सांवरा रे

'अरे, सुमाची गाडी कशी काय घरी? लवकर आली की काय?' असा विचार करतच मी गाडी पार्क केली अन् गराज बंद केलं. ती ऑफिसातून यायच्या आत घरी पोचून तिला सरप्राईझ द्यायचं, या विचाराने मी नेहमीपेक्षा आधीची फ्लाईट घेऊन घरी आलो होतो.
'श्या! आता त्या सरप्राईझची मजाच गेली. तिने सांगितलं का नाही, लवकर घरी येणार होती तर?'
पुटपुटतच घराचं दार उघडून आत आलो, सवयीप्रमाणे सिक्युरिटी अलार्म डिसेबल केला.
'अरे, ही घरी आहे, तर हिने अलार्म का नाही बदलला?' घरातनं बाहेर जाताना अलार्म चालू करणे अन् जो कोणी पहिल्यांदा घरी येईल, त्याने तो डिसेबल करणे हा नेहमीचा शिरस्ता आहे घरात. अन् आजपर्यंत सुमा कधी विसरलीय असं झालं नाही. अलार्म बसवून घेतानाच मी तिला कल्पना दिली होती. चुकीचे अलार्म वाजून पोलीस घरी आले, तर त्याबद्दल दंड भरणे परवडणार नाही, हे तिला चांगलंच माहीत होतं. आता तिने घरात असून अलार्म डिसेबल केला नाही म्हणजे ती कुठेही फिरली असती, तर अलार्म वाजला असता ना लगेच. असा वाजला, की सात सेकंदांच्या आत डिसेबल करावा लागतो. नाहीतर पोलिसांचा फोन आलाच म्हणून समजा. बरं झालं मी सवयीने तो ऑन आहे, ते पाहून डिसेबल केला, नाहीतर आत्तापर्यंत आलाच असता फोन.

"सुमा, ए सुमा! आहेस कुठे तू? घरी कोण आलंय, ते पहायचं नाही का?"

काही उत्तर नाही, चालल्याचा आवाज नाही, झोपली असेल का? काल संध्याकाळी फोनवर थोडी मलूल वाटली होती खरी, पण मीच ते उडवून टाकलं होतं.
'किती तुझा प्रवास? कंटाळले मी एकटं राहून राहून. या दिवसांततरी तू सतत सोबत असावास, असं वाटतं रे' म्हणालेली. तीन महिने होईपर्यंत कुठे जाऊही दिलं नव्हतं तिने. त्यानंतर आतासुद्धा ही खरंतर दुसरीच ट्रिप होती. पहिल्यांदा तर दोनच दिवसांकरता गेलो होतो, तेही सॅन डिएगोला. म्हणजे टाइम झोनसुद्धा एकच. तरी अगदी वैतागलेली होती. यावेळेस 'इस्ट कोस्टला जाणार आठवड्याभरासाठी' म्हटल्यावर तर अगदी नोकरी सोड म्हणाली होती.
'इथेच, घराजवळ मिळेल ती नोकरी घे. शून्य टक्के प्रवास असला पाहिजे. पगार कमी असला, तरी चालेल. परवडेल आपल्याला.' आता मूल होणार म्हणजे खर्च किती वाढतील. कसं शक्य आहे कमी पगाराची नोकरी घेणं? पण सुमाला व्यवहार थोडा कमीच कळतो.

घरभर शोधून पाहिलं मी, कुठेही नाही. पुढच्या, मागच्या अंगणांत नाही. गेली कुठे? गाडी घरी सोडून जाईल तरी कुठे? कोणा मैत्रिणीच्या घरीतर नसेल ना गेली दोन दिवस राहायला? तिच्या क्लॉझेटमध्ये पाहिलं, तर सगळे शूज जागच्या जागी, फक्त स्नीकर्स नाहीत! म्हणजे? स्नीकर्स घालून ती फक्त जिमला जाते किंवा क्वचित सायकल चालवते इथेच डिव्हेलपमेंटमध्ये. धावत खाली जाऊन पाहिलं, तर दोघांच्याही सायकली गराजमध्येच आहेत.

मंगळवारी तिची अपॉइंटमेंट होती गायनॅकॉलॉजिस्टकडे. नॉर्मल केसेसमध्ये दर चार आठवड्यांनी असते अपॉइंटमेंट. पण तिची, सॉरी, आमची ही तिसरी खेप! तीसुद्धा महत्प्रयासाने तीन महिन्यांच्यावर टिकलेली पहिलीच. त्या पहिल्या तीन महिन्यांत दर आठवड्याला जावं लागे. अल्ट्रासाउंड, ब्लड टेस्ट अन् डॉक्टरांशी चर्चा होईपर्यंत दोन-तीन तास सहज निघून जात. मला जर एखादवेळेस जमलं नाही, की ती एकटीने जायला आढेवेढे घेत असे. ब्लड टेस्ट ठीक, पण दर खेपेस अल्ट्रासाउंड करताना पाहणे म्हणजेच मला शिक्षा वाटत असे, तिला तर ती किती ऑकवर्ड वाटत असेल कोणास ठाऊक. तरी अल्ट्रासाउंड करणारी टेक्निशियन बाई एकदम छान होती. पेशंटच्या, तिच्या नवर्‍याच्या मनस्थितीची पूर्ण कल्पना असायची तिला. चांगली न्यूज नसली, तरी सांगायची हातोटी विलक्षणच होती तिची. पण तरी दर आठवड्याला त्या दिव्यातून जायचं म्हणजे सुमाला कसंसंच वाटत असे.

शिवाय या खेपेस तिला दररोज दिवसातून दोन वेळा इंजेक्शनं सांगितली होती. दणकट दीड इंच लांब सिरींज अन् ते दाट तेलात मिसळलेलं प्रोजेस्टरोन. डॉक्टरांनीच शिकवलं होतं मला अन् सुमाला ते इंजेक्शन कसं द्यायचं ते. ती एवढी मोठी सिरींज तिच्या दंडात खुपसताना तिला कितीही दुखलं, तरी ती घट्ट ओठ चावून घेण्यापलीकडे काही दाखवत नसे. मी जर नसेन, तर तिला स्वत:च उजव्या हाताने डाव्या दंडात ते इंजेक्शन घ्यावे लागणार. मी असलो, की आलटून पालटून उजव्या, डाव्या बाजूला देत असे, पण डॉक्टरांनीच सांगितलं होतं, 'इफ यू आर डूइंग इट युवरसेल्फ, डोंट इव्हन थिंक ऑफ यूझिंग यूवर लेफ्ट हॅंड'. सतत पाच दिवस एकाच बाजूला ते इंजेक्शन घेऊन हात ठणकत असणार. त्याबद्दल बोलली नव्हती ती काहीच. मंगळवारची ब्लड टेस्टदेखील व्यवस्थित होती, बाळाचे हार्टबीट्स नीट ऐकू आले, वजन वगैरेपण प्रमाणात आहे म्हणालेली.

