'लिंगनिरपेक्ष मैत्री-ओळख'

परिसंवादाचं हे शीर्षक वाचलं की आधी काहीतरी बोजड वस्तू डोक्यावर घेतल्यासारखं वाटतं आणि हळूहळू जेव्हा आपण खोलात शिरु लागतो तेव्हा कळतं की, ही वस्तू खरंच फार भारी आहे! आणि ती दररोज आपल्याला वागवावीही लागत आहे!

म्हणजे बघा, आपण आपल्या साधारण बालवयात असताना जेव्हा जगाकडे पाहू लागतो तेव्हा सुरुवातीला आपल्याला लैंगिक जाणीव फार कमी असल्यामुळे आपण फक्त एक जीव असतो. आई, बाबा, भाऊ, बहीण करताकरता नातेवाईक, समाज, जग अशा जाणिवा निर्माण होताना आपलं मन आपल्या नकळत आपली स्वतःची वैचारिक बैठक मेंदूत निर्माण करु लागतं. ही बैठक आपल्या सभोवतालच्या परिस्थितीनुसार आणि आपल्या जीवनातील गरजांनुसार अधिकाधिक पक्की होत जाते, दृढ होत जाते. मग शाळेत गेल्यावर मित्र किंवा मैत्रिणींच्या सहवासात ती अधिक घट्ट होत जाते. तारुण्यात लैंगिक जाणीव अगदी ठसठशीत झालेली असते. इथेच खरी गंमत होते. घराघरांतील शिकवण, आचारविचार, धर्म, जाती वगैरे भेदांचा उभा छेद घेणारी ही लैंगिक जाणीव आपल्या वृत्तीचा एक भाग बनते.

म्हणजे असं की, स्त्रैण जाणिवा किंवा पौरुष जाणिवा वेगवेगळ्या गुणसमुच्चयांनी बनलेल्या असतात. स्त्रिया अधिक 'सोशिक' असतात. पुरुष अधिक 'कठोर' असतात. स्त्रिया अधिक 'मानसिकदृष्ट्या खंबीर' असतात. पुरुष अधिक 'दुष्ट' असतात. असे गुणधर्म थोड्याफार फरकाने बरोबरही असतात. त्यामुळे होतं काय, एखादा कार्यालयीन निर्णय स्त्रीने वा पुरूषाने घेतला तर त्याचे सामान्यत: कामकाजातले परिणाम सारखेच असतात पण त्या निर्णयाचा कार्यालयातील स्त्रियावर व पुरूषांवर वेगवेगळा परिणाम होऊ शकतो. असे होण्यामागे त्या कार्यालयीन संस्कृतीमध्ये लिंगसापेक्ष वातावरण आहे की लिंगनिरपेक्ष या पार्श्वभूमीचा वाटा असतो, नाही का?

एका बाजूने विचार करता लिंगनिरपेक्ष मैत्री असूच शकत नाही कारण आपली स्वतःची लिंग-ओळख आपल्या वैचारिक बैठकीतच ठाम असते. आपण मुलगा/पुरुष/मुलगी/स्त्री आहोत ही जाणीव घेऊनच एखाद्या गोष्टीचा विचार करतो. आपली लैंगिक जाणीव ही आपली पहिली ओळख असते, स्वतःलाही नि इतरांनाही. त्यामुळे लिंगनिरपेक्ष ओळख होण्यात पहिली अडचण येते ती आपल्या लिंगाची.

पुढेपुढे जेव्हा आपण समाजात वावरतो नि त्या समाजात जे चाललेलं असतं त्याचं प्रतिबिंब आपल्या वागण्यात दिसू लागतं. आपण सो कॉल्ड मॅच्युअर होतो नि मग प्रश्न पडू लागतात की काय खरं नि काय खोटं, हे कसं ठरवणार नि कोण ठरवणार? बलात्कार, खून, लैंगिक फसवणूक, चोर्‍यामार्‍या, दहशत, लुबाडणूक या सर्वांतून, आपल्या नैमित्तिक कामांतून आपण विसरून जातो की आपण पुरुष आहोत की स्त्री आहोत, कारण आपल्या सर्वांपुढे एकच प्रश्न उरतो - अस्तित्वाचा.

