मराठी संगीत नाटक : एक आढावा

मराठी माणूस नाटकवेडा आहे हे म्हणणं म्हणजे द्विरुक्ती करण्यासारखं आहे. सुप्रसिद्ध कथालेखक व. पु. काळे यांनी म्हटल्याप्रमाणे, "दोन घंटा झालेल्या आहेत, फूटलाईटचा प्रकाश मखमली पडद्यावर झेपवलेला आहे, पात्रांच्या पायांच्या हालचाली पडदा आणि रंगमंच यांच्या फटीतून दिसताहेत, तबल्याची मनधरणी झालेली आहे, उदा-धुपाच्या सुगंधी वातावरणात नांदीचा सूर तुमचा वेध घेत येतो - अशा प्रसंगी प्रेयसीची जरी हाक आली, तरी जो जाणार नाही असा तो मराठी माणूस."

मराठी नाटकाची सुरुवात ही संगीत नाटकांपासूनच झाली. एका दृष्टीने पाहिलं, तर ही इंग्रजी राजवटीची देणगीच म्हणायला हवी. इंग्रजी राजवटीमुळे शास्त्रीय गायकांचा राजाश्रय कमी झाला. पुणे-मुंबईसारख्या ठिकाणी तमाशा मागे पडू लागला. इंग्रजी शिक्षण घेतलेल्या नव्या मध्यमवर्गीय पिढीने तमाशा आणि त्यातील विनोद या दोन्हींकडे नैतिकतेच्या विलायती, व्हिक्टोरियन कल्पनांनी बघितल्यामुळे त्यांचा लोकाश्रय कमी झाला. या सगळ्यांमुळे एक प्रकारची सांस्कृतिक पोकळी निर्माण झाल्यासारखी झाली होती. नवशिक्षित समाजाने ही पोकळी भरून काढण्याचा प्रयत्न शेक्सपिअर, मोलिए वगैरे युरोपीय नाटककारांच्या नाटकांच्या भाषांतर / रूपांतरांनी केला. पण त्या प्रकारच्या नाटकांचा भारतीय संस्कृतीशी काहीच ताळमेळ जुळत नसल्याने, सर्वसामान्य जनता मात्र त्यांपासून दूरच राहिली. त्यामुळे मराठी मातीतूनच निर्माण झालेल्या नाटककारांनी जेव्हा संस्कृत नाटकांचा आधार घेऊन नाट्यनिर्मितीचे प्रयत्न केले, तेव्हा त्यांना भरभरून प्रतिसाद मिळाला.

Vishnudas_Bhave.jpg सर्वसाधारणपणे कै. विष्णुदास भाव्यांनी मराठी संगीत नाटकाची परंपरा सुरू केली असं म्हटलं जातं, पण काही विद्वानांच्या मते मराठी नाटकाची परंपरा ज्ञानेश्वरांच्या काळापासून चालत असली पाहिजे. इतिहासाचार्य राजवाड्यांना तंजावर येथे एका रामदासी मठात इ.स. १६९० च्या सुमारास लिहिलेल्या 'श्रीलक्ष्मी-नारायण कल्याण' या नाटकाची हस्तलिखित प्रत मिळाली. परंतु याव्यतिरिक्त इतर काही नाटकाशी संबंधित लिखाण मात्र कुठे मिळाल्याचे ऐकिवात नाही. त्यामुळे इ.स. १८४३ साली सांगलीला विष्णुदास भावे यांनी केलेल्या 'सीतास्वयंवर' या प्रयोगाने मराठी संगीत नाटक रूढार्थाने प्राणप्रतिष्ठित झाले, असे म्हणायला हरकत नाही. या नाटकाचे प्रयोग मुंबई, पुणे, नगर इत्यादी ठिकाणीही झाले. साधारण १८६१ सालापर्यंत भावे स्वतः नाटकाचे प्रयोग करीत. या नाटकाची ही नांदी - भाव्यांच्या परिभाषेत नमनाचे पद्य.
गणपतीचे नमनाचे पद्य (नाटक : सीतास्वयंवर)
(राग - यमन, ताल - धुमाळी)
श्री गजवदना हे मतिहीना करावया नूतन कवना ।। ध्रु ।।
अष्टदश पुराणे सुरस ही गाऊ करु कैचे जनरंजना? ।।१
सुरस कथानके वेचक घेऊन करु इच्छित नाटके नाना ।।२
ईशचरित काय पामर वर्णिल जेथे थकली अहि रसना ।।३
नाही ज्ञान हा दास विष्णु तव लीन परी करि सज्ञाना ।।४
विष्णुदास भाव्यांनी रामायण, महाभारत, भागवत यांतील सुमारे पन्नास लोकप्रिय आख्यानांवर पदे रचली आणि त्यांना प्रासादिक आणि रसानुकूल चालीही लावल्या. त्या काळात पौराणिक नाटकांचीच चलती होती. इतर नाटककार भाव्यांचीच पदे आपल्या नाटकांत वापरत आणि पदे म्हणण्याचे काम सर्वस्वी एकट्या सूत्रधारावर अवलंबून असे. त्यानंतरच्या काळात मात्र बाबाजी दातार (इचलकरंजी नाटकमंडळी), नाना सोहनी, अनंतबुवा बुधकर (तासगावकर नाटकमंडळी), रावजी शहरकर (पुणेकर नाटकमंडळी), सखारामबुवा चांबळीकर सरनाईक (सांगलीकर नाटकमंडळी) आणि गोविंददास (कोल्हापूरकर नाटकमंडळी) या कवींनी पौराणिक आख्यानांवर आधारित, पण नाटकाला योग्य अशी पदे रचली.

Annasaheb-Kirloskar.gif मराठी जनमानसात संगीत नाटकाचे प्रेम खर्‍या अर्थाने रुजवण्याचे श्रेय मात्र बलवंत पांडुरंग अर्थात अण्णासाहेब किर्लोस्करांकडेच जाते. ३१ मार्च १८४३ रोजी - म्हणजे विष्णुदास भाव्यांनी संगीत नाटकाची मुहूर्तमेढ रोवली, त्याच वर्षी - किर्लोस्करांचा जन्म व्हावा हा नियतीचा संकेतच म्हणायला हवा. १८७३ साली अण्णासाहेबांनी 'शांकरदिग्विजय' या नावाचे एक गद्य नाटक प्रसिद्ध केले. १८८० साली पुणे मुक्कामी किर्लोस्करांनी 'इंद्रसभा' नावाचे पारसी नाटक - उर्दू भाषेतील - पाहिले आणि तशा प्रकारचे नाटक मराठी रंगभूमीवर का होऊ शकत नाही, या ईर्ष्येने एकटाकी 'संगीत शाकुंतल' या नाटकाचा पहिला अंक लिहून काढला. १३ ऑक्टोबर १८८० रोजी पुण्याच्या तंबाखू आळीत दसर्‍याच्या मुहूर्तावर 'शाकुंतला'च्या पहिल्या तीन अंकांची रंगीत तालीम झाली. आणि रविवार ३१ ऑक्टोबर १८८० रोजी बुधवार पेठेतील भांग्या मारुतीसमोरच्या तांबेकरांच्या वाड्यात असलेल्या आनंदोद्भव नाटकगृहाच्या गच्च भरलेल्या तिन्ही मजल्यांसमोर शाकुंतलाचा पहिला प्रयोग झाला. व्यावसायिक मराठी संगीत नाटकाची मुहूर्तमेढ इथे रोवली गेली.

भारतीय नाटशास्त्राचा पाया भरतमुनींनी लिहिलेल्या नाट्यशास्त्राच्या ग्रंथात सापडतो. रंगमंचावरील नेपथ्य, संगीत, नृत्य, वेषभूषा, रंगभूषा, अभिनय, दिग्दर्शन इथपासून रंगमंच जिथे असतो त्या रंगमंदिराचे बांधकाम कसे करावे, त्यासाठी भूमीची निवड, बांधकाम साहित्य, आकारमान इथपर्यंत नाटकाचे संपूर्ण नियम, पथ्ये भरताच्या नाट्यशास्त्रात सापडतात. त्यामुळेच नाट्यशास्त्राला पाचवा वेद मानलं जातं. भरताच्या नाट्यशास्त्राप्रमाणे जेव्हा इतिहासकाळात नाटके होत असत, तेव्हा वातावरणनिर्मितीसाठी सुरुवातीला धृवागीतं वाजवली जात असत - ती वाद्यांवर वाजवली जात. त्यांत दोन प्रकार होते - निःशब्द धृवागीत आणि सशब्द धृवागीत. प्रथम निःशब्द धृवागीत वाजवले जात असे, जेणेकरून लोकांना कळावे, की आज इथे काहीतरी नाटक आहे. निःशब्द धृवागीताने एकप्रकारे सुरांचे गूढ असे वातावरण निर्माण होत असे. पण नाटक म्हणजे शेवटी शब्दसृष्टी. त्यामुळे निःशब्द धृवागीतानंतर सशब्द धृवागीत होत असे. त्यालाच आपण आज नांदी म्हणून ओळखतो.

नाट्यशास्त्राप्रमाणे नांदी हा एक पडद्यामागे होणारा विधी असे. त्यानुसार 'संगीत शाकुंतल' नाटकाच्या शुभारंभाच्या प्रयोगाला स्वतः अण्णासाहेब सूत्रधार, बाळकोबा नाटेकर, मोरोबा वाघोलीकर आणि शेवडे या पारिपार्श्वकांसह पडद्यामागे नांदी म्हणण्याकरता सज्ज झाले. 'पंचतुंड नररुंडमालधर' ही नांदी म्हणण्यास सुरुवात करणार, तोवर जणू पडदा ओढणार्‍यास तेवढाही विलंब सहन न होऊन त्याने एकदम पडदा वर उचलला. आणि पडद्यामागे नांदी म्हणून नटेश्वराला फुले अर्पण करून नाट्यप्रयोगाला सुरुवात करण्याचा संकेत असा अचानकपणे बदलून गेला. ती ही 'संगीत शाकुंतला'ची नांदी.
(राग : खमाज, ताल : धुमाळी, चाल : जय श्री रमणा भयहरणा)
पंचतुंड नररुंडमालधर पार्वतीश आधी नमितो ॥
विघ्नवर्गनग भग्न कराया विघ्नेश्वर गणपति मग तो ॥ ध्रु.
कालिदास कविराज विरचित हें, गाती शाकुंतल रचितों
जाणुनिया अवसान नसोनि महकृत्यभर शिरिं घेतो
ईशवराचा लेश मिळे तरि मूढ यत्न शेवटि जातो
या न्याये बलवत्कवि निजवाक्यपुष्पिं रसिकार्चन करितो ॥
नांदीनंतर सूचकपद असे. शाकुंतलाच्या नांदीच्या सूचकपदाची झलक ही अशी.
अष्टमुर्ती परमेश सदाशिव तुम्हां शिव देवो
यदृपाविण विश्वचि हा भास हृदयी ठसवो
सूचकपदातून नाटकाचं साधारण कथानक हे नटेश्वराच्या आयुष्यावर बेतून सांगितले जायचे. जणू काही नटेश्वराच्या जीवनामध्ये या घटना घडल्या आहेत, असे समजून त्याला उद्देशून हे सूचकपद म्हणायचे कारण ती असायची त्या नाटकाच्या एकूण कथासूत्राची सुरुवात. नाटकाचा मूळ उद्देश हा मनोरंजनाचा असल्याने नाटकाचे कथानक सूचकपदातून सांगितल्याने काही रसभंग होत नसे. उलट जमलेल्या लोकांना आज आपण कुठल्या कथानकावरचे नाटक पाहण्यासाठी जमलो आहोत, हे कळल्याने नाटकाचा आणि पदांचा आनंद लुटायला मदतच होत असे. जसे एखाद्या शास्त्रीय संगीताच्या मैफिलीत गायक माहितीतलाच राग सादर करणार असेल, तरी त्या-त्या दिवशीचा रसाविष्कार वेगळा असतो, तसेच कथानक आधी माहीत असले, तरी त्या दिवशी नाटक आणि मुख्य म्हणजे पदे कशी होतील याची उत्सुकता प्रेक्षकांत असेच.

