दोनुली

( दोनुली ही संकल्पना कविवर्य वामन रामराव कान्त यांची. या द्विदलात्मक रचना म्हणजे एकाच देठावर पण दोन वेगवेगळ्या दिशांना झेपावणारी पानं. आपण जेव्हा एखादी रचना लिहितो तेव्हा त्या विषयाचा एक अव्यक्त भाव मनात दडुन बसतो...आपण आपल्या बुध्दीला-मनाला पटेल तेवढे लिहुन मोकळे होतो., मात्र हा अव्यक्त भाव लपुन बसतो...कदाचित हा "दोनुली" काव्यसंग्रहाचाच परिणाम असावा..मला माझ्या काही रचनांचा अव्यक्त भाव उमगला आणि मी दोनुली लिहिण्याचा एक प्रयत्न केला.)

प्रश्न

प्रश्नच प्रश्न, कधी डोंगरा सारखे
कधी झाडाएवढे
प्रश्नांचा गुंता सुटता सुटत नाही
उगवत्या सूर्यासोबत रोज येतात
पण तो मावळतांना प्रश्न अस्त होतच नाही
आणि मग दिवसेंदिवस वाढत रहातात
सोडवायचे कसे ? हा प्रश्न विचारत.


मी आज सूर्योदयाची वाटच पहात होते
उत्तरांची झोळी घेउन.
पण हे काय मला सतावणारे प्रश्न
कुठे आहेत ?
या सोप्प्या प्रश्नांसाठी मी माझी
झोळी कशाला रिकामी करु ?

पायवाट

मातीत मळलेली पायवाट
माझ्या पावलांखालून हळूहळू सरकत होती
निर्मनुष्य...थोडीशी अवघडलेली.
मी येणार म्हणून...की काय
पानांची सळसळ थांबली होती
वारा पण दुसर्‍या वाटेने निघून गेला
उशीरा का होईना..उमगले
ही वाट तर माझ्या तळहातांच्या
रेषेवरुनच जात होती.


पाउलखुणांचा मागोवा घेत
निघून तर आले या पायवाटेवर
माणसांनी गजबजलेल्या या वाटेवर
कोणाला वेळच नाही..क्षणभर
सगळेच चेहरे विझलेले...मग्न..हरवलेले
या वाटेवरचे चैतन्य माझ्याकडे धावत धावत आले
"चल तुझे लक्ष्य वाट बघत आहे..गाठ घालून देतो ".

नदीचा काठ

किरणांनी मोहरलेले नदीतले पाणी
हसत खिदळत काठावर आले
काठ मोहरला...हिरवागार झाला
हळूहळू सारा परिसर कंच हिरवा झाला.
काही दिवसांनी तीच पाण्याची लाट परत आली
"अरे काय सुरेख काठ आहे..थांबू या का थोडे?"
पाणी थांबले आणि..आता या शेवाळलेल्या काठावर
हल्ली कोणी येतच नाही.


ओढ्याचा बांध तोडुन पाणी खळखळून
वाहत होते..अखंड
झाडाझुडपातुन..द‍र्‍या खोर्‍यातून
कपारीतून...भानच नव्हते त्याला
घनदाट जंगलातून...वाट तुडवत होते
कधी निळे.कधी हिरवे....कधी गढूळ होत..
त्यालाच ठाउक नव्हती..त्याची वाट
पाण्याच्या प्रवाहाला एकच ध्यास..एकच ओढ...
सागरभेटीची.

- विनीता देशपांडे