दिसामाजिं काहीतरी....

मी तसा प्रसिद्ध लेखक आहे. नामवंत प्रकाशक माझी पुस्तके छापतात आणि ती खपतातही. काही पुस्तकांच्या दुसरी तिसरी (कधी पाचवी सहावी) अशा आवृत्त्याही निघाल्या. म्हणजे मी लोकप्रिय आहे यावर शिक्कामोर्तब व्हावे. पुस्तक प्रदर्शनांमध्ये माझी पुस्तके असतात त्या ठिकाणी वाचकांची बर्‍यापैकी गर्दी असते. त्यात तरुण मुलंही बरीच असतात. माझ्या पुस्तकांतले काही विचार, वाक्यं तरुणाईला आजही भुरळ घालतात, असं परवाच एका मासिकात माझ्यावरच्या लेखात लिहिलं होतं.

मी आता पन्नाशीच्या पुढे आहे. तरीही खूप सुचतं, लेखन करावंसं वाटतं. याला कारण माझ्या वाचकांचा माझ्यावर असलेला लोभ.... हं हे जरा माझ्या सार्वजनिक भाषणासारखं व्हायला लागलं बरं का! तर ते बाजूला ठेवूया जरा.

आजही मी रोज नेमाने लेखन करतो. 'दिसामाजिं काहीतरी ते लिहावें' वर आमच्या पिढीतल्या लेखकांचा तसा खूप विश्वास. कुठलीशी इंग्रजी लेखिका... अगाथा ख्रिस्ती बहुधा... किंवा अजून कुणी असेल. तुम्हाला म्हणून सांगतो माझा इंग्रजी साहित्याचा तेवढा व्यासंग नाही. तर ती म्हणे, काही लिहिण्यासारखं नसेल तरी टाईपरायटरावर काहीतरी टायपत बसायची. मला मात्र रोज काहीनाकाही सुचतंच. ही देवाची कृपाच म्हणायची.... माझं तर स्पष्ट मत आहे की लेखकाने रोज लिहीत राहिलं पाहिजे. आळस करता कामा नये. कधी लिहिलेलं चांगलं उतरतं; कधी नाही. पण लिहावं.

पण एक काळ... बरं का असाही येऊन गेला माझ्या लेखन कारकीर्दीत की, मी सहा महिने काही लिहिलंच नाही. इतकी वाईट अवस्था की हातात पेन धरवेना. नुस्ती घुसमट... तगमग... लिहायला बसलो की ती एक घटना पुनःपुन्हा आठवायची. मग लिहायची इच्छाच नाहीशी व्हायची. आज मी तुम्हाला सांगतोय ही त्याबद्दलचीच गोष्ट आहे.

तेव्हा मी होतकरू लेखक होतो. दोन चार पुस्तकं गाजलेला. लोक महाराष्ट्रात मला ओळखू लागले होते. बर्‍याच समारंभांसाठी मला 'प्रमुख पाहुणे', 'माननीय वक्ते' म्हणून ठिकठिकाणांहून बोलावणी यायला लागली होती. मीही मजा म्हणून काही समारंभांना हजेरी लावीत असे. माझ्या पुस्तकांची तिथं होणारी अफाट स्तुती मला काही काळ हवेत नक्कीच घेऊन जाई.

'मध्यमवर्गाचं नेमकं चित्र रेखाटण्याबाबतीत यांचा हात कुणीही धरू शकणार नाही,' वगैरे ऐकलं की मान अजून ताठ व्हायची.
"मध्यमवर्गाचं चित्रण करण्याचं काय हो? मीही याच वर्गाचा तुमच्यासारखा घटक नाही का? हे मी लिहितो ते माझं आयुष्य आहे, तुमचं आयुष्य आहे. कदाचित म्हणून ते तुम्हाला भिडत असावं," मी खोट्या विनयाने भाषण करी. श्रोतेही त्या भाषणावर बेहद्द खूष होत.

तर असाच एक कुठलासा समारंभ. एक आडगावातलं कॉलेज होतं ते. तिथे 'विद्यार्थीमित्रांशी हितगुज' अशा चालू फॅशनच्या नावाच्या एका कार्यक्रमात भाषण करायला म्हणून मी तिथे यावं, म्हणून त्या विद्यार्थीमंडळाचे चिटणीस व इतर विद्यार्थी माझ्याकडे आले होते.

"सर, आजच्या तरुण पिढीपुढचा आदर्श आहात तुम्ही. (त्यावेळी मी तिशी जेमतेम पार केली होती.) लहान वयात आपण मिळवलेली साहित्यप्रांतातली कीर्ती. आमचे विद्यार्थी धन्य होतील सर....." मी त्या स्तुतीने विरघळत चाललो होतो. तरी उगीचच डायरीत ती नेमकी तारीख उघडून विचार केल्यासारखं दाखवलं. खरंतर दिवस मोकळाच होता. तोच काय अख्खा आठवडा मोकळाच होता.

