आठवणी आणीबाणीच्या

HDA2014_orangeheader.jpg

HDA2014_aanibaanee.jpg गेली चाळीस वर्षे सामाजिक व राजकीय क्षेत्रात काम करीत असताना अनेक भलेबुरे अनुभव आले. २५ जून, १९७५ ते २१ मार्च, १९७७ या पंचवीस महिन्यांच्या काळात भारतात आणीबाणी जाहीर करण्यात आली. भारतीय लोकशाहीवरचा हा एक काळा डाग! आणीबाणीआधीच्या काही वर्षांपासून आणीबाणी व त्यानंतर लगेच झालेल्या निवडणुका, या दरम्यानचा मी घेतलेल्या अनुभवांचा थोडक्यात आढावा घेण्याचा हा प्रयत्न आहे.

१९६७ला मी महाविद्यालयात प्रवेश घेतला. याचवेळी मराठवाड्यात कृषी विद्यापीठ व्हावे, यासाठी आंदोलन सुरू झाले होते. तेव्हा पंधरा दिवस मराठवाड्यातील सर्व महाविद्यालये बंद होती. या घडामोडींमध्ये माझा सहभाग नव्हता. किंबहुना राजकारणात, चळवळीत मला तेव्हा रस नव्हता.

बी.एससी.च्या दुसर्‍या वर्षी प्रा. श्री. विजय दिवाण आम्हांला शिकवायला होते. मी वर्गप्रतिनिधी असल्यामुळे मला बरोबर घेऊन त्यांनी अनेक उपक्रम राबविले. त्यांच्या सल्ल्यावरून मी बाबा आमटेंच्या सोमनाथ येथील 'श्रमसंस्कार छावणी'मध्ये भाग घेतला. तेथील अनुभवामुळे माझा दृष्टिकोन व्यापक झाला. मला वाचनाची व विचार करण्याची सवय लागली. दिवाणसरांच्या आग्रहामुळे अंबेजोगाई येथे 'युवक क्रांती दलाची' स्थापना केली. त्याचवेळी डॉ. लोहियांशीही संपर्क आला. वर्षभर विविध उपक्रम राबविल्यामुळे सार्वजनिक कामाची गोडी निर्माण झाली. या काळातच सामाजिक, राजकीय चळवळींना उधाण आले होते. सामाजिक समतेसाठी 'एक गाव एक पाणवठा' ही बाबा आढावांची चळवळ, दलित पॅंथर व अशा अनेक चळवळींशी मी आपोआप जोडला गेलो.

१९७०ला औरंगाबादमधील विधिमहाविद्यालयात प्रवेश घेतल्यानंतर युक्रांदचा उपसंयोजक म्हणून मी काम सुरू केले. १९७२च्या दुष्काळात विद्यार्थ्यांची फी माफ व्हावी, म्हणून तीन दिवस उपोषण केले. याच काळात मजुरांना काम आणि पुरेसे धान्य पाणी मिळावे म्हणून समाजवादी पक्षाच्या आंदोलनात सहभागी झालो.

भंडारा जिल्ह्यातील एरणगावी गुप्तधनासाठी नन्नावरे नावाच्या एका दलित तरुणाचा नरबळी दिला गेला. या घटनेच्या निषेधार्थ युक्रांदने व पदव्युत्तर मागासवर्गीय विद्यार्थी संघटनेने मनुस्मृति प्रेतयात्रा काढली. जवळपास पाच हजारांचा जनसमुदाय सहभागी झालेली ही अभूतपूर्व मूक प्रेतयात्रा, औरंगाबादेतील सर्व प्रमुख रस्त्यांनी फिरून सरस्वती भुवन महाविद्यालयाच्या मैदानावर विसर्जित झाली. मी स्वतः मनुस्मृतिला अग्नी दिला. या आगळ्यावेगळ्या निषेधाची संपूर्ण महाराष्ट्रभर चर्चा झाली.

