शीतल महाजन

संवाद: शीतल महाजन
मुलाखत आणि शब्दांकन- पूनम छत्रे, चिन्मय दामले

शीतल महाजन! प्रत्येक मराठी माणसालाच नव्हे तर प्रत्येक भारतीय माणसाला जिचा सार्थ अभिमान वाटेल अशी मुलगी. १४ एप्रिल २००४ रोजी, कोणताही पूर्वानुभव नसताना, आयुष्यात कधीही साध्या विमानात पाऊलही टाकलेले नसताना हिने ३००० फूटांवरून, उणे ३७ डीग्री तापमानात पॅरॅशूटच्या सहाय्याने चक्क उत्तर धृवावर उडी मारली आहे. अशी उडी तिने याआधी सरावासाठीही मारलेली नव्हती. पहिली मारली ती थेट उत्तर धृवावरच! अर्थातच हा विश्वविक्रम झाला शीतलच्या नावावर. ती इथेच थांबली नाही. उत्तर धृवावरून ती परतही आली नसेल, तोवर तिने मनाशी निश्चयही केला की पुढची उडी दक्षिण धृवावर! आणि तीही ’फ्रीफॉल जम्प’- म्हणजेच ज्यामधे तब्बल १५,००० फुटांवरून हवेत स्वत:ला झोकून द्यायचं आणि ४००० फुटावर आल्यावरच पॅरॅशूट उघडायचं! ही उडीही तिने यशस्वीपणे पूर्ण केली.

उत्तर अन् दक्षिण धृव- पृथ्वीचे अतिशय निर्गम भाग. इथे पाणी नसतं, जे असतं ते केवळ बर्फ. हवामान इतकं प्रतिकूल की अजूनही मानव तिथे राहू शकत नाही, केवळ संशोधनासाठी काही भागातच वस्ती आहे. अश्या जागी जिथे आपण कधी जायचा विचारही करू शकत नाही, तिथे शीतल नुसती गेलीच नाही तर एक कल्पनातीत साहस करून आली! अश्या या धाडसी आणि नावाप्रमाणेच ’कूल’ शीतलशी साधलेला हा संवाद.

त्यापूर्वी आवर्जून असं सांगावसं वाटतं की या मुलीचे विक्रम जरी ’हवेतले’ असले, तरी शीतल बोलायला, गप्पा मारायला अगदी मनमोकळी आणि निगर्वी आहे. यश तिच्या डोक्यात अजिबातच गेलेले नाही, उलट तिच्या डोक्यात सतत ’यापुढे आपल्याला काय करायचं आहे, आणि ते कसं करता येईल’ हेच असते..

-तुझ्या मनामधे ’आपण पॅरॅशूट जम्पिंग’ करावं असं अगदी पहिल्यांदा कधी आलं? त्यामागची प्रेरणा कोणाची?

शीतल: मला अगदी लहानपणापासून विमानांचं भयंकर आकर्षण होतं. कधीही आकाशात विमान दिसलं की मी ते बघून म्हणायची की मला त्यात बसायचंय. मी बारावीत असताना माझी एक मैत्रीण होती, जी एनडीएमधे रहायची. त्यावेळी एनडीए, ते कॅडेट्स वगैरेचं प्रचंड आकर्षण असायचं, त्यामुळे जवळजवळ प्रत्येक रविवार मी तिच्याकडे असायचे. तिचा भाऊ, म्हणजेच कमलसिंग उबेरा हे एनडीए मधे होते. त्यांच्याशी माझी जुजबी ओळख होती. एक दिवस अशीच मी त्यांच्याकडे गेलेले असताना मी टीव्हीवर कमलसिंगांचा एक प्रोग्राम बघितला. त्यांनी उत्तर आणि दक्षिण धृवावर उडी मारली आहे त्यावरचा कार्यक्रम होता तो. ते बघून मी इतकी प्रभावित झाले की बस. आणि मला आश्चर्यही वाटलं की भैय्यांना मी इतक्या वेळा भेटले आहे, त्यांनी एकदाही कसं मला सांगितलं नाही याबद्दल? पुढच्याच रविवारी मी त्यांना गाठलं, आणि विचारलं की ’तुम्ही इतका मोठं साहसी काम केलंत, मला एकदाही कसं बोलला नाहीत?’ तर, त्यावर ते म्हणाले, की ’त्यात काय सांगायचं? माझ्याच तोंडाने मी काय माझी तारीफ करणार?’ मी त्यांना त्याच क्षणी कोणताही विचार न करता म्हणाले, ’भैय्या, मलाही अशी उडी मारायची आहे. मला सांगा तुम्ही कसं केलत ते!’ त्यावर ते काहीच बोलले नाहीत. फक्त हसले. त्यानंतर मी दीड वर्ष त्यांना सतत विचारत होते आणि ते टाळत होते.. पण या काळात माझा विचार एकदम पक्का होत गेला. शेवटी माझी तयारी बघून दीड वर्षानी त्यांनी होकार दिला, आणि ते माझ्या घरी, माझ्या वाढदिवसालाच आले, माझ्या आई-बाबांशी बोलायला.

