"हा
य! आज ऑनलाईन..? अभीची नाईट शिफ्ट आहे वाटतं! ;-)"
आज जरा कुठे एफबी वर फोटो अपलोड करायला आले तर तेवढ्यातल्या तेवढ्यात स्मिने पिंग करत विचारलंच.
"अगं बाई फोटो अपलोड करायला आलेय इथे. लास्ट मंथच्या ट्रेकचे. बघा आणि लाईक करा".
"गाणी पण ऐकतेय 'अभीज कलेक्शन'", मी रिप्लाय टाईप करून पुन्हा कामाला लागले.
तेवढयात तिचा रिप्लाय आला, "मी मिऽऽऽऽऽऽऽस करतेय :भ्याऽऽऽऽ: बाय द वे कुठे गेला होतात? आपला ग्रूप?"
"पेबला. माझ्या ऑफिसचा ग्रूप. सु होती आम्हा दोघांबरोबर "
"सु आपली सु? सुदिप्ता?" तिने चकित होऊन विचारलं.
"दुसरी कोण सु आहे इथे?" मी म्हटलं खरं पण तिला आश्चर्य वाटणंही स्वाभाविकच आहे म्हणा. सुदिप्ता तशी कमीच असते आजकाल आमच्यात. एकतर ग्रूपमध्ये ती सोडली तर बाकी सारे संसारी जीव. एकत्र भेटल्यावर थोड्याच वेळात गप्पा संसार ट्रॅकवर घसरतात आणि ती एकटी पडते. तिने विषय बदला, बोअर झाले म्हणून तगादा लावलाच तरी कोणी ना कोणी तिला मस्करी मस्करीत ऐकवतंच "मग कर लग्न नि ये आमच्या ब्रिगेडमध्ये तू पण".
"ऐक ना मनु, मी येतेय तिथे नेक्स्ट वीक" स्मि उत्साहात म्हणाली.
"वॉव! धऽऽम्माल मग :-)" मी पण एक पिवळी स्मायली देत म्हटलं तिला.
"आल्यावर एक ट्रेक मेरे नाम.... भूलना नही. आणि बाकी गँगला पण सांग. चल, सी या, जीएन."
"या. बाय जी एन".
"वेट वेट, आदिती जग्या कसे आहेत? एनी कॉन्टॅक्ट? ते दोघे येतील मी आल्यावर?"
आता यावर मी काय उत्तर देणार? गेल्या महिन्यात फ्लॉप गेलेलं आमचं गेट टुगेदर तरळलं डोळयासमोर माझ्या. हे सगळं इथे असं चॅट विंडोवर सांगणं अशक्यच होतं म्हणून मग "काय माहित?" एवढंच उत्तर देऊन गप्प बसले मी.
"काय झालं काय नेमकं त्यांच्यात? तू जास्त क्लोज होतीस ना आदितीशी, तुला काही कल्पना?"
"ना डिअर, काही फॅमिली इश्यूज, काही त्यांच्यातले इश्यूज..." मी पुन्हा एक व्हेग रिप्लाय दिला.
"फॅमिली इश्युज तर काय असतातच. व्हॉट अ बिग डील देन?" सगळ्या शंका फिटल्या शिवाय ती काही गप्प बसणार नव्हती.
"नात्यांबरोबर नात्यांचा चष्मा फ्री मिळत असेल मग.." बॅकग्राऊंडला 'वो भूली दास्ताँऽऽ' लागलं होतं ते
कानाआड करायचा प्रयत्न करत मी उगाचच विषयाला लाईट मोड देण्याचा प्रयत्न केला.
"हम्म! असेल बॉ तसंच. पणऽऽ तुला आठवतं ती किती परफेक्ट जोडी होती कॉलेजमधली!" स्मिने मला खोल डोहात ढकलायचाच चंग बांधलेला बहुतेक.
अभीला व्हॉल्यूम कमी करायला सांगूनही गाणं मनात वाजतच राहिलं. मनाचा वेग सगळ्यात जास्त असतो म्हणतात, खरंय. एका क्षणात त्याने मला कॉलेजमधे नेऊन सोडलं.
कॉलेजच्या नोटीस बोर्डवर "स्वयंसेवक पाहिजेत" अशी मवामची म्हणजेच मराठी वाङमय मंडळाची सूचना झळकली आणि शाळेतल्या सगळ्यात भाग घेऊन बघण्याच्या सवयीने हळूच डोकं वर काढलं. 'अनोळखी वातावरणात निभाव लागेल का आपला?' ह्या मनातल्या शंकेवर मात करत संपर्कासाठीच्या नावांची वहीत नोंद झाली आणि तिथेच ह्या जोडगोळीशीही गाठ बांधली गेली.
तसे ते दोघे मला सिनिअर. मवामचे खंदे कार्यकर्ते वगैरे वगैरे. जग्या तेव्हा माझ्यासाठी जगदीश होता, डोळ्यात मिष्कील पण एक फ्लर्टी झाक असलेला. फ्लर्ट करणारी, उगाचच स्त्रीदाक्षिण्य दाखवणारी माणसं मला अजिबातच आवडत नाहीत. तसाच तोही आधी नव्हताच आवडला. आदिती मात्र पहिल्या प्रथम बघता क्षणीच तिच्या प्रामाणिक आश्वासक नजरेमुळे जवळची वाटलेली. त्याच्या बरोबर आदिती म्हणजे तर महद् आश्चर्यच वाटलेलं तेव्हा.
कार्यक्रमाच्या निमित्ताने भेट होत गेली आणि सदैव मदतीसाठी तत्पर असलेला, सगळ्या टीमची काळजी वाहणारा, ताण कमी करायला मस्कर्या, विनोद करणारा जग्या दिसला आणि फ्लर्ट करणार्या जग्याच्या ह्या पैलूचाही परिचय झाला.