मार्च, १९७४मध्ये, वसमत, जि. परभणी येथे सिंचन विभागात चार रिक्त जागांच्या मुलाखतीसाठी सुमारे चारशे तरुण हजर होते. संध्याकाळी मुलाखती रद्द झाल्याचे घोषित झाल्यामुळे गोंधळ निर्माण झाला व पोलिसांनी केलेल्या गोळीबारात दोन तरुण मृत्युमुखी पडले. त्याच दिवशी मराठवाडा विद्यापीठाच्या परीक्षा सुरू झाल्या होत्या. वसमतची बातमी सगळीकडे पसरताच पूर्ण मराठवाडाभर विद्यार्थ्यांनी परीक्षेवर बहिष्कार टाकला. दोन दिवसांतच सर्व परीक्षाकेंद्रे ओस पडली. पुढील पंधरा दिवस मराठवाड्यातील लहानथोर रस्त्यावर उतरले. मराठवाड्याचा विकास होत नसल्यामुळे रोजगार नाही व असलेले रोजगार भ्रष्टाचारामुळे सामान्यांना मिळत नाहीत, ही भावना घेऊन गावोगावी मोर्चे निघत होते. आंदोलनाचे नेतृत्व मी स्वतः, डॉ. भालचंद्र कांगो, सुभाष लोमटे, विजय गव्हाणे यांनी केले. एस. टी.चा मोफत प्रवास, तालुका कचेरीवर निदर्शने इत्यादी कार्यक्रमांनंतर अंबेजोगाई येथील माझ्या अध्यक्षतेखाली झालेल्या मेळाव्यात आंदोलन पुढे चालविण्याचा निर्णय झाला. आमदार-खासदार-लोकप्रतिनिधींना घेराव घालून राजीनामा मागण्याच्या कार्यक्रमामुळे जबरदस्त दहशत निर्माण झाली. त्यामुळे लोकप्रतिनिधी खाजगी कार्यक्रमालासुद्धा हजर राहत नव्हते. त्याच वेळी जिल्हाधिकारी कचेरीवर मोर्चे काढण्याचे ठरले. या मेळाव्यास युक्रांदबरोबरच युवक काँग्रेसचे काही नेते आले होते. या आंदोलनामुळे सरकार अडचणीत आले, म्हणून आंदोलन मोडण्याचा प्रयत्न काँग्रेसवाल्यांनी केला, पण उपस्थित हजारो विद्यार्थ्यांनी तो हाणून पडला. आंदोलनात अनेक लोक, अनेक उद्देश घेऊन आले होते. माझ्या बहिणीच्या व भावाच्या एकत्रित लग्नसमारंभाला उपस्थित असलेले खासदार श्री. सयाजीराव पंडित यांना आम्ही घेराव घातला.

आंदोलन भरात असतानाच सरकार व काँग्रेस पक्ष आंदोलनात फूट पाडण्याचे निरनिराळ्या पद्धतीने प्रयत्न करीत होते. मराठवाड्याचे नेते श्री. शंकरराव चव्हाण यांना मुख्यमंत्री करण्याचा काँग्रेसच्या एका गटाचा मानस होता. त्याचप्रमाणे विजय गव्हाणे यांचे वडील, शे. का. पक्षाचे नेते अण्णासाहेब गव्हाणे, हेसुद्धा शंकररावांच्या बाजूने प्रयत्नशील होते.

