एक चूक अशीही..

ढोलाच्या तालावर थिरकणारी नाजूक पावलं...हातातल्या लेझिमाने पकडलेली सुरेख लय... आणि नवतारुण्याचा डौल सांभाळत धुंद होऊन नाचणारी ती...मैदानाच्या एका कोपर्‍यात उभं राहून मी तिची प्रत्येक हालचाल टिपत होतो. तिच्यासमोर रांगा करून उभे असणारे चाळीसेक विद्यार्थी तिचं अनुकरण करीत होते. मध्येमध्ये ती त्यांना काही सूचनाही देत होती. तिचं त्या विद्यार्थ्यांना लेझीम शिकवणं पाहण्यातच मला आनंद मिळत होता.

एका क्षणी अचानक थांबून तिने डोळयावर आलेली केसांची बट मनगटाने मागे सारली. धपापणार्‍या छातीवरची ओढणी सावरत तिने माझ्याकडे पाहिलं.
"तुम्ही नाही खेळणार का?"
माझं तिच्या बोलण्याकडे लक्ष कुठं होतं?
गळ्यातली शिट्टी फुर्रर्रर्र करून तिने पुन्हा विचारलं, "याच अध्यापक विद्यालयाचे आहात ना?"
"हो .. होहो.." भानावर येत मी मान डोलावली.
"मग खेळणार नाही का?"
"अं.. हो .. होना.."
"मग ते लेझीम घ्या आणि मागच्या रांगेत उभे राहा."
इतका दम भरूनही मी सुन्न होतो. आठ-दहा दिवस सरावलेल्या त्या मुलांमध्ये मी धरून आणलेल्या गुन्हेगारासारखा उभा राहिलो. एकतर माझा कॉलेजचा पहिला-दुसरा दिवस आणि त्यात आलेला हा अनपेक्षित प्रसंग...मी पार गांगरून गेलो होतो.

"अहो असं पकडा", पोरगी पुन्हा डाफरली.
चौफेर फिदीफिदी...सगळ्यांच्या वळलेल्या माना आणि बत्तिशीने इतकावेळ शांत असलेल्या माझ्यातल्या पुरुषाला राग येऊ लागला होता.
"तुम्ही सांगा ना कसा ते?" मी ही तणतणलो.
"महेश तुम्ही दाखवा त्यांना", तिने माझ्या शेजारच्या मुलाला खुणावले.
"कोण रे ही?" मला समजावत असताना महेशला मी विचारले.
"अरे दुसर्‍या वर्षाची आहे, मागच्या वर्षी ट्रॉफी मिळवून दिलीये तिने कॉलेजला."
"तरीच भाव खातीये. सर नाही का कुणी शिकवायला?"
"सरांनीच सांगितलय तिला", त्याचं बोलणं होईपर्यंत पुन्हा तिची शिट्टी वाजली.

आत्तापर्यंतच्या माझ्या शालेय जीवनात मला शिक्षिका कधीच नव्हती. त्यामुळे शिकवणे हे फक्त पुरुषाचे काम आहे अशीच माझी धारणा होती. एखाद्या मुलीने मला काही शिकवावं, हा माझ्या दृष्टीने कमीपणा वाटत होता. मला तिच्याविषयी प्रचंड चीड निर्माण होत होती.
"अहो लक्ष कुठे आहे तुमचं?" या तिच्या वाक्यावर मी लेझीम दाणकन भुईवर आपटले.
"तुम्हांला नसेल शिकायचं तर बाजूला बसा."
"हे सांगणारी तू कोण? मला नाही जमत. मी नवीन आहे. तू समजून घ्यायला नको? आणि मुळात मला तुझ्याकडून शिकायचंच नाही."
"बाहेर व्हा आधी."
तीही साधीसुधी नव्हती.

