कु
णाला कशाकशाची भीती वाटेल ह्याचा काही नेम नाही. माझंच घ्या. मला माझ्याच चांगुलपणाची भीती वाटते. बायकोला तर आणखीच जास्त वाटते. बायकोची नोकरी अजून सुरु आहे. मी निवृत्त असल्याने घरीच असतो. पण हल्ली सोसायटीच्या आवारात हिंडायला; इतकंच काय पण घराचं दार उघडायलासुध्दा मला भीती वाटते. दार उघडलंच आणि समोर शेजारपाजारच्या गृहिणी दिसल्या की पोटात गोळाच येतो आणि त्यांच्या कडेवर लहान मूल असलं की मला दरदरुन घाम फुटतो. मागे कधीतरी जिन्यात की पार्किंगमधे सहज म्हणून समोरच्या बाईकडचं मूल हौसेनं घेतलं नि त्या निष्पाप जिवाशी पाच मिनिटे लाडेलाडे खेळण्याचा प्रमाद माझ्याकडनं घडला. त्या कर्माची फळं मी आजतागायत भोगतो आहे. आता अशा पोरांना कुणाच्या कडेवरनं मला घ्यावं लागत नाही. त्यांच्या जन्मदात्र्याच त्यांना माझ्याकडे आणून सोडतात. ' मुले ही देवाघरची फुले ' वगैरे वगैरे साफ खोटं आहे. वाटल्यास साने गुरुजींनी माझ्या शेजारीपाजारी जन्माला येऊन याची खात्री करुन घ्यावी. तेवढयासाठी इतर पोरांबरोबर मी त्यांनाही सांभाळायला तयार आहे.
सकाळी बायको कामावर जाईपर्यंतच मी सुरक्षित असतो. ती माझ्यासारखी भिडस्त नाही. फटाफटा बोलते. कामावर जातानासुध्दा दार लोटून घेता घेता, " येत्ये बरं का मी, तुमचं चालू द्या पाळणाघर. " असं शेजारणीला ऐकू जाईल एवढया आवाजात बोलते. त्यामुळे तिला खडूस, माणूसघाणी वगैरे वगैरे विशेषणं लागलेली आहेत. ती लावताना इतर बायका, " काका मात्र नाहीत हो तसे, प्रेमळ आहेत, परोपकारी आहेत. कित्ती समजून घेतात ! " वगैरे बिरुदावल्या मला लावतात. नंतर मुलं आणून सोडतात. सकाळी अंघोळीला जावं म्हणून मी तयारीत असतानाच दारावरची बेल ठणाणा ऽऽ करत वाजत राहते. दार उघडून बघावं तर समोरच्या गोवंडयांची गृहलक्ष्मी कडेवर वंशाचा दिवा घेऊन उभी! तोपर्यंत त्यांचा वंश बेल वाजवितच असतो. त्याचा त्या दिव्याला नि त्याच्या दिव्य आईला यत्किंचितही त्रास होत नाही. मग सावकाशीनं त्याचा हात आवरता घेत ही बाई " अले अले, बाश आता ऽऽ. किती वाजवायची बलं ती बेल ! हे बगा ऽ, काका आलेशुद्दा. जा एकदाचा त्यांच्याकले म्हणजे शांत होशील. " असं म्हणत त्या पोराला माझ्यापुढे धरते. ते कार्टंही बापाची पेंड असल्यासारखं हात पुढे करुन माझ्याकडे अंग झोकून देतं. सुटल्यासारखा चेहरा करत गोवंडेबाई वरती म्हणणार, " इतका लब्बाड आहे नाऽ,ऐकतच नव्हता. सारखं तुमच्याकडे यायचं म्हणत होता. "
आता ' ब्ब ब्ब, म्म म्म ऽ ' या दोन उच्चारांपलीकडे कुठलीच भाषा येत नसलेला हा अज्ञानी जीव आपल्या आईकडे असलं काही म्हणत होता हे माझ्या ज्ञानात बसत नव्हतं. पण ' पिलांची भाषा आईलाच कळते ' वगैरे वाक्यांवर हल्ली माझा विश्वास बसू लागला आहे. मी उगाच बोलायचं म्हणून " हो का ? अरे व्वा! चला चला याऽ " म्हणत पोराला कडेवर घेतो. ते तिथूनही वाकून वाकून बाहेरच्या बेलच्या बटणाकडे ओढाताण करीत असतं. गोवंडेबाई जाता जाता त्याला निक्षून बजावते, " फक्त दहाच मिनिटं हं बंटी. काकांना काम आहे. त्रास द्यायचा नाही बरं का त्यांना. "
