संपादकीय

नमस्कार,

मराठीतून पहिला दिवाळी अंक निघाला त्याला यंदा शंभर वर्षे पूर्ण होतील. या शंभर वर्षात दिवाळी अंक म्हणजे मराठीचं व्यवच्छेदक लक्षण झालं आहे. जगाच्या कानाकोपर्‍यात पसरलेल्या मराठी माणसांच्या घरात फराळ, फटाके अन कंदील या जोडीने दिवाळी अंक हवेतच. निदान अंकांच्या आठवणी काढल्याखेरीज दिवाळी साजरी होत नाही. या शतकमहोत्सवी वर्षात मायबोलीचा नववा दिवाळी अंक आपल्यासमोर ठेवताना आम्हाला अतिशय आनंद होत आहे.

आपली मायबोली गेल्या दहाबारा वर्षात आमूलाग्र बदलली. या काळात जगभरातल्या मराठी माणसांच्या आयुष्यातही अनेक बदल घडले, येत्या दहाबारा वर्षात अजूनच वेगाने बदल होत राहतील. काळाच्या ओघात मराठी माणसाची, भाषेची, साहित्याची, कलांची परिस्थिती कशी कशी बदलतेय हे पाहणं रोचक आहेच. पण येत्या काही वर्षांत काय परिस्थिती राहील याचा विचार करणं देखील रोमांचक आहे. या संकल्पनेवर आधारित साहित्य 'स्थित्यंतर'मध्ये वाचायला मिळेल.

यावर्षीचे मुखपृष्ठसुद्धा हे स्थित्यंतर सूचित करणारे आहे. सुलेखन केलेल्या ओळी मराठीच्या वैभवाची ग्वाही देणार्‍या आहेत. या जुन्या, सुपरिचित ओळी सुलेखित स्वरुपात मायबोलीच्या पूर्णपणे ऑनलाईन अंकाच्या मुखपृष्ठावर विराजमान होणे म्हणजे जुन्या-नव्याचा समसमासंयोगच!

जुने ते सोने ही म्हण अन् जुने जाउ द्या मरणालागुनि ही कविता यांत सांगड कशी घालावी हा प्रश्न प्रत्येक सुजाण व्यक्तीला पडत असणार. गेल्या पंधरा-वीस वर्षांत तर जगभर परिस्थिती फार झपाट्याने बदलते आहे . तंत्रज्ञान, माहिती तंत्रज्ञान, दळणवळणाची साधनं यांत 'न भूतो' असे बदल जवळजवळ रोज होत आहेत. जगाच्या आर्थिक उलाढालींमध्ये अलिकडे जे काय अराजक माजलंय त्याच्या तडाख्यातून कोणीच सुटलेलं नाही. अतिवेगाने होणार्‍या या बदलांमधले सगळेच काही स्वीकारार्ह नसणार, नाहीत. पण सगळ्या बदलांचे दूरगामी परिणाम ओळखून त्यानुसार वागणं हेही दर वेळी शक्य होत नाही.

बदलती सामाजिक अन आर्थिक परिस्थिती, माहिती तंत्रज्ञानातील प्रगती, देशविदेशात माजलेलं राजकीय व धार्मिक अराजक, शिक्षण अन संशोधन क्षेत्रांमधली चुरस, वेगवेगळ्या देशांचे एकमेकात गुंतलेले आर्थिक हितसंबंध अन् त्यांचे परिणाम या सर्व पार्श्वभूमीवर आपले, आपल्या कुटुंबाचे धोरण ठरवणे अन् ते नित्यनेमाने आचरणात आणणे ही काही साधीसुधी जबाबदारी नाही. ज्या रीतीभाती, ज्या प्रथा आपल्या श्रद्धा बळकट करतात, जगण्याला अर्थ देतात त्या पारखून पाळणे अन् इतर सर्व फापटपसारा आप्तस्वकीयांना न दुखवता कटाक्षाने टाळणे ही एक तपश्चर्याच आहे.

या दिवाळीत अन येणार्‍या वर्षात तुम्हा सर्वांची ही तपश्चर्या सुसाध्य होण्याकरता मनापासून शुभेच्छा.

गणेशोत्सवाच्या कार्यक्रमाप्रमाणे दिवाळी अंकातसुद्धा नामांकित दिग्गजांच्या आवाजात तुमच्यासाठी कथा, कविता, अभिवाचन व संवाद सादर करत आहोत 'तारांकित'मध्ये. ज्येष्ठ कवी, लेखक, अभिनेते यांच्या आवाजात ध्वनिमुद्रण करून मराठी साहित्याचा एक अतिशय मोलाचा वारसा जपून ठेवण्याचा मायबोलीकरांनी नवाच पायंडा पाडला आहे.

मागल्या दोन अंकांप्रमाणे यंदाही मायबोलीकरांनी सादर केलेल्या श्राव्य कलाकृती तर आहेतच पण या दिवाळी अंकात प्रथमच दृकश्राव्य कलाकृती पण सादर करत आहोत. या नव्या प्रकारच्या साहित्याच्या आवाहनाला मायबोलीकरांनी जो प्रतिसाद दिला त्याला तोड नाही. अजून शंभर वर्षांनी प्रकाशन अन संगणक तंत्रज्ञान कसेही अन् कितीही विकसित झालेले असले तरी तेव्हाचे मायबोलीकर या नव्या प्रयोगांची दखल आवर्जून घेतील यात शंका नाही. पहिल्यावहिल्या दृक-श्राव्य हितगुज दिवाळी अंकाचे वाचक या नात्याने तुमचे अभिनंदन.


हा अंक तुमच्यापुढे आणायला अनेकांची मदत झाली आहे. त्या सर्वांना अनेकानेक धन्यवाद. श्रेयनामावलीसाठी कृपया खालील दुवा पहा.

श्रेयनामावली

शुभ दीपावली!