गुलज़ार आणि चंद्र

चाँद की बिंदीवाली.. बिंदीवाली रतिया...

गुलज़ारचं 'रात, चाँद और मैं'.. यावेळी घेऊन जायचंच या हट्टातून गेल्यावर्षी मी निघायच्या आदल्या दिवशी 'किताबमहल'पासून 'पीपल्स बुक हाऊस' व्हाया 'क्रॉसवर्ड' वणवणत फिरले होते. कुठेच मिळालं नाही. संध्याकाळी मित्राचा मेसेज आला की इन्फिनिटीच्या 'लॅन्डमार्क'मध्ये साडेसातच्या आत ये. येच. संध्याकाळच्या त्या वेळेला तिथल्या ट्रॅफिकमधे उडी घेणे वेडेपणाचे हे माहीत असूनही का-कशाला काही एक न विचारता एका अंत:प्रेरणेवर विसंबून निघाले. पोचले तेव्हा साडेआठ वाजत आले होते. लॅन्डमार्कमधे अगदी शेवटच्या टोकाला मोजकी गर्दी होती आणि मधोमध एका सोफ्यावर गुलज़ार बसले होते. सोबत मेघना गुलज़ार. 'चाँद परोसा है..' च्या म्युझिक अल्बमचं प्रमोशन होतं. कार्यक्रम संपत आला होता आणि गुलज़ारजी शेवटची कविता वाचून दाखवत होते..

रोज आता है ये बहरुपिया, इक रूप बदलकर
रात के वक्त दिखाता है, 'कलायें' अपनी,
और लुभा लेता है मासूम से लोगोंको अदा से!
पूरा हरजाई है, गलियोंसे गुजरता है, कभी
छत से, बजाता हुआ सीटी-
रोज आता है, जगाता है, बहुत लोगोंको शब भर!
आज की रात उफ़क़ से कोई,
चाँद निकले तो गिरफ़्तारही कर लो!!

गुलज़ारचा चंद्र असा नेहमीसारखाच रुप बदलत, वेळ चुकवत पण तरी मन ओळखत अचूक सामोरा आलेला..
पांढरा शुभ्र कुर्ता पायजमा, कडक स्टार्च केलेला आणि त्यामुळे पाठीवरुन चुण्या पडत किंचित वर उचलला गेलेला. तपकिरी मऊसर केस आणि जाड काचांचा काळ्या काड्यांचा चष्मा- त्यांच्या त्या नेहमीच्याच फोटोमधल्या लकबीत कविता वाचत असताना बरेचदा हातामधेच धरलेला.. आणि माझी नजर खिळली गेली ती या सगळ्या त्यांच्या परिचित साधेपणाला जबरदस्त छेद देणार्‍या सोनेरी, भरजरी, अगदी जोधा-अकबरमधून उचलून आणल्यात असं वाटणार्‍या त्यांच्या पायातल्या त्या राजेशाही मोजड्यांवर. तो एक अजब प्रकार होता. साधा शुभ्र कुर्ता पायजमा आणि पायातल्या देखण्या सोनेरी जयपुरी मोजड्या. त्यांवरचं ते चंदेरी टिकल्यांचं वर्तुळ. छोट्या छोट्या चंद्रांनी पायातळी फेर धरलाय असं वाटायला लावणारं..

स्टाईल स्टेटमेन्टच आहे गुलज़ारजींचं हे. मित्र सांगत होता.

बाजूला मांडलेल्या चहाच्या टेबलाच्या दिशेने गुलज़ारांच्या त्या पायातल्या मोजड्यांवरचे ते चमचमते चंद्र नजरेसमोरुन फिरत गेले आणि मित्राने हातात ठेवलेलं 'चाँद परोसा है..' न्याहाळत त्याला शेवटी म्हणूनच टाकलं मघापासून मनात येत असलेलं, 'गुलज़ारचे चंद्र असे वणवण शोधत फिरत बसायची खरोखरच गरज नसते हे कधी कळणार मला?'

