शालेय शिक्षणात तंत्रज्ञान

'आ

मच्या वेळी हे असं नव्हतं' किंवा 'जमाना बदल गया है' हे उद्गार तुम्हाला मला काही नवीन नाहीत. ही किंवा अशाप्रकारची वाक्यं आपण जाता-येता, कळत नकळत ऐकत असतो आणि ऐकवतही असतो. गंमत म्हणजे 'जमाना हा नेहेमी बदलतच असतो' आणि शिक्षणक्षेत्रही याला अजिबातच अपवाद नाही. अगदी उदाहरणच द्यायचं झालं तर आता ही काही विधानं पहा..

सुमारे तीनशे वर्षापूर्वी, "Students today can’t prepare Bark to calculate their problems. They depend on their slates, which are more expensive. What will they do when the slate is dropped and it breaks? They will not be able to write." - Teachers Conference, 1703
असं झाडाच्या सालीपासून ते पाटीपर्यंतच्या प्रवासाबद्दल लिहिलं गेलं.

त्यानंतर शंभर वर्षांनी पाटी आणि खडूपासून कागदापर्यंतचा प्रवास घडला.
"Students today depend upon paper too much. They don’t know how to write on slate without getting chalk dust all over themselves. They can’t clean a slate properly. What will they do when they run out of the paper?" - Principal’s Association, 1815

पुढच्या शंभर वर्षांत पेन्सिल आणि पेन यांच्यात युद्ध झालं.
"Students today depend too much upon ink. They don’t know how to use a pen knife to sharpen a pencil. Pen and ink will never replace the pencil." - National Association of Teachers, 1907

आणि त्यानंतर (जवळजवळ) शंभर वर्षांनंतर इंटरनेटने जगाचा कब्जा घेतला.
"The Internet is not a great tool for teaching. The Internet pales in comparison to the hype surrounding it. People think that children can think of any topic and pull up a wealth of information on it, but that is not the case. There is nothing on the Internet that is incredibly beneficial to education, yet we continue to waste money on it." - The Monterey County Herald, 1999

गेल्या काही वर्षांत तर गोष्टी इतक्या झपाट्यानं बदलत गेल्या की ही झाडांच्या सालीपासून सुरू झालेली चर्चा अवघ्या सहा वर्षांपूर्वी आयपॉड आणि ब्लॅकबेरीवर येऊन पोचली आहे
"We are not going to allow iPods and BlackBerrys and cellphones and things that are disruptive in the classroom. Teachers cannot be expected to look under every kid’s desk at what they are doing" -New York Mayor, Michael Bloomberg in 2006

ही प्रगती इथेच न स्थिरावता लवकरच पुढच्या टप्प्यावर पोचेलही. त्यासाठी आता शतकांचा किंवा दशकांचा कालावधी लागणार नाही. सांगायचा मुद्दा तुम्हाला एव्हाना कळला असेल, तो म्हणजे तंत्रज्ञान सतत बदलते आहे, त्याच्या उत्क्रांतीचा वेग प्रचंड वाढला आहे आणि या झपाट्याने सर्वच शिक्षणक्षेत्राला आपल्या कवेत घेतलेले आहे. प्रत्येक शतकात त्याला विरोध हा झालाच, तसाच तो आताही होतो आहे आणि पुढेही होईलच.

आज मी एका अत्याधुनिक तंत्रज्ञान वापरणार्‍या संस्थेत शिक्षक आहे. अकरावी-बारावीतल्या माझ्या प्रत्येक विद्यार्थ्याकडे लॅपटॉप आहे, नव्हे तो असणे अनिवार्य आहे. ह्या नव्या पिढीशी, तंत्रज्ञानाशी जुळवून घेण्याचा सगळ्यात चांगला आणि हुकमी उपाय म्हणजे हा बदल अपरिहार्य आहे हे मान्य करणं. एकदा ते स्वतःला सांगितलं की तुम्ही आपोआप त्याची मजा घेऊ लागता. तंत्रज्ञानाच्या वेगाशी जुळवून घेण्याचा सर्वात सोपा मार्ग एकच, समोर बसलेल्या विद्यार्थ्यांना तुमचा शिक्षक बनवणे! ही पोरं अगदी उत्साहाने तुमच्या सगळ्या शंकांचे निराकरण करतात. पुन्हा तुमचे-त्यांचे नाते बळकट होते हा अजूनच फायदा.

कोणत्याही नव्या बॅचच्या सुरुवातीला मी शाळेच्या सर्वरवरील माझ्या विषयाशी संबंधित सर्व माहितीशी त्यांची ओळख करुन देतो. प्रत्येक धड्यावरील पॉवरपॉईंट्स, अ‍ॅनिमेशन्स, व्हिडिओज, वर्कशीट्स, सिम्युलेशन सॉफ्टवेअर्स अगदी रॅप साँग्जदेखील आणि हे सगळं त्यांना मिळते पहिल्याच दिवशी.

आता हे सगळे माझ्याकडे कुठून येतं? उत्तर सरळ आहे- इंटरनेट.