गोवंडेबाईची दहा मिनिटं म्हणजे घडयाळाचा अर्धापाऊण तास तरी असतो. कारण ती लेकराला न्यायला येते तेव्हा तिची अंघोळ होऊन वर एखादी भाजी चिरुन वा परतून झालेली असते. तोपर्यंत ते पोर मात्र माझी निवृत्ती बरबाद करुन टाकतं. एकदा वैतागून त्याला रागवावं म्हणून चेहरा उग्र वगैरे करत मी गुरकावलो. त्याला ते विदुषकासारखं काहीतरी वाटलं असावं. ते आणखी चेकाळलं आणि ' परत कर ' म्हणून माझ्याच थोबाडावर हात मारु लागलं. शेवटी त्याच्यासाठी मला चेहरा वेडावाकडा करत बसावं लागलं. वरच्या मजल्यावरचे काळे अण्णा जिने उतरताना दरवाजातून हे सारं पाहत होते. (हे मला फार उशीरा कळलं.) ते काही न बोलता ' लहान कोण नि मोठं कोण तेच समजत नाही ' अशा अर्थाचा चेहरा करुन निघून गेले. बायको मला ' मुखदुर्बळ ' वगैरे काय काय नेहमीच म्हणत असते. गोवंडयांचं पोरगं याच दुर्बलतेचा फायदा घेऊन माझ्या मुखाचा स्वतःच्या करमणुकीसाठी वापर करुन घेत होतं. पण याची जाणीव होऊनही मी काही करु शकत नाही. स्पष्टवक्तेपणा, स्वतःची किंमत राखून असणे या गोष्टी रक्तातच असाव्या लागतात. आणि ' ते तुमच्या रक्तातच नाही ' असं बायकोचं ठाम म्हणणं आहे. त्यामुळे माझ्या रक्ताची नेमकी कॅटेगरी कोणती ह्याबद्दल मला औत्सुक्य आहे.
एकवेळ गोवंडयांचा वंश परवडला पण शेजारच्या टिळेकरांचा नको. या टिळेकर खानदानामुळे छंद म्हणून पेटी वाजवणंदेखील मला अवघड होऊन बसलं आहे. मुलाचे पाय पाळण्यात दिसतात वगैरे हे धडधडीत खोटं आहे. नाहीतर वडाच्या खोडासारख्या दिसणार्या टिळेकरबाईचं ' लतिका ' हे नामकरण करण्याचा आततायीपणा तिच्या आईबापानी केलाच नसता. ही म्हणे सूरकोकिळा आहे. (असं फक्त हिच्याच जवळच्या एक दोन मैत्रिणी म्हणतात.) पूर्वी कधी गाण्याच्या चार दोन परीक्षा मांडीवर थापा टाकून पास झाली तेव्हापासून ही कोकिळा कंठशोष करीत फिरते आहे. हिचे यजमान हाडाचे शिक्षक. त्यांचे क्लासेस की काय आहेत. त्यामुळे सकाळपासून ते रात्रीपर्यंत ते तिथे कंठशोष करताहेत. घरातल्यांना शिकवणार कोण? गेल्याच गणपतीत सोसायटीच्या कार्यक्रमात हिच्या सुरांना पेटीच्या पट्टीत शोधण्याचा मला योग आला. आता ' काळी चार घ्या हं ' म्हटल्यावर मी काय पांढरी पाच पकडणार आहे का? पण दोन सुरांच्या बरोबर मधलाच सूर पकडून हिने आपला गळा रिकामा केला. पेटीचा सूर आणि आपला सूर यांत कुठलंही सामंजस्य नसताना सगळी गाणी हसरा चेहरा ठेवून म्हणणारी समंजस गायिका मी प्रथमच पाहिली. आपल्या गुरुंबद्दल हिला पराकोटीचा अभिमान. गुरुपौर्णिमेला न चुकता त्यांच्याकडे जाऊन ही आधी गुरुपूजन करते नंतर कूजन करून येते. दोन स्वरांच्या मधल्या उंबर्यावरच मेहनत करणार्या या शिष्यांच्या गुरुबद्दल मलाही औत्सुक्य निर्माण झालं होतं. एकदा तोही योग आला. समग्र शिष्यमंडळींचा ' स्वरविहार ' नामक कार्यक्रम होता. तिथे आधी शिष्यमंडळींनी वाट्टेल तसा विहार केला आणि शेवटी हे गुरु विहार करायला बसले. त्यांची परिस्थिती शिष्यांपेक्षा फारशी वेगळी नव्हती. बर्याचदा दोन स्वरांच्या मधल्या उंबर्यावर रेंगाळून ते पुन्हा जागेवर येत होते. सूर सापडण्यात जे कधी हरवलेच नाहीत असे गुरु या शिष्यांना नेमके कसे सापडतात याचं मला आश्चर्य वाटलं.
