एलेमेंटरी, माय डिअर..

होम्सचा भारतीय कर्मचार्‍यांशी संबंध आला नाही हे बरेच म्हणायचे. त्याहीपेक्षा एकाही हिंदी चित्रपट निर्मात्याला होम्सवर चित्रपट काढावासा वाटला नाही याचा अर्थ देव जागा आहे असे म्हणायला जागा आहे.

borderpng.png

हारा वाळवंटातल्या एका लहानशा खेड्यात आपलं आयुष्य काढलेला एक माणूस पहिल्यांदा शहरात मुलाकडे गेला. त्याचा पोरगा उत्साहाने त्याला मोठ्या पडद्यावर "टायटॅनिक" दाखवायला घेऊन गेला. चित्रपट संपल्यावर त्याने आतुरतेनं बापाला विचारलं,

"काय, आवडला का?"
"हो तर," बाप म्हणाला, "इतकं मुबलक पाणी असल्यावर कुणाला नाही आवडणार?"

rajkashanalekh1.jpgहे आठवायचं कारण शेरलॉक होम्सच्या कथा बघताना आणि वाचताना लोक त्याच्या प्रखर बुद्धिमत्तेमुळे, अजोड तर्कामुळे प्रभावित होतात, मात्र आमचं लक्ष भलतीकडेच असतं!

जेव्हा बघावं तेव्हा होम्स⁽¹⁾ त्या बिचार्‍या मिसेस हडसनना⁽²⁾ दुस्वासाने वागवत असतो. कल्पना करा, त्यांच्या जागी एखादी भारतीय मोलकरीण असती तर?

होम्स: वॉटसन, आता एक क्षणही दवडून चालणार नाही. तो लंडनचा नकाशा या टेबलावर पसर. गंगूबाई⁽³⁾, गंगूबाई, किती पसारा झाला आहे या टेबलावर?
गंगूबाई: पसारा झालाय तर मी काय करू? द्येवानं दोनच हात दिलंत की मला. सकाळधरनं उभी हाय मी, कंबरेचा काटा ढिला झालाय निस्ता. सुनामी आल्यागत घरात पसारा करून ठेवायचा आन मंग गंगूबाईला आवरायला सांगायचा. आन ह्या आठवड्यात बोनस देनार हुते त्याचं काय झालं? उद्यापर्यंत बोनसचं बघा नायतर मोरियार्टीकडं खुल्ली ऑफर हाय मला! नंतर म्हनू नगा, न सांगता गेली म्हनून. जाते आता, पोरगं यायचंय शाळेतून. किचनमधी कपबश्या पडल्यात, त्या धुऊन ठेवा, उद्यापर्यंत र्‍हायल्या तर मुंग्या लागतील.

होम्स कपाळ बडवून घेतो!

या कथांमधील दुसरे आश्चर्यजनक पात्र म्हणजे टांगेवाले. कधीही, कुठेही जायला एका पायावर तयार असतात. बरं, भाड्याविषयी चकार शब्द काढत नाहीत. जे दिलं ते निमूटपणे घेतात, थांबावं लागलं तर वेटिंग चार्जही लावत नाहीत. त्या जागी पुण्याचा टांगेवाला असता तर?

होम्स: (वॉटसनबरोबर धावत येत) मित्रा, चल लवकर. रेल्वे स्टेशन.
टांगेवाला होम्स आणि वॉटसनला बाजूला व्हा अशी खूण करतो. ते लगबगीने बाजूला होतात तसा तो दोन बोटांनी ओठांसमोर 'व्ही' चा आकार करून दोघांच्या मधून पानाची पिंक टाकतो आणि जिभेने 'चक्क' असा आवाज करतो.

होम्स: म्हणजे?
टांगेवाला: जमनार नाय.
वॉटसन: जमणार नाही? अरे बाबा, हा कुणाच्या तरी जगण्या-मरण्याचा प्रश्न आहे.
टांगेवाला: रेलवे ठेसन म्हंजी मला उलट पडतय, तिकडून सवारी भेटत नाय. मधे अंधार हाय, घोडं बिचकतं . . . हाफ रिटन पडेल बघा . . .
वॉटसन: हे बघा, तुम्ही कायद्याने असे करू शकत नाही.
टांगेवाला: ओ सायेब, बिंधास कंप्लेंट करा ना. आपन कुनाला डरत नाय. आन यवढ्या रातचं ठेसनला जाताच कशापायी तुम्ही, सकाळी जावा की आरामशीर.