आजवरच्या अनुभवात मला सर्वात जास्त उपयुक्त ठरलेले, आवडलेले साधन नक्कीच हा इंटरनेट नामक दिव्यातला राक्षस आहे. पण या राक्षसाला राबवून घेणे मात्र शिकावे लागले. सुरुवातीला मी माहितीच्या महापुरात पार गोंधळून, हरवून जायचो. एक काहीतरी शोधायला निघायचो आणि वाट चुकून भलतीकडेच पोहोचायचो. हळूहळू पण निश्चितपणे याचा उत्तम वापर करता येऊ लागला. सतत शोधत राहणे हाच यावर उपाय आहे असे मला वाटते.

अर्थात अशी माहिती गोळा करणे आणि ती आपल्या अभ्यासक्रमाच्या आणि विद्यार्थ्यांच्या गरजेप्रमाणे संकलित करणे हे काम सतत करावे लागते. नाहीतर वर्षानुवर्षे त्याच त्या नोट्स वापरणारा जुन्या पिढीतला शिक्षक आणि तेच तो पॉवरपॉईंट वापरणारा नव्या पिढीतला शिक्षक यात काहीच फरक नाही. तरीही एकदा तुमचा डेटाबेस तयार झाला की ९०% काम झालेले असते. उरते ते केवळ अपडेट करत राहणे. उदा. एकेका विषयावर शब्दशः हजारो अ‍ॅनिमेशन्स उपलब्ध असतात. त्यातले सर्वात योग्य कुठले हा निर्णय शिक्षकालाच घ्यावा लागतो.
कामाच्या संदर्भात सतत सर्व काही 'तय्यार' असल्याची भावना, इतर वेळेला अस्वस्थता येऊ देत नाही. मात्र याचबरोबर ही सर्व माहिती, सॉफ्टवेअर्स हे केवळ एक साधन आहे याचे भान शिक्षकाला सतत असणे अत्यावश्यक आहे. मी पहिल्यांदाच लॅपटॉप घेतला तेव्हा पहिले काही महिने मी दिसेल त्या धड्यावर पॉवरपॉईंट करीत सुटलो होतो आणि प्रत्येक वर्गात त्याच एका पद्धतीने शिकवीत होतो. अखेर माझ्या विद्यार्थ्यांनीच मला, 'तुम्ही लॅपटॉप नसतानाच जास्त चांगले शिकवीत होतात, तेव्हा वर्गात किती चर्चा व्हायची' अशी प्रतिक्रिया देऊन भानावर आणले.
गेल्या काही वर्षात माझा 'खडू' या गोष्टीशी फार कमी वेळा संबंध आला आहे पण आता मी तंत्रज्ञानाचा वापर करुन जास्त विद्यार्थीकेंद्रीत शिकवणे व्हावे यासाठी प्रयत्न करतो. यामध्ये टचस्क्रीन स्मार्टबोर्ड, ऑनलाईन-इंटरॅक्टीव्ह क्विझसारख्या गोष्टींचा फार उपयोग होतो.
इंटरनेटच्या प्रभावी वापरामुळे वेळ नक्कीच वाचतो जो मी मुख्यतः वाचनासाठी वापरतो. यातही इंटरनेटवरच्या वाचनाचा वाटा वाढत चालला आहे. विशेषत: संदर्भ शोधण्यासाठी लायब्ररीत जाण्याची सवय जवळपास मोडीत निघाली आहे. पाश्चात्त्य तसेच भारतीय वृत्तपत्रांच्या वेबसाईट्सवरील लेख, एकाच विषयाला वाहून घेतलेले ब्लॉग्स आणि साईट्स उदा. 'बॅड सायन्स', आणि कशावरही धमाल टिप्पणी करणारे 'ग्रेटबाँग'सारखे लेखक यांचे वाचन जास्त होत आहे.

तंत्रज्ञानाचा उपयोगी आणि प्रभावी वापर होणारी शाळेतली दुसरी जागा म्हणजे प्रयोगशाळा. अत्यंत अचूक तपशील नोंदवणारे वेगवेगळे 'प्रोब्ज', डेटालॉगिंग सॉफ्टवेअर्स, स्प्रेड्शीट्स आणि सिम्युलेशन/व्हर्चुअल लॅब्स यांच्या मदतीने कमी वेळ आणि श्रमात विद्यार्थ्यांना अनेक प्रयोग करता येतात. नव्या पिढीला गॅजेट्स वापरण्याची असलेली सवय आणि हौस या दोन्हीचा इथे उपयोग होतो. त्यांच्या प्रयोगशीलतेवर या सर्वांचा प्रचंड परिणाम होतो हे मी अनुभवाने निश्चितपणे सांगेन.

पण नाण्याला दोन बाजू असतात तश्या त्या तंत्रज्ञानाच्या वापरालाही आहेत.

