चैतन्यमूर्ती शम्मी कपूर

का रविवारची सुस्त सकाळ. अचानक कसल्याशा आवाजाने जाग आली. घड्याळ बघितलं तर सात वाजलेले. "रंगोली लागलं असणार" असं म्हणून रिमोटकडे हात गेला. आणि पहिल्याच गाण्याने रविवारी सकाळी सात वाजता जो काही आळस अंगात भरलेला असतो तो पार कुठच्याकुठे पळाला. मी ताडकन उठून उभा राहिलो. "ये चाँद सा रोशन चेहरा, जुल्फों का रंग सुनहरा...." म्हणत काश्मीरच्या दाल लेकमधे शिकार्‍यात शम्मी कपूर शर्मिला टागोरला पटवण्यासाठी बेभान होऊन नाचत होता. आमच्या पिढीतल्या कित्येकांना याच गाण्याने शम्मीचा परिचय करून दिला होता. काही माणसात अजब जादू असते. आपल्या नुसत्या असण्याने ते आसपासच्या सगळ्या मनुष्यमात्रात चैतन्य आणतात. शम्मी कपूर त्यातलाच. घरी कुणी नव्हतं हे माझ्या पथ्यावरच पडलं. सगळ्या खिडक्यांचे पडदे लावून शम्मीच्या नाचावर घरातल्या घरात त्याच्या उत्स्फूर्तपणा आणि बेभानपणाला गाठण्याची पराकाष्ठा करत नाचायला सुरुवात केली.

शेवटी एकदाचा तो बोटीतून धप्पकन पाण्यात पडला, गाणं संपलं, जाहिरात लागली आणि मी भानावर आलो. अचानक एक पोकळी निर्माण झाल्याचं वाटू लागलं. पण तो रविवार त्या काही मिनिटातच साजरा झाला होता.

SK01_KKK.jpg

अशीच एक न भरून येणारी पोकळी चौदा ऑगस्टला शम्मी गेल्याच्या बातमीने निर्माण झाली. हल्ली बातम्या बघायचा अतीव तिटकारा निर्माण झालाय. म्हणूनच शम्मी गेल्याची बातमी समजलीच नाही आधी. चौदा ऑगस्टच्या रात्री मायबोली.कॉम वर मित्रांचे संदेश वाचले "शम्मी कपूर गेला. त्याच्यावर लिहिणार का?" आणि मन विषण्ण झालं. अंगातलं चैतन्य कुणीतरी एकाच क्षणात शोषून घेतल्याचा भास झाला आणि मी सुन्नपणे ते शब्द पुन्हा पुन्हा वाचू लागलो. टीव्हीवर बातमी खरी असल्याची खात्री करून घेतली आणि मग भानावर येऊन त्या मित्रांना उलट संदेश पाठवला.... "हो, लिहिणार!".

चित्रपटसृष्टीतला एखादा माणूस गेल्यावर अगदी घराघरात हळहळ व्यक्त झालेली मी तरी फक्त दोनच व्यक्तींबाबत बघितली. एक सर्वांचे लाडके दादामुनी म्हणजेच अशोक कुमार आणि दुसरा शम्मी कपूर. शम्मीला अहो-जाहो करावसं कधीच वाटलं नाही इतका तो जवळचा वाटायचा. अगदी आमच्या वडिलांच्या पिढीपेक्षा वयस्कर असूनही.

शमशेरराज कपूर असं भारदस्त नाव घेऊन मुंबईत जन्मलेल्या शम्मी कपूरच्या बालपणीची सुरुवातीची वर्ष कलकत्त्यात गेली. वडील पृथ्वीराज कपूर कलकत्त्याच्या न्यू थिएटर्समध्ये अभिनेता म्हणून काम करायचे. सुरुवातीची काही वर्ष तिथे शिक्षण घेतल्यावर मुंबईत त्याने शालेय शिक्षण पूर्ण केलं. कॉलेजमधे तो मात्र फार काळ रमला नाही. लवकरच त्याने शिक्षणाला राम राम ठोकला आणि वडिलांच्याच पृथ्वी थिएटरमध्ये उमेदवारीला सुरुवात केली.

