जगाशी संवाद : कॅमेर्‍यातून!

छायाचित्रणकार प्रत्येक दृश्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारे व्यक्त होतात. काही दृश्यं तानेसारखी असतात, काही एखाद्या शांत गाण्यासारखी, काही सुंदर चित्रांसारखी तर काही रखरखीत वास्तव दाखवणारी असतात. कित्येकदा स्टुडिओच्या आत वास्तववादी परिणाम साधावा लागतो. दिवसा रात्रीची वेळ तर रात्री दिवस निर्माण केला जातो. अशावेळी वैयक्तिक अनुभव, पाहिलेली ठिकाणं, प्रवासांमधले अनुभव, व्यक्ती आणि विशेष प्रसंगांचं निरीक्षण हे फार उपयोगी पडतं.

'जे

न देखे रवी, ते देखे कवी' ही उक्ती आपल्या सगळ्यांना माहीतच आहे. पण हल्लीच माझी एका अश्या व्यक्तीशी भेट झाली, जिच्याबरोबर झालेल्या गप्पांमधून "जे दिग्दर्शक 'पाही', ते कॅमेरा दाखवी" हे अगदी मनापासून पटलंय. स्वप्ना पाटसकर आणि तिचे पती मिनाल कायेकर हे एक 'फिल्ममेकर कपल' आहे. स्वप्ना छायाचित्रणकार (कॅमेरापर्सन) आहे. त्यांची आणि माझी माझ्या एका मैत्रिणीच्या घरी भेट झाली ती अगदी अचानक, न ठरवता. स्वप्ना आणि मिनाल यांनी देशात तसेच परदेशांत अनेक प्रकल्पांवर काम केलं आहे आणि त्यांनी बनवलेल्या लघुपटांना पुरस्कारदेखील मिळालेले आहेत. नुकताच त्यांच्या 'Solar Energy - An awakening' या लघुपटाला 'UGC National Best Educational Film' हा पुरस्कार, तर 'Made in China' या चित्रपटाला 'Filmfare Award for Technical Excellence' हा पुरस्कार मिळाला. बोलता बोलता त्यांच्याकडून या क्षेत्रातल्या बर्‍याच गोष्टी कळल्या, ज्या माझ्यासाठी अगदी नवीन होत्या. या सगळ्या गोष्टी तुम्हा सर्वांनाही सांगाव्यात, म्हणून स्वप्ना तसेच मिनालशी झालेल्या गप्पा संवादरुपात मांडत आहे.

कुठलीही कलाकृती तयार करताना छायाचित्रणकार अतिशय महत्त्वाची भूमिका बजावतो आणि तरीही सगळ्या झगमगाटापासून तो कायमच दूर असतो. अश्या परिस्थितीत तू या क्षेत्राकडे वळण्याचं कारण काय? कॅमेर्‍याबद्दल आकर्षण, उत्सुकता लहानपणापासून होती की घरातलं विशिष्ट वातावरण याला कारणीभूत ठरलं?

लहानपणापासून कॅमेर्‍याबद्दल खूप आकर्षण होतं अशातला भाग नाही, पण कलाक्षेत्राशी मात्र अगदी जवळचा संबंध होता. परंतु तरीही कलाक्षेत्राशी मी व्यवसायिकदृष्ट्या जोडली जाईन, असं वाटलं नव्हतं. लहानपणी मी चांगली चित्रकार होते, नाटकांतून काम करत होते, तसंच माझं वाचनही बरंच होतं. याशिवाय मी नीता रानडे तसेच जयमाला शिलेदार यांच्याकडे गाणं शिकले आणि प्रथमा, मध्यमा या गंधर्व महाविद्यालयाच्या परीक्षा दिल्या. मी लहानपणापासून पाहिलेल्या अनेक गोष्टी, फ्रेम्स्‌ माझ्या मनात कायमच्या राहिलेल्या आहेत आणि आता काम करताना नकळत जोडल्या जातात. माझ्या मते छायाचित्रणकार या शब्दातच त्याचा अर्थ येतो. प्रत्येकजण आपापल्या मनात आजूबाजूच्या गोष्टींची छायाचित्रं काढत असतो. नंतर ती कधीतरी आठवतात. माझ्या बाबतीत सांगायचं तर आमचं टुमदार घर, शाळेत सर्व मुलांना आणि घरी आम्हा भावंडांना उत्साहाने शिकवणारी आई, माझे 'टुच' करणारे डॉक्टर बाबा, सायकलवर दूरवरून येताना दिसणारे दूधवाले काका, रस्त्यातल्या एका निळ्या बिल्डिंगमुळे निर्माण झालेला आजूबाजूचा निळसर परिसर अश्या अनेक गोष्टींचा, प्रतिमांचा समावेश आहे. काम करताना नकळत या सगळ्या गोष्टींचा, प्रतिमांचा, त्यातल्या रंगसंगतीचा, ऊन-सावल्यांचा विचार होतो. कुठलीच गोष्ट करायला घरून विरोध नव्हताच आणि घरातल्या वातावरणामुळे हळूहळू मन घडत गेलं.