कदाचित नुसतीच वॉकला गेली असेल, सायकल चालवायचा मूड नसेल आज, असा विचार करून मी तयारीला लागलो. चार वाजत आले होते, ऑफिसमधनं काही ती सहाशिवाय येत नाही, अशा अंदाजाने माझी सरप्राईझची तयारी होती. भेळपुरी, पाणीपुरी अन् कटलेट, तिचा आवडता मेनू. शुक्रवारीतर अजूनच आवडता. अन् मला जमणारे प्रकार. भाज्या चिरून अन् बटाटे उकडून होईपर्यंत ती येईलच. मग पुढचं दोघं मिळून करू, असा विचार होता. पाच वाजत आले, तरी ती आली नाही, तेव्हा मला जरा काळजी वाटली. सेलफोनवर फोन केला, तर व्हॉइसमेल. कदाचित वॉकला नसेल गेली, एखाद्या कलीगकडून राइड घेऊन ऑफिसला गेली असेल, म्हणून ऑफिसात फोन केला, तर तिथेही व्हॉइसमेल. एक टेक्स्ट मेसेज केला शेवटी तिच्या फोनवर.

दहा मिनिटे कशीबशी वाट पाहिली, परत उत्तर येईल म्हणून. टेक्स्ट मेसेज केला, की कधीही पाच मिनिटांत तिच्याकडून उत्तर यायचंच. दहा मिनिटे झाल्यावर मात्र मी आणखीनच काळजीत पडलो. सगळं झाकून ठेवलं अन् गाडी काढून डिव्हलपमेंटमधले सगळे रस्ते शोधून आलो. कोपर्‍यावर राहणारी दोन लॅब्रॅडॉरवाली बाई - सुमाच्या भाषेत त्यांची आई, अंगणातच होती. गाडी थांबवून तिला विचारलं, सुमा दिसली होती का म्हणून.
"आय हॅवंट सीन शूमा सिन्स लास्ट नाइट. शी वॉज आउट फॉर अ स्ट्रोल, अँड वी चॅटेड फॉर अ फ्यू मिनट्स."
पहाटेपासून रात्री उशिरापर्यंत ही अन् हिचे दोन्ही कुत्रे बाहेर अंगणात पडीक असतात. सगळा वेळ ही बाई बागेत खूडबूड करत असते अन् आल्यागेल्यांशी गप्पा मारत असते. हिने पाहिलं नाही, म्हणजे नक्की सुमा या बाजूने आली नसणार.

परत घरी जाऊन मित्र-मैत्रिणींना फोन करायला सुरुवात केली. आठवड्याभरातले आलेले अन् सुमाने केलेले फोन पाहिले, तर त्यांत काही विशेष नव्हतं. माझे रोज संध्याकाळचे कॉल्स, तिच्या एक-दोन मैत्रिणींचे कॉल्स अन् एक डॉक्टर ऑफिसमधून अपॉइंटमेंटची आठवण द्यायला आलेला फोन. तिने तर घरचा फोन वापरलाच नव्हता मी गेल्यापासून.

जवळच्या, रोजच्या रोज ज्यांच्याशी बोलणं होत असे, अशा तिन्ही मैत्रिणींना फोन केला. कोणालाच काही माहीत नव्हतं. शेवटी तिच्या ऑफिसमधल्या मैत्रिणीला फोन केला, तर ती म्हणाली,
"डिडंट शी टेल यू? शी टुक द डे ऑफ बिकॉज शी वॉजंट फीलिंग गुड. आय हॅवंट हर्ड एनिथिंग सिन्स दॅट इमेल इन द मॉर्निंग. इन फॅक्ट, आय वॉज गोइंग टु कॉल यू. वेअरंट यू सपोज्ड टु अराइव्ह लेट अ‍ॅट नाइट?"

शुक्रवारी संध्याकाळी साडेपाचच्याही पुढे, म्हणजे डॉक्टर ऑफिसमध्ये कोणी नसणार. फोन वाजेल आंसरिंग सर्व्हिसच्या ऑफिसात. तिथले लोक एक नंबरचे मठ्ठ. तरी सुदैवाने माझा फोन ज्या बाईने घेतला, तिला पटकन कळलं मी काय विचारतोय ते, अन् तिने पंधरा मिनिटांत ऑन-कॉल डॉक्टर फोन करतील म्हणून सांगितलं. आता वाट पाहणे आले. पोलिसांना फोन करावा का? आता करू की डॉक्टरांचा फोन आल्यावर करू? इथे न्यूजमध्ये जेव्हाही गरोदर बाई हरवते, तेव्हा पहिल्यांदा नवर्‍यावरच संशय असतो. आपलं काय होईल? उद्या शनिवार, घरी फोन करायचेत सगळ्यांना? काय सांगायची वेळ येईल? डोकं भणाणून गेलं. स्वयंपाकाची तयारी अर्धवट पडली होती. सुमा आली, तर वैतागेल स्वयंपाकघरात पसारा पाहून. या विचाराने हसूच आलं मला. ती सापडत नाहीये, म्हणूनच हा सगळा पसारा तसाच पडलाय ना!

वेळ जायला हवा म्हणून मी प्रवासाची बॅग रिकामी करायला घेतली. धुवायचे कपडे लाँड्री बास्केटमध्ये टाकले. कुठेही बाहेरगावी गेलं, की हॉटेलमधले साबण अन् शॅंपू आणून इथल्या होमलेस शेल्टरमध्ये द्यायचे, हा सुमाचा शिरस्ता आहे. त्या छोट्या बाटल्या गराजमधल्या बास्केटमध्ये टाकल्या. ऑफिसचे कागदपत्र, लॅपटॉप सगळं स्टडीरूममध्ये ठेवलं. घरात सगळीकडे सुमाचा नीटनेटकेपणा जाणवत होता. तिच्याशी लग्न झाल्यापासून किती बदललो मी!

