हिंसा आणि 'वॉर अँड पीस'

आपण कितीही नाकारायचं म्हटलं, तरी हिंसेचं इंद्रिय हे माणसात कुठेतरी रूजलेलं असतंच. उत्क्रांत होताना एक अपरिहार्य गरज म्हणून कदाचित हिंसेचं मूळ आपल्या स्वभावात रोवलं गेलं असेल. हे एकदा जाणवल्यावर सार्‍या संस्कृतींनी ह्यावर तोडगा काढण्याचा (पूर्णतः यशस्वी न ठरलेला) प्रयत्न केलेला दिसतो. 'लॉर्ड ऑफ द फ्लाईज'सारखी लहान मुलांतही आढळणार्‍या हिंसेच्या प्रवृत्तीचं चित्रण करणारी कादंबरी असो वा तेंडुलकरांचं मध्यमवर्गीय माणसांतल्या हिंसेचा अस्वस्थ करणारा उघडानागडा चेहरा आपल्यासमोर ठेवणारं 'शांतता! कोर्ट चालू आहे' सारखं नाटक; या हिंसेचं स्वरूप रेखाटण्याचा, तिच्यामागची कारणं शोधण्याचा प्रयत्न अनेक लेखकांनी करून पाहिला आहे. आधुनिक साहित्यात 'वॉर अँड पीस'चे नाव त्यात अग्रहक्काने घ्यावे लागेल. टॉलस्टॉयने आपल्या समर्थ लेखणीने नेपोलियनने रशियावर १८१२ मध्ये केलेल्या स्वारीचा, दरम्यान घडलेल्या अनेक युद्ध आणि लढायांतील हिंसेचा विस्तीर्ण पट आपल्यासमोर उभा केला आहेच; पण हिंसेच्या ह्या ढोबळ स्वरूपाबरोबरच सामान्य माणसातील सुप्त हिंसेलाही प्रसंगी कसं उधाण येतं याचं फार सूक्ष्मपणे वर्णन त्याने केलं आहे. कादंबरीतील त्या भागाच्या अनुवादाचा हा एक प्रयत्न -

-------------------------------------------------------------------------

सकाळी नवाच्या सुमारास नेपोलियनच्या फौजा मॉस्को शहरात घुसल्या. काऊंट रोस्तोपचिनकडे सल्ला मागण्यासाठी तेव्हा कुणीही फिरकलं नाही. ज्यांना शहर सोडून जाणं शक्य होतं, ते निघून गेले होते. मागे राहिलेले आपण काय करायचं, हे स्वत:च ठरवण्यात गुंतले होते. सोकोल्निकी गावाकडे जायचं म्हणून काऊंटने बग्गी तयार ठेवायला सांगितली अन् आपल्या अभ्यासिकेत तो निराश, हताश मुद्रेने हातांची घडी घालून बसून राहिला.

जेव्हा शहरात शांतता आणि सुव्यवस्था नांदत असते, तेव्हा प्रत्येक शासकाला हे आपलंच कर्तृत्व आहे असं वाटत असतं. शहरातील नागरिकांचं जीवन आपल्याच प्रयत्नांमुळे सुरळीत चाललं आहे; आपलं कार्य अतिशय महत्त्वाचं आहे या जाणीवेतच त्याला आपल्या कामाचं समाधान मिळत असतं. त्याची स्थिती ही मोठ्या जहाजाला दोरखंडाने जोडलेल्या एका होडक्याप्रमाणे असते. जोवर इतिहासाचा समुद्र शांत असतो, तोवर त्या होडक्यात बसलेल्या शासकाला साहजिकच आपण या जहाजाची दिशा ठरवतो आहोत, असं वाटत असतं. पण एखादं वादळ आलं की समुद्र खवळतो. जहाजाला लाटा झोडपून काढतात. मग आपलं या सार्‍या गोष्टींवर नियंत्रण आहे, हा त्याचा भ्रम फार काळ टिकत नाही. जहाज वेगानं वेगळ्याच दिशेला फेकलं जातं. होडक्याला त्याच्याशी जोडून ठेवणार्‍या दोरखंडाच्या पार चिंध्या होऊन जातात आणि एकेकाळी सर्वशक्तिमान भासणारा तो शासक पार हीनदीन, दुबळा होऊन जातो.