-आई-वडिलांची काय प्रतिक्रिया होती?
शीतल: त्यांचा आधी विश्वासच बसला नाही. या खेळाची माहितीच आपल्याकडे नाही. आणि जेव्हा त्यांना भैय्याने सांगितलं, तेव्हा तर त्यांनी लगेचच ’नाही’ सांगितलं. मला दहावीनंतर मुंबईमधे जे.जे.स्कूल ऑफ आर्टसला प्रवेश मिळाला होता, पण मुंबईला पाच वर्ष रहावं लागेल, म्हणून त्यांनी मला जाऊ दिले नाही, ते मला या अश्या स्पोर्टमधे परवानगी कसे देणार? पण भैय्या त्यांना म्हणाले की ’इस लडकीमें स्पार्क है, वो कर सकेगी’. मग त्यांनी थोडा विचार केला. आणि माझं तर पक्कं झालंच होतं. मला जम्प करायचीच होती.

-तुझ्या उडीचं वेगळेपण काय आहे?
शीतल: माझी उत्तर धृवावरची जम्प ही माझी ’मेडन जम्प’ आहे! मी त्या अगोदर कधी साध्या विमानातदेखील पाय ठेवलेला नव्हता. या आधीही लोकांनी तिथे जम्प केल्या आहेत. आपल्या भारताच्याच रेचल थॉमस म्हणून आहेत, त्यांना मी खूप मानते.. त्यांनी दोन्ही धृवांवर जम्प केल्या आहेत, पण त्या त्याआधी १५ वर्ष जम्प करत होत्या, त्यांना प्रॅक्टिस होती, अनुभव होता. ही माझी माझ्या आयुष्यातली पहिली उडी होती.


-बापरे! मग त्याची काय तयारी केलीस?

शीतल: काहीच विशेष नाही. ’मला जम्प करायचंय’ हेच इतकं होतं डोक्यात की बाकी तयारी काहीच नाही लागली. मी जी जम्प केली त्याला ’स्टॅटिक लाईन पॅरॅशूट जम्प’ म्हणतात.. म्हणजे काय, की मी विमानाच्या बाहेर पडल्याबरोब्बर पॅरॅशूट उघडतं. त्यामुळे मला पॅरॅशूट उघडेल की नाही याचं टेन्शन नव्हतं, फक्त व्यवस्थित लॅंड करायचं होतं. ते एकदा झालं की झालंच!

-तेंव्हा उडी मारताना काय होतं मनात?
शीतल: बास! आपलं स्वप्न साकार होतंय, आपल्याला नीट जम्प घ्यायची आहे इतकंच. खरंतर इतक्या उंचावरून उडी मारताना आपण ४ सेकंदात एक हजार फूट खाली येतो.. त्यामुळे तेंव्हा फारसा विचार वगैरे करायला वेळ नसतो.. पूर्ण लक्ष आपल्या जम्पवर ठेवावं लागतं. माझी उडी पूर्ण झाल्यावर मात्र खूप खूप आनंद झाला. माझ्याबरोबर माझी रशियन टीम होती बेसवर. तिकडे सगळ्यांनी कौतुक केलं. ही जम्प मी केली १८ एप्रिल, २००४ ला. त्या आधी माझी जम्प हवामानामुळे पुढे पुढे जात होती, त्यामुळे जम्प पूर्ण झाल्यावर एकदम ’Dream come True ’!

-मग त्यानंतर भारतात परत आल्यावर खूप जल्लोष झाला असेल ना?
शीतल: अजिबातच नाही! इथे कोणाला हा स्पोर्टच मुळात माहित नाहीये! भले मी तिकडे वर्ल्ड रेकॉर्ड करून आले, इकडे कोणालाही त्याचं काही नव्हतं. मी क्रीडा खात्यामधे गेले, त्यांना हे सगळं सांगितलं, माझं सर्टिफिकेट दाखवलं, तरी त्यांचा विश्वास बसला नाही. ते म्हणाले चक्क की मदत मिळवण्यासाठी अशी खोटी सर्टिफिकेट्स रोज येतात आमच्याकडे! मग मी त्यांना फोटो दाखवले, सर्व परवाने घेतले त्यांचे रेकॉर्ड दाखवले, माझ्या रशियन टीममेट्सशी बोला असं सांगितलं, त्यांचं या लोकांशी बोलणं घडवून आणलं तेव्हा कुठे त्यांचा विश्वास बसला!