टिळेकरबाईकडे जो तानपुरा आहे त्याची तर गंमतच आहे. तिच्या गुरुंची एक पट्टशिष्या हिची जीवश्च कंठश्च मैत्रिण. महिन्यातून एखादा दिवस येऊन ही कोकिळाभगिनी टिळेकरबाईला तानपुरा लावून देते. त्याच तारांवर आमची गंधर्वलतिका महिनाभर रियाज करत असते. एकदा मीही या तानपुर्याचं कानांनी आणि डोळ्यांनी घाबरतच दर्शन घेतलं. तर तीन षड्जांच्या मतभेदात बिचार्या पंचमाला कुणाबरोबर जावं तेच कळत नव्हतं. असल्या विद्रोही नादबैठकीत स्वरसाधना करून सुरांचे नव्हे तर त्यांना विभागणार्या सीमारेषेचेच उंबरठे झिजवले जाणार नाहीत तर काय? आणि रागदारीच्या क्षेत्रात धुमाकूळ घालणारे या कोकिळेचे सूर जेव्हा सुगम संगीतही पादाक्रांत करु पाहतात तेव्हा माझा गळा दाटून येतो. आवंढा गिळण्यापलीकडे मी काहीच करु शकत नाही.
अशी ही आमची सूरकोकिळा प्रसूत होऊन सांप्रत सप्त किंवा अष्ट मास सरले असावेत. हिने मुलाला जन्म देऊन वंशविस्तार केला आहे की स्वरविस्तार असा गहन प्रश्न मला पडला आहे. कारण त्याच्या कुठल्याही आरड-ओरडण्याला वा विव्हळण्याला ही बाई "कसा सुरात गातोय पहा" असं संबोधत असते. हिला म्हणे मुलाचे पाय केव्हाच पाळण्यात दिसलेत! कारण आतापर्यंत भीमसेन जोशींपासून सोनू निगमपर्यंत आणि नौशादांपासून ते ए. आर. रेहमानपर्यंत सगळ्यांची छबी तिला मुलामधे दिसून गेलीय. साधं खेळण्यावर किंवा जमिनीवर त्याने दोनतीनदा हात आपटले तरी 'तालालासुध्दा अगदी पक्का आहे हं!' असलं बेताल विधान ही करत असते. इतकंच काय पण हा जन्मल्या जन्मल्या याला तंगडया धरुन उलटा केला तेव्हा त्याच्या केकाटण्यातंच ह्या बाईला कलेचं उत्कट बीज दिसून आलं म्हणे ! कदाचित हा पोटात असतानासुध्दा हिला सूर किंवा ताल आतल्या आत ऐकू आले असावेत, कुणी सांगावं?
