संवाद - विद्याताई बाळ

मुलाखतकार : चित्रा गोडबोले

"उक्ती-कृतीचा मेळ, जुळवी जगण्याचा ताळमेळ!"

अलिकडेच एक गृहस्थ माझ्याशी तावातावाने वाद घालताना म्हणाले, "ह्या स्त्री-मुक्तीवाल्या, घरफोडी करणार्‍या बायकांचा मला फार राग येतो. स्वत:चा संसार ज्यांना धडपणे सांभाळता येत नाही त्या इतरांना काय शहाणपणा शिकवणार?"
त्यावर मी त्यांना म्हटलं, "घर-संसार सोडून एकटीने घराबाहेर पडणं स्त्रीला इतकं सोप्पं असतं का हो? ज्या बायकांवर अशी वेळ येते, त्यांना घरात किती त्रास सहन करावा लागत असेल? स्त्रीचा एक माणूस, एक व्यक्ती, ह्या मनोभूमिकेतून कधी विचार केला आहात का?"
भारताच्या स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने विद्याताईंनी लिहिलेला लेख मी नुकताच वाचला होता. त्याचा शेवट करताना विद्याताईंनी लिहिलंय, "स्त्रीस्वातंत्र्य म्हणजे माणसाच्या विकासासाठीच्या सर्व संधी स्त्रीला मिळाल्या पाहिजेत. त्यांचं सोनं करीत तिनं आपलं आयुष्य समृध्द केलं तर तिच्यापुरती ती स्वतंत्र झाली असं म्हणता येईल का? याला माझं उत्तर ’नाही’ असं आहे. कारण स्वातंत्र्य ही एकट्यासाठीची संकल्पना नाहीच. स्वातंत्र्य म्हणजे जबाबदारी! स्वत:ची, इतरांबरोबरची, इतरांसाठीची जबाबदारी! म्हणून व्यक्तिगत जीवनाची समॄध्दी अर्थपूर्ण करण्यासाठी भोवतीच्यांकडे जाणिवेनं बघायलाच हवं. हे बघण्यासाठी आपल्या स्वातंत्र्याचा आणि समॄध्दीचा विनियोग, शक्य होईल तेवढा इतरांसाठी करण्याचं भान ठेवणं आवश्यक आहे."
मी शांतपणे त्या गृहस्थांना विद्याताईंचा तो लेख संपूर्ण वाचण्याची नम्र विनंती केली. त्यानंतर इतर कामानिमित्ताने अनेकदा फोनवर भेट होऊनही पुन्हा कधीही त्या गृहस्थाने हा विषय माझ्यापाशी काढला नाही. पण ’मिळून सार्‍याजणी’ची एक वर्षाची वर्गणी भरली. हे श्रेय कुणाचं? अर्थातच विद्याताईंचं आणि त्यांच्या विचारांचं!
मला नकळत समर्थ रामदासस्वामींचे बोल आठवले, ’बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले!’ गेली वीस वर्षं ’मिळून सार्‍याजणी’च्या माध्यमातून, आपले विचार प्रामाणिकपणे इतरांसमोर मांडत, ’उक्ती आणि कॄती’ ह्यांचा मेळ घालत केलेल्या वाटचालीतून, दुसर्‍यांच्या मनात माणुसकीची आच निर्माण करण्याचं विधायक कार्य घडू शकतं ह्याचा आदर्श विद्याताईंनी आपल्यापुढे ठेवला आहे.
स्त्रियांना आत्मभान येण्यासाठी उद्युक्त करणं, त्यांच्यातील सजगता जागवणं आणि आपल्या कृतींतून ते इतरांपर्यंत न थकता, न कंटाळता पोचवणं हे विद्याताईंचं वैशिष्ठ्य आहे. त्यांच्या लिखाणाचे संकलन केलेली ’संवाद’, ’शोध स्वत:चा’, ’साकव’, ’तुमच्या-माझ्यासाठी’ ही पुस्तके वाचनीय-मननीय-चिंतनीय आहेत.

