एकेक थेंब रक्ताचा

HDA2014_orangeheader.jpg

शासकीय सेवेतून निवृत्त होऊन मला आता दीड वर्ष झाले आहे. तरीसुद्धा विभागीय रक्तपेढी, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, औरंगाबाद आणि रक्तदान शिबिरे यांच्याशी माझा संबंध अजूनही कायम आहे. रक्तपेढीतील डॉक्टर व कर्मचारी मदत हवी असल्यास मला बोलवतात. रक्तदान शिबिरांचे संयोजकही सातत्याने संपर्कात असतात. गरजू रुग्णांचे नातेवाईकही रक्ताची गरज असल्यास माझ्याशी संपर्क साधतात. विभागीय रक्तपेढी, औरंगाबाद येथे मी केवळ एक सरकारी नोकर नव्हते, तर 'स्वेच्छा रक्तदान चळवळीची' एक कार्यकर्त्री म्हणून काम करत होते याची स्पष्ट जाणीव मला या सर्वांमुळे आज होत आहे.

देहदान, नेत्रदान इत्यादी अवयवदानाच्या चळवळी जगभर, तसेच आपल्या इथे भारतातही चालू आहेत. अवयवदानाचे महत्त्व तर आहेच, पण रक्तदान सर्वांत अनमोल आहे. रुग्णाला ज्यावेळी रक्त हवे असते ती वेळ जीवनमरणाची असते. तेव्हा क्षणाचीही दिरंगाई करता येत नाही.

HDA2014_Raktadan2.JPG

वाढत्या नागरीकरणामुळे अपघातांचे तसेच निरनिराळ्या आजारांचे प्रमाण खूप वाढले आहे, त्यामुळे रक्ताची गरजदेखील वाढली आहे. पण या सर्वांपेक्षाही प्रसूतिदरम्यानच्या जास्त रक्तस्रावामुळे होणार्‍या स्त्रियांच्या मृत्यूचे प्रमाण फार मोठे आहे. एका सँपल सर्व्हेनुसार (१९९७-२००३) प्रसूतिदरम्यानच्या मृत्यूंमध्ये, रक्तस्रावामुळे झालेल्या मृत्यूंचे प्रमाण भारतात अडतीस टक्के आहे. "Despite all the technological marvels that humanity is experiencing, a reliable and safe blood supply is still out of reach for millions of people around the world" - WHOचे माजी डायरेक्टर जनरल डॉ. ग्रु हार्लम ब्रुन्ड्टलंड (Dr. Gro Harlem Brundtland) यांच्या या निवेदनावरून रक्तदानाची चळवळ अजूनही जोमाने वाढविण्याची गरज लक्षात येते.

१९८९च्या ऑगस्टमध्ये औरंगाबाद येथील शासकीय विभागीय रक्तपेढीत रुजू होईपर्यंत माझा रक्तदान चळवळीशी फारच थोडा संबंध आला होता. अंबाजोगाईला असताना तेथील रक्तपेढीत O –ve रक्ताची गरज असली की माझे पती श्री. अण्णा खंदारे यांना कधीही बोलावणे येई. एकदा तर थिएटरमध्ये सिनेमा बघत असतानासुद्धा बोलावणे आल्याचे आठवते आहे. तेथील रक्तपेढीत त्यांचे जवळजवळ ४०-४२ वेळा रक्तदान झाले. एवढाच माझा रक्तपेढीशी संबंध.

