अशी पाखरे येति

अशी पाखरे येती, आणिक स्मृति ठेवुनी जाती
दोन दिसांची रंगतसंगत, दोन दिसांची नाती ॥ ध्रु ॥

चंद्र कोवळा, पहिला वहिला, झाडामागे उभा राहिला
जरा लाजुनि, जाय उजळुनी, काळोखाच्या राती ॥ १ ॥

फुलून येता फुल बोलले, मी मरणावर हृदय तोलले
नव्हते नंतर, परी निरंतर, गंधित झाली माती ॥ २ ॥

हात एक तो हळु थरथरला, पाठीवर मायेने फिरला
देवघरातिल समईमधुनी, अजून जळती वाती ॥ ३ ॥

कुठे कुणाच्या घडल्या भेटी, गीत एक मोहरले ओठी
त्या जुळल्या हृदयांची गाथा, सूर अजुनही गाती ॥ ४ ॥

गायक/गायिका: 
सुधीर फडके
संगीतकार: 
यशवंत देव
गीतकार: 
मंगेश पाडगांवकर
अधिक टिपा: 
या गाण्याचे शब्द, चाल आणि गायन याची जादू अशी आहे कि, हे गाणे तूम्ही त्या सूरांचा आधार घेतल्याशिवाय वाचूच शकत नाही.