मेंडकेचा सल्ला

कितीही प्रयत्न केला तरी माझ्या स्टेटस अपडेटला, माझ्या फोटोंना फेसबुकावर लाइक्स् मिळत नाहीत, याचा मला खूपच न्यूनगंड आला आहे. लाइक्स् वाढवण्यासाठी काय करू?

अरेरे ! तुम्हीसुद्धा या प्रश्नाच्या जाळ्यात अडकलातच का? अभिनेत्यांपासून नेत्यांपर्यंत आणि खायच्या सिरिअलपासून ते बघायच्या सिरिअल्‌स्‌पर्यंत सगळेच या व्याधीनं ग्रस्त आहेत. लाइक्स् वाढवण्यासाठी काय करू? डराव!तुम्हांला सांगते, इंद्राच्या दरबारातही सगळ्यांत जास्त लाइक्स् कोणत्या अप्सरेला मिळतात, यावर त्या अप्सरेचा, एआरपी म्हणजेच ‘अप्सरा रतिनैपुण्य पसंतीगुण’ अवलंबून असे. या एआरपीच्या नादातच तर… डराव… असो. सांगायचा मुद्दा हा की, तुमची वेदना मला परिचित आहे. खरंतर… तुम्हांला कदाचित हे वाचून आनंद होईल की, अखिल सजीवांची हीच आद्य वेदना आहे.… माय ब्रह्मी! लवकरच ही सगळ्या बेडकांचीही आद्य वेदना असणार आहे…… डराव!!

HDA2014_Mendaka_reading.gif

तर लाइक्स् वाढवण्यासाठी काय करायचं? सतराशे सहासष्ठ कहाण्या एकशे अठ्ठेचाळीस शब्दांत संपावायच्या या काळात हे काही उपाय. खरं सांगायचं तर माझ्या रसिक वाचकांनी हे उपाय सुचवले आहेत, ते करून बघा…

रिया म्हणतात, “पन्नासेक डुप्लिकेट आयडी काढा आणि स्वतःच लाइक्स् आणि कमेंट्स् करायला सुरुवात करा. पन्नासच्या वर लाइक्स् मिळालेला फोटो दिसला की लाज वाटून लोक लाइक्स् देतातच.”

तर अमित एक डिव्हाईन उपाय सांगतात तो असा - “नियमित पहाटे उठून 'लाइक'बॉय साबणाने अंघोळ करून लॅपटॉपवर फेसबुकाची खिडकी उघडून तीसमोर 'ओम र्‍हिम क्लिम फेसबुकाय लाइक्सवृद्धी नमः' हा मंत्र १०८ वेळा म्हणा.”

आता या तंत्रानं वा सांगितलेल्या मंत्रानं जर फरक पडला नाही, तर आमचे अजून एक वाचक असामी यांनी मारलेला डायलॉग “Facebook is for old people. Cool people do not use Facebook any more” हा समोरच्याला ऐकवायला विसरू नका! तसंही मराठी बोलताना साहेबाच्या भाषेत काहीतरी तात्त्विक ऐकवणं हे अस्सल मराठीपणाचं लक्षण आहे आणि म्हणूनच याला मात्र भरपूर लाईक्स् मिळतील…

तर वाचकहो, आठवलं म्हणून एक गोष्ट शेअर करते आहे. जर तुम्हांला स्वर्गातल्या गॉसिपमध्ये इंटरेस्ट असेल, तर माझं ‘एक स्वर्गीय डबके’ हे आत्मचरित्र नुकतंच प्रकाशित झालं आहे. मायबोलीच्या खरेदीविभागात माझी स्वाक्षरी असलेल्या प्रती पाच टक्के सवलतीत मिळतील. ते जरूर विकत घ्या आणि हो, त्याला फेसबुकावर लाइक करायला विसरू नका! ड्राव!


अंघोळ करणे म्हणजे पाण्याचा अपव्यय करणे, असे मला वाटते. वाढत्या जागतिक लोकसंख्येमुळे भविष्यातील पाणीटंचाईवर उपाय काय? काही पर्याय सुचवाल का?