हे असले कार्यक्रम, त्यांची तयारी ह्याची आवड खरं तर आदितीला जास्त. जग्याचा पिंड पिकनिक, कॉलेज कट्टा, कॅंटिनमध्ये रमणारा. पण कॉलेजमध्ये मिळणारा वेळ पूर्णपणे आदितीबरोबर राहायला मिळावं म्हणून ह्या सगळ्यात गुंतवून घेणारा जग्या, आदितीला छोटे मोठे सरप्रायझेस देणारा जग्या रोमॅन्टिकपणाची हद्द वाटायला लागला.
त्यानंतर कधीच त्यांच्या जोडीविषयी प्रश्न पडले नाहीत.
"आहेस का अजून?" स्मिचा प्रश्न दुसर्यांदा फ्लॅश झाला आणि मन पुन्हा एकदा वर्तमानात लॅन्ड झालं.
"आहे गं इथेच. बोल!" मी आपला एक जुजबी रिप्लाय दिला.
"जग्या आदिती विषयी बोलत होते मी. कॉलेज मधे एकदम मेड फॉर इच अदर कपल म्हणायचे ना त्यांना" तिने पुन्हा एकदा जुनी तार छेडली.
पण मी हट्टाने वर्तमानात राहत तिला म्हटलं, "एकमेकांना मायनस करुन जगायला शिकलेत आता ते स्मि."
"मला एक सांग काउंसेलरकडे का नाही गेले गं दोघे?" ती काही विषय सोडायला तयार नव्हती
"होऊन गेलेय गोष्ट आता स्मि" मी विषय संपवायच्या दृष्टीने म्हटलं.
"अभीबरोबर राहून एकदम प्रॅक्टिकल झालीस की ग बयो तू ही." तिने जरी नुसतच वाक्य टाईप केलं असलं तरी मला हे लिहिताना हलकासा सुस्कारा सोडून एक भुवई उंचावून हे वाक्य टाईप करणारी स्मि आली डोळ्यांपुढे.
"मी असायला हवे होते गं तेव्हा तिथे" तिने दु:खी स्मायली न देता टाईप केलं असलं हे वाक्य, तरी ते तिच्या आवाजातल्या हेलासगट, तिच्या मनात होणार्या तगमगीसगट माझ्या डोळ्यांना जाणवलं... कानात वाजलं अक्षरश:...
पण आता असं चॅटिंग करताना हिला काय सांगणार. चॅटिंगच्या विंडोमधे मावेल अशी थोडीच ही कहाणी होती.
आदिती आणि जग्या दोघांनी निर्णय घेतला तेव्हा घरी सांगायच्याही आधी आमच्याशी शेअर केलं होतं. ह्या इथेच आमच्याचं घरी बसून दोघांनी शांतपणे वेगळं व्हायचा निर्णय सांगितला होता. देअर इज नो स्पेसिफिक रिझन बिहाइंड इट पण अडकल्यासारखं होतंय म्हणाले नात्यात. वी आर बेस्ट ऍज फ्रेंड्स, गुड ऍज लव्हर्स पण नॉट फिट फॉर हजबंड वाईफ रोल टुगेदर. ह्या एका वाक्यात सारं आलंय म्हणाले.
अरे ताण तणाव, वाद तर प्रत्येकाचेच होतात की? त्यासाठी एवढा टोकाचा निर्णय? माझ्या प्रश्नावर "वी अल्सो डिड अवर बेस्ट" असं म्हणाले दोघेही.
दोघांच्याही घरच्यांमुळे वाद होतात म्हणून आम्ही दोघांनी एकत्र कुटुंबातून बाहेर पडून स्वतंत्र राहूनही बघितलं पण तरिही गोष्टी बिनसत गेल्या. स्वत:च्या अपेक्षा पूर्ण करायच्या की एकमेकांच्या करता अपेक्षा मारत रहायच्या हे ठरवतानाच दकछाक होतेय आमची. आहे ते वेगळे झालो तर निदान चांगले मित्र तरी बनून राहू एकमेकांचे. एक दिवस ह्या कडवटपणात सगळ्या चांगल्याचीही राख व्हायची, असं म्हणून मलाच गप्प केलं त्याने.
आम्ही आधी खूप वकिली केली विवाह संस्था इ. इ. ची, पण जग्या माझ्या पेक्षा जास्त चांगला वकील निघाला. मला म्हणे, "तुला तर लग्नच करायचं नव्हतं. अभी तुला आवडायचा तरी तू लग्नाला हो तेव्हाच म्हणालीस जेव्हा तुझ्या मनाने शंभर टक्के कौल दिला. मनाचा कौल महत्त्वाचा असं तूच ना सांगायचीस आम्हाला" म्हणत माझेच शब्द माझ्यावरच उलटवले.
त्याही आधी कधीतरी आदिती तिच्या अनाथालयातल्या कामामधे खूप जास्त इन्व्हॉल्व होते, इतकी की तिला एक घर आहे, नवरा आहे, कुटुंब आहे, हे ही विसरते म्हणून तक्रार घेऊन आलेला जग्या.
कधीतरी आदितीही वैतागून म्हणाली होती "किती किती अपेक्षा? समोरचा माणूस आहे मशीन नाही."
त्याच्या, घरच्यांच्या, इतरांच्या, स्वत:च्या... सगळ्यांच्याच अपेक्षांना पुरे पडताना गळून गेली की एक इमेल असायचीच तिची, हा सगळा वैताग ओकून टाकणारी. सुरुवातीला महिन्या दोन महिन्यातून एकदा, मग दर आठवड्याला.
"अपेक्षांशिवाय काय असतं आदिती? कोणी अपेक्षा ठेवू नयेत ही पण आपली एक अपेक्षाच झाली ना? कोणी काय करावं? अपेक्षा ठेवाव्यात का ठेवू नयेत, गृहित धरावं का धरु नये हे आपल्या हातात थोडीच असतं. अपेक्षा पूर्ण करण्याचं कंपल्शन तू का करतेस स्वत:ला?" अशाच एका इमेलला रिप्लाय देताना मी तिला लिहिलं होतं.
