कोर्सेरा - ऑनलाईन शिक्षणाचा एक आगळा अनुभव!

तं

त्रज्ञानामुळे जग किती जवळ येत चालले आहे आणि माहितीजालाचा उपयोग करून आयुष्यात किती नवनवीन क्षितिजे खुली होऊ शकतात याचा प्रत्यय मला काही महिन्यांपूर्वी एका ऑनलाईन कोर्सद्वारे पहिल्यांदा आला. निमित्त झाले ते मायबोली वरील मातृदिन विशेष ''आईला शाळेत जायचंय'' धाग्याचे! या धाग्यावर ऑनलाईन शिक्षणाच्या विविध पर्यायांमध्ये मला "कोर्सेरा" संस्थळाचे नाव दिसले.कुतूहलापोटी ते संकेतस्थळ उघडल्यावर तिथे माहिती तंत्रज्ञान, विज्ञान, गणित, साहित्य, संस्कृती, आरोग्य, इतिहास इत्यादी नानाविध विषयांवरील कोर्सेसच्या यादीत मला अमेरिकेतील पेनसिलवेनिया विद्यापीठातर्फे घेतला जाणारा 'लिसनिंग टू वर्ल्ड म्युझिक' हा कोर्स दिसला. संगीताविषयी मुळातच प्रेम असल्यामुळे व या कोर्ससाठी विनामूल्य नावनोंदणी असल्यामुळे मी लगेच नाव नोंदवून टाकले. त्यातच या संस्थळामागील संकल्पना विशद करणारी व्हिडिओक्लिप टेड.कॉम या प्रसिद्ध संकेतस्थळावर पाहिल्यावर मला आणखी उत्साह आला. आणि मग सुरू झाला एक रोमांचकारी प्रवास!

जगाच्या कानाकोपर्‍यातले पस्तीस हजारापेक्षा जास्त लोक या विश्व संगीताच्या नावेत बसल्याचे तर माहीत होते. पण जेव्हा कोर्सच्या ऑनलाईन फोरमवर सहाध्यायींनी एकमेकांची ओळख करून घ्यायला सुरुवात केली तेव्हा खरी धमाल सुरू झाली. इंग्रजीचे जेमतेम, मोडकेतोडके ज्ञान परंतु संगीताबद्दलची तीव्र ओढ, वीजकपातीमुळे दिवसातले मोजकेच तास इंटरनेट चालू, फ्लॅशफ्लड्स, वादळे यांमुळे सतत खंडित होणारा विद्युतप्रवाह, देशोदेशी फिरायला लावणारा फिरतीचा व्यवसाय, गंभीर आजारामुळे आलेली शारीरिक अक्षमता, कॉम्प्युटरचे अतिशय प्राथमिक स्वरूपाचे ज्ञान, तीस-चाळीस वर्षांच्या खंडानंतर पुन्हा विद्यार्थीदशा अशी अनंत आव्हाने पेलत मंडळी कोर्सला उपस्थिती लावत होती. कोणी आपल्या देशात यूट्यूबवर निर्बंध घातल्यामुळे आपण कोर्सशी संबंधित व्हिडियोज पाहू शकत नाही अशी तक्रार करत होते, कोणी नातेवाइकांच्या शुश्रुषेच्या कारणाने घरी थांबावे लागत असल्यामुळे त्या वेळात हा कोर्स करत होते. कोणाला त्यातून व्यावसायिक फायदे दिसत होते, कोणाला फक्त आपल्या ज्ञानाच्या कक्षा रुंदावायच्या होत्या, कोणाला इतरांशी संवाद साधायचा होता तर कोणाला या नव्या प्रयोगात सामील होण्याचा आगळावेगळा अनुभव हवा होता.