ते नेहमीच असे अचानक सामोरे आलेत. कुठल्याही रस्त्याच्या टोकावरुन.. एकात एक गुंतून परत आपल्यापर्यंत येऊन पोचणार्‍या वळणदार रस्त्यावरुन.. त्याचे रस्तेच तर मुळी 'चाँद से होकर सडक जाती है..' असे. आणि या अशा सडकांवरचे कुठल्याही ऋतूतले गुलज़ारचे चंद्र कधी नजरेआड होऊच न शकणारे.. झालेच तर खुशाल शोध घ्यावा..

रात के पेड़ पे कल ही तो उसे देखा था
चाँद बस गिरने ही वाला था फ़लक से पककर
...सूरज आया था, जरा उसकी तलाशी लेना
असं म्हणत.

गुलज़ारच्या चंद्रांना सामोरे यायला कधी कोणते ऋतूही लागत नाहीत. परदेशात 'सीली हवा' अंगाला स्पर्शत असताना नीली नदी के परे, गिला सा चाँद सहज भेटून गेला होता यात काही नवल नाही पण कधीच विसरणार नाही असा अचानक भेटलेला गेल्या वर्षीचा दिल्लीचा तो 'पतझडका चाँद..'

पाऊण तास धुरकटलेल्या ट्रॅफिकमधे काढल्यावर एकदाची मोकळ्या रस्त्याला गाडी लागली होती आणि हायसं वाटून ताजी, मोकळी हवा घायला काच खाली केली तेव्हा रस्त्याकडेच्या झाडांतून तो चंद्र एकदम आतच घुसला.

आत आला खरा पण मनात भरला नाही. एकतर झाडं अजून बिनापालवीची, काटकिट्या फांद्यांची आणि त्यातून बाहेर पडलेला चंद्रही निस्तेज पिवळा. गुलज़ारच्या त्या पीपल के सूखे पत्ते सा कमजोर चाँद .. मला हा त्याचा एकमेव चंद्र जो कधीच आवडलेला नव्हता. त्याच्या 'पुखराज'मध्ये आहे तो..

जब जब पतझडमें पेडोंसे पीले पीले पत्ते
मेरे लॉन में आकर गिरते हैं
रातको छतपर जाके मैं आकाश को तकता रहता हूं
लगता है क़मजोरसा पीला चाँद भी शायद
पीपल के सूखे पत्ते सा
लहराता-लहराता मेरे लॉनमें आकर उतरेगा..

म्हटलं दिल्लीच्या प्रदूषणाने चंद्रालाही सोडलेलं दिसत नाही. त्यावर सोबत असलेल्या पांडेने तत्परतेने ऐकवलं होतं, "अरे, यह तो पतझडका चाँद है. ऐसाही दिखता है. अब बसंतपंचमी के बादही इसका पीलापन कम होने लगता है" आणि मग खरंच दिल्लीच्या त्या पानगळीच्या शिशिरामधला फिक्का निस्तेज पिवळा चंद्र क्रमाक्रमाने उजळत जात फाल्गुन पौर्णिमेला लख्ख चांदीसारखा चमकत आकाशभर भरुन राहिलेला पाहिला आणि 'पतझडच्या चंद्रा'ची कन्सेप्ट लक्षात आली.

१९६३ साली बिमलदांच्या बंदिनी नावाच्या कृष्णधवल कवितेसाठी गुलज़ारने पहिल्यांदा आपले शब्द उसने दिले तेव्हा मी कोणत्यातरी मागच्या जन्मात होते. नूतनच्या सावळ्या चेहर्‍यामागून उगवणारा तो त्याचा पहिला चंद्र..

बदली हटाके चंदा, चुपकेसे झाँके चंदा
तोहे राहू लागे बैरी, मुस्काये जी जलायके

असं गुणगुणत मोरा गोरा अंग लैले.. च्या मोहक लडीत लपेटत मी सोबत या जन्मामधे घेऊन आले..

वाटेतल्या प्रवासात
एक बूँद है चंदा की, आकाश समंदर मे
दो हाथों की ओस मिली
गिर पडता तो क्या होता
हाथोंमे ख़ुदा होता..
ची सोबत होती

बहुत बरस जब गुजर गये
और लाख चाँद जब उतर गये
म्हणत आता गुलज़ारच्याच उम्रसे लंबी सडकोंपर प्रवास करत पोचले आहे 'ओंकारा'मधल्या 'नमक इश्क़ का'च्या सुरुवातीच्या 'मैं चाँद निगल गयी' पर्यंत. ते ऐकताना या चंद्रावर कधी गुलज़ारच्या पंचावन्न वर्षांच्या प्रवासाच्या सुरकुत्या पडलेल्या मला दिसत नाहीत.