छायाचित्रण करण्यासाठी कोणत्या विषयातली जाण छायाचित्रणकारासाठी महत्त्वाची ठरते? कुठल्याही चित्रीकरणात छायाचित्रणकाराची एकंदरीत भूमिका काय असते?

व्हिडिओ कॅमेरा हे वापरायला म्हटलं तर अतिशय सोप्पं आणि म्हटलं तर अतिशय अवघड असं यंत्र आहे. कॅमेर्‍याचा योग्य उपयोग करून घेण्यासाठी भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, इलेक्ट्रॉनिक्स आणि संगणक यांचं जरुरीपुरतं का होईना पण ज्ञान असणं फार महत्त्वाचं असतं. कॅमेरावर्क हे चित्रपटाचं महत्त्वाचं अंग आहे. दिग्दर्शक त्याचे विचार कॅमेर्‍याच्या माध्यमातून आणि छायाचित्रणकाराच्या साहाय्यानं प्रेक्षकांपर्यंत पोहचवत असतो. कुठलंही चित्रीकरण हे शेवटी एक टीमवर्क आहे. त्यामुळे फक्त दिग्दर्शक सांगेल तसं छायाचित्रणकार चित्रित करतो किंवा दिग्दर्शक प्रसंग सांगून टाकतो आणि पुढचं सगळं छायाचित्रणकार बघून घेतो, असं कधीच होत नाही. दिग्दर्शक आणि छायाचित्रणकारानं एकत्र काम करणं महत्त्वाचं असतं आणि त्यांच जितकं जास्त ट्यूनिंग असेल तितका चित्रीकरणाचा दर्जा सुधारतो. चित्रीकरण चांगलं झालं की, अपेक्षित परिणाम हा भाषेची सीमा पार करून प्रेक्षकांपर्यंत पोचू शकतो. चित्रित केलेल्या काही काही प्रसंगांमध्ये एकही वाक्य बोललं जात नाही, पण तरीही ते खूप काही सांगून जातात आणि याचमुळे तांत्रिक ज्ञानाबरोबरच एक प्रकारची कलात्मक दृष्टी असणं, हे छायाचित्रणकारासाठी महत्त्वाचं ठरतं. छायाचित्रणकार प्रत्येक दृश्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारे व्यक्त होतात. काही दृश्य तानेसारखी असतात, काही एखाद्या शांत गाण्यासारखी, काही सुंदर चित्रांसारखी तर काही रखरखीत वास्तव दाखवणारी असतात. कित्येकदा स्टुडिओच्या आत वास्तववादी परिणाम साधावा लागतो. दिवसा रात्रीची वेळ तर रात्री दिवस निर्माण केला जातो. अश्यावेळी वैयक्तिक अनुभव, पाहिलेली ठिकाणं, प्रवासांमधले अनुभव, व्यक्ती आणि विशेष प्रसंगांचं निरीक्षण हे फार उपयोगी पडतं.