आमची ओळख झाली, तेव्हा सुमा नवीनच होती अमेरिकेत. तिचं पहिलं सेमिस्टर, ते माझं शेवटचं सेमिस्टर होतं. तेव्हा भारतीय मुलं-मुली कमीच असायची अन् जी असतील, ती सगळी एकमेकांना ओळखत असायची. दर महिन्याला काही ना काही निमित्ताने सगळे एकत्र जमून पार्टी करत असू. पहिल्याच पार्टीमध्ये कोणीतरी सुमाला गाण्याचा आग्रह केला होता अन् तिनेही फारसे आढेवेढे न घेता गाणी म्हटली होती. 'इक लडकी को देखा तो ऐसा लगा' इतकं मस्त म्हटलं होतं तिने, कसल्या टाळ्या घेतल्या होत्या त्या गाण्याला! तेव्हापासून दर कार्यक्रमाला सुमाची गाणी असायचीच. सेमिस्टर संपल्याची पार्टी होती, त्यात तिने 'पापा कहतें है' म्हटलेलं, त्यावेळीसुद्धा जोरदार टाळ्या पडल्या होत्या. त्यानंतर मी नोकरीनिमित्त बॉस्टनला गेलो अन् युनिव्हर्सिटीमध्ये येणं-जाणं काही झालं नाही. काही तुरळक लोकांशी फोनवरून बोलणं होत असे. हळूहळू मी नोकरीत स्थिरावलो, बॉस्टनमध्ये मित्रमैत्रिणींचं नवं वर्तुळ आकार घेत गेलं. युनिव्हर्सिटीमधल्या मित्रमैत्रिणींशी बोलणं तुरळकच होत गेलं. क्वचित फोन केलेच, तरी 'हा काय करतो? ती कुठे असते?' असे प्रश्न संपले, की पुढचं बोलणं खुंटत असे.

जवळजवळ चार-पाच वर्षांनी माझ्या कंपनीच्या एच्. आर.मधल्या बाईने फोन केला, "डू यू नो सूमॅन गॉड्बॉली? शी इज फ्रॉम युवर अल्मा मॅटर."
सूमॅन? हे कसलं नाव? 'मी नाही ओळखत असल्या कोणाला,' असं अगदी तोंडावर आलं होतं. पण का कोणास ठाऊक, मी ते उच्चार कागदावर लिहून पाहिले. 'Suman'! सुमा! सुमाच असणार. पण गोडबोले कुठे अन् गॉडबॉली कुठे? ही कॅथी विचित्रच आहे. "येस, आय नो हर, शी वॉज माय ज्युनियर."

मी तिचा रेझ्यूमे पाहिला. ग्रॅज्युएशननंतर दोन वर्षं तिने शिकागोजवळ एके ठिकाणी नोकरी केली होती अन् आता इथे माझ्या कंपनीत नोकरीकरता अर्ज टाकला होता. इंटरव्ह्यूला यायच्या आधी एक-दोन वेळा फोनवर बोललो होतो आम्ही. पण तिला मी जेव्हा प्रत्यक्ष भेटलो, तेव्हा अजिबात ओळखलंच नाही. मी शेवटचं भेटलेलो त्यामानाने वजन केवढंतरी कमी झालेलं, केस अगदी तोकडे जेमतेम पोनीटेल येईल इतपत अन् एकंदरीत चेहर्‍यावर नुकतीच आजारपणातून उठली असेल असे भाव. बोलणंसुद्धा अगदी मोघम. पूर्वीची अखंड बडबड हरवून बसली होती जणू.

इंटरव्ह्यू चांगलाच झाला, तिला ऑफर मिळाली, महिन्याभरात ती शिकागोहून बॉस्टनला आलीदेखील. सुरुवातीला मी तिला अपार्टमेंट शोधायला वगैरे मदत केली. एकदोनदा माझ्या मित्र-मैत्रिणींच्याबरोबर काही प्लॅन्स होते, तिथे तिला बोलावलं. पण एकंदरीत तिला कोणाशी बोलणंच नको असायचं. आली, तरी एका कोपर्‍यात गप्प बसून राही. काही प्रश्न विचारले, तर मोघम उत्तर देई. शेवटी एकदा वैतागून मी तिला विचारलंसुद्धा, "कँपसमधली सुमन ती तूच आहेस की तिची खडूस जुळी बहीण आहेस? इतकी कशी बदललीस तू?" असे, लगेच डोळे भरून आलेले तिचे!
मला म्हणाली, "तुला वेळ आहे का भरपूर? इतर कोणाकडनं काहीबाही कळण्यापेक्षा मीच सांगते तुला."

"तू कॅंपस सोडल्यानंतर कधी परत आला नाहीस ना शिकागोला? तुला काहीच माहीत नसेल काय काय झालं ते. आमच्याच बॅचला एक अमित नावाचा मुलगा आलेला, आठवतो का तुला?"

"नावतरी ओळखीचं वाटत नाही. कुठल्या डिपार्टमेंटला होता?"

"आपल्याच की, काँप साय. त्याचे काका सॅन डिएगोहून त्याला सेटल करायला आले होते."

तिने त्याचे काका म्हटल्याबरोबर मला एकदम तो मुलगा आठवला. दिल्लीहून सॅन डिएगोला येऊन काकांकडे महिनाभर राहिला होता तो सेमिस्टर सुरू व्हायच्या आधी. त्याच्या काकांनी त्याच्या अपार्टमेंटमधलं सगळं फर्निचर नवं कोरं घेऊन दिलं होतं त्याला. ड्रायव्हिंग लायसंसची परीक्षा लागोपाठ दोनदा फेल झाल्यामुळे गाडी घेऊन देता आली नव्हती, तर तो दिसेल त्याला इथल्या आर. टी. ओ.बद्दल सांगत बसायचा.

"हो, हो आता आठवला जरा जरा."

"माझे अन् त्याचे कोर्सेस सेमच होते पहिल्या सेमिस्टरमध्ये. एका कोर्समध्ये ग्रूप असाइनमेंट होती, तर त्याने मला अन् इतर दोन देशी मुलांना घेऊन ग्रूप केला होता. तेव्हा मला कळत नव्हतं, पण आता कळतंय, की त्याने स्वतः फारसं काम कधी केलं नाही. पण लॅबमध्ये असलो, की सगळ्यांचा कॉफीचा, खाण्यापिण्याचा खर्च करायचा. हे कॉपी करून आण, तिकडनं कलर प्रिंट करून आण वगैरे कामंही विनातक्रार करायचा. आम्हांला चार लोकांना त्या विषयात 'ए' मिळाली होती. तर त्याने सगळ्यांना देशी रेस्टॉरंटमध्ये जेवायला नेलं होतं."

ही वेडी त्या अमितच्या प्रेमात पडली होती. कॉलेजमध्ये असेपर्यंत सर्व काही नीट चाललं होतं. शेवटच्या सेमिस्टरला जेव्हा सुमनने घरी सांगण्याचा विषय काढला, तेव्हा मात्र अमितने कानावर हात ठेवले. घरच्यांनी सांगितलेल्या, तोलामोलाच्या खानदानातल्या मुलीशीच त्याला लग्न करावं लागणार. सुमनसारखी शिकलेली, करियर करू इच्छिणारी मुलगी त्याच्या घरच्यांना अजिबात पसंत पडली नसती.

