ऋतू आयुष्यातले..

उन्हाळा

सं

पलेल्या अहवालावरून उर्मिलने नजर उचलली तेव्हा समोरचा खिडकीचा आयत तळपत्या उन्हाने भरून गेला होता. निळंपांढरं तापलेलं आकाश अन् त्यात घुसलेले आंब्याचे पालवलेले शेंडे.

उर्मिल उठली. खिडकीपाशी जाऊन उभी राहिली. खाली पाण्याच्या टाकीवर सावलीला स्तब्ध झोपलेली मनीमाऊ.

''डायना, या मांजराला दिवास्वप्नं पडत असतील का ग?'' डायना, तिची लायब्ररियन मैत्रीण.

''विचार त्यालाच. आज डब्यात काय आणलं आहेस? ते सांग आधी.'' डायनाची भुकेची वेळ.

''तुझ्यासारखंच असणार ते. स्वार्थी आणि खादाड.'' यावर डायनाचं खळखळतं हास्य.

''अगं, त्या अंध मुलाला का आशा लावून बसवून ठेवलं आहेस उर्मिल? तुला ना, कट ऑफ करता येत नाही. अंधांच्या वेगळ्या संस्था आहेत ना?'

''तिथूनच निराश होऊन आलाय गं तो. बिचारा सातार्‍याहून आलाय. वणवणतोय मुंबईत नोकरीसाठी. बघते बर्वेसरांच्या चिठ्ठीचा काही उपयोग होतो का त्याच्यासाठी. अंधांना आरक्षण असून नसल्यासारखं ठरतं ग कित्येक क्षेत्रांत. आपण आपलं काम करायचं. तसंही मलाही आज लवकर निघायचंय जयूला भेटायला.''

''उन्हाच्याच वेळा सूट होतात वाटतं तुला? काय आवड ही तळपत्या उन्हात फिरायची!'' डायनाची नाराजी.

उर्मिलला सिद्धार्थ आठवला. ''का फिरत असतेस उन्हातान्हात एकटीच? तुझ्या बॅगा तरी उचलायला बोलव गं मला. किती परक्यासारखं वागवतेस!''

उर्मिल आत्ताही खिन्न हसली ते आठवून. परकेच तर झालोय एकमेकांना, सिद्धू! गेल्या दिवाळीत तुझी लग्नपत्रिका पाठवलीस, लग्नानंतर मिळेल अशा बेताने. त्याआधी वर्षभर भेटी विरळल्याच होत्या. जयू अन् हायकिंगचा ग्रूप हा एक क्षीण धागा तेव्हढा टिकलाय अजून.

सिद्धार्थने मागणी घातली होती तिला. पण लग्नाचा विचारही करू शकत नव्हती उर्मिल. तिच्या जिवलग, प्रेमळ वडिलांचा अकालमृत्यू, त्यांच्याच एका मित्राच्या - बर्वेसरांच्या, अपंगांसाठी काम करणार्‍या एका अनुदानित सेवाभावी संस्थेत मिळालेली साधीशी नोकरी, बाबांची पेन्शन. या सर्वांवर पेललेली घराची, लहान भावांची जबाबदारी.

''हे ऊन्हच खरं असतं डायना. मला खूप आपलं वाटतं हे. कधीकधी वाटतं, मी हे ऊनच आहे. शरीर वगैरे काहीच नाही मला. उन्हात चालत राहिलीस ना, की एक असा फील येतो.''

''फील माय फूट! सनस्ट्रोक म्हणतात अशा चमत्कारिक विचारांना.'' डायनाला काहीच काव्यमय झेपत नाही. भुकेच्या वेळी तर नाहीच नाही.

पलीकडल्या केबिनमधून दुर्गाताईचे मोठमोठ्या आवाजात हसणे अन् बोलणे. ''मी लग्न केलंय का ते विचारताय? अहो वीस पंचवीस तरी केलीत! अहो माझी नाही हो! इतरांची! आमच्या संस्थेतर्फे पुनर्वसन झालेल्या अपंगांची!"

दुर्गाताईला एक पाऊलही चालता येत नाही. क्रचेसवर कसातरी बेंगरूळ देह सावरत वावरते ती. पण अदम्य जिगीषा अन् उत्साह संस्थेच्या कार्यासाठी. बर्वेसरांचा जीव तिच्यावर. बाकी अहवाल वगैरे लिखापढी उर्मिलकडे. तोंड बंद ठेवून करायची कामे. उर्मिलने अहवाल मिटून ठेवला. खरं आणि खोटं. आकडे आणि सत्य. अनुदानं आणि डोनेशन्स. देणार्‍या-घेणार्‍यांचे अ‍ॅटिट्यूडस. नकोनकोशा तपशिलांचे खिळे तिला टोचले.