"बरं, जमवतो मी नक्की." मी होकार दिला आणि मानधनाचं वगैरे ठरवून मंडळी दहा मिनिटांत गेलीही. मी भाषणाची जुळवाजुळव करत मजेत पडून राहिलो.

ठरल्यावेळी मी स्टेशनावर उतरलो तेव्हा विद्यार्थी माझ्या स्वागताला हजर होतेच. गाडीला गर्दी फारशी नव्हती. त्यातून श्रावणाचा महिना. प्रवास सुरेख झालेला. विद्यार्थ्यांनी हारबीर घातले. एकांकडे जेवायची व्यवस्था केली होती. चवदार जेवण होतं. थोडी विश्रांती मग सभागृहाकडे प्रयाण... नेटका कार्यक्रम होता. कसं छान सुरु होतं सारं. 'सर... लिखाण कसं करावं याबद्दल थोडं बोला ना...' मुलांनी गिल्ला केला.

'अनुभवांनी लेखक समृद्ध होत जातो. ज्यावर लिहावं असं बरंच काही तर आपल्या आजूबाजूला रोज घडत असतं. माणसं वाचायला शिका. येणारे विविध अनुभव डोळसपणे घ्यायला शिका. मग लिहा... तुमचं लिखाण कसं जिवंत होईल मग...'
नेहमीप्रमाणे इथेही मी हुकमी टाळ्या वसूल केल्याच.

...... रात्रीची आठची वेळ. माझी गाडी साडेआठला होती. दिवसभर कोवळं ऊन होतं पण संध्याकाळी आभाळ विचित्र भरून आलं. सातपर्यंत पावसाने जोर धरला. त्यात वीज गेली. मी आटोपतं घेऊन लवकरच स्टेशनवर पोचायचा प्रस्ताव मांडला. हो, उगीच कुठेतरी अडकून पडून परतीची गाडी चुकायला नको.

मला दोन विद्यार्थी सोडायला आले स्टेशनापर्यंत. तेव्हा पावणेआठ वाजत होते. काही मिनिटांतच त्या दोघांची चुळबुळ सुरू झाली.
"काय रे? काही प्रॉब्लेम आहे का?"
"नाही सर. आम्ही..... निघावं म्हणत होतो. पण तुमच्यासोबत कुणीतरी हवं ना... आमची उद्यापासून परीक्षा आहे. त्यातच ही अवांतर कामं.... अभ्यास राहिलाय. फक्त तुम्ही होता म्हणून अभ्यास टाकून .... तुमचं भाषण ऐकायला आलो सर..." तो मनापासून बोलत होता.
"अरे... मग तुम्ही निघा लगेचच. इथे मला पोचवल्याबद्दल धन्यवाद. आता काय मला गाडीत चढून बसायचं आहे फक्त.... तुम्ही खरंच निघा."
"नक्की ना सर? आपल्याला काही त्रास तर नाही होणार ना सर?"

पुनःपुन्हा ते विचारत होते. मी त्यांना निरोप दिला. आठ वाजलेच होते. गाडीला जेमतेम अर्धा तास बाकी होता. जाईल आरामात वेळ, मी विचार केला.....

ते दोघं निघून गेले. स्टेशनावर मी आता एकटा राहिलो. पाऊस थांबला होता जवळजवळ. स्टेशनावर मिणमिण ट्यूबलाईट्स. केवळ स्टेशनावरच येऊ शकतो असा घाण वास. त्यातच भजी, वडे वगैरेंचा तळकट वास मिसळलेला. जवळच खाद्यपदार्थांचा स्टॉल होता. दूर कुठेतरी पाणी गळण्याचा आवाज. आसपास पडलेला कचरा. सिगारेटची थोटकं. गर्दी तुरळक. बाजूला एका माणसाचे गोणत्यात बांधलेले बरेच बोजे. पलिकडे एका बाकावर एक कुटुंब बसलेलं. डबे उघडून काहीतरी खात होते. त्या घाणीत खायचं कसं सुचत होतं देव जाणे! बाकी रेल्वे स्टेशनात दिसणारी नेहमीची जनता. हमाल, चहावाले, खेळणी विकणारे. मीही एक बर्‍यापैकी बाक बघून तिथे टेकलो. तितक्यात घोषणा कानी पडली....