'शाकुंतला'नंतर साधारण दोन वर्षांनी, म्हणजे १८ नोव्हेंबर १८८२ रोजी 'सौभद्र' नाटकाचा प्रयोग करून अण्णासाहेबांनी 'संगीत नाटकाचे जनक' ही आपली भूमिका चिरस्थायी केली आणि त्यानंतर १८९० पर्यंतचा काळ हा किर्लोस्कर संगीत नाटकांचा काळ झाला. किर्लोस्करांच्या नाटकांत गाण्यांची रेलचेल असे; पण ही सगळी गाणी नाटकाच्या कथावस्तूचा एक अविभाज्य भाग होती. नाटकाचे कथानक पुढे सरकवण्याचे काम ही पदे करायची. एक जरी पद गाळले, तरी नाटकाची गती कुंठित झाली पाहिजे; तर ते खर्‍या अर्थी संगीत नाटक. किर्लोस्करांपासून देवलांपर्यंत तरी हे पथ्य सांभाळले गेले. रात्री सुरू झालेले नाटक सकाळी संपायचे. आठवड्यातून जेमतेम तीन प्रयोग होत असत - शनिवार, रविवार आणि बुधवार हे नाटकाचे वार. इतर वारी नटमंडळी आराम करायची, तालमी करायची, त्यामुळे प्रयोगाच्या दिवशी सर्व नट कसे ताजेतवाने असत. 'पाट्या टाकणे' हा प्रकार होत नसे. रात्रीचे नाटक, रस्त्यावर दिवे नाहीत - त्यामुळे प्रेक्षक आपल्याबरोबर कंदील घेऊन येत आणि नाटक सुरू झाले, की वात बारीक करून ठेवत. कंदिलाची वात विझेपर्यंत नाटक चालू राहत असे.

अर्थात असे असले, तरी पद किती काळ म्हणावे यालाही दंडक होता. त्याकाळी झालरीचे पडदे वापरले जात असल्यामुळे पात्रांच्या हालचाली आडव्या - म्हणजे एका विंगेतून दुसर्‍या विंगेत अशा असत. त्यामुळे पद जर एकटे पात्र रंगभूमीवर असताना असेल (थोडक्यात, मागचा पडदा आणि सीन बदलेपर्यंत) तर त्याला गाणे रंगवायची मुभा असे. इतर पात्रांच्या सहवासात गाणे असेल, तर त्याला अ‍ॅक्शन साँग - किंवा 'झगडा गीत' म्हणत. आणि अशी गाणी फार वेळ रंगवली जात नसत, कारण दुसर्‍या पात्राचा सहभाग, अभिनयातून प्रतिसाद त्यात समाविष्ट करावा लागे.

नांदी आणि नाटकातील इतरही पदे निरनिराळ्या राग-रागिण्यांवर आधारित असत. यमन, भूप, ललत, जोगिया, पिलू, आसावरी, भैरवी यांसारखे प्रचलित आणि लोकप्रिय राग तर वापरले गेलेच, पण 'अरसिक किती हा शेला', 'नच सुंदरी करू कोपा', किंवा 'पांडुनृपति जनक जया' यांसारख्या पदांच्या चाली मूळच्या कानडी आहेत. इतकेच काय, पण 'बलसागर तुम्ही वीर शिरोमणी' आणि 'वद जाऊ कुणाला शरण' यांसारख्या पदांना लावणीची चाल देऊन - तेही एका राजकन्येच्या तोंडी असलेल्या पदांना - एका प्रकारे सर्वसाधारण मराठी कुटुंबाला लावणीचे हे नवे दर्शन घडविले गेले. याशिवाय साकी, दिंडी, अंजनीगीते, हरदासी पदे अशा सर्वसामान्यांच्या परिचयाच्या चाली वापरल्या गेल्या. त्यावेळी संगीतदिग्दर्शक अशी वेगळी जबाबदारी कोणावर नसे. नाटककाराला गाण्याचे ज्ञान असे, त्यामुळे नाटकात पद लिहिताना त्याचा राग / वृत्त / छंद / चाल ही माहिती दिलेली असे आणि कलाकार उत्तम गाणारे असत. साथीला तंबोरे, वीणा, मृदंग, तबला आणि अलगूज (बासरी) आदी वाद्ये असत. विंगेत बसून ही वाद्ये वाजविली जायची. हार्मोनियमचा (संवादिनी) तोवर भारतात प्रवेशही झालेला नव्हता. ऑर्गनही प्रथम बालगंधर्वांनी वापरला.