शब्दाने शब्द वाढला. आणि मग धावत जाऊन कुणीतरी सरांना पाचारण केलं.
दुरूनच आवाज देत सरांनी आम्हांला थांबवलं.
"काय प्रॉब्लेम आहे?" जवळ येताच दोन्ही भुवया वर करुन विठ्ठल उभा राहिला.
"सर, तुम्हीच शिकवा मला."
"ही शिकवतेय ना? मग काय अडचण आहे?" माझा शब्द निघायच्या आत..
"हो, हो, तुम्हीच शिकवा सगळ्यांना.." झपझप पावलं टाकत पोरगी निघून गेली.
"तुला शिकायचं नसेल तर उद्यापासून येत जाऊ नकोस मैदानावर", फणकार्‍याने सरही निघून गेले.
इतर मुलंही कुजबुजत निघून गेली. त्यानंतर मी कधीही हातात लेझीम घेतलं नाही.

गोष्ट साधी होती. मी शिकूही शकत होतो, पण एक मुलगी आपल्याला शिकवतेय ही गोष्ट माझ्या मनाला पटत नव्हती. अल्लड वयात केलेला बाष्कळ विचार होता तो. उलट मी तेव्हा इतरांना चिडवायचो की,"एक पोरगी तुम्हांला शिकवतेय, लाज वाटू द्या, पुरुष आहात ना?"

अशा गोष्टी अनेकांच्या आयुष्यात घडल्या असतील, की केवळ खोट्या पुरूषार्थासाठी आपल्या चुकांच आपण समर्थन केलं असेल.

***

"सर, २६ जानेवारीसाठी छानपैकी लेझीम बसवा मुलांचा", परिपाठातच विद्यार्थ्यांसमोर मुख्याध्यापकांनी मला फर्मावले.
पोरांचा आनंद मैदानात मावेना.
"बसवा ना सर...केव्हा सुरु करायचा सराव?", ते निरागस चिमुकले जीव मोठ्या आशेने मला विनवत होते.
"बसवूया, बसवूया", मी तात्पुरती सोडवण केली.
"आता कसं शिकवायचं? मला नाही येत म्हटलं, तर स्टाफमध्ये किती हसं होईल? मुलं काय म्हणतील?" एक ना दोन अशा असंख्य प्रश्नांचा गुंता घेऊन मी स्टाफरूममधे आलो.

डोळ्यासमोर तो कॉलेजचा प्रसंग... ती मुलगी...लेझीम...सर..मी.

किती मूर्खासारखं वागलो होतो तेव्हा? चूक योग्यवेळी कळली तर सावरता येतं. मात्र नाही कळली तर आयुष्य आपल्याला चुकवतं तेव्हा सावरायला संधी मिळतेच असं नाही. मलाही आज तशी संधी नव्हती. तेव्हाच्या पुरुषी अहंकारानं मला आज हरवलं होतं. इतरांची लाज काढणार्‍या मला आता स्वतःचीच लाज वाटत होती. काहीतरी गमावलं होतं. माझ्याच विद्यार्थ्यांचा मी गुन्हेगार बनलो होतो.

पुढे दुसर्‍‍या एका शिक्षकाच्या मदतीने मी मुलांना दिलेला शब्द पाळला. ते त्या मुलांना शिकवत असताना मी तसाच कोपर्‍यात उभा राहायचो जसा कॉलेजात राहात होतो. आता शिकण्याची इच्छा होती. शिकवणाराही पुरुष होता. मात्र मी शिकू शकत नव्हतो...

खरंच, मी पुरुष आहे किंवा ती स्त्री आहे, यातलं कोणतही एक मी विसरलो असतो तरी आज ही वेळ आली नसती. पण हे विसरणं आयुष्याच्या कोणत्याही वळणावर शक्य नसतं. मात्र एखाददुसरा क्षण असा असू शकतो.

