संपादकीय

नमस्कार,

१ मे १९६० रोजी संयुक्त महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली. घटना आनंदाची आणि अभिमानाची खरी, पण त्यामागच्या इतिहासाची पानं चाळली, तर ती जनसामान्यांना आपल्याच सरकारविरुद्ध कराव्या लागलेल्या संघर्षाने आणि १०५ हुतात्म्यांच्या प्राणार्पणाने रक्तलांच्छित झालेली आढळतात. म्हणूनच राज्याचं सुवर्णमहोत्सवी वर्ष साजरं करताना या हुतात्म्यांच्या स्मृतीला अभिवादन केल्याशिवाय पुढे जाता येणार नाही.

Maharashtra_seal.gifसंयुक्त महाराष्ट्रासाठीचा लढा हा, एक भाषा बोलणारी, एक सांस्कृतिक बैठक असणारी जनता विरुद्ध सरकार आणि कामगार विरुद्ध भांडवलशहा असा दोन पातळ्यांवरचा लढा होता. आज जागतिकीकरणाच्या काळात ही दोन्ही समीकरणं अपरिहार्यपणे बदलत चालली आहेत. 'जे इतिहास समजून घेत नाहीत, ते त्याची पुनरावृत्ती घडवून आणण्यास कारणीभूत होतात' असं म्हटलं जातं. म्हणूनच या मैलाच्या दगडापाशी काही क्षण थबकून आतापर्यंत झालेल्या प्रवासाचं सिंहावलोकन करणं आवश्यक झालं आहे.

यंदाच्या हितगुज दिवाळी अंकाची संकल्पना महाराष्ट्राच्या विविध पैलूंचं दर्शन घडवून देणारी निवडली, ती त्यासाठीच. समर्थांनी 'आनंदवनभुवन' म्हणून गौरवलेली ही 'अंजन कांचन करवंदीची राकट कणखर' भूमी संतवाङ्मयाने संस्कारित झाली, संगीताने नटली, नाटकांत रमली, अजिंठा-वेरूळ यांसारखी लेणी लेऊन सजली, भारतीय चित्रपटसृष्टीची गंगोत्री ठरली, क्रिकेटसारखा परकीय खेळ आत्मसात करून त्यात जागतिक विक्रम करणारे खेळाडू इथे घडले. राज्यस्थापनेच्या इतिहासाबरोबरच या सर्वांचं प्रतिबिंब आपल्याला संकल्पना विभागात (प्रिय अमुचा) पाहायला मिळेल.

यंदाचे दुसरे वैशिष्ट्य म्हणजे हा मायबोलीचा दहावा 'हितगुज दिवाळी अंक'. आंतरजालावर दिवाळी अंक प्रकाशित करायला सुरुवात केली ती मायबोलीने. एका अर्थी ही दहा वर्षं अव्याहत चाललेली एक सांस्कृतिक चळवळच म्हणता येईल. माणूस हा उत्सवप्रिय प्राणी. 'देव मस्तकीं धरावा, अवघा हलकल्लोळ करावा' ही उर्मी जगातल्या सगळ्या मानवसमूहांत दिसून येते. हा देव, हे अधिष्ठान स्थलकालानुसार बदलतं इतकंच. मायबोली संकेतस्थळासाठी मायबोली मराठी हेच अधिष्ठान आहे असं म्हणता येईल. कोणत्याही मराठी कुटुंबात दिवाळीला चार दिवस सवड काढून आप्तेष्ट भेटतात, गप्पांचे फड, गाण्यांच्या मैफिली, सहभोजनाच्या पंगती, हास्यविनोद यांनी वातावरण गजबजून जातं. मग मायबोलीचं कुटुंब याला अपवाद कसं असणार? हे सगळं आपण साजरं करतो, या दिवाळी अंकाच्या निमित्ताने. आपला अंक नटतो मायबोलीकरांच्या साहित्यातल्या लालित्याने, कवितांच्या नक्षत्रदिव्यांनी, सुगरण हातांनी निगुतीने केलेल्या पाककृतींनी, कलाकारांच्या कुंचल्यांतून आणि गायकांच्या कंठांतून उमटलेल्या आविष्कारांनी. विविध क्षेत्रांत आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवणार्‍या मराठी व्यक्तींशी मायबोली कुटुंबियांची ओळख होते 'संवाद' विभागात.

तंत्रज्ञानात बदल होत गेले, तसतसं दहा वर्षांत अंकाचं स्वरूपही हळूहळू बदलत गेलं. सुरुवातीच्या काही अंकांत प्रामुख्याने कथा, कविता, ललित लेख, विनोदी लेख आणि श्रद्धांजली हे विभाग असत. २००२ सालापासून विभागांना नुसतं कथा, कविता इत्यादींऐवजी वैशिष्ट्यपूर्ण नावं (गोष्टींचा गाव, उन्मेष इत्यादी) द्यायला सुरुवात झाली. २००६ साली मायबोलीला दहा वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने अंकातील नेहमीच्या विभागांच्या जोडीला 'मी आणि मायबोली' या स्पर्धेतील विजेत्या प्रवेशिका मिरवल्या. त्यांपैकी प्रथम क्रमांकाची प्रवेशिका ध्वनिफितीच्या स्वरूपात असल्यामुळे तेव्हापासून अंकाला 'कंठ फुटला' असं म्हणता येईल. २००७ सालच्या अंकाचं मुखपृष्ठ बासरीवर आळवलेल्या भूप रागाने सुरेल झालं, तसंच 'स्वरचित्रे' या विभागात सुश्राव्य संगीताची मैफिल रंगली. 'दिवाळी संवाद' विभागही या अंकात प्रथम समाविष्ट झाला. २००८च्या अंकातील दृक्-श्राव्य साहित्याने त्यापुढची पायरी गाठली गेली. यात मायबोलीकरांचं काव्यवाचन, नृत्याविष्कार, हस्तकला, पाककला इत्यादी संगणकाच्या पडद्यावर जिवंत झाल्या, तसंच तारांकित विभागात अनेक मान्यवरांनी अभिवाचनांद्वारे हजेरी लावली.

सांगायला अतिशय आनंद वाटतो, की मायबोलीचे दिवाळी अंक आतापर्यंत दोन वेळा पुरस्कारप्राप्त ठरले आहेत. २००३ सालच्या दिवाळी अंकाला मुंबई पत्रकार सेवासंघाच्या, तर गतवर्षीच्या दिवाळी अंकाला ग्रंथालीच्या विशेष पारितोषिकाने गौरवण्यात आलं होतं.

यंदाचा अंकही या परंपरेला साजेसा ठरो आणि आपणां सर्वांचा दिवाळीचा आनंद द्विगुणित करो अशी आशा.

हा अंक ज्यांच्या मदतीशिवाय प्रकाशित होणं अशक्य होतं त्या मायबोलीकरांची ओळख होईल 'श्रेयनामावली' या दुव्यात. ही सगळी घरची मंडळी म्हणूनच केवळ त्यांचे औपचारिक आभार मानत नाही.

आपणां सर्वांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा!
जय महाराष्ट्र!