परिणाम? कोर्सच्या सात आठवड्यांच्या काळात क्लास फोरममधील चर्चांचे धागे महापूर आल्यागत ओसंडून वाहत होतेच, शिवाय फेसबुकवरही काही लोकांनी अभ्यास गट सुरू केला होता. सगळीकडे धबाधबा पोष्टी! एका शहरात राहणारे लोक प्रत्यक्षात एकमेकांना भेटून परस्पर संवाद साधत होते. ओळखीपाळखी सुरू झाल्यावर प्रत्येक जण आपापल्या देशातील संगीताचे किंवा आपल्या आवडत्या संगीताचे दुवे एकमेकांसोबत शेअर करू लागला. त्यातून पुन्हा चर्चा, माहितीची देवघेव, त्या संगीतातील वेगळेपणा किंवा त्या संगीताचे व आपल्याला माहीत असलेल्या संगीताचे सामायिक गुण यांच्या चर्चा सुरू झाल्याच! काही ठिकाणी काही 'बेशिस्त' विद्यार्थ्यांना फोरममध्ये कशा प्रकारची भाषा अपेक्षित आहे याची समजही प्रथमतः द्यावी लागली. काही आंतरराष्ट्रीय संकेतांची व सभ्य भाषेची आठवण करून द्यायला लागली. परंतु एकदा नियम कळल्यावर लोकांना त्यास अनुसरून लिहिणे सोपे झाले. वेगवेगळ्या राष्ट्रांचे, विचारधारांचे, धर्मांचे, विविध भाषा बोलणारे लोक जेव्हा एकत्र येतात, तेव्हा परस्परांतील सांस्कृतिक भेद किंवा अन्य प्रकारचे भेद ओलांडून त्यापलिकडे जाऊन एकमेकांशी संवाद साधणे फार महत्त्वाचे ठरते. अन्यथा त्या चर्चेचा फज्जा उडायला वेळ लागत नाही. या बाबतीत बहुतांशी लोक जबाबदारीने वागत होते हे विशेष! आणि ज्या पोस्ट्स त्याला अनुसरून नव्हत्या त्या उडवण्याचे स्वातंत्र्य मॉडरेटर्सकडे होतेच.

आमच्या प्राध्यापिका मूळच्या दक्षिण आफ्रिकेच्या असल्यामुळे व त्यांच्या शोधनिबंधाचा विषय दक्षिण आफ्रिकेतील संगीतासंबंधी असल्यामुळे आमच्या कोर्समध्ये आफ्रिकन संगीतावर प्रामुख्याने भर असण्यात काहीच नवल नव्हते. पण मग त्याच जोडीला आशिया, ऑस्ट्रेलिया व अमेरिकेच्या काही प्रांतांमधील संगीत प्रकारांची जोड मिळाल्यावर जनता हळूहळू खुलू लागली. इन्विट ( Inuit) लोकांचे संगीत, पॉलिनेशियन बेटांवरील संगीत, ब्राझिलियन संगीत, रशियन संगीत, वेगवेगळ्या आदिवासी जमातींचे संगीत, त्याबरोबरीने पॉप, रॉक, जाझ, ब्लूज हे संगीत प्रकार, आवडते गायक, आवडते अल्बम्स यांबद्दल चर्चा होऊ लागली. बौद्धिक संपदा, प्रताधिकार कायदा यांवरील विविधांगी मतांनी सजलेल्या चर्चा वाचताना, वेगवेगळी माहिती जमविताना, त्याबद्दल लिहिताना, आपली मते मांडताना नवे दृष्टिकोन सातत्याने समोर येत होते.

कोणाला कोणतीही शंका असो, ती फोरमवर विचारा... बहुतेकदा अर्ध्या तासाच्या आत जगाच्या दुसर्‍या कोपर्‍यात त्या वेळी ऑनलाईन असलेल्या कोणा विद्यार्थ्याजवळ त्या शंकेचे समाधान असेल तर प्रश्नकर्त्याला त्याचे उत्तर मिळालेले असे. मला एकदा तिथे एक तांत्रिक समस्या आल्यावर मी विचारलेल्या प्रश्नाला पाऊण तासाच्या आत आमच्या प्राध्यापकांना साहाय्य करणार्‍या 'ली' चे उत्तर आले होते आणि तेव्हा तिच्याकडे नक्कीच पहाटेचे तीन-साडेतीन वाजले असणार! माझ्या आठवणीत शाळा-कॉलेजात प्राध्यापकांना किंवा शिक्षकांना विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे तेव्हाच लगोलग मिळतील याची काहीच खात्री नसे. कित्येकदा शंका विचारता विचारता राहून जाई, तर कधी तरी नंतर, अचानक एखादी शंका डोक्यात येई आणि तिचे समाधान होण्यासाठी, एक तर स्वतः लायब्ररीत जाऊन पुस्तके धुंडाळा, संदर्भ तपासा किंवा प्राध्यापकांच्या पुढच्या लेक्चरपर्यंत वाट पाहा, हे अनुभवले असल्यामुळे इतके त्वरित शंकासमाधान होणे हीच एक समाधानाची बाब होती.

