संवाद - अजय-अतुल

मुलाखतकार : संपदा माळवदे

"बस नाम ही काफी है!" असं आपण म्हणतो त्याप्रमाणे काही नावं अशी असतात, की त्यांनी आपल्या क्षेत्रात स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केलेली असते. स्वतःचं एक स्थान निर्माण केलेलं असतं. अशाच एका तरूण जोडीने मराठी मनांत आपलं एक अढळ स्थान निर्माण केलेलं आहे. आणि ती जोडी म्हणजे अजय-अतुल.

ajay_atul.JPGआज मराठी माणसाला अजय-अतुलची ओळख करून देण्याची खरं गरजच नाही. या दोघा भावांनी आपल्या अफाट प्रतिभेने व अथक परिश्रमाने संगीतक्षेत्रात आपलं एकमेवाद्वितीय असं स्थान निर्माण केलं आहे. गेल्या काही वर्षांत या जोडीने संगीतक्षेत्रात जणू काही क्रांतीच घडवून आणली आहे. मराठी चित्रपटगीतांना तर नवा श्वासच दिला आहे. दर्जेदार, प्रयोगशील आणि तितक्याच यशस्वीपणे गाणी संगीतबद्ध करण्यात त्यांचा हातखंडा आहे. दर्जेदार संगीत देण्याकरता त्यांनी नुसताच वाद्यांचा मेळ घातला नाही, तर त्यांच्या गाण्यांमध्ये लय-ताल-सुरांचे असे काही जादूई मिश्रण आहे, की त्यांची गाणी सान-थोरांच्या मनांचा केव्हा ठाव घेतात ते कळतही नाही.

लोकांना वेगळं, पण चांगलं काय देता येईल याची उत्कृष्ट जाण या दोघा भावांना आहे. प्रत्येक गाण्यात काहीतरी नवीन प्रयोग करण्याचा प्रयत्न त्यांनी केला आहे. गेल्या काही वर्षांत त्यांनी दिलेल्या संगीतात मराठी लोकसंगीतापासून भावगीत, रॅप, हिप-हॉप, रॉक अशा सगळ्याच प्रकारांचा अत्यंत उत्कृष्टपणे वापर केला आहे.

या जोडीच्या कामाची सुरुवात प्रारंभी विनती केल्यासारखी गणपती बाप्पांच्या गाण्यांनीच झाली. विश्वविनायक या प्रसिद्ध अल्बममध्ये पारंपरिक आरती, स्तोत्रं त्यांनी वेगळ्या रूपात जगापुढे ठेवली. या वेगळेपणामुळे हा अल्बम जगभर लोकप्रिय झाला.

संगीतकार असण्याबरोबरच चांगले गायक म्हणूनही त्यांची ओळख आहे. अनेक काँबो म्युझिकल गाणी आणि लोकगीतं त्यांनी स्वत:च गायली आहेत. त्या गाण्यांना त्यांचा आवाज चपखल आणि साजेसा वाटतो. त्यांनी संगीतबद्ध केलेल्या 'सावरखेड एक गाव' या चित्रपटातलं 'वार्‍यावरती गंध पसरला' हे गाणं असो किंवा 'अगंबाई अरेच्चा'मधलं अतिशय मधुर चालीचं 'मन उधाण वार्‍याचे' हे गाणं असो किंवा 'जत्रा'मधली 'कोंबडी', तसंच 'दे धक्का', 'साडे माडे तीन', 'उलाढाल', 'जोगवा', 'बेधुंद', 'एक डाव धोबी पछाड', 'सही रे सही' किंवा 'लोच्या झाला रे' सारखी मराठी नाटकांची, मालिकांची शीर्षकगीते, अनेक हिंदी चित्रपट, 'झी मराठी'चे गौरवगीत... अगदी मराठी-हिंदीच्या पलीकडेही जाऊन तेलुगू चित्रपट गीतांनाही त्यांनी संगीत दिलं आहे. ही यादी थोडक्यात न संपणारी आहे.