ह्या दोघा मायलेकरांनी मिळून माझी मात्र शांतता बेसूर करुन टाकली आहे. कधी लहर लागली की मी पेटी काढून बसतो. मागे कधीतरी सकाळच्या वेळी दार उघडं टाकून पेटी वाजवण्याचा भयंकर मूर्खपणा मी केला होता, तेव्हापासून मी आणि पेटी दोघंही संकटात आहोत. मी वाजवलेली सुरावट वायूरुपाने टिळेकरबाईपर्यंत गेली तिथंच माझी साडेसाती सुरु झाली. " अय्या काका ऽ, तुम्ही पेटी वाजवता ऽ? मला माहितच नव्हतं! " असं म्हणत ती किंचाळली होती. मला त्यावेळेस ' चला कुणीतरी रसिक मिळाला ' म्हणून जरा कॉलर ताठ झाल्यासारखं वाटलं; हल्ली त्याच कॉलरला धरुन ओढत नेल्यासारखं वाटतं. नंतर रतीबच सुरु झाला. तिची तमाम गाणी हार्मोनियमवर बसविण्याचं खडतर व्रत माझ्या नशिबी आलं. तिच्या सप्तसूरलोकात मी जाऊ शकत नव्हतो आणि माझ्या पेटीच्या सुरांशी तिचं जमत नव्हतं. तरीही अज्ञानाच्या बळावर ती संपूर्ण गाणं म्हणून मोकळी होत असे. वर परत प्रश्न -
" बसलंय ना हो छान? "
यावर 'घाण' म्हणायची माझी काय बिशाद!
हे सगळं आमच्या हिला कळलं तेव्हा " कलाकाराला शेवटी एक कलाकारच ओळखू शकतो " असलं खवचट वाक्य तिने माझ्या तोंडावर फेकलं होतं.
टिळेकरबाई विनापत्य होती तोपर्यंत मीच फक्त संकटात होतो. तिच्या अपत्यप्राप्तीनंतर मात्र माझ्या हार्मोनियमवर आपत्ती आली. ही आपल्या चिरंजीवांना मांडीवर घेऊन गाणं गायची, आणि म्हणायची,
" आत्तापासनंच त्याच्यावर मी गाण्याचे संस्कार करणार आहे. "
इथं सुरांवरच अंत्यसंस्कार झालेले असताना ही अपत्यावर कुठला संस्कार करणार होती कोण जाणे? पण संस्कारित होऊन ते पोरगं मात्र माझ्या पेटीवर जोरजोरात हात आपटत ' अॅ ऽ अॅ ' करु लागलं. तेवढयाने हिला साक्षात्कार झाला,
" बघा बघा कसा गातोय ते! तुम्हाला सांगते हा नक्की गायक होणार. माझ्यावरती गेलाय अगदी! "
आता पोटचाच गोळा तो! एकतर आईच्या गळ्यावर जाणार नाहीतर बापाच्या फळ्यावर! पण हे वाक्य मनातच गिळून मी " हो हो, म्हणजे काय, तो गायक होणारच! " असलं काहीतरी बोलून स्वतःलाच संकटात टाकलं. कारण नंतर हे संस्कार वर्ग घेण्याचं गुरुकर्म तिने अलगद माझ्या गळ्यात मारलं. आपल्या गायक पोराला काखोटीला मारुन एके सकाळीच ती आली.
" बघा ना! सारखा गाणंच म्हणतोय आज. आणि तुमच्याकडंच यायचं म्हणत होता. पेटी काढा बाई, म्हणजे एकदाचा जीव शांत होईल त्याचा."
यावर माझी प्रतिक्रिया काय, मला वेळ आहे की नाही, पेटी म्हणजे काय खेळणं आहे का? वगैरे कुठल्याच गोष्टीची पर्वा न करता तिने मला कागद गुंडाळावा तसं गुंडाळलं.
