शोभा चित्रे-दिलीप चित्रे

संवादः शोभा चित्रे आणि दिलीप चित्रे
मुलाखतकार: वैशाली राजे

शोभा आणि दिलीप चित्रे ही नावं साहित्यप्रेमींना नवीन नाहीत. परदेशी वास्तव्य करून असणार्‍या भारतीयांचं मनोगत प्रथमच मराठी वाचकांपुढे मांडणारे साहित्यिक म्हणून ते भारताबाहेर तसेच भारतातल्या मराठी जनतेला परिचित आहेत. चित्रे दांपत्य मूळचे बडोद्याचे, पण गेली ३७ वर्षे त्यांचे अमेरिकेत वास्तव्य आहे. 'गोठलेल्या वाटा', 'गौरी गौरी कुठे आलीस', 'पानगळीच्या आठवणी' ही शोभाताईंची काही गाजलेली पुस्तकं, तसंच 'हिमगंध' हा कवितासंग्रह आणि 'अलिबाबाची हीच गुहा' हे दिलीप चित्रे यांचं नाटक सर्वपरिचित आहे.

अमेरिकेत मराठी साहित्य, नाटक, चित्रपट, काव्यवाचन अशा मराठी मनाशी संबंधित अनेक गोष्टींचे संयोजन त्यांनी केले आहे. 'महाराष्ट्र फाऊंडेशन' या संस्थेमध्ये तिच्या स्थापनेपासून आजपर्यंत शोभा आणि दिलीप चित्रे कार्य करत आहेत. नुकताच दोघांनी मिळून केलेला एक प्रकल्प म्हणजे 'मीना - हिरॉईन ऑफ अफगाणिस्तान' ह्या मेलडी चेव्हिस यांच्या इंग्रजी पुस्तकाचा 'मीना - अफगाण मुक्तीचा आक्रोश' या नावाने केलेला अनुवाद. जून महिन्यात या पुस्तकाचा प्रकाशन समारंभ अमेरिकेत झाला. या समारंभात प्रथम या दांपत्याशी भेट झाली. 'मायबोली'साठी मुलाखत देण्याची विनंती त्यांनी आनंदाने स्वीकारली. त्यांच्याशी झालेला संवाद हितगुज दिवाळी अंकाच्या वाचकांसाठी सादर करीत आहे.

दिलीप चित्रे : मी दिलीप वि. चित्रे, म्हणजे दिलीप विष्णू चित्रे. मित्र माझा उल्लेख 'विचित्रे' असा करतात. बर्‍याचदा लोकांचा घोटाळा होतो माझ्या नावामुळे. 'दिलीप पुरुषोत्तम चित्रे' म्हणून मोठे मराठी साहित्यिक आहेत. ते दि. पु. चित्रे वेगळे. मला लहानपणापासूनच आवड होती लिहिण्याची. मी 'सत्यकथा' अगदी लहान असताना वाचायला सुरुवात केली, तेव्हापासून ते अगदी बंद पडेपर्यंत मी त्याचा प्रमोटर होतो. अगदी अमेरिकेतही मी त्याचे वर्गणीदार जमवले. शाळा, कॉलेजमध्ये असताना कथा, कविता लिहायला लागलो. पारितोषिकं मिळवली. पु. वा. चित्रे, म्हणजे 'दिपुं'चे वडील, हे 'अभिरुची'चे संपादक होते. त्यातही माझ्या काही कविता प्रसिद्ध झाल्या. बडोद्याला 'मराठी वाङ्मयपरिषद' नावाची संस्था आहे. त्याचा वाङ्मयउत्सव असतो. तेव्हा स्पर्धा असायच्या, त्यात मी भाग घेऊ लागलो. पारितोषिकं मिळवली. एकदा तर सगळ्यांच साहित्यप्रकारात मला प्रथम पारितोषिक मिळालं, मग मी भाग घेणं थांबवलं. वाङ्मयपरिषदेच्या एक्झेक्युटिव्ह कमिटीवर होतो सेक्रेटरी म्हणून. कॉलेजमध्ये असताना माझ्या कविता मासिकांत वगैरे प्रसिद्ध व्हायला लागल्या. कॉलेज संपले, नोकरी लागली, मग त्यानिमित्त देशाबाहेर पडलो.