काऊंट रोस्तोपचिनलाही हीच हतबल करून टाकणारी जाणीव आता सतत डाचू लागली होती.

बग्गी तयार असल्याचं नोकर सांगत आला, आणि त्याचवेळी बाहेर जमावाने आत्तापर्यंत अडवून ठेवलेला पोलिसांचा मुख्य अधिकारी काऊंटला भेटायला आला. दोघांचेही चेहरे भीतीने फिकुटले होते. काऊंटने दिलेल्या सूचनांचं पालन केल्याचं सांगून त्या अधिकार्‍याने बाहेर जमलेल्या प्रचंड जमावाची माहिती दिली. हे सारे लोक काऊंटला भेटण्यासाठी बाहेर थांबले होते.

काहीही उत्तर न देता रोस्तोपचिन उठला आणि घाईने त्याच्या प्रशस्त दिवाणखान्यात गेला. व्हरांड्यात जाण्याचं दार उघडण्यासाठी त्याने दरवाजाची मूठ पकडली, आणि लगेच सोडून दिली. त्याऐवजी तो खिडकीकडे वळला. इथून खाली थांबलेले लोक त्याला नीट दिसत होते. जमावाच्या सर्वात पुढे एक उंचेला माणूस उभा होता. हातवारे करत, गंभीर मुद्रेने तो लोकांना काही सांगत होता. बंद खिडकीतून खालून येणारे बोलण्याचे आवाज दबकतच आत येत होते.

"बग्गी तयार आहे?", खिडकीपासून मागे हटत रोस्तोपचिनने विचारलं.

"होय साहेब", सहाय्यक म्हणाला.

रोस्तोपचिन पुन्हा व्हरांड्याच्या दाराकडे वळला.

"पण हवंय तरी काय त्यांना नक्की?", त्याने अधिकार्‍याला विचारलं.

"साहेब, ते म्हणतायत की तुम्ही मागे आदेश दिले होते त्याप्रमाणे फ्रेंच सैन्याविरूद्ध लढायला ते तयार आहेत. मध्येच काहीतरी फंदफितुरीबद्दलसुद्धा त्यांचं बोलणं चालू होतं. पण हा जमाव खवळलेला आहे, साहेब -- मी कसाबसा निसटून आत आलो. साहेब, एक सांगू का?..."

"नको. मी काय करायचं हे तुम्ही सांगायचं गरज नाही! या तुम्ही", रोस्तोपचिन तडकून म्हणाला नि खालच्या जमावाकडे पाहत व्हरांड्याच्या दाराशी थांबून राहिला.

'काय अवस्था केलीये ही रशियाची त्यांनी, आणि त्यासोबत माझीही', तो स्वत:शीच म्हणत होता. संतापाची एक तिडीक त्याच्या डोक्यात गेली. 'कुणी केलं हे? कोण जबाबदार आहे या सगळ्यासाठी?' तापट स्वभावाच्या माणसांचं जसं बर्‍याचदा होतं, तसं संतापाने त्याच्या अंगाची लाही लाही झाली तरी, तो राग कोणावर काढावा हे त्याला सुचत नव्हतं. खाली जमलेल्या जमावाकडे, हातवारे करून बोलणार्‍या त्या उंचेल्या माणसाकडे बघताना त्याला जाणवलं की या अशांत जमावाला कुणीतरी बळी हवाय. आणि हे त्याला जाणवायचं कारण म्हणजे, त्या जमावासारखाच त्याला आपल्या रागाला वाट करून देण्यासाठी एक बळीचा बकरा हवा होता.

"बग्गी तयार आहे का?", त्याने पुन्हा विचारलं.

"हो, साहेब. त्या वेरेश्चागिनचं काय करायचं? त्याला देवडीवर आणलंय." सहाय्यक उत्तरला.

"आह!", कुठलीतरी अनपेक्षित गोष्ट अचानक आठवावी तसा रोस्तोपचिन उद्गारला, आणि झपाट्याने दार उघडून निश्चयानं पावलं टाकीत तो व्हरांड्यात गेला. क्षणात खालच्या जमावाची कुजबुज थांबली, डोक्यावरच्या टोप्या आदराने हाती घेतल्या गेल्या आणि सर्वांचे डोळे काऊंटकडे वळले.