मग त्यानंतर काही मदत वगैरे मिळाली का?
शीतल: हे स्पोर्ट खूप खर्चिक आहे. माझ्या नॉर्थ पोलच्या उडीला मला १५ लाख रुपये खर्च आला, तो आम्ही कसाबसा, स्पॉन्सरच्या मदतीने वगैरे करू शकलो. माझ्या वडिलांच्या कंपनीमधून मदत मिळाली . पण माझी पुढची उडी ही साऊथ पोलवर करायची होती मला, आणि ती ’फ्रीफॉल जम्प’ असणार होती. यामधे कमीतकमी एक प्रशिक्षक तरी लागतो. या प्रकारची माझी पहिलीच जम्प असल्याने मला दोन प्रशिक्षक हवे होते. या सगळ्याचा खर्च, तयारी, प्रवास वगैरे मिळून ८० लाख रुपये असा खर्च होता. यासाठी मला मदत हवी होती आणि मुख्य म्हणजे रेकगनिशनही हवं होतं. आत्ता आत्ता कुठे बाकी खेळांकडे ऑलिंपिक्समुळे आपलं लक्ष जायला लागलंय. नेमबाजी, बॉक्सिंग, हॉकीला थोडी प्रसिद्धी मिळतेय. नाहीतर आपल्याकडे एकच खेळ म्हणजे क्रिकेट. अर्थात, त्यांच्याकडेही स्किल आहे, कसब आहे, पण शेवटी ते संध्याकाळी धड घरी जाऊ शकतात. माझं स्पोर्ट ’पॅरॅजम्पिंग’ हे असं स्पोर्ट आहे, की एक चूक आणि तुम्ही कायमचे अधू किंवा जीवालाच मुकता. तर अश्या स्पोर्टला थोडी तरी मदत हवी होती मला.

-या सर्वामधे आपले तत्कालीन राष्ट्रपती डॉ. अब्दुल कलाम यांच्याशी तुझी भेट झाली.. तो अनुभव कसा होता?

शीतल: खूपच छान. मी त्यांना प्रथम भेटले आणि त्यांना माझं नाव सांगितलं, तेव्हा ते मराठीमधे बोलले, ’अरे! शीतल महाजन हे नाव तर मी ऐकलेलं आहे. फार पराक्रमी मुलगी आहेस तू!’ हे ऐकताक्षणी मी हवेत होते! ’पराक्रमी’ सारखा अस्सल मराठी शब्द त्यांच्याकडून माझ्यासाठी ऐकताना अंगावर काटा आला! मग त्यांनी मला माझ्या दुसर्‍या जम्पबद्दल अगदी सखोल माहिती विचारली. मी जाण्याआधी थोडा अभ्यास करून गेले होते, म्हणून बरं, मी सगळी उत्तरं दिली त्यांना. शेवटी त्यांचं समाधान झाल्यावर ते म्हणाले, की ’हां, तुझा अभ्यास तर पूर्ण झालाय. मी तुला सगळी मदत करतो. हवे ते सहकार्य देतो..’ मला स्पॉन्सरशिपबरोबर माझे ट्रेनर म्हणून नेव्हीचे दोन ऑफिसर हवे होते, माझ्या दुसर्‍या जम्पसाठी. नेव्हीमधे सिव्हिलियन्ससाठी अशी मदत करत नाहीत. ते जे ऑफिसर्स होते, ते नेव्हीमधले सर्वोत्तम ऑफिसर होते. त्यांना सहजासहजी नेव्हीवाले माझ्यासाठी जाऊन द्यायला तयार नव्हते. ते म्हणाले की राष्ट्रपतींच्या परवानगीचं पत्र आणा, तरच हे ऑफिसर आम्ही तुमच्यासाठी देऊ शकू. हे सगळं राष्ट्रपतींना सांगितल्यावर त्यांनी लगेचच त्यांच्या सेक्रेटरीला सांगितलं की हिला सगळी मदत कर, हवी ती पत्र, परवानग्या दे, वगैरे.

- वा! मग यानंतर पटापट सूत्र हलली असतील ना?

शीतल: आपल्या देशात काय आहे, की कोणत्या ना कोणत्या पर्सनल कारणासाठी म्हणा, किंवा काहीही, पण कामं पटपट होत नाहीत. आता खुद्द राष्ट्रपतींकडून मला मदतीसाठी, सगळ्या क्लीयरन्सेससाठी पत्र मिळणार म्हणून मी परत घरी आले. पत्र मला पंधरा दिवसात मिळायला हवं होतं, पण एक महिना झाला तरी काही हालचाल नाही! मग पुन्हा दिल्लीची वाट! सेक्रेटरींना भेटले, तर त्यांनी पत्रच पाठवलं नव्हतं! मग पुन्हा मागे लागून एकदाचं पत्र मिळवलं. दिल्लीमधे आपलं कोणतंही काम करायचं असलं तर खूप हेलपाटे मारायला लागतात, खूप वेळ जातो. मी तर म्हणेन की उडी मारणं सोपं, पण फंड्ज मिळवणं, स्पॉन्सरशिप मिळवणं फार अवघड काम. साधं पत्र मिळवायलादेखील खूप वेळ जातो.

