नाती, खगोलशास्त्रीय

सध्या अवकाशस्थ असलेली केप्लर नामक दुर्बीण ग्रह असू शकतील अशा अनेक तार्‍यांचा वेध घेते आहे व शेकड्याने ग्रह सापडताहेत. त्या ग्रहांवर वस्तीला आपण कधी पोचू हा भाग नंतरचा, पण या शोधांमुळे आपण, आपली पृथ्वी, आपला बाब्या या पलीकडे विचारांची क्षितिजे रुंदावायला मदत झाली तर केप्लर धन्य होईल.

borderpng.png

'ए

, तो पहा तुटता तारा!'
'अगं, तारा कसा तुटणार? तो काय माठ आहे का तुटा-फुटायला?'
असे माठ उत्तर त्या चंद्रमुखीला दिल्याने अनेक दिले मात्र तुटली आहेत.
(चंद्रमुखी? चंद्रावर किती विवरे आहेत कल्पना आहे का? बरे झाले ब्याद टळली).
पण तार्‍यांचा आणि तुटत्या तार्‍यांचा संबंध आहे तरी काय? चला तर पाहूया ही आणि अशी काही खगोलशास्त्रीय अथांग नाती - काही स्फोटक, काही खस्सकन जवळ ओढणारी, काही ठिकर्‍या उडवणारी, काही हळुवार मृत्यूकडे ढकलणारी, तर काही गुंतागुंतीची!

उल्का

ज्यांना लोक तुटते तारे समजतात त्या उल्का असतात. ग्रहांप्रमाणेच अनेक धूमकेतू सूर्याभोवती दीर्घ लंबवर्तुळांमध्ये प्रदक्षिणा घालत असतात. हे खरे तर धुळीचे काळपट गोळे असतात. पण सूर्याजवळ पोचल्यावर सौरवार्‍यामुळे त्यांना शेपूट फुटते व ते प्रकाशमान भासतात आणि आपल्याला दिसू लागतात. मात्र प्रत्येक प्रदक्षिणेत ते थोडे वस्तुमान मागे सोडतात. पृथ्वीची कक्षा अशा अनेक धूमकेतूंच्या कक्षा छेदते. अशा प्रसंगी असे वेळोवेळी मागे राहिलेले छोटे मोठे तुकडे पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणाने आकर्षित होऊन पृथ्वीच्या वातावरणात शिरतात. तिथे झालेल्या घर्षणाने प्रचंड ऊर्जा निर्माण होऊन ते तुकडे जळतात व केवळ क्षण-दोन-क्षण आपल्याला दर्शन देऊन अनंतात विलीन होतात. उल्का आकाराने लहान असल्याने बिंदुरुपी तार्‍यांप्रमाणे भासतात व लोक फसतात. काही नग मात्र मोठे असतात आणि भस्मसात न होता थेट पृथ्वीपर्यंत पोचतात. अशी एखादी दैदीप्यमान उल्का पहायचा योग आल्यास ओरडू नका - ती जेंव्हा वातावरणातून प्रवास करते तेंव्हा होणारा sonic boom ऐकण्याचे तुमच्या भाग्यात असू शकते. ती दुर्मिळ संधी गमावू नका.

मुळात धूमकेतू हे ग्रहांप्रमाणेच सूर्यमालेचा भाग असतात व सूर्याबरोबर बनले असतात. मात्र अनेक धूमकेतू एकापेक्षा अधिक तार्‍यांभोवतीच्या कक्षेत असू शकतात. तर असे हे 'तुटत्या तार्‍यांचे' तार्‍यांबरोबरचे नाते - एकाच लांबलचक प्रक्रियेतून बनलेले. एकाचा (सूर्य/तारा) दुसरा (धूमकेतू) छोटासा भाग असतो, त्याचे अधिकच छोटे भाग (उल्का) केवळ पृथ्वीला भेटल्यामुळे प्रज्वलित होतात आणि ते स्वत:च्या आजोबांसारखे (तार्‍यासारखे) भासतात.

