बाटलीतला जादूगार - सुरेश साळगावकर

मा

णूस भौतिकरूपाने आपल्यातून निघून गेला तरी त्याने जोपासलेल्या छंदाच्या रूपाने तो अमर राहतो असं म्हणतात ते काही खोटं नाही. मायबोलीसाठी छंदिष्ट माणसांशी गप्पा मारताना नुकताच या गोष्टीचा प्रत्यय आला. पुण्यात राहणारे सुरेश साळगांवकर यांचे बंधू सदानंद उर्फ अण्णा साळगांवकर यांनी असाच एक आगळावेगळा छंद जोपासला, वाढवला आणि त्या बळावर आपले आजारपणातले दिवसही आनंदी बनवले. अण्णा दुर्दैवाने आज आपल्यात नाहीत पण त्यांचे धाकटे बंधू सुरेश साळगांवकर यांच्याकडून अण्णांच्या या छंदाबद्दल बरीच माहिती मिळाली. विविध आकाराच्या बाटल्यांच्या आत देखावे, वाहने अशा प्रतिकृती करण्याचा छंद त्यांनी जोपासला होता व आज हा सगळा संग्रह सुरेशजींनी जिवापाड जपून ठेवला आहे. तो सगळा खजिना बघत बघतच सुरेशजींशी गप्पा झाल्या.

अण्णांच्या या छंदाची सुरूवात नेमकी कुठून आणि कधी झाली?
अण्णा माझे थोरले बंधू. कलाकुसर त्यांच्या हातातच होती. महाविद्यालयीन जीवनात असताना १९५४ साली त्यांनी आवड म्हणून प्रदर्शनात ठेवण्यासाठी इमारत आणि ताजमहाल अशा काही प्रतिकृती तयार केल्या होत्या. याच सुमारास बाटलीमध्ये बंद अशी शिडाची होडीही केली होती. पण हे सगळं तेवढयावर थांबलं कारण नंतर नोकरीच्या व्यापात हा छंद बाजूला पडला. पण सुरूवात तिथून झाली.

slide4_framed.jpg

मग या इतक्या सगळ्या प्रतिकृती त्यांनी कधी तयार केल्या?
त्याचं असं झालं, ३५ वर्ष स्टोअर ऑफिसर म्हणून एस.टी.मध्ये नोकरी केल्यानंतर वयाच्या ६३व्या वर्षी त्यांना गंभीर स्वरूपाचा हार्टअ‍ॅटॅक आला. ट्रिटमेंटसाठी अण्णा पुण्याला माझ्या घरी राहायला होते. डॉक्टरांनी त्यांना सक्त विश्रांतीचा सल्ला दिला. बाहेर जाणं येणं बंद केलं इतकंच काय त्यांच्या बोलण्यावरही बंधन आलं. मग अशा परिस्थितीत वेळ घालवायचा कसा? आणि त्याचवेळी अण्णांना आपल्या जुन्या छंदाची आठवण झाली. त्यांनी ही कल्पना माझ्याकडे व माझ्या पत्नीकडे बोलून दाखवली. आम्हाला हे ऐकून फार आनंद झाला व आम्ही त्यांना जुन्या बाजारातून विविध प्रकारच्या बाटल्या आणून द्यायला सुरूवात केली.

अण्णांच्या या छंदाबद्दल जरा विस्तृतपणे सांगू शकाल का?
जरूर. अण्णांना पुठ्ठ्याच्या मदतीने विविध प्रतिकृती तयार करण्याचा छंद आधीपासूनच होता. मग एकदा त्यांनी त्रिकोणी आकाराच्या बाटलीत एक होडी तयार केली. इतकंच नाही तर अशीच होडी जुन्या बल्बमध्येही करून दाखवण्याची किमया त्यांनी साधली. आणि मग ज्या आकाराची बाटली उपलब्ध होईल त्याप्रमाणे विचार करून अण्णांनी बाटलीच्या आत बैलगाडी, टांगा, सायकलपासून ते विमानापर्यंत सर्व प्रकारची वाहने, इतिहासातील आणि नाटकातील प्रसंग, व्यक्ती, ताजमहाल, मंदिरे, चर्च, पुण्यातले मानाचे गणपती इतकंच नाही तर बाटलीत देखावा तयार करत असणारी स्वतःची प्रतिकृतीही तयार केली. या छंदात अण्णा इतके रमले की ते आपलं आजारपण पार विसरून गेले.


slide3_framed.jpg

अण्णांच्या या आगळ्यावेगळ्या छंदासाठी साहित्य काय काय लागत असे? आणि या प्रतिकृती कशाप्रकारे बाटलीबंद होत असत?
अण्णांचा हा छंद टाकाऊतून टिकाऊ या प्रकारातला होता. विविध आकाराच्या बाटल्या, जुन्या निमंत्रणपत्रिका, पुठ्ठे, ग्रिटींग कार्ड्स, रंगीत कागद, छत्रीच्या तारा, छोटासा चिमटा आणि फेव्हिकॉल. अण्णांना या प्रतिकृती करताना बघणं ही अतिशय आनंददायी गोष्ट होती. ते प्रत्येक प्रतिकृतीचे छोटे छोटे भाग बाहेर तयार करून घेत असत. मग सगळ्यात बेसचा भाग तारेच्या सहाय्याने बाटलीच्या आत सरकवून योग्य जागी चिकटवून घेत. मग छोटे छोटे भाग घेऊन ते चिमट्याने आत सरकवून योग्य जागी बसवून अनेक तासांच्या किंवा दिवसांच्या अथक प्रयत्नानंतर ती कलाकृती तयार होत असे. हे करताना प्रचंड एकाग्रता लागत असे. हे सगळे करताना अनेक कलाकृतींमधले बारकावे दाखवायलाही अण्णा विसरलेले नाहीत. वाहनांच्या नंबर प्लेट्स, त्यावरची अक्षरं, ड्रायव्हर, रिक्षावाला, रिक्षाचं मीटर , टांगेवाला एक ना दोन.