- तुला २००५चं ’तेनझिंग नोरगे नॅशनल ऍडव्हेन्चर अवॉर्ड’ मिळालं, त्याबद्दल काय सांगशील?
शीतल: प्रथमच हे अवॉर्ड एका सिव्हिलियनला मिळाले आहे. आत्तापर्यंत फक्त डिफेन्समधल्या लोकांनाच हे अवॉर्ड मिळाले आहे, कारण अर्थातच ऍडव्हेन्चर स्पोर्ट्स मधे कोणी सामान्य लोक उतरतच नाहीत. या अवॉर्डसाठीही बरीच फाईट मारायला लागली. एका सिव्हिलियनचं नाव नॉमिनेट झालं हेच मुळी काही लोकांना पचलं नाही. त्यातून मी मुलगी.. म्हणजे तर जास्तच. त्यामुळे मला हे अवॉर्ड मिळू नये म्हणूनही बरीच फिल्डींग लावली गेली होती, पण अखेरच्या दिवशी माझं नाव फायनल झालं. बरं, हे अवॉर्ड जाहीर झाल्यानंतरही याची पेपरमधे, मीडीयामधे कुठेच पब्लिसिटी केली नाही. रेडीयोवर एका ओळीची बातमी दिली फक्त. पण हे बरोबर नाही ना.. या अवॉर्डच्याच वेळी खेलरत्न जाहीर केलं, द्रोणाचार्य अवॉर्ड दिलं, पण माझंच अवॉर्ड का नाही जाहीर केलं पेपरमधे? एका सिव्हिलियनला हा सन्मान मिळाला आहे, तर तो जगासमोर यायलाच हवा. असं एकदा ठरवल्यानंतर मग सगळीकडे फोटो आले, मुलाखती आल्या वगैरे वगैरे. पण यात मलाच खूप इनिशिएटीव्ह घ्यायला लागलं.

-या नंतरच तुझी दक्षिण धृवावरच्या उडीसाठी तयारी चालू झाली?
शीतल:
हो, मी नॉर्थ पोलची जम्प केल्याबरोब्बरच ठरवलं होतं की आता पुढची जम्प साऊथ पोलवरच. यासाठी स्पॉन्सरशिप हा मोठा प्रॉब्लेम होता. या मोहिमेचा खर्च सुमारे ८० लाख रुपये होता, आणि तो शेवटी एक कोटी पर्यंत पोचला. इतका खर्च करणं मला एकटीला शक्यच नव्हतं. पण तेनझिंग नोरगे अवॉर्डमुळे मला स्पॉन्सर्स गोळा करायला मदत झाली. अवॉर्डचे पैसे मिळाले, पुन्हा माझ्या बाबांच्या कंपनीमधून पैसे मिळाले, बर्‍याच संस्थांनी मदत केली. हे चालू होतं त्या बरोबरच माझं नेव्हीच्या लोकांशी बोलणं चालू होतं. मला ते दोन ऑफिसर्स हवे होते. राष्ट्रपतींच्या क्लीयरन्सनंतरही ते ऑफिसर मला सहजासहजी मिळाले नाहीत. शेवटच्या दिवसापर्यंत त्यांचं येणं अनिश्चित होतं. परत, माझ्या टीमबरोबर मला एक कॅमेरामॅनही हवा होता जम्पचं शूटींग करायला.. मी या सगळ्या तयारीत होते. इतकं सगळं करूनदेखील मला २० लाख रुपये कमी पडत होते, तेव्हा माझ्या पपांनी आमचं हे राहतं घरही गहाण टाकलं. सुदैवाने बँकेने लगेच चेक दिला.. तेव्हा माझ्या मनाला खूप लागून राहिलं होतं की माझ्यासाठी माझ्या आई-बाबांना किती काय काय करावं लागतंय.. सगळे पैसे माझ्या मोहिमेसाठी जात होते, आता तर घरही गहाण! पण माझे पपा बोलले की इतकं सगळं केलंय, तर आता माघार घेऊ नकोस. आता यशस्वी होऊनच ये. माझ्याही मनात होतंच की ’बस, करायचंय, आता जम्प पूर्ण करायचीये!’

-दक्षिण धृवाच्या उडीचा अनुभव कसा होता?
शीतल: ही माझ्या आधीच्या उडीपेक्षा पूर्णपणे वेगळी उडी होती, कारण ही फ्रीफॉल जम्प होती. आम्ही गेलोही होतो १५००० फुटावर. आधीची जम्प मी ३००० फुटांवरून केली आणि त्यात फ्रीफॉल नव्हता. इथे मी आणि माझे दोन ट्रेनर्स- आम्ही १५००० फुटांवरून अक्षरश: खाली स्वत:ला झोकून दिलं. ४००० फुटावर आल्यावरच मला पॅरॅशूट उघडायचं होतं. त्यावेळी माझ्या दोन ट्रेनर्सची मला मदत झाली. एक तर हे ट्रेनर्स वॉच करतात- उडी मारताना काही चूक झाली, समजा पॅरॅशूट उघडलंच नाही तर, वगैरे वेळी त्यांची मदत मिळते. सुदैवाने तसं काही झालं नाही. आम्ही ४००० फुटांवर आल्यावर मी पॅरॅशूट उघडलं आणि मग सेफली लँड केलं!