होम्स परत कपाळ बडवून घेतो!

होम्सच्या अजरामर कथांमधील एक म्हणजे 'ऍबी ग्रेंजचे प्रकरण'. हा प्रसंग पुस्तकात नाहीये मात्र मालिकेत आहे. यात होम्स आणि वॉटसन रेलवे स्टेशनच्या बाकावर बसलेले असतात.

होम्स म्हणतो "आपली गाडी आली."
वॉटसन म्हणतो, "मला तर गाडीचा आवाज नाही आला."
मग होम्स म्हणतो, "मलाही नाही आला." पण त्याला गाडीचा धूर दिसला, हातात हिरवे निशाण घेतलेला गार्ड दिसला, त्यावरून त्याने अनुमान काढलं, वगैरे वगैरे, नेहेमीची शायनिंग.

जर इथे आपली भारतीय रेल्वे⁽⁴⁾ असती तर?

"आपली गाडी आली." होम्स.
"होम्स, गाडी येते आहे हे खरे आहे. पण ती कालची गाडी आहे. २४ तास लेट." इति वॉटसन.

घोषणा: सभी यात्रियों से निवेदन है की होशियारपुरसे दिल्ली जानेवाली आकांक्षा एक्सप्रेस २४ घंटे देरी से प्लॅटफॉर्म क्रमांक २ पर आ रही है. यात्रियों की असुविधा के लिये खेद है.

होम्सच्या कपाळावर पिटुकले टेंगूळ आले आहे!

होम्सचा भारतीय कर्मचार्‍यांशी संबंध आला नाही हे बरेच म्हणायचे. त्याहीपेक्षा एकाही हिंदी चित्रपट निर्मात्याला होम्सवर चित्रपट काढावासा वाटला नाही याचा अर्थ देव जागा आहे असे म्हणायला जागा आहे.

होम्सचे हिंदी चित्रपटात काय कडबोळे झाले असते कुणास ठाउक. मध्यंतरापर्यंत तर वॉटसन-मिसेस हडसनचे विनोद वगैरे. गुंडाच्या भूमिकेत रंजीतच्या यक्ष्ट्रा करिकुलर ऍक्टिव्हीटीज. होम्स सज्जनांचा तारणहार आणि दुर्जनांचा कर्दनकाळ आहे अशा अर्थाचे एक गाणे. (जिंदगी तो बेवफा हय टाइप). इंटरव्हलनंतर काली घाटीमधल्या रंजीतच्या अड्ड्याचा होम्सला पत्ता लागणार. मग होम्स गुंडाला पकडणार इतक्यात गुंडीणीच्या भूमिकेत बिंदू तिरछी नजरोंसे होम्सला घायाळ करण्याचा प्रयत्न करत गाणं म्हणणार. त्याच वेळी मिसेस हडसन येशूच्या मूर्तिसमोर प्रार्थना करीत आणखी एक गाणे म्हणणार. शेवटी गुंड ताब्यात आल्यावर 'कानून के हाथ बहोत लंबे होते हय' - इति लस्ट्रेडच्या भूमिकेतील अंजन श्रीवास्तव.

अर्थात होम्सवर मराठी किंवा हिंदी मालिका निघाली तर हे सर्व ऑस्करपात्र वाटायला लागेल. मालिकेचे २५-३० भाग तर मिसेस हडसन घराची सफाई करताना दाखवण्यातच निघून जातील. मग वॉटसनच्या क्लिनिकमध्ये १०-१५ एपिसोड, त्यातल्या एखाद्या पेशंटचा आजार, त्याच्या घरातल्या अडचणी, पेशंटच्या सासूला निमोनिया होतो, त्याचा घटस्फोट आणि प्रेमप्रकरण (हे फारच इंटरेष्टींग व्हायला लागलं तर सगळी मालिका इथेच), त्याच्या ऑफिसमधील क्लार्कच्या वडीलांच्या मित्राचा धाकटा मुलगा शिकारीला गेलेला असताना जखमी होतो, हे सगळं होईपर्यंत एक-दीडशे भाग सहज निघून जातील. (काळजी करू नका, जोपर्यंत पडद्यावर हालचाल होते आहे तोपर्यंत प्रेक्षक नेटानं बघत राहतात. जातील कुठं?) मग अखेर (नाइलाजास्तव) होम्सचं आगमन. वीस-पंचवीस भाग होम्सची दिनचर्या, तो आणि वॉटसन गप्पा मारणार, चहा पिणार, गप्पा मारणार, सिगरेट पिणार, गप्पा मारणार, जेवणार, गप्पा मारणार, मिसेस हडसनशी किरकोळ कारणावरून खटके उडणार, गप्पा मारणार, खिडकीतून बघणार, गप्पा मारणार.

