संवाद - सचिन कुंडलकर

को

बाल्ट ब्लू. रन्वार आणि फिन्सेन्ट फॉन हॉख यांचा आवडता रंग. झळाळता, रसरशीत, स्वतंत्र अस्तित्व असलेला. उल्हसित करणारा. इतर निळ्या रंगांपेक्षा वेगळा. या रंगाला स्वत:ची ओळख आहे. हा रंग अचेतनाभोवती चेतना निर्माण करतो, अवकाशाला पूर्णत्व प्राप्त करून देतो. आपलं अस्तित्व जाणवून देणारा कोबाल्ट ब्लू इतर रंगांमुळे झाकोळून जात नाही. किंबहुना तो आपली जागा हक्कानं मागून घेतो. अनेकदा हा रंग नितळ, पारदर्शक वाटतो. कोबाल्ट ब्लू हा अस्सल व्यक्तिवादी रंग आहे.

सचिन कुंडलकरच्या कादंबरीत, नाटकांत, चित्रपटांत हा कोबाल्ट ब्लू ठायीठायी दिसतो. त्याच्या पहिल्या कादंबरीचं नावच ’कोबाल्ट ब्लू’ आहे. या कादंबरीतला मनोर्‍यात राहणारा मुलगा कॅनव्हासवर फटकारे मारावेत तसं तनयच्या आणि अनुजाच्या आयुष्यावर आपलं कोबाल्ट ब्लू अस्तित्व कायम ठेवून निघून जातो. ’छोट्याश्या सुट्टीत’ला व्योम, ’गंध’मधली लग्नाच्या वयाची मुलगी किंवा ’अय्या’तली मीनाक्षी देशपांडे या कोबाल्ट ब्लूनंच रंगतात. ’अय्या’तला सूर्या त्या मनोर्‍यातल्या मुलाप्रमाणेच कोर्‍या कॅनव्हासवर आपलं कोबाल्ट ब्लू जग निर्माण करतो.

वयाच्या विसाव्या वर्षी सचिननं ’कोबाल्ट ब्लू’ लिहायला सुरुवात केली, आणि बाविसाव्या वर्षी ती लिहून संपवली. खर्‍या अर्थानं आजची म्हणावी अशी ही कादंबरी. कालसुसंगत विचारांचा, उत्कटपणे जगण्याचा उत्सव साजरा करणारी ही कादंबरी मानवी नातेसंबंधांकडे, नात्यांमधलं अपूर्णत्व मिटवण्याच्या मानवी धडपडीकडे एका वेगळ्याच कोनातून पाहते. ’छोट्याश्या सुट्टीत’ हे नाटकही असंच परिपूर्ण नात्यांच्या शोधात असलेल्या व्यक्तींच्या विश्वात शिरकाव करण्याचा प्रयत्न करतं. चिरस्थायी प्रेमाच्या शोधात असलेली, पूर्णत्वाकडे जाण्यासाठी धडपडणारी, पण आपलं स्वतंत्र अस्तित्व टिकवून ठेवण्याचा प्रयत्न करणारी या नाटकातली पात्रं पुढे ’फ्रिजमध्ये ठेवलेलं प्रेम’, ’चंद्रलोक कॉम्प्लेक्स’ आणि ’पूर्णविराम’मध्येही भेटतात.

स्वतंत्र असणं, हे सचिनला खूप महत्त्वाचं वाटतं. प्रत्येकाला आजच्या काळात आणि हवं तसं जगता यायला हवं. जगण्यातला आनंद मिळवता यायला हवा. हा आनंद उपभोगणं हा प्रत्येकाचा हक्क आहे. मात्र आपल्याला हवं तसं जगायचं असेल तर भूतकाळाकडे तटस्थपणे बघता यायला हवं. आजच्या जगाशी जुळवून घेण्याची कुवत अंगी निर्माण करायला हवी. मूल्यांचा तात्पुरतेपणा मान्य करायला हवा. ’निरोप’, ’रेस्टॉरंट’, ’गंध’, ’अय्या’ या त्याच्या चित्रपटांमध्ये आपल्याला हवं ते करता यावं आणि हवं तसं जगून आनंद मिळवता यावा, यासाठी आसुसलेली किंवा तसं जगणारी माणसं दिसतात.

सचिन स्वत:चे चित्रपट स्वत: लिहितो. त्यानं आजवर दिग्दर्शन केलेले चारही चित्रपट गाजले आहेत. सचिनचे लघुपटही जाणत्या प्रेक्षकांनी उचलून धरले आहेत. ’निरोप’, ’रेस्टॉरंट’, ’गंध’ हे चित्रपट अनेक राष्ट्रीय - आंतरराष्ट्रीय महोत्सवांमधून दाखवले गेले आहेत. ’निरोप’ला सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपटाचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता. ’गंध’साठी सचिनला सर्वोत्कृष्ट पटकथालेखकाचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. कुस्टुरिका आणि अल्मोवोदार यांचा प्रभाव असलेला ’अय्या’ हा त्याचा ताजा चित्रपट प्रेक्षकांना चांगलाच चकवून गेला. या चित्रपटातल्या खर्‍या, स्वत:शी प्रामाणिक असलेल्या, लैंगिकतेकडे निकोप दृष्टीनं बघणार्‍या मराठी व्यक्तिरेखा प्रेक्षकांना चांगल्याच अनोळखी वाटल्या.

त्याला अस्वस्थ करणार्‍या, आव्हान देणार्‍या विषयांबद्दल सचिन मोकळेपणानं लिहितो. त्याची पात्रं लैंगिकतेबद्दल बोलताना किंवा शारीरिक आकर्षण मान्य करताना लाजत नाहीत. लैंगिकतेबद्दल लिहिणंबोलणं म्हणजे काहीतरी वाह्यात आणि वाईट, असा समज असणाच्या या आजच्या काळात सचिनचं लिखाण स्वागतार्ह ठरतं.

सचिन सदाशिव पेठेतल्या एका मध्यमवर्गीय कुटुंबात वाढला. पुरोगामी असल्याचा आव आणला तरी अतिशय रुढीप्रिय असलेल्या मराठी समाजाशी त्याची उत्तम ओळख आहे. भूतकाळाशी, परंपरांशी नाळ न तोडू शकलेला, शाश्वततेचा आग्रह धरणारा मराठी माणूस सचिनच्या लिखाणात अनेकदा दिसतो. आपल्या स्तंभांमधून सचिन अशा प्रतिगामी, दांभिक प्रवृत्तींबद्दल वेळोवेळी लिहितो. बहुसंख्यांना त्यानं दाखवलेल्या आरशातलं स्वत:चं रूप आवडत नाही. त्यामुळे त्याला उद्धट, बेमूर्वतखोर, गर्विष्ठ, मोठ्यांचा आदर न करणारा अशी विशेषणं लावली जातात.

सचिनशी वेळोवेळी मारलेल्या गप्पांचं हे संकलन आहे. या गप्पांचा मूळ उद्देश त्याची जडणघडण आणि त्याची मतं समजून घेणं हा असल्यानं चित्रपटविषयक किंवा नाटकांचे सगळेच तपशील या मुलाखतीत नाहीत. सचिन कुंडलकर या लेखकाच्या व दिग्दर्शकाच्या कलाकृतींमागची विचारधारा समजून घेण्याचा हा प्रयत्न आहे.

Sachin7.jpg

चित्रपटच तयार करायचे, दिग्दर्शकच व्हायचं, हे तू कधी ठरवलंस?

मी अगदी शाळेत होतो तेव्हापासून, म्हणजे आठवीनववीपासून ठरवलं होतं की, चित्रपट बनवायचे. मला लेखक वगैरे व्हायचं नव्हतं, मला चित्रपटच बनवायचे होते. मग बारावीची परीक्षा झाल्यानंतर मला सुमित्रा भावे आणि सुनील सुकथनकर भेटले, आणि मी त्यांच्याबरोबर काम करायला सुरुवात केली. ’दोघी’ हा चित्रपट तेव्हा ते करत होते. हा चित्रपट तयार होतानाची संपूर्ण प्रक्रिया मी पाहिली. अगदी चित्रीकरण संपून, संकलन होऊन, फिल्मलॅबमधून प्रिंट येईपर्यंतची. चित्रपट बनवण्याची ही सगळी प्रक्रिया मला अतिशय आवडली. आपण चित्रपट बनवायचे, हे आधी ठरवलं होतंच, 'दोघी'मुळे आता ते नक्की झालं.

सिनेमा ही आपल्या पिढीची प्राथमिक कला. त्यामुळे सिनेमा बनवणं, हे माझंच काम आहे, हे काम आपल्याला अगदी सहज जमेल, असं मला तेव्हा वाटायचं. लहानपणी मी खूप सिनेमे पाहायचो. घराशेजारी अलका टॉकिज होतं. तिथे लागणारे हॉलिवुडचे सिनेमे मी आवडीनं बघत असे. बाबा मला हे इंग्रजी सिनेमे दाखवायचे, आणि आई अमिताभचे सिनेमे दाखवायची. सिनेमे बघताना कसलाही भेदभाव मी पाळत नसे. टीव्हीवर, टॉकिजात लागतील ते सिनेमे चार लोक बघतात तसं मी सरधोपट बघायचो. आणि मला सिनेमा बघणं आवडायचं. पण तोपर्यंत मला ’इंडिपेंडंट सिनेमा’ म्हणजे काय, हे माहीत नव्हतं. युरोपीय सिनेमाशी ओळख झाली नव्हती. दिग्दर्शकप्रणीत चित्रपट म्हणजे नक्की काय, हे ठाऊक नव्हतं. सुमित्रामावशी - सुनीलबरोबर काम करायला सुरुवात केल्यावर आपण इतकी वर्षं ज्याबद्दल बडबडत होतो, ते ’सिनेमा बनवणं’ म्हणजे असं असतं, हे कळलं.

सुमित्राताई आणि सुनील तुला कसे भेटले?

’सुदर्शन रंगमंच’च्या प्रमोद काळ्यांचा ’आदि’ नावाचा एक नाटकाचा ग्रूप आहे. मी अकरावीत असताना एका मित्राच्या ओळखीनं या ग्रुपात काम करायला जायला लागलो. त्यावेळी प्रमोद काळे सुमित्रामावशींना नेपथ्यात मदत करत होते, आणि त्यांना दोन मदतनीस हवे होते. उमेश कुलकर्णी माझा लहानपणीपासूनचा मित्र. आम्ही दोघं पाचवीपासून एफटीआयआयमधून बाहेर पडेपर्यंत एकत्र होतो. तर एकदा रात्री मला उमेशनं विचारलं की, काळेसरांनी अशा अशा कामासाठी विचारलं आहे, आपण जायचं का? मला जायचंच होतं. दुसर्‍या दिवशी सकाळी जाऊन आम्ही सुनीलला इंटरव्ह्यू दिला. ’या कामाला’, असं तो म्हणाला, आणि आम्ही दोघं ’दोघी’च्या सेटवर जायला लागलो. आमचं काम प्रॉपर्टीची देखभाल करणं हे होतं.

उमेश आणि तू शाळेपासून एकत्र होतात. त्याचाही ओढा चित्रपटांकडे होता का?

अजिबात नाही. उमेशचा ओढा नाटकांकडे जास्त होता. त्यामुळे शाळेत किंवा कॉलेजात आम्ही सिनेमांबद्दल कधी बोलल्याचं मला आठवत नाही. ’दोघी’च्या संकलनाच्या वेळी आम्ही सुमित्रामावशी-सुनीलबरोबर मुंबईला राहिलो, तेव्हा आम्हांला गंभीरपणे सिनेमा बनवावासा वाटू लागला. खरं म्हणजे एखादा लघुपट किंवा माहितीपट बनवावा, असं आम्हां दोघांनाही तेव्हा वाटत होतं. आम्ही फारच लहान होतो तेव्हा. वयाची अठरा वर्षंही पूर्ण केली नव्हती. त्यामुळे स्वतंत्रपणे सिनेमा बनवणं शक्यच नव्हतं.

इतक्या लहान वयात दिग्दर्शक व्हावं अशी इच्छा असणं, हे जरा मजेशीर आहे.

पण मला नव्हतं तसं वाटत. सिनेमा बनवणं आपल्या आवाक्याबाहेरचं आहे, असं कधीही मला वाटलं नाही. सिनेमा माझ्यासमोर पडद्यावर मला दिसायचा, म्हणजे तो बनवणं शक्य आहे, इतकं साधं होतं माझ्यासाठी ते.

त्यावेळी जे मराठी चित्रपट तयार होत होते, त्यांची जातकुळी वेगळी होती. सुमित्राताई - सुनील यांचा ’दोघी’ हा अगदी वेगळा चित्रपट होता. आपण नक्की कशा पद्धतीचे चित्रपट करायचे, हे तुला कसं आणि कधी कळलं?