-प्रत्यक्ष उडी मारण्याच्या वेळी, किंवा हवेत असताना काय वाटत होतं- आपलं स्वप्न साकार होताना दिसत होतं?

शीतल: खरं तर इतका वेळच नसतो. आपण इतके झपकन खाली येत असतो, की हाईट चेक करणं, पॅरॅशूट व्यवस्थित उघडणं वगैरेकडे पूर्ण लक्ष द्यावं लागतं. कारण हवेमधे काहीही होऊ शकतं. आणि इथे एक चूक म्हणजे सगळं संपलंच! त्यामुळे, त्या क्षणी फक्त उडी महत्त्वाची असते. मग खाली उतरल्यावर थोडं थोडं जाणवायला लागतं की येस, जम्प झाली, वर्ल्डरेकॉर्ड केलं वगैरे!


-या स्पोर्टमधे फिटनेस कश्या प्रकारचा लागतो? खाण्यापिण्याची काही बंधनं, काही विशेष व्यायामप्रकार वगैरे करतेस का?
शीतल: आधी मी या बाबतीत फारशी जागरूक नव्हते. पण आता मुद्दाम लक्ष देते. इतक्या उंचीवर ऑक्सिजन खूपच विरळ असतो, श्वास घ्यायला त्रास होतो.. त्यामुळे तेलकट खाणं बंद केलंय.. थोडक्यात ज्याने मळमळेल, उलटी होईल असं सगळं खाणं बंद केलंय आता. रोजचं जेवण, पोळी, भाजी, भात हे बेस्ट. व्यायाम म्हणशील तर मुख्य आपले खांदे बळकट असले पाहिजेत. पॅरॅशूट उघडल्यावर, जेव्हा त्यात पूर्ण हवा भरते, तेव्हा मानेला जोराचा हिसका बसतो. मान, खांदे यांना तो हिसका सहन होण्यासाठी खांद्याचे, मानेचे व्यायाम करून ते फिट ठेवणं गरजेचं आहे. या व्यतिरिक्त, नेहेमीचे व्यायाम, डायट वगैरे असतंच.

-तुझं लग्नही अनोख्या पद्धतीने झालं..
शीतल: माझं अरेंज्ड मॅरेज. माझे पती श्री. वैभव राणे सध्या फिनलँडमधे असतात. त्यानेही पॅरॅजम्पिंग केले आहे, अर्थातच अमॅच्यूअर म्हणून. पण त्याला या खेळाबद्दल माहिती आहे, त्यातले धोके, त्यातलं थ्रिल- सगळंच. लग्न ठरवताना, स्थळं बघताना मी आई-पपांना सांगितलं होतं की सध्या भारताबाहेर असला तरी चालेल, पण नंतर भारतामधे परत येणाराच मुलगा बघा. भारत सोडून अन्य देशात स्थायिक होण्याचा मी विचारही करू शकत नाही. ही आपली जन्मभूमी आहे, कर्मभूमी आहे, आपलं जे काही व्हायचं ते इथेच. त्यामुळे अमेरिका, ऑस्ट्रेलिया वगैरे मधूनही स्थळं येत होती, पण त्यांचा विचार केला नाही. वैभवना भेटल्याबरोबर मी हे सांगितलं की हेच माझं करीयर असणार आहे. ऑफिस जॉब मी नाही करू शकणार. त्यांनी, त्यांच्या फॅमिलीने मला पूर्ण सपोर्ट केला. लग्न मला हॉट एअर बलूनमधेच करायचे होते. त्यासाठी वेगळी परमिशन घेतली आर्मीकडून.. लग्नाच्या तयारीपेक्षा तीच धावपळ बरीच केली, पण शेवटी मिळवली परवानगी आणि दोन बलून मिळवले. जमिनीपासून ६०० फूट उंचीवर एका बास्केटमधे मी आणि वैभव, आणी दुसर्‍यामधे माझे बाबा आणि गुरुजी असे गेलो आणि तिथे फेरे घेतले!

-त्यानंतर तू लगेचच पॅरॅशूट जम्पिंगच्या ट्रेनिंगला अमेरिकेत गेली होतीस.. या ट्रेनिंगचे अनुभव कसे होते?
शीतल: खूपच छान. आम्ही ऍरिझोनाच्या वाळवंटात होतो, पूर्ण डेझर्ट. मी मेनली गेले होते ते पॅरॅशूट जम्पिंगच्या ट्रेनिंगसाठी. मी नॉर्थ आणि साऊथ पोल वरून उड्या मारल्या, पण त्या कोणत्याच ट्रेनिंगशिवाय. आता हेच करीयर करायचंय, त्यामुळे व्यवस्थित माहिती असणं गरजेचं होतं. इथे आम्हाला १३,००० फूटांवरून किमान ८ जम्प रोज करायच्या होत्या. सगळे वर्ल्ड बेस्ट लोक या ट्रेनिंग सेंटरमधे येतात. काही काही लोकांचे ८ वेळा, ९ वेळा वर्ल्डरेकॉर्डही झाले आहेत. अश्या लोकांबरोबर ट्रेनिंग घेणं हा एक जबरदस्त अनुभव होता. या लोकांपुढे मी अगदीच लिंबूटिंबू होते. इथे वेगवेगळ्या प्रकारचे पॅरॅजम्पिंग शिकवले जाते, टीम इव्हेन्ट्स असतात, तसंच फॉर्मेशन्स असतात, इन्डीव्हिजुअल जम्पिंग असते.. सगळंच शिकले मी. मी आणि माझ्याबरोबर एक मुलगी होती, आम्ही दोघीच कमी एक्सपीरीयन्सवाल्या.. बाकी सगळे दादा लोक होते. पण मी भराभर शिकले, माझ्या ट्रेनरने मला तसं सांगितलंही, की माझी प्रगती खूपच चांगली आहे. आमचं शेड्यूल टाईट होतं. रोज १३,००० फूटांवरून कमीतकमी ८ जम्प मारायच्या म्हणजे अवघड जातं. इतक्या उंचीवर जा, परत खाली आपण अक्षरश: ५ मिनिटात येतो, मग पुन्हा १३,००० फूटाच्या उंचीवर जा.. डोकं नंतर भिरभिरायला लागतं. सुरुवातीला चक्क भीतीही वाटायची.. तेव्हा तिथला ट्रेनर म्हणला होता की ’काही माहित नसताना जम्प करणं तसं सोपं असतं, पण मुद्दाम तसं ट्रेनिंग घेतलं की शंकाकुशंका जास्त येत राहतात’. पण त्यालाही सरावले. नंतर नंतर तर मी बाकीच्यांना सांगायचे, ’थांबा आधी मी मारते उडी!’ ट्रेनिंगसाईटवर दोन ड्रॉप झोन्स असतात- एक प्रोफेशनल्ससाठी आणि एक अमॅच्यूअर्ससाठी . आम्हाला हेलिकॉप्टरमधून आमच्या अमॅच्यूअर फील्डमधे जम्प करायची असे. आपलं जे टार्गेट आहे, ते मार्क केलेलं असतं, त्या टार्गेटवर जम्प करायचा प्रयत्न करायचा. हे जसं जसं ऍक्यूरेटली जमायला लागेल, तशी जम्प परफेक्ट होत जाईल. मला बर्‍यापैकी जमत होतं माझं टार्गेट गाठायला.

-ट्रेनिंगच्या वेळेचे बाकी लोक कसे होते?
शीतल: एकदम मस्त. एक तर ७० वर्षाचे आजोबा होते. प्रचंड अनुभव होता त्यांना. एक जण होते, तेही वयाने मोठे.. त्यांनी तर वयाच्या ५०व्या वर्षी पॅरॅजम्पिंग सुरु केलं.. अचानक एक दिवस मनात आलं की बस, खूप काम केलं, आता काहीतरी थ्रिल हवं म्हणून हे सुरु केलं, आणि आता दर वर्षी येतात ते या कँपला. अश्या लोकांकडे बघून आम्ही तर तोंडात बोटंच घालायचो.

-हे असं पन्नासाव्या वर्षी पॅरॅजम्पिंग करणं ते केवळ अमेरिकेत आहेत म्हणूनच शक्य झालं?
शीतल: हो. तिथे हे स्पोर्ट लोकप्रिय आहे आणि अद्ययावत सुविधाही आहेत. ते लोक फिटही असतात. त्यामुळे, तुमच्याकडे पैसा आणि वेळ असेल तर कधीही हे स्पोर्ट आपण सुरु करू शकतो. आपल्या इथे या स्पोर्टला इतकी मान्यता मिळायला वेळ लागेल.

-तू फॉर्मेशन्स मधेही भाग घेतलास?
शीतल: हो. हा फार अवघड आणि तितकाच सुंदर प्रकार असतो. यामधे हेलिकॉप्टरमधून सगळे १०-१२ जण, एकाच वेळेला जम्प करून हवेत वेगवेगळे फॉर्मेशन्स करतात आणि मग सेपरेट होत खाली येतात. यामधे फ्रन्ट फ्लिप, बॅक फ्लिप, साईड फ्लिप, ३६० डीग्री टर्न असे बरेच प्रकार असतात. फॉर्मेशन्समधे सगळ्यांचं ट्यूनिंग जमणं फार महत्त्वाचं आहे. पण आम्ही हवेतच असल्यामुळे रिस्कही खूप असते. साधं उदाहरण सांगते.. जवळ येताना हवेच्या प्रेशरप्रमाणे आम्ही एकमेकांवर धडकू शकतो आणि ही धडक इतकी जोराची असू शकते की प्राणही जाऊ शकतो. माझ्यासमोरच अशी दोघांची धडक झाली होती.. त्यांची तर डोकी, म्हणजे हेल्मेट्स आपटली एकमेकांवर आणि त्यातला एक तिथल्या तिथे बेशुद्ध झाला. अश्या वेळी आपण काहीही करू शकत नाही. फेटल ऍक्सिडेन्ट्स होतात. कधी कधी लोक बरेही होतात, पण त्यांना पॅरॅजम्पिंग नाही करता येत पुढे. यामधेच आता एक ’ए ए डी’ म्हणून डीव्हाईस आलाय.. पॅरॅशूट आपल्याला उघडता आलं नाही, तर याच्यामुळे किमान पॅरॅशूट उघडतं तरी आणि फेटल ऍक्सिडेन्ट होत नाहीत.

-हवेमधे आपण असताना आपल्याकडे काहीच सुरक्षित साधनं नसतात की ज्यायोगे आपण लँड तरी नक्कीच होऊ शकतो?
शीतल: पॅरॅशूट हेच सर्वात सुरक्षित साधन आहे. पण त्यामधेही गडबड होऊ शकते. जेव्हा फ्रीफॉल करतो, तेव्हा कोणत्या हाईटवर आल्यावर पॅरॅशूट उघडायचे आहे हे दर्शवणारा एक ’अल्टीमीटर’ असतो. त्याकडे लक्ष नाही गेलं काही कारणाने, तर कानामधे त्या हाईटला आल्यावर एक ’बीप’ वाजतो. हे इन्डीकेशन असतं की आता पॅरॅशूटची लीव्हर खेचून ते उघडायचं आहे. पण कधीकधी घाई होते, ती लीव्हर आपण नीट उघडू शकत नाही. आणि खाली यायचा वेग प्रचंड असतो. एक एक क्षण महत्त्वाचा असतो. अश्या वेळी मेन पॅरॅशूटमधे काही बिघाड झाला, तर एक मिनी पॅरॅशूट अजून असतं, ते कंबरेच्या बेल्टला असतं, तेव्हा मेन पॅरॅशूट कट अवे करायचं आणि हे उघडायचं. पण हे निर्णय झटपट घ्यावे लागतात. कोणी येऊन आपल्यासाठी पॅरॅशूट उघडू शकत नाही. मी हा अनुभव घेतला आहे, की हेलिकॉप्टरमधून उडी मारायच्या आधी आम्ही सगळेच एकमेकांना थंब्ज-अप करतो, किंवा शेकहँड करतो.. हे करून आमच्या एका कलीगने जम्प केली आणि कसल्यातरी मिसहॅपमुळे तो लँड करू शकला नाही. त्याला हॉस्पिटलाईज केले, पण तो गेला नंतर. हे असं बघितलं की सुन्न व्हायला होतं.
मलाही एक छोटासा ऍक्सिडेन्ट झाला लँड करताना.. माझ्या पावलाचं लिगामेन्ट पार फाटलं, पाऊल प्रचंड सुजलं होतं.. तसा मोठा म्हणायचा, पण तसा किरकोळच.. बाकी लोकांचे जे हाल झालेत, त्यापुढे माझं काहीच नाही. या नंतर मला सक्तीची विश्रांती होती ६ आठवडे, सूज उतरून पूर्ण बरी होईपर्यंत. काही दिवसांनी चालायची परवानगी मिळाली. तेव्हा मला नुसतं बेसवर बसवायचंच नाही. मी सगळ्यांबरोबर हेलिकॉप्टरमधून वर जाऊन खाली यायचे. फ्लाईंगची आवड आहेच मला, त्यामुळे मी त्या पायलटलाही अनेकदा विचारलं की मला हे कसं चालवतात शिकव ना, पण त्याने नाहीच शिकवलं! तरी मी वॉच करायची तो कसं आणि काय करतो ते!

-ट्रेनिंगमधे जे बरेच प्रकार शिकलीस, त्यातल्या कोणा एका प्रकारामधे खास काही करावं असं वाटलं?
शीतल: फ्रीस्टाईल जम्पिंग म्हणून एक प्रकार असतो, जो मला खूप आवडला आणि करायला जमलाही. माझे ट्रेनर मला म्हणाले, की तो प्रकार मी नॅचरली चांगला करू शकते. यामधे पहिला फ्रीफॉल घेऊन खाली येईपर्यंत आपण हवे तसे फ्लिप्स, फॉर्मेशन्स करू शकतो.. आपल्यामधे जे टॅलेन्ट आहे ते दाखवू शकतो, कधी एक प्रकार, तर कधी दुसरा प्रकार.. कसंही.. त्यामधे काही लिमिट्स किंवा रूल्स नाहीत की अमूक इतक्या फ्लिप्स झाल्याच पाहिजेत असं. आणि मुख्य म्हणजे मी ते एकटी करू शकते. मला एक फोटोग्राफर लागेल फक्त. पण टीम लागत नाही. आपल्याकडे टीम करणंच मुळात अवघड काम आहे. एक तर हा स्पोर्ट कोणाला माहित नाही, बरं ज्या मुली तरीही थोडंफार जम्पिंग करत आहेत, त्यांचे वेगवेगळे प्रॉब्लेम्स आहेत. एक चांगली मुलगी भेटली होती मला, मराठीच होती. मी तिला विचारलं की आपण टीम बनवूया का? तर ती मला म्हणाली, माझ्या नवर्‍याला आवडणार नाही! मग अश्यावेळी काय बोलणार? हे स्पोर्ट आपल्या देशात वाढणार कसं मग? मला अश्या मुलीच्या माहेरच्यांना, सासरच्यांना सांगायचं आहे की तुम्ही असं का नाही बघत की तुमची मुलगी, सून तुमचं नाव कुठल्या कुठे नेणार आहे ते.. ती घराबाहेर पडेल तेव्हा लोक अभिमानानी म्हणतील की ही अमूक आहे, जी पॅरॅजम्पिंग करते, जी भारताला आंतरराष्ट्रीय स्तरावर रीप्रेझेन्ट करते! हे जोवर होत नाही, तोवर मी एकटीच मला जमेल तसं हे स्पोर्ट फॉलो करणार. आणि एक दिवस निश्चितपणे या स्पोर्टलाही आपल्याकडे मान्यता मिळेल याचा मला विश्वास आहे.

-पण हे स्पोर्ट परदेशात लोकप्रिय आहेच, तर तिथेच जाऊन रहावं, इथे तो पावलोपावली संघर्ष करावा लागेल तो टळेल असं कधी नाही वाटलं?
शीतल: कधीच नाही. आपल्यासारखा देश, आपल्यासारखे लोक आणि आपल्यासारखं अन्न कुठेच नाही मिळू शकणार. आपल्याकडची साधी चटणी-भाकरी खाल्ली तरी एक समाधान मिळतं. मला सरकारी कामात, अनेक परमिशन्स घेताना इतका त्रास झाला, की असं वाटलं की आता माझं काम होऊच नाही शकणार! आणि नेमक्या त्याच वेळी मला कोणीतरी मराठी माणूस, कोणी महाराष्ट्रियन भेटला आहे, ज्याने माझं काम जरी केलं नाही, तरी मला जमेल ती सर्व मदत केली आहे. आणि असा माणूस भेटल्यावरच माझी पुढची कामं फटाफट झाली आहेत. त्यामुळे मी हा देश सोडायचा विचारही नाही करू शकत. मी बरेच देश फिरले आहे, अनेक प्रकारचे लोक बघितले आहेत. पण ’कायम जाऊन रहावं’ असं मला कधीच नाही वाटलं. हा माझा देश आहे आणि इथे मला हे स्पोर्ट आणायचे आहे, बस्स! मी ठरवले आहे की कितीही वेळ का लागेना, पण इथेच जे काय करायचं ते करायचं. मला माझा पासपोर्ट हा भारतीय पास्पोर्टच हवा आहे शेवटपर्यंत.

-पुढच्या योजना काय आहेत?
शीतल: बर्‍याच आहेत. माझ्या डोक्यात सतत तेच चालू असतं, की आता पुढे काय करता येईल, कसं करता येईल? माझे सगळे ब्ल्यूप्रिन्ट्सही तयार आहेत. मला एका सेन्ट्रल लोकेशनला पॅरॅजम्पिंगचे ट्रेनिंग सुरु करायचे आहे. असं लोकेशन की भारतातले सगळे लोक जिथे सहजपणे येऊ शकतील. हे स्पोर्ट नक्की काय आहे, त्यात काय मजा आहे हे जास्तीतजास्त लोकांपर्यंत पोचवायचं आहे मला. बेसिकली हे स्पोर्ट मला भारतामधे आणायचं आहे आणि त्याकरता झटायची माझी तयारी आहे. मला वेळ मिळेल तसतसे माझे सगळे अनुभव लिहूनही काढायचे आहेत, म्हणजे लोकांना एन्ट्रीलेव्हलपासून यातले खाचखळगे कळू शकतील. तसंच नवीन नवीन उंचावरच्या ठिकाणी जाऊन मला तिथून जम्पिंग करायचे आहे. खूप बेत आहेत मनात. वैयक्तिक सांगायचं, तर मी आधी बोलले तसं, मला फ्रीफॉल जम्पिंग मधे काहीतरी करायचं आहे, आपली टीम होऊ शकली तर वर्ल्ड इव्हेन्ट्समधे भारताची टीम म्हणून भाग घ्यायचा आहे. बेसिकली, पॅरॅजम्पिंग आणि फ्लाईंग हेच माझं करीयर आहे आणि त्यामधे जे जे काही शक्य आहे ते ते सगळं मला करायचं आहे, आणि ते होईल असा मला विश्वासही आहे.

शीतलच्या जिगरचं कौतुक वाटल्यावाचून राहवत नाही. तिच्या मनातल्या सर्व योजना पूर्णत्वास जावोत आणि तिचे सर्व बेत सुफळ संपूर्ण होवोत अशी सदिच्छा व्यक्त करून आम्ही या धाडसी मुलीचा निरोप घेतला.