१८८५ साली किर्लोस्करांच्या निधनानंतरच्या काळात अनेक संगीत नाटकमंडळ्या उदयाला आल्या. पण नाट्यसंगीताचे पुढचे पर्व श्रीपाद कृष्ण कोल्हटकर यांच्यापासून सुरू झाले असे मानले जाते. रसिक प्रेक्षक नव्याच्या शोधात होते. जुन्या चाली स्वरविस्ताराला अनुकूल नव्हत्या, हे लक्षात घेऊन कोल्हटकरांनी आपल्या नाटकांत वेगळ्या ढंगांची पदे रचली. त्यांच्या 'वीरतनय' या नाटकात नटी-सूत्रधाराचा पारंपरिक प्रवेश नव्हता. कोल्हटकरांनी पारसी आणि उर्दू रंगभूमीवरील चाली वापरल्या, सांघिक गीतांचा वापर केला. मात्र व्यावसायिक दृष्ट्या कोल्हटकरांचे प्रयत्न म्हणावे तितके यशस्वी झाले नाहीत.

Govind_Ballal_Deval.gif त्याच वेळी गोविंद बल्लाळ देवलांनी मात्र किर्लोस्करांच्या परंपरेत बसणारी नाटकेही प्रचंड लोकप्रिय करून दाखवली. किंबहुना देवलांची पद्यरचना किर्लोस्करांच्या तुलनेत प्रासादिकता, सुबोधता, रसाळपणा, भावना यांबाबतीत थोडी सरसच झाली. किर्लोस्करांच्या शाकुंतलातलीही शकुंतलेची पदे देवलांनी केली होती. 'मृच्छकटिक' (रजनीनाथ हा नभी उगवला, माडीवरी चल गं गडे, त्या मदनमनोरम रूपी, तेचि पुरुष दैवाचे), 'शापसंभ्रम' (नंदन वनदेवीने, बहुर परिने उपदेश तुवा केला, मधुर किती कुसुमगंध सुटला) ही रूढार्थाने संगीत नाटके तर गाजलीच पण 'संशयकल्लोळ' (हृदयि धरा हा बोध खरा, सुकांत चंद्रानना, कर हा करी धरिला, ही बहु चपल वारांगना, मानिली आपुली तुजसि मी एकदा, मृगनयना रसिक मोहिनी, मजवरी तयांचे प्रेम खरे) यासारखे विनोदी संगीत नाटकही अतिशय लोकप्रिय झाले. खरे तर मोलिएच्या 'सानारेल' या फ्रेंच नाटकाच्या आधाराने आर्थर मर्फी या इंग्रजी नाटककाराने लिहिलेले 'All in the Wrong' हे नाटक म्हणजे संशयकल्लोळाचे मूळ. पण याचे इतके बेमालूम मराठीकरण देवलांनी केले आहे, की खुद्द त्यांनीच लिहून ठेवले नसते, तर अशी शंकाही कोणाच्या मनात आली नसती. या नाटकात देवलांनी केलेली एक गंमत म्हणजे यातील सर्व पुरुषपात्रांची नावे ही मराठी महिन्यांची नावे होती, जसे फाल्गुनराव, आश्विनशेठ, भादव्या, तर सर्व स्त्रीपात्रांची नावे ही नक्षत्रांवरून ठेवली होती - कृत्तिका, रेवती, रोहिणी, स्वाती, मघा. पण या सर्व नाटकांपेक्षा देवलांची छाप संगीत नाट्यसृष्टीवर उमटली ती खास भारतीय मनाला, विशेषतः स्त्रीमनाला जवळच्या अशा नाटकाने. 'शारदा' नाटकाच्या रूपाने जरठ-बाला विवाहाच्या प्रथेवर देवलांनी सणसणीत आसूड ओढला. नाटक लोकप्रिय झाले नसते, तरच नवल! शिवाय जोडीला 'अजुनि खुळा हा नाद', 'काय पुरुष चळले बाई', 'कधी करिती लग्न माझे', 'तरूण कुलीन गोरा', 'सावळा वर बरा', 'बिंबाधरा मधुरा', 'श्रीमंत पतीची राणी', 'म्हातारा इतुका', 'मूर्तिमंत भीति उभी' अशी एकाहून एक सरस पदे असल्यामुळे 'संगीत शारदा' आणि देवल हे समीकरण १८९९ पासून आजतागायत जमलेले आहे.

Balgandharva.gif यानंतर मात्र मराठी संगीत रंगभूमीवर नाटके चालत ती नाटककारांच्याऐवजी कलाकारांच्या नावांवर. आणि याचा प्रारंभ खर्‍या अर्थाने नारायण श्रीपाद राजहंस ऊर्फ 'बालगंधर्वां'पासून झाला असे म्हणायला हरकत नाही. १९०५ साली गुरुद्वादशीच्या मुहूर्तावर बालगंधर्व 'किर्लोस्कर नाटकमंडळी'मध्ये दाखल झाले आणि तेथपासून सतत पन्नास वर्षें त्यांनी नाट्यरसिकांच्या मनांवर अधिराज्य गाजवले. गोविंदराव टेंबे बालगंधर्वांबद्दल लिहितात, "संगीताबाबत बालगंधर्वांमध्ये अनेक गुण आहेत. जवारीदार सुरेल आवाज, अत्यंत लवचिक गळा, ताल आणि लय यांचा उपजत पक्केपणा, यांशिवाय त्यांच्या गळ्यात अशी काही लडिवाळ लटक होती, जणू मुलीच्या कानांतील डूलच! निर्व्याज लीलेने ते केव्हा व कोठे हलतील आणि वेड लावतील याचा नेम नाही. एकंदरीत गाण्यातील संथपणा, संयम त्यांच्याइतका क्वचितच पाहायला मिळेल. अगदी सर्वसामान्य रागातील पदात ते एखादा विसंवादी अशास्त्रीय स्वर लावतील किंवा तो अभावितपणे लागून जाईल, पण तो इतक्या सहजपणे आणि अशा झोकाने लागेल, की त्यायोगे रागाला नाही तरी चालीला नवीनच शोभा येते. त्यामुळे गायनाच्या शास्त्रीय प्रमादाचे गालबोट एखाद्या तिटीसारखे शोभादायक ठरते. त्यांच्या गळ्याला तान म्हणजे तर तळहाताचा मळ. 'नको, नको' म्हणत असता गळ्याला लागून जायची आणि त्यात पुसटपणा नाही की तालासुराला धक्का नाही. अशा गायनाची जाणत्या आणि आबालवृद्ध प्रेक्षकांवर मोहिनी पडावी यापलीकडे परमेश्वरी प्रसाद तो काय?"