मराठी संगीताला ते पाश्चिमात्य नजरेतून पाहतात हे त्यांचे वैशिष्ट्य आहे. मराठी संगीत आंतरराष्ट्रीय दर्जाचे का असू शकत नाही? या संगीताला आंतरराष्ट्रीय दर्जा मिळवून देण्याचे स्वप्न त्यांनी बाळगले आहे. त्यासाठी हिंदी गाण्यांच्या तोडीची गाणी त्यांनी मराठीत निर्मिली. इतकेच नव्हे, तर एस्. पी. बालसुब्रमण्यम, हरिहरन, शंकर महादेवन, कुणाल गांजावाला, सुखविंदर, शान, चित्रा, सुनिधी चौहान, श्रेया, ऋचा शर्मा, सुजाता अशा अनेक अमराठी गायकांकडून त्यांनी मराठी गाणी गाऊन घेतली आहेत.

अनेकानेक पुरस्कारांनी त्यांना आजवर गौरवले गेले आहे. अशा या हरहुन्नरी, सर्वस्पर्शी संगीतकार-द्वयीशी गप्पा मारण्याची संधी मिळाली. त्यांच्यासोबत झालेल्या अनौपचारिक गप्पांतून त्यांच्या कारकिर्दीचा आणि व्यक्तिमत्त्वांचा आढावा घेण्याचा हा एक प्रयत्न.

'विश्वविनायक' हा तुमचा पहिला अल्बम. याबद्दल आम्हांला थोडं सांगाल का ? यामागची प्रेरणा काय होती ?

विश्वविनायक केला त्याला दोन कारणं आहेत. एक म्हणजे प्रचंड राग होता...

अतुल : त्या काळात नामस्मरणांच्या, मंत्रजागरांच्या कॅसेट्स काढायची लाट आली होती. अशा कॅसेट लावून आपल्या मनात नामस्मरण होणार आहे का ? ते स्वतः केलं, तर त्याचा लाभ होतो. दुसरी गोष्ट पिक्चरच्या गाण्यांचा चालींवर गणपती बाप्पाची गाणी यायची आणि ती विकायचा प्रयत्न करायचे लोक. अगदी 'जुम्मा चुम्मा दे दे' आणि 'चोली के पीछे'च्या चालींवरही गणपतीची गाणी निघाली होती.

आचार्य अत्र्यांचं एक वाक्य आहे,"भारतातल्या इतर प्रांतांना नुसताच भूगोल आहे; पण आपल्या महाराष्ट्राला प्राचीन इतिहासही आहे !" आणि साहित्याबद्दलही तेच आहे. शेकडो वर्षांपूर्वी संत ज्ञानेश्वरांनी वयाच्या सतराव्या वर्षी ज्ञानेश्वरी लिहिली, 'ओम् नमो जी आद्या'सारखे काव्य लिहिले. तेव्हा आम्ही विचार केला - असे आपले प्रगल्भ साहित्य असतानाही आपण उथळ गोष्टी करायच्या का? आपल्याला एवढी समृद्ध संस्कृती लाभलेली असतानाही आपण मात्र चित्रपटगीतांवर आधारलेल्या गाण्यांतून देवाला स्मरतो आहोत. आणि बनवणारे पण कोण? ज्यांना आम्ही अनुसरतो, तेच संगीतकार. खूप वाईट वाटलं.

देवांचा आदिदेव गणपती. त्यासाठी काहीतरी करायची एक आंतरिक इच्छा होती. आपला देव केवळ आपला न राहता तो सर्वांचा व्हावा असा त्यामागचा दृष्टिकोन होता. चौदा विद्या-चौसष्ट कलांची देवता गणपती. प्रत्येक मूर्तिकाराला एकदा तरी त्याची मूर्ती घडवावीशी वाटते. चित्रकाराला गणेशाचं सुंदर चित्र काढावसं वाटतं. तसंच आम्हांलाही आमच्या संगीतातून गणेशाला साकारावंसं वाटलं. मग जवळ जवळ दोन वर्षे गणपतीच्या पुराणकथा, स्तोत्रं, आरत्या यांचा आम्ही अभ्यास केला. मग आपला हा लाडका देव फक्त मराठी-हिंदी भाषिकांपुरता किंवा भारतापुरता मर्यादित न राहता, तो त्याहीपलीकडे सातासमुद्रापार जाऊन सर्वश्रुत व्हावा, सगळ्यांचा लाडका व्हावा या अपेक्षेने 'विश्वविनायक'ची निर्मिती झाली. त्यासाठी प्रेरणा बाप्पानेच दिली. कर्ता करविता तोच !

