कॅनव्हासवर सोडलेले जलरंग म्हणजे अवखळ मूलच. कॅनव्हासवर वाहणार्या अथवा सोडलेल्या जलरंगाला तुम्ही त्या-च्या-त्या वेळी नाही घडवले आणि एकदा का तो रंग कागदाने टिपला, पक्का झाला की मग पुनर्रचनेला वाव नाही. खूप खूप वेग आहे या माध्यमाला आणि म्हणूनच मिलिंद सरांच्या विचारवेगाला साजेसे असणारे हे माध्यम त्यांचे आवडते आहे.
स्व
तःमधील आवड/कला यांची योग्य वेळी जाणीव होऊन त्या आवडीलाच आपले कार्यक्षेत्र बनवण्याचा धाडसी निर्णय फार थोड्या लोकांना घेता येतो. प्रवाहपतित न होता असा धाडसी निर्णय घेणे आणि त्या कलेला जागतिक पातळीवर मान्यता प्राप्त करून देणे ही गोष्ट ज्या मोजक्या व्यक्तींना जमली, त्यांत अग्रक्रमाने घेता येईल असे एक नाव म्हणजे मिलिंद मुळीक!
रंगांची अमर्याद उधळण आपल्या कुंचल्याच्या साहाय्याने कॅनव्हासवर समर्थपणे पेलणारा मनस्वी कलाकार.. आंतरराष्ट्रीय ख्यातीचे जलरंग चित्रकार... मिलिंद मुळीक!
लँडस्केप पेंटिंग, सिटीस्केप पेंटिंग, स्टिल लाईफ आणि स्केचेस ही त्यांची खासियत. आपल्या आजूबाजूला दिसणार्या गोष्टी चित्रांच्या माध्यमातून अगदी सहजपणे उलगडून दाखवणारा विलक्षण किमयागार... मिलिंद मुळीक!
रोज घडणार्याच घटना, पण त्यातही चित्र दिसते मिलिंदसरांना. पुढच्या गोष्टी काही अंशी तांत्रिक असतात. मुळात साध्यासाध्या गोष्टींतले कलात्मक, रचनात्मक मूल्य जाणवणे महत्त्वाचे. सामान्यांच्या आणि अभिजात कलाकाराच्या दृष्टीतला हाच तो फरक. त्यांना विचारले, "तुम्ही पेंट का करता?" तर त्यावर ते म्हणतात, "कारण मी पेंट करू शकतो, पेंटिंग माझा श्वास आहे".
मिलिंद मुळीकांचा जन्म कलेची जोपासना करणार्या कुटुंबात झाला. त्यांचे वडील श्री. प्रतापराव मुळीक हे प्रख्यात बोधचित्रकार आणि पेंटर होते. मिलिंदसरांनी वयाच्या पाचव्या वर्षापासून चित्रकलेला सुरुवात केली व आपले पहिले जलरंग चित्र त्यांनी वयाच्या तेराव्या वर्षी काढले. कलाक्षेत्रातील अभ्यासक्रमासाठी त्यांना शासनाची राष्ट्रीय प्रज्ञा शिष्यवृत्तीही मिळाली. पण, बारावीनंतर त्यांनी कला महाविद्यालात न जाता अभियांत्रिकी शाखेत प्रवेश घेतला. अभियांत्रिकी शिक्षण पूर्ण झाल्यावर मात्र त्यांच्यातील चित्रकार त्यांना स्वस्थ बसू देईना. कुठेतरी अस्वस्थता होती. चित्रकार खुणावत होता. त्यामुळेच सगळ्यांत महत्त्वाचे, त्यांचे आवडते लँडस्केप पेंटिंग त्यांनी मधल्या अन्य काही व्यवधानांनंतर पूर्णवेळ परत सुरु केले.
महाराष्ट्रातल्या सरकारी कला महाविद्यालयांमध्ये ते जलरंगाची प्रात्यक्षिके देतात आणि टिळक रोड, पुणे येथील Art2day गॅलरीत ते आपल्या मोजक्या विद्यार्थ्यांना जलरंग चित्रकलेचे धडे देतात. तसेच पुण्याच्या मध्यवर्ती भागात त्यांचा आर्ट स्टुडिओ आहे. भारतभर चित्रकलेच्या अनेक सामुहिक प्रदर्शनांमध्ये त्यांचा सहभाग असतो आणि मुंबई-पुण्यात फक्त त्यांची स्वतंत्र अशी जवळपास २० चित्रप्रदर्शने झाली आहेत. १९८७ सालापासून त्यांची वैयक्तिक चित्रप्रदर्शने बालगंधर्व कलादालन (पुणे), Art2day गॅलरी (पुणे), जहांगीर कलादालन (मुंबई), सेन्टॉर हॉटेल (मुंबई), नेहरू कलाकेंद्र (मुंबई), ताज कलादालन (मुंबई), अशा अनेक नामांकित ठिकाणी झाली आहेत. परदेशात अॅक्वारेल सेंटर, स्वीडन, तसेच फ्रान्समध्ये सामूहिक चित्रप्रदर्शनांमध्येही त्यांचा सहभाग असतो. विशेष गौरवास्पद बाब म्हणजे अमेरिकन वॉटरकलर सोसायटीमध्ये सलग तीन वर्ष त्यांच्या चित्रांचा अंतर्भाव केला गेला आहे. त्यांना राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर अनेक पुरस्कार मिळाले आहेत. त्यांच्या पेंटिंग्जना कॉर्पोरेट ऑफिसेस, तसेच अमेरिका, युरोप, जपान, सिंगापूर इथून वैयक्तिक पातळीवरही खूप मागणी आहे.