परदेशी साहित्य : एक चळवळ

अमेरिकेत यायच्या आधी ३ वर्षं आम्ही लंडनला होतो. तेव्हा जाणवलं, की तिथे राहणार्‍या मराठी लोकांना साहित्याची ओळख नाही, आवड नाही. साहित्याबद्दल कळकळ अशी फार नव्हती. मनोरंजनात्मक वाचनच करायचे लोक, अभ्यासपूर्ण असं नाही. तेव्हा पहिल्यांदा मी 'दीपावली' मासिकाचा 'लंडन विशेषांक' काढला. या कामात माझे लंडनचे मित्र कै. मुकुंद सोनपाटकी हे सुद्धा सहभागी होते. दीनानाथ दलाल संपादक होते. मुखपृष्ठ, जाहिराती यांपासून त्या अंकाचं सगळं काम लंडनमध्येच करण्यात आलं. परदेशातील अनुभवाचं चित्र साहित्यात येणं हे नवीन होतं तेव्हा. नारळीकरांपासून सर्वांचं साहित्य होतं त्यात. हा प्रकल्प खूप गाजला.

इथे आल्यानंतर वाटलं परदेशस्थ भारतीयांच्या, मराठी लोकांच्या लेखनाला शाश्वत स्वरूप द्यावं. कथासंग्रह करावा. भारताबाहेरच्या लोकांचे अनुभव मराठी साहित्यात यावेत. यातून काही वेगळं तयार होईल का, असा विचार मनात आला. त्यासाठी 'कथा' हा फॉर्म निवडला. मग १२ वर्षं प्रयत्न केला. तेव्हा कंप्युटर नव्हता, फोनसंपर्क कठीण, पत्रोत्तराला विलंब लागायचा. अश्या परिस्थितीत जपान, मिडल इस्ट, रशिया, ऑस्ट्रेलिया इकडे सर्वांना पत्रं पाठवून लिहिण्याबद्दल कळवलं. लिहिणारे लोक नवीन होते, परदेशी राहण्याचा अनुभव घेत होते. असं काही लिहावं, अशी कल्पनाही त्यांच्या मनात नव्हती. पण लेखनामध्ये परदेशाच्या किंवा तिथे राहण्याबद्दलच्या नुसत्या कौतुकाचा भाग नको होता. 'परदेशी साहित्य' असा एक नवीन फॉर्म तयार होईल, असं शाश्वत स्वरूप त्या लेखनाला द्यायचा विचार होता. तेव्हा काही लोकांनी मला वेड्यात काढलं, पण आज ही वस्तुस्थिती आहे. दलित साहित्य असंच आलं. ग्रामीण साहित्याची सुरुवात माडगूळकर, शंकर पाटील यांच्यापासून झाली आणि मग ते प्रस्थापित झालं. तसंच या परदेशी साहित्याचं. त्याचा मोठा प्रकल्प झाला. मराठी कथाविश्वाचा ढाचा बदलला. एक लँडमार्क म्हणून हे पुस्तक, 'कुंपणापलिकडचे शेत' प्रसिद्ध झालं. मराठीचं क्षितीज विस्तारलं गेलं.

गंमत अशी की लोक पर्यटनासाठी म्हणून परदेशी जातात, पंधरा दिवस फिरतात आणि आमच्याविषयी लिहितात. यात कधीकधी चुकीचं चित्र निर्माण होतं. तरी मागे जाऊन पाहिलं, तर अनंत काणेकरांचं 'धुक्यातून लाल तार्‍याकडे' हे रशियावरचं पुस्तक मला आवडलं. प्रवासवर्णन आहे, बाकी लेखनातून परदेशातल्या जीवनाचे अनुभव आहेत का? ते नसले, तर चुकीचं चित्र निर्माण होऊ शकतं. हे थांबलं पाहिजे म्हणून आम्ही लढा दिला असं म्हणायला हरकत नाही. तिथे राहणार्‍या लोकांचं आयुष्य हे पर्यटनासाठी येऊन कळत नाही. अपर्णाचं (अपर्णा वेलणकर) 'फॉर हियर ऑर टू गो' हे नवीन पुस्तक पाहिलंयस? त्याच्या प्रस्तावनेत मी हेच म्हटलंय, खोल पाण्यात बुडी घ्यावी लागते, काठावरून सुखंदु:खं कळत नाहीत. मी इथे आलो तेव्हा 'हायर आणि फायर' माहीत नव्हतं. शेजार्‍याचा जॉब जातो... मी नुकताच आलोय. त्यात माझा रंग वेगळा. इन्टरव्ह्यूला गेलात... दुसरा गोरा, इथे जन्मलेला... तर कोणाला सिलेक्ट करतील? मग always try to be better than somebody else. कुंपणापलिकडचं शेत लांबून नेहमीच हिरवंगार दिसतं. त्यावरून चालायला सुरुवात केलीत की खरे अनुभव येतात. ते अनुभव या पुस्तकात लोकांनी मांडले.

शोभा चित्रे : मला वाचनाची आवड होती, मी नुसतं वाचन करायचे. लेखन कधी केलं नव्हतं. पण दिलीपनी तेव्हा जो विचार मांडला, परदेशी साहित्याबद्दलचा, तो मला अतिशय आवडला. मी विचार करत होते की पदरचे पैसे घालावे का, कारण कोणी प्रकाशक ओळखीचे नव्हते. दिलीपचे प्रयत्न मी पाहत होते. आलेल्या साहित्यातून पुस्तकासाठी श्री. पु.(भागवत)नी लेखनाची निवड करायची एवढं ठरलं होतं. नवर्‍याच्या धडपडीला थोडीशी मदत म्हणून मग मी या पुस्तकासाठी एक कथा लिहायचं ठरवलं. मला भीती वाटत होती, की ही कथा दिलीपला कशी दाखवायची? श्रीपुंचं नाव एवढं मोठं, त्याचा तर मी विचारच नाही केला. तेव्हा मी भारतात जाणार होते, तर जाण्यापूर्वी ती कथा मी दिलीपला देऊन निघून गेले. मग दिलीपही नंतर मुंबईला आले, तेव्हा ठरवलं की कथेवर नाव नाही टाकायचं, कारण दिलीपच पुस्तकाचं सगळं काम करत होते आणि त्यांच्याच पत्नीनं लिहिलेली कथा, तेव्हा श्रीपुंवर काही दडपण येऊ नये असं मला वाटत होतं. जमलेल्या सगळ्या कथांबरोबर ती कथा माझं नाव न घालता पाठवली. मग श्रीपुंनी ती कथा चांगली आहे, पुस्तकाच्या संकल्पनेमध्ये बसते आणि घ्यावी असं मत देऊन त्या कथेची निवड केली आणि विचारलं, कोणी लिहिली आहे? तेव्हा सांगितलं, की शोभाने लिहिली आहे. ती कथा जशीच्या तशी घेतली, एकाही शब्दाचा बदल केला नाही. श्रीपुंशी नंतरही आमचे घनिष्ठ संबंध राहिले. तेव्हा ते मला म्हणायचे, की तुम्ही लिहा, चांगलं लिहू शकाल.

तेव्हा मुलं लहान होती, वेळ मिळायचा नाही. पण परदेशातल्या भारतीयांबद्दलचं चुकीचं लेखन पाहून वाईट वाटायचं. एक आई म्हणून मला कधीकधी फार राग यायचा की इथल्या आमच्या मुलांबद्दल तुम्ही असं कसं लिहिता? मग वाटलं की आपणच लिहिलं पाहिजे. मग मी इथल्या अनुभवांवर आधारीत असे एक एक लेख लिहायला सुरुवात केली. ते लेख 'गोठलेल्या वाटा' या पुस्तकरुपाने प्रसिद्ध झाले.