'विश्वविनायक' हा पहिलाच अल्बम हिट झाला, प्रसिध्दी मिळाली तेव्हा कसं वाटलं ?

नाही. तो लगेच हिट झाला नाही. अल्बम रिलीज झाला तो अनंत चतुर्दशीला. गणपती विसर्जन झाले, सहा महिने-वर्ष लोटलं, तरी काही नाही. आमचं स्ट्रगल चालू होतं. काही काम नव्हतं. आम्हांला वाटलं होतं, की आमची 'तेजाब'ची माधुरी दीक्षित होईल, एका रात्रीत स्टार ! आम्हांला वाटलं होतं, तसं झालं नाही.

पण बाप्पाचा आशीर्वाद होता. दोन वर्षांत आम्ही केलेल्या कामाची माउथ-टू-माउथ पब्लिसिटी झाली. कुणी गणपतीत १०० सीडीज वाटल्या, कुणी कुणाला गिफ्ट दिल्या, एकाला आवडलं दुसर्‍याला सांगितलं. आणि यश कणाकणानं, दबक्या पावलांनी आलं. आमच्या यशाचं श्रेय 'विश्वविनायक'लाच. 'विश्वविनायक'नेच आमची खरी ओळख निर्माण केली.

शंकर महादेवन, एस. पी. बालसुब्रमण्यम यांसारख्या दिग्गजांबरोबर काम करतानाचा अनुभव कसा होता ? पहिलाच अल्बम असल्यानं काही दडपण होतं का ?

दडपण तर होतंच. ही दोन्हीही माणसं प्रचंड अभ्यासू आहेत. दोन्ही दिग्गजांनी आमची मेहनत बघितली. आमची कामाविषयीची कळकळ पाहिली आणि त्यांनीही स्वत:ला झोकून दिलं. एकूणच अनुभव फार छान होता. आम्ही चांगले मित्र बनलो. शंकर स्वतः एक संगीतकार असूनदेखील आमचे ट्यूनिंग उत्तम जमते.

संगीतक्षेत्रातच काम किंवा संगीतातच करियर करावं असं कधी वाटलं ?

अगदी लहानपणापासून ! शाळेत असल्यापासून आम्ही स्वतःकडे संगीतकार म्हणून पाहतोय. म्हणजे करियर करायचं होतं असं नाही; पण आपण संगीत द्यायचं हे लहानपणीच ठरलं होतं.

अजय : अगदी दोघांनी नाव कसं ठेवायचं, हेसुद्धा ठरलं होतं.

अतुल : माझ्या शाळेच्या वहीची मागची कित्येक पानं ऑटोग्राफ कसा द्यायचा, त्याच्या प्रॅक्टिसने भरलेली. अजूनही ती वही माझ्याकडे आहे.

तुम्ही जेव्हा संगीतात करियर करायचंय असं घरी सांगितलं, तेव्हा घरच्यांची प्रतिक्रिया काय होती? की हे सहज घडत गेलं?

आई-बाबांची प्रतिक्रिया चांगली होती. वडलांचं आधीपासूनच मत होतं, 'जे काही कराल ते मनापासून करा. पैसा कमावण्यासाठी करू नका. नाहीच जमलं तर दोन सुखाचे घास खाण्याइतकी आपली परिस्थिती नक्कीच आहे.' या क्षेत्राबद्दल त्यांना काही माहिती नसतानाही त्यांनी आम्हांला कधी विरोध केला नाही. त्यांचा आधार होताच.