रोजच्या रोज त्या आठवड्यातले व्हिडियोज पाहून त्यांवरची प्रश्नावली सोडविणे, आठवड्याच्या असाइनमेंट्स पूर्ण करून वेळेत दाखल करणे, त्यानंतर, रँडमली वाटून दिलेल्या किमान पाच सहाध्यायांच्या असाइनमेंट्स वेळेत तपासून योग्य ते गुण देणे, ते गुण का व कसे दिले याबरोबरच असाइनमेंटमधील अधिक -उणे यांविषयी दर असाइनमेंटच्या खाली शेरे लिहिणे, त्यानंतर आपली स्वतःची असाइनमेंट तपासून स्वतःचे स्वतःला गुण देणे आणि हे सर्व ठराविक वेळेत पूर्ण करणे असे अत्यंत धावाधावीचे वेळापत्रक या काळात माझ्या चांगल्याच परिचयाचे झाले होते. त्याबद्दल कोणीतरी कुरकूर केल्यावर प्राध्यापकांचा प्रतिसादही तितकाच ठाम व सडेतोड होता. 'हा कोर्स विद्यापीठाच्या दर्जाचा आहे, त्याचा दर्जा खालावता येणार नाही, तसेच तुम्ही हा कोर्स विनामूल्य करत आहात, तुम्हाला कोर्ससंबंधी सर्व मटेरियल उपलब्ध करून दिले आहे, तेव्हा वेळ पुरत नाही हे निमित्त चालणार नाही.' हे एकदा स्पष्ट केल्यावर मग मात्र लोकांनी फार कुरकूर न करता आपल्या वेळांचे गणित जमवून अभ्यास करायला सुरुवात केली. क्लासमधील काही मित्र-मैत्रिणी कोणाला काही अडचण आल्यास त्यासाठी मदत करत होते ते वेगळेच.

यात काही वेळा मजेचे अनुभवही यायचे! एका असाइनमेंटच्या वेळी माझ्या एका सहाध्यायाला पूर्णपणे स्पॅनिशमध्ये लिहिलेली एक असाइनमेंट तपासायला आली आणि त्याला स्पॅनिश अजिबात कळत नाही!! कोर्सची भाषा इंग्रजी असतानाही ही असाइनमेंट स्पॅनिशमध्ये होती व शेवटी तोडक्यामोडक्या इंग्रजीत माफी मागून ''कृपया या वेळी स्पॅनिशमध्ये असलेली माझी असाईनमेंट खपवून घ्या, पुढच्या वेळी असाइनमेंट इंग्रजीत लिहिण्याचा १०० टक्के प्रयत्न करेन!!'' असे लिहिले होते. शेवटी त्या सहाध्यायाने क्लासमधील इंग्रजी व स्पॅनिशचे ज्ञान असणार्‍या दुसर्‍या व्यक्तीची मदत घेऊन ती असाइनमेंट तपासली एकदाची! बरं, तुम्ही जर नेमून दिलेले काम वेळेत पूर्ण केले नाहीत तर सरळ सरळ तुमचे गुण कापले जायचे. त्यामुळे सर्वांची आपले गुण कापले जाऊ नयेत यासाठी धडपड! एका व्यक्तीला एका आठवड्यात काही कारणांमुळे त्या आठवड्याचा गृहपाठ व असाइनमेंट लिहिण्यास जमले नाही. तेव्हा तिने असाइनमेंटमध्ये सरळ लिहिले, 'मला माफ करा, या आठवड्यात माझा कॉम्प्युटर क्रॅश झाला, माझ्या हार्ड ड्राइव्हमधील माझे गेल्या दोन वर्षांचे संशोधन उडाले व ते परत मिळवण्याच्या खटपटीत मला या आठवड्याची असाइनमेंट लिहिणे जमले नाही. तुम्ही मला शून्य गुण देणार हे माहीत आहे, तरी मी हे लिहीत आहे.' त्या व्यक्तीला बाकी सर्व निकषांनुसार असाइनमेंट मध्ये शून्य गुण मिळाले, परंतु बिनचूक, शुद्ध लिखाणाचा एक गुण मात्र तिने पटकावला!