ठरल्याप्रमाणे मराठवाड्यातील सर्व जिल्हाधिकारी कार्यालयांवर मोर्चे काढण्यात जनतेने प्रचंड प्रतिसाद नोंदवला. बीड वगळता सर्व ठिकाणी शांततेने कार्यक्रम पार पडले. मला व डॉ. शशिकांत बर्‍हाणपूरकर (डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या नाट्यशास्त्र विभागाचे प्राध्यापक) यांना सकाळीच अटक करून गावाबाहेर पोलीस मुख्यालयात ठेवले होते. बीडला मात्र पोलिसांनी बळाचा वापर केला. शहराबाहेर बसेस अडवून लोकांना तेथेच अटक केली. त्यामुळे तणाव वाढून दगडफेक, जाळपोळ सुरु झाली. जमावाला काबूत आणण्यासाठी पोलिसांनी लाठीहल्ला, अश्रुधुराचा वापर केला. रात्री एक वाजता मला व डॉ. शशीकांत बर्‍हाणपूरकर यांना कारंजा चौक येथे सोडले. जीपमधून उतरताच तेथे हजर असलेल्या एस. आर. पी.च्या जवानांनी आमच्यावर हल्ला केला व बेदम मारहाण केली. पुढचा कार्यक्रम ठरविण्यासाठी परभणीस मेळावा आयोजित केला. त्याच वेळी निरनिराळ्या शक्ती आंदोलन फोडण्यासाठी सक्रीय झाल्या.

वैचारिक भूमिकेबद्दल व कार्यक्रमाबाबत स्पष्टता नसल्यावर आंदोलन चालवणे कठीण असते, याचा अनुभव येऊ लागला. सरकारने मराठवाड्यासाठी काही प्रकल्प, योजना जाहीर केल्या. तेवढ्यावरच समाधान मानावे असा सूर मराठवाड्यातील कर्ते-धर्ते म्हणविणार्‍यांकडूनही निघू लागला. पडद्यामागे हालचाली सुरू झाल्या. अनेक विद्यार्थी नेत्यांची व बहुसंख्य जनतेची इच्छा नसतानाही, आंदोलन मागे घेतल्याचे जाहीर केले गेले. काँग्रेसच्या कूटनीतीने युक्रांदच्या अननुभवी नेतृत्वावर मात केली.

HDA2014_separator_small.jpg

याच काळात संपूर्ण देशात भ्रष्टाचाराने धुमाकूळ घातला होता. तरुणवर्ग अस्वस्थ होता. हे वातावरण पाहून राजकारणातून निवृत्त झालेले सर्वोदयी नेते जयप्रकाश नारायण सक्रीय झाले. भ्रष्टाचाराच्या व एकाधिकारशाहीच्या विरोधात देशभरातील निरनिराळ्या विद्यार्थी संघटनांना आणि राजकीय पक्षांना संघटीत करण्यासाठी जयप्रकाशजी देशभर सभा व मेळावे आयोजित करत होते. तापलेल्या वातावरणातच २६ जानेवारी, १९७५ रोजी जयप्रकाशजींनी शिवाजी पार्क येथे सभा घेतली. यावेळी झालेल्या युवक मेळाव्यात जयप्रकाशजींनी जाती तोडो, हुंडाबंदी व तस्करी विरोधी आचरणाची शपथ दिली. ती आम्ही आजतागायत पाळत आहोत.

या भारलेल्या वातावरणातच इंदिरा गांधींची निवडणूक रद्द करणारा अलाहाबाद उच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय जाहीर झाला. इंदिरा गांधींनी राजीनामा द्यावा, अशी मागणी समाजाच्या साहित्यिक, कलावंत, पत्रकार इत्यादी सर्व स्तरांतून होऊ लागली. काँग्रेसमधूनही चंद्रशेखर, मोहन धारिया इत्यादी तरुण-तुर्कांनी ही मागणी उचलून धरली व पक्षाचा राजीनामा दिला. २५ जूनच्या मध्यरात्री इंदिराजींनी आणीबाणी घोषित करून जयप्रकाशजी, मोरारजीभाई, मधु लिमये, अटलबिहारी, अडवाणी, चंद्रशेखर, मोहन धारिया आदी नेत्यांना अटक करून तुरुंगात टाकले. एका रात्रीत हजारो छोट्या-मोठ्या कार्यकर्त्यांना मिसाखाली (अंतर्गत सुरक्षा कायदा) तुरुंगात टाकले. देशातील सर्व मध्यवर्ती कारागृहे भरल्यामुळे जिल्हा कारागृहांना बढती देण्यात आली. सर्व प्रकारच्या राजकीय हालचालींवर बंदी घातली. घटनेने दिलेले नागरिकांचे मूलभूत अधिकार स्थगित केले. वर्तमानपत्रांना सेन्सॉरशिप लागू केली. जिल्हाधिकार्‍यांनी तपासल्याशिवाय वर्तमानपत्रे छापणे, पोस्टातील पत्रव्यवहार पोलिसांनी तपासल्याशिवाय वितरित करणे, यांवर बंदी घातली. कारणाशिवाय कुणालाही ताब्यात घेण्याचा अधिकार पोलिसांना दिला. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, जमात-ए-इस्लाम इत्यादी संघटनांवर बंदी घालून त्यांच्या सर्व कार्यकर्त्यांना तुरुंगात टाकले. वर्तमानपत्रांवर निर्बंध असल्यामुळे नेमके काय झाले, कुणाला अटक झाली, हे कळेना!