Govindrao_Tembe.gif नाट्यसंगीताच्या नदीचे पात्र वळवण्याचे श्रेय गोविंदराव टेंबे, बालगंधर्व आणि काकासाहेब खाडिलकर या त्रयीला जाते. या त्रयीचे 'मानापमान' हे नाटक ही महाराष्ट्राच्या सांस्कृतिक जीवनातील असामान्य घटना म्हणावी लागेल. धैर्यधराच्या भूमिकेतील नानासाहेब जोगळेकरांचे काम श्रेष्ठ की भामिनीच्या रूपातल्या बालगंधर्वांचे यावर रसिकांमध्ये सतत वाद चालत! एकाहून एक सरस अशी पदे (नमन नटवरा विस्मयकारा, माता दिसली, चंद्रिका ही जणू, या नव नवल नयनोत्सवा, नयने लाजवित, खरा तो प्रेमा, दे हाता या शरणागता, युवतिमना दारुण रण, मला मदन भासे हा, विनयहीन वदता नाथा, शूरा मी वंदिले, भाली चंद्र असे धरिला, प्रेमभावे जीव जगी या नटला, रवि मी हा चंद्र, धनी मी पति वरिन कशी, प्रेमसेवा शरण, सवतचि भासे मला) आणि जोडीला तितकाच सुंदर अभिनय म्हटल्यावर रसिकांची अशी पंचाईत व्हावी यात नवल ते काय?

पण त्यानंतर मानापमानालाही मागे टाकणारे 'स्वयंवर' हे नाटक खाडिलकरांनी लिहिले. या नाटकापासून रंगभूमीवर खर्‍या अर्थाने गंधर्वयुग निर्माण झाले. नाटक म्हणून तर ते मानापमानापेक्षा उजवे होतेच, पण तेव्हा बालगंधर्वांची अभिनयकला आणि गायनकला अगदी परिपक्व झाली होती. भास्करबुवा बखल्यांनी अत्यंत दुर्मिळ, पण आकर्षक बांधणीच्या आणि उठावदार चाली दिल्या आणि त्या चालींवर पदे रचली गेली. गुरू उस्ताद अल्लादियाखाँसाहेबांकडून घेतलेली विद्या भास्करबुवांनी स्वयंवर नाटकाच्या पदांच्या निमित्ताने मुक्तपणे उधळली. पण हे करीत असताना यथोचित रसाविष्कार करून भावपूर्ण रीतीने ती पदे सादर होतील, यासाठी बालगंधर्वांकडून कसून तालीमही करून घेतली. पदे बसवण्यापूर्वी मूळ चिजा सहा महिने अगोदर भास्करबुवांनी स्वतः बालगंधर्वांना शिकवल्या, त्यांच्या रागांची तालीम दिली. स्वयंवरातली बहुतेक पदे घराणेदार चिजांवर आधारलेली आहेत. ती जितकी भारदस्त आणि उठावदार (नाथ हा माझा, मम आत्मा गमला, सुजन कसा मन चोरी, रूप बली तो नरशार्दूल, कांता मजसि तूचि, स्वकुलतारक सुता, नरवर कृष्णासमान, अनृतचि गोपाला, करीन यदुमनी सदना, नृपकन्या तव जाया, मम सुखाचि ठेव) आहेत, तितकीच अवघड आणि कठीण आहेत. बालगंधर्वांची यातली सर्वच पदे अतिशय लोकप्रिय झाली.

Bhaskarbuva_Bakhale.gif भास्करबुवा बखले आणि वझेबुवांसारखे स्वररचनाकार लाभल्यामुळे एका प्रकारे नाट्यसंगीताचा दर्जा उंचावला आणि सर्वसामान्य रसिकाला उच्च शास्त्रीय संगीताची ओळख झाली. अनेक अप्रचलित आणि अनवट रागांचा प्रयोग या दोघांनी केला. पण त्याचबरोबर संगीत नाटकाला बैठकीच्या गाण्याचे स्वरूप येऊ लागले आणि नाट्य व संगीत यांच्यातला समतोल ढळला. गाण्यांद्वारे नाटकाचे कथानक पुढे सरकवण्याऐवजी आधी नाटक लिहून मग त्यात गाण्यांसाठी जागा निर्माण केल्या गेल्या.

Ram_Ganesh_Gadkari.gif याच परंपरेतील आणि प्रचंड लोकप्रिय झालेले दुसरे नाटक म्हणजे 'एकच प्याला'. नाटककार राम गणेश गडकरी स्वतः जरी सिद्धहस्त कवी असले, तरी या नाटकातील पदे (गुणगंभीरा, घास घे रे तान्ह्या बाळा, दयाछाया घे, मानस का बधिरावे, कशी या त्यजू पदाला, प्रभु अजि गमला) विठ्ठल सीताराम गुर्जर यांनी रचली आहेत. कव्वाली, गझल, दादरा या प्रकारांतील गायकीच्या अस्सल चिजांवर बाई सुंदराबाईंनी पदांना चाली लावल्या. बालगंधर्वांनी आपल्या अलौकिक अशा अभिनयाने आणि गायनाने सिंधूची भूमिका अजरामर केली - इतकी, की त्यांचा अभिनय पाहत असता प्रेक्षक सिंधूच्या बरोबरीने अश्रू ढाळीत असत! गणपतराव बोडस हे संगीतनट म्हणून गाजलेले नसले, तरी सौभद्रात 'कृष्ण' आणि 'एकच प्याल्या'मध्ये 'सुधाकरा'च्या भूमिकेत ते पदेही म्हणत. त्यानंतर नटवर्य लोंढ्यांनी सुधाकराचे काम करताना त्याच्या तोंडी असलेल्या पदांत रंग भरला. लोंढ्यांनंतर मात्र सुधाकराची भूमिका कायमचीच गद्य झाली.