हिने त्याला तिथल्या तिथे सोडायला हवं होतं. पण हे काही दुसर्‍याने सांगून यायचं शहाणपण नाही. दोघांनाही शिकागोतच नोकर्‍या मिळाल्या होत्या. दोघांचं फ्रेंडसर्कल कॉमन होतं. अमित आपल्या घरच्यांचं मन वळवेल, अशा आशेत ती राहिली. शेवटी जेव्हा ग्रीनकार्ड व्हायच्या थोडंसं आधी तो पंधरा दिवसांकरता भारतात गेला अन् लग्न करूनच परतला होता, तेव्हा मात्र सुमन कोलमडून गेली होती. कसंबसं स्वतःचं ग्रीनकार्ड होईपर्यंत शिकागोमध्ये राहिली अन् ग्रीनकार्ड झाल्या झाल्या 'शिकागोबाहेरची हवी' या एका अटीवर नवी नोकरी शोधायला सुरुवात केली होती.

फोनच्या आवाजाने भानावर आलो दचकून. डॉक्टर रोझेंथालचा फोन होता. नशिबाने सुमनची अपॉइंटमेंट त्यांच्याबरोबरच होती.
"येस, शी केम इन टू सी अस धिस मॉर्निंग. हर प्रोजेस्टेरोन लेव्हल्स हॅड ड्रॉप्ड. आय अ‍ॅम अफ्रेड इट इज नॉट गुड न्यूज. वी डिडंट सी एनी हार्टबीट."
माझे पाय लटपटायला लागले. मी मटकन खालीच बसलो. पहिले बारा आठवडे सुखरूप पार पडलेले. आता धोका टळला असं त्यांनीच तर सांगितलेलं. अन् आता हे काय मध्येच? "आर यू ओके मिस्टर गॉडबोलि?" म्हातार्‍या रोझेंथालच्या आवाजात काळजी दाटून आली. मी 'मिस्टर गॉडबोलि' नाही, हे त्यांना सांगायचंसुद्धा मला सुचलं नाही. मी कसंबसं त्यांच्याकडनं सगळे डीटेल्स घेतले. त्यांनी परत लागला, तर असू दे म्हणून स्वतःचा सेलफोन नंबरही दिला.

रात्रभर तिला अतिशय थकवा वाटत होता, कसंसंच वाटत होतं. डॉक्टरांकडे गेल्यावर तेव्हा बाळाचे ठोके ऐकू येत नव्हते. अल्ट्रासाउंडमध्येही काही हालचाल दिसत नव्हती. प्रोजेस्टरोन अन् एच्. सी. जी. लेव्हल्स एकदम खाली आलेल्या. रोझेंथालनी अगदी हळुवारपणे तिला सांगितलं होतं, की चोवीस ते अठ्ठेचाळीस तासांत आपोआप मिसकॅरेज होईल. नाही झालं, तर सोमवारी मग कळा येण्याचं इंजेक्शन देऊन अबॉर्शन करावं लागेल. हे सगळं ऐकून दहाच्या सुमारास ती त्यांच्या ऑफिसमधनं निघाली होती. त्यानंतर ती कोणाशी बोलली, कुठे गेली, काहीच ठावठिकाणा नव्हता. तिला चकित करावं म्हणून मी लवकर निघालेलो, त्यामुळे काल रात्रीनंतर माझंही तिच्याशी बोलणं झालं नव्हतं.

पोलिसांना फोन करावा की करू नये अशा विचारात होतो. तेवढ्यात अंजूचा - तिच्या मैत्रिणीचा - परत फोन आला.
"सापडली का रे प्रिय बायको तुझी?"
तिला सगळं सांगितल्यावर ती म्हणाली, "आधी पोलिसांना कळव. नुसता फोन करू नकोस, त्यांच्या ऑफिसमध्येच जा अन् सांग. मी अन् अविनाश तिथेच येतो पंधरा मिनिटांत."
अविनाश स्कूल बोर्डावर आहे. इथल्या पोलिसांशी, टाउनशिपमधल्या लोकांशी त्याची चांगली ओळख आहे.

स्वयंपाकाची तयारी अर्धवट होती, ते सगळं जरा आवरलं अन् निघालो. ड्यूटीवरच्या ऑफिसरला सगळी परिस्थिती सांगितली. त्यांनी अनेक प्रश्न विचारले. अंजू अन् अविनाश आल्यावर त्यांनी दोघांनी पोलिस ऑफिसरला आपली ओळख सांगितली. मला अन् सुमाला कसे ओळखतात, अंजूचं अन् सुमाचं काय बोलणं झालं होतं वगैरे सगळं सांगितलं.

त्या ऑफिसर डेविसने त्यांचे दिवसभराचे अ‍ॅक्सिडेंट रिपोर्टस तपासले, कुठे काही नाही. गाडी घरीच होती. त्यामुळे गाडीचा नंबर देणे वगैरे काही प्रश्न नव्हता. तो म्हणाला, की साधारणपणे सज्ञान व्यक्ती जर हरवली असेल, तर चोवीस तासांपर्यंत ते काही कारवाई करत नाहीत. त्यानंतर काय ती शोधाशोध वगैरे सुरू होते. पण तिची मेडिकल कंडिशन लक्षात घेता, ते त्यांची प्रोसिजर लगेच चालू करतील. बसस्टेशन, एअरपोर्ट, रेल्वेस्टेशन सगळीकडच्या पोलिसांना त्याने लगेच कळवलं.

क्रेडिट कार्डावर काय काय चार्जेस आहेत ते चेक करा, सेलफोनचे रेकॉर्ड पाहा, तिने कपडे कुठले घातले असतील, ते शोधून पाहा वगैरे सांगून त्याने मला अन् अंजूला घरी पाठवलं अन् अविनाशला थांबवून घेतलं.

मी अन् अंजू घरी आलो. रात्रीचे आठ वाजत आले होते. हळूहळू काळोख पडायला लागला होता. ही सुमाची अगदी नावडती वेळ. एकदा पूर्ण काळोख पडला, की हरकत नाही. पण ही अशी संधिप्रकाशाची वेळ म्हणजे तिला कायम कसलीतरी हुरहूर वाटत राही. घरभर दिवे लावल्याशिवाय चैन पडत नसे तिला. कितीदा भांडलोय मी तिच्याशी. घरात राहणारे आम्ही दोघंच, पण आत, बाहेर, वरती, मागच्या डेकवरचे, सगळीकडचे दिवे लावलेले! आज तिची आठवण काढत मीच घरभर दिवे लावले.

क्रेडिट कार्डावर गेल्या चार-पाच दिवसांत काहीही चार्जेस नव्हते. त्याआधीचे होते, ते साधेच गॅस भरल्याचे, ग्रोसरी स्टोअरचे असे दोन चार फुटकळ चार्जेस. सेलफोनवर दिवसभरात एकही आउटगोइंग कॉल नव्हता. अंजूचे दोन फोन, माझा एक, ऑफिसमधल्यांचे एक-दोन. त्यांतही काही विशेष नाही. तिच्या क्लॉझेटमधून तिने कुठले कपडे घातले असतील, ते बघू म्हणून वरती जात होतो. तेवढ्यात अविनाश येऊन पोचला.