आज जग जवळ आलं आहे, पण त्याच वेळी लांब जात आहे. वेबमुळे एकमेकाला ओळखत नसलेली माणसे जोडली जाताना, असलेली नाती दुभंगताना पाहणं आपल्या नशिबी आलं आहे. त्यामुळे असे वैचारिक मुद्दे घेऊन त्यावर आपण परिसंवाद घडवून तर आणू शकतो, पण त्यातले मिथ्यापण नाकारु शकत नाही.

लिंगनिरपेक्ष मैत्री होऊ शकणं किंवा न होऊ शकणं हे त्या त्या वेळच्या परिस्थितीवर, इच्छाआकांक्षांवर, 'तुम्हांला काय पाहिजे' यांवर अवलंबून असतं. म्हणजे बघा, आधी मैत्री म्हणजे काय हे समजून घेतलं तर असे प्रश्नच पडणार नाहीत की लिंगनिरपेक्ष मैत्री असू शकते का? स्वतःकडे स्त्री वा पुरूष असूनही लिंगनिरपेक्ष पाहता येते का, ते शक्य असते का, वगैरे. कारण जर मुळात मैत्री म्हणजे काय हेच नक्की ठाऊक नसेल तर लिंग काय नि निरपेक्ष काय, कशाचा कशाशी मेळ लागणार नाही.

संस्कृतात 'मित्र' म्हणजे सूर्य. मी मैत्रीची अशी सोपी व्याख्या करतो की, जो या मित्रासारखा (सूर्यासारखा) सतत आपल्याबरोबर असतो, पण आपल्या लक्षात मात्र येत नाही, जो या मित्रासारखा (सूर्यासारखा) आपल्याला जाणवतो, पण आपल्या आयुष्यात मध्येमध्ये लुडबुड करत नाही, ज्याप्रमाणे सूर्यामुळे प्राणवायू तयार होतो जो आपल्या जीवनाचे कारण आहे व आपण त्यावर जगतो त्याप्रमाणे खरा मित्रदेखील आपल्या आयुष्याच्या प्राणवायूला - आपल्या अहंला - तयार करतो. आणि ग्यानबाची मेख अशी की आपल्या या 'अहं'मध्ये आपली लैंगिक जाणीव 'एम्बेड' झालेली असते.

अशा विचारांतून जर आपण पाहिले तर लक्षात येतं की, मैत्री ही आपल्याला हवी त्याप्रमाणे - लिंगसापेक्ष किंवा लिंगनिरपेक्ष - असू शकते. 'लिंगनिरपेक्ष ओळख -मैत्री' याचा एक अर्थ लैंगिक आकर्षणयुक्त मैत्री असाही होतो व दुसरा अर्थ स्वतःचे लिंग विसरुन मैत्रीकडे निखळपणे पाहणे - न पाहणे असाही होतो. मुळात आपण ज्या परिस्थितीतून जात असतो ती परिस्थिती आपला दृष्टिकोन ठरवित असते. उदाहरणार्थ, जर मी स्वतः पुरुष आहे हे विसरुन एखाद्या पुरुषाशी ओळख करतोय नि तोही तो स्वतः पुरुष आहे हे विसरुन बोलतोय, तर आमच्या संभाषणात कधीतरी त्याच्या किंवा माझ्या किंवा दोघांच्या पुरुषपणाचा संदर्भ येईलच ना! मग त्या संदर्भाच्या वेळी माझी किंवा त्याची प्रतिक्रिया एक पुरुष म्हणून असेल की एक माणूस म्हणून असेल? अर्थात त्यावेळच्या परिस्थितीवर ते अवलंबून असेल ना?

तेच जर दोन स्त्रियांच्या बाबतीत घडलं तरी त्यावेळच्या परिस्थितीवरच त्या स्त्रियाही हे त्या त्या वेळी ठरवतील की लिंगसापेक्ष मैत्री करावी की लिंगनिरपेक्ष ते! उदाहरणार्थ जर त्या वेळी त्या दोघी एखाद्या पुरात सापडल्या असतील तर साहजिकच मानवी नातं निर्माण होईल. तेच जर त्या वेळी अशी परिस्थिती असेल की एकीचा मित्र किंवा नवरा दुसरीबरोबर समजा अफेअर करत असेल, नि त्या दोघी पहिल्यांदाच एकमेकीला कन्फ्रंट करत असतील, तर साहजिकच छानपैकी स्त्रैण नातं निर्माण होईल ना? :-)

तीच परिस्थिती दोन पुरुषांची, किंवा एका स्त्रीची व एका पुरुषाची. फक्त दरवेळी परिस्थितीचे पर्म्युटेशन - काँबिनेशन बदलले की उत्तरे होय / नाही अशी बदलत जातील. तर पहिल्या मुद्द्याचे उत्तर तर मिळाले की 'स्वतःकडे स्त्री वा पुरूष असूनही लिंगनिरपेक्ष पाहता येते का? ते शक्य असते का?', की ते परिस्थितीप्रमाणे ठरते.