या क्षेत्रात तुझा प्रवेश कसा झाला? कोणी कोणी तुला प्रोत्साहन दिलं, घडवण्यात हातभार लावला? करीयरची सुरुवात करताना तुला कुठल्या गोष्टी महत्त्वाच्या वाटल्या?

श्री. पिंटू चौधरी हे ’फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया’त सिनियर कॅमेरापर्सन होते. त्यांना सगळे 'दादा' म्हणत. त्यांच्यापासून प्रेरणा घेऊन मी छायाचित्रणकार व्हायचं ठरवलं. त्यांच्याकडे मी शास्त्रशुद्ध प्रशिक्षण घेत होतेच; शिवाय १९९६ ते २००० या काळात त्यांची साहाय्यक म्हणूनही मी काम केलं. त्यांनी मला कॅमेरा हातात धरण्यापासून सगळं शिकवलं. याशिवाय संकलन, पटकथा, रंगभूषा, प्रकाशयोजना या सगळ्या गोष्टीही मी त्यांच्याकडून थोड्याफार प्रमाणात शिकले. एखाद्या चित्रपटात अगदी लहानसहान गोष्टींमध्येही सातत्य राखणं महत्त्वाचं असतं, उदा. एका प्रसंगाचं शूटिंग दोन-तीन दिवस चालणार असेल तर त्यावेळचं वातावरण, कलाकारांचे कपडे, फ्रेममध्ये दिसणार्‍या आजूबाजूच्या गोष्टी हे सगळं प्रत्येक वेळी सारखंच असणं, अत्यंत गरजेचं असतं. या नोंदी ठेवण्याच्या कामाला 'बेसिक कंटिन्यूइटी' असं म्हणतात. भोसरीतील एका कंपनीसाठी काम करत असताना दादांनी मला बेसिक कंटिन्यूइटी लिहिण्याचं काम दिलं. हे करताना दिग्दर्शक, कॅमेरामन यांच्या मागे फिरून फिरून मी भांबावले होते. मी केलेल्या कामाची वही मी त्यांना दाखवली. त्यात मी काही प्रसंगांची चित्रं पण काढून ठेवली होती. ती पाहून ते खूष झाले व म्हणाले, "यालाच ’स्टोरी बोर्ड’ म्हणतात". अश्या काही महत्त्वाच्या गोष्टी मी प्रत्यक्ष काम करतानाच शिकत गेले. मग त्यांनी मला FTIIमधल्या आणि इतर अनेक प्रोजेक्टमध्ये सहभागी करून घेतले.

या क्षेत्रात जे लोक प्रवेश करू इच्छितात त्यांना कोणत्या गोष्टींची पूर्तता करणं आवश्यक असतं? तसंच या क्षेत्राचं औपचारिक प्रशिक्षण कुठे कुठे उपलब्ध आहे?

ज्यांना औपचारिक शिक्षण घ्यायचं आहे, त्यांना सायन्स ग्रॅज्युएशननंतर FTIIमध्ये प्रवेश मिळू शकतो. या संस्थेत छायाचित्रणाचं अतिशय तंत्रशुद्ध प्रशिक्षण दिलं जातं. याशिवाय मास कम्युनिकेशन स्कूल्समध्येसुद्धा हे कॅमेरावापराचं प्रशिक्षण दिलं जातं. हल्ली तर मास कम्युनिकेशनच्या सगळ्याच विद्यार्थ्यांना कॅमेरावापर शिकवला जातो. अर्थात तो बातमीपत्रांच्या दृष्टिकोनातून असतो. मी आधी म्हटल्याप्रमाणे कॅमेरावापराच्या औपचारिक प्रशिक्षणाबरोबरच भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, इलेक्ट्रॉनिक्स आणि संगणक यांच ज्ञान आणि स्वतःची एक कलात्मक दृष्टी असणं आवश्यक आहे.

तुझ्यामते तुझ्या करियरमधलं निर्णायक वळण कोणतं?