सगळं विसरायचंय. घर, सिद्धार्थ, संस्थेत सामोरं येणारं दु:खितांचं जग. आयुष्याचं वैराण वाळवंट.

''मी निघू ना डायना? बर्वेसरांची सही झाल्यावर ते बाहेर पाठवतीलच एक रेकमेंडेशन लेटर, ते तेव्हढं त्या अंध मुलाला दे. या शनिवारी हाइकचं ठरतंय जयूबरोबर!''

जयू कटकट करायची अलीकडे... उर्मिलला माहिती होतं ते. तिलाही झेपत नव्हतं हल्ली सगळी जुळवाजुळव करायला. नोकरी अन् अभ्यास सांभाळून हायकिंग ग्रूपच्या सफरी. पण उरक दांडगा. जमवेल याही वेळी. उर्मिलला शिव्या घालत. उर्मिलने तिला जास्त वेळ द्यावा असं तिला वाटत होतं.

लांबलांब पसरलेले तळपते रस्ते... चारच तर वाजलेत पण रहदारी आत्ता ओसंडायला लागेल. हा वरळी सी-फेसलगतचा रस्ता उर्मिल पायी तुडवतेय. मृगजळ तरळतंय डांबरी रस्त्यावर. जसं उर्मिलच्या दिवास्वप्नात डोंगरमाळा उलगडताहेत करड्या-जांभळ्या. तिथे जाऊन ती मनातला कोलाहल डोंगरांवर विखरून टाकणार आहे. रात्र उतरेल. शीतल तारकांचं छत तिच्या डोळ्यांवर स्वप्नांची तोरणं बांधेल. तेवढंच ते. पण तेवढं तरी.

उर्मिल उन्हात चालतेय. तहान लागलीय तिला अचानक. अथांग निळा महानगरीय सागर तिच्या तृष्णेसमोरच पसरलाय.

***

पावसाळा

अबॉर्शननंतर आजच कामावर आलीय अस्मिता. थकलेली; लपवतेय ती, पण आतून खूप खचलेली. किती फर्टिलिटी ट्रीटमेंटस, किती कसले कसले सेशन्स आणि आता हे !

''सुस्वागतम् अस्मि. छान भरल्यासारखं वाटतंय ऑफिस आज. केवढं मिस केलं तुला!'' जाहिरात कंपनीमधला तिचा सहकारी मधुसूदन तिला गेटवरच घ्यायला आलाय एक सुंदरसा पुष्पगुच्छ घेऊन.

ती फरफटत खुर्चीत स्थानापन्न.

''हे काय मधू? नवीन रंग?''

तजेलदार अन् बोल्ड पिवळा रंग. चंदेरी अन् काळ्या बाह्यरेषांचे उठाव वस्तूंना. ऑफिस चमकतंय.

''तुला फ्रेश दिसलं पाहिजे सगळं, म्हणून तुझा आवडता रंग, ऊर्जेचा. बॉसने परवानगी दिली, करून टाकलं काम.''

अस्मिला जास्तच खिन्न वाटतंय त्याची ही धडपड पाहून..

''आणि कामाच्या डोंगरांचं काय? ते एकट्याने उपसणं कमी होतं म्हणून हे काम वाढवलंस?'' ती पेंडिंग असाइनमेंटसचा फोल्डर उघडते.

''हे काय? बेबी शांपूचं करून टाकलंस वाटतं?'' अभावितपणे हेच पहिले शब्द तोंडातून अन् अस्मिला अश्रू आवरत नाहीत. इतकं गोंडस बाळाचं चित्र, तिनेच तर प्रॉडक्ट कव्हर डिझाइन केलं होतं.

मधू नि:स्तब्ध. पाठमोरा खिडकीतून बाहेर बघत. म्हणतो,''अगं, तूच तर सगळं केलं होतंस. मी फक्त कॉपी लिहून घेतली क्षिप्राकडून. त्या लोकांना लवकर हवं होतं ना. असं सेंटी होऊन कसं चालेल अस्मि? नको त्याच असाइनमेंटस येताहेत नेमक्या.''