" हे बगा, हे काका आहेत की नाई ते तुला शिकवतील हं गाणं. पेटी वाजवायची ना तुला? मग जा बलं त्यांच्याकले. हां ऽऽ ... शाब्बास! "
पेटी या शब्दाचा काहीतरी संदर्भ त्या अर्भकाला लागला असावा. कारण माझा गंडा बांधल्यासारखं ते माझ्याकडे झेपावलं. टिळेकरबाई थांबलीय तोपर्यंत मला पेटी काढणं भाग पडलं. ती काढून मी पहिला सूर वाजवला नि " मी आलेच हं दहा मिनिटात " असं म्हणून ही निर्दयी माता मला त्या अर्भकाच्या तोंडी देऊन निघून गेली. नंतर पेटीचे आणि माझे भयंकर हाल झाले. पेटी ही तबल्यासारखी बडवायची असते या समजुतीने त्या अर्भकाने पेटीवर हात मारायला सुरुवात केली.टिळेकरांच्या घरात संगीताचं शिक्षण कुठल्या स्वरुपात मिळेल याचा नेम नव्हता. मी त्या पेटीच्या संरक्षणार्थ सगळे उद्योग करुन पाहिले. पेटीचा भाता नाजूक म्हणून तो हळूच बंद करुन खिटी घातली; तर याने दुसर्या सेकंदाला माझा हात बाजूला सारून खिटी काढून दाखवली. नंतर मी खिटी लावायची नि त्याने काढून दाखवायची असा रियाज थोडा वेळ झाला. मग उभं राहून दोन्ही हात पेटीवर रेलून पाय वर टाकण्याचा पराक्रमही त्याने केला आणि घोडयावर बसतात तसा पेटीवर बसल्यावर आपल्या घरात जसा घोडा आहे तसाच हा काकांचा असावा या समजुतीने त्याने पेटीला पिदाडून दाखवलं. ( नशीब! बोलता येत नसल्याने मला "मागे बसा" म्हणाला नाही.) मी त्याला उचलून खाली उतरवावं नि त्याने पुन्हा चढून दाखवावं ही घोडेस्वारी बराच वेळ चालली होती. शेवटी घोडयावरुनच त्याने ' अॅ ऽ ' करुन माझ्यावर हात उगारला. आणि मी सपशेल पराभव पत्करला. गेल्यावेळी आलेल्या गोवंडेपुत्राच्या अनुभवाने मी चेहरा रागीट वगैरे करण्याच्या भानगडीत पडलो नाही. पण पेटीच्या रक्षणार्थ त्याचं मन वळवावं म्हणून मी " चल तुला काऊ दाखवतो, चिऊ दाखवतो " असं म्हणत त्याला उचलून बाल्कनीत नेला. मी दाखवलेल्या कुठल्याच दिशेला एकही काऊ नि चिऊ न दिसल्याने दोन वेळा फसून तिसर्या वेळी त्याने माझ्याकडे अविश्वासाने पाहिलं आणि परत पेटीकडे जायचं म्हणून मला ओढू लागला. शेवटी पुन्हा त्याने पेटीवर कब्जा मिळ्वला. मघासारखी घोडेस्वारी होऊ देण्यापेक्षा पेटी वाजवण्यात त्याला गुंतवावं या इराद्याने मी त्याला सूर वाजवून दाखवले. या काळ्या पांढर्या पट्टया दाबल्या की आवाज येतो एवढंच लॉजिक त्याला पुरेसं होतं. त्याने त्या पट्टया बडवायला सुरुवात केली. पेकाटात लाथ घातल्यावर जसे ओरडतात तसे सूर वाजत होते. नंतर पेटीवर बसून पायही आपटायला सुरुवात केली. सूर वेडेवाकडे केकाटत होते. तोच टिळेकरबाई आली. चिरंजीवांना पेटीवर बसलेलं पाहून तिला पुन्हा साक्षात्कार झाला,
" अग्गो बाई, पेटीवरच बसलाय की! हा नक्की संगीतकार होणार. "
मी मनातल्या मनातच कपाळ बडवून घेतलं. म्हणजे पेटीवर हात आपटला की गायक आणि वर चढून बसलं की संगीतकार? नौशाद, मदनमोहन वगैरे मंडळी लहानपणी पेटीवरच मुक्काम ठोकून होती की काय?
" आणि बघा नाऽ, धुंदी कळ्यांना वाजवतोय. अगदी तेच सूर आहेत ना! सक्काळी हेच गाणं तो रेडिओवर ऐकत होता."
माझीच धुंदी पार उतरली होती. त्यामुळे तो ' धुंदी कळ्यांना ' वाजवतोय की ' मलमली तारुण्य ' वाजवतोय हे कळायच्या अवस्थेत मी नव्हतो.
