चक्र

आता या वयात काय बदलणारेत का ते त्यांच्या सवयी?'' असा विचार करून लोक बापूआजोबांचे तर्‍हेवाईक वागणे, खवट प्रश्न नजरेआड करत. त्यांना रस्त्याने भीक मागताना बघून कोणी परिचित अनोळखी असल्यासारखा चेहरा करून पुढे जात, तर कोणी ''काय आजोबा, घरापर्यंत लिफ्ट देऊ का?'' असे विचारत त्यांना घरापर्यंत आणून सोडत असत.
पण डॉक्टर फडक्यांनी हे सर्व समीकरणच बदलून टाकले.

borderpng.png

का

"य गं, बाहेर निघालीस?'' मी लिफ्टचा दरवाजा उघडून बाहेर पाऊल टाकल्याटाकल्या हा प्रश्न ऐकला की आधी डोक्यात एक सणकच जायची. समोर बापूआजोबा बिनबाह्यांचा कळकट बनियन, ठिगळे लावलेले मळकट धोतर व खपाटीला गेलेल्या गालांवर दाढीचे पांढरे खुंट अशा अवतारात हातातील तंबाखू मळत बसलेले असायचे. दर वेळेस मी बाहेर जातानाच यांना प्रश्न विचारायला का सुचते हे मला न सुटलेले कोडे. त्यांना काहीतरी उत्तर देऊन मी तिथून सटकायचे आणि मनातल्या मनात ''आता आणखी प्रश्न नकोत!'' असे म्हणत आठवेल त्या देवाचा धावा करायचे.

बापूआजोबा खरेतर आमच्या या भागातील जुने जाणते रहिवासी. सरकारी नोकरीत हयात गेल्यावर १९८० च्या दरम्यान कधीतरी ते सेवानिवृत्त झाले. तुटपुंजे पेन्शन. राहत्या भाड्याच्या घराची जागा एका बांधकाम-व्यावसायिकाने विकत घेतली आणि बापूआजोबा व त्यांच्या पत्नीस, म्हणजे बापूआजीस त्याच जागेवर नव्याने बांधलेल्या इमारतीत तळमजल्याची दोन खोल्यांची सदनिका देऊ केली. बापूआजोबांना ना काही मूलबाळ ना इतर व्याप. पण तरीही अपुर्‍या पेन्शनपायी त्यांचे हाल होऊ लागले. वयपरत्वे त्यांना कोणी दुसरी नोकरीही देत नव्हते. आजोबांनी मग एक शक्कल शोधली. रोज सकाळी नऊ-दहाच्या दरम्यान ते त्यांचा खास फाटका वेष घालून तयार होत व काठी टेकवत पंचक्रोशीतील देवळांच्या बाहेर बसून भीक मागत. आणि त्यात त्यांना काहीही लाज वाटत नसे. उलट भिकेतही बरे उत्पन्न मिळते असा दावा करत.

''सरकार माझं पेन्शन वाढवून देत नाही. माझा खर्च करायला माझ्या पोटी पोरं नाहीत. तीन हजार रुपयांच्या पेन्शनीत आमचा म्हातारा-म्हातारीचा औषधाचा खर्च निघतुया जेमतेम. मग तुम्हीच सांगा, कायतरी मार्ग काढायला हवा की नको?'' बापूआजोबांचे कोणी 'भीक मागणे किती वाईट आहे' यावरून बौद्धिक घेऊ गेला की ते त्या व्यक्तीला विचारत. तरीही कोणी चिवटपणे त्यांच्याशी वाद घालू लागले की ते फिस्कारत, ''माझ्या घरी वर्षाचा किराणा भरून देतुस का? आमचं भाजीपाल्याचं, दुधाचं बिल भरतुस का? नाय ना, मंग बोलू नगस! जा आपल्या वाटेला.'' नात्यात तसे लोक होते मदत करू शकतील असे, पण त्यांनाही आपापले संसार, खर्च . . . बापूआजोबांच्या संसाराची जास्तीची जबाबदारी घेण्यासाठी तेही असमर्थ होते.

मग सकाळी भीक मागायला गेलेले बापूआजोबा दुपारी जेवायला घरी येत. जेवल्यावर तास-दोन तास वामकुक्षी Chakra2.jpgघेऊन पुन्हा चार-साडेचारला भीक मागायला जात ते अंधार पडू लागला की घरी येत. अंधाराचे त्यांना आताशा नीट दिसत नसे. मग घरी परत आले की आपल्या सदनिकेबाहेर असलेल्या कट्ट्यावर बसून इमारतीत जाणार्‍या-येणार्‍याची चौकशी, प्रश्न, तंबाखू मळणे, तिचा तोबरा भरून रस्त्यावर पचकन थुंकणे इत्यादी प्रकार साग्रसंगीत चालत असत. त्यांचे वयच इतके मोठे की कोणी मंडळी त्यांना सहसा टोकत नसत. ''जाऊ दे ना, म्हातारं आहेच तसलं . . . आता या वयात काय बदलणारेत का ते त्यांच्या सवयी?'' असा विचार करून लोक बापूआजोबांचे तर्‍हेवाईक वागणे, खवट प्रश्न नजरेआड करत. त्यांना रस्त्याने भीक मागताना बघून कोणी परिचित अनोळखी असल्यासारखा चेहरा करून पुढे जात, तर कोणी ''काय आजोबा, घरापर्यंत लिफ्ट देऊ का?'' असे विचारत त्यांना घरापर्यंत आणून सोडत असत.

पण डॉक्टर फडक्यांनी हे सर्व समीकरणच बदलून टाकले. त्याचे असे झाले की बापूआजोबांच्या शेजारील सदनिका डॉक्टर फडक्यांनी त्यांच्या क्लिनिकसाठी विकत घेतली. अद्ययावत सजावट, वातानुकूलित खोल्या, इमारतीच्या प्रवेशद्वारापाशी भली थोरली आलिशान पाटी, चकचकीत उद्घाटन सोहळा . . . डॉ. फडक्यांच्या क्लिनिकमुळे त्यांच्याकडे येणार्‍या श्रीमंती पेशंट्सची तळमजल्यावर वर्दळ वाढली. एकीकडे फडक्यांच्या क्लिनिकचा लखलखाट तर दुसरीकडे बापूआजोबांच्या अंधारल्या घरातील पिवळ्या बल्बचा खिन्न उजेड . . . दरवाज्यासमोर फाटक्या वेषात बसलेले बापूआजोबा . . . त्यांच्या पिचकार्‍या . . . बडबड . . .

डॉ. फडक्यांच्या ऐटदार पेशंट्सनी हळूहळू त्याबद्दल तक्रार करायला सुरुवात केली. डॉक्टरांनी मग एक दिवस गोडीगुलाबीत बापूआजोबांपुढे त्यांची राहती सदनिका विकत घेण्याचा प्रस्ताव मांडला. आजोबांनी साफ नकार दिला. उभी हयात ज्या वास्तूत गेली त्या वास्तुपासून आता त्यांना शेवटच्या दिवसांत दूर जायचे नव्हते. आजोबांचा नकार डॉक्टरला चांगलाच झोंबला. आणि मग सुरुवात झाली एका शीतयुद्धाची!

Chakra4.jpgडॉक्टरकडे आलेल्या पेशंट्सनी आपली पादत्राणे दरवाज्याबाहेर कशीही टाकावीत आणि बापूआजोबांनी ती आपल्या काठीच्या फटक्याने इकडे-तिकडे उडवून द्यावीत . . . डॉक्टरने मुद्दाम बापूआजोबांच्या दरवाज्याला अडसर होईल अशा पद्धतीने चपलांचा स्टॅन्ड ठेवावा . . . बापूआजोबांनी संध्याकाळी बाहेर कट्ट्यावर बसून येणार्‍या-जाणार्‍या पेशंट्सच्या आगाऊ चौकश्या कराव्यात . . . इमारतीच्या प्रवेशद्वारापाशी डॉक्टरने तिथून येणार्‍या-जाणार्‍यांची पर्वा न करता आपली गाडी लावली की डॉक्टरच्या त्या कोर्‍या करकरीत चारचाकीच्या दिशेने बापूआजोबांनी तंबाखूची पिचकारी टाकावी . . .

डॉक्टर आणि बापूआजोबा एकमेकांवर खार खाऊन होते. ''हा म्हातारा कोण आलाय मला सुनावणारा'' म्हणून डॉक्टर दात-ओठ खाऊन असे; तर बापूआजोबा ''हे आत्ताचं पोरटं, माहितेय कसले धंदे चालतात त्याच्या क्लिनिकमध्ये . . . तो मला कसला सुनावतोय . . .'' म्हणत डॉक्टरला पाण्यात पाहत होते. दोघांमध्ये कोणी मध्यस्थी करायला गेले की ती व्यक्ती स्वतःचेच हात पोळून घेत असे. दोघांपैकी कोणीही एक इंचभरही मागे हटायला वा आपला हेका सोडायला तयार नव्हते!