याशिवाय आणखी काही हृदयस्पर्शी प्रसंगही या निमित्ताने घडले. एका सहाध्यायीचा मुलगा स्वमग्न (ऑटिस्टिक) आहे. आमच्या अभ्यासक्रमात आम्हाला "टुवा" देशातील लोकांच्या खास प्रकारच्या कंठ संगीताचा अभ्यास करायचा होता. या संगीतात गायक-गायिका आपल्या घशाचा विशिष्ट प्रकारे वापर करून पर्वत शिखरांवरील वारा, तळ्यातील पाण्याच्या लाटा, पक्ष्यांची शीळ, प्राण्यांचे आवाज यांचा आभास करून देणारे गायन करतात. साथीला प्राण्यांच्या कातड्यांपासून किंवा अवयवांपासून बनवलेली वाद्येही असतात. निसर्गातील वेगवेगळ्या तत्वांशी संवाद साधणारे त्यांचे हे आवाज, ज्यांना अशा प्रकारचे संगीत ऐकायची सवय नाही त्यांना विचित्रच वाटतात. तर त्या सहाध्यायी बाई जेव्हा आपल्या कॉम्प्युटरच्या स्पीकर्सवरून ते संगीत ऐकू लागल्या तेव्हा एरवी दहा मिनिटेही एका जागी स्थिर बसू न शकणार्‍या त्यांच्या स्वमग्न मुलाने सलग दीड तास त्यांच्या शेजारी बसून एकतानतेने ते संगीत एकाच बैठकीत ऐकले! त्या बाईंसाठी तो अनुभव वर्णनातीत होता. अशा प्रकारे तो अगोदर कधी वागला नव्हता. त्यामुळे संगीतात व खास करून 'टुवन' संगीतात आपल्या स्वमग्न मुलाचे लक्ष स्थिर करण्याची ताकद आहे हे त्या बाईंना इतक्या वर्षांनी पहिल्यांदा जाणवले.

वेगवेगळ्या तर्‍हांचे, विचारांचे लोक एकत्र आल्यावर वाद-विवाद होणे हेही अटळ होतेच आणि तसे ते झालेही. खास करून टुवा देशावरील रशियाच्या १९९० पर्यंतच्या सत्ताकाळात, तेथील कम्युनिस्ट राजवटी अंतर्गत, स्थानिक संगीत व संस्कृती दडपली गेल्याच्या विधानाला काही रशियन सहाध्यायींनी जोरदार आक्षेप घेतला. त्यांनी त्या काळात स्थानिक रेडियो स्टेशनवर सर्व तर्‍हेचे संगीत व टुवा देशातील कंठसंगीत वाजविले जात असल्याची आठवण आवर्जून सांगितली. काहींनी हा अभ्यासक्रम अमेरिकेतील एका विद्यापीठाचा असल्यामुळे या कोर्समध्ये त्याला अनुसरून खास अमेरिकन चष्म्यातून जगातील घटनांकडे बघितले जाणार याची हमी वर्तविली. दुसरे वादळ उठले ते क्यूबन (क्यूबा देशातील) संगीताचा अभ्यास करताना. अमेरिकेचे क्यूबाविषयीचे धोरण, व्यापारी निर्बंध, मेक्सिकोमधील ड्रग्ज माफियांचे साम्राज्य, क्यूबातील हुकूमशाही, त्यात मागे पडलेले संगीत, फिडेल कॅस्ट्रोने केलेले अत्याचार व त्याने घडवून आणलेल्या शिक्षण, आरोग्य विषयक सुधारणा, क्यूबा व रशियाचे संबंध, अमेरिकेचा स्वार्थीपणा व दुटप्पीपणा, सध्याचा क्यूबा व तेथील संगीताची स्थिती अशा विषयांवर अतिशय स्फोटक चर्चा घडून आली. त्यातही, सहाध्यायांमध्ये काहीजण गेल्या काही वर्षांमध्ये क्यूबात राहून आल्यामुळे किंवा तिथे त्यांचे नातेवाईक असल्यामुळे त्यांनी वर्णन केलेली स्थिती व अभ्यासक्रमात चर्चिली गेलेली स्थिती यांच्यात दिसणारी तफावत ही त्या ज्वालाग्राही चर्चेचा महत्वाचा भाग ठरली. प्रत्येकाकडे आपापल्या विधानांच्या व निरीक्षणांच्या पुष्ट्यर्थ असणारे पुरावे तर होतेच! कोर्स संपला तरी ही चर्चा नंतरही दोन आठवडे रंगली होती म्हणजे बघा!