"गुड मॉर्निंग, मित्रांनो!" स्पष्टपणे आणि मोठ्याने काऊंट म्हणाला."तुम्ही सारे इथे आलात त्याबद्दल मी तुमचा आभारी आहे. तुम्हांला भेटण्यासाठी मी खाली येतोच आहे, पण त्यापूर्वी आपल्याला एका अपराध्याचा निवाडा करायचा आहे. ज्याने मॉस्कोला ह्या संकटाच्या खाईत लोटलंय, त्याला आपण कडक शिक्षा केलीच पाहिजे. आलोच मी!"

ज्या सफाईने तो व्हरांड्यात आला होता, तितक्याच झपाट्याने काऊंट पुन्हा खोलीत परतला आणि त्याने दार धाडदिशी लावून घेतलं.

एक पसंतीची आणि समाधानाची लहर खालच्या जमावात उठली. "काऊंटसाहेब सगळ्या अपराध्यांना शिक्षा करतील, बघाच तुम्ही! आणि ते फ्रेंचांचं काय सांगत होतात?...न्यायनिवाडा ही काय चीज असते हे तेच दाखवतील तुम्हाला!", जणू काही काऊंटसाहेबांवर संशय घेतला म्हणून एकमेकांना दोष देत जमाव कुजबुजू लागला.

काही मिनिटांनी एक अधिकारी घाईघाईने बाहेर आला आणि त्याने आदेश देताक्षणी सारे सैनिक एका रांगेत खडे राहिले. जमावही थोड्या अपेक्षेने व्हरांड्याकडून देवडीकडे वळला. रोस्तोपचिन घाईघाईने रागावल्या पावलांनी बाहेर आला आणि कुणालातरी शोधत असल्यासारखी त्याने जमावावर धावती नजर टाकली.

"कुठाय तो?", त्याने विचारलं. त्याचवेळी घराच्या कोपर्‍याकडून दोन सैनिक एका तरुणाला घेऊन येताना त्याला दिसले. त्या कृश तरुणाची मान लांब, अरूंद होती. अर्धवट भादरलेल्या डोक्यावर पुन्हा खुरट्या केसांची लव वाढली होती. एकेकाळी सुस्थितीतला पण आता अगदीच जीर्ण झालेला निळा फरकोट नि कैद्यांना मिळणारी मळकी पँट असा त्याचा एकंदर अवतार होता. बारीक, अशक्त पायांतल्या जड साखळ्यांमुळे त्याची पावलं झुकांडी गेल्यासारखी अनिश्चितपणे पडत होती.

"आह!", रोस्तोपचिन उद्गारला, आणि आपली नजर घाईघाईने त्या तरुणावरून वळवून त्याने सैनिकांना कैद्याला पायर्‍यांच्या तळाशी उभं करण्याचा आदेश दिला.

खळखळत्या साखळ्या पायी घेऊन तो तरुण थोड्या अजागळपणेच सांगितलेल्या जागी गेला. मानेला काचणार्‍या कॉलरला एका बोटाने दूर सारून त्याने आपली निरूंद मान दोन्हीकडे फिरवली आणि काटकुळ्या, कठोर श्रमांची सवय नसलेल्या हातांची मुकाट घडी घालून तो निमूटपणे तिथे उभा राहिला.

पायर्‍यांच्या तळाशी नेमून दिलेल्या जागी, तो तरुण कैदी जात असताना संपूर्ण वेळ जमाव स्तब्धपणे उभा होता. फक्त पुढे सरकण्याचा प्रयत्न करणार्‍या पाठच्या काही लोकांच्या पावलांचे, नि:श्वासांचे, कुजबुजीचे आवाज ऐकू येत होते. रोस्तोपचिन हे सारं कपाळाला आठ्या घालून, गारठलेला चेहरा हातांनी चोळत अधीरपणे पाहत होता.

"लोकहो!", कठोर आवाजात तो म्हणाला, "ह्या वेरेश्चागिनच्या कारवायांमुळेच आज मॉस्कोची ही दशा झाली आहे."