२६ जूनला मी माजलगावला असताना आणीबाणीची बातमी समजली. तेथून अंबेजोगाईस परतल्यानंतर डॉ. लोहिया, अमर हबीब, अशोक गुंजाळ व कचरे यांच्या अटकेची बातमी कळली व मी तडक मुंबई गाठली. समाजवादी पक्षाच्या कार्यालयात नानासाहेब गोरे यांच्या उपस्थितीत बाहेर राहिलेल्या प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक झाली. तेथे जॉर्ज फर्नांडिस, मृणालताई गोरे, पन्नालालजी सुराणा असे नेते भूमिगत झाल्याची बातमी व इतर सर्व माहिती समजली. माझी पन्नालालजींशी भेट झाली. त्यांनी मला भूमिगत होण्याचा आदेश दिला.

आठ दिवसानंतर अंबेजोगाईस आलो तेव्हा माझ्या नावे वॉरंट असल्याचे समजल्यावर मी माझी वेशभूषा पूर्ण बदलली. बापूसाहेब काळदात्यांना औरंगाबाद येथे भेटलो. १५ ऑगस्ट रोजी राज्यभर आणीबाणीविरोधी सत्याग्रह करण्याचा कार्यक्रम समाजवादी पक्षाने ठरविल्याचे त्यांनी सांगितले. सत्याग्रहाच्या तयारीसाठी अंबेजोगाईला डॉ. पन्हाळेंना भेटून कार्यक्रम ठरवला. अत्यंत विश्वासातील लोकांना परिणामाची पूर्ण कल्पना देऊन मी नेहमीच्या ठिकाणी न राहता 'राष्ट्र सेवा दलाच्या' राखे गुरुजींकडे राहिलो. ठरल्याप्रमाणे पन्हाळ्यांनी व इतरांनी सत्याग्रह केला. मी भूमिगत राहावे, असे ठरल्यामुळे सत्याग्रहात सहभागी न होता, परळीमार्गे मुंबईस गेलो.

पुढे पन्नालालजींच्या निरोपाप्रमाणे नागपूरला अनिल बांदेकर यांच्याकडे गेलो. शासकीय आय. टी. आय.मध्ये शिक्षक असलेल्या बांदेकरांनी, गुप्त पत्रके छापण्याची जबाबदारी घेतली होती. ते आणीबाणीविरोधी कार्यक्रम, आंतरराष्ट्रीय समाजवादी संघटनेने केलेले प्रयत्न आणि जॉर्ज, मृणालताई, पन्नालालजी यांच्या गुप्त बैठकांची माहिती संकलित करत असत. महिन्याच्या दुसर्‍या व चौथ्या शनिवारी आणि रविवारी कार्यालयात जाऊन ते या माहितीची सायक्लोस्टाईल पत्रकं तयार करायचे. काही तरुण या कामी त्यांना मदत करीत. नागपूरव्यतिरिक्त मी वर्धा, हिंगणघाट, वरोरा, चंद्रपूर, कागजनगर इत्यादी गावांच्या पोस्टांत पत्रकं पोस्ट करून माणिकगडला मुक्कामास जात असे. माणिकगडच्या जंगलात मराठवाड्यातील (विशेषतः लमाण समाजातील) लोकांनी अतिक्रमण केले होते. त्यांच्या नावे जमिनीचे अधिकृत पट्टे करून द्यावेत, म्हणून समाजवादी पक्ष १९७२पासून आंदोलन करीत होता. मी अनेकवेळा पंधरा-पंधरा दिवस माणिकगडावर राहत असे. त्यामुळे आणीबाणीच्या काळात माझे हेडक्वार्टर माणिकगड ठरले.