काही काळ तिथे घालवल्यावर १९५३ साली त्याने जीवन ज्योत या चित्रपटाद्वारे नायक म्हणून पडद्यावर पदार्पण केलं. मनमोहक निळे डोळे, अत्यंत देखणा चेहरा, तलवारकट मिशा आणि एकंदरीत रुबाबदार व्यक्तिमत्त्वाच्या शम्मीला सुरूवातीला मात्र यशाने सतत हुलकावणी दिली. त्या काळी प्रस्थापित असलेल्या स्टार्स मधुबाला, नलिनी जयवंत, नूतन यांच्यासारख्या अभिनेत्रींबरोबर अनेक चित्रपट करूनही शम्मीच्या पदरात सतत अपयशाचं दान पडत गेलं. मोठा भाऊ राज कपूरच्या जवळ जाणारं व्यक्तिमत्त्व ही त्याच्या विरोधात जाणारी एक महत्त्वाची गोष्ट. त्या मिशांमुळे म्हणा किंवा सारख्या केशरचनेमुळे म्हणा, तो तसा दिसायचाही. त्याच्यावर राजची नक्कल केल्याचा सुरूवातीला आरोप केला जायचा.

SK02_misha.jpg

यशाच्या प्रतिक्षेत असलेल्या शम्मीच्या आयुष्याला कलाटणी देणारी एक महत्त्वाची घटना घडली. त्या काळात यशस्वी अभिनेत्री म्हणून नाव कमावलेल्या अत्यंत गोड चेहर्‍याच्या गीता बाली बरोबर रंगीन रातें (१९५६) हा चित्रपट करत असताना साहेब तिच्या प्रेमात पडले. "माझ्याशी लग्न कर!" म्हणून अनेक आर्जवं केल्यानंतर अचानक एके दिवशी गीताने "लग्न करते तुझ्याशी, पण आजच्या आज करत असलास तर!" अशी विचित्र अट घातली. मग काय, एका पायावर तयार झालेल्या शम्मीने लगेच तयारी दाखवली आणि दोघे मुंबईतील बाणगंगा परिसरातल्या एका देवळात विवाहबद्ध झाले. विशेष म्हणजे तेव्हा शम्मी हा चित्रपटसृष्टीत कुणीही नव्हता आणि गीता लोकप्रिय अभिनेत्री म्हणून आधीच प्रस्थापित झाली होती. शम्मीच्या आयुष्यात एका भक्कम आधाराने आता प्रवेश केला होता.

SK03_Marriage.jpg

शम्मीने त्याच्या तलवारकट मिशांना सोडचिठ्ठी दिल्यावर त्याचं नशीब फळफळलं. मग आला तो फिल्मिस्तान स्टुडिओजच्या नासिर हुसैनने काढलेला तुमसा नहीं देखा (१९५७). तोपर्यंत अपयशाला कंटाळलेल्या आणि हा चित्रपट न चालल्यास चित्रपटसृष्टीलाच रामराम ठोकण्याच्या निर्णयाप्रत आलेल्या शम्मी कपूरला या सिनेमाने चांगलाच हात दिला. तिकीटबारीवर घवघवीत यश तर या चित्रपटाने मिळवलंच, शिवाय शम्मीला रातोरात तरुणांच्या हृदयाची धडकन म्हणून स्थानही मिळवून दिलं. चॉकलेटी अभिनय करणारा देव आनंद, तुपकट चेहर्‍याचा राज कपूर आणि 'करुण' कुमार दिलीप कुमार यांनी आपल्याभोवती बांधलेल्या चाहत्यांच्या आवडीनिवडीच्या अभेद्य भासणार्‍या कवचाला शम्मीने अखेर भेदलं होतं. मूर्तीमंत चैतन्य असलेल्या शम्मीच्या रूपात तरुण वर्गाला या सिनेमाने एक नवा 'युथ आयकॉन' मिळवून दिला. एका आख्ख्या पिढीला वेड लावलं, बेभान केलं.

