वेळ यावी लागते

HDA2014_vel_yavi_lagate.jpg

काळ आला पण तरीही वेळ यावी लागते
काळही मजबूर आहे, वेळ हेही जाणते


का चुनावाच्या अधी नेतृत्व फसवे वाकते?
एकदा निवडून येता, जात ही उंडारते


राहिले फेडावयाचे पाप गतजन्मातले
संकटांची आज गर्दी, कर्ज वापस मागते


आठवाया काल आहे अन् उद्या योजावया
वास्तवाशी आज जुळणे नाळ अवघड वाटते


कालमहिमा एवढा की कालची तरुणी अता
झाकण्या वय, सुरकुत्यांना केवढी श्रुंगारते!


पापक्षालन आपुले आपण करावे, पण तरी
माणसांची जात का गंगेस कोडे घालते?


काळ घेतो का परिक्षा कास्तकारांची अशी?
शेत असते कंच हिरवे, तर कधी भेगाळते


जे प्रवाही नांदले ते जिंकले असले तरी
कालओघाच्या विरोधी हार, विजयी भासते


ठेपला येऊन मृत्यु पण तरी "निशिकांत"च्या
स्वप्न नेत्री श्रावणाचे का असे रेंगाळते?

related1: 

HDA2014_blackseparator.jpg

HDA2014_rangoLee3.jpg

HDA2014_blackseparator.jpg

निशिकांत

HDA_14_Nishikant%20Deshpande.jpg

निशिकांत हे मूळचे औरंगाबादचे रहिवासी असून सध्या पुण्यात वास्तव्यास आहेत. ते निवृत्त बँक अधिकारी आहेत. त्यांनी मराठी कवितालिखाणास दहा वर्षांपूर्वी सुरुवात केली, तर गझला ते गेल्या पाच वर्षांपासून लिहीत आहेत. त्यांचा 'आहट' हा एक हिंदी काव्यसंग्रह व 'कल्पतरू' हा मराठी कवितासंग्रह प्रकाशित झाले आहेत आणि दोन गझलसंग्रह प्रकाशनाच्या मार्गावर आहेत. त्यांनी आजवर विविध मुशायर्‍यांत आणि साहित्य संमेलनांत भाग घेतला आहे.

HDA2014_blackseparator.jpg

प्रतिसाद

हम्म्म्म्म