दिलीप चित्रे : तसं म्हटलं तर हा मोठा शब्द होईल, पण आम्ही ही एक movement च सुरू केली. परदेशी साहित्याबद्दल एक चळवळच सुरु केली. त्यानंतर खूपजण पुढे आले. 'कुंपणापलिकडचे शेत' प्रसिद्ध झालं, तेव्हा 'एकता' मासिकाची सुरुवात झाली होती. मग अजिता काळेंचा कथासंग्रह आला. त्यातही त्यांनी सांगितलं आहे की चित्रेंच्या जुलमी आग्रहाखातर मी आयुष्यातली पहिली कथा लिहिली आणि आज माझा कथासंग्रह प्रसिद्ध होतो आहे. परदेशी साहित्य म्हणजे नुसती गाड्या, मॉल्स, ऐश्वर्य यांची वर्णनं नकोत. तिथे पोहोचेपर्यंत जे कष्ट आहेत ते लोकांना दिसत नाहीत. शरद पवार मुख्यमंत्री होते तेव्हाची गोष्ट. ते म्हणाले परदेशी जाणार्‍या प्रत्येकाला विमानतळावर 'गोठलेल्या वाटा' या पुस्तकाची एक प्रत भेट दिली पाहिजे! १९८७ साली न्यूजर्सीत बीएमएमचं अधिवेशन झालं तेव्हा पुलं आले होते. त्यांनी भाषणात 'गोठलेल्या वाटा'चा उल्लेख केला, तेव्हा इथल्या लोकांना खूप बरं वाटलं, शोभा इथली म्हणून. सभागृहात टाळ्यांचा कडकडाट झाला.

शोभा चित्रे : लिहिणार्‍या प्रत्येकाचाच एक प्रवास होतो. तसा 'गोठलेल्या वाटा'पासून 'गौरी गौरी कुठे आलीस'पर्यंत आहे. 'गोठलेल्या वाटा'मध्ये एक सार्वत्रिक, प्रातिनिधिक अनुभव होता तो मांडला होता. ते लोकांना आपले वाटले. 'गौरी गौरी..'मध्ये माझे वैयक्तिक अनुभव आहेत. 'गौरी गौरी कुठे आलीस' यातला शीर्षकाचा लेख प्रथम 'मौज'च्या दिवाळी अंकात प्रसिद्ध झाला, त्याला 'सर्वोत्तम ललित लेख' म्हणून 'अनंत काणेकर पुरस्कार' मिळाला होता. 'गौरी गौरी कुठे आलीस'मध्ये माझे जरी वैयक्तिक अनुभव असले, तरी लोकांनी त्यात आपल्या ओळखीचे अनुभव शोधायचा प्रयत्न केला. गौरीचा साधा प्रसंग, पण तो एका वेगळ्याच स्तरावर जातो. गौरीला कुठे आलीस आणि काय पाहतेस विचारल्यावर त्यातून येणार्‍या उत्तरांतून तुमच्या अपेक्षा, हव्यास दिसतो. गौर पळवणारा तो वाघोबा, हव्यासाचा वाघोबा... तो कुठंतरी थांबायला हवा अशा अर्थाने.

गोठलेल्या वाटा आणि गौरी गौरी यांच्यामध्ये माझं एक पुस्तक आलं, 'पानगळीच्या आठवणी'. 'गोठलेल्या वाटा'चं प्रकाशन माझे वडील बघू शकले नाहीत. तो प्रसंग माझ्या दृष्टीने खूप भावनाप्रधान होता. माझे वडील आणि सासरे हे मित्र होते. या प्रकाशनाच्या वेळी सासर्‍यांना अल्झायमर्स झाला होता. ते आले होते, बसले होते, सगळं बघत होते, परंतु त्यांच्यापर्यंत हे काहीच पोहोचत नव्हतं. मी त्यांना मुलीसारखी होते. 'शोभा कोण?' विचारलं, तर 'शोभा माझी मुलगी' असं ते सांगायचे. त्यावेळी या आजाराबद्दल लोकांना फारशी माहिती नव्हती. एक आई, बायको, सून म्हणून या प्रश्नाकडे कसं पहायचं ते सांगावं, पेशंटकडे पहायचा दृष्टीकोन बदलावा, यासाठी सामान्यांपर्यंत ही माहिती पोचावी म्हणून मी लिहायचं ठरवलं. 'पानगळीच्या आठवणी' हे पूर्ण पुस्तक म्हणजे माझं ठराविक काळापुरतं आत्मनिवेदन आहे. यात सासरे-सून यांचं नातं, कौटुंबिक संघर्ष आहे. त्यामुळे त्याची उंची वेगळी आहे. पुस्तकं वाचून असंख्य लोकांची पत्रं आली. लोक लिहित, की तुमच्या पुस्तकामुळे आम्ही आमच्या परदेशातल्या नातेवाईकांना ओळखू शकलो. पानगळीच्या आठवणी वाचून एकानी लिहिलं होतं, त्याच्या वडिलांना हा त्रास सुरू झाला, तर नातेवाईकांना वाटायचं कोणी करणी केली. मग त्याने हे पुस्तक घेऊन सगळ्यांना वाचायला दिलं. या पुस्तकामुळे या आजाराबद्दल काही जाणीव लोकांना झाली, लोक पेशंटकडे सहानुभूतीने बघू लागले, हे माझ्या दृष्टीने महत्त्वाचं आहे.