मळक्या कपड्यांतला तो तरुण कैदी किंचित वाकून, सारा हवाला दैवावर सोडल्यासारखा बोटं एकमेकांत जुळवून उभा होता. अर्धवट भादरलेल्या केसांनी थोडा विरूप झालेला त्याचा कोवळा चेहरा निराशेने पडला होता. काऊंटच्या पहिल्या उद्गारांसरशी त्याचा चेहरा किंचित उचलला गेला आणि काहीतरी उत्तर द्यावं किंवा किमानपक्षी त्याच्या डोळ्यांत डोळे भिडवून पहावं या आशेनं त्याने काऊंटकडे पाहिलं. पण रोस्तोपचिनची नजर त्याच्याकडे वळलीच नाही. त्याच्या त्या अरूंद मानेतली एक शीर तडतडली आणि अचानक त्याच्या चेहर्‍यावरचे रंग पालटले.

सगळ्यांचे डोळे आता त्याच्यावर रोखलेले होते. त्याने जमावाकडे पाहिलं. गर्दीतल्या चेहर्‍यांवरचे भाव वाचण्याचा त्याने प्रयत्न केला आणि त्याला किंचित धीर आला. एका खिन्न, भित्र्या स्मिताची रेषा त्याच्या चेहर्‍यावर उमटल्यासारखी झाली नि पायांची चाळवाचाळव करत त्याने पुन्हा मान खाली घातली.

"या नराधमाने झारशी आणि रशियाशी द्रोह केला आहे. बोनापार्टशी हातमिळवणी केली आहे. सार्‍या रशियन जनतेत हाच एकटा असा आहे की ज्याने रशियाच्या नावाला काळिमा फासला आहे, मॉस्कोवर आज ही पाळी आणली आहे", रोस्तोपचिन जमावाला उद्देशून तीव्रपणे पण आवाज न चढवता म्हणाला; पण अचानक त्याने मान खाली घालून तसाच उभ्या असलेल्या वेरेश्चागिनकडे वळून पाहिलं. जणू काही त्याच्या तिथल्या अस्तित्वामुळे चीड आल्याच्या आविर्भावात त्याने दोन्ही हात हवेत उंचावले आणि ओरडून तो जमावाला म्हणाला, "काय वाट्टेल ती शिक्षा करा याला! मी तुमच्या हाती सोपवतोय."

जमाव शांतच राहिला. फक्त लोक अजून एकमेकांजवळ सरकले. त्या घुसमटून टाकणार्‍या वातावरणात जमावाच्या पाठीमागे राहणं, न चळवळता शांत उभं राहणं किंवा काही अकल्पित, भयंकर घडण्याची वाट पाहत राहणं हे कुणालाच शक्य नव्हतं. परिणामी सर्वांचीच पुढे यायची धडपड सुरू झाली. गर्दीच्या पुढे असणारे, हा तमाशा प्रत्यक्ष डोळे विस्फारून पाहणारे लोक मग मागच्यांना रोखण्याचा प्रयत्न करू लागले.

"मारा त्याला!...मारून टाका त्या गद्दाराला. मिटवून टाका ही अवलाद!", रोस्तोपचिन ओरडला. "माझा हुकूम आहे. कापून टाका त्याला."

त्याच्या त्या बेभान शब्दांपेक्षाही त्याच्या आवाजातल्या क्रुद्धपणाने जमाव पुढे सरसावला, पण पुन्हा थांबला.

क्षणभर सगळीकडे शांतता पसरली. "काऊंट!" भित्र्या पण स्पष्ट स्वरांत वेरेश्चागिनचा आवाज घुमला. "काऊंट! आपल्या दोघांच्याही वर एकच देव आहे ..." त्याने वर पाहिलं. पुन्हा त्याच्या अरूंद गळ्यातली ती जाड शीर दिसू लागली. त्याचा चेहरा अचानक फिकटला. आपलं बोलणं त्याला पूर्ण करता आलं नाही.

"कापून टाका त्याला! मी हुकूम देतो..." रोस्तोपचिन जीव खाऊन ओरडला. अचानक वेरेश्चागिनसारखा त्याचाही चेहरा पांढराफटक पडला होता.

