रेखाटनकार

HDA2014_selfportrait_Alpana.jpg
अल्पना
खूप पूर्वीपासून चित्रकलेची आवड होती. शाळा-कॉलेजात असताना थोडीफार पेन्सिल स्केचेस केली होती. चित्रकलेची एलिमेंटरीची परिक्षासुद्धा दिली होती. पुढची मात्र देणं झालं नाही. सुट्ट्यांमध्ये काचेवर, कपड्यांच्या तुकड्यांवर चित्र रंगवणे, पत्र्यावर एम्बोसिंग, सिरॅमिक असले उद्योग करायचे. नंतर मात्र नोकरी आणि इतर कामधंद्यांच्या नादात या छंदाकडे खूप दुर्लक्ष झालं. २-३ वर्षांपूर्वीच्या दिवाळीअंकाच्या वेळी रेखाटन करताना हा छंद परत सुरू झाला.मध्यंतरी मेटल एनॅमलींग करताना काही चित्रकार मैत्रिणी मिळाल्या. त्यांच्या प्रोत्साहनामुळे (यात मला प्रसिद्ध चित्रकार, ज्वेलरी डिझायनर शुभा गोखलेंचा आवर्जून उल्लेख करावा लागेल.) कागद, भांडी, वस्तू, कॅनव्हास असं जे दिसेल ते रंगवायला सुरवात करायला लागले होते. याच दरम्यान मायबोलीवरील दिल्लीस्थित चित्रकार प्राजक्ताशी ओळख झाली आणि मी या छंदाकडे गंभीरपणे लक्ष द्यायला लागलेय. मायबोलीचा माझा हा छंद परत सुरू होण्यात खूप मोठा वाटा आहे. इथल्या जलरंग कार्यशाळेमुळे, अजय, संपदा, अश्विनी, प्राजक्ता आणि इतर अनेकांमुळे मी परत एकदा रंगांमध्ये रमायला लागलेय.
HDA2014_selfportrait_GD.png
गजानन
कुठलेही चित्र दिसले की ते बघण्यासाठी आपोआप थोडे रेंगाळणे होतेच. मी काही चित्रकार / रेखाटनकार वगैरे नाही. हे शब्द फारच मोठे होतील माझ्यासाठी. रीतसर ट्रेनींगही नाही पण मध्ये मायबोलीवर अजय पाटलांनी ऑनलाईन जलरंग कार्यशाळा आयोजित केली. त्यातले तंत्र अभ्यासण्याचे मी थोडेफार प्रयत्न केले. माझे व्यवसायिक क्षेत्रही चित्रांच्या १८० अंश कोनात सुसाट पळत असल्याने तिथेही चित्रांचा काही फारसा संबंध येत नाही (आलाच तर, त्या अमूकढमूक ठिकाणी चित्र अपलोड करताना एरर येतोय तेवढा बघशील का, या छापाचा). तेंव्हा 'बाथरूम सिंगर' असतात त्याप्रमाणे चित्रकलेच्या बाबतीत गमतीने 'लास्ट बेंच चित्रकार' असे काही म्हणत असतील, तर ते म्हणता येईल माझ्या बाबतीत.
HDA2014_Selfportrait_Palli.jpg
पल्ली
अभिनव कला महाविद्यालय, पुणे येथून जी.डी. आर्टस् केलंय. इलस्ट्रेशन हा माझा स्पेशलायझेशनचा विषय असून मी एम.टि.डि.सी.वर प्रोजेक्ट केलेला आहे. वर्गात दुसरी आले होते. गेली २४ वर्षे पुणे आणि बहारिन येथे अनुक्रमे ग्राफिक डिझायनर, सिनिअर आर्ट डायरेक्टर, क्रिएटिव हेड असा प्रवास झाला. श्रीलंकन, पाकिस्तानी, फिलिपिनोज, केरळी, तमिळी, ब्रिटिश असा स्टाफ सांभाळला. प्रॉडक्शन फ्लोअरवरील एकमेव स्त्री आणि एकमेव मराठी व्यक्ती असा मान मिळाला. आयुष्यात प्रचंड उतारचढाव आले, प्रत्येक वेळी कामानं तारलं. ग्राफिक डिझायनिंग हाच माझा छंद आणि चरितार्थाचे साधनही. आता स्वतःचा व्यवसाय सुरू केलाय. प्रिंटींग सोल्युशनही पुरवते. मायबोलीने एक स्वतंत्र ओळख दिलीय, खूप आनंद दिलाय, छान मित्र मैत्रिणी दिल्या आहेत. अनंत उपकार मायबोली.कॉमचे. आभार सार्‍यांचे...