"आम्ही आता स्वतंत्र रहातोय तरी वाद होतायतच आमचे, अभी. सरळ चालू असलेलं रोजचं संभाषण पण कधी भलतं वळण घेतं नि भडका उडतो. नेमकं काय चुकतंय तेच कळत नाही" जग्या म्हणाला होता एका भेटीत.
एक ना अनेक प्रसंग.. अनेक आठवणी ... करोगे याद तो हर बात याद आएगी.. म्हणत लड उसवतच जाते. आता ह्यातलं नेमकं काय काय सांगायचं हिला असं इथे चॅटींग करताना?
"हॅऽऽलोऽऽ आहेस का?" तिचा पुन्हा वर्तमानात आणणारा प्रश्न आला.
"स्मि, होऊन गेलेय गोष्ट आता. त्यावर चर्चा शक्यतो नकोच अशी इथे. भेटल्यावर बोलूच." म्हणत मी समारोपाचं लिहून टाकलं.
"ह्म्म! ओके! बरोबर आहे तुझंही. चल हा विषय वाढत गेला की सुचत नाही काही. डोकं दुखत राहतं नुसतं. रात्रही बरीच झालेय. सी या जी एन टि सी" विषय इथे मांडायची माझी असमर्थता ओळखत ती म्हणाली.
"या बाय जी एन" म्हणत मी ही चॅट विंडो क्लोज केली तरी मन काही वर्तमानात रहायला तयार नव्हतं ते कधीच हरवून गेलेलं त्या जुन्या गल्ल्यांमधे..
आमची गॅंग.. सुदिप्ता (ड्रीमगर्ल), स्मि (साईंटिस्ट), अभी (घनचक्कर) , मी (हटेली काजल भाय), जग्या (फ्लर्टी), दिप्या (राज्जा), अदिती (मॅनेजर) आणि राणी (राणी). स्मि, दिप्या, राणी, आणि मी समवयस्क, आदिती आणि जग्या आम्हाला सिनिअर तर अभी आणि सुदिप्ता आमच्या नंतरच्या बॅचचे. मराठी वाङमय मंडळ म्हणजेच मवामच्यामुळे आमच्या ओळखी झाल्या, मैत्री झाली आणि मस्त पैकी एक घट्ट ग्रूप बघता बघता जमून गेला.
दिप्याच्या प्रेमात पडली म्हणून खरंतर राणी आमच्या ग्रूपमध्ये ओढली गेली. दिप्याला खूष ठेवणं, त्याच्या आवडीनिवडी प्रमाणे स्वत:ला मोल्ड करणं, हे ध्येय असल्यासारखी वागायची ती कधी कधी.
तशी होती लाघवी पण तो सोडून जाईल की काय ह्या इन्सिक्युरिटीने इतकी घेरली होती ती की सुरुवातीला आमच्या ग्रूपमधल्या मुलींकडे अगदी संशयाने बघायची. नंतर जशी मैत्री घट्ट होत गेली आमची तशी आमच्यातलीच एक झाली आणि मग निदान आमच्या बाबतीत तरी ही संशयाची धार बोथट झाली.
पण तोपर्यंत, ऊफ्फ! दिप्याशी बोलणं नको असं वाटायचं.
दिप्यावर छोट्या छोट्या गोष्टींकरता इतकी अवलंबून रहायची की वाटायचं की दिप्या नसेल एखादवेळी जवळ तर ही मुलगी एकटी स्वत: काही एक ठरवून चार पावलं तरी चालू शकेल का?
कोणासाठी तरी इतकं बदलणं, नात्यातली ही इन्सिक्युरिटी आणि प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टींसाठी दुसर्या कोणावर अवलंबून रहाणं हे सगळं जडच होतं समजायला मला. एकतर मी आमच्या ग्रूपमधली 'भाय' अगदी त्या हम पाच मधली काजल भाय. कोणासाठी म्हणून नटणं, तयार होणं ये मेरे बस की बातच नाही.
मी, अभी, सुदिप्ता असेच एकदा कॅन्टीनमध्ये गप्पा मारत बसलेलो.
"अभी काय रे हे? हा शर्ट तुला सूट होतो, नो डाऊट अबाउट इट. एकदा दिली की कॉम्प्लिमेंट आम्ही पण म्हणून काय आठवड्याचे तीन दिवस तोच वापरायचा? आयला धुतोस बितोस का तसच डिओची अंघोळ घालतोस शर्टाला?" मी त्याला लिटररी पिडत होते.
"कोणासाठी तरी घालतो म्हणे तो. हो ना रे अभीऽऽ" सुदिप्ताच्या वाक्यावर कावरा बावरा झालेल्या अभीने तिला कोपराने ढोसून गप्प केलेलं मी बघितलं पण तेवढयात दिप्या राणी आमच्या बाजूने पास होत समोरच्या टेबलवर जाऊन बसलेले दिसले. तेव्हा तिचं संशयाचं भूत पुरतं निवलं नव्हतं म्हणून दिप्याने आम्हाला लांबूनच हात करुन नंतर येतो असं सांगितलं आणि पुन्हा मला आमचा काल चाललेला वाद आठवला.
मी म्हटलं पण अभीला "ही अशी काय रे वागते? संशय काय घेते? आणि दिसण्या रहाण्याच्या बाबतीत दिप्याला आवडतं म्हणून नि दिप्याला आवडत नाही म्हणून स्वत:ला बदलते. अरे, काय अर्थ आहे का दरवेळी याला? हिला काय स्वत:ची मतं बितं आहेत की नाही? आणि दिप्यापण तस्साच".