औरंगाबादला आल्यानंतर रक्तपेढीत रूजू झाले, तेव्हा रक्तपेढीची अवस्था फारशी चांगली नव्हती. महिन्याला दोनतीन स्वेच्छा-रक्तदान शिबिरे होत असत. बाकी रक्तपेढी रिप्लेसमेन्ट डोनरवर चालायची. यामध्ये पैसे घेऊन रक्त देणारे व्यावसायिक रक्तदाते जास्त होते. रक्तदानाबद्दल फारशी जागृती नसल्याने भीती व गैरसमज जास्त होते. त्यामुळे स्वेच्छा-रक्तदानाचे प्रमाण अत्यल्प होते. खूप पूर्वी ज्यावेळी लोकांमध्ये रक्तदानाविषयी गैरसमज होते, त्याकाळी भारतात काही रक्तपेढ्यांमध्ये रक्तदात्यांना रक्तदानानंतर त्याचा मोबदला दिला जायचा. आपल्याकडे मुंबईमध्ये असे मोबदला घेऊन रक्त देणारे रक्तदाते बरेच होते. यांच्यापैकी काहींच्या हातांवरतर चक्क 'I am Donor' असे गोंदलेले असायचे. मी औरंगाबादेत रक्तपेढीमध्ये रूजू झाले त्यावेळी असे गोंदवून घेतलेले काही व्यावसायिक रक्तदाते मुंबईहून औरंगाबादला आले होते. परंतु तोपर्यंत रक्तपेढीतर्फे रक्तदात्यांना मोबदला देणे बंद झाले होते. औरंगाबादेत अशा व्यावसायिक रक्तदात्यांचे व त्यांच्या दलालांचे एक रॅकेटच होते. ही मंडळी रक्तपेढीच्या बाहेर अगदी मुक्कामाला असायची. गरजू पेशंटचे नातेवाईक हेरून, ज्यांना रक्ताची खूप गरज आहे, पण बदली रक्तदाता देण्यासाठी सोबत कोणी नाही किंवा रक्तदानाची भीती वाटते, त्यांना पैशाच्या मोबदल्यात रक्तदाता पुरवणे हे या दलालांचे काम असायचे. या रॅकेटमध्ये रक्तपेढीतील काही चतुर्थ-श्रेणी कर्मचारी आणि टेक्निशियन्स् सहभागी होते. त्याकाळी रक्तपेढीमध्ये एकूणच रक्तपुरवठा आणि रक्तदानाचे प्रमाण अत्यल्प असल्याने मेडिकल ऑफिसरला काहीच काम नसायचे. त्यामुळे मेडिकल ऑफिसर्स्/बीटीओ (ब्लड ट्रांसफ्युजन ऑफिसर - रक्तसंक्रमण अधिकारी) रक्तपेढीत पूर्ण वेळ हजर नसायचे. व्यावसायिक रक्तदात्यांपैकी काही रक्तदाते अ‍ॅनिमिक होते, तर काहींच्या अंगावर सूज दिसायची. हे योग्य रक्तदाते नाहीत हे बघताक्षणीच कळून यायचे. काहीजणतर रक्तपेढीत रक्तदान करायला दर दोनतीन दिवसांतून एक चक्कर मारायचे. अशा वेळी रक्तदात्याची मेडिकल हिस्टरी विचारात न घेता रॅकेटमध्ये सहभागी असलेले टेक्निशियन्स् या व्यावसायिक रक्तदात्यांचे रक्त घ्यायचे. त्या काळात दोनतीन रक्तदाते "मॅडम, अमुक अमुक डॉक्टर/टेक्निशियन माझं रक्त घेत नाही. तुम्ही त्याला सांगा." असे म्हणत मलासुद्धा अप्रोच झाले होते.

व्यावसायिक रक्तदात्याचे रक्त सुरक्षित असण्याची खात्री देता येत नसल्याने स्वेच्छा-रक्तदात्यांची संख्या वाढवणे हाच एक पर्याय मानला जातो. या दृष्टीने डॉ. अंबुलगेकर, डॉ. आचलिया व त्यांच्या सहकार्‍यांनी त्यांच्या विद्यार्थिकाळात बरेच प्रयत्न केले होते. १९७८ साली डॉ. मनसुख आचलियांनी स्वतःच्या लग्नात रक्तदान शिबिर आयोजित करुन रक्तपेढीस पस्तीस बाटल्या रक्त उपलब्ध करून दिले होते. डॉ. बिंदू, डॉ. चौधरी व त्यांच्यासोबतच्या टीमनेदेखील रक्तदान चळवळ वाढवण्यास खूप हातभार लावला.

१९८९मध्ये मी आले त्यावेळी एका महिन्याला सरासरी शंभर बाटल्यांची गरज असे. माझ्यासमोर दोन आव्हाने होती. १) व्यावसायिक रक्तदाते बंद करणे, २) स्वेच्छा-रक्तदात्यांची संख्या वाढवणे. यांसाठी निरनिराळे उपक्रम राबविण्याची गरज होती. त्या दिशेने आम्ही काम सुरू केले.