दिलीप चित्रे : माझी मुख्य आवड कवितेची आहे. इथे येण्यापूर्वी काही कविता मी लिहिल्या होत्या आणि नंतरही लिहिल्या. १९८८ मध्ये प्रसिद्ध झालेला 'हिमगंध' हा कवितासंग्रह म्हणजे आधीच्या आणि नंतरच्या कवितेचा प्रवास आहे. इथे आल्यानंतर सुरुवातीला एक 'नॉस्टॅल्जिया' होता, सोडून आल्यानंतरचा... अरे, आपण काय केलं हे ? का सगळं सोडून आलो ? असं वाटत असतं. तेव्हा 'ऐलतीरावर' या ध्वनीमुद्रिकेमधील माझ्या एका कवितेत हे म्हटलंय...

एक झाली चूक आता, लाख होती वेदना
मी दिली सूर्यास माती, काजव्याला वंदना

यात सूर्य आणि काजवा ही प्रतिमा होती. एकदा देश सोडून इथे राहू लागल्यानंतर काही दिवसांनी भावना प्रगल्भ होत जाते. 'पण जायचेच आम्हाला या नव्याच वाटेवरूनी' असा आत्मविश्वास येतो. न्यूजर्सीच्या अधिवेशनाचे स्वागतगीतही मी लिहिले होते,

पूर्व आणि पश्चिमेची पालखी स्कंधावरी
आमुची दिंडी निघाली, जय हरी, जय जय हरी
पालखीला पेलण्या उत्तुंग बळ द्या भास्करा
ख्रिस्त, येशू, शंकरा...

(तेव्हा काही लोकांनी आक्षेप घेतला, 'ख्रिस्त' कशाला? कृष्ण का नाही?' वगैरे... पण यांची वैचारिक प्रगल्भता कुठे जाते असा विचार करताना? नन्स कॉलेजमध्ये अधिवेशन आणि ख्रिस्त नको? धर्म, जातपात कधी सोडणार लोक, कळत नाही.)

'अलिबाबाची हीच गुहा' हे नाटक होतं. जाणीवपूर्वक वेगळा फॉर्म निवडला होता. कथासंग्रह झाला, रेकॉर्ड झाली. गरजेप्रमाणे कथावाचन, काव्यवाचन केलं. इथे मराठी चित्रपट महोत्सव केला. इथल्या फिलाडेल्फियाच्या डॉ. खाडीलकरांनी माझ्या कवितांवर आधारीत 'हिमगंध' याच नावाचा कार्यक्रम तयार केला. फ्लोरिडापासून ओहायो, फिलाडेल्फियापर्यंत १३-१४ कार्यक्रम केले. शब्द आणि सूर या माध्यमांतून कविता लोकांपर्यंत पोहोचवायची अशी त्याची संकल्पना होती. काही कविता मी वाचायचो, ज्या गायल्या जायच्या त्यांची पार्श्वभूमी सांगायचो. तो कार्यक्रम लोकांना आवडला.