माणिकगडला जाण्यासाठी चंद्रपूरहून बसने किंवा शेअर टॅक्सीने राजुरा या तालुक्याच्या गावी जायचे व दुसर्‍या बसने गडचांदूर या गावी जाऊन पुढे चौदा किमी. चालत जावे लागे. यात पहिले दहा किमी. चढाचा रस्ता व नंतर पठार. सुरुवातीच्या चार किमी.च्या अंतरावर ओसाड किल्ला व भोवताली घनदाट जंगल! रस्ता अगदी निर्मनुष्य! तो भाग पार पडेपर्यंत खूप भीती वाटे. अचानक वाघ समोर आला तर? एखादा नक्षलवादी आला तर? नक्षलवादी हे समाजवादी, कम्युनिस्ट यांचा खूप द्वेष करतात. माझी माहिती त्यांना असली तर? असे काही होण्याची शक्यता नसतानाही भीती वाटायची. माणिकगडावर जाण्यासाठी दुसरा रस्ता होता. चंद्रपूरहून रेल्वेने प्रथम कागजनगर, आंध्रप्रदेश (बिर्लांचा कागद कारखाना) आणि मग तिथून पुढे असिफाबाद मार्गे केरामेरीला बसने. केरामेरी हे गाव शंभरएक घरांच्या वस्तीचे. पूर्ण माणिकगड पंचक्रोशीतील लोक बाजारासाठी येथे येत. म्हणून मी हा मार्ग टाळत असे.

आणीबाणीविरोधी कृतिसमितीने २ ऑक्टोबर, १९७५ला गांधीजींचे छायाचित्र व 'निर्भय बनो' संदेशाचे बिल्ले लोकांमध्ये वितरीत करून, ते लावण्याचा आग्रह धरावा असा कार्यक्रम दिला होता. जेष्ठ समाजवादी नेते सदाशिवराव बागाईतकर हे त्यानिमित्त अंबेजोगाईला येणार म्हणून तयारीसाठी मी अंबेजोगाईस गेलो. खोलेश्वर महाविद्यालयातील व्याख्यान आटोपून, त्यांना पुणे बसमध्ये बसवून, मी व कर्‍हाड वकील एका मित्राकडे गेलो. कसा कुणास ठाऊक, पण पोलिसांना सुगावा लागला व त्यांनी मला अटक केली. अटक रात्री झाल्यामुळे जामीन होण्याची शक्यता नव्हती. डास, पिसवा, ढेकुण, उंदरांच्या सहवासात ४ X ४च्या कस्टडीत रात्र काढली. सकाळी कर्‍हाड वकील आल्यानंतर कलम १०७ लावले आहे व दिवसभरात कधीतरी तहसीलदारांसमोर जामीन होईल, असे कळले. जामिनावर सुटका झाली व कर्‍हाड वकिलांच्या सल्ल्यावरून मी अंबेजोगाई सोडले. कदाचित पोलिसांना माझ्यावरील वॉरंटची कल्पना नसल्यामुळे त्यावेळची मिसाखालील अटक टळली. कर्‍हाड वकिलांनी पुढे तहसीलमधील कारकुनाला पटवून प्रत्येक तारखेला माझी हजेरी लावली.