व्यावसायिक रक्तदाते बंद करण्यासाठी जाणीवपूर्वक पावले उचलली. त्यासाठी सर्वप्रथम रक्तसंक्रमण अधिकार्‍यांना रक्तपेढीत पूर्ण वेळ थांबणे अनिवार्य केले. डॉक्टर रक्तपेढीत आहेत म्हटल्यावर त्यांच्या धाकाने का होईना व्यावसायिक रक्तदात्यांचे रक्तपेढीत येणे आपोआप कमी झाले. प्रत्येक वेळी रक्तदान करण्यापूर्वी रक्तदात्याचा आरोग्य इतिहास विचारणे/बघणे गरजेचे असते. पूर्वी बरेचदा रक्तदान करवून घेणारे टेक्निशियन्स्‌च असायचे, जे याकडे सोयीस्कररीत्या दुर्लक्ष करायचे. डॉक्टरच्या तिथे असण्याने या सर्वांवर वचक बसला. यासोबतच मी आरोग्य समाजसेविका म्हणून तिथे थांबून रक्त घेण्यासाठी येणार्‍या रुग्णांच्या नातेवाइकांचे समुपदेशन करायचे. आम्ही वॉर्डमध्ये जाऊनही रुग्णांच्या नातेवाइकांचे समुपदेशन करायला सुरुवात केली. तातडीच्या गरजेच्या वेळी बदली रक्तदात्याशिवायही रक्तपेढीतून गरजू रुग्णांना विनामोबदला रक्तपुरवठा केला जायचा. पण याविषयी त्यांना (रुग्ण व नातेवाईकांना) माहितीच नसल्याने वॉर्डामधले चतुर्थ-श्रेणी कर्मचारी या गोष्टीचा गैरफायदा घेऊन रुग्णांकडून पैसे उकळायचे. आम्ही केलेल्या समुपदेशनामुळे अनेक वेळा रक्तदानाला घाबरणार्‍या नातेवाईकांनी रक्तदान केले आहे. त्यातले काहीजण स्वेच्छा-रक्तदाते पण झाले आहेत.

HDA2014_Raktadan3.JPG
स्वेच्छा-रक्तदानाचे महत्त्व लोकांना कळण्यासाठी आम्ही 'राष्ट्रीय स्वेच्छा-रक्तदान दिवस' साजरा करायचे ठरवले. त्यानुसार १ ऑक्टोबर, १९९० रोजी औरंगाबादच्या शासकीय रक्तपेढीत पहिला स्वेच्छा रक्तदान दिवस रक्तपेढीचे प्रमुख डॉ. भोपळे यांच्या मार्गदर्शनाखाली साजरा केला गेला. यावेळी एकवीसपेक्षा जास्त वेळा रक्तदान केलेल्या रक्तदात्यांना रौप्यपदक देऊन सन्मानित करण्यात आले. डॉ. मनसुख आचलियांनी सरकारी सेवेत नसतानाही या कामी आम्हांला खूप मदत केली.

मी औरंगाबाद येथील विविध महाविद्यालयांचे प्राचार्य, राष्ट्रीय सेवा योजनेचे (National Service Scheme - NSS) कार्यक्रम अधिकारी, एनसीसी प्रमुख यांच्याशी सातत्याने संपर्क साधून रक्तदान शिबिरे घेण्यासाठी त्यांना उद्युक्त केले. राज्यपालांनी राष्ट्रीय सेवा योजनेमार्फत रक्तदान चळवळ वाढावी म्हणून एक परिपत्रक काढले होते. आम्हांला याबाबत विद्यापीठातील एका शिबिरामध्ये कळल्याने आम्ही याचा पाठपुरावा करून रक्तदानासाठी राष्ट्रीय सेवा योजनेची खूप मदत घेऊ शकलो. आमची टीम - मी स्वतः, रक्तपेढीप्रमुख आणि रक्तसंक्रमण अधिकारी ठिकठिकाणी रक्तदानाचे महत्त्व, रक्तदानाची निकड, रक्तदानाविषयीचे समजगैरसमज, रक्तदान - एक सामाजिक बांधिलकी इ. विषयांवर व्याख्याने देत असू.