'XXXX एक्स्प्रेस दोन तास उशिरा धावत आहे.'
मी चरफडत रेल्वेला शिव्या घातल्या. कधी साल्या गाड्या वेळेवर धावत नाहीत..... दोन तास? मी घड्याळ बघितलं. सव्वाआठ वाजले होते. साडेदहापर्यंत वेळ कसा काढायचा आता? मघाचे दोन विद्यार्थी केव्हाच सटकले होते. मला त्यांचाही आता राग येऊ लागला होता. कसली परीक्षा अन् कसलं काय? तुमच्या भाषणासाठी अभ्यास टाकून आलो म्हणे! थापा... निव्वळ थापा... कामं टाळायला निमित्त पाहिजे फक्त. मी चरफडत बसून राहिलो.

८:२५.... दहा मिनिटं फक्त? वेळ जाता जाईना. सारखं घड्याळ बघून तरी काय करणार? उठलो. इकडून तिकडे उगाच फेर्‍या मारू लागलो. समोरच रेल्वेचा टिपिकल चहा कॉफीचा स्टॉल होता. काहीतरी करायचं म्हणून एक कप चहा घेतला.

'ए, मला देतो का घेऊन चाहा?'
मी दचकलोच. वळून पाहिलं. मागे 'ती' उभी होती. हो... 'ती'च! कारण तिचं नाव मला शेवटपर्यंत कळू शकलं नाही.
मळकी-फाटकी हिरव्या रंगाची साडी, लाल ब्लाऊज, हातात प्लास्टिकच्या लाल बांगड्या, भुरकट-राठ केसांना बांधलेली लाल रिबीन आणि भावहीन चेहरा... हातात कसलंसं छोटं बोचकं होतं. ते तिने छातीशी घट्ट धरून ठेवलं होतं. मला तिच्याकडे पाहून एकदम शहारल्यासारखं झालं.

स्टॉलवाला एव्हाना तिला हाकलायला लागला होता.
"ए येडे, चल निघ... निघ इथून. काठी फेकून मारेल. साला तरास... कुणालापन चा मागते..."
ती खवळून त्याच्या अंगावर धावून गेली.
"ए तुज्या XXXXX, तू का शिव्या देतो? तुला मागितला का फुकट चाहा? तुला मागितला? हरामी.... तू पैशे घे, चाहा दे. कोण पिणार याची तुला का पंचाईत रे?"
"एऽऽऽ, मी दिल्या शिव्या का तू?" तो तिच्यावर ओरडला.

त्यांची चांगलीच जुंपणार, असं दिसल्यावर मी मधे पडलो. स्टॉलवाल्यासमोर पैसे ठेवले. 'दे तिला चहा!'
'सायेब, तिला नस्ती मेहरबानी दाखवू नका. वेडी हाये ती. साली... अंगात लई रग आहे. कुणावरपन धावून जाते. आख्ख्या स्टेशनाला तरास...' बडबडतच त्याने प्लास्टिकचा कपभरून तिला चहा दिला. तिचं लक्ष फक्त चहाकडे होतं. त्याच्या त्या बडबडीला तिने काहीही प्रत्युत्तर दिलं नाही. चहाचा कप उचलून ती चालू पडली. लांबवर एका बाकावर एक पाय पोटाशी घेऊन चहाचे घोट घेत राहिली. मधूनच एकटक कुठेतरी बघत रहायची.

मी तिच्यापासून थोडा लांबवर बसून तिला न्याहाळू लागलो. कोण असेल ही? कशाने हे असं झालं असेल हिचं? हिला घर असेल का? घरच्यांनी टाकून तर दिलं नसेल? नवर्‍याने टाकलेली बाई असेल का? छळाला कंटाळलेली का रोग वगैरे??? मला प्रश्नांनी भोवंडून टाकलं.

मी तिच्याकडे बघत असल्याचं कळल्यासारखी ती अचानक वळली. माझ्याकडे पाहून हसली. स्टेशनावरच्या त्या रात्रीच्या वातावरणात तिचं हसू अजूनच भयाण वाटलं. अचानक तिला काय वाटलं देव जाणे! एकदम उठून ती माझ्या दिशेने यायला लागली. मला चटकन उठून पलिकडे जायचंही सुचलं नाही. ती जवळ येऊन उभी राहिली. मला विचित्र नजरेने निरखत राहिली. ती तिची नजर मला सहन होईना.

"काय आहे?" मी जरा वरचा सूर लावला.
"थेन्क्यू साहेब." वेडीला थँक्यू वगैरे शिष्टाचार माहीत असणं म्हणजे नवलच! मी कुतुहलाने तिच्याकडे बघत राहिलो.

