चिल्लॅ s क्स मॉम !

त्याला तसं जाताना पाहून प्रिया अचंबित होऊन सोफ्यावर बसली. काय बोलतोय हा ? एवढं बोलायला कधी शिकला? मुळात हे इतके विचार कसे यायला लागले ह्याच्या डोक्यात ?
' तू मला नेहमीच असं करतेस ' ' मी तुला आवडतच नाही ' ही वाक्यं कुठून आली ?
मी तर किती व्यवस्थित वागते ह्याच्याशी. मग नेमकं काय चुकलं ? आणि कधीपासून ? मला कसं कळलं नाही ?
हिरवळीचं ध्येय उराशी घेऊन चालत राहावं आणि नजरेच्या टप्प्यात येताच ते मृगजळ असल्याची जीवघेणी जाणीव व्हावी तशी एक कळ उठली प्रियाच्या मनात!

borderpng.png

"रा

मा, माझी लाल पँट कुठेच दिसत नाहीऽये."
" अरे लक्ष्मणा, असं काय करतोस ? तिकडे वॉशिंग मशिनवर ठेवली आहे बघ. पण धुवायची राहिली आहे हं अजून."
" ओह नो! रामा, असं काय करतोस रे तू ? मला युद्धावर जाताना लालच पँट घालावी लागते हे तुला माहीत आहे ना ?"
" हो रे बाबा, चांगलंच माहीत आहे. पण दिवसातून हज्जार वेळा तू युद्धावर जातोस, मेलेला रावण पुन्हापुन्हा जिवंत करतोस. त्याला मी काय करू? ढीगभर पँटस पडल्या आहेत घरात. त्या नको असतात तुला. सारखी कुठून देऊ तुला तीच लाल पँट?" प्रिया जरा वैतागून म्हणाली.
" ओक्के. चिऽल्लॅक्स मॉम ! मला एक आयडिया सुचली आहे. आपण ना माझी लाल पँट जमिनीत पेरूया. मग तिथे झाड उगवेल. त्याला खूप खूप लाल ' पँटी ' येतील. मग मी तुला लाल पँटसाठी अज्जिबात मस्का लावणार नाही. मी स्वतःच रोज नवी पँट तोडून घेईन, घालीन आणि जाईन रावणाला मारायला."

जेमतेम ५ वर्षांच्या लेकाचे असले कल्पनाविष्कार ऐकून प्रियाला हसू आवरेना. त्याला लाडाने कुरवाळण्यासाठी ती पुढे वाकली...पण पिल्लू केव्हाच तिथून सटकलं होतं.

युद्धावर जाण्यासाठी 'आवश्यक सामग्री' न मिळाल्याने तो बेत तूर्तास रद्द करून चिरंजीव आता 'मिकी माऊस क्लबहाऊस' पाहयला बसले होते.
चला, म्हणजे आता रामाच्या भूमिकेतून प्रियाला बाहेर निघायला लागणार आणि लेकासोबत ' मिऽश्का मुऽश्का मिक्कीऽ माऊस ' च्या घोषणा द्याव्या लागणार. शिवाय शेवटी डान्सही. ' हॉड्डॉग हॉड्डॉग हॉड्डिगिटी डॉग '!

Chillox1.jpgआणि काय ते एकेक शब्द, चिलॅक्स म्हणे. पहिल्यांदा त्याच्या तोंडून हा शब्द ऐकला तेव्हा प्रियाला वाटलं, अधूनमधून हा एखादा शब्द विसरतो आणि तिसरंच काहीतरी म्हणतो, त्यातलाच हा प्रकार असेल.
म्हटलीसुद्धा ती त्याला," ए, चिलॅक्स काय चिलॅक्स? रिलॅक्स म्हण ना! "
तर त्यानेच तिला ऐकवलं, "ए हॅलो, मी काय चुकून नाही म्हटलं तसं. रिलॅक्स म्हणजे-शांत हो. आणि चिलॅक्स म्हणजे- शांत तर होच, पण जरा गारेऽगाऽर पण हो. म्हणजेच उग्गीच्या उग्गीच विचार करत बसू नकोस. कळ्ळं ?"
" हो कळ्ळं ! " प्रिया त्याला वेडावून दाखवत म्हणाली. असलं सगळं शिकतो तरी कुठून हा, असा विचार करतच तिने तिच्या (अ)ज्ञानकोषात एक नवीन शब्द साठवून ठेवला.