slide6_framed.jpg
slide5_framed.jpg

अण्णांची मास्टरपीस म्हणता येईल अशी कलाकृती तुमच्यामते कोणती आहे?
माझ्यामते बाटलीच्या आत अण्णांनी उभा केलेला ताजमहाल हा त्यांचा मास्टरपीस आहे. मोठी गोल आकाराची काचेची बरणी एकदा जुन्या बाजारात मिळाली आणि तेव्हा त्यात ताजमहाल करायची कल्पना त्यांना सुचली. बारीक बारीक बारकाव्यांसह अथक प्रयत्नांनंतर अण्णांनी हुबेहुब ताजमहाल बाटलीबंद केला. त्याचप्रमाणे केवळ बाटलीच नाही तर बल्बमध्येही त्यांनी काही छोट्या छोट्या कलाकृती केलेल्या आहेत.


slide11_framed.jpg
slide14_framed.jpg

अण्णांच्या या छंदाला घरातून सगळ्यांचा कशाप्रकारे प्रतिसाद होता?
आमच्या घरात सगळ्यांना काही ना काहीतरी छंद तरी आहे किंवा सगळ्यांना कलेची आवड आहे. त्यामुळे अण्णांना कुणी प्रोत्साहन न देण्याचा प्रश्नच नव्हता. केवळ छंदाच्या बळावर अण्णांनी शारिरीक समस्येचा ज्याप्रकारे सामना केला त्यातून घरातल्या सगळ्यांनाच प्रेरणा मिळाली.
तर अशी ही आगळ्यावेगळ्या छंदाची आणि छंदिष्टाची गोष्ट. सुरेशजी म्हणाले ते काही खोटं नाही. अण्णांचे सगळेच बंधू-भगिनी कलाकार आहेत. कुणी उत्तम रांगोळ्या घातल्या आहेत, कुणी मासिकाच्या कागदातून अनेक बाहुल्या तयार केल्या आहेत, दिवाळीच्या कंदिलात तयार केलेला फिरता देखावाही आम्हाला पहायला मिळाला, कुणी बासरी वाजवतं तर कुणी चित्र काढतं. एक ना दोन. पण स्वतः सुरेशजींनी जगभरातील अनेक ठिकाणांहून अनेक छोट्यामोठ्या गोष्टी जमवल्या आहेत त्याचा उल्लेख करायलाच हवा. त्यांच्याकडे गणपतीच्या अनेक मूर्ती, काचेच्या वस्तू, लाकडाची वाहने, अनेक प्रकारचे प्राणी इतकंच नाही तर लाकडाच्या वेगवेगळ्या आकाराच्या ओंडक्यापर्यंत सगळंच आहे. या सगळ्या गोष्टींचा मिळून आकडा हजारांच्यावर सहज जाईल. हा सगळा संग्रह पहायला सुरेशजींच्या घरी भेट द्यायला हवी तरच अण्णांच्या कलाकृतींना आणि सुरेशजींच्या संग्रहाला खरा न्याय दिल्यासारखे होईल.

बाटलीमुळे माणूस आयुष्यातून उठतो हे आपण पाहतोच पण हीच बाटली माणसाला त्याचे आयुष्य परत देऊ शकते याचे हे उत्तम उदाहरण आहे.

शब्दांकन - nda

हितगुज दिवाळी अंक २०१२ छंदमग्न सदरासाठी

प्रतिसाद

कमाल आहे!

बापरे, खरंच कमाल आहे !
बाटलीतली कलाकृती कशी बनते हे कळल्यावर किती एकाग्रता, चिकाटी आणि कमालीचं कसब लागत असेल त्याची कल्पना करता आली. आयुष्याच्या ज्या वळणावर अण्णांनी हा छंद जोपासला ते वाचून खूप आदर वाटला. साळगावकरांच्या छंदवेड्या कुटुंबाला Hats off !
nda ह्यांनाही धन्यवाद.

सुंदर कलाकृती. खुपच कौशल्याचे आणि चिकाटीचे काम आहे हे.

वा. आवडले.

व्वाह!!

बाटलीमुळे माणूस आयुष्यातून उठतो हे आपण पाहतोच पण हीच बाटली माणसाला त्याचे आयुष्य परत देऊ शकते याचे हे उत्तम उदाहरण आहे.
>> :)

बाटलीत सृष्टी बसवणारा बाटली बाहेरचा जिनी... :)

बापरे काय कलाकुसर आहे. खुपच सुंदर. खुप मेहनत करावी लागत असणार हे दिसतच.

>>बाटलीमुळे माणूस आयुष्यातून उठतो हे आपण पाहतोच पण हीच बाटली माणसाला त्याचे आयुष्य परत देऊ शकते याचे हे उत्तम उदाहरण आहे.

क्या बात! आणि ती बाटलीतली रिक्षा तर अगदीच भन्नाट आहे..