अस्वस्थ कहाणी

udabattee1_f.jpg
तुझ्या माझ्या संदर्भातले
सगळे ऋतू नादावतात मला...
तसे तर चिंब चिंब श्रावणधारांमध्ये
वैशाखवणवा होऊन जळण्याचे प्राक्तनही
तूच तर दिलेले असते मला
आयुष्यभरासाठी आंदण म्हणून...

उदबत्ती जळताना
सुगंध उधळते आसमंतात
माणसासाठी, देव म्हणून असलेल्या
त्याच्या श्रद्धेच्या प्रतीकासाठी.
मागे राहिलेली राखच नसते कुणाची,
कुठल्या वासाची!
अंगारा म्हणूनही कधी भाग्य नसते तिचे!
पण जळताना ती उधळून देते
आपले सुगंधीपणाचे सारे आविष्कार...

जळण्याचे उदबत्तीचे भाग्य दिल्याबद्दल
आभार मानायचे आहेत तुझे
पण शब्दच सापडत नाहीयेत...
असं कर,
भिजल्या अंतराचे
थोडे हळवे स्पर्शच घेऊन जा.
ते सांगतील तुला अनंत जन्मांची,
जळण्या- उरण्याची,
उधळून दिलेल्या सुगंधाची

अस्वस्थ कहाणी...

-बयो

प्रतिसाद

फार हळवं करून टाकणारी कविता...
>>>भिजल्या अंतराचे
थोडे हळवे स्पर्शच घेऊन जा.<<< सुरेख !

सुरेख!...

भिजल्या अंतराचे थोडे हळवे स्पर्श....!!

अस्वस्थ..

व्व्व्वा!!

आवडली!