चित्रकलेबद्दलच्या आंतरिक ओढीनेच त्यांना प्राचीन कलेच्या इतिहासाकडे वळवले आणि त्यांनी कलेचा सखोल अभ्यास केला. त्यासाठी त्यांनी युरोपभर प्रवासही केला.
पण त्यांना विशेष रस आहे तो पुण्यात. पुण्याबद्दल, पुण्याच्या सांस्कृतिक जपणुकीबद्दल, पुण्याच्या प्राचीन वास्तुकलेबद्दल त्यांना विशेष आत्मीयता आहे. जुने वाडे पाडून त्याठिकाणी चकचकीत इमारती उभ्या राहत आहेत त्याबद्दल त्यांना काळजी वाटते. चित्रांच्या माध्यमातून ते ही वाडा संस्कृती जपतात. स्थानिक सांस्कृतिक वारसा समितीतर्फे प्रकाशित करण्यात येणार्या पुस्तकातही त्यांचा उत्स्फूर्त सहभाग आहे. ही त्यांची कळकळ, बांधिलकी आणि आत्मीयता त्यांच्या सर्व चित्रांमधून व्यक्त होते.
त्यांच्याबद्दल ही सगळी माहिती गोळा करत असताना कुठेतरी एक अस्वस्थता होती, असमाधान होते, काहीतरी कमी पडते आहे आपल्याकडून असे वाटत होते... या माणसाला न भेटता नुसतीच माहिती जमा करण्यात मजा येत नव्हती. ऐकत होते, त्यांच्या चित्रकलेबद्दल, व्यक्तिमत्त्वाबद्दल... आणि माझ्या नवर्यामुळे, मनोजमुळे या विलक्षण माणसाच्या भेटीचा योग जुळून आला. या मनस्वी कलाकाराला जाणून घेण्याचा, प्रत्यक्ष पेंटिंग करताना पाहण्याचा योग आला.
मिलिंद मुळीक. एक प्रसन्न आणि अतिशय साधे व्यक्तिमत्त्व. कसला बडेजाव नाही, चेहर्यावर कसलाही अभिनिवेष नाही. बोलण्यात कुठलीही ओढूनताणून आणलेली, कलाकाराचा म्हणून दाखवला जातो तसला विक्षिप्तपणा दाखवण्यासाठीची कसलीही अतार्किक विसंगती नाही. शांत, अविचल मुद्रा आणि निर्व्याज डोळे. पण हळूहळू उलगडत जाते ह्या निर्व्याज डोळ्यांमागची अतिशय विलक्षण प्रतिभावान नजर! बोलण्यात मार्दव. तरीसुद्धा चार मित्रमैत्रिणी जमा झाल्यावर गप्पा मारतात तशीच बोलण्याची पद्धत. माझ्यासारख्या नवख्या व्यक्तीला लेखनप्रक्रियेत त्यांनी ज्याप्रकारे मनापासून पाठिंबा आणि प्रोत्साहन दिले त्यातून या कलाकाराच्या आत दडलेल्या सहृदय माणसाचे दर्शन घडले.
त्यांना जाणून घेण्याचा योग आला तशीच त्यांची पेंटिंग्ज जाणून घेण्याचीही संधी मिळाली.