VB2.jpg
’घराबाहेर पडून स्त्री-मुक्ती चळवळीला संपूर्णपणे वाहून घेतलेली माझ्या आईच्या पिढीतील एक स्त्री.’ फक्त एवढीच त्रोटक माहिती मला त्यांच्याबद्द्ल होती. ह्या प्रसंगाच्या निमित्ताने विद्याताईंविषयी मला वाटणारं कुतूहल जागं झालं. म्हणून त्यांना हा प्रसंग सांगितला.
हे ऐकून मोकळेपणाने हसत त्या म्हणाल्या, "स्त्री-मुक्ती चळवळीत काम करणा‍र्‍या बायकांना ’तुम्ही घरफोड्या’ हे नेहमीच ऎकावं लागतं. मला असं वाटतं, मी माणसाच्या जन्माला आले म्हणजे माझी जशी कौटुंबिक जबाबदारी आहे तशीच ती माझ्या स्वत:प्रतीसुध्दा आहे. माणसाच्या जगण्याशी आपलं काही उत्तरदायित्त्व आहे की नाही? मी चांगलंच जगलं पाहिजे. त्यासाठी मला बदललं पाहिजे. असा विचार प्रत्येकीने करावा असं मला वाटतं. समजा, मी विचारांनी थोडी थोडी शहाणी होत चालले आहे, बदलत चालले आहे, माझ्यातील बदल मला शहाणपणाकडे नेणारा आहे. तर मी माझ्या कुटुंबियांपर्यंत माझ्यातील हा बदल पोचवण्याचा सतत प्रयत्न करीन. त्यांच्यापर्यंत ते पोहोचलं, त्यांना ते कळलं, त्याचं महत्त्व त्यांच्या लक्षात आलं तर ते मला सहकार्य देतील. आणि समजा जर का त्यांच्यापर्यंत ते पोचत नसेल तर मग माझं घर मी माणूस म्हणून जगण्यासाठी, वाढण्यासाठी कसं आहे ह्याचा, माझ्या कौटुंबिक जगण्याचा पुनर्विचार करेन. माझ्या जगण्याचा जमाखर्च मांडेन. कुटुंबातील सर्वांच्या सुखासाठी जगताना माझ्या पदरी काही जमा होत आहे का? ह्या जगण्याची मी काय किंमत मोजते आहे? मी स्वत:ला कुठवर मुरड घालायची?"

तुमच्या बाबतीत हा बदल कसा झाला ते सांगाल का?

विद्याताई : घर एके घर करणारी मी, माझ्या एका तर्कशुध्द विचार करणार्‍या मैत्रिणीच्या सहवासामुळे घरच्यांखेरीज एकटी तिच्याबरोबर वाढू लागले. गुणवत्तापूर्ण जीवन जगण्याच्या दिशेने विचार आणि वागणं सुरू झाल्यावर आजवरचं केवळ कौटुंबिक जगणं मला नीरस वाटू लागलं. माझ्यात घडणारं परिवर्तन कुणाला समजत नव्हतं. मला मिळणारा आनंद आणि जगण्यातील अर्थपूर्णता मी घरच्यांना पोचवण्याचा प्रयत्न करीत राहिले. पण मी हा संवाद साधायला किंवा त्याचबरोबर या सार्‍याचा स्वीकार करायलाही बरीच अपुरी पडले. त्यामुळे मी आणि माझं घर यांच्यात एक अंतर निर्माण झालं.

ही मैत्रीण तुम्हांला कधी भेटली? तिने तुम्हांला नेमकं काय दिलं?