चित्रपटाचं तंत्र समजून घेण्यातच माझी सुरुवातीची दोनतीन वर्षं गेली. त्यावेळी सुमित्रामावशी - सुनील मला लॅबमध्ये जाऊ देत होते. मी तिसराचौथा साहाय्यक होतो त्यांचा, पण मी विनंती केल्यावर त्यांनी मला संकलनाची प्रक्रिया पाहू दिली, प्रिंट कशी तयार होते, हे पाहू दिलं. चित्रपट तयार करण्याचं माझं शिक्षण सुरू होतं तेव्हा. ’दोघी’चं चित्रीकरण सुरू झालं १९९४ साली, आणि त्याच्या पुढच्या वर्षी सुनीलनं मला आणि उमेशला राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाच्या, म्हणजे नॅशनल फिल्म्स आर्काइव्ह्‌ज्‌च्या फिल्म क्लबाचं सभासदत्व घ्यायला लावलं. दर शनिवारी आम्ही तिथे जाऊन सिनेमे पाहायला लागलो. सिनेमा म्हणजे काय, या माध्यमाची ताकद काय असते, हे मला तेव्हा कळलं. दिग्दर्शकाचा, लेखकाचा सिनेमा (जसा ’दोघी’ होता) कसा असतो, हे तिथे बघायला मिळालं. मी जेव्हा पहिल्यांदा आर्काइव्ह्‌ज्‌च्या थिएटरला सिनेमा बघायला गेलो, तेव्हा तिथे लुई ब्युन्यूएलच्या चित्रपटांचं पुनरावलोकन सुरू होतं. समजायला अतिशय अवघड असा हा दिग्दर्शक. मी मराठी माध्यमातला मुलगा असल्यामुळे ’सर्रियल’ या शब्दाचा अर्थही तेव्हा मला माहीत नव्हता. पण नेटानं आम्ही ते सारे चित्रपट पाहिले. मग नंतर आम्ही सलग उझू पाहिला. सलग कुरोसावा पाहिला. तारकोव्हस्की पाहिला. अ‍ॅन्तोनिओनी पाहिला. त्यावेळी सुरेश छाब्रिया संचालक होते आर्काइव्ह्‌ज्‌चे, आणि ते फार काळजीपूर्वक आखणी करायचे चित्रपटांची. त्यांनी तयार केलेली चित्रपटांची माहितीपत्रकंही वाचनीय असायची. ते दिग्दर्शकांबद्दलही लिहायचे, त्यामुळे चित्रपट कळायचा. हे असे चित्रपट बघून आपल्याला नक्की काय करायला आवडेल, हे कुठेतरी मनात तयार होत गेलं. आर्काइव्ह्‌ज्‌च्या थेटरात हे असे पुष्कळ सिनेमे बघितल्यामुळे, आणि बीएमसीसी कॉलेजला न गेल्यान‍ं मला खूप फायदा झाला.

तू आत्ता ज्या दिग्दर्शकांचा उल्लेख केलास, त्यांचे चित्रपट समजायला तसे कठीण.

सुनील एफटीआयआयचा विद्यार्थी असल्यामुळे तो प्रत्येक दिग्दर्शकाच्या कामाकडे बघण्याच्या दृष्टीबद्दल नेमकेपणानं सांगायचा. चित्रपट कसा बघायचा, हे कळायला सुनीलमुळे मदत झाली. मग नंतर मी 'आशय फिल्म क्लब'चा सदस्य झालो. सिनेमाच्या सेटवर आणि आर्काइव्ह्‌ज्‌च्या थेटरातच माझा बराचसा वेळ जाऊ लागला. आपल्याला कशा पद्धतीचे सिनेमे बनवायचे आहेत, हे तेव्हा लक्षात यायला लागलं. आपण कसे आहोत, आणि आपल्याला कशा पद्धतीचे सिनेमे करायचे आहेत, ही जाणीव अतिशय नकळतपणे आणि हळूहळू होत जाते. हे दही लागत जाण्यासारखं असतं. खूप संथ आणि नकळत घडत जाणारी प्रक्रिया असते ती. आपल्या आवडीनिवडी तयार करण्याचं कामही चित्रपट बघूनच करावं लागतं. त्यावेळी पूर्णवेळ मी आणि उमेश हेच काम करायचो. आर्काइव्ह्‌ज्‌ला जाऊन सिनेमे बघत बसायचो आम्ही. आलियाँस फ्रॉन्सेचा फिल्म क्लब होता. मॅक्समुल्लर भवनाचा फिल्म क्लब होता. त्यांचे सिनेमे आर्काइव्ह्‌ज्‌च्या थेटरात दाखवत. हे सिनेमे नसले तर एफटीआयआयच्या मेन थेटरात रोज सिनेमा दाखवतात. तो बघायला आम्ही जायचो. रोज संध्याकाळी साडेसहा वाजता एकतरी सिनेमा आम्ही पाहतच असू. त्यावेळी आम्ही सीए करत होतो, सीएस करत होतो, आणि कॉलेज होतंच. मग आम्ही सीएस सोडलं, नंतर सीए सोडलं. पण ग्रॅज्युएट मात्र झालो.

हे चित्रपट पाहून तुम्ही आपापसांत चर्चा करायचात?

मनात सुरू असणारी मुख्य प्रक्रिया महत्त्वाची. कोणाशी बोलणं, चर्चा करणं हे महत्त्वाचं नाही. आपल्याला काय वाटतं, हे सगळ्यांत महत्त्वाचं असतं.

पण आपली प्रगती होते आहे, हे कसं कळतं?

हे कळतच नसतं. आपण इतके भांबावलेले आणि सिनेमा बघून त्यातून काही घेण्यात उत्सुक असतो की, प्रगती होते आहे की नाही, हे कळत नाही, आणि ते महत्त्वाचंही नाही. मुळात इथे हवीये कोणाला प्रगती? आपल्याला रोज नवा अनुभव हवा असतो. त्यातून प्रगती होओ किंवा अधोगती होओ. आपण सतत बदलत राहिलं पाहिजे. काल जे होतो ते आज नसणं, हे मला महत्त्वाचं वाटतं. घुसळण महत्त्वाची. ’माझं काय होतंय’ हा विचार करायलाही खरं म्हणजे वेळ नसतो. जे काही होतंय ते तुम्ही होऊ देत असता. वॉशिंग मशिनीत टाकलेल्या कपड्यांसारखे तुम्ही असता.

आर्काइव्ह्‌ज्‌च्या थेटरात तुझं शिक्षण सुरू होतं. तरी चित्रपट तयार करण्याचं पद्धतशीर प्रशिक्षण घ्यावं, असं तुला का वाटलं?

मी आलियाँस फ्रॉन्सेज्‌मध्ये फ्रेंच शिकत असताना तिथे एव्हेलिन बेरो नावाच्या संचालिका होत्या. त्या मला एक दिवस म्हणाल्या की, पॅरिसला जाऊन चित्रपटविषयक प्रशिक्षण घेण्यासाठी एक शिष्यवृत्ती असते, आणि भारतातून फक्त एका विद्यार्थ्याची यासाठी निवड होते, त्यासाठी चित्रपटाबद्दल प्रेम असावं लागतं, फ्रेंच भाषा यावी लागते, शिवाय एक लेखी आणि तोंडी परीक्षा द्यावी लागते, तर ही परीक्षा तू दे. मी ती परीक्षा दिली, लेखी परीक्षा उत्तीर्ण झालो. एका एसटीडी बूथवरून मी तोंडी परीक्षा दिली आणि तीही उत्तीर्ण झालो. त्यावेळी मला सगळ्यांतून बाहेर पडायचं होतं. मला पॅरिसला जायचं होतं. म्हणून मी तिथल्या ला फेमी (एकोल नासिओनाल सुपेरिअर दे मेतिएर द लिमाज ए द्यु साँ) या फिल्म इन्स्टिट्यूटमध्ये शिकायचं ठरवलं. बारा देशांतून बरोब्बर बारा मुलं पॅरिसच्या इन्स्टिट्यूटला शिकायला येणार होती. खरं म्हणजे परत पुस्तकांतून शिकण्याची मला फार काही इच्छा नव्हती. पण मला चार महिने पॅरिसला राहायला मिळणार होतं, वाट्टेल ते करता येणार होतं. मुख्य म्हणजे अतिश्रीमंत अशी ती शिष्यवृत्ती होती. म्हणून मी गेलो. फ्रेंच सिनेमाशी तिथं नव्यानं ओळख झाली. ’चित्रकला आणि चित्रपट यांचा संबंध’ असा विषय आम्हांला अभ्यासाला होता. त्यातून बरंच काही शिकता आलं. वेगवेगळ्या देशांतून आलेल्या विद्यार्थ्यांशी मैत्री झाली. यातून मला लक्षात आलं की, आपण चित्रपटाचं पद्धतशीर शिक्षण सहन करू शकतो. म्हणून मी परत आल्यावर एफटीआयआयला (भारतीय चित्रपट आणि दूरदर्शन संस्था, पुणे) प्रवेश घेतला.

पण एफटीआयआयमधून तू वर्षभरातच बाहेरही पडलास.

एफटीआयआयला मी एक वर्ष पूर्ण केलं. नंतरच्या वर्षी तिथे विद्यार्थ्यांनी संप केला. अनेक विद्यार्थ्यांचे राजकीय प्रश्न होते. तिथे चित्रपटविषयक शिक्षणापेक्षा राजकीय ताकद आणि महत्त्वाकांक्षा यांचाच प्रभाव जास्त होता. एफटीआयआयला प्रवेश घेण्यापूर्वी मी बरंच काम केलं होतं. ते सगळं मागे सोडून मी शिकायला आलो होतो. त्यामुळे या राजकीय प्रश्नांशी स्वत:ला जोडून घेण्यात मला रस नव्हता. शिवाय वर्षभरातच मला असं लक्षात आलं की, दिग्दर्शक व्हायचं असेल, तर शिकण्यासाठी एफटीआयआयपेक्षा उत्तम जागा म्हणजे राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाचं थिएटर. तिथे असणं आणि सिनेमा बघणं मला खूप आवडत होतं. मी मग एफटीआयआय सोडलं, आणि एक लघुपट तयार केला. ’आउट ऑफ द बॉक्स’ नावाचा.

’आउट ऑफ द बॉक्स’ करण्यासाठी माझ्याकडे पैसे नव्हते. कथानक अनेक दिवस माझ्या डोक्यात घोळत होतं. मी आणि सुमित्रामावशींची मुलगी, सती (भावे) पटकथेवर काम करत होतो. हा लघुपट करण्यासाठी माझ्या आईवडिलांनी, मित्रांनी पैसे दिले, पण फिल्मचा स्टॉक घेण्यासाठी हे पैसे पुरेसे नव्हते. त्यावेळी 'दहावी फ'चं चित्रीकरण संपलं होतं, आणि सुमित्रामावशी - सुनीलकडे 'कोडॅक' कंपनीच्या रिळांचे चार डबे होते. 'कोडॅक'ची रिळं अतिशय महाग असतात. सुमित्रामावशी - सुनीलनं ही रिळं मला देऊन टाकली, आणि मी ’आउट ऑफ द बॉक्स’ चित्रीत केला.

’द बाथ’ हा तुझा एक फार महत्त्वाचा लघुपट आहे. तू ’द बाथ’ केलास त्याला आता बरीच वर्षं झाली. अतिशय जबाबदारीनं, संयतपणे तू हा लघुपट चित्रीत केला होतास. त्या काळी असा विषय निवडणं, आणि तो पडद्यावर सादर करणं हे धाडसाचं होतंच, पण मला आवडलं ते तुझं सादरीकरण. इतका जिवंत, हेलावून सोडणारा अनुभव क्वचितच दुसर्‍या कुठल्या लघुपटानं दिला असेल.

’समभावना सोसायटी’ नावाची एक संस्था मुंबईत पुरुष वेश्यांबरोबर काम करते. त्यांनी मला एक माहितीपट करायला सांगितलं होतं. पुरुष वेश्यांच्या आयुष्यावर. मी तिथे गेलो, अनेक पुरुष वेश्यांना भेटलो. तेव्हा मला असं वाटलं की, मी खांद्यावर कॅमेरा ठेवून एक भूमिका घ्यायची, आणि त्यांना विचारायचं की, तुम्ही का असं करता, आणि तुम्ही किती दिवस हे काम करणार आहात, हे फार उद्धटपणाचं ठरेल. माहितीपट बनवण्यासाठी प्रश्न विचारणार्‍या माणसाच्या भूमिकेत शिरण्याची मला इच्छा नव्हती. तेव्हा असं वाटलं की, माहितीपट बनवण्यापेक्षा एक लघुपट बनवावा, ज्यात भावनिक ओलावा असेल. ज्या मुलांसाठी ही संस्था काम करत होती ती फार लहान होती. कोवळ्या वयाची, विचित्र अवस्थेतली ती मुलं होती. शरीरविक्रयाचं काम ती मुलं करत नसती तर त्यांना भीक मागावी लागली असती, किंवा फुगे विकावे लागले असते. त्यामुळे हे काम ती करत होती, आणि त्यांना रोज असंख्य घाणेरडे स्पर्श होत होते. ही मुलं बोलताना सतत स्पर्शाबद्दल तक्रार करत होती. त्यांच्याशी बोलल्यानंतर मला स्पर्शाविषयी लघुपट बनवावासा वाटला, कारण त्यांना भावनिक जखमा त्या स्पर्शांमुळे होत होत्या. माहितीपट न करता लघुपट करण्याचा माझा निर्णय संस्थेनं मान्य केला, आणि असंख्य देशांमध्ये हा लघुपट दाखवला गेला. अनेकांना तो फार जवळचा आणि आपलासा वाटला.

मघाशी आपण पॅरिसबद्दल बोलत होतो. या शहराबद्दल तू कायम भरभरून लिहितोस, बोलतोस. तुझ्या आयुष्यावर असलेल्या पॅरिसच्या प्रभावाबद्दल सांगशील?

फक्त दिग्दर्शक म्हणूनच नव्हे, तर लेखक म्हणून आणि माणूस म्हणूनही फार मोठा प्रभाव आहे या शहराचा माझ्यावर. कारण पॅरिस हे एक जादुई शहर आहे. मी पहिल्यांदा तिथे गेलो, तेव्हा कुटुंबातून बाहेर पडून एकट्यानं राहण्याची सवय मला नव्हती. ती सवय मला या शहरात लागली. आपण घेतलेले कुठलेही नैतिक आणि अनैतिक निर्णय हे आपले असतात, आणि आपणच त्यांना जबाबदार असतो, हे मला या शहरामुळे कळलं. मी पॅरिसला पहिल्यांदा गेलो तेव्हा एक शतक, सहस्रक संपत आलं होतं, आणि जग प्रचंड वेगानं बदलत होतं. १९९९ साल होतं ते. भारतही बदलत होता, पण भारतात अजूनही फ्रान्समधल्या १९६८ सालच्या क्रांतीची आभा होती. माझ्या अवतीभवती जी पुण्यातली बुद्धिवादी मंडळी होती, ती पॅरिसकडे एका वेगळ्या बोहेमियन स्पिरिटनं बघत होती.

