अतर्क्य!!!

तो आपल्याच माणसांच्या म्हणे मर्जीत जगतो आहे
कधी त्यांच्या प्रेमात तर कधी धमकीत जगतो आहे

कधी समजावतो नव्याने....कधी फसवतो स्वतःला
तो असाच बापडा पाप-पुण्याच्या गर्दीत जगतो आहे

असे जगणे भार का व्हावे कुणाला..प्रश्न महान आहे
उत्तर शोधीत तो ओहोटीत तर कधी भरतीत जगतो आहे

आपलाच आपल्याशी संवाद क्षीण होता दु:खास जाग येते
हा आपला तरीही नात्या-गोत्यांच्या वस्तीत जगतो आहे !!!

आयुष्याच्या गर्तेत कुणी आळसावतो..कुणी मस्तीत आहे
कुणी आठवांच्या...कुणी आसवांच्या दहशतीत जगतो आहे

- गिरीश कुलकर्णी