तुमसा नहीं देखा नंतर दोन वर्षांनी आलेल्या दिल देके देखो (१९५९) या चित्रपटामुळे उंच, गोर्‍यागोमट्या, खेळकर व्यक्तिमत्त्वाच्या शम्मी कपूरचं धडाकेबाज नायक म्हणून तरुणांच्या हृदयातलं स्थान आणखी पक्कं झालं. हे दोन चित्रपट केवळ शम्मीसाठीच नव्हे तर अनुक्रमे अमिता व आशा पारेख या दोन नवोदित अभिनेत्रींसाठीही परीसस्पर्श ठरले. दोघी पुढे नामवंत अभिनेत्री म्हणून नावाजल्या गेल्या. यानंतर नवोदित अभिनेत्रींना शम्मी कपूरबरोबर संधी देण्याची निर्मात्यांमध्ये स्पर्धाच लागली.

SK04_TSDDDD.jpg

उपरोल्लेखित दोन चित्रपटांनी शम्मी कपूरच्या एक धडाकेबाज आणि बिंधास नायक म्हणून प्रस्थापित केलेल्या प्रतिमेवर त्यानंतर आलेल्या जंगलीने (१९६१) शिक्कामोर्तब केलं. 'जंगली' तून सायरा बानोने रुपेरी पडद्यावर पदार्पण केलं. या चित्रपटातलं (अर्थातच रफीच्या आवाजातलं) याssssssहू हे गाणं त्या वेळीच काय तर आजही तितकंच लोकप्रिय आहे.

यानंतर शम्मीने जंगली, दिल तेरा दीवाना, प्रोफेसर, चायना टाऊन, ब्लफ मास्टर, राजकुमार, कश्मीर की कली, आणि जानवर अशा यशस्वी चित्रपटांची रांगच लावली. शम्मीच्या चित्रपटांचं एक अविभाज्य अंग (म्हणजे काश्मीर हे भारताचं अविभाज्य वगैरे अंग आहे त्यापेक्षा जास्तच अविभाज्य) म्हणजे रफीच्या स्वर्गीय आवाजात गायलेली कर्णमधुर गाणी. तुमसा नहीं देखा मधलं "यूं तो हमने लाख हसीं देखें है, तुमसा नहीं देखा" आणि दिल देके देखो मधलं "दिल देके देखो, दिल देके देखो, दिल देके देखो जी, दिल लेने वालों दिल देना सीखो जी" या चित्रपटांपासून सुरू झाला तो रफी आणि शम्मीचा चित्रपटसृष्टीतील एकमेवाद्वितीय असा सुरेल आणि देखणा प्रवास. मुळातच संगीताची उत्कृष्ट जाण असलेल्या शम्मी कपूरने प्रत्येक गाण्यातली प्रत्येक फ्रेम आपल्या चैतन्यपूर्ण देहबोलीने आणि नितांतसुंदर अभिनयाने पडद्यावर प्रेक्षणीय केली, तर स्वर्गीय गळ्याच्या रफीने प्रत्येक गाणं श्रवणीय करून सोडलं. शम्मीच्या अभिनयाला साजेसा आवाज देण्याकडे रफीचा नेहमीच कटाक्ष असे. शम्मी स्वतःच्या प्रत्येक गाण्याच्या ध्वनिमुद्रणाच्या वेळी जातीने हजर असे. शम्मी कपूरने अनेकदा "रफी साहेबांशिवाय मी कुणीच नव्हतो!" हे जाहीररीत्या कबूल केलं आहे. जेव्हा रफीचं निधन झालं तेव्हा ती बातमी त्यांना "शम्मीजी, तुमचा आवाज गेला!" अशी सांगण्यात आली.

SK05_RAFI.jpg

अर्थात यामुळे धम्माल आणि धागडधिंगा असलेला नाच एवढीच शम्मीच्या गाण्यांची ओळख आहे असा समज मात्र कुणी करून घेऊ नये. सुंदर मुद्राभिनयातही तितकंच प्राविण्य मिळवलेल्या शम्मीने हळुवार रोमँटिक गाण्यांनाही तितकंच प्रेक्षणीय केलं. तुमने मुझे देखा होकर मेहरबाँ, एहसान तेरा होगा मुझपर, ए गुलबदन, है दुनिया उसीकी जमाना उसीका, हम और तुम और ये समां, तुमने किसी की जान को जाते हुए देखा है, इशारों इशारों मे दिल लेने वाले, रात के हमसफर थक के घर को चले, मै जागू तुम सो जाओ ही व अशी अनेक गाणी आठवून बघा. शम्मी कपूर हा अष्टपैलू अभिनेता असल्याची तुमची नक्की खात्री पटेल.

देव आनंदला नाचता येत नसेच. पण राज आणि दिलीप या दोघांनी नाचण्याचा फारसा प्रयत्न केल्याचं ऐकिवात नाही. तेव्हा चित्रपटांत कथेच्या नावाखाली काहीही चालून जात असलं तरी प्रेक्षक मोर आणि माकड यांमध्ये नक्कीच फरक करू शकत असले पाहिजेत, कारण पुढे एक गृहस्थ जंपिंग जॅक म्हणून प्रसिद्धीस आले तरी त्यांना कुणी छान 'नाचतो' असं म्हणायला धजावलं नाही. शम्मीने मात्र उत्तम नाचणारा नायक म्हणून अनेक वर्ष सिनेरसिकांच्या मनावर अधिराज्य केलं. त्याला नाचता येत नसे असे तो म्हणे. विश्वास बसतो? गाण्यात नाचणं कुठे आवश्यक आहे, कुठे लयबद्ध पदलालित्य अपेक्षित आहे हे अचूक ओळखून तो स्वतःच कसं नाचायचं ते ठरवी. शम्मीला संगीताची आणि ठेक्याची इतकी चांगली जाण होती की त्याच्या गाण्यांसाठी त्याला कधीही नृत्यदिग्दर्शकाची गरज पडलीच नाही. एक काळ असा होता की गाण्यावर शम्मी नाचतोय की त्याच्या नाचामुळे गाणं बहरतंय असा प्रश्न पडावा. 'गोविंदा आला रे आला' हे गाणं आठवा, आजही हे गाणं लागलं की कृष्णभक्ती आणि कान्हाचा नटखटपणा याचं मिश्रण चेहर्‍यावर बाळगत रस्त्यावर बेभान होऊन नाचणारा शम्मीच डोळ्यांसमोर येतो.

SK06_Govinda.jpg

जणू शम्मीच गातोय असं वाटावं इतका फिट बसणारा रफीसाहेबांचा आवाज आणि उत्स्फूर्ततेचं उत्तम उदाहरण असलेला शम्मीचा अप्रतिम नाच या गोष्टींमुळे शम्मी 'भारताचा एल्विस प्रिस्ली' म्हणून ओळखला जाऊ लागला. याचं उत्तम उदाहरण म्हणजे १९६६ साली आलेला गोल्डीचा तीसरी मंझिल हा चित्रपट. प्रचंड लोकप्रिय झालेला हा रहस्यपट मात्र अत्यंत नाट्यमय रीतीने शम्मीच्या पदरात पडला. एका पार्टीत निर्माता नासीर हुसेनशी झालेल्या कडाक्याच्या भांडणानंतर देव आनंद या चित्रपटातून बाहेर पडला (बरं झालं, नाहीतर बेभान होऊन देव आनंद ड्रम वाजवतोय की ड्रम देव आनंदला वाजवतायत असा प्रश्न पडला असता) आणि शम्मी कपूरचा नायक म्हणून चित्रपटात प्रवेश झाला. दिग्दर्शकाच्या भूमिकेत गोल्डी मात्र तसाच राहिला. 'ओ हसीना जुल्फों वाली' या गाण्यात नृत्यनिपुण हेलनच्या प्रत्येक अदा आणि पदलालित्याला तोडीस तोड नाच शम्मीने करून दाखवला आहे. या चित्रपटातलं एक दृश्य शम्मी त्याच्या कारकिर्दीच्या सर्वोच्च टप्प्यावर ('पीक') असल्याची जाणीव करून देतं. प्रेमनाथने एका खोलीत पाठवल्यावर कपाट उघडून त्यातला एक वेश तो परिधान करतो. त्याच वेळी त्याची बटणं बघून त्याला अचानक खुनी कोण ते ध्यानात येतं, तेंव्हा त्याचे विस्फारलेले डोळे आणि अप्रतिम मुद्राभिनय आपल्याला जिंकून जातो.

