संपादकीय

मस्कार. सर्व रसिक वाचकांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा! 'मायबोली.कॉम'शिवाय जशी आपली दिनचर्या अपुरी आहे, तशीच हितगुज दिवाळी अंकाशिवाय आपली मानसदीपावली अपुरी आहे. म्हणूनच हा अकरावा दिवाळी अंक तुमच्यासमोर सादर करताना आम्हांला अतिशय आनंद होत आहे. पुढील काही पाने आपल्याला खिळवून ठेवतील आणि त्याबरोबरच आपल्यापुढे काही नवीन विचार मांडतील, अशी आशा आहे.

महाराष्ट्रात शंभराहून अधिक वर्षे अव्याहतपणे चालत आलेली दिवाळी अंकांची परंपरा सर्वप्रथम मायबोलीच्या माध्यमातून अकरा वर्षांपूर्वी आंतरजालावर आली. दरवर्षीच्या संपादक मंडळाने आपापल्या परीने त्या शब्ददिंडीची धुरा वाहिली आणि प्रत्येक वर्षीच काहीतरी वेगळे देण्याचा आवर्जून प्रयत्न केला. गेल्या काही वर्षांत आंतरजालावरच्या मराठीभाषक लेखकवर्गाच्या जाणिवा आणि नेणिवा समृद्ध झाल्या आहेत. मायबोली आणि त्यासारखी इतर अनेक संकेतस्थळे, अनुदिनी अशा माध्यमांमुळे अनेकजण 'दिसामाजिं काहीतरी' लिहू लागले आहेत. तर काहीजण नक्की काय आणि किती लिहावे, अशा संभ्रमातही आहेत. हे माध्यम भलतेच ताकदवान आणि बहुआयामी प्रतिभेला चालना देणारे आहे. अश्या वेळेस संपूर्ण अंक संकल्पनांवर आधारित काढून सामूहिक विचारांना काहीएक दिशा मिळेल का आणि लेखक तसेच वाचकांना सकस, वैचारिक खाद्य पुरवता येईल का यावर थोडा उहापोह करण्यात आला. अधिकाधिक लेखकांना सहभागी होता यावे, म्हणून एकीऐवजी सर्वसमावेशक अशा चार संकल्पना ठरवण्यात आल्या. एकाच संकल्पनेवर आधारित संपूर्ण अंक काढण्याच्या दृष्टीने यंदाचा अंक ही पहिली पायरी ठरावी, अशी आमची इच्छा आहे. मराठी भाषा आंतरजालावर येऊन एका तपाहून अधिक काळ उलटला. देशाविदेशांतल्या मराठी मंडळींनी एकत्रितरीत्या एका माध्यमाद्वारे संवाद साधणे, माहितीची देवाणघेवाण करणे आणि मातृभाषेतल्या मनोरंजनाचे एक साधन म्हणून त्याकडे पाहणे, यापलीकडले पुढचे पाऊल म्हणून हा अंक महत्त्वाचा ठरला तर आमचे उद्दिष्ट साध्य होईल.

मायबोलीवरचा लेखक-वाचकवर्ग नजरेसमोर ठेवल्यास त्यांत मुख्यत्वे शहरी, तरुण पिढी, उत्तम कलाकार किंवा कलेबद्दल आस्था बाळगणारी, चाकोरीबाहेरचे प्रयोग करण्यास उत्सुक असलेली तसेच धरित्री आणि पर्यावरणसंवर्धनाचे योग्य भान असलेली अशी मंडळी असावीत, असा कयास बांधता येतो. या सगळ्यांचा विचार करून तसेच ’आंतरराष्ट्रीय जैववैविध्य वर्ष’ आणि ’आंतरराष्ट्रीय युवा वर्ष’ यांचे औचित्य साधून आम्ही निसर्गायण, कला आणि जाणिवा, रंग उमलल्या मनांचे आणि वेगळ्या वाटा, नवी क्षितिजे या संकल्पना निवडल्या. नवीन प्रयोगांना नेहमीच पाठिंबा देणार्‍या मायबोलीप्रशासनाने आमची ही कल्पनाही मंजूर केली. लेखकांकडूनही भरघोस प्रतिसाद मिळाला. अंकात समाविष्ट केलेल्या साहित्यकृतींमध्ये तरुण पिढीचे अंतरंग उलगडून दाखवणार्‍या 'थेट'कथा, चाकोरीबाहेर जाऊन वेगळ्या कार्यक्षेत्रांत चमकत असणार्‍या तरुण मान्यवरांची मनोगते आणि त्यांच्याशी संवाद, निरनिराळ्या कलाकारांच्या कलाकृतींचा लेखकांनी घेतलेला आस्वाद, त्यासंबंधीचे विचारमंथन, कुंचले, कॅमेरे, रांगोळी, मेंदी अशा विविध माध्यमांचा वापर करून घडवलेल्या कलाकृतींचा आविष्कार आणि बालसाहित्य आपल्याला पाहायला मिळेल. संपादकमंडळातर्फे छोटीशी दिवाळीभेट म्हणून 'ग्रंथस्नेह' पाहायलाही विसरू नका. खेदाची गोष्ट एवढीच की, गद्यसाहित्याच्या तोलामोलाचे पद्यसाहित्य पुरेसे न आल्याने पद्यविभाग आम्हांला वगळावा लागला.

अंक ज्यांच्या मदतीशिवाय पूर्ण होऊ शकला नसता, अशा सर्वांची तसेच संपादक मंडळाची ओळख श्रेयनामावली या दुव्यावर होईल. हे सर्वजण घरचे आणि हक्काचेच असले तरी त्यांचे आभार मानावे तितके थोडेच आहेत.

मायबोली प्रशासन तसेच लेखकांकडून उत्स्फूर्त स्वागत झालेल्या या संकल्पनाधारित अंकाबद्दलचे आपले मत जाणून घ्यायला आम्ही उत्सुक आहोत. हा दीपोत्सव आपल्यासाठी आनंद, समृद्धी आणि वैचारिक भरभराट घेऊन येवो.

Taxonomy upgrade extras: