ब्रीफकेस

घुसमट सहन न होऊन मी तिच्या घरातून बाहेर पडले. मला मी जिवंत आहे हे स्वतःला पटवण्यासाठी काहीतरी करायचेच होते. ब्रेडचे, पाणीपुरीचे वास, फुगेवाला, जॉनसन कंपनीसमोरची हिरवळ, सिग्नलचा लाल रंग, बालराजेश्वर मंदिरात झोपलेले कुत्रे, जगाचा रंगीत पाळणा जोमाने फिरत होता आणि मला त्यात बसून खूप फिरायचे होते.

borderpng.png

मी

आपल्याला ज्या नात्याबद्दल सांगणार आहे ते असंच आहे; ब्रीफ . . . पण अगदी जिव्हाळ्याचं. होतं तोपर्यंत अगदी मैत्रीचे अनेक सुखी रंग दाखविणारं. संपल्यावर एक हुरहुर मनी ठेवून जाणारं.

हरीश तलवार . . . उंच, काळारोम आणि चष्मिश. अगदी पक्की मुंबईची हिंदी बोलणारा. 'तेरेको लंबा गिरेगा, मैं क्या बोलता है' टाईप. माझी त्याची पहिली भेट झाली केळकर कंपनीच्या ७५ व्या वाढदिवसाच्या निमित्ताने. दोन प्रकारची ब्रोशर्स लिहायची होती व जाहिरात एजन्सी नेमायची होती. त्या जाहिरात एजन्सीच्या लोकांशी भेटायला आम्ही मुलुंडकर फोर्टात गेलो. सर्व कार्यालयाची टूर व पी.आर. झाले, बोलणी झाली. अति स्टायलिश व अनुभवी बाईसमोर त्यांना कशाप्रकारचे कॉर्पोरेट गिफ्ट हवे आहे, अत्तर कंपनी म्हणजे नक्की काय, ती कन्सेप्ट कम्युनिकेशनमध्ये कशी प्रत्यक्षात आणावी, वगैरे हायफंडा बोलणे झाले. (म्हणजे त्यांचे आम्ही ऐकून घेतले!) मग त्याचे लीव्हरमध्ये काय काम होते ते करून आम्ही महालक्ष्मी मार्केटात फेरफटका मारला. बॉसच्या मुलांसाठी चॉकोलेटे घेतली. हसत खेळत गप्पा मारत परत आलो. तलवार विनोदीच आहे जरा असे मी रवीला कोपर्‍यात बोलावून सांगितले. त्याने सर्व समजल्यासारखा चेहरा केला. (आणि रवी फार समजूतदार आहे असे मी स्वतःच स्वतःला परत एकदा सांगितले.) ह्या कार्यक्रमाच्या निमित्ताने झालेली ओळख पुढे आम्ही मुलुंडात राहायला गेलो तेव्हापर्यंत दृढ होत गेली व एका घट्ट पण अव्यक्त मैत्रीच्या नात्यात गुंफली गेली, ती शेवटी तटकन् तुटेपर्यंत!

तलवार हा सर्वत्र, म्हणजे कंपनीत व ग्राहकांच्यात तलवार ह्याच नावाने प्रसिद्ध होता. त्याचे हरीश नाव भारतीबेनला तरी आठवत असेल की नाही कोण जाणे. भारतीबेन म्हणजे अर्थात सौ. तलवार. हा खास मंगळुरी. तुळू भाषा बोलणारा. ती खास गुजराती जैन बेन. आता ह्या दोघांचा प्रेमविवाह कसा झाला असेल हे मला कधी कल्पनेतही आणता येत नसे. प्रचंड बडबडी, सर्व जैन प्रथा, उपवास इत्यादी निष्ठेने करणारी भारतीबेन. अगदी शाकाहारी. हा पक्का मांसाहारी. जलारामानेच ह्यांना एकत्र आणले असणार. प्रेमात पडून त्यांनी पळून जाऊन लग्न केले होते एकेकाळी व मित्राच्या नर्सिंग होम मध्ये सुरुवातीचे काही दिवस राहून नव्या संसाराची सुरुवात केली होती. ही कथा त्याच्या तोंडून ऐकण्यात फार गंमत होती. त्याला बघूनच मला हसायला येत असे व तोही मिश्किलपणे एकेक विनोद करून, साधे साधे प्रसंग खुलवून सांगत असे. रोजचे तेच ते काम व कामातले प्रश्न पण ते त्या मिश्किल शैलीत ऐकताना फार गंमत येई. त्यावेळी भारतीबेन काय स्वयंपाक करते आहे ते बघणे, त्यांच्या एकुलत्या एक मुलीचे कवतिक ऐकणे, पुढे नातवाचे फोटो बघून त्याच्या वांडपणाच्या गोष्टी ऐकणे मला फार आवडे.