सुरुवातीला ज्यावेळी मी औरंगाबादेत नवीन होते आणि माझ्या जास्त ओळखी नव्हत्या, त्याकाळात मी विद्यापीठात राष्ट्रीय सेवा योजनेच्या समन्वयकांच्या होणार्‍या पहिल्या बैठकीस जायचे. तिथून प्राध्यापकांच्या ओळखी झाल्यानंतर आम्ही त्यांच्या ओळखीने कॉलेजात जायचो. याशिवाय आम्ही विविध सामाजिक, राजकीय, धार्मिक संघटनांचे पदाधिकारी, कारखान्यांचे पी.आर.ओ., कामगार संघटना नेते (यूनियन लीडर), हमाल-मापाडी, रिक्शा चालक-मालक-युनियन पदाधिकारी आदींना भेटून रुग्णालयातील रक्ताच्या गरजेबद्दल माहिती द्यायचो व त्यांना शिबिरे घेण्यास प्रवृत्त करायचो.

याकाळात आमच्या रक्तपेढीला स्वतःचे वाहन नव्हते, की स्वतःचा वेगळा टेलिफोन नव्हता. रक्तदान शिबिराच्या वेळी आम्हांला तेवढ्या कालावधीसाठी रुग्णवाहिका मिळायची. परंतु वेगवेगळ्या महाविद्यालयांत जाऊन रक्तदानासंबंधी माहिती देणे, विद्यार्थ्यांचे समुपदेशन करणे, वाळुजला जाऊन रक्तदान शिबिरे आयोजित करण्यासाठी कारखान्यांना भेटी देणे अशी सगळी कामे मी स्वतःच्या स्कूटरमध्ये स्वखर्चाने पेट्रोल भरूनच करायचे. निम्म्याच्यावर फोनपण घरून केले जायचे. रक्तपेढीच्या कामासाठी कुठलीच काळवेळ नव्हती. बाकी कर्मचार्‍यांप्रमाणे माझी शिफ्ट ड्यूटी किंवा ९ ते ५ कार्यालयीन वेळ असा प्रकारच नव्हता. रक्तदान शिबिरे आयोजित करण्यासाठी शिबिर संयोजकांना त्यांच्या सोयीनुसार भेटायला जावे लागे. कधी सकाळी ७-८ वाजता तर कधी संध्याकाळी ८-९ वाजता, त्यामुळे माझी कार्यालयीन वेळ अशी निश्चित नव्हती. सुरुवातीला रक्तदान शिबिरे आयोजनासाठी खूप त्रास व्हायचा. लोकांना वारंवार भेटून रक्तदान शिबिरे घेण्यासाठी तयार करावे लागे. काही महाविद्यालयांच्या प्राचार्यांनी तर माझे नावच 'रक्तपिपासू मॅडम' ठेवले होते. माझ्या कार्यालयीन उपस्थितीची वेळही निश्चित नसायची. मला रोजच वेगेवेगळ्या संघटनांच्या लोकांना, कार्यकर्त्यांना भेटायला जावे लागायचे. यासाठी माझ्या वरिष्ठांनी आणि सहकार्‍यानी मला खूप मदत केली.

रक्तदान चळवळींमध्ये विद्यार्थ्यांचा, तरुणांचा, महिलांचा सहभाग वाढविण्यासाठी आम्ही स्वेच्छा रक्तदान दिवसाला जोडून निरनिराळे उपक्रम राबवायला सुरुवात केली. ऑक्टोबरचा पूर्ण महिना स्वेच्छा रक्तदान महिना म्हणून आम्ही साजरा करायला लागलो. यानिमित्ताने सुरुवातीला शाळाकॉलेजांमध्ये निबंध स्पर्धा, रांगोळी स्पर्धा आयोजित केल्या गेल्या. पहिल्या वर्षीच्या भरघोस प्रतिसादानंतर आम्ही दरवर्षी विविध वयोगटांसाठी निबंध स्पर्धा, रांगोळी स्पर्धा, घोषवाक्य स्पर्धा, भित्तिचित्र स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा इ. उपक्रम राबवायला लागलो. या स्पर्धा विविध महाविद्यालयांत आयोजित केल्या जायच्या. स्पर्धांनंतर आम्ही वेगवेगळ्या ठिकाणी भित्तिचित्र प्रदर्शने, रांगोळी प्रदर्शनेसुद्धा आयोजित करायचो. याच कालावधीत रक्तपेढीशी संबंधित डॉक्टर्स् आणि मी वेगवेगळ्या वर्तमानपत्रांमध्ये स्वेच्छा रक्तदान दिवसाच्या निमित्ताने लेख लिहून जनजागृती करायचो.