असे २०० भाग झाले की एक दिवशी एक क्लायंट येणार. (इतके एक्साइट होऊ नका, अजून क्लायंट यायला २०-३० भाग बाकी आहेत. कुठं काश्मीर-सिंगापूर-हवाई-अंटार्क्टिका ट्रिप वगैरे करायची असेल तर खुशाल करून या.)

मग संवाद पुढीलप्रमाणे . . .

होम्स: मित्रा . . .
वॉटसन: बोल . . .
होम्स: एक बातमी आहे. (ढ्याण-ढ्याण-ढ्याण)

क्यामेरा होम्स वर तीनदा, वॉटसनवर तीनदा.

वॉटसन: बातमी? बातमी? बातमी? (मूळ बातमीचे दोन एको)

होम्सचा तीव्र कटाक्ष. वॉटसनाचा प्रत्युत्तर म्हणून आणखी तीव्र कटाक्ष.

होम्स: हो
वॉटसन: बोल
होम्स: माझ्या . . .
वॉटसन: तुझ्या?
होम्स: माझ्या. . . माझ्या . . .
वॉटसन: तुझ्या . . . तुझ्या काय मित्रा?

होम्स त्याच्या हात उंच करून हातातील बाटली दाखवतो. क्यामेरा स्लोमोशनमध्ये बाटलीला तीन प्रदक्षिणा घालतो.

होम्स: माझ्या. . . माझ्या . . . माझ्या बाटलीतील शाई संपली आहे.

होम्सचा तीव्र कटाक्ष. वॉटसनाचा प्रत्युत्तर म्हणून आणखी एक जळजळीत कटाक्ष.
(ढ्याण-ढ्याण-ढ्याण)

क्यामेरा होम्स वर तीनदा, वॉटसनवर तीनदा. चित्र फ्रीझ होते.

होम्ससहित इतर सर्व अभिजात कलाकृतींकडे आपल्या मालिका निर्मात्यांचे लक्ष जाऊ नये हीच प्रार्थना.
इत्यलम.

तळटीपा:

⁽¹⁾: पुणे-मुंबई परिसरातील होम्सचे पंखे आणि पंखिण्या यांची संख्या लक्षात घेता लेख वाचल्यानंतर लेखकाच्या घरावर मोर्चा - बहुतांशी लाटणे मोर्चा - येण्याची दाट शक्यता आहे. स्वसंरक्षणार्थ लेखक हे स्पष्ट करू इच्छितो की होम्स त्याचाही अत्यंत आवडता आहे. लेखातील विनोद हे आपण घरातील एखाद्या आवडत्या माणसाची थट्टा करतो त्या पद्धतीने घ्यावेत आणि लाटणी परत फडताळात ठेवावीत.

⁽²⁾ मिसेस हडसनसारखी मोलकरीण भारतात सापडली तर तिला पद्मश्री द्यायला काहीच हरकत नाही. तसेही पद्मश्रीसाठी किमान नाकातून तरी गाता यायला हवे किंवा आयटेम नंबर करण्याइतका तरी अभिनय करता यायला हवा या आतापर्यंतच्या जाचक अटी आता शिथिल करण्यात येतील असे ऐकून आहोत. आधारचे काम संपले की निलेकणी पद्मश्रीसाठी सुलभ आवेदन फॉर्म डिझाइन करणार आहेत म्हणे. पूर्वी लोक बजाजच्या गाड्यांसाठी नंबर लावायचे, आता पद्मश्रीसाठी लावतील, हाय काय अन नाय काय!

⁽³⁾ इथे मिसेस हडसन नऊवारीत कशा दिसतील असा विचार मनात आला.

⁽⁴⁾ सध्याच्या काळातील भारतीय रेल्वे बरीच सुधारली आहे. पूर्वी रेल्वे प्रवासाला जाताना घड्याळाऐवजी क्यालेंडर घेऊन जावे असे म्हणायची पद्धत होती.

- राजेंद्र क्षीरसागर ( राजकाशाना)