भारतीबेन फार निगुतीने संसार करत असे. तिच्या फ्रिजमध्ये बारीक कातरलेले बदाम-पिस्ते असत, ते काढून खाणे हा माझा उद्योग असे. तिच्या पर्समध्ये नेहमी एकतरी डेअरी मिल्क चॉकोलेट सापडे. तलवारला ती डब्यात तीन रंगांच्या भोपळी मिरच्यांची भाजी, नीर दोसे वगैरे मस्त पदार्थ बनवून देत असे. रवी डबा नेत नसल्याने त्याच्यासाठी पण देत असे. वीणानगरातले त्यांचे छोटेसे घर अगदी स्वच्छ. नीट ठेवलेले असे. पक्के मुंबईकर जोडपे. भारतीबेनच्या बिल्डिंगमधील सर्वांशी ओळखी होत्या. संध्याकाळी घरी गेले म्हणजे ती आजुबाजूच्या बेनलोकांबरोबर गप्पा मारत घरकाम उरकत असे व हा एक व्हिस्कीचा पेग लावून एक्सेन बघत बसलेला असे. आमच्या घरी रवीला व मला वेगवेगळी कपाटे आहेत हे ऐकून तो अगदी अचंबित झाला होता. बारीक आवाजात "भारती तो मेरेको थोडासा जगा देती है उसके कपाटमें" म्हणून कुरकुरला होता. पण तेवढ्यापुरतेच. कोणत्याही मुरलेल्या जोडप्याप्रमाणेच त्यांचे एकमेकांशी वादविवाद होत असत. अगदी आमच्यासमोरही. पण ते आम्ही कधीच सीरिअसली घेतले नाहीत. त्यांनी तर नाहीच नाही. आम्ही सापुतार्‍याला गेलो होतो तेव्हा मात्र एकदा त्यांचे काहीतरी खरेच बिनसले होते. सर्व ट्रिप त्या छायेत पार पडली.

एखाद्या शनिवारी किंवा ३१ डिसेंबरला हे दोघे व इतर मित्र, सहकारी कधी कधी पार्टी करत. त्यात
मोठ्या आवाजात सामिष विनोद करणे हे तलवारसेठचे मुख्य काम. त्याला रागे भरणे हे भारतीबेनचे काम. रस्त्याच्या कडेला वैदू लोक तंबूत दुकान लावतात बघा जडीबुटीचे आणि त्यांच्या सहाय्याने कसलेही रोग बरे करण्याचे. तुमचे लक्ष तिकडे गेले असेल तर ह्या दुकानात एक टेप कायम वाजत असते. ती टेप लक्षपूर्वक ऐकून त्या खास अ‍ॅक्सेंटमध्ये म्हणणे हा त्याचा एक हातखंडा आयटम होता. ह्या पार्टीची वर्णने नुसती रवीच्या तोंडून ऐकूनच मला दिवसेंदिवस हसू येत असे. परत नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी प्राणी कधीच कार्यालयात जागेवर नसे. हक्काची सुट्टी घेऊन घरी ढाराढूर झोपत असे. ते बरेच होते म्हणा!

वरवर बेदरकार वाटला तरीही तलवार मनाने फारच संवेदनशील होता. भारती बेन, त्यांची दोघांची एकुलती लेक गुड्डी, जी मिडल इस्ट मध्ये कुठेतरी संसार करत होती. गुंड नातू व नात ह्यांच्यात त्याचे मन अगदी अडकलेले असे. नातवाला एवढेसे काही झाले तरी तो बायको मुलीला आग्रहाने त्याला डॉक्टर कडे न्यायला लावी. एरवी मांस मच्छी नियमित खाणारा, प्रसंगी स्वतः बनविणारा पण रामनवमीला उपास करत असे. रामजन्माच्या वेळी उत्सव करत असे व खास त्या दिवशी बनली जाणारी मंगळुरी पानातली इडली बनवीत असे. प्रसाद आग्रहाने देत असे. भारती बेनचे जैन उपवास सुरू असले की तिची थट्टा करत नसे. माझ्या नणंदेच्या पतींचे जिथे पोस्टिंग झाले होते अशा दोन तीन ठिकाणी तो जाऊन तिला भेटून आला. तिच्या मुलांचे लाड करून आला. पण सांगताना, "क्या यार वो बच्चा, अख्खा रस्ताभर एकिच गाना गा रहा था". "कौनसा तलवारसेठ?" असे विचारल्यावर, 'देखा है पहली बार साजन की आंखों में प्यार' हे लहान मुलाच्या आवाजात म्हणून दाखवले. हसू येइल नाहीतर काय! अजूनही आम्ही हे त्या कार्ट्याला सांगून सतावीत असतो. कंपनीचे जुने फोटो बघताना त्यात स्वतःचा अठरा वर्षाच्या वयातला सेपिया टोन मधला फोटो त्याने लाजत लाजत दाखविला होता. जुनी कपाटे, त्यात हजारो केमिकल्सच्या बारक्या बाटल्या व हा होतकरू टायधारी तरूण मुलगा! ती डोळ्यातली चमक मात्र आता कुठेतरी हरवली होती. त्याजागी आला होता एक हार्ड, प्रॅक्टिकल सेन्स. आयुष्याबरोबर केलेली तडजोड - बारकी क्युबिकल, ते बारके घर हा जीवन प्रवास.

२००० साली आम्ही हैद्राबादला परत आलो. कामात गुरफटून गेलो, मी त्याबरोबरच बालसंगोपन आणि घरकामात! त्या जोडप्याची भेट आता फारशी होतच नसे. रवी कधी कामानिमित्त मुंबईस गेला तर भेटून खुशाली सांगत असे. २००६च्या मध्यात तलवारला पोटाचा कॅन्सर झाल्याचे समजले. संपूर्ण मांसाहारी, मसालेदार खाण्याने व नेहमी दारू पिण्याच्या सवयीने शेवटी त्याचा घात केलाच. जो माणूस नेहमी कंपनीतील काही प्रश्न सोडविणे, गप्पा मारणे, विनोद करणे, बायकोशी प्रेमाने भांडणे इत्यादी करत असे त्याच्या तोंडी आता टाटाला नियमित जाणे, बायॉप्सी, कीमो असे अभद्र शब्द नांदू लागले. तब्येत झपाट्याने घसरली. त्यांची एकुलती एक मुलगी कुठल्यातरी मध्यपूर्वेतल्या कुठल्यातरी आडबाजूच्या देशात राहात असे, ती पण अधून मधून येऊन आईला मदत करत असे.

२००७ च्या मे महिन्यात सुरुवातीला रवी त्याला हॉस्पिटल मध्ये भेटून आला तेव्हा त्याला मित्राची परिस्थिती मला सांगताच येईना. आधीच साहेब भावनाप्रधान, मुंबईच्या उपनगरातले नर्सिंग होम, त्यातली अर्धी, अजिबातच प्रायव्हसी नसलेली खोली. कुठे कुठे नळ्या लावलेल्या, मूळ तब्येतीच्या अर्धा झालेला हा मित्र रवीचा हात हातात घेऊन अक्षरशः रडला. 'मेरे बाद भारती किदर जाएगी? उसका क्या होगा? ' हा प्रश्न त्याला भेडसावून टाकत होता. "तुम्ही बायका तर त्याला भेटूच नका तुम्हाला बघवणार नाही." असेही एका दुसर्‍या सहकार्‍याकडून कळले. मंगलोरच्या रम्य खेड्यात सुरू झालेल्या त्याच्या जीवनयात्रेचा शेवट असा आणि इथे होणार होता तर. मन ५०% अ‍ॅलर्टवरच होते. कधीही वाईट बातमी कळू शकते म्हणून.

आणि अचानक रवीच गेला. पतीच्या शरीरापाशी बसून धाय मोकलून रडणारी पत्नी हा एक अतिशय मोठा व संस्कृतीत जपला गेलेला क्लिशे आहे. सत्यवान-सावित्री इत्यादींचा हातभार आहेच. बट टेक इट फ्रॉम मी, असे झाले की तुम्ही कितीतरी तास, दिवस, महिने अशाच भ्रमात असता की तो इथेच आहे, आता येणारच आहे, तुम्ही पूर्ण कुटुंबासाठीच खाणे बनविता, सामान घेता, लाँड्रीत जाता, फोन घेता. खरे झाड हादरवून टाकणारे रडे कधीतरी अनपेक्षितपणे अचानक तुमच्यावर कोसळते.