मधली 'एकसो सोलह चाँदकी रातें' कधी गुजरलीच नाहीयेत जणू.
गुजरणार तरी कशी? निघायची वेळ जवळ आली की त्याची ती कातर विनवणीच कानावर पडते आणि रात्र थांबून राहते.. आहे तिथेच चंद्रालाही थांबवून ठेवत..
तुम जो कह दो तो आजकी रात चाँद डूबेगा नहीं..
रात को रोक लो...
रात की बात है और ज़िंदगी बाकी तो नहीं..

ती जाऊ नये म्हणून चंद्रालाच अडवू पहाणार्‍या रात्रीतला तो.. तिच्यावाचून 'दिन खाली खाली बर्तन है और रात है जैसे अंधा कुंआ' म्हणणारा तो.. रात्र, चंद्र आणि त्याच्यातलं सनातन नातं गुलज़ारने इतकं सुरेख फुलवत ठेवलेलं आहे!

गुलज़ारचे चंद्र कधीच एकेकटे नसतातच. सोबत कायम त्या रातभर काजल जले.. वाल्या ख़्वाबोंके दिये जळवणार्‍या रात्री असतातच. फ़िर वही रात है.. म्हणत आपण फक्त ते कांच के ख़्वाब सांभाळायचे असतात आणि
रोज अकेली आये रोज अकेली जाये
चाँद कटोरा लिए भिखारन रात
च्या चकित करुन सोडणा-या शब्दकल्पनांना दाद द्यायची असते.

गुलज़ार काळजाच्या आत घुसणारं असं कितीही लिहून जात असेल जसे की 'जीने के लिये सोचा ही नहीं - दर्द सम्हालने होंगे'..
पण या माणसाची पोएट्री खरी बहरते ती चंद्र आणि रात्रीच्या संदर्भातच. त्याचं ते एक अफलातून नाही का...
डोरियोंसे बाँध बाँध के
रात भर चाँद तोडना
ये मुझे क्या हो गया?
क्या बात है?
हे असलं लिहावं ते ह्यानेच आणि ते सुद्धा एक...

एक ख़्वाब लें.. एक ख़्वाब दें..
नींद का सौदा करें..
किती साधं आणि तरी सेन्शुअस हे सगळं गाणंच! रात्र, ख़्वाब, नींद आणि त्यात गुंफलेला तो चंद्र..

नींद का सौदा करें..
एक ख़्वाब तो आँखोमें है
एक चाँद तो तकिये तले..

पिढ्या बदलल्या अणि गुलज़ारचा चंद्रही किती अलगद नव्या जमान्याचा झाला!

मैं एक सदीसे बैठी हूं, इस राहसे कोई गुजरा नहीं
कुछ चाँदके रथ तो गुजरे थे, पर चाँदसे कोई उतरा नहीं..
अस एका जमान्यात सहज लिहून जाणारा हा माणूस आता 'गुरू'मध्ये 'लोडशेडिंग में चाँद जलायें' म्हणतानाही किती तितकाच सहज वाटतो!

त्याचे ते सारेच पूर्वीचे चंद्र मन लुभावणारे आहेतच, पण..
चाँद का टीका मथ्थे लगाके
रातदिन तारोंमें जीना-वीना ईझी नही!

किंवा
शामको खिडकीसे चोरी चोरी नंगे पाँव येणारा आत्ताचा चाँदसुद्धा किती या जमान्यातला.. अनयुजुअल, पण तितकाच टवटवीत दिसतोय.

गुलज़ार कायमच स्वत:च्या कवितांमधून डोकावणारं चंद्रप्रतिमांचं आपलं वेड दिलखुलासपणे मान्य करतात. अगदी स्वत:च्या आयुष्याबद्दल बोलतानाही 'कभी चाँद की तरह चमकी अठन्नीसी ये ज़िंदगी' असं सहज लिहून जातात. आपण 'प्रेमात पडलो होतो तेव्हाच्या दिवसांतल्या माझ्या कवितेतला चंद्र अत्तराच्या गुलाबी फायासारखा अजून दरवळतो..' असे ते म्हणतात तेव्हां त्यांची ती त्या दिवसांतली अप्रतिम कविता अपरिहार्यपणे आठवतेच..