पॅरिसला जाताना माझ्या बाबांनी मला ’अपूर्वाई’ हातात दिलं होतं. ’विमानात वाच’ म्हणून. मी पुलंच्या नजरेनं पहिले दोन दिवस पॅरिस बघण्याचा प्रयत्न केला. पण मला लक्षात आलं की, पुलंचं पॅरिस आता अस्तित्वात नव्हतं. मग मी समर नखाते आणि माधुरी पुरंदरे यांच्या भूमिकेतून पॅरिस बघण्याचा प्रयत्न केला, जे आता लयाला जात चालं होतं. त्या पॅरिसच्या आता फक्त खुणा शिल्लक होत्या. माझी पॅरिसची पहिली भेट या शहराचा भूतकाळ समजून घेण्यात गेली. सगळा वेळ मी म्यूझियमांमध्ये, सिनेमाथेकांमध्ये असायचो. इतिहासात मी फार वेळ घालवला. आता मी दरवर्षी जातो तेव्हा बर्‍यापैकी वर्तमानात असतो. एखादं विशिष्ट पेंटिंग बघायचं असेल तर तेवढ्यापुरतं म्यूझियममध्ये जाऊन बघून येतो. पण माझा सुरुवातीचा काळ हा पॅरिसच्या रम्य, गौरवशाली वगैरे भूतकाळात गेला.

आता पॅरिस हे जागतिक शहर झालं आहे. जुन्या काळातलं वैभव आता नाहीसं झालं आहे. पण तरीही माझ्या दृष्टीनं हे शहर म्हणजे एक चेटकीण आहे. असं काहीतरी आहे या शहरात, की तुम्ही ताजेतवाने होऊन तिथून परत येता. या शहरात सतत काहीतरी जादुई, बोहीमियन असं घडत असतं. ही बोहीमी त्या १९६८ सालच्या क्रांतीतून आलेली नाही, किंवा कलाकारांच्या कलंदरपणातूनही आलेली नाही. पॅरिस आता कलाकारांची राजधानी वगैरे राहिलेलं नाही. जगातल्या अनेक शहरांना आलं आहे तसं एक मटीरिअलिस्टिक स्वरूप या शहराला आलं आहे. पॅरिसचे दोन भाग आहेत. जुन्या पॅरिसमध्ये इतिहास भरलेला आहे. नव्या पॅरिसमध्ये अरब राहतात, तुर्की राहतात, जर्मन राहतात, पाकिस्तानी राहतात, भारतीय राहतात. पॅरिसची ओळख आता सतत बदलते आहे, पण माझ्यासाठी ते पुण्यामुंबईइतकंच महत्त्वाचं शहर आहे. मला तिथे दरवर्षी जावंच लागतं, आणि स्वत:ला हुडकावं लागतं. मी तिथे नव्या ओळखी जोडतो, काही नवे मित्र मिळतात. पॅरिसच्या रात्री मात्र अजूनही तितक्याच गूढ आहेत. त्या अजूनही तुमच्यातल्या कलाकाराला ऊर्जा देतात. फ्रेंच माणसाची भाषा तुम्हांला अवगत असेल, तर लगेच तुमच्यासाठी सारी दारं उघडली जातात. अतिशय रंजक अशी ही संस्कृती आहे, आणि पुढली हजारो वर्षं ती नष्ट होणार नाही. पॅरिसची जादू कायम राहील. त्यामुळे माझ्यावर आहे प्रभाव पॅरिस शहराचा, आणि हा प्रभाव माझ्याबरोबर सतत असतो.

खरं म्हणजे पुणं, मुंबई आणि पॅरिस अशी तीन शहरं माझ्यासाठी फार महत्त्वाची आहेत. ही शहरं माझ्यात सामावली आहेत. या शहरांमध्ये मी सगळ्यांत जास्त राहिलो आहे, आणि या शहरांना मी अजूनही सतत भेट देत असतो. या शहरांकडे मी त्रयस्थपणे पाहू शकतो. काही वर्षांपूर्वीपर्यंत मी म्हणायचो की, मी पुण्याचा मुलगा आहे. पण मला मी आता कुठलाच मुलगा वाटत नाही. मी अधांतरी आहे. मी माझ्याबरोबर फिरत असतो. मी जिथे जातो तिथे माझं घर असतं. माझी जी मतं आहेत, ज्या पद्धतीनं मी विचार करतो, ते सगळं या शहरांमुळे, तिथल्या संस्कृतीमुळे, तिथल्या लोकांच्या विविध रंगांमुळे आहे. मी अत्यंत शहरी माणूस आहे, त्यामुळे शहरांकडे मी प्रश्न म्हणून न बघता अत्यंत चांगली गोष्ट म्हणून बघतो. शहरी जगणं मला आवडतं. मला गावं आवडत नाहीत. मी एकही दिवस कुठल्याही खेड्यात राहू शकत नाही. मला ती सवय नाही.

म्हणजे तुझ्यातल्या कलाकाराला पॅरिस अजूनही आकर्षित करतं...

तुम्ही जर आजच्या काळात जगणारे कलावंत असाल, तर पॅरिस तुम्हांला भरभरून देईल. तुम्ही जर अजूनही साठीच्या दशकात राहणारे असाल, तर मात्र पॅरिसचं आजचं स्वरूप बघून ढसाढसा रडाल ’गेले ते दिवस’ म्हणत. तुम्ही कुठल्या परिप्रेक्ष्यानं एखाद्या जागेकडे बघताय ते फार महत्त्वाचं आहे. तुम्ही आजच्या नजरेनं नाही बघितलं अवतीभवती तर तुम्ही दु:खी व्हाल. तुम्ही स्मरणरंजनात अडकला आहात, आणि अजूनही गतकाळात जगत आहात, ही तुमची समस्या आहे. इतर कोणाचा त्यात दोष नाही. तुम्ही भूतकाळात रमता, पुढच्या पिढ्यांनाही तीच सवय लावता आणि मग आयुष्यभर डोळ्यांना झापडं बांधून जगत राहता. हे मला मुंबईच्या, पुण्याच्या बाबतीत घडताना दिसतं. ’पूर्वीसारखं पुणं राहिलं नाही’, असं अनेकजण म्हणत असतात. कसं राहील ते? नकोच आहे ते राहायला तसं. जुन्याला भ्रष्ट केलं, नष्ट केलं, त्याच्या अस्तित्वावर, अस्तित्वात राहण्याच्या हेतूंवर प्रश्नचिन्ह उमटलं, उमटवलं, तरच जिवंत राहण्याची, आणि नवनिर्मितीची प्रक्रिया पुढे सरकेल.

पॅरिस मला दृश्यात्मकतेच्या दृष्टीनं सतत आव्हान देतं. पॅरिसचा सिनेमा मात्र मला असं काही आव्हान देत नाही. त्यापेक्षा भारतातला आजचा सिनेमा जास्त ताजा, सकस आणि प्रयोगशील आहे. फ्रेंच सिनेमा आता शिळा झाला आहे. तो कुठेतरी गतकाळात अडकून बसला आहे. त्यामुळे सध्या भारतीय असणं आणि भारतात सिनेमा तयार करणं, यापेक्षा अधिक आनंददायी मला काहीच वाटत नाही.

हाच जुनं विरुद्ध नवं संघर्ष ’रेस्टॉरंट’मध्ये आला होता का?

’रेस्टॉरंट’चा हा विषय नव्हता खरं तर. अनेक समीक्षकांना आणि प्रेक्षकांनाही हा विषय चित्रपटात का दिसला, हे कळत नाही. माझ्या दृष्टीनं ’रेस्टॉरंट’ हा एकटेपणावरचा, स्वातंत्र्यावरचा सिनेमा आहे. स्वत:चे निर्णय स्वत: घेण्याबद्दलचा हा चित्रपट आहे. यापलीकडे त्यात काही नव्हतं.

Sachin3.jpg

तू म्हणालास की, भारतात चित्रपट तयार करणं हे आनंददायी आहे. हे कसं?

आत्ता भारतात मला हव्या त्या पद्धतीचा चित्रपट तयार करण्याची मुभा आहे. मी मराठी असल्याचा फायदा हा की, मी मला माझ्या प्रांतीय भाषेत चित्रपट करता येतो, आणि राष्ट्रीय भाषेतही मी चित्रपट करू शकतो. दुसरं असं की, इतर अनेक देशांप्रमाणे माझ्या चित्रपटाचं बजेट हे सरकारी अनुदानावर अवलंबून नाही. युरोपीय देशांमध्ये ९०% बजेट हे सरकारी अनुदानांमधून गोळा करावं लागतं आणि मगच तुम्हांला चित्रपट तयार करता येतो. भारतात आर्थिक सुबत्ता असल्यानं मी वेगवेगळ्या आकाराचे, वेगवेगळ्या भाषांमधले चित्रपट करू शकतो. त्यासाठी लागणारा पैसा मला मिळू शकतो. हा पैसा मिळवण्यासाठी मला सरकारची मदत घ्यावी लागत नाही. महत्त्वाचं म्हणजे सध्या भारतात जे घडतंय, ते माझ्यासारख्या चित्रपटकर्त्यांना चित्रपटांद्वारे सांगावंसं वाटतंय. भारताचा चेहरामोहरा वर्षागणिक बदलतोय. ’भारतीय’ असणं म्हणजे काय हे दरवर्षी बदलतं आहे. त्यामुळे तुमच्याकडे सांगण्यासारखं नेहमीच असतं. दुसरीकडे कुठे असं घडत नाहीये. दुसर्‍या कुठल्याच देशात अशी घुसळण होत नाहीये. चीनमध्ये भारतासारखेच फार वेगानं बदल होत आहेत. पण तिथे तुम्हांला हे बदल टिपण्याची, त्याबद्दल बोलण्याची परवानगी नाही. भारतात मला माझं मत मांडण्याचं स्वातंत्र्य आहे. मला अभिव्यक्तिस्वातंत्र्य आहे. मला जे काही सांगायचं आहे, ते मी सांगू शकतो, आणि त्यातून मला आनंद मिळतो. त्यामुळे इतर देशांतल्या दिग्दर्शकांपेक्षा कामाच्या दृष्टीनं मी बराच सुखी आहे.

हा आनंद तुला जे सांगायचं आहे ते सांगण्याचा की तुझं म्हणणं प्रेक्षकांपर्यंत पोहोचतं आहे, याचा?

तू कुठलाही चित्रपट बनवलास तरी त्यातून तुला काय सांगायचंय, हे फारतर दहा टक्के लोकांना कळतं. बाकीचे टीव्ही बघावा तसा चित्रपट बघतात, किंवा बघतच नाहीत. शिवाय आपल्याकडे ’आम्हांला तुम्ही केलेला सिनेमा आवडला’, असं प्रेक्षकांनी दिग्दर्शकाला सांगण्याची पद्धत नाही. नाटकात हे शक्य होतं, कारण तिथे तुम्ही हजर असता आणि प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया टिपता. चित्रपटाच्या बाबतीत असं होत नाही. त्यामुळे प्रेक्षकांच्या आनंदात आपला आनंद मानणं, हे सुख चित्रपटदिग्दर्शकाच्या नशिबी नाही. ’तुमचा सिनेमा बकवास होता’, असं म्हणत प्रेक्षक माझ्याशी भांडला तर मला नक्की आवडेल. पण चित्रपटमहोत्सव सोडले तर प्रेक्षकांशी थेट संवाद साधणं शक्य नसतं.

चित्रपट बनवताना तुझ्यासाठी प्रेक्षक किती महत्त्वाचे असतात?

मला जे सांगायचं आहे चित्रपटातून, ते नीट पोहोचतं आहे की नाही, याची मी पन्नासदा खात्री करून घेतो. अगदी संकलन करतानाही मी हा विचार करतो. त्यामुळे माझ्यासाठी प्रेक्षक महत्त्वाचे असतात.

पण हल्लीचा प्रेक्षकवर्ग हा एकसंध राहिलेला नाही. शहरी, ग्रामीण, मध्यमवर्गीय, कॉलेजला जाणारा असे असंख्य गट पडले आहेत. चित्रपट तयार करताना आपला प्रेक्षक अमूक एक वर्गाचा आहे, हे तुला कळतं का? किंवा तसं तू ठरवतोस का?

जे कोणी माझा चित्रपट अंधारात शांतपणे बघतील, ते माझे प्रेक्षक आणि त्यांच्यापर्यंत मला जे काही सांगायचं आहे, ते पोहोचावं, अशी माझी इच्छा असते. त्यात मी प्रतवारी करत नाही. हा चित्रपट फक्त पुण्याच्या प्रेक्षकांना कळेल, तो चित्रपट फक्त बिहारमध्ये चालेल, अशी काही वर्गवारी माझ्या डोक्यात नसते. दिग्दर्शक म्हणून मी काय विचार करतो? तर अंधारात, शांतपणे, मोठ्या पडद्यावर हलती चित्रं बघण्याच्या अनुभवाला जो कोणी शरण येईल, त्याला मी चांगला अनुभव देईन. त्यांच्याच करणीनं बरेच प्रेक्षक या अनुभवापासून लांब जातात, ही गोष्ट वेगळी. ना ते मोठ्या पडद्याकडे येत, ना ते अंधारात सिनेमा बघत, ना ते शांत बसत. सिनेमा बघताना ते त्यांच्या गर्लफ्रेंडशी खेळतात, फोनवर गप्पा मारतात. त्यांना जर माझ्या सिनेमातून काही मिळालं नाही तर त्याबद्दल मी काही करू शकत नाही. सिनेमा बनवण्याची जबाबदारी माझी, बघण्याची जबाबदारी माझी नाही.

हल्ली इंटरनेटवर लिहून लगेच प्रकाशित करता येतं म्हणून असेल कदाचित, पण प्रत्येक बाबतीत इन्स्टंट प्रतिक्रिया दिल्या जातात. आपण जे वाचतोय, बघतोय, त्यावर विचार करण्याची तसदी कोणी फारशी घेत नाही. प्रेक्षकांच्या, वाचकांच्या अशा तात्काळ प्रतिक्रियांचा तुला त्रास होतो का?