"प्रेमात पडलेत ते भाय. तुम नय समझोगी." अभी म्हणाला होता तेव्हा.
"हे असलं प्रेम? बरंय मी नाही पडले कोणाच्या प्रेमात ते. तसही माझ्याही प्रेमात कोणी पडायची शक्यताच नाही. काय सु खरं ना?" मी सुदिप्ताला टाळी मागत विचारलं.
"पडलं तरी बोलायची हिम्मत आहे काय कोणाची ह्या हिटलर पुढे?" अभी टोमणा मारत होता की मस्करी करत होता कळलंच नाही.
सुदिप्ताने लग्गेच त्याच्या ह्या वाक्यावर टाळी देत पाठिंबा दर्शवत मला एकटं पाडलं म्हणून दोघांचाही राग आलेला थोडा. पण अगदीच थोडावेळ. तसा अभीवरचा राग फार काळ टिकूच शकत नाही असा आजवरचा अनुभव आहे माझा. दिप्यासारखा पुरुषी इगो नाहीये त्याला की जग्यासारखं फ्लर्ट करणं नाहीये स्वभावात त्याच्या. आणि मुख्य म्हणजे मुद्दाम मुलगी आहे समोर मग मुलगा म्हणून तिला मदत केलीच पाहिजे हा आव नाही की मुलींकडून एखाद्या गोष्टीत मदत घेण्यात कमीपणा वाटणं नाही. हाच त्याचा स्वभाव तर मला नेहमी आवडायचा.
‘प्लेन जेन’ म्हणून पहिले अभीच माझी मस्करी करायचा. त्यानेच मला हटेली, काजल भाय, हिटलर अशी नावं बहाल केलेली. म्हणून मी त्याला घनचक्कर म्हणायचे. तर साहेबाने सगळ्यांना स्वत:ची ओळखच "घनचक्कर" अशी करुन द्यायला सुरुवात केलेली.
"छान दिसतात मोकळे केस तुला" असं अभी एक दिवस अचानक बोलून गेला आणि का कोण जाणे रोज निघताना आरशात केस मोकळे सोडून त्या वाक्याची मनात उजळणी करण्यात दिवसाचा काही काळ जायला लागला.
कधी तरी बोलताना ऐकलं होतं त्याच्याकडून "ए भाय ये कलर सूट होता है तेरेपे" म्हणून सारी डे ला आईच्या साड्यांपैकी शोधून शोधून त्या रंगाची साडी नेसून केस मोकळे सोडून कॉलेजात जातानाही आधी कळलंच नव्हतं "आपण प्रेमात पडलोय त्याच्या!"
दिप्याच्या आवडी निवडी लक्षात ठेवून तसं वागणारी राणी अगदीच अनाकलनीय वाटेनाशी झाली मग.
माझ्यातले हे बदल सर्वात आधी कळले ते आदितीला. अभी म्हणे घाबरायचा मला. "न जाणो ह्या मुक्तीवाल्या भाय ने फेकून बिकून मारलं म्हणजे काही! म्हणून मग मला आणि आदितीला पुढाकार घ्यावा लागला आणि जमवून आणावं लागलं सगळं" असं जग्या मला अजूनही ऐकवत असतो.
सुदिप्ता आमची ड्रिमगर्ल. सतत स्वप्नांमधे मश्गुल. परिकथेत वाचल्याप्रमाणे कोणीतरी "राजकुमार" येईल नि घोड्यावर बसवून ह्या राजकुमारीला घेऊन जाईल अशा टाईपाची स्वप्न बघणारी आमची ड्रिमगर्ल. वडील गेल्यापासून तिच्या आईची पूर्ण वेळ केअर टेकर झालीये. हुंडा म्हणून मी आईला घेऊन येईन नाहीतर तू इथे येऊन रहा असं समोरच्या स्थळांना सांगितल्यामुळे अजूनही अविवाहितच आणि दिवसेंदिवस ह्या अरेंज मॅरेज प्रकारालाच वैतागून एकटीच रहाण्याची प्रतिज्ञा करण्याच्या बेतात आहे.
मस्त पगाराची नोकरी आहे, स्वत:ची चारचाकी गाडीही स्वकमाईवर घेण्याइतकी धमक आहे. पण तरीही कधी गेलोच तिच्या घरी की तिच्या आईच्या चेहर्यावर स्पष्ट वाचता येणारी काळजी घरभर भरुन राहिलेली आहे ती आहेच.
ह्या बाबतीत बोलायचीही चोरीच. काकू म्हणणार "तुम्ही लग्न करुन सुखात आहात गं आपापल्या संसारात. तुमच्या आईला विचारा माझी काळजी."
मग आमची बोलती बंद यापुढे. "आजूबाजूच्या सगळ्या मुलींची लग्न होताना बघायचं वर हसून साजरं करायचं. माझ्या नंतर काय होईल? तुमच्या जबाबदार्या वाढल्या की ही एकटी नाही का पडायची? ह्या विचाराने झोप येत नाही आणि तू म्हणतेस काळजी का करता काकू?" ह्या त्यांच्या प्रश्नावर त्यांचं समाधान होईल असं उत्तर कुठे होतं माझ्याकडे?
"तडजोडी शिवाय आयुष्य नाही बघा, तुम्हाला समजेल तेव्हा समजेल" काकू एकदा म्हणाल्या होत्या.
पण तडजोड करायची म्हणजे कशात? किती आणि कोणी? तडजोड केली तरी ती वर्थ आहे का? असेल तर किती? हे नाही ना चटकन ठरवता येत असं.
एव्हरिथिंग कम्स विथ अ प्राईस टॅग. कुठेतरी वाचलेलं इतक्या तीव्रतेने आत्ता आत्ता उमगायला लागलंय.
