स्मरणपर्णे

विवार सकाळ. जाग आली तीच राहिलेल्या कामांची उजळणी करत. सोमवारपासून पुढचा आठवडा सुरू. शाळा, ऑफिस, इ.इ. दुपारी बघितले तर सोसायटीच्या लोकांनी दारात विनंतीवजा सूचना सोडली होती. ’कृपया घरासमोरच्या रस्त्यावरची पाने उचला’. यादीत अजून एक काम वाढले. चिडचिड. राहिली असती पाने इथे तर काय गेले असते यांचे? नाहीतरी नगरपालिकावाले नंतर येऊन उचलतील की. कश्शाला उगाच दंड भरा? असा विचार करून मी ते वाढीव काम अंगावर घेतले आणि त्यासाठी पंजा हातात घेतला.

फराफरा पाने ओढून बाजूला करत असताना झोपेत काहीतरी स्वप्न पडले होते अशी एक जाणीव झाली, पण काय स्वप्न होते ते काही केल्या आठवेना. तोच विचार डोक्यात घेऊन हात यांत्रिकपणे पाने ओढायचे काम करत होते. जसजशी हातांची रग वाढू लागली, तसतशी डोक्यात चीड वाढू लागली आणि स्वप्नाबद्दलचे विचार कुठतरी मागं भिरकावले गेले. आधी एकतर नोटीस, त्यात काम वाढवलेले. त्यात भरीसभर म्हणून वाऱ्याच्या अंगात आले. तो घुमू लागला आणि गोळा केलेली पानं सैरावैरा उधळली. चिडाग्निमध्ये तूप ओतले गेले. मग आत जाऊन विजेवर चालणारा ब्लोअर घेऊन आलो. काट्यानं काटा ! जरा भराभर काम झाले.

पानांचे तीन ढीग जमा करून झाले. केवढी ती पानं! झाडाला विचारावंसं वाटलं, 'किती पानं होती तुला बेट्या?’ बिरबलाची गोष्ट आठवली. दिल्लीत कावळे किती? माझ्याच प्रश्नाचं मला हसू आलं. झाड थोडंच सांगणार "सत्तर हजार चारशे एक्कावन्न. खाली पडलेली पानं कमी असतील, तर काही पानं उडून गेलीत, जास्त असतील तर उडून आलीत." या झाडाचं पण सगळं अजब आहे. १२ महिन्यात ठराविक वेळेला पानं फुटतात, बिया येतात, पानं वाढतात, हिरव्याची पिवळी/केशरी/लाल होतात आणि मग गळून पडतात. झाडसाहेब स्थितप्रज्ञासारखे उभे. का त्यांना शोक होत असेल? का ते ’बचेंगे तो और भी लडेंगे’ म्हणत असतील? नाहीच. बहुतेक ते ’आता काय सूर्य नाही दिसत, काय करायचंय पानं ठेवून मग ? झालं ते बरंच झालं. आता वसंतात बघू की. तेव्हा अजून पानं वाढवू’ असंच म्हणत असतील. असले काहीतरी विचार डोक्यात फिरवत, मी ती पानं उचलायच्या मार्गाला लागलो.

आजीनं अंगण झाडलं होतं. कडूलिंबाची पडलेली पानं एका कोपऱ्यात गोळा करून आणली होती. आता ती उचलून कचरापेटीत टाकणं माझं काम होतं, मी आपले दोन्ही हातात गोळा होतील तेवढी उचलली आणि रस्त्याच्या कडेला टाकून दिली. ’रांxx, कचरापेटीत टाक रे’ आजीनं लगेच उद्धार केला माझा. मला हसू आलं.

आत्ताही मला आठवून हसू आलं. कचरापेटीत पानं भरून मी मागे वळलो. झाडसाहेबांनी अजून काही पाने गाळली होती. साफ केलेल्या जागेवर आता दहा वीस नवीन पानं अवतीर्ण झाली होती. काही अजूनही हवेतच होती. मला आता राग न येता, त्याची मजा वाटत होती.

दुसऱ्या गठ्ठ्याकडे वळलो.

आजीनं दिलेल्या पिवळ्या कॉटनच्या साडीपासून बनवलेल्या दुलईची रंगसंगती/डिझाईन असंच होतं ना? का तिनं दिलेल्या पहिल्यावहिल्या स्वेटरचं ? स्वेटरचं बहुतेक. काय भराभर विणून दिला होता स्वेटर! पहिल्यांदा, एकटाच, आईला सोडून, आजीबरोबर मामाच्या गावाला रेल्वेने गेलो होतो तेव्हा घातलेला, नाही का!

चला, उचला हा गठ्ठा.

हा आवाज कसला? नव्या कोऱ्या करकरीत १ रुपयाच्या नोटांच्या बंडलातून आजी आंबेवालीचे पैसे चुकते करत होती. एकेक नोट वाजवून मगच द्यायची. कसले गोड गोटीआंबे होते ते! कोऱ्या करकरीत नोटा वाजवायला मजा यायची. आपण गेलो असताना तर हमखास आजीकडे असे बंडल असायचे. दोनतीन वेळेला तरी नंतर आपणच केले होते तसे.