आधी सांगितल्याप्रमाणे संगीतकार व्हायचं हे लहानपणापासूनचं ध्येय. पण मग शाळा-कॉलेज संपल्यावर इतर लोकांसारखं नोकरी शोधा, कंप्युटर शिका असे उद्योग करत करत आम्ही पुण्याच्या काही लोकल ग्रूप्ससोबत गाण्याच्या व लोककलेच्या कार्यक्रमांत वादक, गायक, नर्तक म्हणून भाग घेत असू. काही ना काही अ‍ॅक्टिव्हिटीज सुरू होत्या. बोलणारे बोलतही होते, 'तुमची मुलं काय करणार आहेत पुढे' वगैरे. पण आपले रक्त आहे, ते कधीच वाया जाणार नाही याची आई-बाबांना खात्री होती.

नंतर पुण्यात काही छोटेमोठे कार्यक्रम, जाहिरातींची जिंगल्स, मग धार्मिक अल्बम्स असं करत करत कामाला सुरुवात झाली.

संगीताचं शास्त्रीय शिक्षण घेतलंय का? तुमचे गुरू कोण?

नाही. शिक्षण असं काही घेतलेलं नाही. प्रत्येक गोष्ट स्वतःहून शिकत गेलो. खास गुरू असा कोणीही नाही.

शास्त्रीय रागदारीवर आधारित अशीही गाणी बसवलीत का?

आम्ही काही शास्त्रीय शिक्षण घेतले नसल्याने रागांवर आधारित अशी गाणी बसवली नाही. खरं सांगायचं, तर गाणं आमच्या मनांमध्ये वाजतं. त्या गाण्याच्या वातावरणाशी जे भिडतं, तसं ते गाणं बनतं. आता आतातरी आमच्या स्वतःच्या अभ्यासाने आम्हांला थोडंफार समजतंय. पण 'विश्वविनायक'च्या वेळीतर लोकांनी सांगितलं, की अरे हे तुम्ही तीन रागांचं मिश्रण केलं आहे. मग चालत नाही का तसं ? चालतं ना. जे श्रवणीय वाटलं, हृदयाला भिडलं, ते केलं. त्यामुळे झालं असं, की एका सुरावटीतून दुसर्‍या सुरावटीत असा त्या गाण्याचा प्रवास झाला. आणि एक समजलं, काहीच माहिती नसण्यामुळे आम्ही आज हे वेगळे प्रयोग करू शकलो. नाहीतर आम्ही थिअरेटिकली कुठेतरी बांधले गेलो असतो - अरे हे असं चालत नाही; यात कसा कोमल सूर लावायचा ? पण जे कानाला चांगलं वाटतं, ते संगीत. जे काळजाला भिडतं आणि आत्म्याला अंतर्मुख करतं, तेच खरं संगीत.

एखादी चाल डोक्यात घुमत असेल आणि पूर्णत्वास जात नसेल, तर त्रास होतो का?

हो, होतो ना. होतं असं कधी कधी. प्रसववेदनाच त्या. त्यांचा त्रास हा होणारच. पण त्यानंतरच्या आनंदाची अनुभूती दिव्य असते ना ? तसंच आहे ते.

नवीन रचना कशी सुचते ? प्रत्येक वेळी दोघे एकत्रच काम करता की वेगवेगळे सुचलेले असते ?

गाणं हृदयातून येतं... दोघे एकत्रच काम करतो. आम्ही दोघांनी नुसतं एकमेकांकडे बघितलं तरी समजतं, की मला काय म्हणायचंय किंवा अजयला काय म्हणायचंय. कधीतरी वेगळं सुचतंही. पण मग त्यात इगो नसतो. दोन्हींपैकी जे चांगलं, ते आम्ही ठरवतो आणि घेतो.

मोठा भाऊ म्हणून कधी तू अजयवर दादागिरी करतोस का ?
किंवा अजय लहान भाऊ आहे म्हणून तो कधी तुझ्याकडे हट्ट करतो का ?

अतुल : हो, असं होतं ना कधी कधी. मी मोठा बनून आलोय आणि मला लहानपणापासून त्याची सवय झालीये. त्यामुळे कुणाला शब्द देताना, बोलताना, मी त्याला सांगतो की नाही हे असं नाही बोलायचं. आई-बाबा नसताना मी मोठा असल्याने मीच जबाबदार असतो. मग मला तसं वागावं लागतं.