रवीला त्या दिवशी जिथे ठेवले होते त्या बेडरूममध्ये मी मधून मधून जात येत होते. घरात कधीच नसलेली गर्दी होती जिचा मला मधूनच वैताग येत होता. दोन गोष्टी मी नेहमीच्याच स्टाइलने रवीला विचारलेल्या मला आठवतात. एक म्हणजे "अरे, तू तर देव आनंदच्याही आधी गेलास?" दुसरे म्हणजे "अरे तू काय तलवारला तिकडे रिसीव्ह करायला गेलास कि काय ?" रवी व त्याची मित्र कंपनी यांचा हा एक खास गुण होता. कोणालाही कुठेही रिसीव्ह करायला जायचे. बस स्टँड, रेल्वे स्टेशन, एअरपोर्ट काही का असेना. अगदी गाडी नाहीतर स्कूटर का होईना पण घेऊन जायचे व जो/जी कोण येणार असेल त्याला/तिला घरपोच सोडायचे. सामान आणून द्यायचे. आता साहेब ढगांच्या मधल्या कुठल्यातरी स्टेशनवर असेच गाडी यायची वाट बघत सिगरेट ओढत फोनवर बोलत उभे असणार असे मला मनापासून वाटले.

नंतर धंद्याची कामे हातात घेतल्यावर पहिले काम काय असेल तर रवीसाठी शोकसभा आयोजित करणे. त्या दिवशी मुंबईची माणसे आली. तलवार गेल्याचे कळले. भारतीबेनला फोन केला पण दोघी काय एकमेकींचे सांत्वन करणार? ही शोकसभा कोणीच जास्त बोलू न शकल्याने लगेचच संपली. मी रोजच्या कामात व्यग्र झाले. त्यानंतर दीड वर्षे मी कामासाठी मुंबईत जात असे पण भारतीबेनला भेटायचे साहस करवले नाही. एक दिवस धीर करून गेले. वीणानगरचा तो छोटा फ्लॅट एका दु:खाने काठोकाठ भरलेल्या डोहासारखा साचलेला होता. ग्रीक शोकनाट्यासारखाच सीन मला वाटला. दोन जाड्या गुजराती बायका खिडकी शेजारी उभ्या होत्या. भारतीबेन रडत बसलेली होती. कसलीशी बारकी नोकरी करून आलेली. शेजारच्या घरात जोरात टीव्ही चालू होता. एक असह्य शांतता पसरली होती. मी पहिल्यांदा मुंबईत आले तेव्हा, "आदमी ना इधर ट्रॅवलिन्गसे थक जाता हे (कम्युटिन्ग नव्हे!) काम तो अच्छा है, लेकिन आनेजाने में थक जाते है" म्हणणारी भारतीबेन आता खरेच थकलेली दिसत होती.

बोलण्यासारखे काहीच नव्हते. बसले पाच मिनिटे व जाते म्हंटले. दु:खाचा तो डोह मलाही गिळून टाकतो की काय अशी भीती मला वाटत होती. माझे आशादायी, सकारात्मक पॅराशूट एकदम फाटते की काय असेच मला आतून वाटले. उठताना ती एकदम हात पकडून म्हणाली. "अश्विनी, हमने उन दोनोंके साथ जो हँसीमजाक का टाइम बिताया वो अब कभी वापस नहीं आयेगा. हैं ना?". "हां भारतीबेन" मी तिची समजूत घातल्यागत म्हटले. समोरच टीपॉयवर तलवारची कार्यालयात नेण्याची ब्रीफकेस ठेवलेली होती. त्याकडे बोट दाखवत ती म्हणाली, "तेरे को मालूम है अश्विनी, मेरे को जब भी कोई भी प्रॉब्लेम आता है ना मैं तलवार का ब्रीफकेस सामने रखती हूं. उसे खोलकर देखती हूं. कुछ ना कुछ सोल्युशन मिल ही जाता है.". थोडीशी हसायचा प्रयत्न करत होती ती. आमचे नवरे जेव्हा नोकर्‍या करत होते तेव्हा अत्तराचा हलका वास येणार्‍या ह्या ब्रीफकेसी आमच्या साठी ऑफ लिमिट्स होत्या. ती त्यांची खाजगी मालमत्ताच होती. एक बारकेसे वैयक्तिक विश्व!

घुसमट सहन न होऊन मी तिच्या घरातून बाहेर पडले. मला मी जिवंत आहे हे स्वतःला पटवण्यासाठी काहीतरी करायचेच होते. ब्रेडचे, पाणीपुरीचे वास, फुगेवाला, जॉनसन कंपनीसमोरची हिरवळ, सिग्नलचा लाल रंग, बालराजेश्वर मंदिरात झोपलेले कुत्रे, जगाचा रंगीत पाळणा जोमाने फिरत होता आणि मला त्यात बसून खूप फिरायचे होते. हिरव्या-काळ्या साचलेल्या डोहांपासून खूप दूर. एक मोठा नि:श्वास घेऊन मी स्वतःशी पण तिला उद्देशून म्हटले. '"हो भारतीबेन, तू ब्रीफकेस उघडून बघितली आहेस आणि मी ती हातात घेतली आहे."

- अश्विनीमामी