एकदा लोकलचं तिकीट काढायला मला उशीर झाला. गाडी पलीकडच्या फलाटावर उभी होती. दादर चढण्या-उतरण्यात गाडी निघून गेली असती. तिकीट हातात पडलं तसं मी अलीकडच्या फलाटावरून खाली उडी मारली. एक ट्रॅक ओलांडून गाडीजवळ आलो. डब्याच्या दरवाज्याचा खांब पकडला. उजवा पाय कसाबसा वर पुरवला. दुसरा पाय वर घेईपर्यंत गाडीचा भोंगा वाजला आणि गाडी सुटली. माझा एक पाय खाली आणि एक वर अशा अवस्थेत मी पुढे पुढे जाऊ लागलो. सर्वांगाला घाम फुटला... तोंडातून शब्द फुटेना...डब्यातले मात्र ओरडत होते. माझी अवस्था लक्षात आल्यावर काही क्षणातच असंख्य हातांनी मला वर खेचून घेतलं. त्या वेळी मी अनुभवलं एका क्षणापुरता मी कोणीही नव्हतो वा मला वाचवणारेही स्त्री नव्हते की पुरूष नव्हते .. होते फक्त जीव.... एका जिवाला वाचवायला धावलेले तसेच काही जीव.

खरंतर जगात आपली प्रथम ओळखच आपण पुरूष आहोत की स्त्री ही आहे. त्यानुसारच आपल्याला नाव दिलं जातं आणि वागणूकही. बालपणीच्या अजाणत्या वयात आपण लैंगिकतेचा जराही विचार करीत नाही. खरोखर याच काळात आपण खरे लिंगनिरपेक्ष असतो. जसजशी आपल्याला 'स्व'ची जाणीव होऊ लागते, आपल्या व्यवहारात बदल होत जातात. एका ठरावीक काळात मुलंमुली अगदी सहज एकत्र खेळ खेळतात, मात्र पुढे समलिंगी व्यक्तींमध्ये रमणे पसंत करतात, आणि त्यापुढे भिन्नलिंगी आकर्षण. लैंगिकता हा व्यक्तीविकासावर परिणाम करणारा अत्यंत महत्त्वाचा घटक आहे. म्हणूनच त्याचा विसर होणं अशक्य आहे. एका विशिष्ट ध्येयाच्या निमित्ताने एकाच ठिकाणी काम करणारे कामाच्या काळात स्वतःला विसरू शकतीलही. मात्र आपण फक्त माणूस आहोत, असं वाटणं फार काळ टिकणारं नाही. म्हणूनच कुठल्याही स्त्रीची वा पुरुषाची मैत्री-ओळख सर्वकाळ लिंगनिरपेक्ष असणे अशक्य आहे. तरीही आपण स्वैर वागत नाही, कारण आहे आपली संस्कृती. स्त्री-पुरूष संबंधांना वेगवेगळ्या स्तरावर, वेगवेगळ्या नात्यांमध्ये बांधून त्यानुरूप व्यवहार करण्यास आपल्या संस्कृतीनेच आपल्याला भाग पाडले आहे. ही नाती रक्ताची असोत वा मानलेली, त्यामागची भावना एकच असते. किंबहुना समाजाने त्या नात्याकडून अपेक्षिल्याप्रमाणेच वर्तन करणे आपल्याला बंधऩकारक बनते. केवळ भाऊ मानलं आणि त्याने रक्षण केलं, अशी उदाहरणं इतिहासात खूप आहेत आणि म्हणूनच वाटतं लिंगनिरपेक्षता रुजवली जाणं कठीण मात्र संस्कृती रुजवणं सोपं आहे.

- शाम

प्रतिसाद

छान :)

शेवटचा पॅरा आणि एकूणच प्रामाणिकपणा फार आवडला शाम

स्वतःची स्वतःलाच लिंगनिरपेक्ष ओळख गवसणे ही एक मोठीच पायरी तुम्ही गाठलीत. छान लिहिलय.

चूक योग्यवेळी कळली तर सावरता येतं. मात्र नाही कळली तर आयुष्य आपल्याला चुकवतं तेव्हा सावरायला संधी मिळतेच असं नाही>>>> मस्तच!

छान लिहलंय, मी इतरही लेख वाचलेत पण तुझ्या प्रामाणीक पणाला सलाम.