HDA2014KansRaj_selfportrait.png
कंसराज
तिसर्‍या इयत्तेपासून इतिहासाच्या पुस्तकातील जुन्या इमारतींची / व्यक्तींची चित्रे पाटीवर पेन्सिलीने काढण्यापासून माझा चित्रकलेचा छंद सुरू झाला असावा; तो आजपर्यंत कायम आहे. मध्यंतरी चित्रकला थोडी मागे पडली होती, पण आता जोमाने ती जोपासायचे ठरवले आहे. मी पेट्रोलियम / केमिकल इंजिनीअर आहे. कामाच्या ठिकाणी चित्रकलेचा उपयोग फक्त प्रिंट केलेल्या डॉक्यूमेंट्‌स्‌वर पेनाने चित्र काढण्यास करतो. वहीच्या पानावरच्या समासाचा उपयोग हा छोटीछोटी चित्रे काढण्यासाठीच असतो, असे माझे ठाम मत मी शाळा-कॉलेजात असतांना होते आणि आजही ते कायम आहे. दिवाळी अंकाचे काम करण्याची संधी दिल्याबद्दल मायबोलीस आणि संपादक मंडळास धन्यवाद.
HDA2014_selfportrait_Minoti.png
मिनोती
मी एका सॉफ्टवेअर कंपनीमध्ये क्वालिटी अ‍ॅश्युरंस इंजिनीअर म्हणून काम करते. कामाच्या ठिकाणी 'चुका काढणे' याव्यतिरिक्त कोणत्याही कलेचा उपयोग करत नाही. मात्र मला बाकीच्या कलांची खूप लहानपणापासून आवड होती. शाळेत चित्रकलेची आवड होती. शाळेतच एलिमेंटरी आणि इंटरमिडिएट परीक्षा दिल्या. कॉलेजमध्ये असताना फार काही केले नाही, पण नंतर मात्र काही ना काही चालू असते. भरतकाम, विणकाम, क्रोशा, चित्रकला, पॉटरी, ज्वेलरी अशा सगळ्या कलाप्रकारांमध्ये मी हात मारून पाहिले आहेत. सध्या जलरंग, अ‍ॅक्रिलीक यांमध्ये काम करते. २०१३ सालच्या मायबोली दिवाळी अंकात प्रथम 'ऑन डिमांड' चित्रे काढली होती, तोवर फक्त आवड म्हणूनच सगळे चालू होते.
HDA2014_selfportrait_Sampada.png
डॅफोडिल्स
मी मायबोलीकरांची डॅफो उर्फ डॅफोडिल्स. ओळख देण्याइतकी मी कुणी मोठी चित्रकार नाहीये, पण मी एक हौशी कलाकार... चित्रकार. लहानपणापासूनच मला चित्रं काढायला आवडायची. सगळेच रंग खूप आवडते. त्यांच्या विविध संगती आणि निरनिराळी माध्यमं असं सारंच विशेष आवडतं. चित्रकलेचं काही खास शिक्षण नाही घेतलं, पण इलेमेंटरी-इंटरमिजीएट परीक्षा दिल्या आहेत. सगळ्या प्रकारची कला मला खूप आवडते. कलाप्रदर्शनांतून रेंगाळायला, निरनिराळ्या कलाकृती बघायला मला खूप आवडतात. नोकरी सोडल्यावर पुन्हा चित्रं काढायला आणि कलाकारीला सुरुवात झाली. ग्लास-पेन्टींग, मातीकाम, छोट्या-मोठ्या मूर्ती बनवणं, क्रोशे-विणकाम इत्यादी छंद पुन्हा नव्यानं जडले. चित्रं रेखाटायला तर आवडायचीच, मग माध्यम कुठलंही असो अगदी मातीवर रेघोट्या मारण्यापासून काच, कापड, लाकूड, कॅन्व्हास इत्यादींपर्यंत काहीही चालतं मग. मायबोलीची मी विशेष आभारी आहे. माझ्यातल्या कलाकाराला ओळखून मायबोलीवरच्या प्रत्येक उपक्रमात दरवर्षी आठवणीनं मला संधी दिली जाते. मायबोलीला मनापासून धन्यवाद! आजपर्यंत हितगुज दिवाळी अंकात एकतरी चित्र असायचं. पण यावर्षी हे असं स्वतःला कलाकार म्हणवून घेताना लई भारी वाटतेय. :)
HDA2014_selfportrait_Prajakta.png
प्राजक्ता पटवे-पाटील
मी फाईन आर्टिस्ट आहे. जे. जे. स्कूल ऑफ आर्टस्‌मध्ये शेवटच्या वर्षाला असताना रौप्यपदक मिळाले होते. नंतर मी सिनेमा क्षेत्रात गेले आणि चित्रकला मागे पडली. आता गुरगावला आल्यानंतर सिनेमा मागे पडला आणि परत चित्रकला सुरू झाली. मायबोलीकर अल्पनाबरोबर हस्तकला-चित्रकलेचा छोटासा व्यवसाय सुरू केला आहे. मी जरा बरी फोटोग्राफीसुद्धा करते. अल्पनामुळे मी या ग्रूपमध्ये आले. त्याबद्दल अल्पनाला आणि मायबोलीला खरंच खूप थँक्स, कारण मला हे काम करायला आणि इतरांचे काम बघायला खूप मजा आली!