१९९८ साली अभिनेत्री-निर्माती मंजू सिंह यांची स्वातंत्र्यचळवळीवरील 'स्वराज' या नावाची मालिका सुरु झाली. त्यासाठी मी दिग्दर्शनसाहाय्य केलं. हा माझ्या आयुष्यातला मोठा टप्पा होता. या निमित्ताने ऑस्कर पुरस्कारविजेत्या भानू अथैय्या यांच्याबरोबर काम करण्याची, त्यांची कार्यपद्धती जवळून बघण्याची संधी मिळाली. कारण त्या या मालिकेच्या वेशभूषासंकल्पक होत्या. हा एकूण अनुभव पुढे खूप महत्त्वाचा ठरला.

छायाचित्रणाचं काम करताना तुला आलेल्या वेगवेगळ्या अनुभवांबद्दल काय सांगशील?

शूटिंगच्या निमित्तानं वेगवेगळी माणसं, त्यांचे विचार, त्यांच्या संस्कृती यांची ओळख झाली. युरोपियन युनियनच्या शेतीविषयक चित्रपटावर काम करताना अख्खं कोकण फिरले. पाणी नियोजन आणि बचतीबाबतचा लघुपट बनवताना विदर्भ, मराठवाड्यातल्या लोकांच्या समस्या लक्षात आल्या. भारतभर काही अगदी लहान लहान खेड्यांतून बचतगट, माहिती तंत्रज्ञान यांमुळे झालेले बदल टिपताना एक सकारात्मक चित्र कोरलं गेलं. भारतीय वनमंत्रालयनिर्मित 'भूमी' या मालिकेचं चित्रीकरण करताना महाराष्ट्राबरोबरच बराच भारतसुद्धा फिरले. या वास्तववादी भारताचं चित्रीकरण हेच खरं भारतदर्शन. ओरिसातल्या आदिवाशांचं चित्रीकरण करत असताना कळलं की, ते अजूनही पैशांचा व्यवहार करत नाहीत. रानमेव्याच्या बदल्यात मीठ, तांदूळ असा वस्तुविनिमय अजूनही चालतो. ते झाडं तोडत नाहीत. कंदमुळं खातात आणि त्यांच्या विश्वात सुखी आहेत. तिथल्या एका आदिवासी स्त्रीचा शॉट आजही मला खूप आवडतो. ती चटई विणता विणता थांबते आणि विडीचा झुरका मारत इतकी सुंदर हसते की, आपल्या सगळ्या नायिका फिक्या पडाव्यात!

ओरिसात ’Save Tiger’ हा लघुपट बनवताना वीस दिवस आम्ही फिरलो, मचाणावर थांबलो. पण वाघोबाची फक्त झलकच दिसली. बहुतेक तोच आमच्या मागावर असावा. 'हत्तींची गणना' हा लघुपट बनवताना आम्ही भर जंगलात शूटिंग करत होतो. मी आणि एक सहाय्यक ओपन टॉप जिप्सीमध्ये मागे कॅमेरा घेऊन उभे होतो. या जंगलात सागाची उंचच उंच, खूप जुनी आणि दाट झाडी आहे आणि Elephant Grass म्हणजेच हत्तीएवढे उंच गवत आहे. जिप्सी हळूहळू पुढे जात होती. आम्ही कधी थांबून तर कधी जिप्सीमधूनच शूटिंग करत होतो. एकेठिकाणी आम्ही खाली उतरून शूटिंग करत असताना थोडी पुढे जाणारी गाडी एका वळणावर कशालातरी धडकली. तिथे Elephant Grassमध्ये साक्षात एक एलिफंटच उभा होता! गवतामुळे ड्रायव्हरला तो दिसला नाही. काही कळायच्या आत तो हत्ती चिडून गाडीच्या दिशेनं आला. त्याचे टवकारलेले कान, उभारलेली सोंड आणि जोरजोरात काढलेले चीत्कार हे सगळंच भयंकर होतं. ड्रायव्हर गाडी जशी मागे घेऊ लागला, तसा तो हत्ती पुढे यायला लागला. मग गाडीतल्या फॉरेस्ट ऑफिसरनं ड्रायवरला गाडीचा अ‍ॅक्सिलरेटर जोरात दाबून आवाज करायला सांगितला. ते पाहून हत्ती काही वेळ तसाच उभा राहिला आणि मग चीत्कारत पुन्हा गवतात गायब झाला. मग वनाधिकार्‍यांनी आम्हांला आत घेण्यासाठी दार उघडले. जर तो हत्ती जास्त रागवला असता तर कदाचित त्यानं आम्हांला गाडीसह उचलून सहज फेकलं असतं. आमचं नशीब म्हणून वाचलो. हे सगळं होत असताना माझा कॅमेरा चालू होता आणि चिडलेल्या हत्तीचे भन्नाट शॉट्स् आम्हांला मिळाले.