स्मिमुळे हे सगळं परत एकदा आठवलं आज. ही स्मि, आमची स्मिता, आमच्यातली सगळ्यात जास्त अभ्यासू मैत्रिण. माझी शाळूसोबतीण म्हणून माझ्याबरोबर ग्रूपमध्येही ओढली गेलेली. सगळ्यात जास्त इमोशनल किडा आणि एखाद्या गोष्टीच्या मुळापर्यंत जाऊन समाधान होईपर्यंत शोध घेत रहाणारी आमची "साइंटिस्ट" आता गेली लग्न करुन नॉयडाला.
तिथे बसून पण इथली काळजी करत बसते वेडी. तिथून तिला काहीच करता येत नाही म्हणून हळहळत बसते. "मै कुछ तो कर लेती, हालात इतने ना बिगडने देती" असं त्या पागल इमोशनल बयेला वाटत रहातं.
खरंच असतं का असं आपल्या कोणाच्या हातात काही? बदलणं.. थोपवणं... घडवणं सगळंच..?
आमच्या गँगमधे आतल्या आत जमलेल्या जोड्या तीन. मी - अभी, जग्या - आदिती आणि दिप्या- राणी.
जग्या आणि आदितीचा दोन महिन्यांपूर्वीच डिव्होर्स झाला. टिल डेथ डू अस अपार्ट म्हणून काहीच वर्षं झाली नाहीत तोच त्यांच्या वाटा वेगळ्याही झाल्या.
तिकडे दिप्या राणीची कहाणीही "द फेमस सिलसिला" मोडवर आहे.
गेल्याच आठवड्यात बोलली ती माझ्याशी ह्याविषयी तेव्हा सुरुवातीला खूप जड गेलं स्वीकारणं सगळंच.
"तुम्ही लोक तरी असं नका गं बघू माझ्याकडे." तिने काकुळतीला येत म्हटलं होतं.
"तुला तर माहितेय की कॉलेज संपल्या संपल्या दिपू वडिलांच्या जागी नोकरीला लागला आणि माझ्या घरी कळल्या कळल्या लग्नाचा तगादा सुरु झाला. प्रेमात होतोच. घरुनही विरोध नव्हता, नोकरीही चांगली होती. मग काय केलं लगेच लग्न आम्ही. हा महिनोंमहिने फिरतीवर. सुरुवातीला गेले त्याच्याबरोबर पण मग अमोघनंतर एकाच ठिकाणी रहायचा निर्णय घेतला मी. घरातले नेहमीचेच इश्युज, अमोघचं आजारपण, माझी नोकरी ह्या सगळ्यात ह्याच्या फिरतीच्या नोकरीमुळे बर्याच आघाड्यांवर माझ्या एकटीची होणारी फरफट... ह्या सगळ्यात मला 'त्याचा' आधार वाटला.कळत नकळत जवळ येत गेलो आम्ही. खरंच तसा हेतू ठेवून कधीच... तिने शप्पथ घेत डोळ्यातलं पाणी अडवत मला सांगितलं होतं हे सगळं आणि अजून बरंच काही..."
"ह्यात दिप्याची काय चूक राणी?" मी प्रथमच दिप्याची कड घेऊन तिला विचारलं असेन तेव्हा.
"त्याची चूक आहे असं कुठे म्हणतेय मी? पण एखादी अशी बाई असू शकत नाही का जिला आधार हवासा वाटतो, कोणावर तरी समस्या सोपवून निर्धास्त व्हावसं वाटतं? मला एकटीने निभावून नेणं नाही जमलं, माझ्या स्वभावाचा दोष म्हण हवं तर. तुझ्यासारखी खंबीर नाहीये मी" तिने तिची बाजू माझ्यापाशी मोकळी केली होती.
त्या दोघांचा डिव्होर्स, ह्यांच्या नात्याचा हा असा तिढा हे सगळं बघून आत कुठे तरी एक वेगळीच भीती वाटायला लागलेय आजकाल. आणि म्हणे मी खंबीर! तिच्या हातावर थोपटताना मनात हे असलं काहीतरी येत होतं. ती मात्र माझ्या अशा थोपटण्याने सैलावल्यासारखी वाटली.
"दिपू परत आलाय आता इथेच, कायमचा. मला दिपू आवडतो ग, खरंच सांगते... पण मला ‘त्यालाही’ एकदम तोडता येत नाहीये असं. मी केला प्रयत्न तरीही", तीच पुढे म्हणाली.
पुढे काय विचार आहे? तर माहीत नाही म्हणाली. 'आज' मधेच जगतेय तेच तेवढं पुरे आहे म्हणाली.
दिप्याचं काय म्हणणं आहे विचारल्यावर खांदे उडवून दुसरी कडे बघितलं तिने.
म्हणजे? जग्या अदिती नंतर आता...?
अभीला आधीच कल्पना होती म्हणे पण मीच नेहमी ग्रूपमधल्या बायांच्या बाबतीत डिफेन्सिव्ह मोड मधे जायचे. ‘नजर सुधारा रे तुमची’ असं म्हणायचे म्हणून त्याने ह्या सिलसिला बद्दल मला अंधारात ठेवलं होतं असं त्याचं म्हणणं.
कित्ती आर्ग्युमेंटस केले होते तेव्हा मी अभीबरोबर...ह्या दोन्ही घटनांवरुन.
"असं का व्हावं अभी? सांग ना? नक्की प्रेम असतं? की असलेलं आटतं? की .. की नेमकं काय होतं असं?"
"माणूस तोच रहात नाही ना. सतरा वर्षांचा मी आणि तिशी पार केलेला मी कुठे एक आहोत? तू पण काय तशीच आहेस का जशी होतीस?" त्याने मलाच प्रश्न विचारुन गप्प केलेलं.
"अरे मान्य आहे माणूस बदलतो. आपणही बदललोय. पण म्हणून काय...." मला पुढचा प्रश्न पूर्ण करवेना.