छोट्या छोट्या, आपल्या आजूबाजूला दिसणार्या गोष्टी आपल्या चित्रांतून दाखवण्यात मिलिंदसरांचा हातखंडा आहे. प्रकाश छायांचा अद्भुत खेळ ते कॅनव्हासवर कुंचल्याच्या फटकार्यांनी लीलया खेळतात. मग ते पुण्यातले जुने वाडे असोत, कोकणातले कौलारू घर असो, खेडेगावातली भातशेती असो, मेंढपाळ असो, पावसाळी ओले रस्ते असोत, एकाकी सायकल असो, कॅफे कॉफी डेमधली निवांत संध्याकाळ असो, किंवा अगदी घरातली टेबलखुर्ची असो. चित्रातला मुक्तपणा व जिवंतपणा ते हरवू देत नाहीत. बघत रहावीत अशी ही चित्रे, सहजसुंदर साकारलेली. त्यांचे चित्र त्यांच्याच स्वभावासारखे. साधेसोपे, पण अथांग. चित्रकलेविषयी अगदी अनभिज्ञ असलेल्या व्यक्तीलाही त्यातले सौंदर्य जाणवायला वेळ लागत नाही, आणि त्या क्षेत्रातल्या व्यासंगी प्रस्थापितांनासुद्धा त्यात वेगळे काहीतरी सापडते. त्यांची चित्रे पाहताना, 'ही रचना अजून काहीतरी सांगते आहे' अशी हुरहूर सतत लागून राहते. आता उदाहरणार्थ हे चित्र-
कॅफे कॉफी डेमधील आधुनिक वातावरण किती चपखल टिपले आहे.
किंवा हे चित्र...
प्लॅस्टिक आणि काच यांचे वेगवेगळे पोत रंगांच्या साहाय्याने कसे दाखवले आहे पहा.
वरील चित्रातून एक गोष्ट प्रकर्षाने लक्षात येईल की चित्र बघणार्याची दृष्टी पाहिजे त्या दिशेला वळवण्याची कला चित्रकाराकडे असावी लागते. एका शेजारी एक ठेवलेल्या दोन बाटल्यांचे चित्र. एक प्लॅस्टिकची बाटली, एक काचेचा पॉट. तर सुरुवातीला आकारावरून, त्यावरच्या बारकाव्यांवरून चित्र पाहणारा हे ठरवत असतो की, ही प्लॅस्टिकचीच बाटली असली पाहिजे. हे चित्रकाराचे कसब आहे की चित्र पाहिल्याक्षणी पाहणार्याला तशी दृष्टी देणे. मग रंगांच्या काही रेषांनी त्या पोताचा अधिक दृढ परिणाम साधता येऊ शकतो. चित्र पाहणार्याच्या मनात चित्रकाराला अपेक्षित अशी प्रतिमा निर्माण होणे आणि त्यानुसार त्याची दृष्टी तयार होणे हे जास्त महत्त्वाचे.
जलरंगांवर त्यांचं विशेष प्रेम. त्यांचे तैलरंग, पेस्टल, अॅक्रिलिक अशा अनेक माध्यमांवर प्रभुत्व आहे. डिजिटल आर्टमधेही त्यांनी बरेच काम केले आहे. पण जीव आहे तो जलरंगांवर. जलरंग ते मुक्तपणे हाताळतात. चित्राचे पद्धतशीर नियोजन व मांडणी जलरंगासाठी अत्यंत आवश्यक आहे. हे आणि पर्स्पेक्टिव्हवरील (यथादर्शन चित्र) प्रभुत्व ही त्यांची बलस्थाने. त्यांच्या चित्रांमधे विषयांची विविधता आहे तसेच एकाच विषयात खोलवर जाऊन नवनवीन अर्थ धुंडाळण्याचीही कुवत आहे. प्रत्येक विषयात ते प्रयोगशील आहेत.
निसर्गचित्रण करताना आपल्या रचनाप्रधान शैलीतून ते अशा सहजपणे जलरंगांना सामोरे जातात की पाहणार्याचे भान हरपून जावे. कलाकाराला त्याच्या कलेच्या साधनेत मग्न असताना बघण्यासारखे दुसरे आनंददायी दृष्य नाही. नवोदित चित्रकार या त्यांच्या सहज साधनेवर भाळूनच जलरंगाच्या वाटेला जाण्याचे धाडस करतात.
मुळात, जलरंग हे अत्यंत उत्स्फूर्त आणि गतिमान माध्यम आहे. अमर्याद वेगवान विचारांच्या आवर्तनाला तितक्याच वेगाने प्रतिसाद देऊ शकणारं हे माध्यम. कॅनव्हासवर सोडलेले जलरंग म्हणजे अवखळ मूलच. कॅनव्हासवर वाहणार्या अथवा सोडलेल्या जलरंगाला तुम्ही त्या-च्या-त्या वेळी नाही घडवले आणि एकदा का तो रंग कागदाने टिपला, पक्का झाला की मग पुनर्रचनेला वाव नाही. खूप खूप वेग आहे या माध्यमाला आणि म्हणूनच मिलिंद सरांच्या विचारवेगाला साजेसे असणारे हे माध्यम त्यांचे आवडते आहे.
मिलिंदसरांनी लिहिलेली व ज्योत्स्ना प्रकाशनने प्रकाशित केलेली अनेक पुस्तके या निमित्ताने पाहण्यात आली.