मीना: अफगाण मुक्तीचा आक्रोश
(चित्रे दांपत्याने अनुवाद केलेले हे पुस्तक नुकतेच प्रकाशित झाले. मेलडी चेव्हिस यांच्या 'मीना - हिरॉईन ऑफ अफगाणिस्तान' या इंग्रजी पुस्तकाचा हा अनुवाद आहे. सत्तेसाठी संधीसाधू अफगाण लोकांनी रशियाला अफगाणिस्तानात प्रवेश करू दिल्यावर त्यांना हुसकावण्यासाठी अमेरिकनांचा हस्तक्षेप, त्यातून झालेला तालिबानचा उदय आणि या सगळ्या धुमश्चक्रीत अफगाणी जनतेची, विशेषतः स्त्रियांची झालेली परवड... या पार्श्वभूमीवर मीना या तरुण मुलीनं RAWA (रिव्होल्युशनरी असोसिएशन ऑफ द विमेन ऑफ अफगाणिस्तान) ही संस्था स्थापन केली आणि स्वतःचा प्राण धोक्यात घालून स्त्रीमुक्तीसाठी लढा दिला. त्या मीनाची ही कथा आहे.)

दिलीप चित्रे : हे पुस्तक म्हणजे आम्ही दोघांनी मिळून केलेला पहिलाच प्रोजेक्ट... खरं तर दुसरा म्हणायचा! पहिला संसार केला. आता दुसरं काहीतरी जमेल म्हणून हे केलं!

शोभा चित्रे : मला लायब्ररीत हे पुस्तक सापडलं. वाचायला सुरुवात केल्यावर इतकी पकड घेतली. अफगाण बायका कसं जीवन जगत होत्या... त्यात ही तर एक तरुण मुलगी, घरात राजकीय वातावरण वगैरे होतं असंही काही नाही. अगदी साधी मुलगी. हिच्यात एवढी हिंमत कशी आली? पण तिला चांगलं शिक्षण मिळालं. चांगल्या शिक्षकांचा आणि चांगल्या वाचनाचा किती उपयोग होत असतो. खडतर आयुष्यात तिने पेटून उठून काम केलं. बुरखा घालावा लागायचा तर त्याचाच वापर करून त्यांनी काम केलं. ते वाचल्यानंतर मला असं वाटू लागलं की हे पुस्तक मराठीतून मराठी वाचकांपर्यंत पोहोचवावं. मी मूळ पुस्तकाच्या लेखिका मेलडी चेव्हिस यांच्याशी संपर्क साधला. त्यांनीही लगेच प्रतिसाद देऊन अनुवादासाठी परवानगी आणि प्रोत्साहन दिलं.

हे पुस्तक भारतातही पोहोचलं आहे. तिथल्या मुस्लिमांना अवेअरनेस आला आहे. पूर्वी सगळे समाज शांतनेने नांदत, आता जो संघर्ष निर्माण झालाय तो वाईट आहे. या पुस्तकाचा त्या दृष्टीने उपयोग व्हावा अशी इच्छा आहे.

दिलीप चित्रे : आम्ही दोघंही महाराष्ट्र फाउंडेशनचं काम करतो. आम्ही जातीधर्म मानत नाही. एकदा फाउंडेशनने शबाना आझमीला बोलावलं होतं, तर लोकांनी टीका केली. आम्ही तिला एक नटी किंवा एम. एल. ए. म्हणून नाही, तर एक सामाजिक कार्यकर्ती म्हणून बोलावलं होतं. समाजकार्यात आणि साहित्यात जातीधर्म नको. आम्ही दक्षिण भारतात लोकांना मदत केली आहे, तसंच कच्छ, लातूर इथंही केली आहे. फाउंडेशनच्या पोस्टरवर एक कविता आहे, ती माझीच आहे,

चैतन्याची फुलवा झाडे, द्या जगण्याला अर्थ नवा
अडले पडले उचला, ज्यांना आधाराचा हात हवा

आता काही लोक देवधर्मावर पैसे खर्च करतात आणि भिकार्‍याला ठोकरुन पुढे जातात. मग काय उपयोग? तुम्ही देवळात देव बघता, आम्ही लोकांत देव बघतो. रुढी, व्रतंवैकल्य यांत देव नाही. लोक आम्हाला म्हणतात, की तुमची श्रद्धा नाही. पण श्रद्धा कशावर ठेवायची हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे.

शोभा चित्रे : इथेसुद्धा स्त्रिया हळदीकुंकू करतात. ज्या काळी बायकांना बाहेरचं जग नव्हतं, लहानपणी लग्न व्हायची, माहेरची आठवण यायची, तेव्हा मुलीला एकटं वाटू नये, काही करमणुकीचं साधन, मैत्रिणी मिळवण्याचं साधन म्हणून या रुढी होत्या. आपल्या सगळ्या रुढींना सामाजिक संदर्भ आहेत, धार्मिक नाहीत. आपण आता घराबाहेर पडलोय, कमावतो, करमणुकीची इतर साधनं आहेत. मग हे हळदीकुंकू वगैरे कशाला? इथे चैत्रगौरीचे, नवरात्रीचे इतके हळदीकुंकू समारंभ होतात, एवढ्या मोठ्या प्रमाणात स्त्रिया एकत्र येतात, तर सगळ्यांनी मिळून चांगलं काहीतरी करावं. चॅरिटी सुरू करावी, डोनेशन्स द्यावी. पण असं काही होत नाही याचं वाईट वाटतं.

या रुढी पकडून ठेवण्यामागची कारणं काय असतील याचा विचार केला, तर आपण आपल्या समाजापासून दूर आहोत, त्यातलं काहीतरी इथे जास्त जपायचा प्रयत्न करणं हे एक असावं, असं मला वाटतं. पण या जुन्या चालीरिती जपल्या म्हणजे आपली संस्कृती जपली असं नाही. काही पालकांचा आग्रह असायचा की आपल्या मुलांनी भारतीय मुलांशीच मैत्री करावी. पण असं नको, बाकीचंही कल्चर पहा, अनुभवा. Let them grow. प्रत्येकात चांगलं आणि वाईट असतं, तर जे चांगलं ते पहायला शिका ना. ज्या पालकांनी आपल्या मुलांवर अशी बंधनं घातली त्यांच्याच मुलांनी मग त्यांना हवं तेच केलं. मुलं अनुकरण करतात, त्यांना आपल्या व्हॅल्यूज शिकवाव्यात. बोलणं एक आणि आचरण दुसरं असं नको.

इथल्या मला आवडणार्‍या गोष्टी म्हणजे लोकांना कोणतंही काम करायला लाज वाटत नाही. प्रतिष्ठेच्या चुकीच्या कल्पना नाहीत. कष्ट करण्याची सवय आणि तयारी या गोष्टी खरंच कौतुक करण्यासारख्या आहेत. कुठे संकट आलं तर भरभरून मदत करतील. डोनेशन्स देतील. चर्चचं प्रस्थ बरंच आहे, पण त्यांच्यामार्फत दानधर्मही बराच चालतो. प्रत्येक चर्च काही ना काही करतेच.

दिलीप चित्रे : या देशालाही इतिहास आहे, स्वातंत्र्याची वर्षं जास्त आहेत. इथे सगळं जतन करण्याची धडपड असते. आर्टचं ऍप्रिशिएशन जास्त आहे. युरोपात आणि इथेही म्युझियम्स, ऐतिहासिक महत्त्वाची ठिकाणं इत्यादी बघून वेड लागतं. आपली संस्कृती तर इतकी जुनी आहे! मी एक आर्किटेक्ट म्हणून काम करतो, म्हणून मला जाणवतं. इथे ऐतिहासिक वास्तूंच जतन फार चांगल्या पद्धतीनं होतं. जुन्या वास्तूंचं जतन करणे वगैरे गोष्टी भारतात फार कमी, या गोष्टींची किंमतच नाही. इथली कला, चित्रपट, त्यांचं तंत्र हे सगळंही खूप आवडतं. खूप रिऍलिस्टिक चित्रपट असतात. पण या देशातही धर्माचं राजकारण चालतं, ते नाही आवडत.