HDA2014_Raktadan4.JPG
या सर्व कार्यक्रमांसाठी त्यावेळी रक्तपेढीकडे पैसा नसायचा. या उपक्रमांसाठी आम्हाला वेगवेगळे प्रायोजक शोधावे लागायचे. राजकीय पक्षांच्या नेत्यांपासून छोट्यामोठ्या रेस्टॉरंट्‌स्‌चे मालक, खाजगी दवाखाने, बेकरी, रोटरी क्लब - लायन्स क्लबसारख्या संस्था, छोटेमोठे उद्योगधंदे, कारखाने अशा वेगवेगळ्या थरांतले प्रायोजक आम्हांला मिळत गेले आहेत. आता मात्र आम्हांला जनजागृतीसाठीच्या तरतुदीअंतर्गत सरकारकडून आर्थिक साहाय्य मिळते. स्वेच्छा रक्तदान दिवस/आठवडा/महिना साजरा करण्यासाठीसुद्धा हल्ली तरतूद असते.

विद्यार्थ्यांची 'हॅलो' ही संघटना त्यासुमारास खूप सक्रिय होती. या संघटनेतर्फे वर्षभरात स्वेच्छा रक्तदान शिबिरांद्वारे जास्तीत जास्त रक्तदाते पुरवणार्‍या संस्थेस/संघटनेस त्यावर्षासाठी ढाल दिली जायची. सलग तीन वर्षे अशी ढाल घेणार्‍या संस्थेला ती ढाल कायमस्वरूपी दिली जायची. ही ढाल आपल्या महाविद्यालयास मिळावी यासाठी महाविद्यालयांमध्ये स्पर्धा सुरू झाली.

'ब्लड रिलेशन्स ग्रूप' नावाची एक उत्साही स्वेच्छा रक्तदात्यांची संस्थासुद्धा याच काळात उदयास आली. वकील, डॉक्टर, कामगार, औषधविक्रेते, दुकानदार अश्या वेगवेगळ्या क्षेत्रांतली मंडळी असणार्‍या या संस्थेने रक्तदात्यांची एक यादी बनवली होती. तातडीच्या वेळी गरजूंना रक्तदात्यांची शोधाशोध करायला लागू नये हा या यादीचा उद्देश होता. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाजवळच्या एका औषधाच्या दुकानात ही यादी ठेवलेली असायची. अशीच एक रक्तदात्यांची 'डिरेक्टरी' (सूची) डॉ. मनसुख आचलियांनीसुद्धा बनवली होती. ती बहुतेक औरंगाबादेतील अशा प्रकारची पहिलीच सूची असेल. या सर्वांच्या मदतीने आम्हीसुद्धा शासकीय रुग्णालयात निगेटिव्ह रक्तगट असणार्‍या रक्तदात्यांची सूची बनवली.

सामाजिक/राजकीय संघटनांमध्ये रक्तदान शिबिरे आयोजित करण्यास शिवसेनेने सुरुवात केली. शिवसेनेची मोठमोठी रक्तदान शिबिरे बघून बाकी राजकीय पक्षांनीसुद्धा नंतरच्या काळात रक्तदान शिबिरे आयोजित करण्यास सुरुवात केली. वेगवेगळ्या धार्मिक कार्यक्रमांच्या निमित्तानेसुद्धा लोक रक्तदान शिबिरांचे आयोजन करण्यास पुढे येऊ लागले. भागवत सप्ताह, गणेशोत्सव, ख्रिसमस ही त्याची काही उदाहरणे.