सहज आठवलेली ही गंमत - 'सत्य वदे वचनाला नाथा' हे सिंधूच्या तोंडी असलेले गाणे किती सोज्ज्वळ वाटते ना? पण हे गाणे ज्या चिजेवर बसवले होते, तिचे शब्द बघा -
कत्ल मुझे कर डाला रामा
पास मुझे बुलाके नजर मिलाके
म्हणजे, केवळ अभिनय आणि गायकीच्या बळावर एका शृंगारिक चिजेचे रुपांतर कसे होते बघा!

बालगंधर्व ऐन कीर्तिशिखरावर होते, तेव्हा इतरही काही नाटकमंडळ्या रसिकांचे मनोरंजन करत होत्या. त्यांत उल्लेखनीय म्हणजे 'ललितकलादर्श' आणि 'बलवंत संगीत मंडळी'. ललितकलादर्शाच्या रंगमंचावरून केशवराव भोसले 'शारदे'च्या भूमिकेत प्रथम लोकांच्या नजरेत भरले. तेरा-चौदा वर्षांचे केशवराव शारदेच्या रूपात 'मूर्तिमंत भीति उभी' म्हणायला उभे राहिले, की भरभरून 'वन्स मोअर' यायला लागायचे. याबाबत एक प्रसंग असा सांगतात, की एकदा आठवेळा वन्स मोअर घेऊन झाले, तरी प्रेक्षकांचे काही समाधान होईना. त्यावेळची प्रथा अशी की वन्स मोअर दिला, की तो जनताजनार्दनाचा आग्रह गायक मंडळी डावलत नसत. परंतु आठ वेळा गाणे म्हटल्यावर शेवटी कंपनीचे मालक जनुभाऊ निमकर रंगमंचावर आले आणि हात जोडून प्रेक्षकांना विनंती केली, की 'पोर लहान आहे, आठ वेळा गाणे म्हणून आता थकलेले आहे, तेव्हा आता वन्स मोअर देऊ नका.'

मराठी संगीत नाटकप्रेमी मंडळींना ७ जुलै १९२१ रोजी एक अपूर्व मेजवानी मिळाली - ती म्हणजे 'संयुक्त मानापमाना'ची. या प्रयोगाच्या निमित्ताने केशवराव भोसले आणि बालगंधर्व हे दोन दिग्गज एकत्र आले. केशवराव धैर्यधराच्या भूमिकेत आणि भामिनी बालगंधर्व. टाचणी पडली, तरी आवाज येईल इतकी शांतता थिएटरात पसरली होती. केशवराव पल्लेदार, पण गायकी अंगाने गाणारे गायक, तर बालगंधर्व अत्यंत गोड, पण तरीही गायकी अंगानेच गाणारे गायक. सर्व प्रेक्षक शरीराचे कान करून प्रयोगाचा आनंद लुटत होते. संयुक्त मानापमानानंतर 'संयुक्त सौभद्रा'चाही प्रयोग झाला. दुर्दैवाने यानंतर केशवरावांचे अकाली निधन झाले आणि रंगभूमीचे कधीही भरून न येणारे नुकसान झाले.

Master-Deenanath.gif चिंतामणराव कोल्हटकर आणि मास्टर दीनानाथ यांनी किर्लोस्कर नाटक मंडळीतून बाहेर पडून बलवंत संगीत मंडळीची स्थापना केली. भावबंधन, रणदुंदुभी, उग्रमंगल अशा नाटकांतून त्यांनी खूप लोकप्रियता मिळवली. दीनानाथांनी पंजाबी ढंगाचे संगीत महाराष्ट्रात आणले. त्यांनी जुन्या पदांना नवीन चाली लावल्या. केशवराव भोसले आणि बालगंधर्वांप्रमाणे दीनानाथही गायकी अंगाचे गायक, फक्त त्यांची गायकी आक्रमक. पण दीनानाथांचेही अकाली निधन झाले आणि संगीत रंगभूमीला आणखी एक हादरा बसला.

दरम्यान केशवराव भोसल्यांच्या निधनानंतर ललितकलादर्श मंडळीची जबाबदारी बापूराव पेंढारकरांनी घेतली आणि नाट्यविषय, नाट्यतंत्र, नेपथ्य आणि नाट्यसंगीत यांबाबतीत अनेक अभिनव प्रयोग केले. मामा वरेरकरांसारखे नाटककार, वझेबुवांसारखे संगीतज्ञ आणि पु. श्री. काळे यांच्यासारखे नेपथ्यकार यांच्या मदतीने रंगभूमीवर सतत काहीतरी नवे देण्याचा प्रयत्न केला.

Master_Krishnarao.gif मास्तर कृष्णराव हे भास्करबुवा बखल्यांचे शिष्य. बालगंधर्व आणि मास्तर कृष्णराव या युतीमुळे १९३० पर्यंत 'गंधर्व नाटक मंडळी' आपली मोहिनी ठेवू शकली. 'नंदकुमार', 'मेनका', 'सावित्री', 'विधिलिखित', 'संत कान्होपात्रा', 'आशानिराशा' आणि 'अमृतसिद्धी' या नाटकांतल्या पदांना मास्तरांनी अप्रतिम चाली दिल्या.