’स्वराज’चे चित्रीकरण येरवडा जेलमध्ये सुरू असताना एक गमतीशीर अनुभव आला. तिथे कैद्यांना ठरावीक दिवशी गोड खाऊ देतात. तेव्हा मी सगळ्यांत लहान असल्याने कैद्यांसकट सगळेजण माझे लाड करायचे. कैद्यांना मिळालेल्या खाऊतला थोडा खाऊ ते माझ्यासाठी काढून ठेवायचे. तो सगळा खाऊ काही मी खाऊ शकत नसे. मग उरलेला घरी नेत असे. माझा भाऊ मयूर कधीकधी तो खायचा. पुढे येरवडा जेलमध्ये सुरु असलेलं शूटिंग संपलं आणि मी घरी खाऊ नेईनाशी झाले. एक दिवस आठवण झाल्यावर मयूरनं मला विचारलं, "ताई, तू जेलमध्ये कधी जाणार? तू जेलमध्ये जा, म्हणजे मला खाऊ मिळेल". हे ऐकून घरी खूप हशा पिकला.

’मानो या ना मानो’ या ’स्टार वन’वरच्या मालिकेचे बरेच भाग मी चित्रित केले. एका प्रसंगात रात्रीचे चित्रीकरण होते. बराच प्रयत्न करूनही हवा तो परिणाम साधता येत नव्हता. शेवटी गाडीचे दिवे लावून झाडाच्या फांद्या तसेच पारंब्यांचा आडोसा करून, अंधूक प्रकाशातला हवा तो परिणाम मिळाला. अशा प्रसंगांमधून शिकायलाही खूप मिळतं.

स्वप्ना, तुला तुझ्या क्षेत्रातला जोडीदार मिळाला तर तुम्हांला व्यावसायिक दृष्टीनं त्याचा फायदा होतो का? की कधीकधी त्रासच होतो?

एका प्रोजेक्टवर काम करत असताना मिनालची आणि माझी ओळख आणि मैत्री झाली. त्याच्या घरचं वातावरण कलाक्षेत्रात काम करण्यासाठी पोषक आहे. मिनालच्या परिवारात मूर्तिकार, चित्रकार, गायक, वादक, अभिनेते अशी वेगवेगळ्या कलाक्षेत्रांत नैपुण्य मिळवलेली मंडळी आहेत. घरातच इतके कलाकार असल्याने कलेला विरोध होण्याचा प्रश्नच नव्हता. मिनालने अर्थशास्त्रात बीए केलं होतं आणि मग एमबीए केलं.