तिला तेवढंच बोलायचं होतं बहुधा. ती पुन्हा दूर जाऊन बसली. अचानक जोरजोरात हसण्याखिदळण्याचे आवाज ऐकू आले. वळून पाहिलं तर स्टेशनाच्या दारातून पाच-सहा मुलं आत येत होती. त्यांचा एकंदरीत अवतार बघितला तर ती स्टेशनातच राहत असावीत हे सहज कळत होतं. त्यातला सगळ्यांत लहान मुलगा जेमतेम ७-८ वर्षांचा असेल. बाकीचीही ९-१० पासून १३-१४ पर्यंतच्या वयाची. ती आपसांत काहीतरी विनोद करून सारखी मोठमोठ्याने खिदळत होती. त्यांचं त्या वेड्या बाईकडे लक्ष गेलं.
"बघा रे, वेडी पुन्हा वापस आली रे...." एकजण खिदळला. एकाने हळू आवाजात इतरांना काही सांगितलं. परत सगळे खिदळले. ती एका बाकावर बसून त्यांच्याकडे पाहत होती. चेहरा संतापाने वेडावाकडा झालेला तिचा....
"ए वेडी, वापस कशाला आली? म्हातार्‍याशी लगीन करायला आली काय?" अजून एक तिच्याकडे पाहत ओरडला.
"लगीन करून तुम्ही दोघं हितेच स्टेशनात र्‍हाणार काय?"
"उस दिन क्या बोला था रे छोटू तूने? फिरसे बोल.... "
"वेडीचे बच्चे वेडे होनार का शाने होनार?"
"चल, बेट लाऊ... पैला बच्चा वेडा होनार."
"तोपन हितेच स्टेशनात राहनार? का वेड्याच्या हास्पिटलमधे डायरेक?"
"स्टेशन तुझ्या बापाचं काय रे भडव्या?" ती उसळलीच. "तुझ्या मालकीच्या जागेत राहते काय रे मी? साले, सगळी हरामी अवलाद. आयXX साले. आईबापाने स्टेशनावर फेकून दिलेले पोरं..."

झालं. तिची आणि पोरांची आता चांगलीच जुंपली. शिव्यांच्या फैरी झडायला लागल्या. वेडीचा आवाज संतापाने चिरकलेला. मुलांना मात्र तिला चिथवल्याची मजा वाटत असल्याचं जाणवत होतं. तेवढ्यात कुठूनसा एक पोलिस दंडुका उगारून तिथे अवतरला (एरवी मी कधी रेल्वे स्टेशनात पोलिस पाहिला नव्हता. इथे कसा होता कुणास ठाऊक!)...
'साले, कुत्र्याच्या अवलादी..... रोजचे तमाशे करतात....' त्याने सरळ दंडुक्याचे फटके लगावायला सुरुवात केली. पोरं बिलंदर होती, हां-हां म्हणता पसार झाली. वेडी मात्र पोलिसाच्या तावडीत सापडली. त्याने पोरांचाही राग तिच्यावर काढायला सुरुवात केली. जीव खाऊन तो फटके हाणत होता. पण बाई दगडाची... बराच वेळ फटके खाऊनही तोंडातून आवाज नाही. अचानक एक फटका बहुधा वर्मी बसला. तो गुरासारखी किंचाळली. हवालदार भेदरला. मारता हात थांबवून तो तिच्याकडे वळून बघत बघत लांब गेला.

ती कितीतरी वेळ तशीच पडली होती. मेलीबिली तर नसेल ना? मला खूप अस्वस्थ व्हायला झालं. ही गाडी अजून का येत नाही? मी घड्याळ बघितलं. जेमतेम साडेनऊ होत होते. मी पुन्हा तिच्याकडे नजर टाकली. ती तशीच लोळागोळा पडून होती. एक म्हातारा हमाल हळूहळू तिच्यापाशी गेला. त्याने तिला हलवून बघितलं. ती क्षीण कण्हली.

हुश्श! मला जरा हायसं वाटलं. जिवंत तरी होती ती! म्हातार्‍याने तिच्या तोंडावर पाणी शिंपडलं. तिला आधार देऊन उठवायचा प्रयत्न करायला लागला. पण त्याला ते काही जमत नव्हतं. तिला तर शुद्धही नव्हती. त्याने मदतीच्या आशेने इकडेतिकडे बघितलं. मघाच्या त्या कुटुंबाच्या जोरजोरात गप्पा चालल्या होत्या. बोजे असलेला माणूस बसल्याजागी पेंगत होता. स्टेशनावरचे नेहमीचे लोक त्यांना बघून न बघितल्यासारखं करत होते. त्याने माझ्याकडेही दोन-तीन वेळा बघितल्यावर माझा नाईलाज झाला. मी अनिच्छेनेच उठून म्हातार्‍यापाशी गेलो. आम्ही दोघांनी तिला आधार देऊन एका बाकावर झोपवलं. तिला जरा शुद्ध आली होती. त्याही स्थितीत तिच्या चेहर्‍यावर उमटलेलं आश्चर्य मला जाणवलं. तिला सोडून मी माझ्या सामानापाशी परत आलो. बसल्यावर पुन्हा बघितलं, तर तिचं ते बोचकं ती पडली होती, तिथेच पडलं होतं. वेडीने मार खातानाही बोचकं हातातून सोडलं नव्हतं. काय एवढं महत्त्वाचं सामान त्यात होतं, देव जाणे!