दुसर्‍या दिवशीच्या मीटिंगची तयारी करता करता प्रिया नकळत विचारचक्रात अडकत गेली.
तिच्या आणि लेकाच्या नात्याचा नाही म्हटलं तरी, प्रियाला अभिमान होता.
" छान जमतंय की आपल्याला सगळं. आई होणं इतकं पण काही अवघड नसतं."

हे असे विचार आणि त्यात 'आई' हे नाव येताच....मस्त लखलखीत ऊन पडलेलं असताना अचानक आकाशात मळभ दाटून यावं, तसं झालं प्रियाला.
हे असं होणं प्रियाला नवीन नव्हतं. कित्तीही विसरायच्या म्हटल्या तरी पुन्हा पुन्हा डोकं वर काढणार्‍या त्या असंख्य घटना....

उन्हाळ्याची सुट्टी. दुपारची वेळ. 'श्रीमान योगी' वाचत प्रिया लोळत पडली होती.
" पियु, जरा भाजी निवडून ठेव."
"......."
"पियु...ऐकू येतंय का ? भाजी निवडून ठेव." आवाज जरा चढलेला.
" अं...काय म्हणालीस ?" प्रियाचा कापरा आवाज, डोळ्यांत तुडुंब पाणी.
" अऽगोऽबाई, भाजी निवडायला सांगितली तर त्यात रडण्यासारखं काय आहे ? अतिच झालं आता हे."
" अगं आई....मी...त्याच्यासाठी नाही रडत...मला हे..." प्रियाला धड बोलताही येईना.
" मग झालं काय?"
काय सांगणार ? पुरंदरचा तह झाला आहे, मिर्झाराजांच्या तळावर असलेल्या शिवाजीराजांची तगमग, घालमेल नुसती वाचूनही मला सहन होत नाहीये. आपोआप रडू कोसळतंय.
तिला सगळा खुळेपणा वाटला असता. शिवाय पुन्हा कधी श्रीमान योगीला हात लावू नसता दिला तिने.
" आई गं, संध्याकाळसाठी हवी आहे ना भाजी. जरा वेळाने निवडून देते. अजून थोडं वाचू दे ना."
" नाही. आत्ताच ऊठ. पुस्तक हातात घेतलं की भान नसतं कशाचं...मुलीच्या जातीला थोडी तरी कामाची सवय हवी की नको."
" आई प्लीज हं. आता ह्यात मुलीची जात कुठून आली ?"
" मग काय तर. सारखंच काय पुस्तक हातात धरून बसायचं? अभ्यास असेल तर गोष्ट वेगळी आहे. तेव्हा काही बोलते का मी? आणि तुझ्याच चांगल्यासाठी सांगते ना मी. "
" तू नेहमीच असं करतेस मला. काय प्रॉब्लेम आहे तुला माझ्याशी ? काहीच माझ्या मनासारखं वागू देत नाहीस." प्रिया वैतागून म्हणाली.
" प्रिया, उलट उत्तरं देऊ नकोस हं. तुझ्या भल्यासाठीच करतेय ना सगळं. हीच जाणीव ठेवतेस का?"
वाद घालण्यात अर्थच नव्हता. पुढचे सगळे संवाद प्रियाला तोंडपाठ झाले होते.
ती धुसफुसत उठली.
आधीच पुस्तकातल्या प्रसंगाने आलेली अस्वस्थता, त्यातून ' आई अशी का वागते माझ्याशी? ' हा छळणारा, अनुत्तरित प्रश्न.