मधल्या काळात मृणालताई व पन्नालालजी वेगवेगळ्या ठिकाणी भेटले. त्यांची वेशभूषा व जामानिमा पाहून मीसुद्धा त्यांना ओळखले नाही.

HDA2014_separator_small.jpg

मराठवाडा विद्यापीठाच्या सिनेटच्या पहिल्या बैठकीस वसंतराव काळे यांना मतदान करण्यासाठी धोका पत्करून हजर राहिलो. तेथून केज, वरपगाव असा प्रवास करून एस. एम. जोशींच्या भेटीसाठी लातूरला गेलो. माझ्या उपस्थितीची बातमी वर्तमानपत्रात वाचून केजचे पोलीस मला शोधू लागले, पण त्याआधीच मी नागपूरला पोहोचलो होतो. माणिकगडचा प्रश्न विधानसभेत उपस्थित करण्यासाठी समाजवादी पक्षाचे आमदार मठकर यांना भेटणे व नंतर तळेगाव दाभाडे येथील महिनाभर होणाऱ्या शिबिरात उपस्थित राहणे, यासाठी मी मुंबईत येणार आहे, ही माहिती चुकून सुलभाने (माझी भावी पत्नी) माझ्या भावास कळविली व टपाल तपासणीत हे पोलिसांना कळले. बीड जिल्ह्यातील मी एकटाच सापडत नसल्याने पोलिसांनी व जिल्हा प्रशासनाने माझ्या नावावर असलेल्या शेतीवर टाच आणली व जप्तीचे आदेश दिले. आमदार निवासातून परतल्यावर घरासमोर सकाळपासून वाट पाहत असलेल्या बीडच्या पोलिसांनी मला अटक करून गोरेगाव पोलीस स्टेशनला नेले. मुंबईच्या दोन सी. आय.डी. इन्स्पेक्टरांनी गोरेगाव पोलीस स्टेशनमध्ये रात्री ८ ते सकाळी २:३०पर्यंत माझी कसून चौकशी केली. पन्नालालजींचा ठावठिकाणा, भूमिगत पत्रकांची छपाई व वितरण व्यवस्थेतील सहभागासंबधी माहिती मिळविण्याचा प्रयत्न चालू होता. गोड बोलून, धमक्या देऊनही माहिती मिळत नसल्याचे बघून मला सी.आय.डी. कार्यालयात नेण्याचा मनोदय व्यक्त केला. त्याचक्षणी, मला अटक करण्यासाठी बीडहून आलेल्या होम इन्स्पेक्टर डोणगावकर यांनी त्याला विरोध केला. चौकशी संपली असल्यास, राजकीय स्थानबद्ध असल्यामुळे, सुरक्षितपणे मला ठाणे जेलमध्ये पोहोचवण्याची त्यांची जबाबदारी आहे, असे सांगितले व तेथे पोहोचविले. इतर कार्यकर्त्यांना अटक केल्यानंतर त्यांना झालेली मारहाण व अत्याचाराच्या कहाण्या मी ऐकल्या होत्या. इन्स्पेक्टर डोणगावकरांमुळे मी संभाव्य पोलिसी जाचातून वाचलो.

ठाणे जेलमध्ये एका वर्षापासून असलेले ज्येष्ठ समाजवादी दत्ताजी ताम्हाणे, पंढरीनाथ चौधरी, महंमद खडस यांनी माझे स्वागत केले. माझे सासरे कै. श्रीरंग साबडे हे मोठे समाजवादी नेते होते. त्यांचा जावई म्हणजे आमचा जावई, अशी भावना त्यांनी व्यक्त केली. दीर्घ काळापासून जेलमध्ये असूनसुद्धा त्यांनी लेखी माफीनामा दिला नाही. त्यामुळे त्यांच्याबद्दल मला नितांत आदर वाटला.