रक्तदान शिबिरांची काही ठराविक काळवेळ नसते. १५ ऑगस्ट किंवा २६ जानेवारीसारख्या राष्ट्रीय सणांच्या दिवशी दोनतीन रक्तदान शिबिरांचे आयोजन केलेले असते. आयोजकांना नंतर शिबिर घ्या असे सांगूनही उपयोग नसतो. त्यांना त्या दिवशीच शिबिर घ्यायचे असते. आमच्याकडे पुरेसे मनुष्यबळ नसले तरी आम्ही कधीच कोणत्याही स्वेच्छा रक्तदान शिबिर आयोजनाला नकार देऊ शकत नाही. अशा प्रसंगी रक्तसंक्रमण अधिकार्‍यासोबतच पदव्युत्तर विद्यार्थ्यांची ड्यूटी लावावी लागायची. एकाऐवजी कधी दोन तर कधी तीन रूग्णवाहिकांची सोय करावी लागायची.

ग्रामीण भागात जाताना आम्हांला बर्‍याच वेळी सकाळी सातालाच जावे लागे. ग्रामीण भागातून शिबिर झाल्यावर परतायला रात्रीचे दोनही वाजत. माझ्या सोबत सर्व टीमचेदेखील जेवणाचे हाल व्हायचे. शिबिर म्हटले, की जेवणाचा डबा नेला तरी जेवायला वेळ मिळत नसे. दूरवरच्या ग्रामीण भागातील शिबिरांमध्ये तर सकाळी लवकर जावे लागल्याने कधी जेवण घेऊन जाणे शक्य व्हायचे नाही. बरे, तिथे काही खायला-प्यायला मिळेलच याची खात्री नसायची. बर्‍याचदा आख्खा दिवस आम्ही रक्तदात्यांना देतो त्या चहाकॉफी, बिस्किटांव्यतिरिक्त काहीच खायला मिळायचे नाही आणि दिवसभर थांबूनही सुरुवातीच्या काळात, विशेषतः ग्रामीण भागातल्या शिबिरांमध्ये, रक्तदात्यांची संख्या मुश्किलीने दोन अंकी आकड्यापर्यंत पोचायची. त्या काळात बरेच सहकारी, कर्मचारी यामुळे कुरकूर करत. परंतु रक्तदात्यांचा प्रतिसाद जसजसा वाढत गेला तसतसे टीमवर्क चांगले होत गेले. रक्तपेढीत रक्त उपलब्ध होऊ लागल्याने लोकांना त्यांच्या गरजेच्या वेळी रक्त मिळू लागले. लोकांचा विश्वास वाढला.

HDA2014_Raktadan6.JPG

दरम्यानच्या काळात अनेक खाजगी रक्तपेढ्या शहरात सुरू झाल्या. त्यामुळे स्पर्धा वाढली. तरीही रक्त संकलन होण्याच्या गतीमध्ये व प्रमाणामध्ये वाढच झाली. या रक्तपेढ्यांच्या सहकार्याने आम्ही (विभागीय शासकीय रक्तपेढीने) निरनिराळे उपक्रम सुरू केले आहेत. स्वेच्छा रक्तदान दिवसाच्या निमित्ताने आयोजित शहरफेर्‍यांमध्ये (रॅली) विविध महाविद्यालयीन विद्यार्थी, स्वेच्छा रक्तदाते आणि खाजगी रक्तपेढ्यांच्या प्रतिनिधींचा सहभाग असतो. या शहरफेर्‍यांमध्ये विद्यार्थी पथनाट्यांद्वारे रक्तदानाचे महत्त्व पटवून देतात. रक्तदान शिबिर संयोजकांचा मेळावा घेऊन त्यांचा सत्कार केला जातो. यामुळे चळवळीबद्दल लोकमनात आपुलकी निर्माण झाली व इतरांनाही प्रोत्साहन मिळाले. याचा परिणाम म्हणून रक्तदान शिबिरांच्या संख्येत व स्वेच्छा रक्तदात्यांच्या संख्येत वाढ झाली. १९८९-९० साली विभागीय रक्तपेढी, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रूग्णालय, औरंगाबाद यांच्यातर्फे वर्षाला पंधरावीस शिबिरे घेतली जात. ती संख्या २०१२च्या आकडेवारीनुसार दोनशेच्या वर गेली आहे आणि रक्तदात्यांच्या संख्येने पंधरा हजारांचा आकडा ओलांडला आहे.