सुरुवातीला मला लोकांच्या तात्काळ प्रतिक्रियांचा त्रास व्हायचा. पण नंतर मला असं लक्षात आलं की, तुमचं काम हे लोणचं मुरल्यासारखं आपोआप मुरत जातं, त्याला स्वतःचं एक आयुष्य मिळतं आणि ते आपोआप समाजाशी कुठेतरी नातं जोडत जातं, कारण समाज बदलत असतो. मी तयार केलेल्या पात्रांविषयी गैरसमज निर्माण होत जातात किंवा लोकांना ती कळत नाहीत, याची मला आता सवय आहे. पण काही वर्षांनी या पात्रांशी आपलेपणा जोडणारी एक नवी पिढी तयार होताना मला दिसते. त्यामुळे मी वाट पाहायला शिकलोय. टोपीतून ससा काढून दाखवला आणि लोकांनी टाळ्या वाजवल्या, असं काम मी करत नाही. मी अशाप्रकारचं काम करतोय जे मुरायला वेळ लागतो. त्यामुळे प्रेक्षक ज्याप्रकारे तात्काळ प्रतिक्रिया देतात तशी मी देत नाही.

हल्लीचा प्रेक्षक चित्रपट या माध्यमाला फार गृहित धरतो का?

मला असं वाटतं की, पंधरावीस वर्षांपूर्वी चित्रपट हे भारतात फार महत्वाचं माध्यम होतं. चित्रपट हा रोजच्या जगण्याचा एक आधारस्तंभ होता. आता तसं नाही. आता टीव्ही आणि इंटरनेट ही भारतीय प्रेक्षकांच्या करमणुकीची प्रमुख साधनं आहेत. जेव्हा मी चित्रपट बनवत असतो तेव्हा मला याचं भान असतं. पण मला चित्रपट बनवायला आवडतं. मी टीव्हीवर रोज दाखवल्या जाणार्‍या मालिका करू शकत नाही. मला चित्रपटच बनवता येतो, आणि प्रेक्षकांच्या दृष्टीनं हल्ली चित्रपट बघणं महत्त्वाचं नाही, हे मला माहीत आहे. त्यामुळे तुमच्या चित्रपटाला नेहमीच एक ठरावीक प्रेक्षक असेल, जो चित्रपटांचं पोषण करत राहील, चित्रपटाला प्रतिसाद देईल. त्यामुळे प्रेक्षकांनी काही जबाबदार्‍या घ्याव्यात, असं मला वाटत नाही. त्यांना आवडतं ते त्यांनी बघावं, आणि आपल्याला आवडतं ते आपण करत राहावं.

अजून एक महत्त्वाचं म्हणजे, चित्रपट बघणं आपल्यासाठी खूप सोपं आहे. आपल्याला चित्रपट फार सहज बघायला मिळतात. आपल्याकडे भरमसाठ सिनेमे तयार होतात. शिवाय हल्ली लोकांचा अटेंशन स्पॅन खूप कमी झाला आहे. त्यामुळे स्थिर बसून चित्रपट बघण्याची सवय नाहीशी होत चालली आहे, आणि चित्रपटदिग्दर्शक याबाबत काहीच करू शकत नाही. जर अशी वेळ आली की, लोक अतिशय असंस्कृत झाले, आणि अर्धा तासही एका जागी बसून चित्रपट बघणं त्यांना अशक्य झालं, तर त्या दिग्दर्शकाला त्याच्या भाषेत, त्याच्या देशात चित्रपट बनवण्याचा आग्रह सोडावा लागेल. चित्रपट बनवतच राहायचं असेल, तर मला अमूकच पद्धतीचे, अमूकच भाषेतले चित्रपट बनवायचे आहेत, असे हट्ट सोडावे लागतील कदाचित. चित्रपटकर्ते त्या देशातून बाहेर पडतील, आणि दुसर्‍या देशांत जाऊन चित्रपट बनवतील. कारण काही देश चित्रपटांबाबत सुसंस्कृत आहेत, तर काही देश असंस्कृत आहेत. त्यामुळे तुम्हांला त्या देशातून बाहेर पडून चित्रपट बनवावे लागतील, आणि माझासमोर उदाहरणं आहेत अशी. त्यामुळे प्रेक्षक चित्रपट कसा बघतात, हे बदलत राहील, आणि ज्याला खरंच चित्रपट बनवायचा आहे, तो चित्रपट बनवत राहील. असं चित्रपट बनवणं आवश्यकच आहे. नाहीतर ’आमचा तो काळ किती सुंदर होता’, ’मराठीतलं सुवर्णयुग नाहीसं झालं’ वगैरे तक्रारी तुम्ही फक्त करत बसाल. प्रेक्षक तुम्हांला हवा तसा प्रतिसाद देत नाहीत, असं वाटतं का तुम्हांला? त्यांच्या आवडीनिवडीकडे दुर्लक्ष करून तुम्हांला आत्ता महत्त्वाचा वाटतो, तोच चित्रपट तुम्ही बनवा. असुरक्षिततेच्या, अनिश्चिततेच्या वातावरणात राहूनच आता यापुढे काम करावं लागणार आहे. त्यामुळे रोज नव्यानं सुरुवात करायची, हे शिकावं लागेल.

पण आपली भाषा सोडून इतर भाषांत चित्रपट बनवणं सोपं आहे का?

हो, सोपं आहे. मी एक फ्रेंच आणि इंग्रजी भाषेतला सिनेमा बनवतोय. खरं सांगायचं तर भाषेचे, प्रांताचे, देशाचे, प्रदूषणाचे प्रश्न हे अस्मितेचे प्रश्न आहेत. फार कोत्या वृत्तीच्या लोकांना हे प्रश्न पडतात. माझ्या आणि माझ्यानंतरच्या पिढ्यांना या प्रश्नांमध्ये गुरफटणं महागात पडणार आहे. आत्ताच्या क्षणात जगण्याची आपल्या आधीच्या पिढीला सवय नव्हती, ती आपल्याला करून घ्यावी लागणार आहे. तुम्ही तुमच्याभोवती काहीतरी निर्माण करा, आणि पुढे चला. आत्ता मी इथे एक चित्रपट बनवतोय, आणि पुढच्या वर्षी मला कदाचित चित्रपट बनवता येणार नाही, कारण आता इथले लोक फक्त टीव्हीच बघतात, असं जर मला वाटलं, तर मी प्रेक्षकांना दोष न देता दुसरीकडे सिनेमा बघणार्‍यांच्या देशात जाऊन सिनेमा बनवेन.

बरोबर आहे. कुठल्याही प्रश्नाशी अस्मिता जोडण्याची मस्त सवय आपल्याला आहे.

आपल्याकडे अस्तित्वाच्या, अस्मितेच्या प्रश्नांमध्ये राजकीय प्रवृत्ती गुंतल्या आहेत. पण त्यापेक्षा वाईट म्हणजे अजूनही आपल्याला तात्पुरतेपणाची सवय झालेली नाही. खूप वर कॅमेरा लावून बघितलं, तर असं दिसतं की, ’आहे तसं राहिलं तर बरं’ म्हणण्याची वाईट सवय आहे आपल्या समाजाला. जे आज आहे, ते उद्या नसेल, हे समजून घेण्याचीही सवय नाही आपल्याला. ही सवय लावलीच जात नाही. कारण आपल्यासाठी वर्तमानकाळापेक्षा आपला भूतकाळ महत्त्वाचा आहे.

तुला हे भारतीय समाजाचंच वैशिष्ट्य वाटतं का?

हो, मला हे भारतीय समाजाचंच वैशिष्ट्य वाटतं. आपण फार चिवटपणे आपला भूतकाळ जपत राहतो. भूतकाळाच्या स्मृतीला आपण पोषक मानतो. असं मानणारे लोक वर्तमानकाळ कसा भ्रष्ट आहे, पूर्वी सगळंच कसं छानछान होतं, असं म्हणत भूतकाळाच्या आधारे भविष्यकाळ घडवायला निघतात. वर्तमानकाळाची पायरी ते गाळतात. अशा लोकांचा भ्रमिष्टपणा समाजाची ऊर्जा कमी करत असतो. तो समाज मग आहे तिथेच राहतो. उदाहरणार्थ, तू परदेशात स्थायिक झालेले मराठी लोक बघितलेस तर तुझ्या लक्षात येईल की, ते प्रागैतिहासिक काळातच अडकून पडलेले आहेत. ते लोक इंटरनेटवर खूप बडबडत असले, तरी ते फार बिचारे असतात. आता असं झालं आहे की, आर्थिक कारणांमुळे अमेरिकेहून भारतात अनेक मराठी कुटुंबं परतू लागली आहेत. भारत म्हणजे काय, आणि इथलं जगणं कसं आहे, यांविषयीची त्यांची समज फारच अ‍ॅनलॉग काळातली आहे. मी त्यांच्या विचारपद्धतीला अ‍ॅनलॉग विचारसरणी म्हणतो. ते ट्रॅक १, ट्रॅक ५, ट्रॅक २ अशी निवड करू शकत नाहीत. त्यांना रिवाइंड आणि फॉरवर्डच करावं लागतं सगळं. परदेशात स्थायिक झालेले आणि इथे परतलेले असे हे लोक कुठल्यातरी वेगळ्याच काळात जगत आहेत, आणि त्यांच्या मुलांचीही हीच समस्या आहे. मरोत ती मराठी भाषा, तुम्ही आत्ता अमेरिकेत आहात ना, आणि तुम्हांला इथेच राहायचं आहे ना, मग इथल्यासारखं जगा, हे त्यांनी त्यांच्या मुलांना शिकवलं नाही. कशाला हवीत ती नाट्यसंमेलनं, साहित्यसंमेलनं आणि ओढूनताणून शनिवारीरविवारी सण साजरे करणं? किल्ल्यावर जसे आपण कागदी मावळे ठेवतो, तसे हे मराठी लोक मराठी संस्कृतीचे प्रतिनिधी तयार करतात. त्यामुळे विचारांमध्ये, वागण्यामध्ये भ्रष्टता येते. अस्पष्टता येते. विचार दोलायमान होतात. आणि या द्विधा विचारसरणीची पेरणी पुढच्या पिढीमध्ये परदेशस्थ मराठी समाज करतो. हे फार चुकीचं आहे. त्यांनी त्यांच्या मुलांना त्यांच्या पद्धतीनं जगू द्यायला हवं. तुमच्या मुलांनी आनंदी राहणं महत्त्वाचं की मराठी बोलणं?

आजूबाजूला इतकं झळाळतं सांस्कृतिक वैभव असताना आपल्या मायदेशातल्या आता बर्‍याच जुन्या झालेल्या सांस्कृतिक अवशेषांना ही मंडळी कवटाळून बसलेली दिसतात. कोणी एखादं ग्रीक नाटक पाहिलं, किंवा एखाद्या विद्यापीठाच्या रेपर्टरीच्या नाटकाला गेलं आहे, किंवा एखाद्या फिलहार्मनिक ऑर्केस्ट्राबद्दल कोणी लिहिलं आहे, हे मला फारसं दिसलेलं नाही.

साधी गोष्ट आहे. हे लोक त्यांचं विमान ज्या काळात उडालं तो काळ फ्रीजमध्ये ठेवून बरोबर घेऊन गेले आहेत. काळाचा तो तुकडा ते सतत कवटाळून बसलेले आहेत. शिवाय जे लोक परदेशात बहुसंख्येनं जातात, ते तिथे आपलं काम करण्यापलीकडे काहीच करत नाहीत. तुम्ही अमेरिकेत किंवा युरोपात राहताय म्हणजे तुम्ही फार हुशार, बुद्धिवादी, रसिक असाल, असं अजिबात नाही. तुम्ही तिथे पोटार्थी म्हणून जात असता, आणि ती खळगी भरण्यात तुमचा निम्मा वेळ जात असतो. तू म्हणतोस ते बरोबर आहे. मला नेहमी असं फार वाटतं की, किती लोकांनी पाहिल्या असतील, अनुभवल्या असतील इतर भाषांमधल्या, देशांमधल्या गोष्टी? त्यांना स्वत:ला समृद्ध करण्यात रसच नसतो, आणि तेवढा वेळही नसतो. नोकरी केल्यानंतर जो काही वेळ उरला असेल, त्यात ते इथे भारतात राहून जे करतील, तेच तिथेही करतील. सेक्स करतील, मुलं जन्माला घालतील. आज्ज्यांना बाळंतपणासाठी बोलावतील. बारशी करतील. किंवा गणपती आणि दिवाळी साजरे करतील. वेबसाइटीवरून फराळ मागवतील. ही इथल्या सामान्य माणसांप्रमाणेच स्थलांतरित झालेली सामान्य माणसं आहेत. जागरूक राहून देशोदेशीचे चित्रपट बघण्यात, नाटकं बघण्यात, गाणी ऐकण्यात, चित्रं आणि शिल्पं बघण्यात ते कशाला शक्ती आणि वेळ वाया घालवतील? मी त्यांच्याकडून तशी अपेक्षाच करत नाही. तुम्ही तिथे का गेलात? पैसे कमवायला. तुम्ही काही शोधायला, किंवा स्वत:चा शोध घ्यायला वगैरे तिथे गेलात का? इथे चांगलं चालत असूनही सगळं काही झुगारून तिथे गेलात का? तर नाही. 'मागणी तसा पुरवठा' या सूत्रानुसार स्वत:चं मनुष्यबळ पुरवायला तिथे गेलात. त्यामुळे परदेशात गेले म्हणून लगेच संगीत, कला, साहित्य यांबाबत त्यांना कळेल, ही अपेक्षाच चूक आहे. इथे ते जसं जगत होते, तसंच तिथेही जगणार. ते पैसे कमावतायत ना? त्यात आनंदी आहेत ना? मग झालं. त्यांचा आनंद त्यांनी शोधावा. त्यांचा तोटा कुठे आहे? तर जेव्हा ते बरोबर नेलेल्या जुन्या काळाला आठवून 'आमचं तेच खरं' हे त्यांच्या मुलांना सांगायला लागतात, तेव्हा सगळं चुकतं. ते पालक म्हणून चुकलेले असतात, व्यक्ती म्हणून नाहीत, आणि हे त्यांच्या पुढच्या पिढीतल्या मुलामुलींशी गप्पा मारल्यानंतर लक्षात येतं. ही मुलं आपल्या आईवडिलांविषयी अतिशय विनोदी पद्धतीनं बोलत असतात. पण त्यांच्याकडे पैसा आहे, आणि ते खूश आहेत, हे महत्त्वाचं आहे. ही पन्नास-पंचावन्न वर्षांची अगदी साधारण माणसं आहेत. मराठी भाषेच्या आणि मराठी संस्कृतीच्या संवर्धनाची जबाबदारी स्वत:हून अंगावर घेतलेली सामान्य माणसं. भलेही पुलं आणि वपु वाचून ’आम्ही किती वाचतो’ अशी शेखी ते मिरवत असतील, किंवा अजूनही ’गीतरामायण’ आणि ’शुक्रतारा’ म्हणजेच मराठी संगीत असा त्यांचा समज असेल, किंवा अजूनही त्यांच्या संमेलनांमध्ये फक्त विनोदी किंवा डोळ्यांतून खोटं पाणी काढणारीच नाटकं सादर केली जात असतील, किंवा प्रमुख पाहुणे म्हणून फक्त महाराष्ट्रातल्या प्रसिद्ध समाजसेवकांनाच बोलावलं जात असेल, तरी त्यांना हवा तसा पैसा त्यांनी मिळवला आहे, आणि त्यातून ते आनंदी झाले आहेत. पालक म्हणून मात्र ते फारफार सामान्य आहेत. आता ते परत येतायत तेव्हा दिसतं की, ते सांस्कृतिकदृष्ट्या किती बिचारे आहेत. त्यांच्या पुढच्या पिढीमध्ये मात्र विचारांची जास्त स्पष्टता आहे, कारण ती पिढी इथली भाषा, संस्कृती आणि आचारविचार विसरून जिथे जन्मली तिथल्याप्रमाणे राहायला शिकली आहे.