मधूला फार वेळ तणावात राहता येतच नाही. मग तो उत्साहाने ड्रॉवर उघडून एक पत्र बाहेर काढतो. ''जाऊ दे. विसर ते, अस्मि. मी खूप आनंदात आहे तुला पाहून.. एक खूप छान बातमी द्यायचीय तुला. आपण केलेल्या 'वूमन एम्पॉवरमेंट' वरच्या टेली पीसला यावर्षीचं Ad Awards नॉमिनेशन मिळालंय. साहेब खूष आहेत आपल्यावर. सेन्ट्रल वेल्फेअरकडून शॉर्ट फिल्म बनवायची ऑफर आलीय ,ती आपल्याकडेच दिलीय त्यांनी. बक अप अस्मि, एवढ्याशाने खचायला देणार आहेस तू स्वतःला?''

''एवढ्याशाने?'' अस्मिला वाटतं मधूला सांगावं,''नाही रे मधू, एवढं सोपं नाहीये ते. एक महत्त्वाचा भागच संपलाय आयुष्याचा. आता काहीच घडणार नाहीये आमच्या आयुष्यात. अस्वस्थ आहोत दोघेही. एक नीटसं न जुळलेलं विवाहबंधन. त्याच्या परिघावर जमलेल्या हितसंबंधी लोकांचे खेळ. या बाळामुळे सोपं झालं असतं बाँडिंग आणि त्याही पलीकडे, मला हवं होतं रे हे बाळ! अपमृत्यू पाहिलेत जीवनात, जीवन अंकुरताना अनुभवायचं होतं. राहिलं आता सगळं.''

पण ती काहीच बोलत नाही. बाहेरचा पाऊस बघत राहते. इमारतीच्या पिलर्सवर धरलेलं शेवाळ, पदपथांच्या फटीत डोलणारं गवत, संथ लयीत गळणारं पाणी. तिच्या गर्भजळातही एक बाळ अंकुरत होतं. आता ओसाडी आहे तिथे.

''अगं अस्मि, लक्ष आहे का मी काय सांगतोय तिकडे? ही शॉर्ट फिल्म संपूर्णपणे तू बनवायचीस. मी तू सांगशील तेच अन् तेवढंच काम करणार सांगकाम्यासारखं. थीम काय आहे माहितेय? 'सेव्ह गर्ल चाइल्ड'...''

'सेव्ह गर्ल चाइल्ड'.. ती एक दीर्घ श्वास घेत उभी राहते. येस्स. क्लिनिकमधली मनाच्या मागे ढकललेली क्षणचित्रं जागी होतात. इतके महिने फर्टिलिटी ट्रीटमेंट अन नंतर अचानक गर्भपात या सगळ्यातून जाताना गेले कैक महिने तिने उघड्या डोळ्या-कानांनी पाहिलेली, ऐकलेली. मुलींचे गर्भ पाडण्याची चौकशी करणार्‍या हताश बाया. मुलगी झाल्यावर चिंताग्रस्त झालेल्या ओल्या बाळंतिणी. भयानक दारुण दु:स्वप्नांसारखे अंगावर येणारे वर्तमानपत्रांचे मथळे.

निदान असलं तरी काही आपल्या जगण्यात नव्हतं. पपांनी किती प्रेमाने वाढवलं तिला अन् तिच्या बहिणीला. अन् अबॉर्शन झालं त्याआधीही 'मुलगा की मुलगी' हा विचार आपण दोघांनीही केला नव्हता. कधीच.

या राजरोस खुडल्या जाणार्‍या कळ्यांसाठी एक सुंदर परिणामकारक शॉर्ट फिल्म बनवायचीय आपल्याला. आपलं बाळ नियतीने नेलं पण वाचणारी प्रत्येक कळी आपली समजून हे काम करायचं.

''होय मधू, मीच करणार हा प्रोजेक्ट. चल कामाला लागू या. पण आधी मस्त कांदाभजी आणि चहा मागव ना. हे काय? विसरलास? इतक्या पावसात इंधन नको मेंदूच्या मशिनला?'

मधूचं हसणं तिच्या हसण्यात मिसळून जातं. बाहेर पाऊस मायेनं टपटपत राहतो.

***

हिवाळा

लवकर अंधारतं. हिवाळा सुरू झालाय. प्रचीतीला हिवाळा आला की बालपण आठवतं... सणासुदींच्या दाटीवाटीतले आश्विन-कार्तिक. उष्ण कटिबंधातले हवेहवेसे वाटणारे शारदीय आकाश, सोनसळी चंद्रकोरींनी सजलेल्या रात्री. थंडगार वार्‍याच्या अप्रूपाच्या झुळुका.

सुटीत येणारे पाहुणे,रात्र रात्र चालणार्‍या गप्पा-गाणी. निदान जानेवारीच्या मध्यापर्यंत हे वातावरण. आताशा तिकडेही बदलत चाललेत ऋतू म्हणा. इथे तर हिवाळ्यात दिवस फारच लवकर सरतो अन रात्र सरतच नाही.

सकाळी मानस, तिचा अविवाहित मुलगा, ऑफिसात जातो. त्यानंतर घरात ती एकटीच. बाहेर बागेत थोडं घुटमळणं. मॅक येऊन बागकाम करून जातो. त्याला इंग्लिश येत नाही, तिला स्पॅनिश. पण एका माणसाची हवीहवीशी जाग.

मग पुढे जेवण गरम करून घेणं, वाचन, टीव्ही, लोळणं. नंतर चहाचा मोठा मग घेऊन बाहेरच्या लाऊंजमध्ये बसणं. तुरळक, ठराविक लोकांची येणीजाणी. टुमदार बंगल्यांच्या या वसाहतीत जणू माणसं राहतंच नाहीत. छाया हलतात आभासांच्या, ''हाय! हॅलो! गुड इव्हनिंग!'' म्हणत, हसून पुढे जाणार्‍या...एखादी फेरी मैदानाला मारून आलं की संपला दिवस. मानसचं लग्न जमेपर्यंत सुटका नाही या सार्‍यातून. अन तेही बेटं जमतच नाहीये काही केल्या. कधी सुरू होईल आपलं भारतातलं शांत, एकटं रूटीन?...

अजून अंधारलं नाहीय तोच ती स्वेटर, शूज घालून बाहेर पडते. मैदानाला एक तरी फेरी घालून येऊया म्हणत. पण गेटबाहेर पडतापडताच तिची नजर शेजारच्या नव्या केलेल्या बंगल्याच्या गेटकडे जाते तर नवा मालक पंचेचाळिशीतला ज्यूड तिला हसून अभिवादन करतो.

हा कॉर्नरवरचा मोठा बंगला. या बंगल्यातलं जुनं लॅटिनो कुटुंब हा बंगला विकून दुसरीकडे गेलं. आता हा ज्यूड. इतके दिवस नूतनीकरणात गुंतला होता. खरंच सुंदर केलंय अगदी बारकाव्यांनिशी, बाहेरून तरी. आतही तसंच अभिरुचिपूर्ण इंटेरियर असणार.

हा ज्यूड बराच पैसेवाला असावा. हसराबोलका वाटतो. तोंडओळख झालीय, पण तिला कोणताही भ्रम नाहीये. अशी हुकमी मैत्री होत नसते. तिची तर कधीच नाही.

''हाय प्राचिथी,'' ज्यूड गेटपाशी थबकलेलाच.

''हाय ज्यूड.''

''हाउ इज मानस?'' ज्यूडला देखणा म्हणता येणार नाही, पण एक गोड बालिश भाव चेहर्‍यावर, बॉयिश म्हणा हवं तर... मानसशी जातायेता असंच बोलला असेल कधीतरी. त्याची फॅमिली लवकरच येईल. बायको, दोन मुलं.

का कोण जाणे, प्रचीती त्याला विचारते,''कॉफी प्यायला येणार?''

''ओह शुअर''. तो जणू याचीच वाट बघत असल्यासारखा. ती स्वतःशीच नवल करत उलट वळून त्याच्याबरोबर घरात जाते.

''मला भारत खूप आवडतो. भारतीय पद्धतीने कॉफी बनवशील प्लीज?'' ज्यूडची थेट सुरुवात. ती कॉफी करताना तो डायनिंग टेबलजवळ अगदी सैलावून बसलाय. ''तुम्ही कोणत्या स्टेटमधले?''

''महाराष्ट्र... मुंबई''... त्याला कदाचित मुंबई जास्त कळेल म्हणून ती स्पष्ट करते. कॉफीचे दोन मोठ्ठे वाफाळते मग घेऊन त्याच्याजवळ बसते. कुतूहलाने त्याला न्याहाळत विचारते, ''गेला होतास कधी भारतात?''

''मनाने अनेकदा. लवकरच प्रत्यक्ष जाणार आहे. आमच्या योगा सेंटरमधल्या गुरुंशी मी अनेकदा बोलतो त्याबद्दल.''