तो कॉलेजमध्ये पुरुषोत्तम करंडक, फिरोदिया करंडक वगैरे स्पर्धांमध्ये भाग घेत असे. तो उत्तम गिटारवादक आहे. तो नियमितपणे ट्रेकिंगला जात असे. तसंच तो 'Behavioural Consultant' आहे. अनुभवातून शिक्षण घेऊन वागण्याबोलण्याच्या पद्धतीत सुधारणा करण्यासाठी हे तंत्र वापरतात. त्याने 'Management Consultant' म्हणून काम केले आहे आणि त्याच्या अनुभवामुळे आम्ही नोकिया, हच, टाटा बीपी सोलार, बजाज अलायन्झ अशा ग्राहकांसाठी ट्रेनिंग फिल्म्स्‌ बनवू शकलो. मी 'Contemporary media and aesthetics' या विषयावरच्या पीएचडीसाठी तयारी करत आहे आणि त्यात मला मिनालच्या अनुभवाचा नक्कीच फायदा होतो. आता तर तो दिग्दर्शन करतो, त्यामुळे आम्ही बर्‍याचदा एकत्र काम करतो. ऑगस्ट २०००मध्ये मी आणि मिनालनी 'Filmsmiths' हे स्वतःचं प्रॉडक्शन हाऊस सुरु केलं. आम्ही केलेली पहिली फिल्म कॉर्पोरेट फिल्म होती आणि ती इंडोनेशिया, आफ्रिका इथे खूप गाजली आणि गौरवली गेली. त्यानंतर आम्ही 'Marketing Spectacular Presentations' हा लघुपट बनवला आणि त्याला भारतात उत्तम प्रतिसाद मिळाला. पुढे आम्ही बर्‍याच जाहिरातींसाठीही काम केलं. मिनाल आणि मी एकाच क्षेत्रात असण्याचा नक्कीच खूप फायदा होतो. आम्ही दोघं व्यावसायिक आघाडीवर एक चांगली टीम आहोत तर वैयक्तिक आयुष्यात आमचे सूर उत्तम जुळतात. तसंच आम्ही एकमेकांना पूरक आहोत.

चित्रपटाचं/लघुपटाचं चित्रीकरण करणं आणि जाहिरातीचं चित्रीकरण करणं यात नक्की काय फरक असतो?

जाहिरात चित्रित करणं, हे खूपच वेगळं प्रकरण आहे. जाहिरातीची संपूर्ण निर्मितीप्रक्रियाच भिन्न आहे. नेमक्या शब्दांत, मोजक्या दृश्यांत आणि काही सेकंदांत एखाद्या वस्तूबद्दल प्रेक्षकांच्या मनात कुतुहल / आकर्षण निर्माण करायचं असतं; त्याचे फायदे, चांगल्या बाजू गळी उतरवायच्या असतात आणि ती वस्तू विकत घ्यायची इच्छा जागृत करायची असते. त्यामुळे जाहिरातीचं अगदी काटेकोर नियोजन करावं लागतं. कलाकारांचा तसेच आमचाही पूर्ण कस लागतो. शिवाय कमी वेळ असूनही सगळ्या प्रकारच्या कलाकारांची, तंत्रज्ञांची फौज लागतेच. कधीकधी अगदी दहा-दहा दिवस चित्रीकरण करून केवळ साठ सेकंदांची पण उत्तम प्रतीची जाहिरात बनते. आणि अर्थातच हे एकट्यादुकट्याचं काम नाही. संपूर्ण टीमचे एकत्रित कष्ट यातही असतातच.

तुम्ही स्वतःचा स्टुडिओसुद्धा सुरू केला आहे, त्यासंदर्भातली माहिती जाणून घ्यायला आवडेल.

मिनालची आणि माझी कामाची पद्धत सारखीच असल्यानं आणि ’उत्तम तेच द्यायचं’ हे ब्रीद असल्यानं या क्षेत्रात काहीतरी करू, असा विचार करून शेवटी काही सहकार्‍यांसोबत आम्ही एवढी मोठी उडी घेतली. २००८ साली अंधेरीत आम्ही आमचा स्टुडिओ सुरू केला. आमचा स्टुडिओ हा एक 'पोस्ट प्रॉडक्शन स्टुडिओ' आहे. म्हणजे चित्रीकरण करून झाल्यानंतर त्याचं संकलन करून ­फायनल कॉपी बनवण्याचं काम आमच्या स्टुडिओत केलं जातं. एडिटिंग इज ऑल्सो अ‍ॅन आर्ट. चित्रीकरण करताना टिपलेले प्रसंग प्रेक्षकांपर्यंत व्यवस्थित पोहोचवण्यासाठी योग्यप्रकारे केलेलं संकलन अतिशय महत्त्वाचं असतं.

आमच्या स्टुडिओत मेड इन चायना, जिंकी रं जिंकी, तुझ्या माझ्यात, इत्यादी चित्रपट, तसेच कुलस्वामिनी, Heavy Petting आणि इतर काही झी मराठी, स्टार प्लस, स्टार प्रवाह, दूरदर्शन वगैरे वाहिन्यांवर प्रसारित होणार्‍या मालिका आणि बर्‍याच जाहिरातींवर काम झालं आहे.