"आपण कुठे वेगळे झालो.. असंच ना?" त्याने माझा गाळलेला प्रश्न पूर्ण केला तरीही "ह्म्म!" ह्या एका शब्दापलिकडे मला ते वाक्य उच्चारणही जड गेलं.
"हे का विसरतेस तू.. हाऽऽ.. हाऽऽ जो काही आहे तो त्यांचा त्यांनी घेतलेला निर्णय आहे. चूक असेल नाहीतर बरोबर असेल, पण त्याचा आता तरी आदर करायला हवा ना आपण?" त्याने मलाच विचारलं.
"पण अभी, इतके चांगले मित्र, इतकी चांगली जोडी, इतक्या वर्षांची सोबत...अशी फटक्यात कशी सोडता येते? ते ही दोघेही स्वभावाने इतके चांगले असताना? त्रास होतो रे मनाला पटवून घ्यायला"
"त्रास तर होतोच पण दुसरा इलाज नसेल तर उगाच फक्त टिकवून ठेवण्याचा अट्टाहास करायचा? मला तरी नाही पटत आणि वेगळं झाले म्हणजे त्यासाठी कोणी एक वाईट असावंच लागतं असं कुठे आहे. दोन व्यक्ती चांगल्या असल्या तरी एकमेकाला कॉम्प्लीमेंट करणार्या असतीलच असं नाही ना? चांगल्या नोटवर हे स्वीकारुन वेगळं होणंच योग्य, असं नाही का तुला वाटत?" दोन्ही हातांनी माझे खांदे धरुन माझ्या डोळ्यात बघत त्याने केलेल्या ह्या युक्तीवादावर माझ्याकडे उत्तर नव्हतं.
"उद्या आपल्याही बाबतीत.... ?" असा विचारायचा मोह झाला खरा पण त्याचं उत्तर "मे बी" असं आलं तर काय घ्या म्हणून मग विचारलंच नाही त्याला.
आठवणी लाटेसारख्या आपटतच रहातात एका मागून एक.... स्वत:ला जपत जपत किनार्यावरुन चालतानाही एखादी तरी जोराची लाट येते नि तुम्हाला भिजवून जातेच नेमकी.
फोटो अपलोड करायला आले नि स्मिमुळे ह्या सगळ्या विचारांमध्ये कधी अडकले कळलंच नाही.
"फोटो झाले का अपलोड करुन बाईसाहेब?" मला गदागदा हलवत अभीने वर्तमानात आणत विचारलं तेव्हा कळलं कितीवेळ नुसताच माऊस इकडून तिकडे करत बसलेय ते.
"बाईसाहेब, स्मिशी पुन्हा त्याच जुन्या विषयावर उजळणी झाली काय आज?" माझा पडलेला चेहरा नि गेलेला मूड बघून त्याने विचारलं.
अजून तरी चेहरा वाचता येतोय म्हणायचा एकमेकांचा!
"हो रे. स्मि विचारत होती, ती आल्यावर एक ट्रेक नाहीतर एक गेट टुगेदर करुयात का? बाकीचेही येतील का म्हणून?"
"सांग ना अभी?"
"अंम्म्म..."
"येतील का बाकीचे?"
"विचारुन बघूयात आपण. मलाही काही कळत नाहीये. तू बघितलंस ना गेल्या महिन्यात ट्रेक वरुन आल्यानंतर आपल्या घरी भेटायचं ठरवलेलं सगळ्यांनी. कल्पना जग्याचीच होती. जग्या आदिती दोघेही सुरुवातीला "वी आर कूल अबाऊट इट" असं दाखवत होते. पण कोणाच्याच गप्पा नेहमी सारख्या रंगत नव्हत्या. खूप कृत्रिम वाटत होतं सगळं."
"नाही म्हंटलं तरी अभीऽ कुठे तरी दुखावलेपण जाणवणारच ना?
"ह्म्म! खरंय. वाटलं होतं ते म्हणतायत ते बरोबर आहे. चांगल्या नोटवर वेगळं व्हायचं ठरवलंय दोघांनी. ठीक आहे. मित्र म्हणून चांगले राहूयात. पण सोप्पं नाहीये असं वागणं. असं प्रत्येक नातं वेगवेगळं करुन एकमेकांमधे गुंतू न देता जगणं... कठीण आहे. इतकं प्रॅक्टीकल तर मलाही नाही होता येणार कधी".
तो पटकन बोलून गेला खरा आणि वाटलं हा ही माझ्यासारखाच विचार करतोय तर.
"होईल सगळं नीट. वेळ जाऊ दे थोडा." आता हे मी त्याला समजावलं की स्वत:ला, काय माहित?
"स्मिला म्हणावं तूच फोन करुन बघ सगळ्यांना. पण प्लीज तिला म्हणावं सध्या तरी कोणताच अप्रिय विषय काढू नकोस. तुझ्या शंका समाधानासाठी आपण अजून एक कार्यक्रम ठरवू आपल्या तिघांत. ठीक?" त्याने मिष्कीलपणाचं पांघरुण घेत विषय हलका करायचा एक प्रयत्न करत म्हटलं.
दिप्याने राणीला तिचं फेसबूक अकाउंट बंद करायला लावलं. तिच्या प्रोफाईल मधल्या प्रत्येक मित्रावरुन तिला सतराशे दहावेळा प्रश्न विचारुन हैराण केलं आधी. ती काय अशी समोर येईल त्याच्या प्रेमात पडत असते की काय? सॅडिस्ट झाल्यासारखा वागतोय दिप्या.
ती काही त्याला फसवावं म्हणून नव्हती पडली दुसर्याच्या प्रेमात. तिला आवडतो दिप्या अजूनही. त्याचा विश्वास, प्रेम परत मिळवायला ती वाट्टेल ते करेल आता. असं वागून अजून वाढतील प्रॉब्लेम्स. अभीला सांगून बघितलं पाहीजे हे सारं. ऐकलं तर त्याचंच ऐकेल दिप्या कदाचित. पण आज नकोच तो विषय.
"फोन कुणाचा होता मगाशी?" मी विषय बदलायचं ठरवून म्हटलं.
"दिप्याचा.." दीर्घ श्वास घेऊन त्याने सांगितलं तेव्हाच समजलं विषय संपवणं माझ्या हातात नाहीये आता.
"काय झालं?" जग्या आदिती नंतर आता हे दोघे.. मनात ह्याची तयारी करुनच प्रश्न विचारला मी त्याला.
"नशेत बरळत होता झालं"
"काऽऽय पण?"
"राणीने विश्वासघात केला म्हणे त्याचा. आता रोज उठून तिचा चेहरा बघणंही सहन होत नाही..तिने हात जरी लावला तरी हात धुवून यावासा वाटतो मला. तरीही डिव्होर्स देणार नाही म्हणाला तिला "
"अमोघसाठी?" मी परत एकदा चाचपलं.
"तुला सांगतो अमोघचं कारण एक ढाल आहे दिप्याची. तो सगळं विसरुन वागू शकत नाही. तिला गिल्ट देण्यासाठीच तो वागतोय सगळं असं" अभी कधी नव्हे तो त्याच्यावर चिडून बोलत होता.
"तो ही दुखावला गेलाय अभी. पहिल्यापासून राणी त्याच्या मनाप्रमाणे वागायची. त्याचा आधार शोधायची. आवडायचं ते त्यालाही."
"तू दिप्याची बाजू घेतेयस?" त्याने चकित होऊन विचारलं.
"बाजू असं नाही रे. मला थोडं थोडं दोघांचं पटतं आणि कधी कधी दोघांचाही राग येतो. काय करु?"
"त्याच्यापेक्षा जास्त त्याचा इगो दुखावलाय. असं वागून ना तो सुखी होईल ना ती ना अमोघ. त्यापेक्षा हेऽ असं काही झालेलं नाही पचवू शकत म्हणत वेगळा झाला असता तरी खरा वाटला असता मला तो". अभीचा मुद्दा बरोबरच होता तरीही एकीकडे मला वाटत होतं वी कान्ट जज लाईक धिस.
त्यांच्या जागी असतो तर आपण काय केलं असतं अभी?
"तुला सांगतो पूर्वी कधीतरी म्हणजे कॉलेजमध्ये असताना सुरुवातीला वाटायचं राणी जशी दिप्यावर छोट्या छोट्या गोष्टींकरता पण अवलंबून राहते ना तसं कधीतरी तू ही रहावंस. मग मी एखादी गोष्ट करेन तुझ्यासाठी आणि मग तुझ्या नजरेत मी 'ते' "ओह! माय हिरो" टाईप प्रेम बघावं जे दिप्याच्या डोळ्यात दिसायचं तेव्हा. बरं झालं पण तू नाहीयेस तशी ते" अभीच्या ह्या बोलण्यावर काय बोलावं ते सुचलंच नाही मला.
"भंकस केली मी, तुझा मूड बदलायला हे घे कान पकडतो हवं तर" त्याने स्वत:चे कान पकडत म्हटलं.
आता ह्याला कसं सांगू ह्याच्या बोलण्याने नाही तर पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे नाती कोसळताना बघून असा चेहरा झालाय माझा.
प्रेम, आनंद, नातं काहीच चिरंतन नाही? इतकं क्षणभंगूर असावं सगळं?
जी नाती तुटतील अशी कधी स्वप्नातही कल्पना केली नव्हती तीच प्रत्यक्षात तुटलेली बघतेय.
खरंतर माझा पिंडच नाही संकटांना घाबरुन मोडून तुटून पडण्याचा.
पण मनाची तयारी नसताना, अकल्पितपणे जेव्हा एखादं वादळ समोर येऊन थडकतं तेव्हा पटकन काय करायचं ते सुचत नाही. त्यातून मग हे अस्वस्थ होणं, भिती वाटणं, आधार शोधणं होत असावं कदाचित.
नात्यांनाही फार गृहित धरलं होतं मी इतके दिवस म्हणून जेव्हा नाती तुटताना बघितली तेव्हा आमच्या बाबतीत असं काही होईल की काय या विचारांनी माझी झोप उडाली.
कॉलेजमधली हटेली भाय असते तर आल्या परिस्थितीशी बेधडक दोन हात करायला पुढे सरसावले असते, काय तुटेल फुटेल ह्याचा विचारही नसता केला आधी.
आज अभीबरोबरच्या संसारात एकप्रकारची पूर्णता, एकप्रकारची स्थैर्यता अनुभवताना हा कोझीनेस बिघडू द्यायची मनाची तयारी नाहीये.
अभी आवडतो, त्याच्यावर प्रेमही आहे माझे पण ह्या बरोबरीनेच मला त्याच्या सोबतीची सवयही झालेय. 'एकत्र स्वप्न बघायची... एकत्र पूर्ण होताना बघायची' यात जास्त आनंद वाटू लागलाय.
ह्या चित्राला धक्का लागला तर..? कदाचित चित्र बिघडेल.. कदाचित पूर्णपणे वेगळं चित्र तयार होईल पण काही काळाने का होईना हातपाय मारुन आम्ही तरुनही जाऊ कोणत्याही परिस्थितीत.
त्यांच्या जागी त्यांचे निर्णय योग्यच असतील, नाही आहेतच. ते जज करण्याचा अधिकार आम्हाला नाहीच. पण तरीही मला आमच्या सहजीवनाचे चित्र जसं आहे तसंच राहावसं वाटतंय.
आणि ते तसंच राहिल ना? बिघडणार तर नाही ना? ह्या विचारांनी अस्वस्थ वाटतंय, घाबरायला होतंय.
माझ्या हातावर थोपटत अभी "हकुनामटाटा" म्हणाला. त्याचा लाडका डायलॉग.