अस्सं. असं आहे तर. योगामुळे 'ब्रँड इंडिया' असा लोकप्रिय होतो. ती किंचित हसते. पण ठीकच आहे. असं तर असं.

''भारत ही खूप वेगळी गोष्ट आहे... भारताबद्दल ऐकणं आणि भारत अनुभवणं दोन वेगळ्या गोष्टी आहेत. का आवडतो भारत तुला न पहाताच?''

ज्यूड थोडा रागावल्यासारखा स्तब्ध होतो."You know what Prachithi? You have to know me first. क्वांटम फिजिक्सचा प्रोफेसर होतो मी. नोकर्‍या केल्या, सोडल्या. नंतर दोन कंपन्या सुरू करून पब्लिक केल्या पण कधीच हॅपी नव्हतो मी. जेव्हा धीर धरले, तेव्हा त्यापलीकडले भयाचे, असुरक्षिततेचे प्रदेश अनुभवले. जेव्हा सुख शोधलं तेव्हा नव्यानव्या दु:खांमध्ये गुरफटत गेलो."

"प्रत्येक नवं, अधिक मोठं घर घेताना निगुतीने सगळं करतो, अन् रहायला येताना वाटतं की सुरेख नवा तुरुंग बांधलाय मी. I have made my millions, प्राचिथी, आता मला हॅपिनेस हवाय! आणि माझ्या गुरुंच्या सहवासात मला त्याची झलक मिळतेय. त्याची मुळं भारतातच आहेत अशी खात्री आहे मला.''

ती अवाक! एखादी खिडकी सहज उघडावी अन समोर मावळतीचे झळाळते रंग ल्यायलेलं क्षितिज दिसावं, तशी चकित.

''ज्यूड, इतकं सोपं असतं ते? मग मानस आणि त्याच्यामागून मी कशाला आले इथे?''

''मानस माझ्या टप्प्यावर आला तर कदाचित कळेल त्याला. या जगात ट्रिलियन्स ऑफ बिइंग्ज आहेत! To each, his own!''

ज्यूड हसतो. ''बरं झालं तुमचा शेजार मिळाला ते, बोलू पुन्हा असेच कधीतरी,'' असं म्हणून तिचे आभार मानून निरोप घेतो.

बाहेर हिवाळ्यातला दिवस काळवंडून त्याची रात्र झालीय . नक्षत्रांकित स्वच्छ कॅलिफोर्निक आकाश वर विस्तारलंय आणि प्रचीतीला दिसते ती सोनसळी चंद्रकोर, अगदी तश्शीच, तिच्या लहानपणी तिने अंगणात पाहिलेली..
सातासमुद्रापार.

- भारती बिर्जे डिग्गीकर

प्रतिसाद

छान. आवडले.

मस्त आहे. आवडलं. वेगळीच मांडणी आहे.

आवडले ऋतूरंग.

छान.

ऋतू ह्या एका सुत्राशी बांधलेल्या तीन कथा वाचताना 'गंध' ह्या चित्रपटाची आठवण येणं अपरिहार्य होतं.
भारती, तुमची लेखनशैली सुरेखच आहे. काहीकाही वाक्यं खूप भिडली पण तरी ऋतू नीट पोचले नाहीत असं वाटलं.

लेखन आवडले पण थोडे तुटक वाटले आणि ऋतू नीटसे जाणवले नाहीत.

आवडले.

भारती, मला भिडले ऋतुरंग...

आवडलेच!

तुमची लेखनशैली सुरेखच आहे. काहीकाही वाक्यं खूप भिडली पण तरी ऋतू नीट पोचले नाहीत असं वाटलं. >>> +१

लेखनशैली आवडली...

कथेचा बाज आवडला. पण उन्हाळा सोडला तर बाकी ऋतू नीट पोचले नाहीत असं वाटलं.

खूप आभार सर्वांचे अन शुभेच्छा सर्वांना.. ऋतू बाहेरचे अन स्त्रीच्या अंतर्यामातले यांची ही तीन रूपे.. तीन ऋतूंशी या तीन स्त्रियांचे संबंध वेगवेगळ्या तर्‍हेने आलेत.

उन्हाळा बाहेरही आहे अन ऐन तारुण्यातल्या उर्मिलच्या जीवनातही. तिने तो स्वीकारलाय, ती उन्हावर प्रेम करायला अन त्याचवेळी स्वतःसाठी मृगजळ निर्माण करायला शिकलीय.