Savarkar.gif मधल्या काळात स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकरांनी 'उःशाप', 'संन्यस्त खड्ग' आणि 'उत्तरक्रिया' या नाटकांच्या माध्यमातून लोकजागृती आणि ब्रिटिश राजवटीवर आसूड ओढण्याचे काम सुरूच ठेवले. ज्वलंत भाषा, परकीय सत्तेखाली जगण्यातील खंत आणि संताप हे त्यांच्या नाट्यगीतांतूनही तळपतात.

नंतर मात्र हळूहळू संगीत नाटकांचे दिवस संपल्यासारखे वाटू लागले. चित्रपटासारख्या स्वस्त आणि नवलाईच्या करमणुकीकडे लोक वळले. 'नाट्यमन्वंतर'सारख्या हौशी नाटक मंडळ्यांनी बदलत्या काळाबरोबर जाण्याचा प्रयत्न करत आपल्या नाटकांत परंपरागत नाट्यसंगीत न वापरता भावगीतांचा वापर केला. केशवराव आणि ज्योत्स्ना भोळे 'नाट्यमन्वंतर' चालवत होते. पण नव्या दमाचे संगीत नाटक लिहून ते यशस्वी करण्याचा विक्रम केला तो मो. ग. रांगणेकरांनी. मास्तर कृष्णरावांचे संगीत आणि ज्योत्स्ना भोळे यांचा अभिनय आणि गायन यांमुळे पुढची जवळपास दोन तपे 'कुलवधू'ने मराठी मनाला भुरळ घातली.

भालचंद्र पेंढारकरांनी बापूरावांच्या निधनानंतर अवघ्या आठ वर्षांत 'ललितकलादर्शा'चे पुनरुज्जीवन केले. १९५६ पासून आपल्या नव्या अवतारात ललितकलादर्शाने बरीच नाटके रंगभूमीवर आणली, पण संगीताच्या दृष्टीने गाजलेली नाटके म्हणजे विद्याधर गोखलेलिखित 'पंडितराज जगन्नाथ' (मदनाचि मंजिरी, नयन तुझे जादूगार, जय गंगे भागीरथी) आणि 'जयजय गौरीशंकर' (सप्तसूर झंकारित बोले, भरे मनात सुंदरा, नारायणा रमारमणा, नसे हा छंद भला प्रियकरा). या दोन्ही नाटकांना वसंत देसायांनी संगीत दिले होते.

ललितकलादर्शातून बाहेर पडूनही गोखल्यांची संगीत-नाटककार म्हणून कीर्ती वाढतीच राहिली. १९६० साली रंगभूमीवर आलेले 'सुवर्णतुला' हे अगदी किर्लोस्करी परंपरेतील नाटक. रसाळ, प्रासादिक आणि अर्थवाही रचनांमुळे गोखल्यांच्या नाटकांतील पदे खूप गाजली. संस्कृत काव्य आणि उर्दू शायरीचा त्यांचा अभ्यास त्यांच्या काव्यरचनांतही उतरलेला दिसतो. 'रंगशारदा' या स्वतःच्या संस्थेमार्फत त्यांनी कितीतरी नाटके रंगभूमीवर आणली आणि प्रचंड लोकप्रिय करून दाखवली. 'सुवर्णतुला' (अंगणी पारिजात फुलला, रागिणी मुखचंद्रमा, येतील कधी यदुवीर, रतिहुन सुंदर मदन-मंजिरी), 'मंदारमाला' (जय शंकरा गंगाधरा, जयोऽस्तुते हे उषादेवते, बसंतकी बहार आयी, कोण अससि तू नकळे मजला, तारिल हा तुज गिरिजा शंकर), 'मदनाची मंजिरी' (मानिनी सोड तुझा अभिमान, अंग अंग तव अनंग, ऋतुराज आज मनि आला), 'मेघमल्हार' (गुलजार नार ही मधुबाला, धनसंपदा नलगे मला ती, धीर धरी धीर धरी), 'स्वरसम्राज्ञी' (कशी केलीस माझी दैना, गुणसागर गंभीर दयामन, रे तुझ्यावाचून काही) यांतील गीते याची साक्ष देतात. विद्याधर गोखल्यांच्या नाटकांचे वैशिष्ट्य असे की नाटकांच्या प्रकृतीला योग्य असा संगीतकार त्यांना मिळत गेला. 'सुवर्णतुला' नाटकाला छोटागंधर्वांनी संगीत दिले, तर पं. राम मराठ्यांनी 'मंदारमाला', 'मदनाची मंजिरी', 'मेघमल्हार' या नाटकांचे संगीतदिग्दर्शन केले आणि 'स्वरसम्राज्ञी' या अगदी भिन्न प्रकृतीच्या नाटकासाठी निळकंठबुवा अभ्यंकरांसारखे संगीतकार त्यांना लाभले.