"काय म्हणाला रे ऑफिसर डेव्हिस?" अंजूने अन् मी एकदमच विचारलं.
"काही विशेष नाही, नेहमीचंच. नवरा-बायकोचं रिलेशनशिप कसं आहे? पैशांचा काही घोळ आहे का, कोणाचं बाहेर काही लफडं आहे का? भांडणं होती का कशावरून? गँब्लिंग, ड्र्ग्ज वगैरे काही भानगडी तर नाही ना? हे अन् असलेच प्रश्न."

असलं सगळं विचारतील हे अपेक्षितच होतं. तरीही अविनाशच्या तोंडून ते ऐकायला कसंसंच वाटत होतं. अविनाश अन् अंजू आम्हांला बर्‍याच वर्षांपासून ओळखतात. पण तरीही त्यांना या सगळ्याबद्दल काय वाटत असेल? त्यांनादेखील माझ्यावर संशय येत असेल का? पण संशय असेल, तर ते माझ्याबरोबर पोलिसात कशाला आले असते? प्रश्न आणि प्रश्न! उत्तरं असलीच, तर तीही प्रश्नार्थकच!

"सुमाच्या सगळ्या फ्रेंडसना फोन करून विचारायचं का आपण?" अंजूने विचारलं. मला असं सगळ्यांना फोन करून विचारायला नको, जवळच्या दोन-चार जणांनाच करावा फारतर असं वाटत होतं.

"सांग बरं जवळचे फ्रेंडस कोण आहेत ते?" अंजू म्हणाली.

"अं, तुम्ही, अपर्णा, रिमा अन् लोकेश, परिणीता, झोई, इंग्रिड."

"ह्यॅ! रिमा अन् लोकेशशी तुमचं भेटणं होतं वारंवार, पण ते काय तिचे क्लोझ फ्रेंडस थोडीच आहेत. लोकेश तुझा शाळेपासूनचा मित्र, बर्‍याच वर्षांनी दोघे परत इथे जवळ-जवळ राहता म्हणून तो तुझा मित्र. तुला ते दोघे आवडतात म्हणून सुमा त्यांना चालवून घेते!"

"जा, जा! तुलाच ती रिमा आवडत नाही, म्हणून तू आता सुमाला पण तुझ्या बाजूला ओढतेयस."

"अरे, आपण सुमाचा विचार करूयात का? रिमा अन् लोकेश कोणाला आवडू दे, नाहीतर न आवडू दे. सुमाला शोधण्यासाठी त्यांची मदत होत असेल, तर करूया फोन." अविनाशला असे वाद आवडत नाहीत.

"तेचतर मी पण म्हणतेय, की सुमाचा ठावठिकाणा रिमाला काही माहीत नसणार. उलट सुमा सापडली, की उगीच चिडेल त्यांना का विचारलंत म्हणून."

"बरं मग कोणाकोणाला विचारूया म्हणतेस तू?"

"अपर्णाला विचारलंस ना तू आधीच? मग आता परिणीताला मी करते फोन. झोईला अन् इंग्रिडला तू कर फोन. दोघींना तुझा सेलफोन नंबरही देऊन ठेव. तिच्या ऑफिसमधल्या कोणाला विचारायचंय का?
अविनाश तू कॉफी अन् सँडविचेसचं बघ अन् आईंना फोन कर," अंजूने सगळी सूत्रं हातात घेतली.

झोई अन् इंग्रिड म्हणजे सुमाच्या जुन्या नोकरीतल्या मैत्रिणी. आता ती नोकरी सोडून किती वर्षं झाली, तरी तिघी एकमेकींच्या अगदी क्लोझ आहेत. दर आठवड्याला भेटतात, एक दिवसाआड फोन असतो. दोघींची आमच्या बाळाची गॉडमदर होण्याची तयारी आहे. त्या दोघींनाही काही माहीत नव्हतंच. दोघींचं सुमाशी शेवटचं बोलणं झालं, त्यात त्यांना काही विशेष वाटलं नव्हतं. तरी इंग्रिडने अजून दोनचार नावं सुचवली.

अंजू म्हणाली, "बघ, इंग्रिडला अंदाज आहे, की सुमा कसा विचार करेल, कशी वागेल, कोणाशी बोलेल. अन् तू म्हणे रिमाला अन् तिच्या नवर्‍याला विचारूया! सुमा त्यांना अडीअडचणीला अजिबात फोन करणार नाही. दे आर नॉट हर टाइप."

"अरे आपण शोधतोय सुमाला अन् तुम्ही दोघे परत रिमावर का चर्चा करताय? तुला एवढं वाटतंय, तर तू कर रे फोन रिमाला."

"नको, जाऊ दे! सुमा नाही चिडली, तरी अंजू चिडेल ना. अजून कोणाला विचारूया? आपणच बाहेर पडून शोधूया म्हटलं, तरी कुठे जाणार? नुसतंच 'गली गली छान मारी' करण्यात अर्थ आहे का?"

"आता कसं मुद्द्याचं बोललास? पहिल्या वेळेस ती किती डिप्रेस्ड होती आठवतंय ना? दुसर्‍या खेपेला तिने वरकरणी तरी बरंच धीराने घेतलं होतं. तरी तिसर्‍यांदा चांस घ्यायला ती तयारच नव्हती. अडॉप्शनच करायचं होतं तिला. तिच्या अन् तुझ्या घरच्यांना पटवायचीसुद्धा तयारी होती. अखेर हा तिसर्‍यांदा प्रयत्न करायचं ठरवल्यावरदेखील बरेच दिवस अस्वस्थ होती. आपल्या नशिबातच बाळ नाहीये, अशी काहीशी समजूत झाली होती तिची. तुझ्या लक्षात आलं होतं का ते?"

"अर्थातच, असं कसं माझ्या लक्षात येणार नाही. मानसिक त्रास तिच्याइतकाच मलाही झालेला ना दोन्हीवेळा. डॉक्टरांनी पहिल्या वेळेस सांगितलेलं मला अजूनही लख्ख आठवतंय, 'धिस इस नेचर्स वे ऑफ स्टॉपिंग समथिंग दॅट इज नॉट व्हायेबल.' त्यांनी सगळी स्टॅटिस्टिकल इन्फर्मेशन दिली होती. पण त्या नुसत्या आकड्यांनी आमच्या मनांची समजूत कशी घालणार? पहिल्यांदा टेस्ट पॉझिटिव्ह आल्यापासून किती खूश होतो आम्ही! किती प्लॅन्स केले होते! दुसर्‍यांदाही मिसकॅरेज झाल्यावर मलासुद्धा वाटलेलं, की हे आपल्या नशिबातच नाही का? सुमा अन् मी इनकंपॅटिबल आहोत की काय, असंसुद्धा वाटलेलं तेव्हा मलातर."