पावसाळा बाहेर पालवतोय पण अस्मिताच्या मातृत्वाला आसावलेल्या जीवनात काहीही अंकुरणार नाहीय. आपल्या कलेच्या माध्यमातून ती निर्मितीक्षमतेला वाट करून देऊ पहातेय..आयुष्यातल्या कोंडमार्‍याची कोंडी फोडतेय.

हिवाळा जीवनाच्या उतरणीवरच्या प्रचीतीला गोठवतोय अन आयुष्य थांबल्यासारखे झालेय तिचे, पण ज्यूडच्या रूपाने एक नवीनच साक्षात्कार झालाय तिला तिच्याच जडणघडणीतल्या आत्मिक शक्तीचा, तिच्या मुळांकडे ती परततेय..

छान आहे, आवडलं ..

(पुन्हा एकदा प्रतिसाद)
भारती हे तिन्ही ऋतुलेख जास्तच तरल झालेत... त्यामुळे भिडत नाहीयेत का?

छान लिहीता तुम्ही. हे जरा तुटक वाटतय. ॠतुंची नावं छोटुकल्या कथांच्या डोक्यावर लिहीण्याऐवजी कथांमधुन त्या ॠतूचा feel जाणवला असता तर मजा आली असती.

माय गॉड काय मस्त भारी भारी सुंदर शब्द पेरलेत जागोजागी. खुपच प्रसन्न वाटले तिनही ॠतु :)

बाज आवडला. पण मलाही निंबुडासारखेच वाटले.

अगो आणि निंबुडाच्या मतांशी सहमत..

दाद, धन्स.
>> भारती हे तिन्ही ऋतुलेख जास्तच तरल झालेत... त्यामुळे भिडत नाहीयेत का? >>
मलाही तसंच वाटतंय. ही तरलता मला गद्यातही टाळता आली नाहीच. :))

तरीही सर्वांचे आभार अन ज्यांना हे लेखन तुटक वाटलं त्यांना एक विनंती की शांतपणे, कविता वाचावी तसं वाचून पहावं ! ऋतुवर्णनापेक्षा ऋतु अन आयुष्य यांचा विरोधविकास चित्रित केला आहे..

छान आवडलं..

अगो +१
हिवाळा जीवनाच्या उतरणीवरच्या प्रचीतीला गोठवतोय अन आयुष्य थांबल्यासारखे झालेय तिचे, पण ज्यूडच्या रूपाने एक नवीनच साक्षात्कार झालाय तिला तिच्याच जडणघडणीतल्या आत्मिक शक्तीचा, तिच्या मुळांकडे ती परततेय..
>> पण सुरवातीलाच तिच्या मनात तिच्या मुळांची आठवण आणि कधी परत तिथे जाता येणार हे असतच की ..त्यामुळे हिवाळा नीट पोचला नाही पण लिहिलय मस्त तुम्ही.

शूम्पी,
मला कदाचित हिवाळा पोचवता आला नाही.. प्रचीती परतणार तर आहेच.
पण ज्यूडच्या नजरेतून स्वतःच्या, आजवर गृहित धरलेल्या भारतीय परंपरांची शक्ती तिला नव्याने जाणवतेय, तिला नवचैतन्य देणारं असं काहीतरी त्या साध्याशा संभाषणातून तिला मिळालंय असं काहीसं रंगवायचं होतं.
ते माझ्या आतच राहिलं असावं. :))

असो. तरीही मनापासून आभार या सर्व खुल्या अन चिकित्सक प्रतिक्रियांसाठी, लिहिण्याइतक्याच त्याही मी enjoy केल्या.

छानच भारती :) आवडले

ऋतुरंगाची वेगळीच मांडणी! आवडल :)

छान लिहीले आहे. पहिले २ ऋतू जास्त भावले. :)

खूपच तरल.... सुंदर.....

धन्यवाद सर्वांना.. तुमच्यासाठी केलेलं हे लेखन. एरवी कविता हा माझा प्रांत.

ऋतुरंगाची वेगळीच मांडणी! आवडली!

तिन्ही रंग आवडले. प्रचीती आणि ज्यूडमधल्या संवादात प्रचीताचा 'याला भारत काय कळणार' ते 'यालाच खरा भारत कळलाय की काय' हा प्रवास शिशिराकडून वसंताकडे नेणारा वाटला.
शब्दसंपन्न लेखनशैली आवडली.