आपण भाषेच्या, संस्कृतीच्या विनाशाला फार घाबरतो.

हो. आणि हा विनाश होणं फार महत्त्वाचं आहे.

पण भाषेबरोबर ज्ञान नष्ट होतं.

होत असेल नष्ट तर होओ. कुठलाही माणूस स्वत:चं आयुष्य दु:खी करून घेत नाही. आयुष्य दु:खी न करून घेण्याचं ज्ञान म्हणजे संस्कृती. ही संस्कृती बदलणारच काळाप्रमाणे. भोंडल्याची गाणी, किंवा रोजच्या वापरातले काही शब्द नष्ट झाले तर माझ्या जगण्यात काय फरक पडतो? दरवर्षी काही शब्द नाश पावतात. त्यांचा वापर थांबतो. ते शब्द नष्ट होत असतील तर मी का त्याबद्दल वाईट वाटून घेऊ? मला माझ्या भाषेत सेक्स, प्रेम, हिंसा व्यक्त करता येत नाहीत. मी पुणेरी, मराठी माणूस आहे. पण या तिन्ही भावना व्यक्त करण्यासाठी मी इंग्रजीचा आधार घेतो. पुढची पिढी अजून काही भावना व्यक्त करण्यासाठी दुसर्‍या भाषेचा आधार घेईल. मी अजूनही विश्वास मराठीतून दाखवू शकतो, आदर मराठीतून दाखवू शकतो. पण मी लैंगिक भावना मराठीतून व्यक्त करू शकत नाही. मला अश्लील बोलायचं असेल, तर ते मी मराठीतून करू शकत नाही. किंवा खूप राग आला तर मला ’फक यू’ म्हणावं लागतं. किंवा ’बास्टर्ड’ वगैरे काही म्हणावं लागतं. मराठीचा वापर मी यावेळी करू शकत नाही. एकतर ते ग्रामीण वाटतं, किंवा जीवशास्त्रीय वाटतं. माझ्यासारख्या शहरी माणसाला, ज्याची अस्मिता आणि ज्याचं अस्तित्व शहरी आहे, मराठी भाषा याबाबतीत मदत करत नाही. त्यामुळे मी मला हवं ते बोलतो. कारण बोलणं महत्त्वाचं आहे. बोलण्याचीच कशाला, मराठीत लिहिण्याचीही सक्ती नसावी. जे लिहितायेत मराठीत त्यांना लिहू देणं, आणि जे नाही लिहीत मराठीत त्यांना तसं करू देणं, हे महत्त्वाचं आहे. हेच चित्रपटांच्याही बाबतीत खरं आहे.

Sachin2.jpg

एक दिग्दर्शक म्हणून समाजाप्रती तुझी काही जबाबदारी आहे, असं तुला वाटतं का?

चित्रपटकर्त्याची समाजाप्रती जबाबदारी असते, असं मानणारी एक पिढी होती. पण वैयक्तिकदृष्ट्या मी तसं मानत नाही. माझ्यासाठी चित्रपट हा फार स्वतंत्र, खाजगी आणि वैयक्तिक अनुभव असतो. मला ’सामाजिक’ वगैरे बाबींचं काही पडलेलं नसतं. चारजणांना शहाणं करून सोडण्याची जबाबदारी माझ्यावर नाही. मला मी केलेला चित्रपट कशावर आहे, कशासाठी केलाय, हे सांगण्याची गरज वाटत नाही. मला त्याबद्दल कोणी विचारूही नये. चित्रपट बनवणं ही माझी जबाबदारी आहे. त्याखेरीज इतर कुठलीही जबाबदारी मी मानत नाही. दुसरं असं की, समाजवादी विचारसरणीची भुतं अजूनही आपल्या मानगुटीवर बसली आहेत. त्यातून असा प्रश्न येतो की, समाजासाठी तुम्ही काय करता? तर मला असं वाटतं की, आपापलं काम प्रामाणिकपणे करणं म्हणजेच समाजासाठी काहीतरी करणं. घर सोडून जाणं, कुठल्यातरी आंदोलनात मेणबत्त्या पेटवून फर्गसन रस्त्यावरून चालणं म्हणजे समाजासाठी काहीतरी करणं नव्हे. मी दिग्दर्शक आहे, मी मान मोडून माझं काम करावं. परिचारिकेनं तिचं काम करावं, वेश्येनं तिचं काम करावं, हॅकरानं त्याचं काम करावं. स्मगलरानं त्याचं काम करावं. प्रत्येकानं त्याला आवडेल ते काम मन लावून करावं. अमूक एका आंदोलनामुळेच किंवा खूप मोठा त्याग केल्यानंच समाजाचं भलं होणार आहे, हा भ्रम आहे. तुम्ही स्वत:च्या आनंदासाठी काम करता म्हणजे काही गुन्हा करत नाही, आणि स्वतःच्या आनंदासाठी काम करणार्‍यांना जाब विचारण्याचा अधिकार तुम्हांला नाही.

एक दिग्दर्शक म्हणून मी समाजासमोर एक आरसा घेऊन शांतपणे उभा आहे. तो खूप जड आरसा आहे. हा आरसा घेऊन उभं राहणं, हे माझं काम आहे. हे काम सोडून मी अण्णा हजार्‍यांच्या मागे मेणबत्त्या घेऊन चाललो, तरच काहीतरी ग्रेट केलं, असं मला वाटत नाही. तो जड आरसा हाती धरण्याचं महत्त्वाचं काम मी करतो आहे. हे काम मी शांतपणे करतोय. ’बघा बघा, मी आरसा कसा मस्त धरलाय’, असंही मी कोणाला सांगत नाहीये. मी फक्त चित्रपट करतोय. आणि ते माझ्यासाठी सर्वांत महत्त्वाचं काम आहे.

मी करतो तसंच काम लेखक करत असतात. असे जड आरसे हाती धरून जगभर लेखक, कवी, दिग्दर्शक उभे असतात, आणि जबाबदारीनं ते हे काम करत असतात. यापेक्षा अधिक काही केलं तरच त्यांच्या सामाजिक जाणिवा प्रखर, हे मला पटत नाही. माझ्या मते प्रत्येक चित्रपटात सामाजिकता असते. आपल्या जगण्यात आपले सामाजिक, राजकीय, आर्थिक, कलेबाबतचे असे सगळे विचार, सगळे दृष्टिकोन रोज डोकावत असतात. हेच विचार, हेच दृष्टिकोन मग चित्रपटातही येतात. केकवर आयसिंग केल्यासारखं परत वेगळं ’सामाजिक’ हे लेबल कशाला? माझा आक्षेप हे लेबल लावण्याबद्दल आहे. तसे चित्रपट बनवण्याबद्दल नाही.

म्हणजे थोडक्यात ज्याला जे आवडतं, ते काम त्यानं करावं.

अगदी. ज्याला जे आवडतं त्याला ते करण्याचं स्वातंत्र्य हवं. पण होतं काय की, ’मी सामाजिक काम करतो’ असं सांगून काहीतरी करणारे जे असतात, त्यांना वाटतं की ते इतरांपेक्षा फार उच्च आणि परीटघडीचे झाले आहेत, आणि इतरेजनांना काही किंमत नाही, कारण ते ’सामाजिक’ असं काही करत नाहीत. निराश, असामाधानी माणसंच सामाजिकतेच्या नावानं फार आवाज करतात. आयुष्यात इतर काहीही न जमलेल्या माणसांनी समाजसुधारक होऊन गोंधळ घालण्यापेक्षा मटीरिअलिस्टिक माणसं बधीर असली तरी बरी. असूया, असुरक्षितता आणि न्यूनगंड यांतून सामाजिकता आणि नैतिकतेची झिंग येणार आणि मटीरिअलिस्टिक जीवनशैलीतून बधीरता येणार. तर ही बधीरता परवडली. न्यूनगंड, अपयश आणि समाजातल्या वाइटाला आपण जबाबदार असल्याची दोषभावना यांमुळे सामाजिक भान असलेले लोक गरजेपेक्षा जास्त आहेत भारतात.

एखादी बाई जर मन लावून घरातलं काम करत असेल, आणि त्यात जर ती आनंदी असेल, तर ते तिचं समाजासाठीचं योगदान आहे. ती आनंदी आहे ना, मग तिचं काम तिला करू द्या. तिला तिच्या मुलांसाठी स्वयंपाक करू द्या, दुपारी झोपू द्या, टीव्ही बघू द्या. ’हे काय चाललंय काय तुझं? बाहेर जाऊन पैसे कमाव’, असं तिला तुम्ही म्हणू शकत नाही. एकाच प्रकारचं चौकोनी आयुष्य जगणं, म्हणजेच प्रगत असणं, हा जो काही कर्कश सूर तयार झाला आहे सामाजिकतेच्या आणि वेगवेगळ्या इझम्‌स्‌च्या नावानं, तो भीषण आहे. आपल्या आधीच्या पिढ्यांमध्ये हा सूर फार जोरकस लागायचा. हा सूर आपण नाकारला पाहिजे. या वेगवेगळ्या इझम्‌स्‌मुळे फार मोठं नुकसान झालं आहे. फेमिनिझम्‌ हा त्यांतला पहिला.

मध्यंतरी एकदा चर्चेत हा मुद्दा आला होता की, स्त्रीला स्वतंत्र करणं म्हणजे काय, तर नोकरी करू देणं.

तिला नोकरी करू देणारे तुम्ही कोण? माझ्या आईला रात्री आठ वाजता टीव्ही बघायचा असतो. त्यावेळी मी घरी आलो तर ती माझ्याकडे ढुंकूनही बघत नाही. ’मी तिला टीव्ही बघू देतो’, असं मी म्हणणार नाही. तिला टीव्ही बघू देणारा मी कोण? तिला हवं ते करण्याचं स्वातंत्र्य आहे. उद्या मला घरी बसून टीव्ही बघावासा वाटला दिवसभर तर ते स्वातंत्र्य मला आहे. त्याबद्दल टिप्पण्या करण्याचा कोणालाही अधिकार नाही.

आपल्याकडे स्त्रीस्वातंत्र्याचा संबंध अर्थार्जनाशी जोडला गेला आहे. एखादी स्त्री घरकाम करत असेल, किंवा एखाद्या पुरुषानं स्त्रीची सूटकेस उचलली, तर या गोष्टी वाईट असा सूर असतो.

पुरुषानं स्त्रीची सूटकेस उचलली, किंवा प्रेमानं कारचं दार उघडलं, तर तो त्या दोघांचा प्रश्न आहे. आपल्याकडे सामाजिक आवाजाचं फार प्रदूषण आहे. आणि यात उजव्यांइतकीच डाव्यांचीही सोवळीओवळी आहेत. या उजव्यांनी आणि डाव्यांनी आता नाहीसं व्हावं, आणि एक व्यक्ती म्हणून अस्तित्व महत्त्वाचं ठरावं, असं मला वाटतं (आणि पुन्हा, मला काय वाटतं, यानं फारसा फरक पडत नाही.) ’वी द पीपल’ जाऊन ’आय’ला महत्त्व मिळावं. मग लग्नासाठी तुम्हांला कुटुंबाची मदत लागणार नाही, तुम्ही काय शिकावं, यात कुटुंबाचा हस्तक्षेप नसेल. मधाच्या पोळ्यासारखी एकमेकांमध्ये गुंफलेली आयुष्यं जाऊन व्यक्तिस्वातंत्र्य देणारं आयुष्य प्रत्येकाला मिळायला हवं. सगळ्यांनी सगळ्यांशी वाईट वागून एकेकटं राहावं, हे मला अपेक्षित नाही. ’जो जे वांछिल तो ते लाहो’ या दिशेनं प्रत्येकाच्या आयुष्याचा प्रवास असावा.

परत चित्रपटांकडे वळूया. तू मघाशी म्हणालास की, भारतात चित्रपट बनवणं तुलनेनं सोपं आहे. पैसा उभा करणं, हव्या त्या विषयावर चित्रपट बनवता येणं या गोष्टी खरंच सोप्या आहेत का?

नाही, तुम्हांला पैसे उभे करण्याकरता झगडावंच लागतं. तुम्हांला अनेक गोष्टींशी झगडूनच सिनेमा करता येतो. सिनेमा तयार करणं सोपं नाही. पण असं झगडून सिनेमा तयार करणारे अनेक आहेत. अनुराग (कश्यप) आहे, दिबाकर (बॅनर्जी) आहे. अनेक प्रांतीय चित्रपटदिग्दर्शक आहेत. हवा तसा सिनेमा करायचा असेल तर तुम्हांला खूप त्रासातून जावं लागतं, हे खरं.

आपल्याला हव्या त्या विषयावर चित्रपट तयार करण्यासाठी झगडावं लागणं याचं मुख्य कारण आपल्याकडे अजूनही अनेक विषय निषिद्ध आहेत, हे आहे का?