प्लॅटफॉर्मच्या दुसर्‍या टोकाकडून पुन्हा त्या मुलांचे आवाज ऐकू आले. त्यातला एक मुलगा,
'म्हातार्‍याचं नि वेडीचं लगीन लावा...' असं काहीतरी जुळवलेलं गाणं मोठमोठ्याने म्हणत होता. पुढेही बरंच काही अश्लील... त्याच्या वयाला ते शोभत नव्हतं. टोळक्यातली इतर मुलं खूष होऊन मोठमोठ्याने हसत होती. तो म्हातारा हमाल नेहमीच त्या वेडीला मदत करत असणार. हा आज घडलेला तमाशाही नेहमीचाच असणार.

काय त्या बाईच्या नशिबी आलं होतं? कदाचित चांगल्या घरातली असावी. घरातल्यांनी कुठल्यातरी कारणावरून घराबाहेर काढलं असणार. मग ही भ्रमिष्टावस्था... तिला काहीतरी आठवत असेल का? ती बरी असेल तेव्हा चांगली दिसत असेल, चांगली राहत असेल. तिचं छोटंसं का होईना एक घर असेल. मग हे? का?

ती आता उठून बसली होती. मधून मधून कण्हत होती. मी मधूनच तिच्याकडे तर मधूनच घड्याळाकडे नजर टाकत होतो. वेळ जाता जात नव्हता. मी काहीतरी चाळा म्हणून बॅग उघडली. आतून ज्यात नेहमी लिखाण करायचो ती वही नि पेन काढला. पानं उलटून काही लिहिणार ('दिसामाजिं काहीतरी...' चा नेम होता ना माझा!) तोच मला ते कात्रण दिसलं.

'मध्यमवर्गातल्या त्याच त्याच पात्रांवर तेच तेच प्रसंग रचून सपक लिखाण करण्यात लेखकाचा हात कुणी धरू शकत नाही. यात बिचार्‍या लेखकाचाही दोष नाही. मध्यमवर्गापलिकडलं अफाट जग बिचार्‍याने कधी बघितलेलंच नाही. अशा झापडबंद लेखनात मग वाचकाला काय गवसणार?......'

नाही म्हटले तरी ती टीका मला बरीच झोंबली होती. मी माझ्या आयुष्यातल्या अनुभवांवर लिहित होतो. त्यात कुणाचे काय गेले? लेखकाला प्रत्येक तर्‍हेच्या आयुष्यावर लिहिण्याची काय सक्ती असते की काय? माझे वाचक माझ्या पुस्तकांवर होते ना खूष? तेवढे पुरेसे नव्हते का?

अचानक मनात विचार चमकून गेला. या वेडीवर लिहावे का? घ्या, मध्यमवर्गापल्याडचीच गोष्ट आहे म्हणावं. मी कागद समोर ओढून ओळी खरडायला सुरुवात केली.

"श्रीराम... श्रीराम" बाजूला आवाज आला म्हणून मी मान वळवून बघितलं. मघाचा तो म्हातारा हमाल माझ्याशेजारी येऊन बसला होता. माझं त्याच्याकडे लक्ष आहे असं वाटल्यासारखा तो बोलायला लागला. बरंचसं स्वतःशी आणि काही माझ्याशी....
"सायेब तुमी सांगा हे बरं का?.. काहून ही पोरं तिला तरास देत्यात? सगळे माजलेत. राहनार सगळे हितेच. पण ती त्यान्ला काय डिष्टर्ब करत नाई वो. तेच रोज हिला छळणार आनि ही भांडणार. तेपन शिव्या देनार. पण मार कोनाला? हिला... एकदा नाई शेंभरदा सांगितलं, नको त्यांच्या नादी लागत जाऊ. ध्यानात राहील तर ना वो...