चौदहवी रात के इस चाँदतले
सुरमई रातमें साहिल के करीब
दूधिया जोडेमें आजाये जो तू
इसा के हाथोंसे गिर जाये सलीब
बुद्ध का ध्यान चटख जाये, कसम से
तुझको बरदाश्त न कर पाये खुदा भी
दूधिया जोडे में आ जाये जो तू
चौदहवी रात के इस चाँद तले..

या कवितेचा शेवट मात्र मावळून परत न उगवलेल्या चंद्ररात्रीची उदासी मनभर पसरवत रहातो..
कहाँ छुपा दी है रात तूने
कहाँ छुपाये हैं तूने अपने
गुलाबी हाथों के ठंडे फ़ाये
कहाँ हैं तेरे लबों के चेहरे
कहाँ है तू आज? कहाँ है??
... ये मेरे बिस्तर पे कैसा सन्नाटा सो रहा है?

मुलीच्या जन्मानंतर परत गुलज़ारना आठवला तो हाच चंद्र. पण आता मात्र तो एका वेगळ्याच रुपातला- हळवा आणि काळजी वाहणारा.. त्यांच्या 'बोस्की के लिये'मधला..
कुछ ख़्वाबोंके खत इनमें, कुछ चाँदके आईने,
सूरजकी शुआएँ है
नजमोंके लिफ़ाफ़ोंमें, कुछ मेरे तजुर्बे हैं,
कुछ मेरी दुआएँ हैं
निकलोगे सफ़र पर जब, यह साथमें रख लेना,
शायद कहीं काम आएं..

त्यांचा तो मिश्किल,मस्तीखोर चाँद सुद्धा असाच बालपणातल्या खुणा माथ्यावर वागवणारा. बोस्कीसोबत मोठा होत जाणारा..
चाँद के माथेपर बचपनकी चोट के दाग़ नजर आते हैं
रोडे,पत्थर और गुलेलोंसे दिनभर खेला करता था
...बहुत कहा की आवारा उल्काओं की संगत ठीक नहीं

खूप नंतरचा त्यांच्या त्रिवेणीमधला चंद्र मात्र वेगळा- ह्रदयाकडून पोटातल्या भुकेकडे उतरलेला:
माँने जिस चाँदसी दुल्हनकी दुआ दी थी मुझे
आजकी रात वह फुटपाथसे देखा मैंने
... रात भर रोटी नजर आया है वो चाँद मुझे!

गुलज़ारच्या चंद्रांना ओलांडल्याशिवाय प्रवास संपूच शकत नाहीत. रस्त्यांच्या मधोमधच ठेवून जातो तो त्याचे चंद्र. आणि मग कितीही हट्ट दाखवला की नाही बघणार, तरी मग ठोकर लागते ती त्याचीच:
क्या बतायें के जाँ गयी कैसे
फ़िरसे दोहरायें वो घड़ी कैसे
किसने रस्ते में चाँद रख्खा था
मुझको ठोकर वहाँ लगी कैसे...

तक्रार करुन वर आपणच म्हणायचं असतं मग:
हम तो अब याद भी नहीं करते
आपको हिचकी लग गयी कैसे?

'गुलज़ारचे चंद्र भारीच हळवे .. रोमॅन्टिक वगैरे.. प्रेमात पडलेल्यांसाठी ठीक आहेत' म्हणणार्‍यांनासुद्धा आपले शब्द मागे घेत चाँद चुभ जायेगा उंगलीमें तो खून आ जायेगा असं म्हणणं भाग पडतं, जेव्हा त्यांचा तो शब का व्यापारकरणारा चंद्र भेटतो- नको असतानाही..
सितारे चाँद की कश्तीमें रात लाते हैं
सहरके आनेसे पहले बिक भी जाते हैं
... बहुत ही अच्छा है व्यापार इन दिनों शबका!