एक दिवस बापूआजोबांच्या पायात क्लिनिकबाहेर ठेवलेली कोणा पेशंटची चप्पल अडकली आणि ते धडपडले. झाले! एवढे दिवस मनात धुमसणारा राग बापूआजोबांनी क्लिनिकबाहेर अस्ताव्यस्त विखुरलेल्या चपला-बुटांवर काढला. एकजात सारी पादत्राणे त्यांनी काठीने इमारतीच्या वाहनतळात ढकलून दिली. त्यात काही महागडी पादत्राणे वाहनतळात असलेल्या एका डबक्यात पडली व खराब झाली.

डॉक्टरला तो वृत्तांत समजल्यावर त्याच्या तर तळपायाची आग मस्तकाला गेली. तसेही गेले काही दिवस त्याचे मनःस्वास्थ्य ठीक नव्हते. गेल्या काही महिन्यांत त्याचे दारू ढोसणे दुप्पट-तिप्पट वाढले होते अशी आतल्या गोटात बातमी होती. तब्येत वारंवार बिघडत होती. पण पिणे काही कमी होत नव्हते.

बापूआजोबाच्या वागण्याने डॉक्टरचे पित्तच खवळले. रात्री साडेनवाला क्लिनिक बंद झाल्यावर त्याने बापूआजोबाच्या घरात घुसून न भूतो न भविष्यति तमाशा केला. त्याने केलेला आरडाओरडा ऐकून आजूबाजूचे लोक धावत आले. त्याला शांत करू लागले. पण डॉक्टर शांत व्हायचे नाव घेत नव्हता. क्षणागणिक त्याचा चेहरा भेसूर, तांबारलेला होऊ लागला होता. शेवटी दोघा-तिघांनी मिळून डॉक्टरला बळजबरीने बापूआजोबांच्या घरातून बाहेर काढले. स्वत: बापूआजोबाही रागारागाने थरथरत होते. डॉक्टर बाहेर गेल्याचे पाहून दाराशी येऊन ते त्याला शिव्या देऊ लागले. जरा कोठे आटोक्यात येऊ घातलेला डॉक्टर त्या शिव्यांनी पुन्हा बिथरला व त्याने बापूआजोबांचे बखोटच पकडले आणि त्यांना गदगदा हलवले. म्हातार्‍याने आपली शक्ती लावून डॉक्टरला दूर ढकलायचा क्षीण प्रयत्न केला . . . पण डॉक्टरचे बळ जास्त होते. त्याच्या एका धक्क्यासरशी बापूआजोबा उंबर्‍यातच भुईसपाट झाले. डोके दाराच्या चौकटीवर दाणकन आदळले. कंबरेचे हाडच मोडले. आपल्या कर्तृत्वाचे परिणाम पाहून डॉक्टर जरासा भानावर आला, पण तोवर बाकी जनता गोळा होऊ लागली होती. सर्वानुमते बापूआजोबांना हॉस्पिटलात दाखल करण्यात आले. अर्थातच हॉस्पिटल, ऑपरेशन, उपचार, नर्स, औषधे इत्यादींचा खर्च डॉक्टरला करायला लागला. म्हणजे बापूआजोबांच्या आतापर्यंत क्वचित दिसणार्‍या नातेवाईकांनी तसा खर्च करणे डॉक्टरला भाग पाडले. अन्यथा प्रकरण पोलिसांकडे जाईल अशी धमकी दिली. डॉक्टरला पोलिसांचा ससेमिरा नकोच होता. नाईलाजाने त्याने म्हातार्‍याचा खर्च करणे मान्य केले.

आता येता-जाता डॉक्टर प्रत्येकाजवळ बापूआजोबाने त्याला कसे लुबाडले याच्या कहाण्या ऐकवू लागला. पण लोकांना खरा प्रकार समजला होता. त्यामुळे सर्वांची सहानुभूती बापूआजोबांना होती. "भले म्हातारा खवट का असेना, पण त्याच्यामुळे जाग होती हो आपल्या इमारतीला!", पासून ते, "अहो, तो डॉक्टर कोण बोलणार त्या म्हातार्‍याला तंबाखुवरून? स्वतःची दारू कमी कर म्हणावं आधी!" पर्यंतचे सर्व तर्‍हेचे उद्गार ऐकू येत होते. शिवाय डॉक्टरच्या क्लिनिकमध्ये तो बेकायदेशीर तपासण्या करतो की काय, अशीही एक वदंता होतीच! परिणामतः डॉक्टरची लोकप्रियता कमी होऊ लागली. त्याच्याकडची गर्दी कमी होऊ लागली. झाले! आधीच त्रस्त असलेल्या डॉक्टरचा मनस्ताप आणखी वाढला. त्याचे मदिरापानही वाढले.