पण म्युझिकबाबत लहान-मोठा असं काही नाही. तिथे आम्ही मिळून काम करतो. मग अजयने हट्ट केला, तरी तो लहान भावाचा हट्ट नसतो, तर तो एका क्रिएटरचा हट्ट असतो.

अतुलच्या दृष्टिकोनातून अजय? अजयच्या दृष्टिकोनातून अतुल? 'अजय-अतुल' म्हणजे काय?

आम्हां दोघांना वेगळं काढता येणारच नाही. बेसिकली लहानपणापासून आम्ही एकत्र वाढलोय. नेहमीच सगळ्या गोष्टी एकत्र केल्या आहेत. मला जे येतं, ते मी करतो. आणि त्याला जे येतं, ते तो करतो. म्हणून आम्ही दोघे मिळून पूर्णत्वास जातो.

तुमच्या संगीतातून लोकसंगीताचा प्रभाव जाणवतो, तो कशामुळे?

लोकसंगीत म्हणजे तिथल्या मातीची ओळख असते. लोकसंगीतच आपल्याला समजतं आणि मनाला भिडतं ! त्यामुळे तो बाज आहे. लोकसंगीताचा प्रभाव जाणवतो, कारण ते आपल्या रक्तातच खेळत आलं आहे. हे लोकसंगीत, ही आपली ओळख आम्हांला जगाच्या कानाकोपर्‍यांत न्यायची आहे.

संगीताचा वारसा तुम्हांला कुणाकडून लाभला आहे?

नाही. संगीताचा किंवा गाण्याचा तसा काही वारसा लाभला नाही. पण आमच्या आईला गाणी ऐकायला आवडायची आणि वडलांना बुलबुलसारखी वाद्ये वाजवायला आवडतं. त्यापलीकडे काहीच नाही.

आयुष्यातला सर्वांत संस्मरणीय परफॉर्मन्स कोणता होता?

'झी मराठी'साठी केलेलं अजय-अतुल लाइव्ह. फार स्वप्न होतं आमचं, की आमची अशी एक लाइव्ह कॉन्सर्ट व्हावी. ती ज्याप्रकारे झाली, तशीच होण्यासाठी आम्ही बरीच वाट पाहिली होती.

तुमच्या यशाचं श्रेय कुणाला द्याल?

सारं श्रेय गणपती बाप्पाला. आणि हो देवानंतर अर्थातच आमच्या आई-बाबांना. त्यांचा आमच्यावर अतोनात विश्वास होता आणि आहे.

आम्हांला तुमच्या बालपणाबद्दल सांगाल का? शालेय शिक्षण कुठे झालं?

वडलांची सरकारी नोकरी असल्याकारणाने गावोगावी बदली होत असे. लहानपणी आम्ही शिरूरला होतो, मग नववी-दहावीच्या वर्षी राजगुरूनगरला(खेड) होतो. मग पुण्यात आलो.

तुमच्या आवडीनिवडींबद्दल ... संगीताव्यतिरिक्त इतर छंद कोणते आहेत ? त्यासाठी वेळ मिळतो का ?

अतुल : पुस्तकं वाचायला आवडतात. प्रवासात मला पुस्तकांची उत्तम साथ असते. जुने चित्रपट पाहायलाही खूप आवडते. मला लहानपणापासून विमानांचं खूप आकर्षण आहे. हे आकर्षण मी कंप्युटरच्या माध्यमातून जपलं आहे. फ्लाइट सिम्युलेटरसारखे गेम्स खेळायला मला खूप आवडतात.

अजय : मला म्युझिकशिवाय तसं फारसं विशेष काही आवडत नाही. गाडी चालवता येत नाही, त्यामुळे मी तसा बांधलेलाच आहे. वेळ मिळेल, तसं वाचन करतो. वॉरीयर्सचे गेम्स खेळतो कधी कधी. मला खाण्याची विशेष आवड आहे. वेगवेगळ्या ठिकाणचं चटकमटक ट्राय करायला खूप आवडतं.

तुमचे आवडते संगीतकार?