आता पुढचा प्रश्न की 'लिंगनिरपेक्ष मैत्री' असू शकते का? नक्कीच असू शकते. मायबोलीवर आपण ते अनुभवत असताना हा प्रश्नच कसा काय पडू शकतो? :-) पण ही वरवरची मैत्री झाली. वर म्हटल्याप्रमाणे खर्‍या मैत्रीच्या निकषावर जर आपण तपासून पाहिले तर लक्षात येते की, अशी 'लिंगनिरपेक्ष मैत्री' होणे न होणे हे सर्वस्वी त्या त्या वेळच्या परिस्थितीवर अवलंबून असते. कारण 'आपल्याला या नात्यातून काय हवे आहे' यावर ते अवलंबून असते ना!

जाताजाता एक मुद्दा प्रकर्षाने जाणवतो तो हा की, आजकाल तोंडओळखीलाही मैत्री म्हणणे प्रचलित झाले आहे, अर्थात अपवाद वगळून. मैत्रीचे 'गाढ', 'वरवरची', 'प्रगाढ', 'खास', 'दाखवण्यापुरती', 'कामापुरती' वगैरे अनेक कंगोरे असतात. यांपैकी जवळच्या मैत्रीतही लिंगनिरपेक्ष भावना असू वा नसूही शकते, तर अंतर राखून असलेल्या मैत्रीत तशी असण्याची शक्यता जास्त प्रमाणात असते असे, ढोबळमानाने म्हणता येईल!

'लिंगनिरपेक्ष मैत्री - अस्तित्व' असणे किंवा नसणे हे त्या त्या वेळच्या सामाजिक गरजांवर अवलंबून असते. तत्कालिक परिस्थितीप्रमाणे याचे उत्तर हो किंवा नाही मिळते. पण मुळात मानवसमूहाचे समाजमन लैंगिक जाणिवेतूनच तयार होत असल्याने लिंगसापेक्ष मैत्री - अस्तित्व असण्याकडे आपला कल असतो.

आजपासून पन्नासेक वर्षांनंतर आपल्याला असा प्रश्नही पडणार नाही, कारण कदाचित तेव्हा लिंगनिरपेक्ष मैत्री-अस्तित्व ही मानवसमूहाची वैचारिक बैठक झालेली असेल. आजच्या जेनेटिक तंत्रज्ञानात ती ताकद नक्कीच आहे. तेव्हाचे जग कदाचित पूर्ण पृथ्वीभर एकाच मानवी संस्कृतीने भरलेले असेल. त्यावेळी सामाजिक संदर्भ बदललेले असतील. मूल जन्माला घालण्यासाठी कदाचित स्त्री-पुरुष लैंगिकदृष्ट्या एकत्र यायची गरज तेव्हा नाहीशी झालेली असेल.

- दीपक भिडे

प्रतिसाद

लेख आवडला.

शेवटचा परिच्छेद उल्लेखनीय. तसंच, ते पुरात सापडलेल्या दोन स्त्रिया आणि अफेअरपोटी आमोरासमोर आलेल्या दोन स्त्रीया - हे उदाहरण देखील आवडलं.

:-)

:)
धन्यवाद ललिता-प्रीति. विशेषतः "लेख आवडला" इतक्या सम्यक शब्दांत लिहिल्याबद्दल नक्कीच धन्यवाद.

आज एक गोष्ट जाणवली ती नमूद करतो: माझ्या लेखातील पहिला परिच्छेद असा आहे :
परिसंवादाचं हे शीर्षक वाचलं की आधी काहीतरी बोजड वस्तू डोक्यावर घेतल्यासारखं वाटतं आणि हळूहळू जेव्हा आपण खोलात शिरु लागतो तेव्हा कळतं की, ही वस्तू खरंच फार भारी आहे! आणि ती दररोज आपल्याला वागवावीही लागत आहे!