SK07_OhHasinaZulfowali.jpg

तीसरी मंझिलचं चित्रीकरण सुरू असतानाच गीता बाली देवीच्या आजाराला बळी पडून हे जग सोडून गेली. या घटनेने शम्मीला बसलेला धक्का इतका मोठा होता की जवळजवळ तीन महिने तो चित्रीकरणात सहभागी होऊ शकला नाही. शम्मी कपूरची मानसिक अवस्था लक्षात घेत त्याला सांभाळून घेऊन अशा नाजूक परिस्थितीतही विजय आनंदने हा चित्रपट ठरलेल्या वेळेत पूर्ण केला. नायक म्हणून कारकिर्दीसाठी शम्मीच्या आयुष्यात गीताचा प्रवेश जसा शुभशकुन ठरला, तसाच गीताचा मृत्यू हा अपशकुन. याच चित्रपटानंतर शम्मी्चा कारकिर्दीतला दुसरा टप्पा सुरू झाला. अनेक चित्रपटांमधून झालेल्या अनेक छोट्यामोठ्या अपघातांमुळे झालेल्या दुखापतींमुळे त्याच्या नाचण्यावर बंधनं आली आणि त्याची कारकिर्द नायक म्हणून हळूहळू उतरणीला लागायला सुरुवात झाली.

अर्थात या कालावधीतही शम्मीने अनेक सुंदर आणि लोकप्रिय कलाकृतींचा आनंद सिनेरसिकांना दिला. बदतमीज, लाट साहब, अ‍ॅन इव्हनिंग इन पॅरिस, प्रिन्स यासारखे सिनेमे हे याहू पठडीतल्या शम्मी कपूरची आठवण करून देत राहिले, तर ब्रह्मचारी आणि अंदाज या चित्रपटातून त्याच्या प्रगल्भ आणि संयत अभिनयाचं दर्शन घडलं. यांपैकी 'ब्रह्मचारी' ने त्याला त्याच्या कारकिर्दीतलं एकमेव फिल्मफेअरचं सर्वोत्कृष्ठ अभिनेता हे पारितोषिक मिळवून दिलं. याच सिनेमातील 'मैं जागू तुम सो जाओ' या गाण्यात शम्मीच्या चेहर्‍यावर मूर्तीमंत वात्सल्य झळकताना आपल्याला दिसतं.

शम्मीच्या चरित्र भूमिकांची खर्‍या अर्थाने सुरुवात झमीर या चित्रपटापासून झाली आणि या अष्टपैलू अभिनेत्याने कारकिर्दीतला हा टप्पाही यशस्वीपणे पेलला. इंग्रजी चित्रपट इर्मा ला दूस (Irma La Douce) ची नक्कल असलेला मनोरंजन या चित्रपटात अभिनयाबरोबाच दिग्दर्शनही करुन त्याने एका वेगळ्या भूमिकेत शिरायचा प्रयत्न केला, पण हा प्रयत्न त्यानंतर आलेल्या बंडलबाज या चित्रपटापर्यंतच टिकला. विधाता चित्रपटातल्या भूमिकेने त्याला सर्वोत्कृष्ठ सहाय्यक अभिनेत्याचं पारितोषिक मिळवून दिलं. मग परवरिश, मीरा, रॉकी, नसीब, हीरो, बेताब, इजाजत अशा चित्रपटांद्वारे तो मोठ्या पडद्यावर झळकत राहिला. शेवटी नव्वदच्या दशकात त्याने चित्रपटामधे भूमिका करणं कमी कमी करत शांत जीवन जगणं पसंत केलं.

SK08_Internet.jpg

पण शांत बसेल तर तो शम्मी कसला? कंप्यूटर सॅव्ही असलेला शम्मी भारतात इंटरनेटच्या पहिल्या वापरकर्त्यांपैकी एक होता. इतकंच नव्हे तर आंतरजाल वापरणार्‍यांची संघटना 'इंटरनेट युजर्स कम्युनिटी ऑफ इंडिया' (ICUI) चा तो संस्थापक अध्यक्षही होता. त्याच्याच म्हणण्यानुसार "भारतात इंटरनेट येण्याआधीपासून मी इंटरनेट वापरतोय!". गंमत म्हणजे शेवटपर्यंत विंडोज आणि मायक्रोसॉफ्टच्या आहारी न जाता निष्ठेने अ‍ॅपल मॅक वापरलं. शम्मी त्याच्या भरभराटीच्या काळात जसा शांत आणि समजूतदार होता, तसाच तो निवृत्तीनंतरही तितकाच प्रेमळ आणि दानशूर राहिला. अनेक वर्षांपूर्वी 'जयबाला आशर' नामक एका तरुणीवर रेल्वेगाडीत एका व्यसनाधीन तरुणाने हल्ला करुन चालत्या ट्रेनमधून खाली ढकलून दिले होते आणि या घटनेत तिला तिचे दोन्ही पाय गमवावे लागले होते. शम्मीने त्या तरुणीस बर्‍याचदा भेट देऊन तिचं दु:ख हलकं करण्याचा प्रयत्न केला आणि ती इस्पितळातून घरी गेल्यावर तिला एक नवा कोरा संगणक भेट म्हणून दिला.

किडनीच्या विकाराने ग्रासलेल्या शम्मीला डायलिसिस सारख्या त्रासदायक प्रक्रियेसाठी आठवड्यातून तीनदा इस्पितळात यावं लागे. अशावेळी स्वभावात कडवटपणा, किरकिरेपणा शिरण्याची शक्यता असते. पण "The difficulties of life are intended to make us better, not bitter" ह्या पंक्ती अक्षरशः जगलेल्या शम्मीचा एकंदर जीवनाबद्दल सकारात्मक दृष्टीकोन कधी बदलला नाही. शेवटपर्यंत त्याची 'देवाने मला आयुष्यात भरभरून दिलं आहे आणि माझी कशाबद्दलही काहीच तक्रार नाही' हीच वृत्ती कायम राहिली. ह्या त्याच्या प्रवासात त्याला खंबीर साथ होती ती त्याची द्वितीय पत्नी नीलाची.

SK09_WC.jpg

याच आजाराशी लढता लढता अखेर शम्मी कपूरने १४ ऑगस्ट २०११ च्या पहाटे इहलोकीची यात्रा संपवली. त्याच्या अंत्यसंस्कारांना त्याचा धाकटा भाऊ शशी कपूर व्हीलचेअरवर हजर होता. त्याच्या चेहर्‍यावरचे भाव जणू म्हणत होते, "मरे एक त्याचा दुजा शोक वाहे, अकस्मात तो ही पुढे जात आहे."

मला खात्री आहे. शम्मी कपूरचा आत्मा न्यायला यम स्वतः आला असणार. इतकंच नव्हे तर त्याच्यासारख्या राजकुमाराला न्यायला स्वर्गातून एक स्पेशल हत्तीही सोबत आणला असणार. त्याच्या पृथ्वीतलावरच्या वास्तव्याची स्तुती करत कुणीतरी गाणंही म्हणत गेलं असेल "आगे पीछे तुम्हारी सरकार, तुम थे यहाँ के राजकुमार".

SK10_ZEND.JPG

- मंदार_जोशी