छायाचित्रणाच्या या क्षेत्रात महिलांचा सहभाग किती? तो वाढतो आहे का? तुझ्याव्यतिरिक्त अजून कितीजणी या क्षेत्रात आहेत? तसंच एक महिला म्हणून या क्षेत्रात काम करताना काही अडचणी जाणवतात का?

खरं सांगायचं तर या क्षेत्रात महिलांचा सहभाग फारच कमी आहे. संपूर्ण भारतात मिळूनही जेमतेम हाताच्या बोटावर मोजण्याइतक्या महिला या क्षेत्रात आहेत. काहीजणी कॅमेरावर्कची सुरुवात करतात. परंतु नंतर कौटुंबिक जबाबदार्‍यांमुळे हे काम सोडून देतात. काहीजणींचं नंतर प्राधान्यक्षेत्रच बदलतं. अडचणींचं म्हणाल तर, इतर क्षेत्रांमध्ये महिलांना जे बरेवाईट अनुभव येतात, ते इथेही थोड्याफार प्रमाणात का होईना येतातच. पण शेवटी आपला निर्धार पक्का असला की, या सगळ्यांमधून मार्ग निघतोच आणि मुख्य म्हणजे प्राधान्यक्रम ठरलेला असेल तर या क्षेत्रात टिकून राहता येतं आणि बरंच काही करता येतं, जे बर्‍याचजणींच्या बाबतीत शक्य होत नाही आणि मग एक-दोन फिल्म्स्‌नंतर या मुली गायब होतात.

स्वप्ना, हा सगळा व्याप सांभाळून तू लिहितेस, भाषांतराची कामं करतेस, व्हिजिटिंग लेक्चरर म्हणून काम करतेस, त्याबद्दल अधिक जाणून घ्यायला आवडेल.

मी दर महिन्याला निघणार्‍या 'व्यक्त अव्यक्त' या मासिकाची क्रिएटिव्ह डायरेक्टर होते. मी संगीतविषयक लिखाण करते, तसेच सिनेमाविषयी काही मासिकांमध्ये लिखाणसुद्धा करते. ब्रिटिश सरकारच्या काळात शेतकर्‍यांवर जे अन्याय होत होते त्याबद्दल लोकमान्य टिळक 'केसरी' वृत्तपत्रात अग्रलेख लिहीत असत. स्वातंत्र्य मिळून आज इतकी वर्षं झाली तरी शेतकर्‍यांच्या परिस्थितीत फारसा फरक पडलेला नाही. या प्रश्नाला कुठेतरी वाचा फोडण्यासाठी टिळक महाराष्ट्र विद्यापीठातर्फे हे अग्रलेख 'Lokamanya Tilak's Economic Thought' या नावाने पुस्तकरुपात प्रसिद्ध झाले. या उपक्रमात मी लोकमान्य टिळकांचं लिखाण भाषांतरित करण्याचं काम केलं होतं. पुण्यातल्या ’महिंद्रा युनायटेड वर्ल्ड कॉलेज अँड फ्रेमवर्क अ‍ॅकॅडमी’ आणि इतर काही संस्थांमध्ये 'कॅमेरावर्क' या विषयासाठी व्हिजिटिंग लेक्चरर म्हणून जाते.

सध्या तुमचे चालू असलेले किंवा भविष्यातले उपक्रम कोणते?

सध्या आम्ही एका फिल्मवर काम करत आहोत. तिचं चित्रीकरण डिसेंबरमध्ये सुरू होईल. याशिवाय काही हिंदी चित्रपट तसंच मालिकांवर काम करायचं आहे. भविष्यात अश्या योजनाही आहेत की, ज्यामध्ये संपूर्ण चित्रपट किंवा मालिका ही आमची निर्मिती असेल. हे काम खूपच मोठं असणार आहे. त्यात बरेच लोक सहभागी असणार आहेत. त्यामुळे त्याची तयारी सुरू आहे.