सहजसोप्या भाषेत, चित्रांच्या प्रात्यक्षिकांसह नवोदिताला तसेच प्रस्थापितांनाही मार्गदर्शक ठरणारी ही पुस्तके आहेत. सरांच्या चित्रकलेची जडणघडण दाखवणारी, त्यांच्या चित्रांचा सहजशैलीत कानोसा घेणारी ही पुस्तके त्यांच्या चित्रातील सहजतेमागचे रहस्य उलगडतात. त्यामुळेच चित्रकलेच्या क्षेत्रात दृष्टीसेन असणार्या किंवा अगदी ओ का ठो कळत नसणार्यांनासुद्धा परत एकदा मागे वळून चित्राकडे पहायला लावणार्या, नकळत 'व्वा! क्या बात है!" अशी दाद द्यायला लावणार्या चित्रांचा मागोवा घेतात ही पुस्तके.
या पुस्तकांचा परिचय दिला नाही तर मिलिंद सरांची ओळख अपूर्ण राहील.
'वॉटरकलर' हे पुस्तक पाहताना लक्षात येते की ...
मुक्तपणे आणि आत्मविश्वासपूर्वक जलरंग हाताळायला शिकवणारे असे हे पुस्तक आहे. यात मिलिंदसरांनी १) ओळख २) सराव ३) स्केचिंग ४) रचना ५) रंग ६) चित्रनिर्मिती व ७) गॅलरी या प्रकरणांमधून जलरंगातील काम कसे करावे, याची प्राथमिक तंत्रापासून ते सूक्ष्म बारकाव्यांपर्यंत तपशीलवार व अनेक प्रात्यक्षिकांसह माहिती करून दिली आहे. यात 'गॅलरी' या सदरात येणारी त्यांची चित्रे, त्याबद्दलच्या सरांनी केलेल्या विवेचनामुळे अनेक बारकावे सहज सांगून जातात.
तीच गोष्ट 'स्केचबुक' ची :
मिलिंदसरांना चित्राचे विषय कसे सापडतात, रचना कशा करतात, रेषा कशा रेखाटतात याचा कानोसा घेणारे आणि त्यांच्या चित्रांतील सहजतेमागचे रहस्य उलगडणारे हे पुस्तक आहे. रेखाचित्रांपासून ते विविध छटांच्या विश्लेषणापर्यंत सर्व पैलूंना स्पर्श करणारे हे पुस्तक नवोदित चित्रकारांना मार्गदर्शक ठरते व त्यांना चित्राची सुरुवात आत्मविश्वासपूर्वक करण्याची स्फूर्ती देते. त्यांच्या अप्रतिम रेखाचित्रांचे हे काही नमुने पहा-
'ओपेक कलर' च्या बाबतीत असे म्हणता येईल की यात :
अपारदर्शक रंगांच्या साहाय्याने चित्रनिर्मितीची तंत्रं विस्तृतपणे विषद केली आहेत. जरी या माध्यमाला मर्यादा असल्या तरी काही चित्रांच्या परिणामकारकतेला हे रंग कसे फायदेशीर ठरू शकतात, याचे विवेचन मिलिंदसरांनी केले आहे. प्रामुख्याने पोस्टर व अॅक्रिलिक रंग यांचा यात अंतर्भाव होतो. अॅक्रिलिक रंग वापरूनही चित्र कसं जिवंत करता येतं याचं उदाहरण म्हणजे हे चित्र...
इथे छाया-प्रकाशाचा अद्भुत खेळ समर्थपणे पेललेला आहे. केवळ काही रेषांच्या सहाय्याने काढलेली सायकल केवळ अप्रतिम!
'पर्स्पेक्टिव्ह' किंवा यथादर्शन चित्र ... या पुस्तकात ...
सुरुवातीला नवोदितांना अत्यंत क्लिष्ट वाटणारा हा विषय सहजसोप्या भाषेत मिलिंदसर समजावून देतात. या विषयातल्या खाचाखोचा, मुद्दे, प्रात्यक्षिकांसह सटीप विवेचन ह्यामुळे हे पुस्तक चित्रकारालाही चित्रांकडे पाहण्याचा एक वेगळाच दृष्टिकोन देते. त्यामुळेच फक्त नवोदित चित्रकारच नव्हेत तर वास्तुविशारद आणि आंतररचनाकारांना सुद्धा हे पुस्तक मार्गदर्शक ठरते.
(पर्स्पेक्टिव्ह म्हणजे अंतर आणि खोली यांचा चित्रात समन्वय साधणे. निसर्गातल्या प्रत्येक गोष्टीला जो तिसर्या मितीचा पैलू असतो त्याला कॅनव्हासवर उतरवणारे असे हे तंत्र आहे ज्यामुळे चित्र जिवंत वाटते.)