शाळेत तंत्रज्ञानाच्या वापराचा सर्वात वादग्रस्त भाग अर्थातच इंटरनेटच्या दुरुपयोगाशी संबंधीत आहे. सोशल नेटवर्किंग साईट्स, चॅट्सवर शाळेने बंदी घालणे आणि विद्यार्थ्यांनी नवनव्या युक्त्या वापरुन त्यातून मार्ग काढणे हा उंदीर-मांजराचा खेळ नेहमीचाच. ऑनलाईन गेम्स हा त्यांचा वेळ कुरतडून टाकणारा अजून एक प्रकार. पण मुद्दा परत विद्यार्थ्याच्या वैयक्तिक शिस्तीशी येउन पोचतो. माझ्या अनुभवात, ज्याला अभ्यास करायचा आहे तो करतोच, फायरवॉल ठेवा अथवा काढा!

एकूणच आपल्या आयुष्यात आणि त्यातही विशेष करून शिक्षण क्षेत्राकडे बघून मला असे वाटते की इंटरनेटच्या महासागरामुळे माहिती असणे याचेच महत्त्व कमी होत चालले आहे आणि पुढील काळात ते अजूनही कमी होईल. तुमच्याकडे माहिती असण्यापेक्षा तुम्हाला तिचा वापर, उपयोजन करता येते का याचे महत्त्व वाढेल. असलेल्या माहितीचे यथायोग्य विश्लेषण करता येणे, त्यावरुन स्वतःचे असे अनुमान काढता येणे, नवी माहिती उजेडात आल्यास तिच्या स्त्रोताच्या सत्यासत्यतेची शहानिशा करता येणे या व अशा अनेक क्षमतांचा विकास विद्यार्थ्यांमधे होणे जास्त गरजेचे ठरेल.
माहितीधिष्ठीत शिक्षणपद्धतीकडून क्षमताधिष्ठीत शिक्षणाकडे होणारा हा प्रवास शिकण्या-शिकवण्याची सर्व प्रक्रियाच जास्त अर्थपूर्ण करेल असा मला विश्वास वाटतो.

- आगाऊ

प्रतिसाद

छान

चांगला लेख. आतानंतर पुढची चौथी पिढी कशावर शिकत असेल...

चांगला लेख. दोन्ही बाजू चांगल्या मांडल्या आहेत.

मुद्दे चांगले मांडले आहेत.
मला सर्वात जास्त उपयुक्त ठरलेले, आवडलेले साधन नक्कीच हा इंटरनेट नामक दिव्यातला राक्षस आहे. पण या राक्षसाला राबवून घेणे मात्र शिकावे लागले. >>> खरे आहे !

छान रोचक लेख. फ्रेश. आवडला.
अजुन विस्तृत विवेचन आवडले असते.

लेख आवडला. दोन्ही बाजू उत्तम मांडल्या आहेत.

खरंच दिव्यातला राक्षस आहे हा. छान मुद्दे मांडलेत. या तंत्राने, अवघड विषय समजणे खुपच सोपे जाते. बी.बी.सी.. खुप छान उपयोग करुन घेते, या सर्वाचा.

काहीसं विचारवंत लेखन आगाऊ!
आवडलं...

वा! तुम्ही खूप मेहनती आणि विद्यार्थ्यांबद्दल passionate आहात, ही खूप मोठी गोष्ट आहे. काही शिक्षक विद्यार्थ्यांबद्दल नुसतेच तळमळ्त असतात, पण तुम्ही पुढे जाऊन मार्ग शोधलात, ही फार महत्वाची गोष्ट वाटली मला. तुमचे कौतुक करावे तितके कमीच.

छान..

चांगला लेख. मला खुप आवडला. :)

छान...

रैना +१ :)

छानच... तुझ्या शाळेतल्या विद्यार्थ्यांचा हेवा वाटल्यावाचून राहिला नाही.

पण ही तर प्रस्तावना झाली. तुझ्याकडून अजून सविस्तर काहीतरी अपेक्षित आहे. (काही उदाहरणं, केस-स्टडीज..?)
आणि इथेही विद्यार्थीप्रिय शिक्षक आणि 'बोअर' शिक्षक - असा फरक केला जात असेलच की! तो कशाच्या आधारावर होत असेल - हे ही वाचायला आवडलं असतं.

>>तुमच्याकडे माहिती असण्यापेक्षा तुम्हाला तिचा वापर, उपयोजन करता येते का याचे महत्त्व वाढेल. असलेल्या माहितीचे यथायोग्य विश्लेषण करता येणे, त्यावरुन स्वतःचे असे अनुमान काढता येणे, नवी माहिती उजेडात आल्यास तिच्या स्त्रोताच्या सत्यासत्यतेची शहानिशा करता येणे या व अशा अनेक क्षमतांचा विकास विद्यार्थ्यांमधे होणे जास्त गरजेचे ठरेल.

अगदी अगदी! आजच्या माहितीच्या बकासुराच्या युगात माहिती किती खाल्ली पेक्षा किती "पचवली" व "पोचवली" याला अधिक मह्त्व आहे :)

छान लिहिलेय. विद्यार्थ्यांकडूनही शिकण्याचा approach खूप सकारात्मक.

लेख आवडला.