इलाई राजा, लक्ष्मीकांत-प्यारेलाल, मदन मोहन, शंकर-जयकिशन, सलील चौधरी, पंचमदा, बप्पी लाहिरी, राम कदम, विश्वनाथ मोरे, राम-लक्ष्मण, श्रीनिवास खळे, दत्ता डावजेकर आणि पाश्चात्य संगीतामध्ये सॅम्युअल बार्बर, जॉन विल्यम्स, बेथोव्हन, मोझ्झार्ट, जेरी गोल्डस्मिथ.

ज्यांच्या सोबत काम करावेसे वाटते, पण राहून गेले असे गायक-गायिका?

किशोर कुमारसोबत काम करायची मनीषा होती. पण आम्हांला फारच उशीर झाला. लतादीदींसोबत एक संधी आली होती. पण काही कारणाने ते जमून आलं नाही.

तुमच्या कुटुंबाविषयी थोडं सांगाल?

आम्ही सारे जणू एका धाग्याने बांधले गेलो आहोत. दिसताना जरी 'अजय-अतुल' असे दिसत असले, तरी आमच्या प्रत्येक कामात घरातल्या सगळ्यांचा सहभाग असतो; अगदी आमच्या छोट्या पिल्लांचाही.

न आवडलेली.. एखादी गोष्ट अजून चांगली देऊ शकलो असतो, असं कधी वाटलंय का?

अतुल : सहसा असं कधी झालं नाहीये. त्याचं कारण म्हणजे दोघांचाही स्वतःवर पूर्ण विश्वास आहे. आपण जे सर्वोत्कृष्ट, तेच लोकांना देऊ. अन्लेस् अँड अंटिल वी आर सॅटिस्फाइड.

अजय : हं, कालांतराने असं वाटेलही कदाचित - 'अरे, आपण हे तेव्हा असं केलं असतं, तर अजून छान झालं असतं.' पण आतापर्यंत असं काही कधी वाटलं नाही. ओव्हर अ पीरियड ऑफ टाइम मे बी, असं होईल कदाचित, की अमुक एका वाद्यापेक्षा वेगळं काही उपलब्ध असेल आणि त्यापेक्षा ते जास्त सरस ठरेल.

संगीतकार झाला नसता तर? पुढल्या जन्मी कोण व्हायला आवडेल?

अतुल : संगीतकारच झालो असतो. पुढच्या जन्माचा मी विचार केला नाही.

अजय : या जन्मी मी जो आहे, तोच झालो असतो. म्युझिकशिवाय दुसरा काही विचारच मी कधी केला नाही. पण पुढच्या जन्मी म्हणशील, तर रीतसर संगीतकलेचे धडे घेतलेला संगीतकार बनायला मला जास्त आवडेल.

तुमची काम करण्याची काही खास वेळ आहे का ? काही जणांना रात्री किंवा पहाटे काम करायला आवडतं ..

आम्हां दोघांचीही अशी काही वेळ नक्की नाही. संगीत सततच आमच्याबरोबर असतं. कधी एखादं गाणं गाडी चालवतानाही सुचतं. उर्मीच ती. केव्हाही येते.

इतर भाषांमध्ये काम करताना आलेले काही अनुभव सांगाल का ? गाणं बांधलं जातं, चाल बसते, पण त्या शब्दांत भाव खरंच उतरले आहेत हे कसं समजतं?

एखादं गाणं करायचं म्हणजे त्या गाण्याची सिच्युएशन कोणती आहे, त्याला साजेशा भावना आमच्या संगीतातून उतरवायचा प्रयत्न आम्ही करतो. बेसिकली संगीताला भाषा अशी नसतेच. ते ऐकून काळजाला हात घातला जातोच जातो. मग ती कुठलीही भाषा असू दे, तमिळ, तेलुगू, हिंदी, मराठी नाहीतर इंग्लिश.

तेलुगू गाणी करताना काही प्रॉब्लेम होते का?

अजय : तेलुगूमध्ये काम करताना तशी काही अडचण आली नाही. राजा सरांचे थोडेफार संस्कार होते आमच्यावर. आणि साउथच्या लोकांची साधारण आवड पक्की माहीत होती. त्यामुळे कदाचित रामगोपाल वर्मांना आम्ही ते करावं असं वाटलं.