आज जवळ-जवळ १४-१५ वर्षांनी सुद्धा त्या छळवादी प्रश्नाची कडवट चव प्रियाला जाणवली. मनावर चरे उमटवून गेलेले असे कितीतरी प्रसंग.
कुठले सणवार असू दे, शाळेतल्या मैत्रिणींना घरी बोलवायचं असू दे, किंवा प्रियाला त्यांच्या घरी एक रात्र
राहयला जायचं असू दे, त्याआधी काहीतरी गंभीर नाट्य घडलंच पाहिजे घरात.
प्रत्येक वेळी जखमी झालेल्या मनावर बाबा फुंकर घालायचे.
" जाऊ दे सोनु, असतो एकेकाचा स्वभाव जरा चिडका. आणि तुझ्या चांगल्यासाठीच सांगते ना ती तुला. हां, पद्धत जरा चुकते तिची. पण तू समजूतदार आहेस ना. तू दुर्लक्ष कर."
" का पण असं ? माझी चूक असेल तर तिने मला खुश्शाल रागवावं ना. मी काहीच नाही म्हणणार. पण उगीचच का ?"
" जनरेशन गॅप असते बाळा ही."
" मग माझ्या मैत्रिणींच्या आया का असं नाही वागत त्यांच्याशी ? तुमच्यात आणि माझ्यात का नाही ही जनरेशन गॅप ? तुम्हाला कसं सगळं समजतं माझ्या मनात काय चाललंय ते ?"
काय बोलणार बाबा तरी ? गप्प व्हायचे.

काही दिवसांनी प्रिया कॉलेजसाठी होस्टेलवर राहिली.
बरोबरच्या मैत्रिणी जेव्हा घरची, त्यातही आईची आठवण येऊन हळव्या व्हायच्या, रडायच्या, तेव्हा प्रियाच्या मनाचा मोठ्ठा कप्पा बाबांच्या आठवणींनी भरलेला असायचा. गेल्या काही वर्षांत आईशी इतके वरचेवर वाद व्हायचे , की तिला आईच्या चांगल्या आठवणींपेक्षा ह्या दुखर्‍या आठवणीच जास्त यायच्या.

शिवाय ह्याबाबत कुणासमोर मन मोकळं करायलाही ती संकोचून जायची. अगदी जवळच्या सखीलाही तिने हा सल कधी बोलून दाखवला नाही.
कारण एकच, आजपर्यंत तिने कधीच कुणालाही आईबद्दल वावगं बोलताना ऐकलं नव्हतं !
व्यसन लागल्यासारखी असंख्य पुस्तकं वाचली होती तिने, पण त्यातही कधी कुठे आईबद्दल वाईट लिहिलेलं वाचलं नव्हतं.
उलट सगळीकडे आईचे गोडवे. आई म्हणजे त्यागाची मूर्ती, वात्सल्याचा पुतळा, कायम हसतमुख, कर्तव्यदक्ष, तिन्ही जगाचा स्वामी असला तरी आईविना भिकारी, वगैरे वगैरे. कधी आईबद्दल वाईट लिहिलेलं असेलच तर ते मात्र हमखास सावत्र आईविषयीच असायचं.

कधी कधी प्रियाला वाटायचं, " शी! आपणच कृतघ्न आहोत. जिने आपल्याला जन्म दिला,वाढवलं, तिच्याविषयी आपल्याला असं का वाटतं? प्रत्येकच वेळी नाही ती आपल्याशी वाईट वागत. कितीतरी वेळा मायेने जवळ घेते. आपणच थोडं दुर्लक्ष करू या. "
कोण चूक, कोण बरोबर ह्या विचारांमध्ये प्रिया भेलकांडत रहायची. स्वतःच्याच मनाला खात रहायची.
पण पुन्हा एखादा वाग्युद्धाचा प्रसंग घडला की ती पुन्हा ताज्या जखमांनी घायाळ व्हायची.