रक्तदान शिबिरांचे प्रमाण हल्ली बरेच वाढले असले तरी मे आणि जून या दोन महिन्यांत औरंगाबादेमध्ये शासकीय तसेच इतर खाजगी रक्तपेढ्यांमध्ये रक्ताची खूप कमतरता असते. या दोन महिन्यांत राजकीय/सामाजिक पुढार्‍यांचे वाढदिवस फारसे साजरे होत नाहीत. सणवार पण नसतात. शाळाकॉलेजांमध्ये आधी परीक्षा चालू असतात आणि मग सुट्ट्या लागलेल्या असतात. या काळात रक्तदान शिबिरे आयोजित व्हावीत म्हणून आम्ही पोलिस कमिशनर, जिल्हाधिकारी आणि वेगवेगळे उद्योजक यांना भेटून प्रयत्न करत आहोत. बहुतांश आयोजकांना कोणत्या ना कोणत्या निमित्तानेच शिबिरे आयोजित करायची असतात आणि नेमके कमतरतेच्या काळात कोणतेही निमित्त सापडत नसल्याने कमी शिबिरांचे आयोजन होते. नागरिकांनी या काळात स्वेच्छा रक्तदान करून रक्तपेढ्यांना मदत करावी असे मला वाटते. स्वेच्छा रक्तदात्यांची संख्या कितीही वाढली तरी ती कमीच पडणार आहे. आजही कॉट्स्, चादरी, वाहने, बिस्किटे इ गोष्टींचा रक्तपेढीत तुटवडा आहे आणि यासाठी आम्हांला अजूनही लोकांची मदत मिळत असते.

सुरुवातीला नमूद केल्यानुसार मानवजातीला सुरक्षित रक्तपुरवठा करण्यासाठी समाजामध्ये जागृती अभियान राबवणे, या उदात्त चळवळीत झोकून देणार्‍या कार्यकर्त्यांची संख्या वाढण्यासाठी पोषक वातावरण तयार करणे गरजेचे आहे. रक्त न मिळाल्याने कुणाही व्यक्तीला आपला जीव गमवायची पाळी येवू नये, ही तुम्हां-आम्हां सर्वांची व आपल्या समाजाची जबाबदारी आहे!

HDA2014_separator_small.jpg

तळटिपा:
१) शासकीय रक्तपेढी व कामाची थोडक्यात ओळखः
शासकीय रक्तपेढी पॅथॉलॉजी डिपार्टपेंटच्या (विकृतिशास्त्र विभाग) अंतर्गत येते. रक्तगट तपासणी, रक्तावर करण्यात येणार्‍या विविध तपासण्या व चाचण्या या विभागात केल्या जातात.

२) रक्तपेढीत केल्या जाणार्‍या चाचण्यांपैकी खालील पाच चाचण्या महत्त्वाच्या आहेत.
ELISA for HIV I/II Antibody
ELISA for Hepatitis B (HBV) surface antigen
ELISA for Antibody to Hepatitis C (HCV)
VDRL/RPR for Syphilis -गुप्तरोग
Screening for Malarial Parasite

३) सर्व रक्तदात्यांकडून घेण्यात आलेल्या रक्तावर या चाचण्या केल्या जातात. चाचण्यांच्या निकालानंतर योग्य रक्त साठवले जाते, तर अयोग्य रक्ताची विल्हेवाट लावली जाते. काही वर्षांपूर्वीपर्यंत रक्ताची विल्हेवाट (डिस्कार्ड/डिस्पोज) लावायची सुविधा फक्त शासकीय रक्तपेढीत असल्याने सगळ्या खाजगी रक्तपेढ्यांमधले वापरण्यास अयोग्य रक्त शासकीय रक्तपेढीतच पुढील विल्हेवाटीसाठी यायचे.

४) योग्य रक्तापैकी जवळपास निम्मे रक्त पूर्ण स्वरूपात साठवले जाते तर उरलेल्या रक्ताचे विघटन (plasma, platelets, PCV- Packed Cell Volume ) केले जाते. किती रक्ताचे विघटन करायचे हे त्यावेळच्या रक्ताच्या साठ्यावर अवलंबून असते. रक्तपेढीमध्ये चाचणी केलेले, न केलेले आणि विघटन केलेले रक्त वेगवेगळ्या ठिकाणी योग्य तापमानाला साठवले जाते.


