वाटा

vata1_f.jpg
वाटा...चालता न येणार्‍या
कधी दुरुनच पाहताना
न भेटल्या वळणांची
मनांत होते दाटी
तेव्हा मग उगीच वाटतं
अनपेक्षितपणे
होतील सरल्या क्षणांच्या
मनांतच गाठी भेटी

तू न सांगताच पुन्हा एकदा
मला सारं काही कळेल
पुन्हा हसरी खोडकर बट
तुझ्या गाली रुळेल
मी पावसात भिजल्यावर
ढग तुझ्या डोळ्यांत दाटून येईल
पुन्हा एकदा खास प्रेमाची
वाफाळलेली कॉफी होईल
पुन्हा जाई जुई चाफा
मनांमध्ये मोहरून येईल
न चुकता मोगरा देखील
सुगंधी हजेरी लावून जाईल

vaaTaa-3.gif
आजवर ह्या सुगंधातील
फरक मला कधी कळलाच नाही
फुलांकडे तुझ्या नजरेने पहाण्याचा
उत्साह देखील आताशा उरला नाही
ओळखीचे रस्ते कसे कोण जाणे
पण वाट चुकून देखील पायाखाली आलेच नाहीत
आयुष्याच्या सरळ रेषा
वळवून देखील कधी वळल्याच नाहीत

वाटा...चालता न येणार्‍या
कधी दुरुनच पाहताना
वळता न आल्या वळणांची
मनांत होते दाटी
तेव्हा मग उगीच वाटतं
अनपेक्षितपणे
होतील कधी पुन्हा चुकून
अपुल्या क्षणिक गाठी भेटी?

- shuma

प्रतिसाद

शमा, वाह फारचं सुंदर लिहिली आहे कविता. कवितेंचा प्रवाह आवडला.

आवडली कविता.

हम्म्म.... आवडली.

सुरेख !! कित्ती दिवसांनी वाचली तुझी कविता ....... मस्तच !

>>वळता न आल्या वळणांची
मनांत होते दाटी
तेव्हा मग उगीच वाटतं
अनपेक्षितपणे
होतील कधी पुन्हा चुकून
अपुल्या क्षणिक गाठी भेटी

अगदी! अगदी!!

मस्त!

छानच, एका अधुर्‍या राहिलेल्या प्रेमाचा इंतजार..