असेनात का. आपल्याला जर सिनेमा करायचाच आहे, तर मग तो करायचा. प्रेक्षकांना अमूक एक विषय बोल्ड वाटेल, आणि त्यांच्या भावना दुखावल्यानं त्यांना चित्रपट आवडणार नाही, हा विचार करण्याचं काही कारण नाही.

पण विषय निषिद्ध असल्यानं होणार्‍या विरोधाचं काय? विरोध तर होतोच.

सेन्सॉर बोर्ड हा एक मुख्य अडसर आहे आपल्याकडे, कारण सरकारचा हस्तक्षेप आपल्याकडे अजून खूप आहे. अनेक क्षेत्रांमध्ये हा हस्तक्षेप आहे. वाहतूक, बँका, सिनेमा. काही क्षेत्रांसाठी हे चांगलं आहे, पण सिनेमात सरकारचा हस्तक्षेप पूर्णपणे अनावश्यक आहे. सरकारनं संस्कृतिरक्षकाची भूमिका करू नये. मागे पुण्यामध्ये वारकर्‍यांचा मेळावा झाला, त्यात त्यांनी स्वतःच असा ठराव पास केला की, साधुसंतांनी सेन्सॉर बोर्डावर असावं. या अशा लोकांना तोंड देतच तुम्हांला पुढे जावं लागतं.

Sachin8.jpg

पण असं असूनही तुझ्या बर्‍याच नाटकांमध्ये, चित्रपटांमध्ये तू शारीरिकतेविषयी, लैंगिकतेविषयी मोकळेपणानं बोलतोस. ’द बाथ’, ’छोट्याशा सुट्टीत’, ’ड्रीम्स ऑफ तालीम’ ही उत्तम उदाहरणं आहेत. तुझ्या कलाकृतींमधली समलिंगी पात्रं ही अर्कचित्र म्हणून समोर येत नाहीत. ’अय्या’मध्ये तर स्त्रीची लैंगिकता फार धीटपणे, आणि मुख्य म्हणजे सहजपणे समोर आली आहे.

एक प्रेक्षक म्हणून तू सांगतो आहेस, तर असेल तसं. मला माहीत नाही. मी कधी या दृष्टीनं विचार केलेला नाही. शारीरिक नातेसंबंधांकडे मी फार नैसर्गिकपणे बघतो, असं मला वाटतं. जी गोष्ट आपण रोज करतो, ज्या गोष्टीविषयी आपण रोज बोलतो, ती गोष्ट शांतपणे पडद्यावर दाखवायला काहीच हरकत नाही. ’अय्या’मध्ये एका स्त्रीला एका पुरुषाबद्दल वाटणारं आकर्षण आहे. आपल्याला अनेक चित्रपटांतून स्त्री ही पुरुषाकडे कमिट्‌मेण्ट्‍, स्थैर्य आणि प्रेम मागताना दिसते. पण माझ्या नायिकेला त्याचा गंध आणि त्याचं रांगडं दिसणं आकर्षित करतं. तो पैसे किती कमावतो, त्याच्या घरी कोण आहे, असे प्रश्न ती विचारत नाही. जसं मुलं मुलींविषयी बोलतात तसं ती मुलगी त्या मुलाविषयी बोलते. त्यामुळे चित्रपटातल्या गाण्यांतले जे शब्द आहेत, ते सगळे त्याच्या शरीराची स्तुती करणारे आहेत. ’अय्या’मधला पेट्रोल पंपाचा जो प्रसंग आहे, तो माझ्या दृष्टीनं महत्त्वाचा आहे. ’अय्या’ लिहिताना हे दृश्य सतत माझ्या डोळ्यांसमोर होतं. एखाद्या मुलीची फॅण्टसी काय असेल एका मुलाकडे पूर्णपणे शारीरिकदृष्ट्या आकर्षित झाल्यावर, याचा मी विचार करत होतो, आणि त्या दृश्यातून मला स्पर्मशॉवर दाखवायचा होता. त्यामुळे हा आणि असे प्रसंग ’अय्या’मध्ये येणं स्वाभाविक होतं. ते तितकं स्वाभाविकपणे चित्रपटात आलं कारण माझा सेक्सकडे पाहण्याचा दृष्टिकोन हा संकोचाचा, गुन्हेगारीचा नाहीये. मला सेक्सबद्दल कुठलंही सुप्त आकर्षण नाहीये. मला शारीरिकता सेलिब्रेट करावीशी वाटते. त्यामुळे ती माझ्या चित्रपटांत सहजपणे येत असावी.

ही लैंगिकता मूळ मराठीतल्या लघुकथेत आली नव्हती. ती हिंदीत आली.

कारण ’अय्या’चा विषयच तो होता. एका लघुकथेचा तुम्ही पूर्ण लांबीचा चित्रपट बनवता, तेव्हा तुम्ही काही फक्त कथेमध्ये पाणी घालत नाही. मला एका नव्या परिप्रेक्ष्यातून या कथेकडे पाहायचं होतं. ’गंध’च्या लघुकथेत एक संयतता होती आणि वासाला महत्त्व होतं. मला लैंगिकतेवरचा चित्रपट करायचा होता आणि म्हणून मला ’अय्या’ करावासा वाटला. हा चित्रपट करताना मला फार मजा आली.

’गंध’च्या वेळचा तू, आणि ’अय्या’च्या वेळचा तू, या दोघांत काय फरक होता?

माझा प्रत्येक चित्रपट हा त्या त्यावेळेचा मी असतो. मी त्या त्या वेळी जो असतो, त्यानुसार माझ्यातलं ते ते चित्रपटात उतरतं. मी अशा जगात राहतो जे दर पाच वर्षांनी बदलतं. इथे चिरंतन असं काही नाहीये. त्यामुळे प्रत्येक नवीन चित्रपट बनवताना माणूस म्हणून मी पूर्ण बदललेलो असतो. आणि तसं नसेल तर नवा चित्रपट होऊच शकत नाही. चित्रपट नवा करण्यासाठीच तुम्ही चित्रपट करत असता, असं मला वाटतं. हां, तुमची संवेदनशीलता, तुमचा मूल्यांवरचा विश्वास या गोष्टी कदाचित बदलत नसतील. ’अय्या’ करत असताना आमची ओळख होऊन वर्ष उलटल्यावर राणी मला म्हणाली की, ’सचिन, ही मीनाक्षी देशपांडे म्हणजे तूच आहेस’. हे तिनं सांगेपर्यंत माझ्या लक्षात आलं नव्हतं.

’गंध’पासून ’अय्या’पर्यंतच्या प्रवासात मी अनेकप्रकारे आपल्या अवतीभवती असलेल्या सामाजिक आणि राजकीय भ्रष्टाचाराचा विचार करत होतो. माझ्या मूल्यांशी त्याची सांगड घालत होतो. त्यातून मला स्वतःला असं वाटायला लगलं की, खरं बोलणं आणि कोणालाही कोणत्याही प्रकारे न फसवणं, पारदर्शक असणं ही मूल्यं जर पाळली, तर बाकी शारीरिक नातेसंबंधांचा आणि नैतिकतेचा संबंध जोडणं योग्य नाही. खरं बोलणं आणि कोणालाही न फसवणं या तत्त्वांवर नैतिकता आधारलेली हवी. नातेसंबंध, शारीरिकता, एकमेकांना जोखण्याची वृत्ती या सगळ्यांशी आपण जो नैतिकतेचा संबंध लावतो, ते चूक आहे आणि हे ’अय्या’मध्ये आलं आहे. ’अय्या’तली पात्रं ही शारीरिकतेचा संबंध नैतिकतेशी जोडत नाहीत. शेवटी आईवडिलांसमोर उभं राहून ती सगळं खरं सांगतात. दांभिक समाजामध्ये ज्याला नैतिकता म्हणतात ती बर्‍याच पातळ्यांवर खरी नसते, हे त्या समाजाला सांगायला पाहिजे, असं मला वाटलं. त्यामुळे त्या मराठी पात्रांना मी अशा तथाकथित अनैतिक गोष्टी करायला लावल्या आहेत, ज्या मला नैतिक वाटतात. लोक ’अय्या’वर चिडले आहेत कारण त्यांच्या नैतिकतेवर आघात केला गेला आहे. सगळा देश ’अय्या’ बघताना खदाखदा हसतो आणि रागावून बाहेर पडतो, कारण ’अय्या’ त्यांच्या नैतिकतेला ढोसतो. हसणं आणि चिडणं एकाच चित्रपटाच्या बाबतीत घडू शकत नाही, पण ते घडलंय. याचं कारण नैतिकता.

Sachin6.jpg

’अय्या’च्या प्रतिक्रिया या टोकाच्या आहेत. आमच्यासारख्या अनेकांना हा चित्रपट अतिशय आवडला, तर बहुसंख्यांना तो बीभत्स, अश्लील वाटला.

चित्रपटामुळे चर्चा घडून येणं, प्रेक्षकांनी विचार करणं, किंवा आनंद, दु:ख अशा भावना व्यक्त करणं, हे व्हायलाच हवं. काहीतरी म्हणायला, प्रतिक्रिया द्यायला चित्रपटानं प्रेक्षकाला प्रवृत्त करायला हवं. प्रत्येक चित्रपटांचं हे कर्तव्य आहे. ’अय्या’च्या बाबतीत हे घडलं याचा मला फार आनंद झाला आहे. प्रत्येकानं माझ्या चित्रपटाचं कौतुक केलंच पाहिजे, असं ठरवून कुठलाही दिग्दर्शक चित्रपट करत नसतो. हे माझ्याही बाबतीत खरं आहे. मला टोकाच्या प्रतिक्रियांची सवय आहे. माझ्या आधीच्या तीन चित्रपटांच्या बाबतीतही हेच घडलं होतं. त्यामुळे ’अय्या’च्या बाबतीतही असंच होईल, याची मला आणि अनुराग कश्यपला पूर्ण कल्पना होती, आणि ते तसं झालं, याचं बरं वाटतं. कारण दोन गोष्टी शक्य असतात. एखादा चित्रपट खूप आवडतो आणि आपण गप्प बसतो किंवा एखादा चित्रपट अजिबात आवडत नाही आणि आपण तो सोडून देतो. ’अय्या’च्या बाबतीत असं झालं की, ज्यांना चित्रपट आवडला त्यांनी अत्यंत तावातावानं तो चित्रपट स्वत:चा असल्यासारखं विविध माध्यमांतून आपली मतं व्यक्त केली आहेत आणि ज्यांना चित्रपट आवडला नाहीये त्यांनी आपला राग व्यक्त केला आहे. मी तो राग पाहतो आहे. आपण केलेलं काम आवडलं नाही, तर लोक ते विसरून जाऊ शकत नाहीत, लोक आपला राग व्यक्त करत आहेत, हे किती छान आहे! चित्रपट न आवडलेले लोक मला जास्त महत्त्वाचे वाटतात कारण त्यांच्यामुळे माझ्या लक्षात येतं की, मी काय काम करतोय, आजच्या काळात मी कोणत्या प्रकारचा सिनेमा बनवतोय आणि यापुढे मला काय करायचं आहे. प्रतिकूल प्रतिक्रियांमुळे माझे निर्णय पक्के होत जातात. त्यामुळे या टोकाच्या प्रतिक्रियांची मजा मी आणि अनुराग घेत आहोत.

’अंदाज अपना अपना’, ’लम्हें’ या चित्रपटांच्या बाबतीतही पूर्वी असं घडलं आहे. हे चित्रपट प्रदर्शित झाले, तेव्हा अनेक प्रेक्षकांनी आणि समीक्षकांनीही या चित्रपटांना नावं ठेवली होती. भारतीय समाज हा विभागलेला समाज आहे. तो युरोपीय समाजासारखा एकसंध नाही. त्यामुळे एकसारखे प्रतिसाद तुम्हांला मिळणार नाहीत. जर सगळ्यांनाच तुमचा चित्रपट आवडला किंवा कोणालाच तुमचा चित्रपट आवडला नाही, तर मात्र धोका आहे. ’अय्या’नंतर मला प्रत्येक गालगुच्च्याबरोबर एक थप्पड मिळाली आहे, आणि त्यामुळे माझे दोन्ही गाल सध्या लाल आहेत, आणि मला याचा आनंद आहे. माझ्यासाठी ही फार महत्त्वाची गोष्ट आहे.

हे झालं चित्रपट आवडण्या किंवा न आवडण्याबाबत. पण ’अय्या’ लोकांना उत्तान, अश्लील वाटला, याचं खरोखर आश्चर्य वाटतं. संदर्भ समजून न घेता ही लेबलं लावली गेली, याचं अजूनच वाईट वाटतं. आपण अजूनही फार सोवळे असल्याचा आव आणतो का?

पण हे फक्त आपल्याकडेच आहे, असं नाही. फ्रान्समध्येही तेच आहे. किंबहुना कुठल्याही देशात तेच आहे. सनातनी विचारसरणीचे लोक जगभर असतात.

पण युरोपीय चित्रपटांमध्ये नग्नता असते.

हो, असते. पण ते चित्रपट इथे भारतात दाखवले जातात. ते तिथे कसे स्वीकारले जातात, हे आपण पाहत नाही. मी जर इथे वेगळा चित्रपट तयार केला, तर तो नाचत फ्रान्समध्ये दाखवतील. इथे तो प्रदर्शित होतो की नाही, अशी परिस्थिती असू शकते. जगात सगळीकडे, फ्रान्समध्येही, पहिला अंमल हा सनातनी विचारसरणीचा असतो. पारंपरिकतेचा, नैतिकतेचा, कुटुंबव्यवस्थेचा असतो. चर्चसारख्या धार्मिक संस्थांचा असतो. आणि मग त्यानंतर एक छोटा समाज असतो जो वेगळा विचार करतो. फ्रान्स काही आदर्श राज्य नाहीये. तिथे राहणं दिवसेंदिवस रटाळ होत चाललं आहे. विचारस्वातंत्र्य, भाषणस्वातंत्र्य यांचा हळूहळू लोप होतो आहे त्या देशात.

तू सांगतोयेस त्याचं उत्तम उदाहरण म्हणजे 'गांडू' हा बंगाली चित्रपट. ’गांडू’ परदेशात अनेक महोत्सवांमध्ये गाजला, पण भारतात सेन्सॉर बोर्डानं या चित्रपटाच्या प्रदर्शनाला संमती दिलेली नाही.