जेलमधील वास्तव्यात नियमित व्यायाम, निरनिराळे खेळ, भरपूर वाचन, चर्चा व व्यवस्थित आहार यामुळे प्रकृती सुधारली. जेलमधील जीवन स्थिरावत असतानाच आणीबाणी उठवून निवडणुका घेणार असल्याची घोषणा झाली. सर्वांना बाहेर जायचे वेध लागले.सर्वजण सुटले, मी एकटाच जेलमध्ये राहिलो व पंधरा दिवसांनी माझ्या सासूबाईंच्या प्रयत्नांमुळे सुटलो.

आणीबाणीच्या काळात मी किंवा इतर भूमिगत कार्यकर्ते कुठल्याही प्रकारच्या प्रवासाच्या सुविधा नसताना राज्यभर फिरत होतो. टेलिफोन, मोबाईल नव्हते, तरीसुद्धा संपर्क होत होता. खाण्यापिण्याची आबाळ, थंडी- वार्‍याचा त्रास असूनसुद्धा वर्षभर आणीबाणीविरोधी संघर्ष कायम ठेवला. प्रबळ इच्छाशक्तीमुळेच हे सहज शक्य झाले.

HDA2014_separator_small.jpg

लोकसभेच्या निवडणुका झाल्या. समाजवादी पक्ष, भारतीय लोकदल, संघटना काँग्रेस, जनसंघ व नव्याने सामील झालेले जगजीवनराम यांचा मिळून 'जनता पक्ष' स्थापन झाला. मोरारजी देसाई यांच्या नेतृत्वाखाली जनता पक्षाचे सरकार अस्तित्वात आले. हे सरकार अठरा महिने टिकले व अंतर्गत विरोध तीव्र झाल्यामुळे कोसळले. एक प्रयोग संपला!

महाराष्ट्रात जनता पक्षाच्या नेतृत्वाखाली असलेल्या पु.लो.द. (पुरोगामी लोक दल) सरकारने मराठवाडा विद्यापीठाला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे नाव द्यावे, असा निर्णय घेतला. विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांनी एकमताने ठराव मंजूर केला. तत्पूर्वी मराठवाडा विद्यापीठाच्या कार्यकारणीने असाच ठराव मंजूर केला होता. मराठवाड्यात मात्र याविरुद्ध तीव्र प्रतिक्रिया उमटली व प्रचंड जाळपोळ, दंगली झाल्या. त्यांत दोघांचा बळी गेला. दलित विरुद्ध सवर्ण असे स्वरूप त्याला प्राप्त झाले. काही काळानंतर महाराष्ट्रातील पुरोगाम्यांनी व समतावाद्यांनी नामांतरासाठी शांततामय आंदोलन सुरू केले. ६ डिसेंबर, १९८० रोजी औरंगाबादेत प्रचंड मोठा सत्याग्रह झाला. महाराष्ट्रातील हजारो कार्यकर्त्यांनी सत्याग्रह करून तुरुंगवास पत्करला. आम्ही अंबेजोगाईत सत्याग्रह केला. पंधरा दिवसांची शिक्षा भोगण्यासाठी आम्हांला नाशिक जेलमध्ये पाठविले. जेलमध्ये असताना लोकदलाने बीड लोकसभेसाठी माझी उमेदवारी जाहीर केली. पण मी जेलमध्ये असल्यामुळे उमेदवारी अर्ज भरू शकलो नाही.

जनता पक्ष फुटल्यानंतर पुढच्या घडामोडींच्या विस्तारात मी जात नाही. १९८० साली इंदिरा गांधी सत्तेवर आल्यानंतर राजकारणाचे स्वरूपच बदलले. त्याग, मूल्ये, नि:स्वार्थीपणा, तत्त्वनिष्ठा मानणारे अव्यवहारी व मूर्ख ठरले. भ्रष्ट व सत्तेसाठीच राजकारण करणार्‍या काँग्रेसच्या वाटेनेच इतर पक्षही चालू लागले. संपूर्ण समाजजीवनाचे व्यापारीकरण झाले.