"तलवारी उपसा!" स्वत:ची तलवार उपसत अधिकारी ओरडला.

जमावात पूर्वीपेक्षाही मोठी लहर आता उसळली आणि पुढे उभे असलेले लोक आता थेट देवडीच्या पायर्‍यांशी येऊन धडकले. जमावाचं नेतृत्व करणारा तो उंचेला तरुण आता कठोर चेहर्‍याने वेरेश्चागिनच्या अगदी शेजारी उभा होता.

"मारा त्याला!" अगदी कुजबुजल्यासारख्या आवाजात अधिकार्‍याच्या तोंडून आदेश गेला नि त्यासरशी एक सैनिक पुढे सरसावला. क्रोधाने त्याचा चेहरा पिळवटून निघाला होता. तलवारीच्या धार नसलेल्या बाजूने त्याने वेरेश्चागिनच्या डोक्यावर प्रहार केला.

"आह!" आश्चर्याने वेरेश्चागिनच्या तोंडून उद्गार बाहेर पडला. आपल्याला ही शिक्षा का मिळते आहे, हे न समजल्यानं आश्चर्यचकित आणि भित्र्या नजरेनं वळून त्याने त्या सैनिकाकडे पाहिलं. त्याच्या त्या नजरेसारखीच आश्चर्याची आणि काहीशी घृणेची भावना त्या जमावात पसरली. कुणाच्या तरी तोंडून सहानुभूतीने 'अरे देवा!' असे उद्गार बाहेर पडले.

पण त्या आश्चर्याच्या उद्गारापाठोपाठच त्याच्या तोंडून एक वेदनेपोटी जन्मलेली किंकाळी निसटली आणि तीच घातक ठरली. जणू काही त्या किंकाळीमुळे जवळजवळ तुटेपर्यंत ताणले गेले असले, तरी त्या जमावाला इतका वेळ यशस्वीपणे मानवी भावनांच्या, सहवेदनेच्या कक्षेत ठेवणारे बंधन पूर्णपणे उद्ध्वस्त झाले. आता सामुदायिक गुन्ह्याचे नष्टचर्य सुरू झाले होते आणि ते बळीचा घास घेतल्याशिवाय थांबणार नव्हते. वेरेश्चागिनचा तो निखळ आक्रोश जमावाच्या प्रक्षुब्ध आरडाओरड्यात विरून गेला. जहाजाचा घास घेणारी अखेरची जीवघेणी लाट यावी तशी एक अनिर्बंध लहर जमावात पाठून उसळली आणि तिने सार्‍या जणांना आपल्यात सामावून घेतले. त्या सैनिकाचा पुन्हा होणारा वार चुकवण्यासाठी वेरेश्चागिनने डोकं हातांत मुडपून जमावाच्या दिशेने धाव घेतली खरी; पण तो जमावाचं नेतृत्व करणार्‍या त्या उंचेल्या माणसाचा धक्का लागून अडखळला. त्या माणसाने वेरेश्चागिनची अरूंद मानगूट आपल्या हातांनी आवळली आणि आरडाओरडा करत त्यांची दुक्कल पुढे सरसावणार्‍या जमावाच्या पायदळी सापडली.

कुणी वेरेश्चागिनवर तुटून पडलं, तर काहींनी त्या उंचेल्या माणसाला प्रसाद दिला. त्या गोंधळात विनाकारण पायदळी तुडवल्या जाणार्‍यांच्या व त्या उंचेल्याला वाचवण्याचा प्रयत्न करणार्‍यांच्या आवाजामुळे तर आगीत तेल ओतल्यासारखा जमावाला चेव चढला. बर्‍याच वेळाने सैनिकांना मारहाणीने रक्तबंबाळ झालेल्या त्या उंचेल्याला हिंसक गर्दीपासून सोडवता आलं. त्यानंतरही बराच वेळ वेरेश्चागिनला मारहाण सुरू होती. त्याचा खातमा करण्याची जमावाला घाई झालेली असली तरी त्याला मारहाण करणार्‍या, त्याचा गळा दाबण्याचा प्रयत्न करणार्‍या, ओरबाडू पाहणार्‍या लोकांवर चहूबाजूंनी इतर उत्साही गर्दी येऊन आदळत होती आणि परिणामी वेरेश्चागिन धड मरण नाही की सुटका नाही अशा केविलवाण्या अवस्थेत सापडला होता.