हजारो जण रोज चंद्र पहात असतात.. हजारो चंद्र आजपर्यंत उगवलेलेही असतात. असंख्य शायर आणि कवी त्यावर लिहीत असतात. मग असं काय आहे गुलज़ारच्या चंद्रामधे की सारा दिन आपण हाथ में खाली कासा घेऊन बसतो की कधी ही रात गुजरेल आणि चाँद की कौडी त्यात पडेल..

का हाच एक चंद्र चोरून प्रेमिकांना चर्चच्या मागे जाऊन लपून बसण्याचा मोह व्हावा?

कधीतरी पावसाळी दुपारी 'इजाज़त' पाहिलेला असतो.. त्यातल्या सूखे पत्तेकी तरह गलेसे लिपटनेवाल्या महेनच्या खांद्यावरच्या तिळामधे एकशे सोळा चंद्रांच्या रात्री मायाबरोबर आपणही मोजलेल्या असतात.. चलो ना चाँद की कश्ती में झील पार करें.. असं तिच्याबरोबरच आपणही त्या ओल्या झिमझिमत्या दुपारी म्हटलेलं असतं.. मग नंतर सोबत करायचे कधीच विसरत नाहीत गुलज़ारचे हे अर्ध्या रात्रीचे पूर्ण चंद्र किंवा रात्रीतले अर्धे चंद्र...

निघून गेलेला तो जेव्हा जेव्हा तिकडे म्हणतो-
लाख दिन हुए हैं रात को
आधे चाँदसे तेरी बाते किये...

तेव्हा तेव्हा आपल्याकडूनही नकळत जवाब निघून जातो:
इक इक बात याद है आधी रात के
पूरे चाँद को, जागते हुए भी हो ख्वाब में ...

सदियाँ उलटून गेल्या.. जमाने बदलले.. ऋतू तर रोज बदलले.. रस्तेही वेगळे झाले पण रस्त्यांवरची पावलं तीच राहिली.. कुछ चुस्त कदम.. कुछ तेज कदम.. फक्त तिच्यापर्यंत जाऊनच ते रस्ते संपत राहिले.. गुलज़ारचे रस्ते आणि त्यावरुन पुकारणारा त्याचा तो... तुम्हारा इंतजार है..तुम पुकार लो.. ख़्वाब चुन रही है रात, बेकरार है.. म्हणत रहाणार्‍या आवाजातली आर्तता मात्र नाहीच बदलली.. नाही बदलल्या त्याच्या रात्री आणि रात्री उगवून येणारे चंद्र.. मग असं वाटतं खरं कुठे काय बदललंय? आज सुद्धा गुलज़ारचा चंद्र उगवताना..
कुछ ऐसी एहतियातसे निकला है चाँद फ़िर
जैसे अंधेरी रातमें खिडकीपे आओ तुम
-- क्या चाँद और ज़मीं में भी कोई खिंचाव है?

असा प्रश्न पाडत राहतोच आहे. गुलज़ारचा चंद्र रोज उगवताना नवी नजर बहाल करुन जातो आहे..

सोळाव्या शतकातला झेन कवी बुनान अजून वेगळं काय लिहून गेला होता?
अजून तसाच आहे तो जुना चंद्र
फुलं अगदी पूर्वी होती तशीच
पण मी स्वत:च आता
या मला दिसणार्‍या गोष्टींचा झालोय..

गुलज़ारचे चंद्र गुलज़ारसारखेच खरं तर. साधेसुधे, नेहमीचेच तर आहेत असं वाटता वाटता धिस मून.. जस्ट वन.. असं म्हणायला भाग पाडणारा गुलज़ार.. कळताकळताच अनाकलनीय बनून जाणारा.. आपण फक्त रोज उठून इतकंच म्हणायचं असतं..
रोज उठकर चाँद टांगा है फ़लक पे रात को
रोज दिन की रोशनी में रात तक आया किये
.. हाथ भर के फ़ासले को उम्र भर चलना पडा..

गुलज़ारच्या चंद्रांविनाही रात्री उगवल्याच कधी तर त्याचा शिकवा काय आणि कोणाकडे करायचा? पण त्या रात्रींना रात्र तरी का आणि कसं म्हणायचं?

- tulip