बापूआजोबा डिस्चार्ज मिळून हॉस्पिटलातून घरी आले. सकाळ-सायंकाळच्या पूर्णवेळ परिचारिका, आजोबांची औषधे, फिजिओथेरपी या सर्वांचा खर्च डॉक्टरला करावा लागत होता. बापूआजोबांच्या एका भाच्याने आजोबांकडून मृत्युपत्रावर सही घेऊन त्यांच्या व बापूआजींच्या मृत्युपश्चात सदनिका स्वतःच्या नावे करवून घेतली होती. बदल्यात तो आता आजी-आजोबांच्या उदरनिर्वाहाची काळजी घेत होता. नव्वदीच्या घरात वय असलेल्या बापूआजोबांना हाडाचे ऑपरेशन वगैरे तितकेसे झेपले नव्हतेच! कधी तर त्यांची तब्येत इतकी खालावलेली असे की नाकी सूत धरायची वेळ येई!

''म्हातारा मेला तर बरं होईल! माझ्या मागची कायमची पीडा टळेल!!'' डॉक्टर आल्यागेल्याला सांगू लागला. लोक आता त्याच्याकडे घृणेने बघू लागले. बापूआजोबांना कोणीतरी डॉक्टरचे उद्गार सांगितल्यावर ते बिछान्याच्या कडेला पचकन थुंकले. त्यांच्या थकलेल्या, क्षीण डोळ्यांत म्हणे तेव्हा वेगळीच चमक दिसत होती.

त्यानंतर महिन्याभरात डॉक्टरची तब्येत बघता बघता अचानक खालावली. तपासण्या झाल्या, चक्रे फिरली, त्याला हॉस्पिटलात ठेवले, त्वरेने उपचार सुरू केले. पण उपयोग झाला नाही. एकेक करत डॉक्टरचे अंतर्गत अवयव निकामी होत गेले. शेवटी कृत्रिम श्वासप्रणालीवर ठेवले. अखेर तीही काढावी लागली. वयाच्या अवघ्या अठ्ठेचाळिसाव्या वर्षी डॉक्टर फडक्यांचे अल्पशा आजाराने अकस्मात निधन म्हणून पेपरात बातमी छापून आली.

बापूआजोबांना कोणीतरी ती बातमी वाचून दाखवली. आजोबांनी ते वर्तमानपत्र हातात घेतले व त्या बातमीवरून आपले मोतीबिंदूंनी अधू झालेले डोळे फिरवून काही दिसेना, तशी सुरकुतलेला हात हळूहळू फिरवत राहिले.

क्लिनिक महिनाभर बंद होते. येणारे-जाणारे "तरणा डॉक्टर मेला, खपला बिचारा," म्हणून हळहळत होते. शिवाय हलक्या आवाजात तो कसा आणि किती प्यायचा याची चर्चाही चालू होती. महिनाभराने क्लिनिकवर नवी पाटी लागली. नवा डॉक्टर, नव्या तपासण्या, नवी सजावट . . . या खेपेस सजावटीबरोबरच क्लिनिकच्या आत स्वागत कक्षात चपलांसाठी वेगळा स्टॅन्ड बनवून घेतला होता. आता कोणाच्या चपला बाहेर राहायचा प्रश्नच येणार नव्हता.

आता या घटनेलाही वर्ष होत आले. बापूआजोबांची तब्येत आजही फारशी सुधारलेली नाही. अंथरुणाला खिळूनच असतात ते. घराच्या बाहेर येऊ शकत नाहीत. पण डॉक्टरला कसा शह दिला याबद्दल त्यांना मध्येच हसू फुटते. मग खोकल्याची ढास लागते. बापूआजी त्यांना पाणी पाजते तेव्हा कोठे ते पुन्हा शांत पडू शकतात.

आताशा बापूआजी बाहेर कट्ट्यावर बसू लागली आहे.

- अरुंधती कुलकर्णी