लेखातील सर्व प्रकाशचित्रे, © विभागीय रक्तपेढी, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय औरंगाबाद

HDA2014_saamarthya.jpg
related1: 


HDA2014_rangolee9.png


सुलभा खंदारे
HDA_14_Sulabha Khandare.jpg
सुलभा खंदारे यांनी मुंबईतील निर्मला निकेतन महाविद्यालयात समाजसेविका म्हणून पदवी घेतली. त्यानंतर त्यांनी अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात रोगप्रतिबंधक व सामाजिक औषधी विभागात वैद्यकीय समाजसेविका म्हणून काम केले. नंतर २५ वर्षे त्यांनी औरंगाबादेतील शासकीय महाविद्यालय रुग्णालयातील विभागीय रक्तपेढीत काम केले. निवृत्तीनंतर त्या गेली दोन वर्षे औरंगाबादेतील विविध समाजसेवी संस्थांमध्ये कार्यरत आहेत. त्यापैकी सजग महिला संघर्ष समिती आणि पोलिस आयुक्तालयाने नेमलेल्या महिला सुरक्षा समितीच्या त्या सदस्या आहेत व या दोन्ही समित्यांची सदस्या म्हणून समुपदेशनाचे काम करत आहेत.


HDA2014_gujarath.png


>

प्रतिसाद

बापरे, रक्तदानासारख्या पवित्र कार्यातही दलाल वगैरे असलेले पाहून सखेद आश्चर्य वाटले. या पार्श्वभूमीवर अडचणीवर मात करुन तुम्ही केलेल काम खरेच मोलाचे आहे. हॅट्स ऑफ टू यू !

<<<<< प्राचार्यांनी तर माझे नावच 'रक्तपिपासू मॅडम' ठेवले होते.>>>> :हाहा: पु लं नी लीलाताई मुळगावकारांवर केलेल्या कोटीची आठवण झाली. लीलाताईनांही त्यांच्या रक्तदान विषयक कामामूळे त्यांनी 'रक्तपिपासू बाई' अस म्हटल होतं

'स्वेच्छा रक्तदान चळवळी' तील तुमचा मोलाचा सहभाग, या चळवळीची सविस्तर माहिती हे सर्व वाचून मनात केवळ आदरभाव निर्माण झाला.
औरंगाबादसारख्या ठिकाणी असे उत्तम कार्य तुम्ही सुरु केलेत, चांगले रुजवले याबद्दल तुमचे आभार मानावे तितके कमीच.
एका चांगल्या कार्याची इतकी सुंदर माहिती दिल्याबद्दल मनापासून धन्यवाद.

खुप मोलाची चळवळ आहे. अजूनही याबाबतीत फार जागृती व्हायला हवी. एखाद्या जवळच्या व्यक्तीवर अशी वेळ आली तर अजूनही
नातेवाईकांना धावपळ करावी लागते.

रक्तदात्याला क्रेडिट कार्ड सारखे कार्ड दिल्यास त्या द्वारे तो गरजूसाठी शिफारस करू शकेल. (हक्क म्हणून नाही). अर्थात असा रक्तदाता स्वतः कार्यकर्ता बनून, जे त्याच्या शिफारशीचा आणि रक्तपेढीचा अडचणीच्यावेळी उपयोग करून घेतात त्यांना, नंतर रक्तदानासाठी प्रवृत्तही करेल. चळवळीच्या वाढीसाठी सुचविले. असा प्रयत्न काही ठिकाणी होतही असावा. रक्त मागायला आलेल्या रूग्णाच्या नातेवाईकांना रक्तपेढीचे कर्मचारी रक्तदानाची विनंती आवर्जून करू शकतात, अर्थात अडवणूक न करता. तुम्ही अत्यंत प्रतिकूल काळात मोठ्या चिकाटीने हे काम केलेत आणि खरा कार्यकर्ता आपल्या नोकरी म्हणून करण्याच्या कामातूनही कशी समाजसेवा करू शकतो याचा आदर्शच निर्माण केलात. धन्यवाद!

मोलाचे आणि अवघड काम. निवेदन हृद्य झाले आहे.

प्रतिकूल परिस्थीतीत अतिशय मोलाचे कार्य केलेत तुम्ही. लेख खूप आवडला.
अनंत बेडेकर यांच्या प्रतिसादाशी सहमत.