"मग ती अशा गोष्टी तुझ्याखेरीज अजून कोणाशी बोलत असे? अशा गोष्टी सगळ्यांशी नाही डिस्कस करणार ती."

"हम्म! मलातरी असं कुणाचंच नाव लक्षात येत नाही. तुला माहीत आहे, ती सगळ्यांशी सारख्याच जवळिकीने वागते. पण तिच्या खास मर्जीतलं कोण आहे, असं सांगता येणार नाही मला."

"मी सांगू का एक," कॉफी अन् सँडविचेस घेऊन अविनाश फॅमिलीरूममध्ये आला.

"ती कोणाशीच बोलली नसणार. एकटी कुठेतरी जाऊन विचार करत बसली असेल!"

"कशावरून?" मी अन् अंजूने जवळपास एकदमच विचारलं.

"असाच हंच आहे माझा. मी काही तुमच्यासारखं लोकांचं अ‍नॅलिसिस करत नाही. पण माझे हंचेस हमखास बरोबर असतात. तू सुमाला प्रपोज करणार, हे तुझ्याआधी मी ओळखलं होतं अन् अंजूला सांगितलंदेखील होतं."

"ह्यॅ! फेकू नकोस उगाच. आम्ही बॉस्टनमध्ये होतो तेव्हा अन् तुम्ही इथे रेडमंडमध्ये. एकदा आला होतास तू बॉस्टनला आमच्या लग्नाच्या आधी."

"कबूल, पण मला कळलं होतं. कशावरून ते नेमकं नाही सांगता येणार मला. आय जस्ट न्यू इट."

"हो, त्याने मला जवळ-जवळ महिनाभर आधी सांगितलं होतं, - ते दोघं एकमेकांच्या प्रेमात पडले आहेत, पण त्यांना अजून माहीत नाही किंवा ते माहीत नसल्याचं दाखवताहेत. - मीसुद्धा उडवून लावलं होतं त्याला. पण मग तुम्हीच फोन करून सांगितलंत, की तू प्रपोज केलंयस ते."

"तू एकदा तिला अमितवरून काहीतरी बोलला होतास आठवतंय का? उगाच फडतूस कारणावरून भांडला होतात दोघे. अन् मग तू नक्की काय म्हणाला होतास ते माहीत नाही मला, पण तिला अतिशय जिव्हारी लागेलसं काहीतरी पचकलेलास. तेव्हा तिने अबोला धरलेला तुझ्याशी. बाकीच्या कोणालाही तिने कळूही दिलं नव्हतं, की तुमचं काहीतरी बिनसलंय ते."

"तुला रे कसं माहीत हे सगळं अविनाश?"

"सांगितलं ना, जस्ट माय हंच म्हणून."

"मग आधी कधी बोलला नाहीस ते?"

"झालं! मी तुला सांगणार, मग तू लगेच फोन करून सुमाला सांगणार, ती मला झापणार, मी ह्याच्यावर डाफरणार. कशाला डोकेदुखी?"

"बरं मग तुझं म्हणणं काय?"

"ती कुठे जाऊन बसली असेल, त्याचा विचार करा अन् तिथे जाऊन शोधूया."

"मी तर मॉलमध्ये गेले असते. फॉर मी नथिंग वर्क्स लाइक रिटेल थेरपी. पण सुमा मॉलच्या दिशेने अजिबात जाणार नाही." अंजूने सरळ कबुली दिली.

"लायब्ररीत जाणार नाही, कुठल्याही दुकानात जाणार नाही. गाडी घरीच आहे म्हणजे एकतर चालत गेली असेल किंवा टॅक्सीने गेली असणार. पण कुठे गेली असेल, ते मात्र मला सुचत नाही."

"बॉस्टनमध्ये तिची आवडती ठिकाणं कुठली होती?"

"का रे बाबा? आता बॉस्टनचा काय संबंध इथे?"

"शी वॉज हॅपी देअर."

म्हणजे इथे हॅपी नाहीये का? लग्नाआधी दीडेक वर्ष अन् त्यानंतर जेमतेम वर्षभर बॉस्टनमध्ये होती ती. इथे येऊन आता पाच वर्षे होऊन गेली. इथे मोठं घर घेतलंय, नोकर्‍यांत दोघंही चांगल्या पोझिशनवर आहोत, मित्रमैत्रिणींचं मोठं सर्कल आहे. पण बॉस्टनमध्ये असताना हे प्रेग्नंसी अन् मिसकॅरेजेसचं टेन्शन नव्हतं. लग्नानंतर आईबाबांनादेखील बोलवून घेतलं होतं बॉस्टनमध्ये असताना. पूर्ण ईस्टकोस्ट, अगदी मेनपासून फ्लोरिडापर्यंत फिरलो होतो तेव्हा. ते खरंच मजेचे दिवस होते. आता तिचे आई अन् पप्पा कधी येतील याची वाटच बघत होतो, तर हे!

"कुठे हरवलास तू? काही स्पेशल जागा आठवली की काय बॉस्टनमधली?"

"असं नाही रे, पण तिला चार्ल्सच्या किनार्‍यावरून फिरायला आवडायचं. व्हेल वॉचिंग टूर आवडायची, पॅट्रियटचे गेम्स दर सीझनला एकतरी बघायचोच. रेड सॉक्सचे तर डझनभर गेम्स पाहिले असतील चार-पाच वर्षांत. खरंच बॉस्टन आवडती जागा आहे तिची."

"नीडल! नीडलपाशी असणार ती!" अंजू म्हणाली, "सिएटलचा लँडमार्क आहे अन् सुमाला आवडतं तिथे जायला."

"मग तू जातोस का तिथे? मी अन् अंजू घरी थांबतो. ती इथे आली, तर कोणीतरी घरी हवं."

"बरं. काही कळलं, की लगेच फोन करा मला."

गराजमध्ये आल्यावर सवयीने मी माझ्या गाडीकडे वळलो. पण का कोणास ठाऊक सुमाची गाडी न्यावी असा विचार आला. तिची गाडी चालू केल्याकेल्या सीडी चालू झाली. 'चला वाही देस...' पहिलंच गाणं लागलं. कशाला अशी गाणी ऐकते ही? म्हणजे गाणं चांगलं आहे, पण अशी विरहाची, दु:खाची गाणी कशाला ऐकावीत अशा दिवसांत? तिला कितीदा सांगितलंय, की क्लासिकल ऐकत जा म्हणून. मोझ्झार्टच्या अन् बीथोव्हनच्या सीड्याही आणल्यात कितीतरी. पण ही हिंदी गाण्यांच्या पलीकडे जायला तयारच नाही. आता सापडू दे एकदा, सगळ्या हिंदी सीड्या जप्त करून टाकेन!

saavara re.JPG सरत्या उन्हाळ्यातली शुक्रवार संध्याकाळ. सगळी माणसं एकत्रच घराबाहेर पडलेली. गाड्या रेंगाळत रेंगाळत सरकताहेत पुढे. एकामागे एक मीराबाईची भजनं चालली आहेत सीडीवर. मला ती ऐकवत नाहीत, पण सीडी बदलायचीदेखील इच्छा होत नाही. रूट फाइव्हवरचं एक्झिट जवळ आल्यावर अविनाशला फोन केला. त्यांना कोणाचाच फोन वगैरे आला नव्हता.