तरीसुद्धा ध्येयवेड्या, निष्ठावान व निस्वार्थी कार्यकर्त्यांची संख्या आजही कमी नाही. कधीतरी यश येईल हा दुर्दम्य आशावाद बाळगणारी मेधा पाटकरांची नर्मदा चळवळ, असंघटित कामगारांच्या प्रश्नासाठीचा लढा व असे अनेक लढे चालूच आहेत. यासंबंधी कधीतरी सविस्तर लिहूया. तूर्तास एवढे पुरे.

HDA2014_saamarthya.jpg
related1: 


HDA2014_rangolee12.jpg

अण्णा खंदारे
HDA_14_Annasaheb Khandare1.jpg
अण्णा खंदारे हे गेली ४० वर्षे मराठवाड्याच्या विकासासाठी सामाजिक / राजकीय व शिक्षण क्षेत्रांतील विविध चळवळींमध्ये पूर्णवेळ कार्यकर्ता म्हणून सहभागी झाले आहेत. शेतकर्‍यांचे प्रश्न व आंदोलने आणि पाणीप्रश्न हे यात प्राधान्याने येतात. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठामध्ये कार्यकारणी व व्यवस्थापन परिषदेचे सदस्य म्हणून त्यांनी बराच काळ काम केले आहे. याशिवाय त्यांनी नाशिक येथील आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे कार्यकारणी (सिनेट) सदस्य म्हणूनही काम केले आहे.


HDA2014_bihar.png

प्रतिसाद

आणीबाणीबद्दल फक्त वाचलेल आहे . पण जेवढ वाचल तेवढ्यावरुनही त्या काळ्याकुट्ट कालखंडाची कल्पना येते . तुमच्यासारख्या प्रत्यक्ष आणीबाणी कालखंदाचा अनुभव असलेल्या कार्यकर्त्याकडून फर्स्ट हैण्ड अनुभव वाचायला मिळाला.त्याबद्दल आभार ! या काळात हाल अपेष्टा सहन किती केल्या असतील याची कल्पना येते . त्या काळाच दस्ताऐवजीकरणच आहे हे.केवळ इथेच न थांबता मायबोली वर सविस्तर लिहावे ही आग्रही विनंती :)

आण्णासाहेब, तुमच्या प्रत्यक्ष आणीबाणीतल्या अनुभवांचे वाचन हा देखिल आमच्यासाठी एक अनुभव आहे. धन्यवाद :-)

खूप सविस्तर तरीही नेमके लिहिलंय खंदारेसाहेब तुम्ही. मनापासून धन्यवाद तुम्हाला. काय काय भोगावे लागले असेल त्याकाळातल्या लोकांना !!

सत्तांध मंडळी कुठल्या थराला जाऊ शकतात याचे हे एक ढळढळीत उदाहरणच.

त्या काळाचे दस्ताऐवजीकरणच आहे हे. केवळ इथेच न थांबता मायबोली वर सविस्तर लिहावे ही आग्रही विनंती :) >>>> अनुमोदन.

काळाकुट्ट कालखंड होता तो. तूम्ही बरेच संयमाने लिहिलेय. त्याकाळात नेत्यांना फारच हालअपेष्टा भोगाव्या लागल्या.
मी नववीत / दहावीत होतो. अजून तो काळ आठवतोय. त्यावेळी उडत उडत कानावर आलेल्या गोष्टी भयानकच होत्या.

आपल्या लेखात अनेक चळवळींना स्पर्श केला आहे. पेपरातल्या बातम्या मला समजू लागायचे वय, आणीबाणीच्या अखेरचे आणि त्यानंतर लगेचच्या अनेक मोठ्या उलथापालथींनी भरलेल्या कालखंडाचे. त्यामुळे आणीबाणीच्या आठवणी अधिकच थरारक वाटल्या.
तुमच्यातल्या दुर्दम्य आशावादी कार्यकर्त्याला सलाम.