kusumagraj.gifपुरुषोत्तम दारव्हेकरांनी दोनच संगीत नाटके लिहिली - 'घनःश्याम नयनी आला' (सुखवितो मधुमास हा, ही कनकांगी कोण ललना') आणि 'कट्यार काळजात घुसली' (या नाटकातील प्रत्येक गाणे गाजले, उदाहरणार्थ तेजोनिधी लोहगोल, घेई छंद मकरंद, या भवनातिल गीत पुराणे, सुरत पिया की). दोन्ही नाटकांतील पदे अतिशय गाजलीच पण 'कट्यार..'ने आधुनिक काळातले लोकप्रियतेचे सगळे उच्चांक पार केले. इतके, की पं. वसंतराव देशपांडे हे वसंतखाँ देशपांडे म्हणून ओळखले जाऊ लागले! विष्णु वामन शिरवाडकर ऊर्फ कुसुमाग्रजांनी 'नटसम्राट'सारखी प्रचंड गाजलेली गद्य नाटके तर लिहिलीच, पण 'ययाती आणि देवयानी' (यतिमन मम मानित या, प्रेम वरदान स्मर सदा, सर्वात्मका सर्वेश्वरा, तम निशेचा सरला), 'वीज म्हणाली धरतीला'(चार होत्या पक्षिणी त्या, स्मरशील राधा), 'विदूषक' (चांद भरली रात आहे, चांदण्यांची रोषणाई) यांसारख्या नाटकांतून संगीताचाही वापर केला.
Vasant_Kanetkar.gifशिरवाडकरांसारखेच वसंत कानेटकर हे मुख्यतः गद्य नाटकांचे लेखक, पण त्यांनी लिहिलेले 'मत्स्यगंधा' (गुंतता हृदय हे, साद देती हिमशिखरे, नको विसरू संकेत मीलनाचा, अर्थशून्य भासे मज हा) हे नाटक पारंपरिक संगीत नाटकाच्या परंपरेत बसणारे होते, तर 'लेकुरे उदंड जाहली' (या गोजिरवाण्या घरात माणसांना लागलंय खूळ - यातली गोम अशी आहे की आम्हाला नाही मूल, निगाह रखो होशियार भाई निगाह रखो होशियार - दोन खुळ्यांच्या जगात आता खुळखुळा येणार) हे आधुनिक कथानक असलेले नाटक. रूढार्थाने यांतली गाणी ही परंपरागत नाट्यसंगीतासारखी अजिबातच नाहीत.

बाळ कोल्हटकरांच्या नाटकांचा स्वतःचा असा प्रेक्षकवर्ग आहे. 'दुरिताचे तिमिर जावे' (आई तुझी आठवण येते, तू जपून टाक पाऊल जरा), 'देव दीनाघरी धावला' (उठी उठी गोपाळा, ऋणानुबंधांच्या जिथून पडल्या), 'वाहतो ही दुर्वांची जुडी' (निघाले आज तिकडच्या घरी) अशी त्यांची कितीतरी नाटके लोकप्रिय झाली.

jitendra_abhisheki.gif संगीत नाटकांबद्दलचे बोलणे पं. जितेंद्र अभिषेकी यांच्या उल्लेखाशिवाय पूर्ण होणे शक्य नाही. त्यांनी संगीत नाटकाची रूढ चाकोरी सोडून काही नवीन राग-रागिण्यांचा वापर केला. 'मत्स्यगंधा', 'कट्यार काळजात घुसली', 'मेघमल्हार', 'हे बंध रेशमाचे', 'धाडिला राम तिने का वनी?' अशा अनेक नाटकांतून नाटकाच्या प्रकृतीप्रमाणे संगीताचे अभिनव प्रयोग त्यांनी केले. 'लेकुरे उदंड जाहली' या नाटकाचे संगीत विशेष उल्लेखनीय होते, कारण वर आधी म्हटल्याप्रमाणे यातली गाणी परंपरागत नाट्यगीतांसारखी नाहीत, तर ती मुक्तछंदातील, काही ठिकाणी संवादस्वरूपात होती. अशा गाण्यांना चाली देण्यासाठी त्यांच्यासारखा प्रतिभावान संगीतकारच आवश्यक होता.

या सगळ्या प्रवासात छोटागंधर्व, अनंत दामले, मास्तर भार्गवराम, सुरेशबाबू हळदणकर, राम मराठे, जयराम आणि जयमालाबाई शिलेदार, श्रीपाद नेवरेकर, मीनाक्षी, कान्होपात्रा किणीकर, डॉ. वसंतराव देशपांडे, रामदास कामत, फैयाज, रजनी जोशी, जयश्री शेजवाडकर, नीलाक्षी जोशी, सुहासिनी मुळगावकर, उदयराज गोडबोले, विश्वनाथ बागुल, प्रकाश घांग्रेकर, प्रसाद सावकार असे अनेक संगीत-नट आपापले योगदान देऊन गेले. मोठमोठ्या नाटक मंडळ्यांच्या काळात त्यांची कारकीर्द नव्हती, पण म्हणून संगीत रंगभूमीवरचे त्यांचे काम त्यामुळे कमी होत नाही.

दुर्दैवाने आजची जीवनाची अफाट गती आणि करमणुकीसाठी असणारे अनेक पर्याय यांमध्ये संगीत नाटक हरवल्यासारखे वाटते. पण शंभरांहून जास्त वर्षं झालेली पदेही जोवर आपण गुणगुणतो, नाट्यसंगीताचे कार्यक्रम करतो, जुन्या नाटकांच्या ध्वनिचित्रफिती का उपलब्ध नाहीत म्हणून हळहळतो, तोवर संगीत नाटक जरी रंगमंचावर पूर्वीइतक्या प्रमाणात होत नसले, तरी आपल्यासारख्या रसिकांच्या आठवणींत आणि मनांत त्याचे प्रयोग सुरूच असतात, नाही का?

***************** संदर्भ :
१. अकोल्यात भरलेल्या ६२ व्या मराठी नाट्यसंमेलनात १३ फेब्रुवारी १९८२ रोजी सुप्रसिद्ध कथालेखक व. पु. काळे यांनी संमेलनाध्यक्ष पं. वसंतराव देशपांडे यांची घेतलेली मुलाखत
२. मराठी नाट्यसंगीत - लेखक : बाळ सामंत
३. असंख्य संगीत नाटकांच्या संहिता
४. Indianetzone

- priya