वरील परिच्छेदात मी "वस्तू" असे म्हटले आहे त्यावेळी (लेख लिहिताना) मला केवळ 'लिंगनिरपेक्ष मैत्री-ओळख' या बोजड शीर्षकाबद्दल उल्लेख करायचा होता. पण आज जाणवले की "वस्तू" याचा दुसरा अर्थ मानवी लिंग किंवा योनी असाही होतो, जे लेख लिहिताना मला लक्षात आले नव्हते. पण तसा अर्थही कोणी घेतला असेल तरी लेखाच्या मूळ गाभ्याला धक्का पोहोचत नाहिये, त्यामुळे बरे झाले!!

आणि शेवटच्या परिच्छेदाबद्दल जे तुम्ही म्हणालात त्यात तथ्य आहे.... मी एक इंग्रजी सिनेमा पाहिला होता....."रेड हिट" नावाचा.... अर्नोल्ड श्वार्त्झनेगर मंगळावरील वसाहतीत एक प्रयोग म्हणून भविष्यातील मानवाकडून पाठविला जातो. पृथ्वीच्या अणुयुद्धामुळे झालेल्या विनाशानंतर तीवर अतीनील किरणांचे एक आच्छादन तेव्हाच्या (अणुयुद्धातून वाचलेल्या) संस्कृतीने घातलेले असते त्याला (सतत "आत" राहिल्यामुळे कंटाळलेल्या) "काढून" टाकण्यासाठी त्याला तिथे पाठवतात, तो ते काम "भविष्यात" यशस्वीपणे करतो वगैरे त्याचे कथानक आहे. त्यात एका प्रसंगात असे दाखविले आहे की मंगळावर पाठवताना त्याला त्याच्या आवडीची "भविष्यातील स्त्री " निवडण्याची मोकळीक दिली जाते व तो त्याप्रमाणे "बॉडी स्पेसिफिकेशन" तसेच "स्वभावकंगोरे" कंप्यूटर मध्ये नमूद करतो. त्याप्रमाणे त्याला मंगळावर गेल्यावर""तश्शी" स्त्री मिळते! जेव्हा (येणेप्रमाणे) शृंगाराचा प्रसंग येतो, त्यावेळी त्याला तेव्हाची "सेक्स टेक्नॉलॉजी" कळते, की एक डिवाईस दोघांच्या कानाला (जे मेंदूच्या चेतापेशींनाही उत्तेजित करते) लावायचे, व "सेक्स करतो आहोत" अशा भावना मनात आणायच्या........... खरोखरच्या शृंगाराच्या वेळेप्रमाणे सर्व शारिरीक क्रिया ते यंत्र घडवून आणते व दोघेही स्पर्शाशिवाय परमोच्च बिंदूपर्यंत पोचत जातात.........!!

हा प्रसंग दिग्दर्शकाने फार खुबीने प्रदर्शित केला आहे व तो पाहताना कधीही उत्तानता जाणवत नाही........... पटकथेची गरज म्हणूनच तो दाखवला गेला आहे आणि केवळ तीन-चार मिनिटांत फार प्रभावीपणे तो दाखवला गेल्यामुळे एकंदर मला फार आवडला होता.......... त्या प्रसंगाचा माझ्या लेखासंदर्भात उल्लेख करावासा वाटला म्हणून लिहिले.

दीपक भिडे, बहुतांश मुद्दे पटले. :)

मुद्दे खूप चांगल्या प्रकारे मांडलेत.
शेवटच्या परिच्छेदातील मुद्दा मात्र फारच काल्पनिक(फिक्शन) वाटला.

उल्हास.धन्यवाद. पण तुम्ही एक लक्षात घ्या की फिक्शन काही प्रमाणात फॅक्ट बनतेच.......... कितीतरी उदाहरणे देता येतील.......... केवळ स्वप्नरंजनाचा (फॅण्टसी) भाग अलाहिदा, पण मी अशा नजिकच्या काळात येऊ घातलेल्या फिक्शन बद्दल लिहिले आहे. असो.

छान लेख. विषयाला समर्पक :)

स्त्री-पुरुष यांच्या मेंदूंतील फरकाबद्दल एक फार छान धागा मिळाला. वाचा तर खरं :

http://www.brainfitnessforlife.com/brain-anatomy-and-imaging/9-differenc...

उल्हास : भिडे॑नी मा॑डलेला मुद्दा काल्पनिक नाहिये, ते स॑शोधन सुध्दा अ॑तिम टप्प्यात आहे.