या दरम्यान विविध वृत्तपत्रांनी कोर्सेरासारख्या संकेतस्थळाने चालू केलेल्या या अभ्यासक्रमांत व परीक्षांमध्ये, तसेच वाटल्या जाणार्‍या प्रशस्तिपत्रकांत कितपत तथ्यांश आहे याविषयीची चर्चा सुरू केली होती. त्यांनी उपस्थित केलेल्या मुद्द्यांमध्येही तथ्य होतेच. इंटरनेटच्या माध्यमातून कोर्स करणार्‍या व्यक्तीची खरी ओळख कशी कळणार?, एकच व्यक्ती दोन-तीन डुप्लिकेट खाती उघडून वेगवेगळ्या नावांनी कोर्स करू शकणार व सर्टिफिकेट मिळवू शकणार, परीक्षेच्या वेळी इतरांची किंवा अन्य स्रोतांची मदत घेऊन परीक्षेतील प्रश्न सोडवू शकणार, किंवा त्या व्यक्तीच्या जागी दुसरीच व्यक्ती त्या व्यक्तीच्या खात्यातून तिचा पासवर्ड वापरून लॉग इन होऊ शकणार, कोणी आपल्या असाइनमेंटमध्ये वेगवेगळ्या संकेतस्थळांवरची माहिती ढापून मूळ लेखकाला त्याचे किंचितही श्रेय न देता ते सर्व साहित्य कॉपी-पेस्ट करून किंवा थोडेसे रूपांतर करून स्वतःच्या नावावर खपवू शकणार व परीक्षेत उत्तम गुण मिळवू शकणार अशा हजारो शक्यता तर होत्याच व आहेतच. मग कोर्सेराने ''ऑनर कोड'' निर्माण केला. जणू प्रत्येकाकडून वचन घेतले की मी अशा तर्‍हेचे वर्तन करणार नाही इत्यादी इत्यादी. अर्थात असे वचन देऊनही ते मोडणारे महाभागही असतातच. मग कोर्सेराच्या साईटवर व त्यांच्याकडून दिल्या जाणार्‍या प्रशस्तिपत्रकांवर त्या प्रकारची डिस्क्लेमर्सही आली. काय करणार? इलाजच नाही. त्यात आणखी एक अफवा उठली की भविष्यात कोर्सेरा लोकांकडून कोर्सची फी घेणार किंवा प्रशस्तिपत्रक देण्यासाठी पैसे आकारणार. अद्याप या अफवांना कोर्सेराने नाकारलेही नाही किंवा मान्यही केलेले नाही. त्यामुळे भविष्यात असे काही होऊ शकते हेही अनेकांच्या मनात आहेच.

Corsera.gif

पण या निमित्ताने जगाच्या दूर दूर कोपर्‍यांमध्ये असणार्‍या लोकांना एकत्र आणले, हे सत्य नाकारता येत नाही. कोर्स संपून महिना उलटून गेला तरी फेसबुकवरच्या अभ्यास गटातील लोक वेगवेगळ्या संगीताच्या चर्चा करताना दिसतात. अनेकांना काही वैयक्तिक अडचणींमुळे कधी कॉलेजात जायची संधीच मिळाली नव्हती व त्यांची आर्थिक स्थिती अनुकूल नसल्यामुळे त्यांना तसे शिक्षण या वयात मिळू शकेल याची शक्यताही वाटत नव्हती. या कोर्समुळे त्यांना कॉलेजमध्ये मिळणार्‍या शिक्षणाचा थोड्याफार प्रमाणात का होईना, अनुभव घेता आला. कोणाच्या राहत्या भागात पुरेशा सुविधा नसल्यामुळे व उदरनिर्वाहाच्या कामातून खास कॉलेजमध्ये जाऊन शिक्षण घेण्याइतपत वेळ नसल्यामुळे त्यांच्यासाठी पुढील शिक्षणाची दारे मिटल्यात जमा होती. कोणाला वयोमानापरत्वे आपल्याला कॉलेज शिक्षण झेपेल किंवा नाही याचा आत्मविश्वास उरला नव्हता. हो, आमच्या कोर्समध्ये एक ऐंशी वर्षांचे म्हातारे आजोबाही होते! कोणाला शारीरिक अडचणी होत्या, कोणाला घर सोडून बाहेर जाता येत नव्हते. अशा सर्व लोकांची मोट या कोर्सद्वारे एकत्र बांधली गेली. बरं, विद्यार्थ्यांमध्ये संगीत व मानववंशशास्त्राच्या क्षेत्रातील अभ्यासक, कलाकार, पत्रकार, लेखक, शिक्षक, वैद्यकीय तज्ञ, स्पिरिच्युअल हीलिंग करणारे, इंजिनियर्स, माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातले लोक, इतिहास तज्ज्ञ, वकील, मनोरंजन क्षेत्रातील सल्लागार अशा अनेक लोकांचा भरणा असल्यामुळे कोणती चर्चा किती टप्पे घेऊन कुठे वळेल व कुठे पोचेल, त्यात काय संदर्भ मिळतील याच्या हजारो शक्यता!