सॅन फ्रॅन्सिस्कोचे साहित्य संमेलन

दिलीप चित्रे : पुढल्या वर्षीचं सॅन फ्रॅन्सिस्कोमधलं साहित्य संमेलन... आम्ही याबद्दलचं आमचं निवेदन 'लोकसत्ता'मध्ये प्रसिद्ध केलं होतं. त्यावरून इथे आणि भारतातही चर्चा झाली. आता याला ते 'साहित्य संमेलन' म्हणत नाहीत! पण बंड्या म्हणा किंवा बाळ्या, पोर तेच आहे! त्यांच्याकडे पैसा आहे, सक्सेसफुल करतीलही, पण उद्देश काय आहे? मराठी ग्लोबल व्हावी? पुढच्या पिढीला मराठीबद्दल आस्था निर्माण व्हावी? अरे, पाच नवीन मराठी पुस्तकांची नावं सांगा आधी, पाच लेखक आणि कवी, येतील सांगता? म्हणजे कुसुमाग्रज, पाडगांवकर, बापट नकोत. हल्लीचे सांगा! तुम्हालाच जर नाही सांगता आले तर पुढच्या पिढीचे काय घेऊन बसलात! आणि हे एकदाच करुन काय उपयोग? सतत करत राहणार असाल तर माझा पाठिंबा आहे. भारतात पाच-सहा लाख लोक येतात. कित्येक कोटी रुपयांची पुस्तकांची खरेदी होते. त्या गावाची पूर्ण अर्थव्यवस्थाच बदलते त्या काळापुरती. इथे किती लोक येणार, सत्तर? पुन्हा पुढच्या वर्षी बीएमएमचं अधिवेशन आहेच ना, मग लोक दोन-दोन वेळा येणार का? मी ही कल्पना मांडली होती की बीएमएममध्येच का नाही ठेवत अर्धा-एक दिवस साहित्यासाठी? आणि हे आत्ताच नाही, मी पूर्वीपासून सांगत आलोय. तशा पुस्तकपंढर्‍या मी केल्या होत्या. १९९३ साली पुस्तकपंढरीमध्ये खूप पुस्तकांची विक्री झाली. अमेरिकेत एवढ्या प्रमाणात मराठी पुस्तकं पहिल्यांदाच विकली गेली. आता ही पुस्तकपंढरी ते व्यावसायिक करतात. तिथे काही प्रकाशक येतात, पण प्रकाशक संघाशी संपर्क साधा. त्यांचा एक प्रतिनिधी बाकी प्रकाशकांशी संपर्क साधेल. जुनं, नवं, अध्यात्मिक, ग्रामीण, दलित, परदेशी सगळ्या प्रकारचं साहित्य पाहिजे. एकच प्रकाशक नको.

'कुंपणापलिकडचे शेत'चा प्रकाशन समारंभ मी केला. I projected that as 'साहित्यसोहळा'. त्यावेळी व्यंकटेश माडगूळकर, सुभाष भेंडे, लाटकर, मधुकाका कुलकर्णी, पाडगांवकर हे सगळे माझ्या घरी होते. माडगूळकरांचे कथाकथन, पाडगांवकरांचे काव्यवाचन असे चार-पाच ठिकाणी कार्यक्रम केले. तेव्हा सांगितलं होतं, येताना एक बॅग पुस्तकांनी भरून आणायची. तरच यायचं. तेव्हा चिकार पुस्तकं आली... तेव्हा आतासारखं रिस्ट्रिक्शन नव्हतं.

****

सध्या लेखनाच्या अनेक नवीन प्रकल्पाच्या कल्पना चित्रे दांपत्याच्या मनात आहेत. वाचन चालूच आहे. इन्डियन अमेरिकन्सपैकी रोहिंटन मिस्त्रीचं लेखन दिलीप चित्रेंना आवडतं. शोभा चित्रेंना झुंपा लाहिरीचं लेखन आवडतं. त्यांनी नुकतंच तिचं 'अनऍकस्टम्ड अर्थ' वाचून संपवलं आहे. मराठीमध्ये सध्या विनया खडपेकरांचं 'ज्ञात अज्ञात अहिल्याबाई होळकर' वाचत आहेत. नोव्हेंबरमध्ये पर्यटनासाठी म्हणून इजिप्तला जात आहेत. 'फक्त पर्यटनासाठी जात आहोत, लेखनाचा विचार नाही' असं त्यांनी स्पष्ट केलं असलं, तरी नवीन लेखनप्रकल्पासाठी स्फूर्ती देणारी ती सहल व्हावी, अशी इच्छा व्यक्त करायला हरकत नाही.