हा असला रियाज आमच्या बायकोने एकदा चुकून पाहिला. तिचा टीपेचा सूर तात्काळ लागला. ती त्याच सुरात टिळेकरबाईला म्हणाली,
" मुलामधे भलतेच गुण दिसताहेत तुमच्या ! पण इथे पेटीवर बसवण्यापेक्षा घरी तंबोर्यावरच का नाही बसवत त्याला ? तेवढीच साथसंगत होईल तुम्हाला. "
हे ऐकून टिळेकरबाई तंबोर्यासारखा चेहरा करुन मुलाला उचलत घाईघाईने निघून गेली. नंतर या मायलेकरांपासून माझी बरीचशी सुटका झाली. पण मधून मधून हे संगीतकार पेटी बडवायला येतातच.
तात्पर्य काय, की काका मुलांना फार छान सांभाळतात अशी सोसायटीत माझी ख्याती झालीय. पाय मोकळे करायला खाली जावं म्हटलं तरी माझी पंचाईत होते. खालच्या बाकांवर अनेकजण बसलेले असतात. त्यांच्यातच मी जाऊन बसलो की कुणाच्या कडेवरच्या नातवाला किंवा मुलाला मी टिचकी वाजवून क्षण दोन क्षण खेळवतो. पण हेच बर्याचदा माझ्या अंगाशी येते. मुलाला कडेवर घेऊन कंटाळलेली ती आजी किंवा आजोबा स्वतःची अलगद सुटका करुन घेतात. " जा, जायचंय काकांकडे? ते भूर नेतायत तुला. " असं म्हटलं म्हणजे भूर नेणं आलं. मी कसला नेतोय? ते पोरगंच मला भूर नेऊन आणतं. बरं ही पोरं माझ्याकडे यायला तयार कशी होतात हे कोडंच आहे. कदाचित हा शांत चेहर्याचा निरुपद्रवी प्राणी कडेवर बसायला बरा आहे असा त्यांचाही समज झाला असावा. काही काही आया आज्यांना तर भानच नसतं. मी नुसता समोर आलो तरी मुलाला म्हणतात,
" ते बगा, आले काका ऽ. जायचं ना आता भूर? "
सारसबागेत जसे घोडे मुलांना फिरवून आणतात त्यांच्यापैकीच मी एक आहे की काय असंच मला वाटायला लागलं आहे. बरं ही पोरंही शांत असावीत की नाही, परवा एक लहानगी अशीच कडेवर बसली. तिच्या फ्रॉकला पिनने रुमाल लावला होता. कडेवर बसल्या बसल्या नाकाने जोरात श्वास सोडत फुसफुस करत ती शिंतोडे उडवू लागली. मी तिच्या आईला विचारले, " सर्दी झालीय का हिला ? "
तर ही महामाता हसूनच म्हणाली, " छे हो ! सर्दी तर नेहमीच असते तिला. ती भस्त्रिका करतेय. सकाळी रामदेवबाबांची सीडी बघते ना! ते बघून शिकलीय. तिला फार आवड आहे त्याची. "
आता हिचं नाक वाहतंय हे स्पष्ट दिसत असताना ती भस्त्रिका कसली करणार डोंबलाची? पण हे ऐकून माझ्याच छातीचा भाता रिकामा झाला. उद्या बालसुलभ प्रक्रियेने पायाचा अंगठा तोंडात घालण्याला ' पवनमुक्तासन ' किंवा पालथं पडून सहज मान उचलण्याला ' भुजंगासन ' वगैरे न म्हटलं तरच नवल!