माय माय ब्रह्मी! हिमालयावर डोकं ठेवून विश्वाची चिंता करणारी तुमच्यासारखी माणसं बघितली की, माझ्या स्वार्थी फिफ्थ अव्हेन्यू, लुई व्हिताँ यांच्या आशेवर धावणार्‍या मनाला पुण्याचा लकवा बसतो. अंघोळ केल्यानं लोकसंख्या वाढते आणि लोकसंख्या वाढली तर अंघोळ करता येणार नाही आणि अंघोळ नाही केली तर लोकसंख्या न वाढून समस्त मानवजातच नामशेष होईल की काय, या भीतीनं तुम्ही आत्ताच उपाय शोधत आहात. मोकळा नळ टू यू! माय फ्रेंड, मोकळा नळ टू यू. इतक्या मोठ्या व्यामिश्र प्रश्नाचं उत्तर देणं माझ्या आवाक्याबाहेरचं आहे. जीएंच्या शब्दात बोलायचे तरी माझी मेंडकेची उडीही उत्तरापर्यंत पोहोचेपर्यंत म्हातारी होऊन जाईल. वेट अ मिनिट … मला राहून राहून असं का वाटतंय की, मला जे समजलं आहे, ते खरंतर मला अजिबात समजलेलं नाही आणि जे न समजलेलं आहे, तेच खरंतर तुम्ही विचारलं आहे… ड्राव !! ब्लेम इट ऑन हँगोव्हर.

HDA2014_Mendaka_shef.gif

पण अंघोळ हा पाण्याचा अपव्यय आहे? वाह! डराव! कसं बोल्लात! द्या ट्टाळी! अहो, मलाही अंघोळ करणं म्हणजे पाण्याचा अपव्यय वाटतो. पण माझं कसंय किनै, माझ्याकरता ही सोय आपोआपच झालीये. मी माझ्या दुसर्‍या रूपात असते ना, त्यावेळी पाण्यात चिक्कार डुबक्या मारते. पण तुमच्याकरता काही उपाय आहेत माझ्याकडे.

एक म्हणजे मायबोलीवर ववि असतो ना, त्यात नाव नोंदवत जा दरवर्षी! अगदी हसतखेळत अंघोळीची खात्री. अधेमधे कधी अंघोळीची अनावर हौस दाटून आलीच, तर मायबोलीवरच्या काव्यपाणपोईवर जा. चार-दोन शिंतोडे नक्कीच अंगावर पडतील. त्यातूनच तुम्हांलाही कधी कविता सुचली, तर मग काय गटांगळ्या खाता येतील. त्यातूनही अगदीच 'सहनही होत नाही अन् सांगताही येत नाही' अशा लेव्हलची अंघोळीची तहान लागली, तर कोणा तयारीच्या आयडीशी वाद उकरून काढा. तो तुमचा जो काही 'पाण'उतारा करेल, त्यात तुमच्या अख्ख्या खानदानाची अंघोळ होईल. सल्ला मागितल्याबद्दल ड्रांवड्रांवड्रांवड्रांव. ड्रांवड्रांवड्रांव! ड्रांवड्रांव ड्रांवड्रांवड्रांवड्रांव ड्रांवड्रांव ड्रांवड्रांव ड्रांवड्रांवड्रांव! *

त.टि. * तेवढ्यात मेंडकेची बेडूक बनण्याची घटिका आली आणि ती त्या रूपात गेली. त्यामुळे सल्ल्याच्या शेवटच्या भागाचे भाषांतर देत आहोत - धन्यवाद. अरेच्चा! माझ्या अंघोळीची वेळ झाली वाटतं! [मामी]

(मेंडका) सॉरी हं, उत्तरे देताना अचानक मेटामॉर्फ झाले, म्हणून मला पूर्ण कल्पना नाही की, दिलेली उत्तरं तुमच्या प्रश्नाचीच आहेत का ते! पण जर तसं नसेल, तर दोन दिवसांत मला या उत्तरांसकट काँटॅक्ट करा. मी त्या उत्तरांना साजेसे प्रश्नही पाठवीन… माझी रिटर्न पॉलिसी खूपच लिनियंट आहे!

related1: 
हितगुज दिवाळी अंक २०१४- एक झलक