ही त्याची नेहमीचीच सवय. कोणी कितीही काळजीत असो अगदी तो स्वत:ही काळजीत असो "नथिंग विल हॅपन. एव्हरीथींग विल बी फाईन" सांगायची ही त्याची अशी खाशी लकब आहे.
त्याच्या हकुनामटाटाने आणि त्याच्या स्पर्शाने मनावरचं मळभ किंचीतसं दूर झालं.
आत्ताच्या क्षणापुरतं तरी निर्धास्त वाटलं.
अजून तरी नजरेतून काळजी पोहोचतेय, शब्दांनी न मांडता देखील मनातली अस्वस्थता देहबोलीतून व्यक्त होतेय आणि अजून तरी अस्वस्थ मन स्पर्शाने शांत होतंय.
त्याच्या खांद्यावर डोकं ठेवल्यावर कालच्याच इतकं आजही निर्धास्त वाटतंय म्हणजे इतक्यात काही प्रलय बिलय येत नाही ह्याची जाणीव झाली आणि वाटलं ह्याचं "हकुनामटाटा" आणि हा आश्वासक स्पर्श आहे तोपर्यंत हे चित्र असंच राहणार... आम्ही कायम असेच राहणार एकत्र..."टिल डेथ डू अस अपार्ट."
- कविन
प्रतिसाद
छान कथा. आवडली.
छान कथा. आवडली.
छान ओघवती आहे कथा........
छान ओघवती आहे कथा........ आवडली :-)
छान ..
छान ..
छान!!
छान!!
मस्तच. कॉलेजातल्या
मस्तच.
कॉलेजातल्या जोड्यांबद्दल विचार करते तेव्हा माझेही हे असेच होते.
कथा लिहायची शैलीही आवडली.
अगदी आजची गोष्ट वाटली.
छान आहे कथा. आवडली रेखाटनात
छान आहे कथा. आवडली :)
रेखाटनात विरलेली लग्नपत्रिका दाखवायची कल्पना आवडली.
कविता, कथा आवडली. छान ओघवतं
कविता, कथा आवडली. छान ओघवतं लिहिलं आहेस.
कथेसोबतचं रेखाटन अगदी परिणामकारक आहे. चांगली कल्पना.
(No subject)
:)
रेखाटनात विरलेली लग्नपत्रिका
रेखाटनात विरलेली लग्नपत्रिका दाखवायची कल्पना आवडली. >>> +१
त्याच्या खांद्यावर डोकं ठेवल्यावर कालच्याच इतकं आजही निर्धास्त वाटतंय म्हणजे इतक्यात काही प्रलय बिलय येत नाही ह्याची जाणीव झाली आणि वाटलं ह्याचं "हकुनामटाटा" आणि हा आश्वासक स्पर्श आहे तोपर्यंत हे चित्र असंच राहणार... आम्ही कायम असेच राहणार एकत्र..."टिल डेथ डू अस अपार्ट." >>>> आजच्या पुरतं जे आहे ते टिल डेथ डू अस अपार्ट कसं काय ? एकूण कथेच्या आणि नायिकेच्या थॉट प्रोसेसच्या विसंगत वाटलं टायटल.
सिंडीला अनुमोदन..
सिंडीला अनुमोदन.. :)
मस्त कथा.... एकदम आवडली.
मस्त कथा.... एकदम आवडली.
रेखाटनात विरलेली लग्नपत्रिका
रेखाटनात विरलेली लग्नपत्रिका दाखवायची कल्पना आवडली. >> +१
तुकड्यातुकड्यातून फ्रेश वाटली कथा.
कविन, शैली आवडली... बरचसं
कविन, शैली आवडली... बरचसं स्वगत असूनही, कुठेही रेंगाळत, कंटाळवाणी किंवा पोक्तं नाही होतय, कथा... रैना वर म्हणतेय तशी.. फ्रेश राहातेय.
मस्तं.
(पण सिंडरेलानं विचारलेला प्रश्नं - कथेचं नाव अन ह्या नात्याचं कथेतलं रूप... ह्यात विसंगती मलाही जाणवली)
कथेसोबतचं रेखाटन अगदी
कथेसोबतचं रेखाटन अगदी परिणामकारक आहे>>> +१०००००
आवडली कथा :)
सर्वांचेच मनापासून आभार
सर्वांचेच मनापासून आभार :)
रेखाटन एकदम भारी झालय. कोणी केलय? त्याला/तिला स्पेशल धन्स :) एक चित्र १००० शब्दांचं काम करतं ते अगदी खरय :)
ललीचे स्पेशल आभार. कथा मोठी लिहीली तर वाचायचा कंटाळा येतो ग लले ह्या वाक्यावर इलेक्ट्रॉनिकली कान उघडणी करत तिने मला नेटाने पुर्ण करायला लावली कथा म्हणून. अशी कल्हईवाली मैत्रिण लाभणं ही माबोची देन. यात्र्याचेही आभार मानायला हवेत. त्याने ललित मधला लेखही मुशो करुन झटकी पट पाठवून दिला. नाहीतर मी बसले असते एक एक ओळ निवडत चिवडत :)
छान कथा
छान कथा :स्मित:
आवड्ली
आवड्ली :)
छान लिहीली आहेस, आवडली.
छान लिहीली आहेस, आवडली.
कथा फुलवण्याची धाटणी आवडली.
कथा फुलवण्याची धाटणी आवडली. जाने तू या जाने ना चित्रपट आठवत राहिला.
सध्याच्या पिढीचे यथार्थ
सध्याच्या पिढीचे यथार्थ चित्रण.
सुरेख, ओघवती लेखनशैली.
रेखाटनात विरलेली लग्नपत्रिका दाखवायची कल्पना आवडली. >>> +१ >>+१
कवे...मस्तच........आवडली ....
कवे...मस्तच........आवडली ....:)