आणि 'वॉटरकलर लँडस्केप (स्टेप बाय स्टेप)' मध्ये :
विशेषतः लँडस्केपसाठी लागणार्या तंत्रांचे, समजण्यास अत्यंत सोप्या भाषेत मिलिंदसरांनी विवेचन केले आहे. यात १) वॉश कसा द्यावा २) वेट-इन-वेट ३) ग्लेझिंग ४) ब्रश वर्क ५) सबट्रॅक्शन ६) डायरेक्ट अॅप्रोच आणि ७) आऊटडोअर्स या पैलूंवर प्रकाश टाकला आहे.
नवोदित चित्रकाराला जलरंगाचे आव्हान पेलण्यासाठीचे मार्गदर्शन या पुस्तकात केले आहे.
कला पर्यटन
बाह्यचित्ररेखाटनाचा खर्या अर्थाने अनुभव देण्याच्या कळकळीतूनच जन्माला आलेला एक अभिनव उपक्रम म्हणजे 'कला पर्यटन'. या अंतर्गत, मे महिन्याच्या सुट्टीत एका छोट्या सहलीच्या रुपात मिलिंदसर, महाराष्ट्रातल्या, बहुतेक वेळा कोकणातल्या एखाद्या गावात, पेंटिंगच्या कार्यशाळा घेऊन आपल्या विद्यार्थ्यांना बाह्यचित्ररेखाटनाचा अनुभव देतात. प्रत्यक्ष स्थळावर, मग ते कौलारू घर असो, समुद्रकिनारा असो, नारळ-पोफळीच्या बागा असोत, मंदिर असो, किंवा ज्या ठिकाणी उतरले आहेत तिथलाच एखादा स्पॉट असो....... आपल्या सर्व विद्यार्थ्यांना त्या 'विशिष्ट जागेच्या अथवा वस्तूच्या'समोर बसकण मारून, त्यांना जसं दिसतं तसं चित्रात मनमुराद उतरवायची ते मोकळीक देतात.
या कला पर्यटनादरम्यान मिलिंदसर स्वत: विद्यार्थ्यांबरोबर फावल्या वेळात गप्पाटप्पा आणि सहलीचा आनंद घेतात म्हणूनच नवोदित चित्रकारांना ते आपल्यातलेच एक वाटतात आणि ते नाते मग फक्त शिक्षक-विद्यार्थी एवढंच मर्यादित रहात नाही.
सकाळी साडे आठपासून सुरू होणारे चित्रकलेचे धडे जेवणाखाण्याच्या वेळा सोडल्या तर रात्री अकरापर्यंत अविरत चालू असतात. रात्रीच्या सत्रात दिवसभर विद्यार्थ्यांनी केलेल्या पेंटिंगचा मागोवा घेऊन सर त्यातल्या खाचाखोचा, बारकावे समजावून सांगतात. यात विद्यार्थ्यांच्या कुटुंबियांनाही सामील होता येत असल्यामुळे चित्रकलेचे धडे घेताघेता कुटुंबाबरोबर सहलीचा आनंदही घेता येतो. माझा नवरा मनोज व मुलगी राधा हे त्यांचे विद्यार्थी असल्यामुळे या कला पर्यटनाचा प्रत्यक्ष अनुभव घेता आला.
पुण्यातून तसेच मुंबईहूनही अनेक नवोदित चित्रकार या कला पर्यटनात सहभागी होऊन मिलिंदसरांच्या प्रात्यक्षिकांसह मार्गदर्शनाचा लाभ घेतात. ती एक पर्वणीच असते त्यांच्यासाठी.
आर्ट स्टुडिओ
पुण्यातील ओंकारेश्वर मंदिराजवळचा त्यांचा आर्ट स्टुडिओ म्हणजे त्यांचे दुसरे घर, छोटेखानी जगच! इथे त्यांच्या वेगवेगळ्या आकारातल्या पूर्ण/अपूर्ण चित्रांचा व चित्रकलेवरील जगभरातील पुस्तकांचा खजिनाच आढळतो. त्यांचा ट्रायपॉड, रंग, कुंचले, कॅनव्हास हेच तिथल्या आविष्काराचे साक्षीदार. त्यातूनच साकार होतात उत्कृष्ट कलाकृती ! हा आर्ट स्टुडिओ, त्यांचे वडील व प्रख्यात चित्रकार श्री. प्रतापराव मुळीक यांच्या कारकिर्दीचा साक्षीदार आहे. १९८०पासून तो अखंडपणे त्यांना साथ देत आला आहे. साधारण १९८४-८५च्या सुमारास कॉमिक्समधील चित्रांचे तिथे काम चाले आणि त्यात मिलिंदही आवडीने सहभागी होत. या स्टुडिओला भेट दिली असता, गप्पांमधून या मनस्वी व्यक्तिमत्त्वाचे अनेक पैलू अजून ठळकपणे समोर आले.