विज्ञान, तंत्रज्ञान व त्यातून होणारी वैश्विक समाजाची जडणघडण, ही केवळ कविकल्पना उरली नसून ते तुमच्या आमच्या दैनंदिन जीवनाचे वास्तव बनले आहे. सोशल मीडियाच्या मार्फत आपण नित्यनियमाने हजारो लोकांच्या संपर्कात येत आहोत. जिथे दिवसातून एकच एस.टी. बस धावते अशा दूरदूरच्या गावांपासून ते अजस्त्र पसार्‍याच्या महानगरांपर्यंत सर्व ठिकाणी आपला संपर्क वाढवत आहोत. भाषा, संस्कृती, धर्म, राष्ट्रीयत्व, वर्ण यांच्या पलीकडे जाऊन वैश्विक नागरिक बनण्याच्या या प्रवासात कोर्सेरासारख्या संकेतस्थळाने जगभरातील लोकांसाठी विद्यापीठाच्या दर्जाचे विनामूल्य शिक्षण ही संकल्पना प्रत्यक्षात आणून दाखवली आहे.

मला स्वतःला या कोर्सने दिला एक निर्भेळ आनंद आणि अपरिमित उत्साह! जगात कोणकोणत्या अडचणींतून मार्ग काढत लोक शिक्षणासाठी किती धडपडतात, तळमळतात हे पाहिल्यावर आपल्याला माऊसच्या एका क्लिकसरशी मिळणारे हे ज्ञान किती अनमोल आहे याची पुन्हा एकदा खात्री पटली. माझ्या या मनमौजी प्रवासाचा आलेख जसा जमेल तसा तुमच्या समोर मांडायचा प्रयत्न केला आहे. त्यातून आणखी कोणाला आपल्या मधील सुप्त विद्यार्थ्याची जाणीव होऊन अशा तर्‍हेने ज्ञानप्राप्ती करण्याची इच्छा झाली, तर या लेखाचा उद्देश साध्य झाला असे म्हणता येईल!

- अरुंधती कुलकर्णी

प्रतिसाद

विलक्षण अनुभव. आणि जगभराचे संगीत ऐकायला / अभ्यासायला मिळाले, हि तर सुवर्णसंधीच !
मला असा एखादा अभ्यासक्रम करायला नक्कीच आवडेल.

मस्त अनुभव! :-)

अभिनंदन आणि आभार .. इतका सुंदर अनुभव आमच्याबरोबर वाटल्याबद्दल! शुभ दिपावली!! :)

मस्त लिहिले आहेस अरुंधती.

तुझा उत्साह संसर्गजन्य आहे अरुंधती.
मस्त.

हेम +१

छान आढावा व अनुभव...

तुझा उत्साह संसर्गजन्य आहे अरुंधती.>>>+१००
मी ठरवूनच टाकले आत्ता...३० नोव्हें.ला माझी एक परीक्शा आहे. ती झाली की कोर्सेराला व्हिजिट!

अरुंधती, हॅटस ऑफ... अनुभवकथन... तुझ्या नादी(?) लागून आमच्यातले बरेचजण कोर्सेरा... सेरा... सेरा... करणार असं दिसतय :)

मस्तच लिहिलंय अरुंधती !

अरुंधती, किती छान अनुभव! लिहिलशी छान.मलाहि आवडेल असा अभ्यासक्रम करायला.

मस्त... :)

वा वा...

विलक्षण अनुभव

विलक्षण अनुभव :)

मस्त !

अकु सलाम :)
चांगली माहिती.

माहितीपूर्ण लेख आणि उत्तम आढावा.

मस्तच लेख :)