"कुर्‍हाड घे ही,...घातला घाव?...देशद्रोही, हरामखोर. ख्रिस्ताला विकणारा...अजून जिवंत आहे...चिवट आहे साला...चांगलं आहे, असंच हाल हाल करून मारायला हवं. ही कुर्‍हाड वापर...काय? अजून जिवंत आहे?"

अखेरीस वेरेश्चागिनची सुटकेची धडपड थांबली आणि आरोळ्यांऐवजी त्याच्या तोंडून संथ मरणांतिक आवाज निघू लागले तेव्हाच कुठे जमाव त्या रक्तबंबाळ देहापासून मागे हटला. प्रत्येक जण पुढे येऊन आश्चर्याने नि नापसंतीने काय घडलं हे पाहून परतू लागला.

"देवा रे! माणसं आहेत की जनावरं? अजून जिवंत कसा असेल तो?", गर्दी म्हणू लागली. "पोरगेलासाच आहे हो...कुणा व्यापार्‍याचा तरुण मुलगा असेल. काय पण लोक असतात!...आणि म्हणे हा खरा अपराधी नाहीच...कसं शक्य आहे हे?...अरे देवा! आणि त्या दुसर्‍यालाही मरेस्तोवर मारलंय की - तो पण वाचणार नाही म्हणता...झालंय काय लोकांना हल्ली... देवाची, पापपुण्याची कुणालाच भीती उरली नाही अलीकडे", वेरेश्चागिनच्या गळ्यावर कापल्याच्या खुणा होत्या. चेहरा रक्त आणि धुळीने माखला गेला होता. त्याच्या अशा निपचित पडलेल्या त्या कलेवराकडे पाहत आता तोच जमाव उसासे टाकू लागला.

आपल्या साहेबांच्या अंगणात प्रेत पडलेलं असणं योग्य दिसणार नाही हे ध्यानी येऊन एका कार्यक्षम पोलीस अधिकार्‍याने सैनिकांना ते तिथून हलवण्याचा आदेश दिला. दोन शिपायांनी विद्रूप झालेल्या त्याच्या पायांना धरून फरफटत ते दूर नेलं. त्याचं ते रक्ताने माखलेलं, अर्धवट भादरलेलं मस्तकही त्याबरोबरच जमिनीवरून खडखडत गेलं. भूत पाहिल्यासारखा जमाव मागे हटला.

जेव्हा जमाव हिंस्रपणे खाली पडलेल्या वेरेश्चागिनवर चाल करून आला, त्याच क्षणी अचानक रोस्तोपचिनच्या चेहर्‍यावरचे रंग उडाले. मागीलदारी थांबलेल्या बग्गीकडे जाण्याऐवजी तो मान खाली घालून घाईघाईने, आपण कुठे आणि का चाललोय, हे न उमजता तिसरीकडेच वळला. त्याचा चेहरा पांढराफटक पडला होता. थरथरणारा जबडा त्याला प्रयत्नांतीही नियंत्रणात आणता येत नव्हता.

"ह्या बाजूने, साहेब...तिथे कुठे चाललात?...इथून चला", मागून कापर्‍या, घाबरलेल्या आवाजात कुणीतरी म्हणालं.

काऊंट रोस्तोपचिनला उत्तर देता आलं नाही. तो सांगितलेल्या दिशेने आज्ञाधारकपणे वळला. मागे बग्गी उभी होती. जमावाचा आरडाओरडा तिथेही ऐकू येत होता. घाईघाईने तो बग्गीत बसला आणि त्याने सोकोल्निकीतल्या आपल्या घराकडे चलण्यास सांगितलं.