एकदा अशाच कुठल्यातरी प्रसंगानंतर प्रियाने अगदी कळवळून विचारलं होतं,"आईलाच मी आवडत नसेल तर मी जगू तरी कशाला? बाबा, ती खरंच माझी सख्खी आई आहे ना की सावत्र आहे ? दादा म्हणतो तसं खरंच मला तिने चतकोर भाकरीच्या तुकड्यावर विकत घेतलंय का?"
बाबांच्या डोळ्यांत टचकन पाणी आलं होतं. " काहीतरी बोलू नकोस सोन्या. तू आम्हाला खूप आवडतेस. थोड्या दिवसांत होईल सगळं ठीक."

आणि खरंच थोड्या दिवसांत नाही, तरी २-३ वर्षांत बरंच निवळलं होतं.

वादाचे प्रसंग जाणवण्याइतपत कमी झाले होते. आई शांत झाली होती की प्रिया दुर्लक्ष करायला शिकली होती ? कारण काही का असेना, प्रियाला हुश्श वाटलं होतं. पण कोवळ्या, हळव्या मनावर जे आघात व्हायचे ते मात्र होऊन गेले होते.
पूर्ण बहरलेल्या, हिरव्यागार बगीच्यामध्ये एखादंच सुकून गेलेलं रोपटं असावं तसं आई-मुलीचं हे नातं प्रियाच्या मनाचा एक कोपरा धरून बसलं होतं !

त्यावेळीच तिने ठरवून टाकलं होतं, आपण खूप छान आई व्हायचं. आपल्या मुलांशी मैत्री करायची. त्यांच्या भावना समजून घ्यायच्या. थोडक्यात म्हणजे आईकडून मिळायला हव्या अशा ज्या ज्या सुखांसाठी आपण कायम भुकेले राहिलो, ती सगळी सुखे आपल्या मुलांना भरभरून द्यायची !

" आई, हे बघ गंमत. "
" काय आहे रे ?" मनातले विचार बाजूला सारून, प्रिया उठून अर्णवकडे गेली.
" हे बघ ना, मी काय चित्र काढलंय. आपण सगळे बोटीतून चाललोय.....आणि मागून एक येऽवऽढ्ढा मोठ्ठा शार्क आलाय....त्याने तुझी ओढणी पकडलीये तोंडात. आणि मी आणि पपा त्याला गुदगुल्या करतोय. त्याने हसायला तोंड उघडलं, आणि तू तिथून पळून चालली आहेस. "
चित्रातले मजेशीर तपशील बघता बघता मग प्रियाने आणि पिलूने भरपूर कल्ला केला....
त्याच्यासोबत खळखळून हसताना यशस्वी आईपणाची जाणीव हळूच कुठेतरी प्रियाच्या मनाला गुदगुल्या करत होती !

दिवस भराभर जात होते. बघता बघता पिलू ६ वर्षांचा झाला. सगळं छान....अगदी आखून दिल्यासारखं चाललं होतं.

Chillox4.jpgअशाच एका संध्याकाळी प्रिया ऑफिसमधून घरी येऊन नुकतीच टेकली होती.
आजूबाजूला नजर फिरवली.
" मन्या, कित्ती हा पसारा ! जरा आवरून ठेव बरं."
" ठेऽवऽतोऽऽय..."
" पटकन "
" हो गं आई, किती त्रास देतेस ?"
" छान, मी तुला त्रास देते ? आई दमून घरी आल्यावर घर जरा नीटनेटकं ठेवायचं सोडून सगळं रणांगण केलंयस, आणि मलाच म्हणतोयस किती त्रास देतेस !"
" मी नाही आवरणार आत्ता. मला कार्टून बघायचंय."
" अर्णव, टीव्ही बंद कर. फार वेळ कार्टून्स नाही बघायचे म्हणून सांगितलंय ना तुला. मला चिडायला लावू नकोस हं."
" तुला चिडायला काहिही कारण पुरतं. मला नेहमीच असं करतेस तू. "
" अरे, काय बोलतोयस तू ? "
" मग क्काय तर. तुला मी आवडतच नाही. म्हणूनच तू मला सारखं सामान तरी आवरायला लावतेस, किंवा कार्टूनच बघू नकोस म्हणून मागे लागतेस, नाहीतर मग ते मेथीचे पराठे खायला घालतेस. जा, मला नको तू !"
" अरे, पण तुझ्या चांगल्यासाठीच तर .... "
प्रियाचं वाक्य पूर्ण व्हायच्या आधीच, डोळ्यांत काठोकाठ भरलेलं पाणी घेऊन अर्णव पाय आपटत दुसर्‍या खोलीत निघून गेला.