ते म्हणतात,
"मी पेंट करतो, कारण मला चित्रात येत जाणार्या रोमहर्षकतेला प्रतिसाद द्यायचा असतो, त्याच्याशी संवाद साधायचा असतो. जेव्हा एखाद्या व्यक्तीच्या तोंडून, माझे चित्र पाहून सहजपणे दाद दिली जाते, तेव्हा एखाद्या समीक्षकाने लिहिलेल्या लांबलचक निबंधापेक्षा ती दादच माझ्यासाठी जास्त महत्त्वाची असते."
"मी एक 'पूर्ण-वेळ चित्रकार' आहे. मी जे पाहतो, ते चित्रात उतरवण्याचा प्रयत्न करतो. चित्राचा विषय नाही, तर चित्र काढताना वापरले जाणारे आकार, रंग, छटा, प्रकाश-छायांचा खेळ आणि त्यांचे एकमेकांशी असलेले नातेच चित्राला बहार आणतात."
शेजारील चित्रात पुण्यातल्या शनिवार पेठेतल्या सकाळचे रेखाटन केले आहे. चित्राच्या मध्यभागी असलेल्या इमारतीवर पडलेला उन्हाचा कवडसा बाकीच्या निळ्या छटांच्या छायांमधून साकार झालेला. सकाळची वेळ आणि अजून दिवस सुरु व्हायचा आहे हे पाहिल्याक्षणी जाणवते.
बोलण्याच्या ओघात अनेक प्रश्न समोर आले ज्यांचं निरसन त्यांनी हातचे काहीही राखून न ठेवता केले. त्यांच्याशी झालेल्या मनमोकळ्या गप्पांना आम्ही एका महत्त्वाच्या प्रश्नाने सुरुवात केली.......
कलाशाखेतल्या पुढील अभ्यासक्रमासाठी शिष्यवृत्ती मिळालेली असूनसुद्धा मेकॅनिकल इंजिनियरिंगला प्रवेश घेण्याचा निर्णय तुम्ही का घेतलात?
इंजिनियरिंगला अॅडमिशन घेण्याच्या निर्णयामागे थोडा प्रवाहाचा हिस्सा होण्याचा भाग होता. अभियांत्रिकी महाविद्यालय, पुणे(COEP) यासारख्या कॉलेजचं आकर्षण होतंच. त्याच वेळी नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ डिझाइन, अहमदाबाद (NID), इथेही प्रवेश मिळाला होता पण तरीही मी इंजिनियरिंगला प्राधान्य दिलं कारण मला कुठल्याही टप्प्यावर पुणे सोडण्यात स्वारस्य नव्हतं आणि भविष्यातल्या आर्थिक सुरक्षिततेचाही विचार करणे अनिवार्य होते. पण एक मात्र झालं की, इंजिनियरिंग अभ्यासक्रमामुळे उलट मला चित्रकलेसाठी अत्यंत आवश्यक असणार्या याथादर्शन चित्ररेखाटन आणि चित्रकलेच्या विविध पद्धतींचे विश्लेषण यासाठी नक्कीच फायदाच झाला.
इंजिनियरिंग नंतर परत चित्रकलेकडे कसे वळलात?
चित्रकलेकडे वेगळे असे वळण्याचा प्रश्नच नव्हता. इंजिनियरिंग करत असतानाच आंतरमहाविद्यालयीन पुरुषोत्तम करंडक, फिरोदिया करंडक स्पर्धेमध्ये मी भाग घ्यायला सुरुवात केली. त्यात सुरुवातीला प्रामुख्याने गिटारवादनात माझा सहभाग असे. नंतरनंतर पेंटिंगला सुरुवात केली. आवड होतीच. त्यामुळेच की काय, एकंदर त्या वातावरणामुळे, शिवाय त्या वयाचा परिणाम म्हणून म्हणा हवं तर, अभियांत्रिकी शिक्षणामधला रस मात्र कमी होऊ लागला. तरी इंजिनियरिंग पूर्ण झाल्यानंतर 3D स्टुडिओ व ऑटोकॅडमध्ये स्थापत्यविषयक रेखाटनाचे काम मी सुरु केले. पण त्यातली अतिअचूकता जाचक वाटू लागली. स्वतःचा कुठलाही खास असा तोंडावळा नसलेल्या औद्योगिक इमारतींची चकचकीत, गुळगुळीत चित्रं काढण्यामागचा रुक्षपणा त्रासदायक वाटू लागला. त्या क्षेत्रातल्या खोटेपणामुळे जीव रमेनासा झाला. साधारण १९८७-८८पासून पूर्ण वेळ पेंटिंगलाच द्यावा असं माझ्या मनात घोळू लागले, जी माझ्यासाठी अत्यंत आनंद देणारी गोष्ट होती.
तुमच्या आत्ताच्या बोलण्यातून प्रथमच कळले की तुम्ही गिटारवादन करत होतात, याबद्दल काही?
ते फील्ड एक्स्प्लोर करायचे राहूनच गेले.