काय प्राब्लेम झाला तिचा कुनाला ठावं... मुंबईत होती का काय जनू... हिकडं कुनी आनून टाकलं ठावं न्हाई. आनली तवा बेसुध व्हती ती. जाग आली न् काय झालं कुनाला ठावं! डोस्कं फिरल्यागत झालं तिचं. रडत काय व्हती, मोठ्यानं वरडत काय व्हती... सारखी मुंबईची गाडी कोन्ची? मुंबईची गाडी कोन्ची? गाडी आली की पळत जानार, पन गाडीत चढनार नाय... गाडी निघून गेली की ठेसनावर कपाळ बडवत बोंबलनार. मंग तेबी बंद...
आता मुक्यावानी हिंडती, नायतर कोपर्‍यात बसून असती. फकस्त तिला कुनी वावगं, वंगाळ बोललं की लई खवळती.. लई खवळती... तीपन काय करनार वो?" त्याचा आवाज हळूहळू लहान होत गेला. 'श्रीराम... श्रीराम' फक्त ऐकू येत राहिलं.

मला एक अक्षरही लिहवेना. मी उठून पुन्हा चहाच्या स्टॉलपाशी गेलो. एक चहा घेतला, पार्ले-जीचा पुडा घेतला. तिचं बोचकंही उचललं. ती बसली होती तिथे गेलो.

"तात्या, खूप मारलं... आंऽऽऽऽ...." माझी चाहूल लागताच ती म्हणाली. तिला तो म्हातारा हमाल असावा, असं वाटलं असावं. मात्र चहाचा कप बघून तिने एकदम चमकून वर पाहिलं.
"सायेब... मघाचा चहा... बास..." माझ्याकडे पाहून ती पुटपुटली.
"घे चहा... बिस्कीटंपण घे." मी तिच्याशेजारी पुडा ठेवला.
"हे तुझं बोचकं...." मी ते तिच्या बाजूला ठेवलं. तिने ते उघडून बघितलं. रंगीत, जर लावलेल्या ओढणीचा एक मोठा तुकडा होता. बांगड्या होत्या. दोनचार लिपस्टिक्स, नेलपेंटच्या रिकाम्या बाटल्या. अजूनही काहीकाही... तिने पुन्हापुन्हा ते सगळं तपासून बघितलं. पुन्हा बोचकं बांधून शेजारी नीट ठेवलं.
"मुंबईत असते आता मी... सायेब.. तर हा आयXX माझ्या अंगाला हात लावू शकला नसता. नुस्तं अंगाला हात लावू द्यायचेई पैशे घ्यायचे मी.. मोजून पैशे घ्यायचे. हज्जार.. दोन हज्जार... दाहा हज्जार... लोग पैसा फेकते थे अपुनके सामने. हा भडवा स्टॉलवाल्यांकडनं पाच दाहा रुपये खातो. ह्याला तर मी गेटावर उभा ठेवला असता. मस्त पैसा होता. जिंदगी मस्त होती साली. डोकं फिरलं माझं. सक्सेनाशी शादी करायला निघाले मी. सक्सेना... हरामी... कुत्र्याची अवलाद. लगीन नव्हतं करायचं तर सोडून द्यायचं ना मला... पण नाही... हालहाल केले माझे. रोज मारलं. मी त्याला खूप त्रास देते म्हणायचा. एक दिवस ड्रगचं इंजेक्शन टोचून या स्टेशनावर आणून सोडलं. माहीत होतं ना.. त्याला माहीत होतं. ह्या स्टेशनाचा शाप आहे मला... मीच बोल्ले होते ना त्याला... मीच सांगून टाकलं.... तब अपुन प्यार मे पागल था... साली जिंदगी बरबाद झाली..." ती अचानक गदगदून रडू लागली, हुंदके देऊ लागली.

"मला माझा ऐशोआराम परत पायजे. माझा पैसा, एस्ट्राचे रोल्स... मला सगळं पायजे. बास झालं इथे कुत्र्यागत जगणं.. मला मुंबईला जायचंय. पण स्टेशनाचा शाप... तो कधी सुटणार? शाप... स्टेशनाचा... " ती असंबद्ध बरळत राहिली.
"तू मुंबईची आहेस?" मी अभावितपणे विचारलं. ती रडं थांबवून माझ्याकडे डोळे विस्फारून बघत राहिली नि अचानक खदाखदा हसत सुटली.
'मुंबईची? मुंबईची??????? येस्स... अपुन मुंबईकाईच. पण माझ्या गावठी आईबापाला मंजूर नवतं ते. मुंबईचं नाव काढलं की घाल मला लाथा. कोंड मला खोलीत. मला हिरॉईन व्हायचं होतं. नाय जमलं तर एस्ट्रा.. पण सिनेमावर आपली जान कुर्बान. आईबापाला नाय पटायचं. अडाणी साले!
मग रमेश होता ना रमेश... उसके साथ अपुन भाग गया मुंबई. म्हणाला, काम होईन तुझं... पण मोबदला दे. मुडदा... मोबदला काय ते माहीत होतं माला... घे म्हटलं. सिनेमात काम करण्यासाठी काहीही... भडव्याने पुरेपूर मोबदला घेतलान्. माझं पोट वाढलं न् मला टाकून तो गायब झाला... पार गायब... गडप..." ती पुन्हा हुंदके देऊ लागली.