एखादी फिल्म उलगडावी तशी मला सुमा आठवते.
एकदा डॉक्टरकडून येताना गाडीत मी वैतागलेलो, 'हे सगळं त्या दिल्लीवाल्याच्या नशिबात असायचं, ते माझ्या वाट्याला का आलं?' म्हटल्यावर नुसतेच डोळे भरून आलेले. त्याच्यानंतरच बरेच दिवस अबोला धरला होता माझ्याशी. पण मग तो रुसवा कसा मिटला? मी काय केलं होतं? काहीच आठवत नाही? का केलं असेल तिने मला माफ?

इथल्या मंडळाच्या पिकनिकला तिची अंताक्षरीची टीम जिंकलेली म्हणून दोनचार लोकांनी तिला उचलून घेतलेलं! मला ते आवडलं नाही, म्हणून एका शब्दाने काही न बोलता माझ्याबरोबर तिथून निघून आलेली सुमा. का आली असेल ती माझ्याबरोबर तडकाफडकी निघून?

रिमा अन् लोकेश आमच्या घरी येतात तेव्हा, फक्त लोकेश माझा लहानपणापासूनचा मित्र म्हणून रिमाचा भोचकपणा चालवून घेणारी सुमा. का करते ती हे?

तिसर्‍या खेपेला नकोच म्हणणारी सुमा. अडॉप्शनला माझा इतका विरोध पाहून बावचळलेली सुमा. शेवटी दिवस राहिल्यावर खूश होण्यापेक्षा काळजीत पडलेली सुमा.
गाड्या अजून रेंगाळतच आहेत, सीडीवरची गाणी पुढे सरकत आहेत.

सांवरा रे, म्हारी प्रीत निभाजो जी...

बॉस्टनमधल्या घरी आई-बाबा आले होते, तेव्हा तिथल्या मित्र-मैत्रिणींना जेवायला बोलावलं होतं. नेहमीप्रमाणे सुमाला गाणं म्हणायचा आग्रह झाला. त्यावेळी तिने हे गाणं म्हटलं होतं. आईसाठी म्हणून तिने भजन म्हटलं असणार, असं मी समजलो होतो! त्यावरून मी तिची टिंगलसुद्धा केली होती, 'तुझ्यासाठी आता अनुप जलोटाच्या सीड्या आणाव्या लागणार का?' म्हणून . तर माझ्यावर उखडलेली. कशाला एवढी उखडली होती?

मनातल्या मनात मी तो सीन रिवाइंड करून पाहतो. गाणं म्हणताना सुमाचे डोळे मिटलेलेच आहेत. अगदी शेवटी ती हलकेच डोळे उघडते. अन् माझ्याकडे पाहून परत डोळे मिटून घेते. डोळ्यांच्या कडा ओलावल्या आहेत. एक क्षणभर सगळे शांत आहेत. आई अन् बाबा टाळ्या वाजवतात. अन् लगेच अजून गाण्यांच्या फर्माइशी चालू होतात. सुमाचे डोळे पाणावलेले कोणाच्याच लक्षात आलेलं नाही. का बरं पाणी आलं डोळ्यांत? देवा-ब्राह्मणांसमोर लग्न लागलंय. दोघांच्याही घरी विरोध तर नाहीच, मानपानावरून वगैरेसुद्धा काही रुसवेफुगवे झालेले नाहीत. आजवर किती गाणी म्हटलेली ऐकली आहेत. घरात असली, तर सतत काहीतरी गुणगुणत असते. पण इतकी एखाद्या गाण्यात बुडून गेलेली नाही कधीच. आपलंच गाणं ऐकत असते ती.

आलंच एक्झिट जवळ. अजून दहा मिनिटांत पोचेन मी नीडलपाशी. किती वाजेपर्यंत जाऊ देतात वरती कोणास ठाऊक. आज तर एकदम गर्दी असणार वरती. Uh-oh! गर्दी! म्हणजे सुमा इथे नसणार नक्की! गर्दी नकोशीच झालीय तिला आजकाल. गोंगाट, आवाज सहन होत नाहीत. गेमला जायलादेखील फारशी उत्सुक नसते. कुठे बरं गेली असेल मग?

एक्झिटपाशी रस्ता थोडा रुंद होतो तिथे बाजूला गाडी थांबवली अन् स्टिअरिंग व्हीलवर डोकं टेकून बसलो.

सुमा! सुमा गं! कुठे गेलीस अशी न सांगता सवरता? कुठे शोधू मी? एखादी तरी हिंट सोडायचीस! तुला माहीत होतं, मी आज संध्याकाळपर्यंत येणार आहे. माझी यायची ओरिजिनल वेळदेखील टळून गेली आतापर्यंत! आतातरी तू घरी यायला हवंस. सकाळी निघालीस डॉक्टरांच्या ऑफिसमधून त्यानंतर काहीच पत्ता नाही तुझा, म्हणजे माझी काय अवस्था झालीय?

सीडीवर पुढचं गाणं सुरू झालंय. मी आधीचा ट्रॅक परत लावतो. सुरुवातीचे काही सेकंद काहीही बॅकग्राऊंड म्युझिक नाहीये. लताचा आवाज अन् बासरी आलटून पालटून आहेत. 'म्हारी प्रीत निभाजो जी', 'अवगुण बिसराजो जी', ' मुखडा सबद सुणाजो जी', 'म्हारे आंगण आजो जी', 'बेडा पार लगा जो जी', किती प्रकारांनी विनवणी केलीय!

अजून कुठेतरी ऐकलंय मी हे गाणं! नक्कीच. हीच हिंट आहे तिची. सुमाने म्हटलेलं हे गाणं कुठे बरं ऐकलंय? ही सीडी सुमा अनेकदा ऐकत असते. पण तिने फक्त हेच गाणं म्हटलेलं आहे. कुठे ऐकलंय? बॉस्टनमध्ये तर नाही? नाही तिथे नक्कीच नाही. मग कुठे? कधी ऐकलंय हे गाणं मी! सुमाला असं वाटलं असेल, की मी तिची गाडी चालवेन? म्हणून तिने ही सीडी लावली असेल? फोकस! फोकस! व्हेअर डिड यू हिअर धिस?