बग्गी म्यास्नित्स्की रस्त्याला लागल्यावर जमावाच्या आरोळ्या ऐकू यायच्या थांबल्या. रोस्तोपचिनच्या मनात आता पश्चात्तापाची भावना दाटू लागली. आपण घाबरलो हे आपल्या हाताखालच्या लोकांना समजल्याचं त्याच्या ध्यानी आलं आणि तो अस्वस्थ झाला. 'भयानक होता तो जमाव,' तो स्वतःशीच फ्रेंचमध्ये म्हणाला. 'रक्ताला चटावलेल्या लांडग्यांसारखा क्रूर आणि हिंस्र!'. पण तितक्यात अचानक त्याला वेरेश्चागिनचे शब्द आठवले, "काऊंट!, आपल्या दोघांच्याही वर एकच देव आहे ...". तो नखशिखांत शहारला. पण हा विचार त्याच्या मनात क्षणभरच टिकला. आपल्याच विचारावर तुच्छपणे हसत त्याने विचार केला, "माझं कर्तव्य मी पार पाडलं. त्या जमावाला शांत करणं भागच होतं. समाजाच्या हितासाठी आजवर अनेक लोकांचा बळी गेला आणि जात आहे." आणि मग त्याचे विचार आपल्यावर असलेल्या आपल्या कुटुंबाच्या आणि शहराच्या जबाबदारीकडे वळले. थिओडोर वॅसिलीविच रोस्तोपचिन ही व्यक्ती म्हणून नव्हे, तर झारने आपल्या साम्राज्याचा नेमलेला प्रतिनिधी म्हणून आपण स्वतः हा त्याग करतो आहोत अशी त्याने स्वत:ची समजूत घातली. 'मी जर केवळ थिओडोर रोस्तोपचिन असतो, तर अर्थातच मी वेगळा वागलो असतो. पण झारचा प्रतिनिधी आणि या शहराचा शासक म्हणून माझा जीव आणि प्रतिष्ठा वाचवण्यासाठी मला असं करणं भाग होतं.'

जमावांच्या आरोळ्यांपासून दूर, हलकेच झुलत जाणार्‍या त्या आरामदायी बग्गीत रोस्तोपचिन सैलावून बसला. शरीराला एकदा विसावा मिळाला की चित्तही थार्‍यावर येतंच. त्याप्रमाणे त्याच्या मनानेही शांत राहण्याचे उपाय आपोआपच शोधून काढले. ज्या विचाराने त्याला दिलासा मिळाला तो मात्र नवीन नक्कीच नव्हता. जगाच्या सुरूवातीपासून माणसं एकामेकांचा मुडदा पाडत आली आहेत आणि त्यातल्या जवळजवळ प्रत्येकाने हे मी इतरांच्या (तथाकथित) भल्यासाठीच केलं, असं म्हणून स्वत:च्या मनाची समजूत घालण्याचा प्रयत्न केला आहे.

एखाद्या भावनेच्या अंमलाखाली बहकलेल्या माणसालाच संयमी माणसापेक्षा आपल्या मुक्तीचा मार्ग कुठे आहे, हे अधिक चांगल्या प्रकारे ठाऊक असतं. रोस्तोपचिनला आता तो मार्ग गवसला होता.

काही वेळाने त्याच्या मनाला लागलेली पश्चात्तापाची डाचणी थांबली, इतकंच नाही तर झालेल्या घटनांबद्दल स्वतःची पाठ थोपटून घेण्याचा मार्गही त्याने शोधला. एकाच वेळी गुन्हेगाराला सजा देणं आणि खवळलेल्या जमावाला शांत करणं त्याने साधलं होतं.

'वेरेश्चागिनला नाहीतरी देहांताची शिक्षा ठोठावण्यात आलीच होती,' रोस्तोपचिनने विचार केला. (खरंतर झारच्या संसदेने वेरेश्चागिनला फक्त सक्तमजुरीची शिक्षा दिली होती.) 'तो देशद्रोही होता, हेर होता. अशा माणसाला मोकळं कसं सोडायचं? तेव्हा मी एका दगडात दोन पक्षी मारले. जमावाला शांत करण्यासाठी बळी दिला आणि त्याचवेळी अपराध्याला शासन केलं.' सोकोल्निकीच्या घरी पोचून तिथल्या नोकरांना आदेश देईपर्यंत काऊंटसाहेबांचं मन पूर्णपणे शांत झालं होतं.

अनुवाद : nand27