मला त्या सगळ्या गोष्टीचीच शिसारी आली. शी: या असल्या बाईवर मी कथा लिहिणार होतो? माझ्या वाचकांनी जोडे हाणले असते मला. सगळी लोकप्रियता धुळीला मिळाली असती. मी तिथून निघून जाण्यासाठी पाय उचलला.
"सायेब... माझा शाप... सुटेन का हो? मला मुंबईला जायचंय." एवढं सगळं भोगत असूनही डोक्यात फक्त हेच? माझ्या डोक्यात संतापाची तिडीक गेली. तिथे जायचं ते धंदा करायलाच ना? मी खरमरीत काही बोलायला तोंड उघडलं. ती माझ्याकडे आशेने पाहत होती.
मला काय वाटलं कुणास ठाऊक?
"होईल बाई तुझ्या मनासारखं." मी काहीतरी पुटपुटलो.
तिथून लांब जाऊन बसलो.
ते मुलांचं टोळकं जवळच बसलं होतं. त्यांच्यात आता तीनपत्तीचा डाव चालू होता. मुलं असल्या सगळ्या गोष्टींत अगदी मुरलेली दिसत होती. ती अचानक उठली. त्या टोळक्यापासून थोड्या अंतरावर येऊन बसली. त्यांना विचित्र नजरेनं निरखत राहिली.

..... त्या टोळक्यात आता भांडण पेटलं होतं. खेळताना काहीतरी फसवाफसवी झाली असावी. त्यातले दोघे पळत सुटले. बाकीचे तीरासारखे त्यांच्यामागे धावले. ते सगळे प्लॅटफॉर्मच्या दुसर्‍या टोकाला दिसेनासे झाले. तिकडून भांडणाचे अस्पष्ट आवाज येत राहिले. मारामारी चालू असावी. मला अजून अस्वस्थ व्हायला झालं. मी वेळ बघितली. सव्वादहा.. येईलच गाडी १५ मिनिटांत.
तेवढ्यात पुन्हा नतद्रष्ट घोषणा झाली,
'XXXX एक्स्प्रेस अर्धा तास उशिरा धावत आहे.' आज ही गाडी येणार आहे की नाही? आता कुठलीशी मेल पुढे काढली जाणार होती. तिला इथे थांबा नव्हता. नाहीतर त्यात चढून गेलो असतो. या वातावरणातून सुटलो तरी असतो. पण तसं व्हायचं नव्हतं.

पाचच मिनिटांत धडाडधाड करत मेल स्टेशनात शिरली. जराही वेग कमी न करता तिने प्लॅटफॉर्म पार केला. आऊटरच्या सिग्नलपलिकडे गेली असेल नसेल, एक जीवघेणी किंकाळी स्टेशनात घुमली.
इतकावेळ मरगळल्यागत असलेलं स्टेशन जणू खडबडून जागं झालं. सगळीकडे जनता जमा झाली. "क्या हुआ?" "काय झालं?" च्या हैराण चौकशा सुरू झाल्या.
"अरे वो लौंडे है ना स्टेशनपे रहनेवाले.. उनमे से मरा कोई... ट्रेनका धक्का लगा..." कुणीतरी दुरून ओरडलं.

वेडी अचानक खूप उत्तेजित झाली. "कौनसा लौंडा मरा?"
"कुठलं पोरगं? सांग की रे...." ती प्रत्येकाला विचारत सुटली. तिच्या चेहर्‍यावर विचित्र आनंद पसरला होता. मी अंतर्बाह्य शहारलो. इतका द्वेष? इतका तीव्र द्वेष? कुणाच्या मरणाने माणूस इतका आनंदी होऊ शकतो. पलिकडे गर्दी जमा झाली होती. त्या टोळक्यातली दोन मुलं मोठमोठ्याने रडण्याचा आवाज कानावर येत होता.
"वो सबसे छोटा था ना, नीली शर्टवाला... वो मर गया.. ऑन दी स्पॉट मर गया..." कुणीशी उत्साहाने माहिती पुरवली. तो? छोटा मुलगा? मी सुन्न झालो.

वेडी गर्दीत पुढे घुसायला बघत होती. लोकांच्या शिव्या खात होती. पण पुढे घुसत होती. शेवटी ढकलाढकली करून ती पुढे गेलीच.