सुमाने आतापर्यंत म्हटलेली गाणी माझ्या डोळ्यांपुढे येतात. कोणाच्या घरी पार्टीमध्ये, पिकनिकला, आमच्या घरी पार्टी असेल तेव्हा. अनेक वेळा गाणी म्हटली आहेत तिने. पण तिची फेवरिट पंधरावीस गाणी आहेत, तीच म्हणत असते नेहमी. घरी मात्र किती गाणी गुणगुणत असते त्याला लिमिट नाही. एकदा चॅलेंज म्हणून तिने लागोपाठ पंचवीस गाणी म्हटली होती. पूर्ण गाणी, अंताक्षरीतल्यासारखं नाही. बर्‍याचदा मिस्टर इंडियामधली अंताक्षरीपण पूर्ण म्हणत असे की ती. त्यातलं 'कांटे नहीं कटते ये दिन ये रात' ते पण तिचं आवडतं होतं गाणं. निळी साडी नेसून कारंज्यांच्यामधून नाचते श्रीदेवी. त्यात मध्येच गवतावरनं लोळते, जुनाट स्पायरल जिन्यावरनं चढते, तो मिस्टर इंडिया इकडे तिकडे लपतो. सगळाच वात्रटपणा. पण सुमाला ते गाणं आवडायचं फार! बागेतल्या गाण्यांवर हिंदी सिनेमावाल्यांनी कॉपीराईट घेतला पाहिजे! बागेत अशी गाणी म्हणत नाचणे हे फक्त सिनेमात होऊ शकेल!
हो? खरंच? तुला आठवत नाही बागेत सुमाने म्हटलेली गाणी? शॅ! सुमाने बागेत कधी गाणं म्हटलंय. पिकनिकला म्हटलं असेल तेवढंच. पण असं ती अन् मी असतानाच तिने कधी गाणं...
अंधारात चाचपडत, ठेचकाळत मी दिव्याच्या स्विचपाशी पोचलो होतो एकदाचा! आय नो व्हेअर शी इज!

गाडी चालूच होती इतका वेळ! मी गियर टाकला अन् एक्झिट घेऊन नीडलच्या दिशेने न जाता दुसर्‍याच रस्त्याने निघालो.

सिअ‍ॅटलला आल्यानंतर जवळ-जवळ वर्षभराने अझेलिया गार्डन पाहायला आर्बोरिटमला गेलो होतो. बर्‍याच ढगाळ, गारठलेल्या दिवसानंतर त्या दिवशी लख्ख ऊन पडलं होतं. थंडीसुद्धा नव्हती फारशी. जवळ-जवळ तीनचार तास त्या आर्बोरिटममध्ये फिरत होतो. मग निघता निघता जपानी गार्डनची पाटी दिसली होती. सुमा थकली होती खरंतर चालून चालून. मी जबरदस्तीने तिला जपानी गार्डनमध्ये नेलं होतं. आत गेल्यावर तिचे पाय दुखत होते ते विसरूनच गेली ती. तिथल्या टी हाऊसच्या समोर बराच वेळ बसलो होतो आम्ही. 'मला इथे ओढून आणलंस, हे एकदम चांगलं काम केलंस तू' म्हणाली होती. नंतर अगदी निघता निघता हे गाणं गुणगुणत होती अन् गाडीत येऊन बसल्यावर पूर्ण म्हटलं होतं हे गाणं.

आता नऊ वाजत आलेले. जपानी गार्डन बंद असणार. पण ती तिथेच असणार. मला खात्री आहे! मी तेच गाणं रिपीट मोडमध्ये टाकतो. 'म्हारी प्रीत निभाजो जी'! हायवेवर ट्रॅफिक असणार अजून. लोकल रस्त्याने जातो मी. गर्दी कमी आहे. गाणं दुसर्‍यांदा संपत आलंय. मी आर्बोरिटमच्या ड्राईव्हवर पोचलोय. या रस्त्यावर अजिबात गाड्या नाहीत. दिवे नाहीत. मी अगदी हळू, इकडे तिकडे बघत गाडी चालवतोय. जपानी गार्डनच्या दरवाजापाशी छोटा पार्किंग लॉट आहे. त्याच्या एका कोपर्‍यात बाकं आहेत बसायला. नक्की तिथे बसली असणार. एकदा पार्कमधले सगळे निघून गेले, की तिथे कोणी येणार जाणार नाही. जॉगर्स किंवा सायकल चालवणारेसुद्धा कमीच. तरी मी शोधत शोधत पार्किंग लॉटपाशी जातो. तिथे एकही गाडी नाही. गाडी चालू, गाडीच्या खिडक्या पूर्ण उघड्या, व्हॉल्यूम फुल मोठा करून मी धावतच बाकांपाशी जातो. अगदी कोपर्‍यातल्या बाकावर डोकं टेकून बसलीय सुमा. तिच्या अगदी जवळ जाऊन मी थबकतो. झोपेत आहे की काय? मी इतक्या जवळ आलो, तरी हिला चाहूल नाही का लागली?
"सुमा!" मी अगदी हळूच हाक मारतो. काहीच उत्तर नाही. तिच्या खांद्यावर हात ठेवला, तरी काही हालचाल नाही. जरासं हलवलं, तरी तिचा प्रतिसाद नाही.
मी आता बाकासमोर जमिनीवर बसून तिला हलवतोय! डोळे मिटलेले. श्वास अगदी मंद! इतकी गाढ झोप कशी लागली हिला!.

"हलो, अविनाश! अविनाश! सुमा सापडली पण, पण.."

"अरे कुठे आहे ती, कुठे सापडली? बरी आहे ना?" अविनाश अन् अंजू एकदम बोलत आहेत.

मी त्यांना काय सांगतो, कसं सांगतो, ते काही आठवत नाही. पण फोन बंद करून मी सुमाच्या बाजूला सुन्न बसून आहे.

सायरन! लाल-निळे दिवे! गाडी थांबलीये माझ्या गाडीच्या बाजूला.
खाडखाड पावलांचा आवाज! जवळ, जवळ. माझ्या अगदी जवळ.
"मे आय हेल्प यू?"

"धिस इज माय वाईफ. शी इज हॅविंग अ मिसकॅरेज आय थिंक. अँड शी वॉज मिसिंग. अँड आय स्पोक विथ रेडमंड कॉप्स धिस आफ्टरनून. अँड समथिंग इस राँग विथ हर. हाउ डिड यू गेट हिअर?"
अजून सायरन. अजून एक गाडी. गाडी नाही, ही अँब्युलन्स आहे.
मला नकोय अँब्युलन्स. "आय अ‍ॅम फाईन. माय वाईफ. माय बेबी!"

कोण तो माझा हात धरून मला अँब्युलन्समध्ये बसवतोय? माझी, माझ्या सुमाची गाडी? 'सांवरा रे' रिपीट प्लेवर आहे ना अजून? गाडी बंद नका करू प्लीज. आय नीड दॅट साँग. शी नीड्स दॅट साँग!

'म्हारी प्रीत निभाजो जी'

- shonoo

रेखाटन - Ajai