वार्षिक उल्कावर्षावांच्या तारखा खालील दुव्यावर आढळतील: http://www.saguaroastro.org/content/ANNUALmeteorSHOWERS.htm

उल्कावर्षावांबद्दल अधिक माहिती येथे मिळेल: http://www.amsmeteors.org/meteor-showers/

शुक्र "तारा"

aashish-lekha_new.jpg'शुक्र तारा, मंद वारा' हे भावगीत माहीत नाही असा मराठी भाषिक विरळाच! मात्र शुक्र हा तारा नसून ग्रह आहे हे भूगोलाच्या पाठ्यपुस्तकाचा मनापासून अभ्यास केला असेल तरच लक्षात असते. किंवा पुन्हा मुलांना शिकवत असाल तर. तारे इतके दूर असतात की ते ग्रहांपेक्षा कितीतरी मोठे असले तरी पृथ्वीवरून बिंदुरूपी भासतात. त्यांच्याकडून येणारी प्रकाशकणांची धारा ही वातावरणातील कणांवर ठेचकाळत आपल्यापर्यंत पोचते. त्यामुळे काही कण एका ठिकाणाहून, तर काही थोऽड्या शेजारील जागेवरून आल्यासारखे वाटतात आणि तारे (चांदण्या) लुकलुकतात. ग्रह मात्र जवळ असल्याने तबकडीसारखे असतात. त्यांच्या वेगवेगळ्या भागांपासून येणार्‍या प्रकाशकाणांच्या धारा* या तार्‍यांच्या प्रकाशाप्रमाणे पसरतात. पण हे पसरणे ग्रहाच्या तबकडीच्या आकाराच्या मानाने कमी असल्याने ग्रहांचा एकूण आकार स्थिर वाटतो. या फरकाशिवाय ग्रह स्थिर तारामंडळाच्या सापेक्ष भटकताना तुम्हाला दिसू शकतात. ग्रीकमध्ये planet म्हणजेच भटक्या. ग्रहांची चाल संथ असल्याने लगेच लक्षात येत नाही व सर्व ग्रहांनां तारे म्हणण्याची चूक सहजच होऊ शकते. तारे बनल्यानंतर त्यांच्यापासून ग्रह बनतात. एका संकल्पनेप्रमाणे एखादा वाट चुकलेला तारा दुसर्‍या तार्‍याचा लचका तोडतो, व ते तुकडे थंड झाले की ग्रह बनतात. थोडक्यात काय तर शुक्र (तसेच गुरु, मंगळ, शनी इ. सर्व ग्रह) हे तारे नसून तारापुत्र असतात. झंझावाती जन्मकथा असलेले!

सध्या अवकाशस्थ असलेली केप्लर नामक दुर्बीण ग्रह असू शकतील अशा अनेक तार्‍यांचा वेध घेते आहे व शेकड्याने ग्रह सापडताहेत. त्या ग्रहांवर वस्तीला आपण कधी पोचू हा भाग नंतरचा, पण या शोधांमुळे आपण, आपली पृथ्वी, आपला बाब्या या पलीकडे विचारांची क्षितिजे रुंदावायला मदत झाली तर केप्लर धन्य होईल. केप्लर दुर्बिणीबद्दल अधिक माहिती: http://kepler.nasa.gov/

* हा प्रकाश त्यांचा स्वत:चा नसून तार्‍याचा (सूर्याचा) परावर्तीत प्रकाश असतो.

चंद्रकोरीतील तारा

star-moon_new.jpgअनेक देशांच्या झेंड्यावर चंद्रकोर व त्यात एक तारा असतो उदा. टर्की, पाकिस्तान, मलेशिया इत्यादी; त्या तार्‍याचे आणि चंद्राचे नाते आगळे आहे ते पाहुया.

अमावस्या ते पौर्णिमा चंद्र कलेकलेने वाढत जातो व पुढच्या अमावस्येपर्यंत पुन्हा कमी होत नाहीसा होतो. ग्रहांप्रमाणेच चंद्र स्वयंप्रकाशी नाही आणि या मासिक लीला सूर्यप्रकाशाच्या. पौर्णिमेव्यतिरिक्त चंद्र पूर्ण दिसत नसला तरी तो पूर्णच असतो. निरखून पाहिलेत तर बहुतांश दिवशी चंद्राची गोलाकृती तुम्हालाही दिसू शकेल. चंद्र अपारदर्शक असल्याने (हो, अमावस्येला आणि प्रतिपदेला सुद्धा) कोरीतील तो तारा चंद्रापलीकडे असू शकत नाही. म्हणजेच अलीकडे असला पाहिजे. पण चंद्र तर आपला अवकाशस्थ शेजारी. त्याच्याइतके जवळचे आपले कुऽण्णी नाही. मग त्या चंद्रकोरीतील तारा (हजारो वर्षे उल्लेखलेला, आणि म्हणूनच सत्यातीत असलेला) आला कोठून? चंद्र आधी खरेच चीजचा (त्यातूनही पारदर्शक नाही, पण आरपार दिसावे म्हणून स्विस चीजचा) बनलेला होता का? की तो ग्रहरूपी लचके तोडणारा तारा खरेच पृथ्वी व चंद्रामध्ये आला होता (पण मग तेंव्हा पृथ्वी/चंद्र असणार तरी कसे!)?

हा तारा दुसरा-तिसरा कोणी नसून चक्क मागच्याच प्रकरणात भेटलेला शुक्र'तारा' आहे. कसे ते पाहूया. हे थोडे किचकट असल्याने वाचतांना थोडे सावकाश वाचा. एकूण तीन गोष्टी व्हाव्या लागतात.

(१) पृथ्वी आणि इतर सर्व ग्रह सूर्याभोवती जवळजवळ एकाच प्रतलात (plane) फिरतात. पूर्व-पश्चिम दिशा सूर्याप्रमाणेच या ग्रहांच्याही आकाशीय मार्गावरून ठरतात. चंद्राचे पृथ्वीभोवती फिरण्याचे प्रतलही जवळजवळ तेच आहे.

(२) शुक्र व बुध यांच्या कक्षा पृथ्वीपेक्षा छोट्या आहेत (त्या दोन ग्रहांना अंतर्ग्रह म्हणतात). यामुळे हे ग्रह सूर्य व पृथ्वी दरम्यान येऊ शकतात, व त्यांची ग्रहणे होऊ शकतात. चंद्राप्रमाणेच त्यांच्याही कला असतात व छोट्या दुर्बिणीतून त्यांची कोर पण दिसते. इतर ग्रह पृथ्वी-सूर्य सापेक्ष त्यांच्या स्थानावरून वर उल्लेखलेल्या प्रतलात कुठेही आढळू शकतात, पण शुक्र व बुध मात्र सूर्यापासून जास्तीत जास्त ४५ अंशावर दिसू शकतात. प्रतिपदेला चंद्राची नवकोर सूर्यास्तानंतर लगेचच पश्चिमेला दिसते.

(३) प्रतिपदेला येणार्‍या सणांच्या दिवशी या कोरीचे दर्शन घेण्याचा प्रघात आहे. सूर्याच्या आसपासच शुक्र फिरत असल्याने तो नवकोरीच्या जवळपास असण्याची शक्यता बरीच असते. चंद्र रोज १२ अंश क्रमतो, त्यामुळे तो प्रतिपदा ते चतुर्थी या दरम्यान हमखास त्यामानाने गोगलगायीच्या गतीने जाणार्‍या शुक्राजवळ आढळतो. प्रतिपदेप्रमाणे चतुर्थीला अनेक लोक आकाशात चंद्राला शोधतात.

दर वर्षी एक-दोन प्रतिपदांना व चतुर्थ्यांना शुक्र व चंद्र आकाशात जवळपास असतात. कोणत्याही ठराविक महिन्यात ही युती शोधल्यास दर ६-७ वर्षांनी आढळते. चंद्राच्या कोरीच्या मागे शुक्र लपेल (पिधान युती) असे घडणे जास्त दुर्मिळ, पण जेव्हा तसे होते तेव्हा ते जास्त लक्षात राहते व तसे अनेकदा (नेहमीच, कुठेतरी) होत असेल असाही समज पसरू शकतो. याचप्रमाणे घडत असलेल्या इतर अलौकिक युतींना लोक भौतिक अर्थ देऊन त्यावरून त्यांच्या आयुष्यांची दिशा ठरवत असतील तर तो त्यांचा प्रश्न आहे. चंद्रकोर व त्यासोबतचा तारा हे चित्र गेले अडीच ते साडेतीन हजार वर्षे वापरात आहे व मोआबांच्या तेव्हाच्या मुद्रांवर आढळते (सद्य जॉर्डन).

जर ग्रहांना सूर्यपुत्र म्हटले तर त्याच नात्याने चंद्र पृथ्वीपुत्र झाला, आणि शुक्र चंद्राचा काका, व सूर्य आजोबा, व इतर तारे इतर आजोबे. चंद्रकोरीचा व शुक्राचा हा घड्याळाच्या काट्यांप्रमाणे असलेला ऋणानुबंध घड्याळाच्याच नियमिततेने जुळणारा व दुरावणारा.

श्वेत-बटु व शेजारप्रेम

रात्री आकाशात नजर टाकल्यास दिसणार्‍या तार्‍यांची तेजस्विता बदलताना दिसत नाही. काही तारे मात्र तेजस्विता अनेक पटींनी वाढून नवतार्‍यांप्रमाणे अचानक दिसू लागतात. मोठ्या दुर्बिणींना असे तारे नियमितपणे आढळत असले तरी पृथ्वीवरून केवळ डोळ्यांनी दिसण्याइतके प्रखर क्वचितच होतात. यातील एका प्रकाराला श्वेत-बटु व त्यांच्या प्रती त्यांच्या शेजार्‍यांना वाटणारे आकर्षण कारणीभूत असते. बहुतांश तारे एकएकटे असण्याऐवजी जोडीने असतात. काही जोड्यांमधील एक तारा अति-घन असा श्वेत-बटु असतो. इंधन संपून आकुंचन पावल्याने हे बटुसारखे छोटे असतात व इतर तार्‍यांसारखे पिवळे निळे नसून पांढरे असतात. अति-घनते मुळे यांचे गुरुत्वाकर्षण अधिक असते व शेजारी तार्‍यातील वस्तुमान सतत यांच्याकडे ओढले जात असते. हा वायु श्वेत-बटु भोवतीच्या एका ओढ-तबकडीवर (accretion-disc) साचत जातो. अधूनमधून (काही वर्षे ते अनेक दशके) या ओढ-तबकडीचा एखादा तुकडा तुटून श्वेत-बटुच्या पृष्ठभागावर आदळतो व त्यातील हायड्रोजनचे फ्युजन होऊन एक मोठा स्फोट होतो. हाच स्फोट तेजस्वितावर्धनाच्या स्वरुपात आपल्याला दिसतो. काही दुर्मिळ जोड्यांमध्ये श्वेत-बटुवर इतके वस्तुमान गोळा होते की त्याचा अंतर्स्फोट होऊन त्याच्या ठिकर्‍या उडतात. तर असे असते शेजार्‍याशी लगट करणारे श्वेत-बटुचे स्फोटक नाते!

तारे आणि तुम्ही

तार्‍यांमध्ये होत असलेल्या फ्युजन प्रक्रियेमुळे लोखंड (आण्विक क्रमांक २६) व त्यापेक्षा कमी घनभारीत कण असलेलेच अणू बनू शकतात. हायड्रोजन ते हेलियम ते नायट्रोजन-कार्बन-ऑक्सिजन-सिलीकॉन ते लोह अशी ही तार्‍यांच्या जीवनचक्रातील फ्युजनप्रक्रिया असते. विश्वोत्पत्तीच्या वेळी केवळ हायड्रोजन व हेलीयमच बनले होते. जेव्हा तार्‍यांचा स्फोटक मृत्यू होतो तेव्हा मात्र तापमान व घनता इतकी वाढते की सोने, चांदी सारखे इतर अणू बनू शकतात. तार्‍यांच्या पुढील पिढ्यांमध्ये हे घटक त्यामुळे आधीपासूनच असतात. त्यांच्या निर्मिती प्रक्रियेत जेव्हा ग्रह बनतात, व ग्रहांवर तुम्ही-आम्ही, तेव्हा दातांच्या, दागिन्यांच्या वगैरे स्वरुपात हे घटक आपल्यातही समाविष्ट होतात. आपल्या शरीररचनेतदेखील तार्‍यांच्या स्फोटानंतरच आढळणारी अनेक मूलद्रव्ये (आवश्यक) असतात (उदा. तांबे, आयोडीन). कार्ल सगानने म्हटल्याप्रमाणे आपल्यात तारकांचे अंश आहेत. असे आहे विश्वाचे आणि आपले नाते - एकाच वेळी विध्वंस व पुनर्निर्मितीत गुंफलेले!

तर अशी ही या अवाढव्य, गूढ, सुरस व चमत्कारिक विश्वातील काही नाती!

- aschig