लिंगनिरपेक्षता रुजवली जाणं कठीण आहे, मात्र संस्कृती रुजवणं सोपं आहे. >>> हेच, खरं म्हणजे, ढळढळीत सत्य आहे.

लेख आवडला. अनुभव अतिशय प्रामाणिकपणे मांडलेत.

लिंगनिरपेक्षता रुजवली जाणं कठीण मात्र संस्कृती रुजवणं सोपं आहे.>> मान्यच. पण मग आपण समर्थन का करत आहोत या संस्कृतीचे?

प्रामाणिक लेखन भावले.

@ रैना, आपल्या प्रश्नाचं उत्तर शेवटच्या परिच्छेदात आहेच की!

सगळ्या वाचक मित्रांना धन्यवाद आणि लेख स्विकारल्या बद्दल संयुक्ताचे आभार!!
:)

शेवटच्या परिच्छेदातला निष्कर्ष पटला नाही.
<मात्र आपण फक्त माणूस आहोत, असं वाटणं फार काळ टिकणारं नाही. म्हणूनच कुठल्याही स्त्रीची वा पुरुषाची मैत्री-ओळख सर्वकाळ लिंगनिरपेक्ष असणे अशक्य आह>
जिथे अशी ओळख अपरिहार्य आहे अशा जागा/वेळा सोडल्या तर अन्यत्र लिंगनिरपेक्ष ओळखच असायला हवी.
<तरीही आपण स्वैर वागत नाही, कारण आहे आपली संस्कृती.> विचार करू शकणार्‍या/इच्छिणार्‍या माणसाला लिंगनिरपेक्ष विचार करता येत नसेल तर संस्कृती ही जोखड ठरेल. सुसंस्कृत या शब्दात स्वत:च्या सारासारबुद्धीवर , विवेकावर विश्वास अपेक्षित असावा.
<समाजाने त्या नात्याकडून अपेक्षिल्याप्रमाणेच वर्तन करणे आपल्याला बंधऩकारक बनते> बंधनकारक नसतानाही योग्य वर्तन घडणे अधिक चांगले नाही का?

लिंगनिरपेक्षता रुजवली जाणं कठीण मात्र संस्कृती रुजवणं सोपं आहे : संस्कृती रुजवायची की आपणाच संस्कृतीत रुतायचं हे ठरवायला हवं.

संकृती ही प्रवाही असेल तर तिला वळण देणं हेही होत राहणार. लिंगनिरपेक्ष ओळख/मैत्री हेही असेच एक वळण असेल.

शाम.
लेख आवडला.
हि भिन्नता आपल्या मनात बाहेरुनच येते. (मूळातली नसते.) कधी सभोवतालची परिस्थिती कारणीभूत असते तर कधी शिकवण.

धन्यवाद मयेकर >>>>जिथे अशी ओळख अपरिहार्य आहे अशा जागा/वेळा सोडल्या तर अन्यत्र लिंगनिरपेक्ष ओळखच असायला हवी.>>>
लिंगनिरपेक्षता असावी की नसावी हा मुद्दाच दूरचा आहे. आधी असे काही असू शकते का? असेल तर कसे असेल आणि त्यामुळे काय होऊ शकेल? होणारे चांगलेच असेल की त्याचे तोटेही होऊ शकतात ? या सगळ्या बाबी विचारात घ्यायला हव्यात. आणि हे सगळं जर आपल्या आवाक्याबाहेर असेल तर आपण ज्या सामाजिक मूल्यांच्या आधारे जीवनप्रवास करत आहोत ते काय वाईट आहे?

<लिंगनिरपेक्षता असावी की नसावी हा मुद्दाच दूरचा आहे. आधी असे काही असू शकते का? असेल तर कसे असेल आणि त्यामुळे काय होऊ शकेल? होणारे चांगलेच असेल की त्याचे तोटेही होऊ शकतात ? या सगळ्या बाबी विचारात घ्यायला हव्यात. आणि हे सगळं जर आपल्या आवाक्याबाहेर असेल तर आपण ज्या सामाजिक मूल्यांच्या आधारे जीवनप्रवास करत आहोत ते काय वाईट आह>

हे सगळं व्यक्तिसापेक्ष आहे. मला शक्य वाटेल, गरजेचं वाटेल; तुम्हाला कदाचित नाही वाटणार. इतकंच.

>>>>>>>><लिंगनिरपेक्षता असावी की नसावी हा मुद्दाच दूरचा आहे. आधी असे काही असू शकते का? असेल तर कसे असेल आणि त्यामुळे काय होऊ शकेल? होणारे चांगलेच असेल की त्याचे तोटेही होऊ शकतात ? या सगळ्या बाबी विचारात घ्यायला हव्यात. आणि हे सगळं जर आपल्या आवाक्याबाहेर असेल तर आपण ज्या सामाजिक मूल्यांच्या आधारे जीवनप्रवास करत आहोत ते काय >>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>

मुद्दे चांगले नि विचारप्रवणी आहेत.... माझा लेख म्हणूनच मी या विषयाच्या डेफिनिशनबद्द्ल साधारणपणे लिहिला आहे.........माझ्या मते जी गोष्ट समाजात मुळात नसते, ती नव्याने आल्यावर त्यातील फायदे व तोटे दोन्हीही असणारच, त्यांवर मंथन व्हायला हवे.. असे मंथन प्रगल्भ नि सुसंस्कृत समाजाचे लक्षण आहे............ माझ्या मते लिंगनिरपेक्ष समाज अस्तित्वात येईलच काही एक वर्षांत. त्याचे पडघम वाजू लागले आहेतच.......... फायदे असे असतील की लिंगसापेक्ष समाजामुळे असलेले तोटे नाहिसे होतील............ तोटे असे की नवीन प्रकारचे तोटे त्यांची जागा घेतील............. जसे स्त्रिया नोकरी करीत नसत त्यावेळचे प्रॉब्लेम आज नाहिसे झाले आहेत (टोमणे, आर्थिक विवंचना इत्यादी) पणा स्त्रियांसमोर नवीन आव्हाने उभी ठाकली आहेत (उदा. उशिरापर्यंत बाहेर राहायला लागणे, मुलांना आया हव्या तेव्हा न मिळणे इत्यादी)..........

माझा मुद्दा हा की समाजपरिवर्तन करताना नवनवीन समस्या उभ्या ठाकणारच, पण म्हणून काही परिवर्तन घडणे / घडवणे थांबत नाही. असो.

तुमच्या प्रामाणिक लेखाबद्दल शतशः धन्यवाद.

लोकलच्या अनुभवाशी ह्या विषयाचा संबंध एकदम आवडला.

शाम,
लेख छानच!
लोकलच्या अनुभवाशी ह्या विषयाचा संबंध मलाही आवडला.

लेझिम प्रकरणी तुमचं वागणं हे प्रातिनिधीक म्हणावं लागेल,
जेव्हा स्री नवीन काही नवीन गोष्ट करते तेव्हा असं घडणं हे अगदी स्वाभाविक म्हटलं पाहिजे कारण स्रीला अशा भूमिकेत कधी पाहिलेलंच नसतं, त्यामुळे आधी तीचं 'बाईपण' नजरेत भरतं.
आजच्या काळात सुद्धा 'बाईने' गाडी चालवताना overtake केलं की पुरुष चालक चवताळतात, मग ती स्री आपत्कालीन स्थितीत गाडी चालवत असो की घाईत!

प्रामाणिक अनुभव कथन आवडले.

प्रामाणिक अनुभव कथन आवडले.

लेख आवडला. प्रामाणिक विचार मांडलेत.

प्रामाणिक लिखाण. :)

:-)

अगदी मनापासुन लिहीलंय...आवडला लेख :)

शाम : लेख अगदी मनापासुन आवडला, दोन्हीही उदाहरणे अगदी समर्पक आहेत. पण शेवट विशेष भावला.