रेखाटनकार (इलस्ट्रेटर) म्हणजे नक्की काय?
इलस्ट्रेटर हा आपल्या चित्रांमधून एखाद्या विषयाची, गोष्टीची, घटनेची प्रभावीपणे मांडणी करतो, दर्शवतो, सांगतो.
पुण्यातील जुन्या वाड्यांबद्दलची आत्मीयता तुमच्या अनेक चित्रांमधून व्यक्त होते, त्यावर काही प्रकाश टाकू शकाल?
'इंडियन नॅशनल ट्रस्ट फॉर आर्ट अँड कल्चरल हेरिटेज (INTACH)' या संस्थेने माझ्याशी संपर्क साधला. त्यांना पुण्याच्या जुन्या वाड्यांच्या जपणुकीबद्दल माझ्याकडून कुठल्यातरी पद्धतीने योगदान अपेक्षित होते. त्यांच्या विनंतीला मान देऊन मी पुण्याच्या प्राचीन वाड्यांचे चित्रांच्या स्वरुपात जतन, आणि एकापरीने डॉक्युमेंटेशन करून ठेवले. या प्रक्रियेदरम्यान या वाड्यांबद्दल आत्मीयता निर्माण होत गेली. अनेक जुन्या वाड्यांना चित्ररूप देऊन त्यांचा वास्तुकलेचा वारसा जपण्याचा मी प्रयत्न केला. उदाहरणादाखल हे जुन्या कुंभारवाड्याचे चित्र ...
किंवा, कबीर बागेतील एक पडका जुना वाडा.
तुमची सगळीच चित्रे अत्यंत जिवंत वाटतात, त्यामागचे रहस्य काय?
कमर्शियल डिझाईनमधला कोरडेपणा जरी निराशाजनक असला तरी त्याच्यामुळे माझी मनोभूमिका बदलायला मदतच झाली. व्यक्तीमत्त्वात एक प्रकारचा मोकळेपणा, सहजपणा आला. 'काय करायचे नाही', हे मनात पक्के झाले. कुठल्याच एका क्षेत्रात अडकून न राहिल्यामुळे कलाविष्कारांना पूर्ण मोकळीक मिळाली - जी माझ्या चित्रांमधून व्यक्त होत असल्यामुळे त्यात जिवंतपणा येत असावा. आर्ट हे प्रोफेशन नव्हतेच, ती एक आनंद देणारीच गोष्ट होती आणि आहे. त्यामुळेच कसल्याच प्रकारची असुरक्षितता कधीच जाणवली नाही. ह्या सगळ्याचा एकत्रित परिणाम आपोआपच होतो.
शिकण्याने कला आत्मसात होते का?
शंभरातल्या पन्नास जणांना खरं तर शिकवण्याची गरज नसते. एकोणपन्नास जणांना शिकवून काहीएक उपयोग नसतो.. पण तो जो मधला एकजण असतो ना, त्याच्यासाठी हा प्रपंच आहे सगळा. आत्तापर्यंत जवळपास तीन हजार विद्यार्थ्यांनी या कार्यशाळांचा लाभ घेतला आहे.
पुस्तकांबद्दल काय सांगावंसं वाटतं?
पुस्तके लिहिण्यामागे उद्देश हा होता की, या विषयावर अशा प्रकारची पुस्तके त्यावेळी नव्हती. कुठेतरी कमतरता जाणवत होती. आपण केलेलं काम मागे रहावं असंही कुठेतरी वाटत होतंच, शिवाय सोप्या पद्धतीने चित्रकलेचं तंत्र सांगणारी पुस्तके नवोदितांना फायदेशीरच ठरणार होती. माझ्या काही पुस्तकांमुळे ही कमतरता, पोकळी भरून काढण्यासाठीचा पूल बांधला गेला याबद्दल मला आनंदच आहे.
चित्रकलेतील तांत्रिक बाबी चित्र परिणामकारक बनवायला किती उपयोगी पडतात?
चित्र सुरू करताना काही तंत्रे (techniques) सांगितली जातात. ही तंत्रे म्हणजे, १०-२० वेळा एकच चित्र काढल्यानंतर, कुठल्या प्रकारे चित्र काढले तर परिणामकारक होईल हे ठरवणारा एक सोपा मार्ग शोधलेला असतो. तोच एकमेव मार्ग आहे असं नाही, तोच मार्ग विद्यार्थ्यांनी कायम आचरावा असंही नाही, पण त्या तंत्रांमुळे चित्रकाराला चालना मिळू शकते. चित्राचा मूलभूत आराखडा तयार करून त्यात स्वतःच्या नवनवीन कल्पना तो आणू शकतो. त्यासाठी या तांत्रिक बाबींचा नक्कीच उपयोग होतो.
चित्रकार-चित्रकारात काही फरक असतो का? कसा?