एकंदरीत हे असं चालू आहे. बायको यावरनं चिडत असते. पण ती चीड व्यक्तींविषयी नसून वृत्तीविषयी असते. मुलांवर मात्र ती राग काढत नाही. नाहीतर मधून अधून आपल्या पर्समधे हात घालत त्यांना तिने चॉकलेट काढून दिलं नसतं. मलाही कधी वैतागायला होतं. पण एखाद दिवस कुठलं लहान मूल आलं नाही तर चुकल्यासारखंसुध्दा वाटतं. मुलांची निरागसता कुठंतरी आकर्षून घेते. मुलं धुडगूस घालतात त्यातही गोडवा असतो. नुसत्या कल्पनेनेच ते पेटीचा किंवा उशीचा घोडा करु शकतात; आपण नाही करु शकत. बाल्कनीतून दिसणारा तो आपला ' कावळा ' असतो, पण त्यांचा 'काऊ' असतो. त्यांची कुठलीही हालचाल ही खरं तर नजरेला सुखावणारीच असते. साधं चॉकलेट त्यांच्यासमोर धरलं तर त्यांच्या चेहर्यावर जे पसरतं ते बाजारात विकत नाही मिळत. डिशमधे मुरमुरे दिले तर एकेक मुरमुरा ज्या पध्दतीने चिमटीत पकडून ते खातात त्यावेळी नजरेला मिळणारं सुख चित्रपट बघून प्राप्त होत नाही. त्यातलेच दोन मुरमुरे पकडून इवल्याशा ओलसर हाताने ते आपल्या ओठांपाशी धरत नजरेनेच ' खा ' म्हणतात, ह्या भावनेपुढे मोठया माणसांचं आदरातिथ्यही कितीतरी फिकं वाटतं. त्यांना कडेवर घेताना ज्या विश्वासाने ते आपल्या कुशीत विसावतात तो विश्वास बाहेरच्या जगात कणभरही अनुभवाला येत नाही.
सांगायचा मुद्दा काय की मी कितीही मुलांचा नि त्यांच्या आयांचा धसका घेतला असला तरी कुठंतरी नकळत लळाही लागून गेला आहे. त्यामुळे त्यांचा त्रास होतोही आणि नाहीही. शेवटी माणसाच्या मनाचा थांग लागत नाही हेच खरं!
-अजय प्रभाकर
प्रतिसाद
लेखाची सुरुवात चांगली
लेखाची सुरुवात चांगली खुसखुशीत झाली आहे, पण नंतर तो भरकटला... प्रकाशझोत पाळणाघरावरुन शेजारीण आणि तिचा मुलगा यावर सरकला असे वाटले. विनोद चांगला जमला आहे.
मिलिंद, लेखाची सुरुवात
मिलिंद,
लेखाची सुरुवात चांगली खुसखुशीत झाली आहे, पण नंतर तो भरकटला... प्रकाशझोत पाळणाघरावरुन शेजारीण आणि तिचा मुलगा यावर सरकला असे वाटले.>>>>
माझ्या लेखाचा विषय शेजारपाजारची मुलं व त्यांच्या आया कशा त्रास देतात हा आहे. लेखाच्या नावात पाळणाघर आहे म्हणून खरंच त्या आजोबांचं पाळणाघर आहे अशी आपली समजूत झाली की काय? लेख विनोदी असल्याने नाव तसं दिलं आहे इतकंच. प्रतिसादाबद्दल धन्यवाद!
आवडला लेख.
आवडला लेख. :)
खुप छान, मनापासुन आवडला,
खुप छान, मनापासुन आवडला, विनोदाबरोबर मनाला भिडणारा आहे. सुंदर!
(No subject)
:)
शेवटचा पॅरा मस्तच आहे.
शेवटचा पॅरा मस्तच आहे.
छान लिहिलय,
छान लिहिलय,
वरील सार्यांना धन्यवाद !
वरील सार्यांना धन्यवाद !
मस्त आहे. खुसखुशीत...
मस्त आहे. खुसखुशीत...
मस्त लिहिलंय. खूप आवडलं
मस्त लिहिलंय. खूप आवडलं :हाहा:
शेवटचे दोन परिच्छेद म्हणजे हसताहसता डोळ्यांत पाणी :)
मिलिंदा +१. लेखाचं शिर्षक
मिलिंदा +१.
लेखाचं शिर्षक आवडलं.
मस्तच
मस्तच :हाहा:
आवडला लेख. टिळेकर बाईंच्या
आवडला लेख. टिळेकर बाईंच्या निमित्ताने एक भोवंडा घेऊन पुन्हा वळणवर आला. पण तो प्रवासही छान होता. बर्याच ठिकाणी 'त्यां'ची आठवण झाली.
(No subject)
:)