विद्याताई : मैत्रिणीविषयी सांगण्यापूर्वी मला थोडं मागे गेलं पाहिजे. कुठलीही राजकीय विचारसरणी, कुठलाही इझम यांच्या वाचनातून, अभ्यासातून मी इथवर आले नाही. स्वत:च्या अनुभवांतून निर्माण होणार्‍या प्रश्नांची उत्तरे मी शोधत राहिले. माझ्यातील भावनाप्रधानतेला विचारांची जोड दिली. माझ्या मर्यादांना समजून घेत, आत्मप्रेरणांना प्रमाण मानून पुढे गेले.
सुखवस्तू मध्यमवर्गीय कुटुंबात तीन भावांच्या पाठीवर झालेली मी एकटी, शेंडेफळ बहीण. शाळेत सतत पहिला नंबर. वक्तॄत्व, अभिनय, खेळ, नेतॄत्व, लेखन या सगळ्यांत चमक दाखवणारी अष्टपैलू आदर्श विद्यार्थिनी. जाऊ तिथे यशस्वी होण्याची चटक लागली. सर्वगुणसंपन्नत्वाच्या शिक्क्यानं मी सुखावले. नाव आणि बक्षिसं याच्या खाली आणि खोल काही असू शकतं ही जाणीवच या चकचकीत काळात बोथटून गेली.
माझा स्वभाव मुळात प्रेमळ. सर्वांशी जमवून घेणारा. ध्येयवादानं, आदर्शवादानं विरघळणारा, संवेदनशील, भावूक. मनासारखं लग्न झालं. अतिशय मनापासून मुलांचं संगोपन, कौटुंबिक जबाबदार्‍या यात रमले. एकीकडे आकाशवाणीत ’गृहिणी’ ह्या कार्यक्रमाची कॉम्पिअर म्हणून सोळा महिने काम केलं. त्यानंतर ’स्त्री’ मासिकात अर्धवेळ कामाला सुरुवात केली. हळूहळू संपादनात हातभार लावत जबादारी स्वीकारत गेल्यावर तिथल्या कामात आत्मविश्वास आला. ’स्त्री’ मासिकाचं संपादन करत असताना, ’आत्मशोधासाठी एक निमित्त’ आणि ’माणसं’ ह्या स्तंभांसाठी लेखन करत असताना एका अबोध पातळीवर माझ्यातील बदलांना सुरूवात झाली. स्त्री मासिकाच्या कामातून मला नाव, लौकिक, समाधान मिळत असूनही एक अस्वस्थता यायला लागली. स्वत:तील हेच असमाधान माझ्यातील बदलांना कारण ठरलं.
ह्याच सुमारास अपयशातून शहाणपण शिकवणार्‍या दोन घटना घडल्या. आकाशवाणीवर निर्माता ह्या पदावर माझी नियुक्ती न होणे आणि जनसंघाच्या तिकिटावर मी लढवलेली महानगरपालिकेची निवडणूक हरणे. माझ्या अतिभावनाप्रधान मनाला ह्या दोन्ही अनुभवांनी खूपखूप शिकवलं. ह्यानंतरही आयुष्यात नकारात्मक अनुभव आले. काही नकार जसे मला मिळाले, तसेच मीही काही नकार दिले. आता असं जाणवतं की हे दिले-घेतलेले सर्व ’नकार’ माझ्यासाठी वरदानच ठरले.
आपल्या अनुभवांचा अर्थ लावण्यासाठी ’का?’ हा प्रश्न विचारावासा वाटणं हीच एक महत्त्वाची सुरूवात आहे. जिनं माझ्या मनातला ’का’ जागा केला त्या मैत्रिणीची आठवणच तेवढी माझ्याजवळ आहे; अंधार उजळत जाणार्‍या विजेरीसारखी. त्या मैत्रिणीच्या धारदार चिकित्सेला, बुध्दिमत्तेला, संवेदनशीलतेला प्रतिसाद देणे आणि माझ्या समजदारीला, माणुसकीच्या जाणिवेला बौद्धिक परिमाण मिळणे ह्यामुळे एकमेकींचा आधार घेत आम्ही दोघीही खूप वाढलो. ’तुझ्याजवळ खूप सामर्थ्य आहे. तू विचार करून ते वापरायला लाग. केवळ ’एन्टरटेनरचा रोल’ घेऊन कशी जगतेस?’ मैत्रिणीच्या ह्या अशा प्रकारच्या प्रश्नांनी मला त्रास होऊ लागला. लग्नानंतर लगेचच, सतराव्या वर्षी आलेल्या ’बाई’पणामुळे सुखावणारा माझा अंतरात्मा स्वत:लाच प्रश्न विचारू लागला. जे केवळ आतून वाटलं म्हणून मी करत होते ते विचारांना ’पटलं’ म्हणून निष्ठापूर्वक कृतीत उतरवता येऊ लागलं.
व्यक्तिगत मैत्री जेव्हा तुम्हाला खरंच काही ’देते’ तेव्हा तुम्हीही लोकांना द्यायला अधिक सक्षम होता. कालांतराने, डॉ. अरूण लिमये, नीलम गो‌र्‍हे अशा मित्र-मैत्रिणींचा सहवास मला मिळाला. त्यांच्यामुळे माझ्यातला टेबलावरचा संपादक टेबलावरून उठून चळवळ्या माणसांपर्यंत पोचण्यासाठी धडपडू लागला. १९८१ साली नारी समता मंचची स्थापना, ग्रामीण स्त्रियांबरोबर 'ग्रोईंग टुगेदर' प्रकल्पाच्या प्रमुख, निर्मळ वसा ह्या आरोग्य-प्रकल्पात सक्रिय सहभाग असा माझ्या कामाचा परीघ वाढला. शहरी स्त्रियांप्रमाणे ग्रामीण भागातील स्त्री-जीवनाशी जवळून परिचय होत राहिला.