... पाच मिनिटांनी त्या कोंडाळ्यातून बाहेर पडलेल्या वेडीचा अवतार बघून मी चरकलोच. ती अनिवार हसत होती... गदगदून... मघाच्या यातना, दु:ख, पोलिसाने लगावलेले फटके, मुलांशी झालेलं भांडण कशाचा मागमूस तिच्या चेहर्‍यावर नव्हता. होता तो केवळ भयंकर, उन्मादातला आनंद.
अचानक तिची नजर माझ्याकडे गेली. ती जवळजवळ पळत माझ्याकडे येऊ लागली. माझे पाय जमिनीला खिळले. तिने जवळ येऊन एकदम लोटांगण घातलं माझ्या पायांवर.

"सायेब, तू ग्रेट माणूस. आपण मानलं तुला. तू बोल्ला ना शाप सुटेन... सुटला बघ. माझा ह्या स्टेशनाचा शाप सुटला. सात वर्षांनी रे .. सुटला आता.. वो मर गया. मला मोकळं करून गेला." तिला अनावर हसू येऊ लागलं. तिचा चेहरा तसल्या हसण्याने भेसूर दिसायला लागला.

"रमेशचा पोरगा... गेला तो... हिते टाकून गेले होते ना मी त्याला... सैतान... सात वर्षं जगला तो. एक दिवसाचा टाकून पळून गेले. वाटलं होतं... भुकेनं मरेल अन् सुटेल तो. पण नाही... जगला ना तो. त्यानंच मला दोन वर्षांत हितं खेचून आणलं. याच स्टेशनावर... धंदा करत होते. कधी नाई ती कुणाचीतरी लग्नाची बायको बनायला गेले. सक्सेना... इंजेक्शन... मार... बरोब्बर हितेच आणून टाकलं.... सात वर्षं... लई भोगला रे शाप.. आज संपला... सायेब, तुझ्या आशीर्वादानं संपला."

ती पुन्हा पुन्हा तुटक तुटक तेच तेच बोलत होती. मला मळमळायला लागलं. डोळ्यांसमोर अंधेरी येऊ लागली.

तो? तो गेला तो हिचा मुलगा होता? हिच्या पोटचा? नि ही त्याच्या मरणाची वाट पाहत सात वर्षं इथे राहत होती? अशी आई असू शकते? पोराला टाकून पळून जाणारी? त्याच्या मरणाची इच्छा करणारी? आणि माझ्या आशीर्वादाने तो मेला? इतकी अभद्र वाचासिद्धी मला कधी प्राप्त झाली?

विजेचा झटका बसल्यासारखी ती उठली.
"सायेब, थांब. तुला कायतरी देते. नवस फेडते म्हण पायजेतर.. आलेच.. थांब"
ती पळत सुटली. स्टेशनाबाहेर गेली. मला तिची प्रचंड भीती वाटायला लागली. घामाने माझं अंग डबडबून आलं. मी इकडेतिकडे भ्रमिष्टासारखा फिरू लागलो.

तेवढ्यात देवाने माझी प्रार्थना ऐकल्यासारखी माझ्या गाडीची घोषणा झाली. लगेचच पाच मिनिटांत गाडी स्टेशनात शिरली. वेडीचा कुठेही पत्ता नव्हता. मी धडधडत्या छातीने गाडीत चढलो. रात्र बरीच झाली होती, त्यामुळे लोक गाडीतले दिवे मालवून झोपले होते. माझ्या ते पथ्यावर पडलं. मी माझ्या जागेवर पुतळ्यासारखा बसून राहिलो. बाहेर वेडीच्या हाका ऐकू आल्यासारख्या वाटल्या. "सायेब... सायेब..." मी बसल्याजागी अंग चोरून घेतलं. बर्थवर सपाट आडवा झालो. ती खिडकीशी येऊन गेली असं वाटलं. रात्रभर तिच्या भीतीने मी जागाच होतो................

................माझ्या आयुष्यात जो तथाकथित 'रायटर्स ब्लॉक' येऊन गेला त्याच्या मुळाशी असलेल्या ह्या घटना. नंतर आयुष्यभर मी माझ्या ठराविक साच्यातल्या मध्यमवर्गीय जगण्याबद्दलच्या कादंबर्‍या पाडल्या. पण हे असलं वास्तव, हे इतकं खरं कधीच लिहू शकलो नाही. लेखणी थांबण्यापूर्वी/थांबवण्यापूर्वी एक संपूर्ण सत्यकथा लिहावी, म्हणून हा खटाटोप. बस्स. बाकी काही नाही.

- shraddhak