HDA2014_selfportrait_Ashwini.png
अश्विनी के
नमस्कार. चित्रकलेची अगदी लहानपणापासून आवड आहे. कॉलेजपर्यंत चित्र काढणे चालू होते. नंतर कित्येक वर्षं, चित्रकला माझ्या आयुष्यात होती ह्याचाच विसर पडला होता. ह्यावर्षी मायबोलीवर श्री अजय पाटील ह्यांनी जलरंग कार्यशाळा सुरु केली आणि माझी ती सुप्त आवड वरचे काळाचे थर दूर करुन पुन्हा बाहेर डोकावली. त्या कार्यशाळेमुळे पुन्हा पेन्सिल आणि रंगांना चित्र काढण्यासाठी हात लावला व लागलीच "ह्यावर्षीच्या हितगुज दिवाळी अंकासाठी रेखाटन करशील का?" अशी विचारणा संपादकांतर्फे झाली. मायबोलीप्रती एक कृतज्ञता म्हणून मागचा पुढचा विचार न करता "हो" म्हणून टाकलं आणि लागतील तशी रेखाटने करण्याचा प्रयास केला आहे. मायबोली आणि तुम्हा सर्व मित्र मैत्रिणींची मी खूप आभारी आहे.
HDA2014_selfportrait_AjayP.png
अजय पाटील
मी अजय. माझ्याबद्दल चित्रकार म्हणून सांगण्यासारखे फार काही नाही. जलरंगाची आवड आहे. त्यामुळे स्वतः शिकत गेलो. चांगल्या चित्रकारांचे मार्गदर्शन लाभले. त्यांतून काही प्रदर्शने भरवण्याइतका पल्ला गाठला. काही महिन्यांपूर्वी 'इंडियन टॅलेंट मॅगझिन'ने 'टॅलेंट' म्हणून माझ्यावर फीचर केले.
HDA2014_Selfportrait_Nalini.jpg
नलिनी
डोळे, नाक, कान काहीच दिसत नाहीत, तरीही वारली चित्रांतल्या भावना, आनंद, कामातली मग्नता, हावभाव असे काहीच काहीच लपून राहात नाहीत. चित्र चितारायला सुरुवात केली की, माणूस वेगळ्याच दुनियेत प्रवेश करतो. तिथे चिंता, काळजी, क्रोध, मत्सर कशाकशाला जागा नसते. अगदीच स्वतःला हरवून बसतो म्हटले, तरी वावगे ठरणार नाही. हीच स्थिती प्राप्त करण्याला आपण मेडिटेशन म्हणतो ना?