त्याला तसं जाताना पाहून प्रिया अचंबित होऊन सोफ्यावर बसली. काय बोलतोय हा ? एवढं बोलायला कधी शिकला? मुळात हे इतके विचार कसे यायला लागले ह्याच्या डोक्यात ?

' तू मला नेहमीच असं करतेस ' ' मी तुला आवडतच नाही ' ही वाक्यं कुठून आली ?

मी तर किती व्यवस्थित वागते ह्याच्याशी. मग नेमकं काय चुकलं ? आणि कधीपासून ? मला कसं कळलं नाही ?
हिरवळीचं ध्येय उराशी घेऊन चालत राहावं आणि नजरेच्या टप्प्यात येताच ते मृगजळ असल्याची जीवघेणी जाणीव व्हावी तशी एक कळ उठली प्रियाच्या मनात!

आत्ताशी ६ वर्षांचा आहे हा. अजूनही आईपपांच्या पंखांच्या सावलीत वाढणारा. एवढ्यातच असे प्रश्न पडतात ह्याला. आणखी ७-८ वर्षांनी काय होईल ? त्यावेळी तर खरी जनरेशन गॅप पडत जाते ना.

जमेल का ह्याला हाताळणं? की तोच इतिहास पुन्हा घडणार? आईबाबत माझ्या ज्या भावना झाल्या, तशाच अर्णवच्या सुद्धा माझ्याबाबत. नुसत्या कल्पनेनेच प्रिया घाबरी झाली.

की आईचं चुकलंच नाही काही ? हे असंच होतं का सगळ्यांचं ? साध्या साध्या गोष्टी तिथेच सोडून द्यायला मला जमलं असतं तर आज आईचं आणि माझं नातं जास्त टवटवीत राहिलं असतं का ?

आई असली तरी ती स्वतः एक माणूस असतेच ना. स्वतःच्या भाव-भावना असलेलं माणूस ! Chillox5.jpg
तिच्या 'आईपणा' कडून अपेक्षा करता करता आपण तिच्यातल्या व्यक्तीवर फार मोठा अन्याय करत आलो का? ह्या अथांग नात्याच्या लाटांमध्ये 'आदर्श' आईपणाचा भोवरा तयार करून त्यातच गटांगळ्या खात राहिलो का?

फार भावुक राहणं हाही एक प्रकारचा दोषच ना!

काहितरी विचार मनात येऊन प्रिया पटकन उठली....काहिशा समाधानाने तिचा चेहरा उजळला होता.
मनाच्या निर्णयाला बुद्धी मोडता घालायच्या आत तिला दोन गोष्टी करायच्या होत्या....
रुसून बसलेल्या लेकाला अगदी सहजपणे जवळ घ्यायचं होतं, स्पर्शाने सांगायचं होतं की, "तू एकटा नाहीस. मी आहेच तुझ्यासोबत. कधीकधी चिडणारी, कधीकधी भांडणारी. पण सतत तुझ्यावर प्रेम करणारी."

आणि दुसरी गोष्ट करायची ती म्हणजे....
आईला फोन करून म्हणायचं ,"चिल्लॅऽक्स मॉम"....
तिने नवीनच ऐकलेल्या ह्या शब्दाबद्दलची तिची गोंधळलेली प्रतिक्रिया ऐकायची आणि कसलीच तक्रार न करता, सुकलेल्या रोपट्याला पाणी शिंपत राहयचं !!

- रुणुझुणू