जगात कुठल्याही देशात चित्रपटांतली नग्नता मोकळेपणी स्वीकारली जातच नाही. त्यामुळे आपल्याकडे चित्रपटमहोत्सवांमधून जे फ्रेंच चित्रपट दाखवतात, ते सगळेच्या सगळे फ्रान्समध्ये नाही दाखवू शकत. जगात सोपं काहीच नाही. समाजातल्या काही घटकांशी तुम्हांला संघर्ष हा कायमच करावा लागतो. तुम्हांला हवा तसा चित्रपट करायचा असेल, तर संघर्ष करावाच लागेल. जगात कुठेही हा संघर्ष चुकणार नाही. आणि तुमच्या समाजापेक्षा बाहेरच्या समाजात तुमचं कौतुक जास्त असतं. निदान सहिष्णुतेनं ते तुमच्या कामाकडे बघतात. तुमच्या लोकांशीच तुम्हांला जास्त भांडावं लागतं.

’कोबाल्ट ब्लू’, ’छोट्याशा सुट्टीत’, ’ड्रीम्स्‌ ऑफ तालीम’ यांत समलैंगिकता होती. या कलाकृती आल्या त्याला आता दहापंधरा वर्षं झाली. मराठी प्रेक्षकांनी आणि वाचकांनी या पुस्तकाचं, नाटकांचं त्यामानानं उत्तम स्वागत केलं.

’छोट्याशा सुट्टीत’, ’फ्रीजमध्ये ठेवलेलं प्रेम’, ’चंद्रलोक कॉम्प्लेक्स’ आणि ’पूर्णविराम’ अशी चार नाटकं मी मोहित टाकळकरसाठी लिहिली. ’ड्रीम्स ऑफ तालीम’ हे नाटक मी ’वारुळ’ या नावानं लिहायला घेतलं होतं. त्याचं नंतर चेतन दातारच्या ’एक माधवबाग’ला जोडून ’ड्रीम्स ऑफ तालीम’ झालं. माझ्या पुस्तकाचं, नाटकांचं मराठी वाचकप्रेक्षकांनी चांगलं स्वागत केलं, असं मला वाटतं. अनेकांनी कौतुक केलं. ’आम्हांला तुझं नाटक / पुस्तक आवडलं’ हे खूपजणांनी सांगितलं. मराठी वाचक अनोळखी, तरुण लेखकाचं पुस्तक सहसा उचलत नाहीत. बरं, मी काही फार छळ सोसलेल्या एखाद्या पीडित समाजातला नाही, किंवा दु:खी स्त्रीही नाही. माझ्या पुस्तकात, नाटकांमध्ये सगळं निवांत चाललेलं असतं. एवढं असूनही लोकांनी माझं पुस्तक वाचलं, नाटकं पाहिली, हे माझ्यासाठी खूप आहे.

या नाटकांच्या वेळी मला लक्षात आलं की, आपल्यापेक्षा लोकच जास्त संकोचलेले असतात. त्यामुळे आपण उगाचच घाबरण्याचं कारण नाही. त्यावेळी विजय तेंडुलकर आमच्याबरोबर होते. माझे आणि मनस्विनी लता रवींद्रचे ते फार लाड करतात, आम्हांला त्यांनी लाडावून ठेवलं आहे, असं लोकांचं म्हणणं होतं. तर तेंडुलकरांनी थोड्या हुशारीनं असं वातावरण तयार करून ठेवलं होतं की, आमची नाटकं आवडली नाहीत, तर लोकांना वाटायचं ’नाटक चांगलं असेल, आपल्यालाच कळलं नसेल’. संकोचानं असेल, किंवा रागानं असेल, पण ज्यांना या नाटकांच्या विषयाबाबत नाराजी होती, ते एकतर नाटकच बघायचे नाहीत, किंवा आम्हांला टाळत राहायचे. होतं काय की, समाजाला जर तुमचे प्रश्न महत्त्वाचे वाटत नसतील, तर समाज विरोध करण्यापेक्षा तुमचा अनुल्लेख करतो. अनुल्लेख हे निषेधाचं उत्तम शस्त्र आहे. अनुल्लेखाविरुद्ध तुम्ही लढू शकत नाही. जेव्हा तुमच्या घराच्या काचा फोडल्या जातात, तेव्हा तुम्हांला हा विरोध समोर दिसतो. पण तुम्ही काहीही करा, आम्ही तुमचं नाटक पाहायलाच येत नाही, असं लोक म्हणाले तर ते नाटककाराच्या दृष्टीनं फार वाईट असतं. पण अशा टोकाच्या प्रतिक्रिया माझ्या वाट्याला आल्या नाहीत. बहुतकरून चांगलंच बोललं गेलं.

ही नाटकं ’सुदर्शन’ किंवा ’पृथ्वी’सारख्या ठिकाणीच दाखवली गेली, हे एक कारण असेल का फारसा विरोध न होण्यामागे? कारण या ठिकाणी येणार्‍या बहुतेकांना आपली मतं पटलेलीच असतात.

त्यावेळी आम्ही पूर्ण महाराष्ट्रभर जाऊन या नाटकांचे प्रयोग करावेत, अशी परिस्थिती नव्हती. म्हणजे मुंबई आणि पुणे वगळता इतर शहरांमध्ये छोटे रंगमंचच नाहीत, आणि हा दोष त्या त्या शहरांचा, गावांचा आहे, कारण त्यांना अशा नाटकांची गरज नाही. लोक पुण्यामुंबईला आणि तिथल्या कलाकारांना नावं ठेवतात, तुम्ही इतर कुठे बाहेर प्रयोग करत नाही, असं म्हणतात. पण पुण्यामुंबईच्या लोकांनी अशा नाटकांसाठी जागा तयार केल्या आहेत. या जागा तयार झाल्या कारण तिथल्या समाजाला त्यांची आणि तिथे सादर होणार्‍या नाटकांची गरज होती.

उद्या तुला एखादी गोष्ट सांगावीशी वाटली, तर प्रेक्षक ती स्वीकारतील की नाही, याचा विचार तू करशील का?

मी बनवीन असा सिनेमा, किंवा लिहीन असं नाटक. मला हवं तसं. मी बनवत आलोय आजवर असे चित्रपट. अगदी आरामात बनवले आहेत मी हे चित्रपट. मला त्यासाठी पैसे उभे करायला खूप झगडावं लागेल कदाचित. पण आत्ता परिस्थिती अशी आहे की, मी मला हवा तसा चित्रपट मराठीत सहज बनवू शकतो. हिंदीत त्यामानानं कठीण आहे.

तुझं म्हणणं पडद्यावर मांडताना तुला तडजोड करावी लागली आहे का?

नाही, मी कधी तडजोड केली आहे, असं मला वाटत नाही. मुळात मी इतकं कामच केलेलं नाही. मी तीन मराठी, लहान आकाराचे सिनेमे बनवले आहेत, आणि एक हिंदी, बर्‍यापैकी मोठा सिनेमा. मराठी चित्रपटांचा आवाका, पोच, बजेट हे सगळंच मर्यादित गोडगोड असतं. त्यामुळे ’दिग्दर्शक म्हणून माझ्यासमोर असलेल्या अडचणी’ या विषयावर मी बोलू शकत नाही. मी तसं करूही नये. अजून काही चित्रपट बनवले मी की कदाचित मला अडचणी, प्रश्न, अडथळे वगैरे कळतील. आत्ता मात्र मी फक्त काम करणं अपेक्षित आहे. तक्रारी करणं माझ्याकडून अपेक्षित नाही.

तू मराठी चित्रपटांबद्दल आणि त्यांच्या आत्ताच्या स्थितीबद्दल बरंच सकारात्मक बोलतोस.

मराठी चित्रपटांमध्ये आर्थिक गुंतवणूक कमी असते. चित्रपटांचा आवाका मर्यादित असतो. हिंदीत तसं नाही. देशभरात एकाच दिवशी तो चित्रपट प्रदर्शित होतो, आणि त्यामुळे चित्रपट बनवण्यासाठी पैसा गोळा करणं कठीण असतं. हे झालं पैशाबद्दल. आशयाबद्दल बोलायचं झालं तर सध्या मराठी चित्रपट सर्वांत श्रीमंत आणि जिवंत आहेत. दिग्दर्शकाचा आणि लेखकाचा खरा चित्रपट मराठीत आहे. त्यानंतर बंगाली चित्रपटांचा नंबर. तिथेही ऋतुपर्ण (घोष) सोडला तर इतर कोणी फार नवीन काही करत नाहीये सध्या.

मी जे आयुष्य जगतोय ते जसंच्या तसं मला मराठी चित्रपटांतून मांडता येतं. पांढरपेशा, सुशिक्षित, शहरी वातावरणातल्या ज्या गुंतागुंती आहेत, ज्या मला दृक्‌श्राव्य माध्यमातून मांडायच्या असतील, तर तशी मुभा मला मराठीत मिळते. माझ्या जाणिवा फार शहरी आहेत. मी शहरीकरणाचा पुरस्कर्ता आहे. त्यामुळे हे शहरी आयुष्य पडद्यावर मांडण्याची संधी मला इथे मिळते. माझ्या पूर्वीच्या चित्रपटांमध्ये मी हेच आयुष्य उभं केलं आहे. मुळात हा भाषेचा प्रश्न नाही. त्या प्रकारच्या प्रांतीय जगण्याचा प्रश्न आहे हा. भाषेसाठी कोणी चित्रपट बनवत नसतो. सिनेम्याची भाषा कुठलीही असू शकते. पण माझं आजचं शहरी आयुष्य मी हिंदीत नाही मांडू शकणार. कोणालाच कळणार नाही मला काय सांगायचं आहे ते.

तुझ्या लिखाणातही हा शहरी प्रभाव डोकावतो का?

आजच्या शहरी जीवनाचा प्रभाव माझ्यावर आहे. कदाचित अस्पष्ट असेल हा प्रभाव, पण आहे. हा प्रभाव खूप शहरी असल्यानं माझ्यातल्या व्यक्तिवादाला खतपाणी घालतो. मानवी समूहाशी या प्रभावाला काही घेणंदेणं नाही. शहरातल्या एकाकी आणि एकट्या व्यक्ती माझ्या लेखनात येतात. या व्यक्ती माझ्या स्फूर्तिस्थान आहेत. अशी माणसं माझ्या आजूबाजूला खूप आहेत, आणि तसं असणं मला चुकीचं वाटत नाही. त्यांची आयुष्यं दुय्यम आहेत, असं मी मानत नाही.

तुझे चित्रपट तूच लिहितोस. तुला चित्रपट डोळ्यांसमोर दिसतो. तो फिल्मवर उतरवणं हा भाग वेगळा. या दोन प्रक्रिया तुला वेगळ्या वाटतात का?

हो. दोन्हींमध्ये प्रचंड तफावत असते. कारण डोळ्यांसमोरचा चित्रपट फिल्मवर उतरवताना मध्ये कॅमेर्‍याची चौकट येते. माझ्यासाठी सगळ्यांत महत्त्वाची प्रक्रिया संकलनाची असते. खरा चित्रपट संकलकाच्या टेबलावर बनतो. त्यामुळे माझ्यासाठी ते फार आनंददायी आणि आव्हानात्मक असतं. हे खरं चित्रपट बनवणं. नुसतं कॅमेर्‍यातून चित्रीकरण करणं म्हणजे चित्रपट बनवणं नव्हे. ते केवळ संकलनासाठी कच्चा माल गोळा करणं झालं. माझ्यासाठी चित्रपट लिहिणं किंवा तो चित्रीत करणं महत्त्वाचं नाही. संकलन महत्त्वाचं आहे.

मागे गोविंद निहलानींची एक मुलाखत वाचली होती. त्यात त्यांनी म्हटलं होतं की, माझ्या डोळ्यांसमोर चित्रपट तयार असतो, त्यामुळे मी मला हवं तेच आणि तितकंच चित्रीत करतो, आणि म्हणून संकलनाला फारसं महत्त्व उरत नाही.

निहलानी हे दिग्दर्शक नंतर, आधी छायालेखक आहेत. त्यामुळे त्यांना चित्रीकरणाची प्रक्रिया महत्त्वाची वाटत असावी. प्रत्येक दिग्दर्शकाची काही बलस्थानं असतात, आणि प्रत्येकाच्या जाणिवाही वेगळ्या असतात. उदाहरणार्थ, संजय लीला भन्साळीला गाणी महत्त्वाची वाटतात. गाण्यांत सगळा जीव असतो त्याचा. प्रत्येक दिग्दर्शकाचा जीव वेगवेगळ्या पक्ष्यात असतो.

Sachin4.jpg

तुझे आवडते दिग्दर्शक कोणते? मध्यंतरी तू ’शाळा’चं फार कौतुक केलं होतंस.

हो, ’शाळा’ मला फार आवडला. अफलातून चित्रपट आहे तो. मला असा चित्रपट बनवता नसता आला. सुजयचा हा पहिलाच चित्रपट असल्यानं दिग्दर्शक म्हणून मी त्याच्याबद्दल बोलू शकत नाही. त्यानं पुढचा चित्रपट बनवला की मग त्याच्या कामाबद्दल मला समजून घेता येईल. हिंदीमध्ये मला अनुराग कश्यप, दिबाकर बॅनर्जी, झोया अख्तर हे दिग्दर्शक आवडतात. त्याचप्रमाणे विक्रमादित्य मोटवानीचा पहिला चित्रपट 'उडान' मला फार महत्त्वाचा चित्रपट वाटतो.

मराठीमध्ये उमेश कुलकर्णी हा माझा सगळ्यांत आवडता दिग्दर्शक आहे. तो माझा फार जवळचा मित्र आहे, म्हणून मी असं म्हणत नाहीये. त्याच्या चित्रपटांमध्ये जी दृश्यात्मक संकल्पना आणि मांडणी असते, ती आज भारतात इतर कुठल्याही दिग्दर्शकाला जमेल, असं मला वाटत नाही. तो फार चांगला दिग्दर्शक आहे, पण ते काम हे माझं असू शकत नाही. मला त्याच्या कामातून स्फूर्ती मिळू शकते, पण मी ते जग उभं करू शकत नाही. त्याच्या चित्रपटांतलं गाव, ती माणसं, माझ्या ओळखीची नाहीत. मला बिपिन नाडकर्णी आवडतो. त्याचे सगळे चित्रपट मला आवडले आहेत, आणि त्याच्या पुढल्या चित्रपटाची मी वाट पाहतो आहे.