टाका तो कचरापेटीत. पाउस पडायला लागला बहुतेक. पळा! हात हलवा भरभर.

हे थेंब कसले पडले? आजी आंघोळीनंतर तिचे नऊवारी लुगडे धुवून वाळायला टाकताना, घडी करण्यासाठी म्हणून आरशाच्या खिळ्याला टांगून दोन भाग करायची आणि मग घडी घालून लुगडे बारके करून दोरीवर वाळत घालायची. त्या खिळ्याला टांगलेल्या ओल्या लुगड्याच्या दोन भागातून पळत जायला, ते लुगडं झटकल्यावर उडणारे ओले थेंब, कण झेलायला काय मस्त वाटायचं !

छ्या, पण आज काही आजी नाही. स्मरणरंजनात रमूनही काही उपयोग नाही. जरा वळावं कुठे तर मागे अजून पानं उगवतातच आहेत. माणसानं कसं झाडासारखं राहिलं पाहिजे, पानं गळली तरी दु:ख नाही. खरंतर पानं ही काहीवेळानं ओझं उतरवल्यासारखी उतरवून ठेवली पाहिजेत. पण पानं गळतात, म्हणून झाड पानं उगवायचं थांबवत नाही. उलट त्याचं तर अव्याहत तेच काम चालू असतं. पानं उगवताना एक बाज असतो, तर गळताना दुसरा, राजेशाही ! मग झाडासारखं म्हणजे कसं? वृक्षप्रज्ञ ? ’जे जे होईल ते ते पहावे? ’

आजीनं तरी दुसरं काय केलं? आजोबा अचानक गेले तेव्हा पदरात ४ पोरं होती. शिक्षण पुरेसे नव्हते. आजीनं आजोबांच्या जागी शाळेत नोकरी धरली. आणि पणजीनं, तिच्या आईनं, घर सांभाळलं. शिकवण्या घेऊन आजीनं सर्वांची शिक्षणं केली. मुलं पायावर उभी राहतील असं बघितलं.

त्यावरही तिचं तत्त्वज्ञान अगदी साधं होतं. ’प्रत्येक जण येताना आपापलं दाणापाणी घेऊन येतो’.

घे हळूहळू स्मरणाने..
पानांचा तू कानोसा,
झाडांच्या अगदी मागे..
तुज दिसतो काय कवडसा?

एव्हाना माझी पाने गोळा करून झाली होती. तरी एक पिवळे पान दारापाशी एका कोपऱ्यातून माझ्याकडे बघत होते. आणि घरात आलो तर शेजाऱ्यांचे एक झाड अंगावर पिवळी केशरी पाने लेऊन मागील दारी उभेच होते. मनातला, आजीच्या अंतिम संस्कारांना जाता न आल्याचा सल किंचीतसा, अगदी किंचितसा का होईना, पण कमी झाला होता.

-नंद्या

प्रतिसाद

Nandya, smaran parne khup avadale hote, proof read karatana ch vachale tyamule lagech pratisad detey! :)

माणसानं कसं झाडासारखं राहिलं पाहिजे, पानं गळली तरी दु:ख नाही. खरंतर पानं ही काहीवेळानं ओझं उतरवल्यासारखी उतरवून ठेवली पाहिजेत. पण पानं गळतात, म्हणून झाड पानं उगवायचं थांबवत नाही.

>> kyaa bat hai!

are yaar ithe maraaThee lihaayachee soy dyaa.

aavaaDale naMdyaa

सुरेख उतरलं आहे मनोगत :).

आवडलं.

सुरेख ,आवडलं.

Mastach re!!

मस्त मनोगत.
लिहीण्याची स्टाईलही आवडली.

सुंदर!

फार सुंदर :)

फार सुंदर :)

बेस्टं आहे हा लेख.
फारच मस्त वाटलं रे वाचून.
अंकातलं पहिलं रत्न सापडलं.

अप्रतिम!

नंद्याभौ, सुरेख लिहिलं आहेस. खूप आवडलं.

aprateemmmm

सुंदर!

सुंदर लिहिलयस, नंद्या!

सुंदर लिहिलय... आवडलं..

क्या बात है!
जबरी लिहिलं आहेस, फार अवडलं.

वा ! क्या बात है! फार छान लिहिलयस :)

छानच लिहील आहे.

मस्त मस्त !

मस्त, आवडलं.

सुरेख!!

वृक्षप्रज्ञ.. आवडलं :)

अतिशय सुरेख !

फारच सुंदर. खूप आवडलं :)

सही

नंद्या, अप्रतिम...
<<माणसानं कसं झाडासारखं राहिलं पाहिजे, पानं गळली तरी दु:ख नाही. खरंतर पानं ही काहीवेळानं ओझं उतरवल्यासारखी उतरवून ठेवली पाहिजेत. पण पानं गळतात, म्हणून झाड पानं उगवायचं थांबवत नाही. उलट त्याचं तर अव्याहत तेच काम चालू असतं. पानं उगवताना एक बाज असतो, तर गळताना दुसरा, राजेशाही ! मग झाडासारखं म्हणजे कसं? वृक्षप्रज्>>
अतीव सुंदर..

सुर्रेखच....