ह्या सगळ्याचा तुमच्यावर नेमका काय परिणाम झाला? आणि ते अनुभव लिखाणातून व्यक्त करावेत असं तुम्हांला कधी आणि का वाटू लागलं?

विद्याताई : घरात असताना, काम करताना, प्रवासात, हिंडताना आपल्यासामोर काय काय घडत असतं. घटना, प्रसंग, अनुभव यांच्या माध्यमातून हे सारं निर्माण होतं. ते बघितल्यामुळे मनात विचार येतात. भावनांचा आवेगही एकेकदा निर्माण होतो. आपल्याला येणारे अनुभव, पडणारे प्रश्न, भोवतालची परिस्थिती आणि या सगळ्याचा आपण लावलेला अर्थ हा ज्याचा त्याला तर उपयोगी पडतोच पण त्याची देवघेव झाली तर त्यातून मानवी जीवनाचं एक नवंच परिमाण दिसायला लागतं. इतरांच्यापुढे मांडता मांडता थोडं अधिक उलगडायला मदत होते. शिवाय त्यावर चर्चा, प्रतिसाद, प्रतिक्रिया यांमधून एकीकडे मला स्वत:ला तपासून घेता येतं. तसंच त्यामुळे वाचणार्‍याच्या मनातही कधीकधी विचाराची प्रक्रिया सुरू होते. ही अशी बोलण्याची, विचारांच्या देवघेवीची साखळी हे माणसाच्या वाढीच्या प्रक्रियेतलं एक महत्त्वाचं साधन आहे.

म्हणूनच तुम्ही ’मिळून सार्‍याजणी’ हे मासिक सुरू केलंत का? हे मासिक साहित्यिक आहे की सामाजिक आहे?

विद्याताई : जे स्वत:ला पटलं ते इतरांना पटवत पटवत पुढे जावं, पटत नाहीसा टप्पा आला की गप्प बसावं, आणि ’करीत रहावं’ अशा तळमळीतून, पत्रकारिता करत असताना आलेल्या आणि स्त्री मासिकाच्या कामातून गाठीशी जमलेल्या अनुभवांतून १९८९ साली ’मिळून सार्‍याजणी’ मासिकाला सुरूवात झाली. या मासिकाच्या वाचनानंतर बोलणं आणि करणं या दिशेला बदल घडावा असं मला वाटतं.