तुझ्या आवडत्या दिग्दर्शकांच्या चित्रपटांतून शहरी आयुष्य दिसतं. म्हणजे तू जर त्या चित्रपटाशी नातं जोडू शकलास तरच तो चित्रपट चांगला ठरतो का? त्या वातावरणाशी तू परिचित आहेस, यावर आवडणं ठरतं का?

प्रत्येकाच्या आवडण्याचं नाव आणि कारण वेगळं असतं. माझ्यासाठी फक्त रिलेट करणं, वातावरणाशी परिचित असणं, एवढंच नसतं, इतर अनेक कारणं असतात. मी ग्रामीण चित्रपट अजिबात बघत नाही, असं नाही. मी सगळ्या प्रकारचे चित्रपट बघतो. मला ’वळू’ खूप आवडला होता. पण मला ’देऊळ’ हा ’वळू - भाग दोन’च वाटला. मला ’विहीर’ खूपच आवडतो. आणि ’गिरणी’ही. सुमित्रामावशी - सुनीलचे ’दोघी’, ’वास्तुपुरुष’, ’नितळ’ मला भयंकर आवडतात. निव्वळ ग्रेट चित्रपट आहेत ते. त्यांच्या इतर काही चित्रपटांशी मला नातं जोडता येत नाही.

तुझे चित्रपट तूच लिहितोस. पण एखाद्या दुसर्‍यानं लिहिलेल्या पटकथेवर चित्रपट करणं तुला आवडेल का?

मला नाही वाटत तसं. दुसर्‍या कोणाच्यातरी कथेवर मी माझी तीन वर्षं कशाला वाया घालवू? मी स्वतः लिहू शकतो, विचार करू शकतो. आणि मला जे करता येतं, ते मी करावं. जे दिग्दर्शक लिहू शकतात, ते नेहमीच स्वत:च्या संहिता स्वत: लिहितात. एक सिनेमा तुमची दोन वर्षं घेतो. ती दोन वर्षं मी काय करण्यात घालवायची, हे मला खूप आधी ठरवायला लागतं. हा खूप महत्त्वाचा निर्णय असतो. बघताबघता तुम्ही दोन वर्षं म्हातारे होता!

’कोबाल्ट ब्लू’ या तुझ्या कादंबरीवर चित्रपट करावा, असं तुला वाटलं का? ही कादंबरी मला खूप दृश्यात्मक वाटते.

अवघड आहे या कादंबरीवर चित्रपट करणं. त्या चित्रकाराचा चेहरा दाखवणं जरा रटाळ वाटेल. प्रत्येकानं त्या चित्रकाराचा चेहरा हवा तसा कल्पावा. त्याचा चेहरा ठोस केला की, त्यातली मजा संपेल. या चित्रकाराला मी कादंबरीत नावही दिलेलं नाही. प्रत्येकाच्या आयुष्यात अशी एखादी व्यक्ती येते, की जिच्यामुळे तुम्ही मुक्त होता. काहींच्या आयुष्यात ती राहते, काहींच्या आयुष्यातून निघून जाते. तर अशी ती व्यक्ती असल्यामुळे तिचा चेहरा दाखवणं अवघड आहे. पण पृथ्वीराजला आणि अनुराग कश्यपला या कादंबरीवर चित्रपट करण्याची इच्छा आहे. पृथ्वीराजला या चित्रपटात भूमिका करायची आहे, आणि अनुरागला चित्रपटाच्या निर्मितीत रस आहे. अजून या बाबतीत मी काही ठरवलेलं नाही.

चित्रपटांमुळे तुझ्यातला लेखक मागे पडला आहे, असं तुला वाटतं का?

’अय्या’चं काम सुरू असल्यामुळे गेले अनेक महिने मी लिहायला बसलो नव्हतो. ’अय्या’ प्रदर्शित झाला त्या दिवशी मी घर बंद करून बसलो आणि वीस पानं मराठीत लिहून काढली. मी चिन्मय केळकरला, माझ्या मित्राला, फोन करून सांगितलं की, आपल्या मातृभाषेत कागदावर शाईनं लिहिणं याच्याइतकं चांगलं जगात काहीही नाही. त्याच्याएवढं आनंद देणारं, इतकं खरं आणि आपलं, असं दुसरं काहीही सृजनशील असेल, असं मला वाटत नाही. ती वीस पानं लिहीत असतानाचा माझा अनुभव अवर्णनीय आहे. त्यामुळे काहीही झालं तरी मी सर्वांत आधी मराठी लेखक आहे. त्यापेक्षा महत्त्वाचं दुसरं काहीच नाही. चित्रपटाची पोहोच जास्त असेल, या माध्यमाची ताकद फार मोठी असेल, भरपूर पैसा असेल या क्षेत्रात, पण आपल्या मातृभाषेत कागदावर शब्द लिहिणं, तो तयार करणं, तो शोधणं, त्या शब्दाचा विचार करणं, याच्याइतकं सुंदर माझ्या दृष्टीनं काहीच नाही. त्यामुळे चित्रपट आणि लिखाण यांची मी तुलना करू शकत नाही.

माझ्याबरोबर नेहमी एक आठशे पानी वही असते. या वहीत मी सतत लिहीत असतो. लेखन हे अंतर्गत पातळीवर सतत सुरूच असतं. हे लेखन वहीत उतरवणं आणि ते प्रकाशित करणं या गोष्टी वेगळ्या. लेखन प्रकाशित करण्याचा माझा वेग अत्यंत कमी आहे. पण माझा डावा हात मात्र सतत लिहिता असतो.

तू सध्या दोन हिंदी चित्रपट लिहितो आहेस. या चित्रपटांमध्येही एक चित्रकार आणि तुझा लाडका निळा रंग असतील का?

रणजीत गुगळे हा माझा कार्यकारी निर्माता आणि मित्र आहे. त्यानं मला तंबी दिली आहे की, यापुढे तुझ्या चित्रपटांमध्ये चित्रकार, निळा रंग आणि मंडई या तीन गोष्टी असल्या, तर आम्ही तुझ्या चित्रपटात काम करणार नाही. पण या गोष्टी असतील की नाही, याबद्दल मी आत्ताच काही सांगू शकत नाही. मी अजूनही चित्रपट लिहितो आहे.

Sachin1.jpg

***

- चिन्मय दामले आणि अरभाट

सचिन कुंडलकर यांची छायाचित्रं - अमलेन्दु चौधरी
'अय्या'च्या चित्रीकरणस्थळी काढलेली छायाचित्रं - भारत पवार

या मुलाखतीत वापरलेली सर्व छायाचित्रं सचिन कुंडलकर यांच्या संग्रहातून.

***

टंकलेखनसाहाय्य - अनिल बिहाणी

***

प्रतिसाद

अप्रतिम मुलाखत ....सचिन कुंडलकरचे बरेच विचार पटले .

छान मुलाखत.

छान, अगदी विस्तृत मुलाखत. काही मुद्दे पटले आणि काही पटले नाही. जरा ओपनियनेटेड वाटले कुंडलकर. :-)
दिग्दर्शक राव होत आहेत की काय असे वाटते वाचताना. (संदर्भ: लेखकाचा लेखक राव होणे. साभारः नेमाडे)प्रश्न उत्तम आहेत अरभाट आणि चिनूक्स. उत्तरेही ठोकळेबाज नाहीत म्हणुन आवडली मुलाखत. पटो न पटो.

किती तो विरोधाभास. मराठीवर एवढे ताशेरे ओढुन पुन्हा शेवटी मातृभाषेत एकपान लिहिणे हे विधान विनोदी वाटले.
मग जर तुमच्या अंतर्यामी खरंच ती 'ओल' अजून आहे तर इतरांच्या मनात असली तर ती खोटी कशी? :-)
असो.

अमुकतमुकच्या नजरेतून पॅरिस हे अगदी बँग ऑन. इंट्रेस्टिंग.

चांगली आहे मुलाखत. पण खूपच एकांगी आणि गैरसमजावर (किंवा स्वतःच तयार करून घेतलेल्या मतावर आधारित) विषेशत: परदेशस्थ मराठी आणि त्यांचे जीवन ह्या विषयावरील मत अगदीच कायच्या काही आहे. नाळ अशी सहज तुटते का? ह्यावर एका प्रश्नामध्येही विचार झाला नाही आणि उत्तरामध्येही.

कुंडलकर एक दिग्दर्शक म्हणून उच्च वाटतात, पण कुंलडकर एक माणूस म्हणून मला तरी ते खूप बायस्ड वाटतात.

मी तसा "मराठी' विषयी बायस्ड नाही, पण अनेकदा, अनेक जनांना "फक यू, बास्टर्ड" हे शब्द जे कन्व्हे करू शकतात ते मराठी शब्द करत नाहीत असे म्हणताना ऐकले. पण मला " मादरचोद" हा शब्द फक यू पेक्षा ही शिवी द्यायला जास्त योग्य वाटतो. तो ग्राम्य वाटतो असे मत वर मुलाखतीत वाचले पण भाषा म्हणल्यावर तसे होणारच. खरे तर "एफ वर्ड" नेहमी उच्चारणे हे देखील ग्राम्यच ! पण ते केवळ इंग्रजी आहे म्हणून लोकांना "भारी" वाटते.

मग जर तुमच्या अंतर्यामी खरंच ती 'ओल' अजून आहे तर इतरांच्या मनात असली तर ती खोटी कशी? >> +1

विस्तृत प्रतिसादास कारण - वाद घालने हा नाही तर, वाचल्यावर आणि ते ही लक्ष देऊन वाटल्यावर वाचकांचा पत्रव्यवहार टाईप हे मत आहे.

रैना +१

छान.. सर्वांगीण मुलाखत... प्रश्ण व त्यामागचा अभ्यास दिसून येतो.
काही ऊत्तरे बाय्सड वाटतात.. पण ते सापेक्ष आहे.

रैना आणि केदारला अनुमोदन !

कुंडलकरांमधील कलाकार छान समजावून दिला आहे. धन्यवाद!

मुलाखत आवडली! विस्त्रुत आहे, प्रश्न आवडले ,उत्तर काही आवडली काही तर्क लावुनही पटली नाहित.
रैना +१

कुंडलकरांचे विचार थेट आहेत, बहुतांशी आवडले-पटले देखील! पण हे अपवाद-
काहीही ’जतन’ वगैरे करायच्या भानगडीत कुणी पडू नये. मग ती संस्कृती असो, साहित्य असो वा भाषा.. असा त्यांचा सूर आहे. मग हाच निकष कलेला लावला तर ’फिल्म आर्काइव्ह्‌ज्‌’ द्वारे भूतकाळातील सिनेमा ’अभ्यासण्याची’ त्यांना गरज का भासली!!
’मराठी’ म्हणजे केवळ पुणेरी आणि शहरी भाषा नव्हे. तिची विभागीय रूपं लक्षात घेतली तर ’सेक्स, प्रेम आणि हिंसा’ हे व्यक्त करायलाही ती सक्षम आहे. कुंडलकर ती वापरू इच्छित नाहीत हा भाग अलाहिदा!
बाकी मुलाखत सुरेख..प्रश्नांची निवड छानच !!

रैना, केदार +१, मला एक दिग्दर्शक म्हणुनही यथातथाच वाटलेले आहेत. निरोप, गंध व अय्या. निरोप हा दिग्दर्शनाच्या उबर्यावरचे शाळकरी पाऊल वाटला होता. गंध मधुन अपेक्षा वाढल्या. लघुकथेत किती पाणि घातले कि अय्या होतो? असे विचारावेसे वाटते. स्वतः लिहितो म्हणुन स्वतः दिग्दर्शीत करणे हे इन्सेस्ट सारखेच आहे. चुकिचे गुण जास्त ठळक होतात... एक लेंपर्सन मत.

मुलाखत उत्तम जमली आहे.

रैना,

>> मग जर तुमच्या अंतर्यामी खरंच ती 'ओल' अजून आहे तर इतरांच्या मनात असली तर ती खोटी कशी?

जे इतर आहेत ते परदेशस्थ मराठी आहेत. कुंडलकरांच्या शब्दात सांगायचं झालं तर ते 'सांस्कृतिकदृष्ट्या बिचारे' आहेत. मात्र कुंडलकर स्वत: 'सांस्कृतिकदृष्ट्या बिचारे' नाहीत. त्यामुळे कुंडलकरांची अंतर्यामी ओल खरी आणि इतरांची खोटी (वा बनावट, वा गोंधळलेली, वा द्विधा, इत्यादि.).

स्वत:ला इतरांपेक्षा वेगळं समजणं मला गैर वाटत नाही. मात्र स्वत:सारखा दुसराही कोणी असू शकतो, हे कुंडलकरांना जाणवलं का? या प्रश्नाच्या उत्तरासाठी तशा व्यक्तीचा शोध घ्यावा लागतो. परदेशस्थ मराठीजनांमध्ये कुंडलकरांना अशी व्यक्ती सापडली नाही, एव्हढाच अर्थ आपण लावूया.

आ.न.,
-गा.पै.

चिनूक्स आणि आरभाट,

मुलाखत चांगली रंगलीये.

सचिन कुंडलकर यांचे चित्रपट पहिले नाहीत. पण वरील मुलाखतीतून व्यक्ती म्हणून बेधडक दिसतात. त्यांची मतं ठाम आहेत. त्यांच्याशी वादविवाद करणं हा एक अनन्यानुभव असेल. मात्र त्यासाठी कलामाध्यमांची जाण हवी (जी मला नाहीये).

दिग्दर्शकाला दाखवायचं असतं एक, पण प्रेक्षक पाहतात भलतंच. असा प्रकार घडू नये याची दिग्दर्शकाने काळजी घ्यावी का? या विषयावर कुंडलकरांचं मत ऐकायला आवडेल.

आ.न.,
-गा.पै.