HDA2014_selfportrait_Hims.png
हिम्सकूल
साधारण दीडएक वर्षांचा असल्यापासूनच रेघोट्या मारायला सुरुवात सगळेच जण करतात, पण तेव्हा काढलेले एक चित्र 'मी मासा काढला आहे' असे सांगितल्यामुळे आईने जपून ठेवले आहे. कदाचित चित्रकलेची आवड तेव्हापासूनच असावी. घरात आजोबा उत्तम चित्र काढत असल्याने कालांतराने त्यांच्याकडे बघूनबघून हळूहळू चित्र काढणे सुरू झाले. एलिमेंटरी-इंटरमिजीएट झालेच पाहिजे, असे आजोबांचे म्हणणे असल्याने सगळ्यांबरोबर आठवीत पहिली परीक्षा तर दिली, पण दुसरी परीक्षा द्यायला थेट अभियांत्रिकीचे पहिले वर्ष उजाडले. तेव्हा महाविद्यालयात शिकत असताना बर्‍यापैकी चित्रकला चालू होती. अक्षरे वेगवेगळ्या पद्धतींत लिहून बर्‍याच वह्यांची मागची पाने भरवत असल्यामुळे मित्रांनी फॉण्टसिंग असेच नाव पाडले होते. नंतर खंड पडला, पण हितगुज दिवाळी अंकात चारपाच वर्षापूर्वी एक चित्र काढून दिले होते, तेव्हापासून परत एकदा थोडीफार चालना मिळाली. नोकरीच्या ठिकाणी तसा चित्रकलेशी काडीमात्र संबंध येत नाही, पण वडिलांच्या व्यवसायात मात्र रोजच चित्रकला असते. त्यामुळे फोटोशॉप आणि कोरल या दोन सॉफ्टवेअर्सचा फारच जवळून संबंध येतो, आणि जोडीला विलकॉम हे संगणकीय भरतकाम करण्यासाठी उपयुक्त सॉफ्टवेअरही वापरतो. सध्यातरी कुठलेच माध्यम वर्ज्य नसल्याने जलरंग, खडू, रंगीत पेन्सिल वापरणे जमेल तसे चालू असते.
HDA2014_sameer_kibey.png
समीर किबे
समीर किबे हे मूळचे नाशिकचे असून सध्या पोर्टलंड, ऑरेगॉन येथे वास्तव्यास आहेत. समीर व्यवसायाने सॉफ्टवेअर इंजिनीयर आहेत. याव्यतिरिक्त त्यांना हास्यचित्रे, व्यंग्यचित्रे आणि रेखाटने काढण्याची आवड आहे.
HDA2014_selfportrait_supriya.jpg
सुप्रिया पैठणकर-काळे

या मूळच्या पुण्याच्या असून सध्या अटलांटा, जॉर्जिया, येथे वास्तव्यास आहेत. अभिनव कला महाविद्यालयातून त्यांनी चित्रकलेचे शिक्षण घेतले आहे. म्यूरल्स् - वॉल पेंटिंगपासून ते पेन आणि शाई व मेंदी यांसारख्या माध्यमांत त्यांना काम करायला आवडते. 'क्ले ऑन वूड' व फ्रेमलेस आर्ट ही त्यांची खासियत आहे व कलेला रंग-रेषांच्या चौकटीत बांधून न ठेवता तिला बघणार्‍याच्या कल्पनाशक्तीबरोबर वाहू द्यावे, हा त्यामागचा विचार आहे. त्यांचे काही काम आपण त्यांच्या www.artbysk.com या संकेतस्थळावर पाहू शकाल.



विशेष आभार-
अ‍ॅबस्ट्रॅक्ट दिवाळी - अ‍ॅड. स्वाती दीक्षित
डिजिटल चित्रे - प्राजक्ता पटवे-पाटील
पानांच्या चौकटीवरील नक्षी, खलिता- अश्विनी के, या चित्रांचे संगणकीकरण- प्राजक्ता पटवे-पाटील
पारंपरिक मराठी दिवाळी - अजय पाटील, मिनोती
मुखपृष्ठ रेखाचित्रे - सुप्रिया पैठणकर-काळे
मुखपृष्ठावरील नक्षी- मिनोती
मुशोकार रेखाचित्र - तेजस मोडक
मेंडकेची रेखाचित्रे - प्रश्न क्र. १ ते ११- कंसराज, प्रश्न क्र. १२- मिनोती
रांगोळ्या - मिनोती, अश्विनी के, डॅफोडिल्स, शिल्पा
लहान मुलांची दिवाळी - सृष्टी शहाजी चव्हाण
वारली शैलीतली दिवाळी - नलिनी
व्यंग्यचित्रे - समीर किबे
संपादक चमूची रेखाचित्रे - मैत्रेयी
साहित्याच्या अनुषंगाने रेखाटने - डॅफोडिल्स, अल्पना, अश्विनी के, कंसराज, मिनोती, गजानन
संपादकीय पानावरील सुलेखन - पल्ली
सुलेखन इतरत्र - हिम्सकूल
हेडरमधली दीपावली चौकट आणि सुलेखन - अश्विनी के

related1: 
हितगुज दिवाळी अंक २०१४- एक झलक

प्रतिसाद

ह्यात वरील सगळ्यांची सेल्फ पोर्ट्रेट्स आणि ओळख नाही आली. अ‍ॅड. स्वाती दिक्षित, तेजस मोडक, शिल्पा, सृष्टी शहाजी चव्हाण, समीर किबे, मैत्रेयी कुठे आहेत?