पण मग ह्या नावात ’सार्‍याजणी’ असं का आहे? ’सारेजण’ का नाही?

विद्याताई : ह्या नावातील ’सार्‍याजणी’ ह्या शब्दामुळे ते फक्त स्त्रियांसाठी आहे का? ह्या प्रश्नाचं उत्तर अर्थातच ’नाही’ हेच आहे. कोणत्याही संस्कृतीचे प्रतिबिंब त्याच्या भाषेत दिसते. ’सारेजण’ हा शब्द वापरताना त्यात ’सार्‍याजणी’ हे गृहित धरलेलं असतं. त्यालाच अनुसरून ’सार्‍याजणी’ मध्ये ’सारेजण’सुध्दा गृहित आहेत. ’मिळून सार्‍याजणी’ ह्या नावातच एक सर्वसमावेशक भाव आहे. स्त्री-पुरूष समता आणि दोघांसाठी अत्यावश्यक माणूसपण ही मूल्यं चळवळीबाहेरच्या बहुसंख्यांपर्यंत पोचवण्याचं एक साधन आणि माध्यम आहे. सुरूवातीच्या काळात स्त्री-हक्क किंवा स्त्री-मुक्ती बाबतची काहीशी हट्टी, आग्रही गरज होती ती आता साहजिकच तितक्या गरजेची राहिलेली नाही. सूक्ष्म स्तरावर का होईना पण समाजात स्त्री-पुरूष भूमिकांच्या परस्परांना समजून घेण्याच्या पातळीत नक्कीच परिपक्वता येऊ लागलेली आहे.

दर महिन्याला तुम्ही जो ’संवाद’ लिहिता त्यातील विषयांमध्येही खूप विविधता असते. तुमचा विचारविमर्श वाचकांनाही विचार करायला उद्युक्त करतो कारण तो आपल्यातील माणूसपणाच्या जाणीवांना स्पर्श करणारा असतो. माणसाने समाजाभिमुख असणं म्हणजे काय हे तुम्ही आजवर लिहिलेल्या लेखांतील विविधता बघितली की जाणवतं. आई रिटायर होते, घरकामाचं मोल, लग्नसमारंभ की प्रदर्शन?, मातॄत्व : स्वत:साठी? की प्रतिष्ठेसाठी?, समॄध्द जीवनासाठी साथ-साथ, हैदराबादचं अन्वेषी केंद्र, नर्मदा घरापासून दूर नाही, कारगिल युध्द आणि ओरिसाचं चक्रीवादळ, पुतळ्यांविषयीचा आदर / अनादर, भारत - पाक नागरिकांमधला सुख-संवाद, गर्भनिरोधक लसीचं आक्रमण, मिळवतीची पोतडी इ. शिवाय स्त्री-विषयक परिषदांच्या निमित्ताने इंग्लंड, श्रीलंका, अमेरिका, अफ्रिका अशा वेगवेगळ्या देशांना भेटी देऊन तिथल्या स्त्रियांची, त्यांच्या तिथल्या कामांची करून घेतलेली माहिती तुम्ही त्या-त्या वेळी ’संवाद’ मधून दिली आहेत. विषयांतील ही विविधता जपणं तुम्हाला कसं काय साध्य झालं?

vidyab1.JPG
विद्याताई :
मी मघाशी म्हटल्याप्रमाणे बोलण्याची, विचारांच्या देवघेवीची साखळी हे माणसाच्या वाढीच्या प्रक्रियेतलं एक महत्त्वाचं साधन आहे. मी स्वत: अशाच देवघेवीतून वाढत गेले, बदलत गेले. स्वत:च्या आणि इतर कुटुंबातल्या मानवी नात्यांकडे, व्यवहारांकडे बघत बघतच, माझ्या मनाला स्त्रीप्रश्नाचं भान आलं, जाणीव निर्माण झाली. त्यामुळे हळूहळू माझ्या दृष्टीचं क्षितिज रुंदावत गेलं. सगळ्या प्रश्नांच्या मुळाशी असलेली ’मानव-बचाव’ ही साद माझ्या मनात सतत गाजत राहिली. झापडबंद आयुष्याच्या पलीकडच्या प्रश्नांच्या गुंतागुंतीची मला जाणीव झाली. यातून मला माझी अधिक ओळख व्हायला लागली. माझ्या स्वभावानुसार निदान मला जे काही समजल्यासारखं वाटतं आहे, माणूस होण्यासाठीची जी वाट मला सापडल्यासारखी वाटते आहे, त्याबाबत अवतीभवतीच्यांशी मला बोलावंसं वाटू लागलं आणि म्हणूनच मी लिहिते आहे.

माणूसपणाच्या जाणीवेतून स्वत:ला आणि इतरांना वाचतं-बोलतं-लिहितं करणारं ’मिळून सार्‍याजणी’ मासिकाची गेल्या वीस वर्षांची वाटचाल ’स्वत:शी सतत नव्यानं संवाद साधायला लावणारं मासिक' अशी सुरू होऊन ’स्त्रियांनी आणि पुरुषांनी स्वत:शी आणि परस्परांशी साधावा यासाठी!’ ह्या वळणावरून एकविसाव्या वर्षांत पुढे सरकली आहे. ’ह्यापुढे ’मिळून सार्‍याजणी’तील विद्याताईंचा सहभाग ह्याहीपेक्षा व्यापक होणार आहे. ’भ्रमंती, जनसंपर्क आणि त्यातून मिळणारं माणसांचं, कल्पनांचं, विचारांचं दाणापाणी गोळा करण्यासाठी’ विद्याताईंनी संपादकपदाला स्वखुशीने निरोप दिला आहे.

दोन-अडीच वर्षांपूर्वी एका वृत्तपत्रात तुम्ही ’गोष्ट आसवांची’ ह्या शीर्षकाखाली लिहिलेल्या लेखात लिहिलं होतं, 'सुंदर जगण्याइतकं मरणही सुंदर करता यायला हवं.' म्हणजे तुम्हाला नक्की काय अभिप्रेत आहे?

विद्याताई : जगण्यातील सुंदरतेप्रमाणेच आपलं मरणही सुंदर व्हावं असं ज्यांना मनापासून वाटतं, त्यांनी इच्छामरणाचा पर्याय विचारपूर्वक स्वीकारायला काहीच हरकत नाही. निराशेतून न आलेलं, तृप्ततेने जगून झाल्यानंतर यावं असं वाटायला लावणार्‍या स्वेच्छामरणाचा हा विचार आहे. आयुष्यातून किमान मिळवणं-गमावणं, त्यासाठी लढणं-झगडणं ह्यातून गेल्यानंतर आपल्याला मरणाचाही नैतिक अधिकार आहे, कारण त्यामुळे तुम्ही पळपुटे ठरू शकत नाही. त्याहीपलिकडे, जोपर्यंत आपलं शरीर व मन चांगल्या अवस्थेत आहे, तोपर्यंत काम करत आपण जगू शकतोय. पण एका टप्प्यावर शरीर साथ देईनासं होतं. आजवर ज्या गुणवत्तेनं आयुष्य जगलो ते आता ह्यानंतर शक्य नाही हे जाणवतं. त्यावेळी आयुष्याच्या ताटावरून भरल्यापोटी समाधानाने उठण्याची भावना ह्या स्वेच्छामरणात असावी."

वयाच्या पंचाहत्तरीकडे वाटचाल सुरू असताना आताच्या पिढीला जवळच्या वाटणार्‍या लिव्ह-इन रिलेशनशिप सारख्या नवीन जीवन-पध्दत्तीचा विचारही तुम्ही मुळापासून आणि मनापासून करता आहात. तो करण्यामागे तुमची काय भूमिका आहे?

विद्याताई : माणसाची प्रगती आणि त्याचे माणूसपण त्याच्या प्रयोगशीलतेत आहे. प्रत्येक प्रयोगतील बरे-वाईट पारखून घेऊन तो पुढे जात राहिला आहे. लग्न-संबंधांना पर्याय म्हणून लिव्ह-इन रिलेशनशिप सारखा नवीन प्रयोग करून बघण्यात काही वावगं नाही. विवाह-संस्थेच्या मर्यादा आता हळूहळू दिसू लागल्या आहेत. कुटुंब-संस्थेची पुनर्रचना करण्यासाठी विवाह-संस्थेला असणारा एक पर्याय म्हणून, कुटुंबातल्या सर्व मर्यादा ऒलांडून जगण्याची शक्यता दाखवणार्‍या लिव्ह-इन रिलेशनशिपचा विचार केला तर त्यात काही गैर आहे असं मला वाटत नाही. मी ह्या जीवन-पध्दतीचा घाईघाईने पुरस्कार करत नाही. पण तरीही त्या वाटेला कुणी जाऊ नये असंही मी म्हणणार नाही. कारण भावनिक आवेगात करण्याची ही गोष्ट नाही. डेमॉक्रसीची मूल्यं सांभाळत नातं जपण्याचा हा पर्याय आहे. दोन माणसांचा एकमेकांवर असणारा विश्वास ही त्या नात्यातील सर्वांत महत्त्वाची गोष्ट आहे.

आजच्या स्व-तंत्र वृत्तीने जगणार्‍या तरूणाईला तुम्ही काय सांगाल?

विद्याताई : दोन गोष्टी आवर्जून सांगाव्याशा वाटतात. सर्वांत पहिलं, माणसासारखं विचारपूर्वक आणि आपले विचार तपासत जगा. जी मूल्यं निवडली आहेत त्यांचा स्वीकार करत, ती मूल्यं सांभाळत, त्या मूल्यांना तडे जाऊ न देता आपण जगू शकतोय का? आपला आनंद हा आपल्या मनाप्रमाणे जगण्यात असतो. सदासर्वकाळ तस्संच सर्वकाही होईल असं नाही. त्यातून एकटेपणा येण्याचीही शक्यता असते. पण म्हणून मनाविरूध्द आणि मूल्यांविरूध्द जगण्याचा जाचही किती काळ सहन करायचा? दुसरी महत्त्वाची गोष्ट ही आहे, की आज जे बरोबर किंवा चूक वाटतंय त्यात कालांतराने बदल होण्याचीही शक्यता असते. ती लक्षात घेऊन ह्या सार्‍याचा वेळोवेळी आढावा घेणं गरजेचं आहे. इतरांशी आणि स्वत:शी मोकळं व प्रामाणिक राहून जगा. त्या विचारांतून स्वत:शी आणि इतरांशी संवाद साधा. संवादावर प्रेम करा.

लोकशाही, वैज्ञानिक दृष्टीकोन, सहिष्णुता, उदारमतवाद, व्यक्तिस्वातंत्र्य, विचारस्वातंत्र्य, मानवता, समानता, मानवी हक्क ह्या सार्‍यांचा वेध घेणार्‍या विद्याताई खर्‍या अर्थाने आधुनिक आहेत. त्यांना ह्या वयात उत्साहाने काम करताना बघून एका वाक्याची प्रचीती येते.
"A good example has twice the value than that of good advice. So always try to set an example rather than giving advice."
विद्याताईंनी आपल्या उक्ती-कृतींतून ते आपल्यापुढे नक्कीच उभं केलं आहे.

('मिळून सार्‍याजणी'विषयी अधिक माहिती इथे मिळू शकेल.)