प्रत्येक चित्रकाराची शैली वेगळी असते. काही चित्रकार हे रंगकार (कलरिस्ट) असतात. म्हणजेच ते चित्रात मुख्यत्वे रंगांचा विचार व वापर करतात. रंगांच्याच विविध छटांनी ते चित्रात परिणाम साधतात. हे थोडेफार काव्यात्मक प्रकारात मोडतात. काही चित्रकार हे छटाकार (टोनलिस्ट) असतात, जे चित्रात मुख्यत्वे प्रकाश-छायांचा विचार करून काही ठिकाणी रंग न वापरताच एखाद्या वस्तूला आकार देऊन जिवंतपणा आणू शकतात. वास्तवदर्शी चित्र काढण्याकडे यांचा कल असतो. मी दुसर्या प्रकारात बसणारा चित्रकार आहे.
जलरंग या माध्यमावर विशेष प्रेम का?
तशी मला सगळीच माध्यमे आवडतात. पेस्टल, तैलरंग, पोस्टर, जलरंग. पण माझे विशेष प्रेम जलरंगावर आहे हे खरेच! एडवर्ड वेसलचे जलरंगावरचे पुस्तक प्रथम वाचल्यानंतर हे माध्यम मला जास्त खुणावू लागले. जलरंग हे माध्यम माझ्या विचारवेगाशी मिळतेजुळते आहे. खूप उत्स्फूर्त, खूप संवाद साधणारे माध्यम आहे हे. मुळात प्रत्येकाकडे रंगांना, त्यातल्या सौदर्याला पारखायची, त्यांना दाद देण्याची स्वाभाविक दृष्टी असते. अगदी लहान मुलातसुद्धा आपल्याला ही दिसून येते. जलरंगातून तुम्ही समोरच्या व्यक्तीमधल्या या नैसर्गिक, स्वाभाविक दृष्टीला चालना देऊ शकता असं मला वाटतं.
सरांचे जलरंगावरील प्रभुत्व दाखवण्यासाठी हे चित्र पुरेसे आहे...
फर्ग्युसन कॉलेज रोडवर पावसाची मोठी सर येऊन गेल्यानंतरचे चित्र. रस्त्याचा ओलेपणा, कपडे, छत्र्या सावरत चाललेल्या तिघीजणी, ओथंबणारे झाड आणि काचेची बिल्डिंग, सगळेच कसे यथार्थ रेखाटले आहे...
आता शेवटचा आणि महत्त्वाचा प्रश्न ...
पहिल्या दोन पिढ्यांनंतर तिसर्या पिढीचे या क्षेत्रात योगदान काय?
माझ्या दोन्ही मुलांमध्ये, चित्रकलेसाठी जी नैसर्गिक गुणवत्ता लागते, ती आहे. माझा मोठा मुलगा अकरावीत व धाकटा पाचवीत आहे. सध्या कॉलेज, शाळा, परीक्षा यांतच ते गुरफटले आहेत. शिवाय हे वयसुद्धा कुठल्याच बाबतीत गंभीरपणे विचार करण्याचे नाहीये त्यांचे. पुढे बघू काय काय होते!
गप्पांचा हा प्रवाह तसा थांबणारा नव्हता. सरांचे व्यक्तिमत्त्व असे एका भेटीत उलगडणे शक्यच नव्हते. कुठेतरी थांबणे क्रमप्राप्त होते. शब्दश: निशब्द अवस्थेत, पुन्हा भेटण्याचे मनात पक्के ठरवून आम्ही बाहेर पडलो.
असाधारण प्रज्ञा आणि अलौकिक दैवजात प्रतिभा यांच्या अद्वैतातून आकाराला येते सृजन. कुठलाही कलाकार, कलाकार असतो तो सृजनाच्या त्या क्षणापुरता. नवनिर्मितीच्या आनंदाने उजळून निघालेले असे मोजकेच क्षण कलाकाराच्या आयुष्यात येतात. पण त्यातही सरांवर त्याचा लोभ जरा अधिकच असावा. असे असंख्य क्षण सरांच्या आयुष्यात उजळून निघाले, आणि असंख्य अजूनही ह्या अवलियाच्या परीसस्पर्शाच्या प्रतिक्षेत आहेत.
_______________________________
मिलिंद सरांच्या चित्रांबद्दल अधिक माहितीसाठी त्यांचा ब्लॉग किंवा वेबसाइट पहा.
(लेखात पुस्तकांच्या मुखपृष्ठांची प्रकाशचित्रे वापरण्यास अनुमती दिल्याबद्दल ज्योत्स्ना प्रकाशनाचे आभार.)
(चित्रकृतींची सर्व प्रकाशचित्रे मिलिंद मुळीक यांच्या ब्लॉगवरून आणि वेबसाईटवरून साभार.)
- मंजिरी सोमण