सध्या मराठी चित्रपटसृष्टीचा चांगला काळ चालू आहे. वेगवेगळ्या विषयांवरचे चित्रपट येत आहेत, प्रेक्षकांकडूनही विषयातल्या वैविध्याला मागणी आहे. आमच्याकडेही काही चांगल्या कथा आहेत, ज्यांवर काम करायचं आहे.

चित्रपटसृष्टीविषयी माहिती देणारे माझे काही लेख मासिकांमधून प्रसिद्ध झाले होते. त्याविषयावर मी पुढे काम सुरू ठेवलं होतं आणि आता ते 'चलचित्रकथा' या नावाने पुस्तकरुपात प्रकाशित होणार आहे. बरेचजण चित्रपट आवडीनं बघतात, पण चित्रपट घडण्यामागे नक्की काय काय गोष्टी असतात, याची कुणाला माहिती नसते. या पुस्तकात सामान्य माणसाला चित्रपटसृष्टीच्या विविध अंगांची माहिती देण्याचा प्रयत्न मी करत आहे.

करियरसाठी छायाचित्रणकाराची ही सर्वस्वी वेगळी वाट जोपासल्यावर आज कसं वाटतं आहे? तसंच, तुझ्या एकूण अनुभवांवरून आज चित्रपटसृष्टीत प्रवेश करणार्‍या नवीन मंडळींना तू काय सांगशील?

कॅमेरावर्कचं हे क्षेत्र हे आजही पुरुषप्रधान आहे. त्यामुळे कामाची सुरुवात करताना या तांत्रिक तसेच चित्रीकरणाच्या दृष्टीने निर्णायक स्थानी एक स्त्री आहे, ही गोष्ट पचायला काही जणांना थोडी जड गेली. मागे मी American Cinematography Society (ACS) निर्मित Women in Cinema नावाची फिल्म पाहिली होती. त्यात कॅमेरावर्कच्या क्षेत्रात काम करणार्‍या अमेरिकन महिलांना आलेले अनुभव दाखवले होते. अमेरिकेसारख्या ठिकाणीही कॅमेरावर्क करणार्‍या एखाद्या महिलेला अजिबात प्रोत्साहन मिळत नसे आणि त्यांना ACSचं सभासदत्वही सहजासहजी मिळत नसे. त्यांच्या मानानं माझी परिस्थिती खूपच चांगली होती. उलट मी लहान असल्यानं आणि वेगळं काहीतरी करत असल्यानं माझं बरंच कौतुक झालं होतं. आज मी माझ्या या क्षेत्राच्या निवडीबद्दल पूर्णपणे समाधानी आहे आणि बर्‍याचदा मी या क्षेत्रात आले नसते तर काय केलं असतं, असा प्रश्न मला पडतो.

येणार्‍या नवीन मंडळींना सांगायचं म्हणजे आपल्याला काय करायचंय हे एकदा मनाशी पक्कं ठरवा, आपले प्राधान्यक्रम ठरवा आणि मग घेतला वसा टाकू नका. चित्रपटसृष्टीत अनेक निर्मात्यांचा पैसा, अनेकांचे श्रम गुंतलेले असतात. त्यामुळे आपली जबाबदारी ओळखून काम करत रहा. चांगलं काम केलं की, प्रसिद्धी मिळते, प्रसिद्धी मिळाली की, अधिक काम मिळतं आणि हे चक्र सुरूच राहतं. त्यामुळे काम करत राहणं आणि ते उत्तमप्रकारे करणं, हे सर्वांत महत्त्वाचं.

वेगळं काहीतरी करून दाखवण्याची इच्छा असणार्‍या सगळ्यांना स्वप्नाचं उदाहरणं नक्कीच प्रेरणादायी ठरेल.
स्वप्ना आणि मिनालला त्यांच्या आगामी योजनांसाठी शुभेच्छा देऊन मी त्यांचा निरोप घेतला.

-----------------

- नीला सहस्रबुद्धे
शब्दांकन साहाय्य : पराग सहस्रबुद्धे