लिरिकली म्हणशील, तर ९५ टक्के कंपोझिशन आम्ही आधी केलेली होती. ती चाल म्हणून एकदा आमच्याकडून अप्रूव्ह झाल्यानंतरच त्यावर शब्द लिहून घेतले गेले. त्यांनी आम्हाला ते फ्रीडम दिले होते. नाहीतर आधी लिरिक्स लिहून साउथचं प्रोजेक्ट शक्य नव्हतं.

इलाईराजांबद्दल काय सांगाल?

अजय : इलाईराजा म्हणजे आमच्यासाठी द्रोणाचार्य आहेत. एस. पी. बालसुब्रमण्यममुळे त्यांची भेट घडली. आपल्या दैवतासमोर बसून त्यांच्याशी आपल्याला बोलता यावं याहून अधिक काय हवं? ते आयुष्यातले अविस्मरणीय क्षण आहेत.

इलाईराजा ही व्यक्ती म्हणजे एक चमत्कार आहे. संगीत म्हणजे फक्त नृत्य करायला लावणारं असं नाही, तर ती अशी एक दैवी देणगी आहे की जी आपल्या मनाला डोलायला लावते. हे समजलं ते इलाईराजांमुळे. संगीताकडे बघण्याचा अंतर्बाह्य दृष्टिकोन बदलला, तो त्यांच्यामुळेच.

शाळा/ कॉलेजमधले काही गमतीशीर किस्से सर्वांसोबत शेअर कराल?

अतुल : मी स्वत:च्या अभ्यासाबद्दल कधीच विचार केला नाही. मला नेहमी वाटायचे, भूगोलात खारे वारे-मतलई वारे शिकून काय करायचंय ? तसंच गणिताशी माझा छत्तिसाचा आकडा. मग काय दहावीच्या प्रीलिमला गणिताच्या पेपरामध्ये चित्रं काढली होती. जाम ओरडा खाल्ला होता आईचा.

अजय : मी शाळेच्या घोषपथकात ड्रम वाजवत असे. एकदा स्पर्धा होत्या. मी काहीतरी वेगळं करण्याच्या विचारात भलतीच काहीतरी मनाची रचना वाजवली. परीक्षकांना माझी ती रचना आणि माझा आत्मविश्वास खूप आवडला असावा. कारण मला पहिलं बक्षीस मिळालं होतं.

अजून एक किस्सा सांगतो -

मी राजगुरुनगरला शाळेत असताना आम्ही चार-पाचजण माईकवरून सकाळी साडेसातची प्रार्थना म्हणायचो. आणि मला बर्‍याचदा शाळेत यायला उशीर व्हायचा. माझ्या घरापासून शाळेपर्यंत जाताना अजून एक शाळा होती. नेमका मी तिथून जात असताना त्या शाळेत राष्ट्रगीत सुरू होत असे. मग अगदी 'सावधान'मध्ये उभं राहणं आपलं आद्य कर्तव्य आणि त्यातूनही मी एन. सी. सी. कॅडेट, राष्ट्रगीताचा मान राखायलाच हवा ना?

मला दोन चार वेळा असं शाळेबाहेर राष्ट्रगीतासाठी उभं बघून, एकदा त्या शाळेच्या शिक्षकांनी आत बोलावून माझं अगदी कौतुक केलं. पण नंतर तिथून मी माझ्या शाळेत पोहोचेपर्यंत चार-पाच मिनिटे लागली आणि शाळेत जाऊन अंगठे धरायची शिक्षा मिळाली. मग दुसर्‍या शाळेत झालेले कौतुक काय आणि कसे सांगणार सरांना? गुपचूप शिक्षेला उभा राहिलो.

इतरांना संगीत शिकवता का? शिकवायला आवडेल का?

नाही. शिकवत नाही. कारण आम्ही कुठे काही शिकलो नाही.

आता शिकण्या-शिकवण्याचा विषय निघालाच आहे, तर आम्हाला काय वाटतं, की हल्ली पालकांना वाटतं आपण आपल्या मुलांना गाण्याच्या, तबला-हार्मोनियमच्या क्लासात घातलं म्हणजे झालं. पण ते सोडूनही संगीत आहेच की. बाकीची इतकी सुंदर सुंदर वाद्ये आहेत. ती काय फक्त बँडवाल्यांचीच का? शक्य असतील ती सगळी वाद्ये द्या ना मुलांना. खेळू द्या त्यांना. त्याच्यातूनच त्यांच्या अवतीभवती संगीत खर्‍या अर्थाने निर्माण होईल.

सध्या आम्ही शिकवत नाही आहोत. पण आमचा त्या दृष्टीने प्रयत्न चालू आहे आणि लवकरच त्या संदर्भात काहीतरी नवीन घेऊन आम्ही लोकांसमोर येऊ.

या क्षेत्रात नव्याने येणार्‍यांना तुम्ही काय मार्गदर्शन कराल?

खूपदा गायक विशिष्ट एका गायनशैलीत अडकून राहतात, संगीतकारही कित्येकदा एकाच प्रकारच्या चाली किंवा संगीतात काम करत राहतात. गायकाने किंवा संगीतकाराने गाण्यातल्या सर्व भावना, भाव समजून गाणं गायलं पाहिजे किंवा संगीत दिलं पाहिजे. गाण्याच्या इमोशन्सप्रमाणे बाज वापरला गेला पाहिजे. तरच तुम्ही हरहुन्नरी बनाल.

संगीत हे इन्स्टॉल्मेंटमध्ये शिकता येत नाही, तुम्ही म्युझिक पार्ट टाइम करू शकत नाही. किंवा तुम्ही संगीतात एखादी डिग्री घेतल्याने तुम्हाला संगीत सर्वसाध्य, सहजशक्य होईलच असे नाही.

जोपर्यंत गाणं किंवा संगीत तुमच्या हृदयातून येत नाही, तुमच्या स्वतःच्या मनाला भिडत नाही, तोपर्यंत ऐकणार्‍याच्या अंगावर शहारे आणि डोळ्यात पाणी आणणार्‍या रचना तुम्ही देऊच शकणार नाही.

फ्यूचर प्लॅन्स? 'अजय-अतुल' हे नाव भविष्यात कुठे असावं असं वाटतं?

अतुल : फ्यूचर प्लॅन्सबद्दल भरपूर गोष्टी आहेत. पण त्याबद्दल सध्या काही बोलणार नाही. तुमचं कामच सगळं बोलतं. हजार गोष्टी करण्यापेक्षा मोजक्याच गोष्टी करू, की त्या-त्या क्षेत्रांतल्या माइलस्टोन ठराव्यात. पाचशे चित्रपटांना संगीत देऊन लोकांनी त्यातले फक्त पन्नासच लक्षात ठेवावे, त्यापेक्षा भले आम्ही पन्नास चित्रपटच करू. पण त्यांतला प्रत्येक चित्रपट लोकांना संस्मरणीय असेल. प्रवाहापेक्षा वेगळं काहीतरी करून एखाद्या गोष्टीचा 'ट्रेंड' हा आमच्यापासून सुरु व्हावा.

अजय : 'त्याच्या'कडे आमच्यासाठी प्लॅन आहे. गॉड हॅज अ प्लॅन फॉर अस ! वी आर जस्ट फॉलॉइंग दॅट प्लॅन. जास्त काही सांगत नाही. पण 'विश्वविनायक-२' करायचा विचार आहे.

मायबोलीकरांना तुम्ही काय सांगाल?

जगभरात विखुरलेल्या मायबोलीकरांचे योगदान खरंच वाखाणण्याजोगे आहे. इंटरनेटचा इतका प्रभावीपणे वापर करून ऑनलाईन गणेशोत्सव, दिवाळी यांसारखे सण साजरे करून आपल्या संस्कृतीचे जतन करत आहात. मायभूमीपासून हजारो मैल दूरवर राहूनही आपल्या पुढच्या पिढीला समृद्ध करत आहात. देशाविदेशांतल्या देशबांधवांना एकत्र आणण्याचे मायबोलीकरांचे हे काम अव्याहतपणे असेच चालू राहावे हीच सदिच्छा. तसेच आम्हां दोघांतर्फे सर्व मायबोलीकरांना दिवाळीनिमित्त शुभेच्छा !

Taxonomy upgrade extras: