देवी

टेप पहिली - दिवस पहिला

"बो

ल बाळा, काय इच्छा हाये तुजी?"
"आपली कृपादृष्टी राहू दे माते."
"ती हायेच. तुला काय पायजेल ते सांग."
"काहीच नाही माते. आपल्या कृपेने सगळं आहे."
"अन्सुये, याला अंगारा दे. प्रसाद दे."

"आता काही बोलण्यात अर्थ नाही. लेट्स वेट."
"किती दिवस?"
"सांगता येत नाही."
"एकंदरीत काय वाटते?"
"काय वाटणार? तिचा अवतार पाहिलाय.. कपाळाला मळवट, मोकळे केस, हिरवी साडी, हिरवा चुडा. गळ्यात हार, मधेच ते घुमणं, तो घोगरा आवाज... सगळंच अनबिलिव्हेबल!"
"लेट्स टॉक टू समवन एल्स."
"या अन्सुया कोण?"
"माहीत नाही. कळेल."

"ते काय करताहेत?"
"तिचे पाय धुताहेत."
"आणि?"
"आणि तेच पाणी तीर्थ म्हणून प्राशन करणार. आता ते तिच्या पायाजवळ डोकं ठेवतील. ती त्यांच्या डोक्याला पाय लावेल. म्हणजे आशीर्वाद दिला असं समजायचं."
"काय सांगतोयस?"
"सागर, अवनी.. तुम्ही काय करताय इथे?"
"सर, आम्ही जस्ट केस स्टडी ..."
"इट्स नॉट युवर केस. हे सगळं टेप होतंय. यू बेटर गो अ‍ॅन्ड डू युवर जॉब्स."
"सॉरी सर."

टेप पहिली - दिवस दुसरा

"माते, तुम्हाला मला काही सांगावसं वाटतंय ना?"
"मला? तू सांग तुला काही त्रास असेल तर."
"माते, माझे प्रश्न इतके सहज सुटणारे नाहीत."
"देवीला काही अशक्य नाय. सांग, प्रश्न सांग तुजा."
"माते, आपण कोण आहात?
"काय येड्यावानी विचारतोस? मला ओळखत नाय?"
"शांत माते... शांत. मी साधा मनुष्यप्राणी. आपण परिचय दिलात तरच ओळखू शकेन."
"अन्सुये, याला माजी वळख सांग."
"माते, इथे आपण दोघंच आहोत."
"कुटं उलथले सगळे ?"
"यज्ञाच्या तयारीला गेलेत माते."
"विचार.. तुला काय विचारायचं ते."
"आपला परिचय माते?"
"श्री काळकाई माता."
"माते, श्रीमती गायत्री निंबाळकरना आपण ओळखता?"
"नाय. कोण हाय ती?"
"तुमच्या भक्तांपैकीच एक."
"मी भक्तांची नावं लक्षात ठेवत नाय."
"तुम्हाला अन्सुया माहीत आहेत ना?"
"माजी सेविका हाय ती."
"गिरिजाला ओळखता?"
"नाय."
"आणि त्रिंबकराव निंबाळकर?"
"कोण हाय तो?"
"राघवेंद्रराव निंबाळकर?"
"तो आणि कोण?"
"माते, आपण साक्षात देवी आहात. आपणास ह्या भक्तांची नावे लक्षात नाहीत."
"या पंचक्रोशीत माजे अमाप भक्त आहेत. मी कुणाकुणाला लक्षात ठेवायचं आणि कशाला?"
"पण माते...."
"बस. चिक्कार बोल्लास तू. आता बस."
"पण..."

"आजही तेच?"
"यस. उद्या पुन्हा प्रयत्न करतो."
"देअर इज नो अदर वे?"
"देअर आर. बट लेट हर टॉक. इट्स टाइम-कन्ज्युमिंग बट हेल्प्स टू रिसॉल्व द इश्यू."
"ओ.के."

टेप पहिली - दिवस चौथा

"बोल, काय प्राब्लेम झालाय?"
"माते, रात्री तुमचा मुक्काम कुठे असतो? "
"नराधमा, देवीला मूर्खासारखा प्रश्न इचारतोस? एका क्षणात तुझी खांडोळी करेन."
"शांत, माते... शांत."
"अन्सुये..........अन्सुये..."

"गो... गो.. गो... धरा तिला."

"आर यू ओके?"
"यस. फाईन."
"इट वॉज अ रॉन्ग क्वेश्चन."
"या इट वॉज."
"व्हाय डोन्ट यू ट्राय अदर्स?"
"आय थिंक शी इज अ विक्टीम. लेट मी टॉक टू हर फर्स्ट. दे ऑल आर हिअर. आय कॅन कॅच एनी नेक एनीटाईम."

टेप पहिली - दिवस सातवा

"आता कसं वाटतंय तुम्हाला?"
"थकल्यागत वाटतंय. आख्खं अंग रगडून काढल्यागत दुखतंय."
"निवांत रेलून बसा. बरं वाटेल. पाणी हवंय का तुम्हाला?"
"थोडंसं."
"हे घ्या. वाटल्यास पाच मिनिटे निवांत डोळे मिटून पडा. आपण नंतर बोलू."
"नाय. आता ठीक हाय."
"बरं. नाव काय तुमचं?"
"गायत्री... गायत्री त्रिंबकराव निंबाळकर."
"गाव कुठलं तुमचं?"
"फलटणपासून दीडशे किलोमीटर अंतरावर एक गाव हाय. काळकाईवाडी."
"छोटंसं आहे का गाव? "
"नाय. म्हंजे तशी हजार एक घरांची वस्ती असंल."
"बरं. मूळच्या तुम्ही कुठच्या?"
"मूळची मी किल्हारी गावाची. काळकाईवाडीपास्नं साधारण छत्तीस-सदतीस किलोमीटर लांब हाय किल्हारी. उगवतीच्या बाजूला. माझे वडील वैद्य."
"अजून कोण कोण आहेत घरात? "
"आई, दोन भाव. थोरला बजा..बजरंग आणि धाकला रामचंद्र... नवमीचा जन्म त्याचा. म्हणून रामचंद्र. बजरंगाचं लगीन झालंय. हौसा.. वहिनी माझी."
"दोन भावात तुम्ही एकुलत्या एक. म्हणजे लाडाकोडात वाढलेल्या."
"खूप. बाबा मला धनाची पेटी म्हनायचं. लक्ष्मी. ते माजं नाव लक्ष्मीच ठेवणार होते. पण आजा म्हणाला म्हणून मग मला आजीच नाव ठेवलं. गायत्री. मला ते एकटीला कधीच सोडायचे नाय. जंगलात मुळ्या आणायला गेले तरी मीच सोबत लागायची त्यांना. त्यांची सगळी काम मीच करायचे."
"निंबाळकरांशी लग्नाचं कसं काय ठरलं?"
"आमच्या गावात एक भटजी हायेत. कुलकर्णी. त्यांनीच हे निंबाळकरांचं स्थळ माज्यासाठी आणलं होतं. रितसर बघण्याचा कार्यक्रम झाला आणि मग बाकी गोष्टी ठरल्या.... देण्याघेण्याच्या.. पंधरा दिवसात लग्न झालं आणि मी काळकाईत आले. निंबाळकराच्या घरातली मी मोठी सून. ह्यांच्यामागे अजून एक भाऊ. त्याचं नाव परशुराम. ह्यांच्यापेक्षा तीन वर्षानी लहान."
"कसं वाटलं तुम्हाला तुमचं नवीन घर?"
"भलं मोठं हाय घर. आमच्या किल्हारीच्या घरापेक्षा थोडं मोठंच. गावपण छान हाय. गावाच्या बाहेर एक पाणवठा हाय. बारा महिने पाणी असतं त्याला. त्याच्या पलीकडे देवीचं मंदीर. मंदिरात खूप राबता असतो भक्तांचा. देवीची जत्रा असते दरसालाला."
"तुम्ही गेलात की नाही कधी देवीच्या जत्रेला?"
"गेलेले. लग्नानंतरच होती जत्रा."
"लग्नाला किती वर्षे झालीत तुमच्या?"
"चार वर्षे."
"तुम्ही दर वर्षी जाता जत्रेला."
"मी? हो.. जाते ना?"
"नक्की?"
"हो... आता जत्रा झाली ना... मी गेलेले...... यांना विचारा... यांनी नेलंलं... लग्नानंतर.. नंतर... मी.... नाय गेले."
"टण टण टण टण टण टण टण टण टण टण टण"
"गावात राहून सुद्धा तुम्ही कधी काळकाईमातेच्या जत्रेला गेला नाहीत?"
"............."
"गावात राहून सुद्धा तुम्ही कधी काळकाईदेवीच्या जत्रेला गेला नाहीत?"
"माज्या जत्रेत मी नसणार तर कोण असणार?"
"माते !"
"कोण आहेस तू? "
"भक्त माते."
"माझ्या दरबारात का आलास?"
"दर्शनाला."
"झालं दर्शन? चल निघ आता. बाकीच्या भक्तांचा खोळंबा झालेला मला चालत नाय."
"जशी आज्ञा माते."

Devi-2.gif

"नॉट बॅड."
"यप."

टेप दुसरी - दिवस दहावा

"बोला मिसेस निंबाळकर, काय म्हणतेय तब्येत?"
"मला काय झालंय? थोडासा थकवा हाय. बस."
"काळजी करू नका. बाहेर ऊन जास्त आहे आज. त्यामुळे असेल."
"खराय तुमचं."
"आपल्या त्या दिवशीच्या गप्पा अपूर्णच राहील्या. तुम्ही तुमच्या सासरबद्दल सांगत होता."
"माज्या सासरी पैश्या-अडक्याला काय कमी नाय. नोकरचाकर हायेत. शेती, बागायती... सगळं कसं दृष्ट लागण्यासारखं. लग्न करून जेवा मी आले तेव्हा मला तर एकदम राणी झाल्यासारखं वाटलं होतं. पहिले चार महिने ज्याम सुखात गेले. सासूसासर्‍याने तर मला कुटं ठेवू? कुटं नको? असं केलं होतं. पण सुख जास्त झालं की मग ते जाचायला लागतं."
"म्हणजे? नेमकं काय म्हणायचंय तुम्हाला?"
"........"
"बोला मिसेस निंबाळकर."
"हूं........"
"प्लीज तुम्ही........."
"हूंssssss"

"व्हॉट? व्हाय इज शी क्रायिंग?"
"गॉड नोज. आय थिंक आय जस्ट प्रेस्ड अ राँग ट्रिगर."
"नाऊ?"
"लेट्स वेट. लेट हर रिलॅक्स."

टेप दुसरी - दिवस अकरावा

"या मिसेस निंबाळकर, कसं वाटतंय आता?"
"ते ... मी..."
"स्वाभाविकच आहे. मी तर म्हणतो, रडू आलं की माणसाने मनसोक्त रडून घ्यावं. बरंच काही असतं मनात.. सांगण्यासारखं, बोलण्यासारखं. पण आपण अशा गोष्टीच्या तोंडाशी बोळे कोंबून ठेवतो. रडलं की हे बोळे निघतात आणि प्रवाहात कधी कधी मनावरची ओझीसुद्धा वाहून जातात."
"तुम्ही पण रडता?"
"अलबत. रडावंसं वाटेल तेव्हा नक्कीच. या बसा."
".."
"तुम्ही परवा बरंच काही सांगत होता. तुमचं लग्न, सासरचं सुख, सुबत्ता वगैरे... वगैरे... लग्नानंतरचे तुमचे दिवस तसे सुखातच गेले ना?"
"हो."
"हुंड्यावरून काही बोलणी होती का?"
"नाय नाय... तसं काय नाय. पैसा चिक्कार हाय त्यांच्याकडे."
"बरं... एक विचारू तुम्हाला?"
"विचारा."
"तुम्हाला काय वाटतं, तुम्हाला इथे का आणलं आहे?"
"त्यांना वाटते की माझ्या घरचे माझा वापर करत आहेत."
"तुम्हाला नाही वाटत ना?"
"नाय."
"अजून काय वाटतं त्यांना?"
"त्यांना वाटतं मी आजारी आहे."
"तुम्हाला तसं नाही वाटतं?"
"छ्या! मी स्वतः आले ना इथे चालत. काय झालेलं नाय. पण तरी..."
"तरी पण ती तुम्हाला इथे घेऊन आली आहे. म्हणजे काही तरी नक्की असेल. तुम्हाला काही आठवते का, नक्की काय ते?"
"तेच."
"काय तेच?"
"आठवत नाय. म्हणजे मी रात्री झोपाया गेले की मला सगळं लख्ख आठवतं. सकाळी उठून आंघोळ-पांघोळ, न्याहारी आटोपली की मग..."
"मग काय?"
"मग रात्र होते आणि मी झोपायची तयारी करत असते."
"दिवसभरात काय होतं, तुम्हाला काहीच आठवत नाही?"
"नाय. कधी कधी तर रात्रीचं पण आठवत नाय."
"हम्म. आणि हे सगळं केव्हा सुरु झालं? लग्नानंतर की काही दिवसांनी?
"महिन्यांनी."
"तेव्हाचं जे काही आठवतं ते सांगाल?"
"सांगते."
"हं."
"निंबाळकरांच्या घराण्याला वंश हवा होता. माजी सासू मला कोरड्या उलट्या केवा होतात याची वाट बघत होती. पण आठ महिने झाले तरी तसं काही झालंच नाही."
"हम्म."
"..."
"बोला."
"तसं आमी दोघं... एकत्रच होतो...... सगळं काय.......... ठीक.... होतं, पण माझी कूस रुजत नव्हती."
"मुलगा हवा होता?"
"तो तर नंतरचा प्रश्न. इथे तर काहीच होत नव्हतं."
"मग?"
"वैद्य झाले, हकीम झाले, मांत्रिक झाले... पण कशाचा काय उप्योग होत नव्हता. वर्ष असंच गेलं. मग सगळ्यांनी आशा सोडली. माजे दिवस पालटले. राणीची दासी झाली. आता मी फक्त नावापुरती निंबाळकरांची सून होते."
"तुम्ही माहेरी कळवलं नाही?"
"त्याना कळवून तरी काय उप्योग? मला पोर होत नव्हतं हा माजाच दोष. त्याला ते तरी काय करणार?"
"शहरातल्या डॉक्टरांकडे तपासणी करायचा प्रयत्न केला नाही?"
"एकदा केला. पण तरी काय फायदा नाय."
"आणि तुमच्या मिस्टरांची?"
"त्यांची कशाला? पोर त्यांना होणार का मला?"
"मुलं दोघांचं असतं. दोघांची तपासणी व्हायला हवी."
"नाय.. नाय... तसं काय झालं नाय."
"त्रास म्हणजे नेमकं काय करत होते? मारहाण, जेवण न देणं की अजून काही?"
"नाय... नाय...मारहाण नाय."
"बिल्कूल नव्हती?"
"आता घराघरात जे थोडंफार चालतं, तेवढंच. जेवण मिळायचं. पण बोलणीपण मिळायची. उठता-बसता."
"मग?"
"अशात एक दिवस परशुरामाच्या लग्नाचं ठरलं. लग्न झालं. धाकटी जाऊ आली. गिरिजा. आता सगळ्यांचं लक्ष तिच्याकडं होतं. तिला मुलगी झाली. खूप गोड हाय पोर. सुलक्षणा नाव ठेवलंय तिचं."
"गिरिजाला मुलं झाल्यावर थोडं शांत झालं असेल ना घरात?"
"नाय. मी 'वांझ' ठरले. वांझोटेपणाचा शिक्का बसल्यावर आयुक्श नरक झालं. कुटं जाणं नाई, येणं नाई, सण नाई, हौस नाई... बारसं, मंगळागौर, डोहाळे... सगळीकडं बंदी. घरातल्या घरात कैद्यासारखं. आता तर जगावंस वाटेना. निस्तं काम, काम.. आता तर खाण्यापिण्याचे पण हाल व्हायला लागले. इतकं वाईट तर घरातल्या जनावरासोबतबी कोण वागत नव्हतं. आता जणू सगळे माझ्या मरणाची वाट बघत होते. नकोशी झालेली मी सगळ्यांना. अशातच मला फिट्स यायला लागल्या."
"फिट्स? "
"कधी पण कुटं पण पडायची मी. मलाच माजा जीव नको झाला. अशात एकच आधार होता."
"कोण? "
"आमची कुलस्वामिनी. सकाळसंध्याकाळ मी देवीचा धावा करत होते. तिचं नाव जपत होते. आज जे काय चांगले दिवस आहेत ते सगळे मातेमुळे. जय काळकाईमाता."
"टण टण टण टण टण टण टण टण टण टण टण"
"काळकाईमातेवर तुमची अपार श्रद्धाच तुम्हाला तारून गेली म्हणायची."
"...."
"मिसेस निंबाळकर?"
"कोण निंबाळकर? मी काळकाईमाता हाय. कोण आहेस तू? "
"माते, दर्शनासाठी आलो होतो."
"अन्सुया कुठाय ? अन्सुया..........."
"पाठवतो माते."

Devi-1.jpg

"गुड राजाध्यक्ष."
"थॅंक्स सर."
"यु गॉट द ट्रिगर पॉईंट."
"ऑलमोस्ट."

टेप दुसरी - दिवस बारावा

"अनुसया कोण?"
"माजी सासू. तुम्हाला त्यांच नाव कसं माईत? "
"तुम्हीच बोललेलात त्या दिवशी."
"मी ? मी माज्या सासूचं नाव कसं घेईन?"
"तुम्ही नाही तर मग गिरिजा...."
"बरं."
"तर तुम्ही म्हणत होता की तुम्हाला देवीचाच आधार होता."
"हो.. गरिबाला देवाशिवाय दुसर्‍या कोणाचा आधार?"
"तेही खरंय. मग काय झालं?"
"देवीची जत्रा होती. घरातून सगळे जाणार होते. मी गोठ्यात गोवर्‍या लिंपत होते. मला कुणी बोलावलंच नाय. मी तरी बोलले सासूबाईला, मला जत्रंला जायचंय. देवीचं दर्सन घ्यायचंय."
"मग सासूबाई काय म्हणाल्या?"
"नेहमीचं. 'तुजं वांझोटीचं तितं काय काम?' आणि बरंच काय काय.."
"मग मला फिट्स येताहेत असं मला वाटलं."
"मग? "
"मग मला जाग आली तेव्हा मी माझ्या खोलीत होते. सगळे चारीबाजूला उभे होते. माझ्याकडे बघत. मी उठायला गेले तसं गिरिजाने मला पुन्हा झोपवलं. बाकी कोणी पुढे आलंच नाही. मला ते सगळे जरा घाबरल्यागत वाटले."
"का? "
"माईत नाय. मी गिरिजाला विचारलं, "मी इथे कशी?" तेव्हा सासूबाई म्हणाल्या,"तू काय..." पण गिरिजाने त्यांना थांबवलं आणि म्हणाली,"कसं वाटतंय?" मी म्हटलं,"काय झालं? फिट आलेली?" गिरिजा म्हणाली,"हो. झोपा आता." मग सासूबाईपण तेच बोलल्या. दोन-तीन दिवस असेच गेले. मला फिट्स सारखं व्हायचं. मी जागी व्हायचे तेव्हा सगळे माझ्या बाजूला असायचे. पण कोण काही सांगायचं नाय."
"मग?"
"पाचवा दिवस असेल.. सकाळी मी बरं वाटत होतं म्हणून घरच्या कामाला लागले तसे घरातली गडीमंडळी घाबरल्यागत कराया लागली. मला काय कळेना. एक-दोघं तर पाया पडाया लागले. तेवढ्यात सासूबाई आल्या आणि त्यांनी मला आराम करायला सांगितला. मला काय कळेना."
"नंतर अजून काही वेगळं घडलं का?"
"हो... म्हंजे त्याचं असं झालं की दुपारची रात्र कधी व्हायची ते मला कळायचंच नाय. कधी कधी घरात खूप गर्दी असायची. देवीच्या नावानं उदो उदो चालायचा. घरभर सगळीकडे गुलाल पडलेला असायचा. कुटं हार तुरे... कुटं नारळ... नुसते ढीग लागलेले असायचे. परकी माणसं पण असायची. यायची, पायावर डोकं ठेवायची. आशिरवाद मागायची. कुणी मुलाला पायावर ठेवायचं. नवीन लगीन झालेली पण यायची. जो तो पाया पडायचा. मला कसंतरीच वाटायचं. त्यात जीवाला निवांतपणा नव्हता."

"हम्म.... तुम्हाला जेव्हा जाणवायचं की मधे बराच काळ गेलाय. तेव्हा काय वाटायचं ? शारिरीक दृष्टीकोनातून विचारतोय."
"खूप थकल्यासारखं. अंग खूप दुखायचं. डोकं भणाणलेलं असायचं."
"आणि मानसिकरित्या ?"
"भीती वाटायची. काय चाललंय तेच कळत नव्हतं. मी डॉक्टरकडं जायचं सुचवलं तर कोणी मनावर घेतलं नाय."
"अजूनही तशी भीती वाटते का ?"
"हो... इकडे तुमच्याकडे येते आणि जेव्हा जाग येते तेव्हा मी गिरिजाबरोबर असते. कसं काय ते कळत नाय. मला खूप भीती वाटते."
"घाबरू नका. सगळं ठीक होईल. फिट्सवर औषधं आहेत आपल्याकडे. चार दिवसात ठणठणीत व्हाल तुम्ही."
"खरंच?"
"एकदम खरं. तुमच्या काळ.... देवावर विश्वास ठेवा."
"उपकार होतील तुमचे."
" तुम्ही थोडा वेळ बाहेर बसा. तोवर मी गिरिजाशी बोलतो. एक मिनिट."
"जी?"
"तुमच्या जावेशी तुमचं नातं कसं आहे?"
"खूप चांगली आहे ती. थोडी शिकली सवरली हाय. तीपण म्हणत होती की ह्यांना तपासणी करून घ्यायला सांग म्हणून. मीच नाय म्हटलं."
"बरं. या तुम्ही."

टेप तिसरी - दिवस बारावा

"या गिरिजाबाई, बसा."
"जी."
"पहिल्यांदा हा प्रकार घडला तेव्हा नेमकं काय झालं होतं, ते सांगा पाहू."
"आम्ही सगळे तयार झालो होतो. जत्रेला जायला. बाहेर गोठ्यात जाऊबाई होत्या. त्या म्हणाल्या, मी पण येते. तशा सासूबाई चिडल्या. फार बडबडल्या.
"वांझपणावर ?"
"हो. ते ऐकल्यावर जाऊबाई घुमायला लागल्या. मला वाटलं फिट्स येतायेत की काय ? पण हे जरा वेगळंच होतं. सगळे त्यांना तसेच सोडून निघायला लागले. तशा त्या भडकल्या. केस मोकळे सोडले. जोरजोराने घुमायला लागल्या. घोगर्‍या आवाजात किंचाळायला लागल्या, "मी घरात असताना बाहेर कशाला जाताय?"

यावर सासूबाई चिडल्या आणि त्यांच्या अंगावर धावून गेल्या. पण मी अडवलं. मला जाऊबाईंच्या अवताराची भीतीच वाटली होती. काही बरंवाईट होईल की काय अशी भीती.. तेवढ्यात त्या पुन्हा किंचाळल्या. "चांडाळणी, काळकाईवर हात उचलतेस!! झडशील.... हातापासून झडत जाशील!!"

त्यांचा तो अवतार, ते घोगर्‍या आवाजात ओरडणं... सगळच भयानक होतं... काय करावं काही सुचेचना. असं वाटलं, जाऊबाई नाहीतच. दुसरंच कोणीतरी हाय. मग मी पटकन जाऊन त्यांच्यासमोर गुडघ्यावर बसले आणि म्हणाले, "काळकाईमाते, माझ्या सासूला माफ कर. अजाणतेपणी त्याच्याकडून हा अपराध घडला आहे..."

तशा त्या घोगर्‍या आवाजात ओरडल्या, "समजव.. समजव या अन्सुयेला." त्यांचं घुमणं जास्त वाढलं आणि माझे सासू सासरे पण घाबरले. नंतर त्या बेशुद्ध पडल्या. शुद्धीवर आल्या तेव्हा त्यांना काय आठवतच नव्हतं."

"तुम्हांला काय वाटते, तुमची जाऊबाई नाटक वगैरे करत असेल का ?"
"नाही नाही... अजिबात नाही."
"शक्य आहे. सासरच्या त्रासाला कटाळून. असह्य झाल्यामुळे."
"नाही नाही. जाऊबाई तशा नाहीत. मला तर तेव्हा वाटलं की काहीतरी बाहेरचं आहे."
"बाहेरचं ?"
"करणी.. भानामती... पिशाचबाधा... असलं काहीतरी."
"हम्म. बरं, त्यानंतर काय झाल ?"
"३-४ दिवस कधीही त्या घुमायला लागायच्या. बेशुद्ध व्हायच्या. कशाचं काही आठवायचं नाही. त्यातच एकदा लक्ष्मीच्या...आमची मोलकरीण... तिच्या पोटात दुखत होतं. ती जाऊबाईच्या पाया पडली आणि तिने उपाय विचारला. जाऊबाई तरातरा चुलीजवळ गेल्या. त्यातलं जळतं लाकूड घेतलं आणि लक्ष्मीकडे आल्या. आम्ही सगळे घाबरलो. काय करावं काय कळेना. लक्ष्मी तर पळायच्या बेतात होती. जाऊबाईंनी जळत्या लाकडाच्या आगीत हात फिरवला आणि त्याची काजळी अंगठ्यावर घेतली. तो अंगठा लक्ष्मीच्या डोक्यावर दाबला आणि डोकं त्यांच्या हातात. घट्ट पकडलं. लक्ष्मी कळवळली. जाऊबाई काय तरी बडबडत होत्या. काही कळेना. नंतर त्यांनी लक्ष्मीला सोडलं. पण दुसर्‍या दिवशी लक्ष्मीची पोटदुखी गेली होती. तिच्यामुळे गावभर बातमी झाली. लोक दर्शनाला यायला लागली. गडीमाणसं पाया पडायला लागली. तसाही गावात काळकाईमातेचा फार दबदबा. तिच्या कोपाची लोकांना ज्याम भीती. फार संतापी देवी आहे ती साहेब. आता स्वतः देवी गावात आल्यावर कोण तिचा कोप ओढवून घेणार? लोक धावले सगळे आमच्याकडे. आजारी लोकांवर उपचार म्हणू नका, का संसाराचा अडला गाडा म्हणू नका. सगळ्या गोष्टीवर जाऊबाईंकडे रामबाण उपाय. एका दोघांना तर गुप्तधनपण मिळालं. पंचक्रोशीत नाव झालं. आमचं घर हे घर राहिलं नाही. मंदिर झालंय. घरातली राख पण लोक काळकाईमातेचा अंगारा म्हणून नेतात. "

"तुम्हांला खरंच असं वाटतं की देवी त्यांच्या अंगात येते ?"
"येते साहेब. एकदा देवी येऊन गेली की काहीही विचारा. काय उपयोग नाही. काय आठवत नाही."
"हम्म. ठीक आहे. या तुम्ही. त्रिंबकरावांना पाठवा."

"नमस्कार साहेब."
"बसा त्रिंबकराव."
"काळकाईमातेशपथ साहेब, आम्ही काही केलं नाय. ते सगळं आपोआप झालं. ही माणसं उगाच आमच्या मागं लागली हायेत. आमच्या घरात देवी आली. आम्ही तिची पुजा करतो यात काय चूक हाय का ? तुम्हीच सांगा."
"काहीच चूक नाही."
"मग ते सांगा ना त्यांना. ज्याम कट्टाळा आलाय इकडं. लोक चौकशीला येऊन -येऊन जात्यात. कुणाकुणाला उत्तर द्यायचं ? तुम्हीच सांगा."
"त्रिंबकराव, मला सांगा तुमच्या बायकोच्या अंगात देवी येते हे कळल्यावर तुम्हाला काय वाटलं ?" "काय वाटणार साहेब ? आनंद झाला."
"खरंच ?"
"हो ना साहेब. वाडवडिलांची पुण्याई फळाला आली. त्यात माजी बायको देवी म्हणजे तुम्ही विचार करा साहेब. सात पिढ्यातल्या पितरांचा माज्या बायकोमुळं उद्धार झाला. किती पुण्य लाभलं असलं मला."
"तेही खरंच. बर मला सांगा, नेमकी केव्हा यायची देवी ?"
"कधी कधी सकाळी पूजेच्या वेळेला आणि..."
"काही विशेष घडायचं तेव्हा घरात ?"
"घरात ? काय नाय."
"घरात पूजेच्या वेळेला नेमक्या कोणत्या क्षणी देवी यायची ?"
"पूजा तिथे देवळात व्हायची साहेब. घरात काय ते आपलं आईचं नेहमीचं. मग घंटानाद व्हायचा आणि मग देवी यायची."
"ओके. आणि मग ?"
"मग दुपारी निवांत. परत संध्याकाळी आरती व्हायची. घंटानाद व्हायचा आणि मग...."
"देवी यायची."
"हो साहेब..."
"आय गॉट इट."
"काय साहेब ?"
"काही नाही. तुमचे तुमच्या बायकोशी संबंध कसे आहेत ?"
"कसे म्हंजे ? जसे नवर्‍याचे बायकोशी असतात तसे."
"तसं नाही निंबाळकर. तिला मूल होत नाही हे कळल्यावर कसे होते संबंध ?"
".."
"बोला निंबाळकर."
"आई ज्याम बोलायची. मग तो राग मी तिच्यावर काढायचो. त्या दिवसात आमचे संबंध सपलेच होते म्हणा. पुढे मग जेव्हा तिच्या अंगात देवी यायला लागली तशी मला भीतीच वाटायची जवळ जायची."
"का ?"
"ती देवी हाय साहेब. मी साधा माणूस. आता देवीच्या जवळ मी वंगाळ विचार घेऊन गेलो तर भस्म करेल ती मला."
"पण ती तुमची बायको आहे त्रिंबकराव. तशीही रात्रीच्या वेळी देवी तिच्या अंगात नसायची ना ?"
"नसायची साहेब. पण ती आता आमच्या सगळ्यांची देवी आहे साहेब. तिला मी बायको कसा म्हणू ?"

"अनुसयाबाई, तुमच्या सुनेच्या अंगात खरच देवी येते ?"
"तुम्ही बघितलय ना साहेब. आमी खोटं कशाला बोलणार ? हे अंधश्रद्दानिर्मुलनवाले उगाच बोंबाबोंब करताहेत. आमी कुणालाबी फशिवलेलं नाय. एक नवा पैसा कुनाकडून मागितला नाय. लोक स्वखुषीने देवीच्या पायावर टाकतात तेच. तुमी गावात कोणालाबी इचारा."
"तुमची सून तुम्हांला कधी नावाने हाक मारते ?"
"अजिबात नाय साहेब. मान वर करून बघत नाय."
"मग देवी झाल्यावर ती फक्त तुम्हालाच का हाक मारते ?"
"ते तर आता देवीलाच माईत ना साहेब. ते मी कसं सांगू? मला जेवढं झेपत तेवढं करते मी देवीचं. बाकी तिची विच्छा."
"वांझ म्हणून तुम्ही तिचा फार छळ केलात. त्याचा बदला घेत असेल तर?"
"देवी आहे ती साहेब, कोपिष्ट असली तरी मोठ्या मनानं सगळे अपराध पोटात घालते लेकरांचे. आता सुनेला पोर होत नाही तर मी तरी काय बोलणार? जे चार लोक बोलतात तेच मी बोलले. पण देवीला खटकलं ते. देवी माझ्या घरातच आली. गेल्या जन्मीची पुण्याई कामी आली बगा."
"देवी आल्यावर फक्त तुमच्याकडूनच कामे करून घेते का इतरांकडून पण ?"
"देवी माझ्याशिवाय दुसर्‍या कुणाशी बोलत नाय साहेब. तिला काय हवं नको ते मीच बघायचं असा तिचा हुकूम आहे."
"हम्म... "

टेप तिसरी - दिवस चौदावा

"नमस्कार. मी डॉ. अद्वैत राजाध्यक्ष. गेले काही दिवस मी श्रीमती गायत्री त्रिंबकराव निंबाळकर यांच्या केसमधे कांऊन्सलर म्हणून काम करत होतो. त्याचा हा एकंदरीत सारांश. या केसमधील सगळ्या टेप्स पोलिसांच्या स्वाधीन केलेल्या आहेतच. फक्त काही ठराविक टेप्सची कॉपी मी विद्यार्थ्यांसाठी केस स्टडी म्हणून ठेवली आहे. ही त्यातलीच एक कॉपी.

स्किझोफ्रेनिया आणि डिससोशल आयडेन्टिटी डिसऑर्डर. सबजेक्ट श्रीमती गायत्री निंबाळकर. आईवडिलांची एकुलती एक लेक. आयुष्यभर लाडकोडात वाढली. पुढे सासरी पण लाड झाले. पण कुळाचा वंशज देऊ शकली नाही म्हणून वांझ म्हणून त्यांची हेटाळणी झाली. त्यांच्या आयुष्यात प्रथमच त्यांनी रिजेक्शन अनुभवलं. त्याचा नकारार्थी परिणाम त्यांच्यावर झाला. त्यातच सततचे टोमणे, बोलणी, वाद, शिवीगाळ, मारझोड, दुर्लक्ष... या सगळ्यामुळे त्या स्किझोफ्रेनिक होऊ लागली. त्या स्वतः जुन्या संस्कारात वाढलेली असल्याने आपला त्रास त्यांनी माहेरी शेअर केला नाही. एक गिरिजा सोडली तर त्यांच्याकडे लक्ष देणारं कोणीच नव्हतं, पण गिरिजाला स्वतःच्या मर्यादा होत्या. सासूच्या नकळत त्यांना जाऊसाठी जेवढं करता आलं तेवढं त्यांनी केलं. स्वतःच्या दुर्दैवाचा फेरा चुकवण्यासाठी परमेश्वराशिवाय दुसरा कोणताच आधार श्रीमती निंबाळकरांसाठी उरला नव्हता. त्यांनी कुलस्वामिनीचा काळकाईमातेचा धावा सुरु केला. मातेचा कायमचा ध्यास घेतला. त्यांच्या विश्वात तेवढा एकच आधार होता. स्किझोफ्रेनियाचा वाढत्या प्रभावात हेलुसिनेशनला सुरुवात झाली असेल आणि त्याचा परिणाम म्हणून पुढे त्यांच्यात काळकाईमातेच्या स्वरुपाचं प्रत्यारोपण झालं असेल. घंटानाद म्हणजे देवीला जागृत करण्यासाठीच केलेलं मानवी आवाहन... हे सर्वसामान्यांप्रमाणे त्यांच्याही मनात इतकं रुजलेलं की त्या आवाजावर त्यांच्यातली काळकाईमाता जागृत होत असे. काऊंसेलिंगच्या दरम्यान वाजलेल्या घड्याळाच्या टोल्यांमुळे त्यांच्यात देवी जागृत झाली होती. कदाचित घरातल्या पूजेच्या घंटेमुळे ही ते शक्य होऊ शकतं. आपल्या आयुष्यातल्या सगळ्या दु:खांना कारण आपली सासू आहे हा त्यांचा ठाम विश्वास असल्याने त्या फक्त त्यांच्या सासूएवजी दुसर्‍या कोणालाच त्या स्वरुपात ओळखत नाहीत. सासूचा सूड उगवावा हे त्यांच्या मूळ स्वरूपात त्यांना सातत्याने वाटत असावं, म्हणून त्यांच्या दुसर्‍या रुपात त्या फक्त आपल्या सासूकडून स्वतःची सेवा करून घेऊ लागल्या. कुठेतरी त्यांच्या सुप्त मनात गिरिजाबद्दल हळवा कोपरा असावा, म्हणून त्यांची गिरिजेच्या प्रती वागणूक सौम्य राहीली असावी. त्यांच्या वैद्य वडिलांकडून मिळालेलं ज्ञान वापरून त्या लोकांना बरं करू लागल्या. त्यात त्यांच्या बोलाफुलाला गाठ पडली आणि लोकांना त्यांच्यामुळे फायदा होऊ लागला. चमत्काराला लोकांनी नमस्कार करायला सुरुवात केली आणि त्यांची काळकाईमाता पंचक्रोशीत प्रसिद्ध झाली. हे झालं श्रीमती गायत्री निंबाळकरांच्या एकंदरीत व्यक्तिमत्वाबद्दलचे थोडक्यात निदान. बाकी सगळी माहिती आणि टेक्निकल विश्लेषण या फाईलमधे नोंदवण्यात आलेलं आहे.

तिच्या घरच्यांनी तिचा कोणताही वापर केलेला नाही. एक गोष्ट मी सांगू इच्छितो की त्यांनी तिची कोणतीही जाहीरात केली नाही की कोणती दवंडी पिटवली नाही. जे झालं ते माऊथ पब्लिसीटीमधून. माझ्या काऊंसेलिंग मधे तरी मला त्यांनी तसं केल्याचं आढळलं नाही. त्यावर योग्य प्रकाश पोलिसच टाकू शकतील. माझं स्वतःचं असं मत आहे की निंबाळकर कुटुंबासकट एकजात सगळेच बळी ठरलेत. अंधश्रद्धेचे बळी.
याबाबत संबधित अधिकार्‍यांनी काय निर्णय घ्यावा हे मी सांगू शकत नाही. पण श्रीमती गायत्री निंबाळकर यांना ट्रिटमेंटची गरज आहे हे नक्की. त्याचा विचार लवकरात लवकर केला जावो."

टेप चौथी - दिवस अठरावा

"हे मी काय करतेय ?"
"तुम्ही स्वतःला काळकाईमाता समजताय."
"असं कसं?"
"तुम्ही स्वतःच बघा."
"पण ते मला का कसं कळत नाही...."
"तो एक प्रकारचा आजार आहे.यात तुम्ही तुमच्या मूळ रुपापेक्षा वेगळं वागता. पण नव्या रुपाची तुमच्या मूळ रुपाला काहीच कल्पना नसते."
"पण माझं मलाच कसं आठवत नाही ?"
"ते समजवायला फारच किचकट आहे. पण तुम्हाला तुमचं हे रुप आठवत नाही हे खरं आहे. तुमच्या या आजारावर इलाज आहे. तुम्ही यातून पूर्ण बर्‍या होऊ शकता."
"मी देवी झाले म्हणून माझा नवरा वेगळ्या खोलीत झोपायचा ?"
"हो. देवीबरोबर संसार करायची त्याच्यासारख्या सर्वसामान्य माणसाची हिंम्मत तरी कशी होणार ?"
"आधी मी वांझ होते म्हणून ते लांब गेले. नंतर मी देवी झाले म्हणून ते लांब गेले."

स्वतःशीच बोलावं तशा गायत्रीबाई बोलत होत्या.

"गायत्रीबाई तुम्ही आई होऊ शकता की नाही, त्याच्या टेस्ट्स अजून बाकी आहेतच. कदाचित दोष तुमच्या नवर्‍यात असू शकेल."
"त्यांच्यात दोष असला तरी मी आई होऊ शकत नाय ना ?"
"विज्ञान फार पुढे गेलेले आहे. इतर अनेक मार्गांनी तुम्ही आई होऊ शकता."
"पण तो निंबाळकर घराण्याचा वंश असेल काय ?"
"तुमचं मूल आहे म्हटल्यावर...."
"मूल जरी माझं असलं तरी ते निंबाळकरांच आहे असं म्हणता येईल ?"
"...."
"....."
"हे बघा मिसेस निंबाळकर, तुम्ही या आजारातून पूर्ण बर्‍या होऊ शकता."
"तुम्ही माजा इलाज केलात तर काय होईल ?"
"तुम्ही या देवीपणातून मुक्त व्हाल."
"आणि ?"
"तुमचा संसार पूर्वीसारखा होईल. तुमचा नवरा तुमच्याकडे परत येईल आणि तुम्ही चारचौघींसारखं आयुष्य जगाल."
"नको... नको.."
"का ? का नको ? "
"वांझोटेपणाचा शाप घेऊन जनावरासारखं जगण्यापेक्षा मी आयुष्यभर 'देवी' म्हणून जगेन."

बाहेर जाणार्‍या श्रीमती गायत्री निंबाळकरांना अडवण्यासाठी राजाध्यक्ष जागचे हलले सुद्धा नाहीत.

- कौतुक शिरोडकर

प्रतिसाद

जबरी कथा. आवडली.

जबरदस्त कथा :)

चांगली आहे कथा, आवडली.

मस्त रे!

:)

मस्त कथा. आवडली :)

ज ब र द स्त!!

नुसत्या संवादामधून उभारलेली एकदम जबरदस्त कथा.

जबरी.. कथा सांगायची पद्धत फार आवडली. :)

अप्रतिम कथा! शैली अत्यंत परिणामकारक. अतिशय आवडली. :)

फॉर्म भारी. :-)

आवडेश :)

जबरदस्त कथा

फॉर्म आवडला. वेगही छान राखलाय निवेदनाचा. :)

मस्त आहे !!

मस्तच आहे कथा.

:( बिचारी!!

जबरदस्त :)

आवडली :-)

सुरेख कथा! प्रेडिक्टेबल होती पण तरिही खूपच प्रभावी लेखन.

कौतुक, निव्वळ संवांदांमधून छान पुढे नेलीये, कथा.

अतिशय सुंदर लिखाणशैली आहे तुझी!
मस्त जमलिये! :)

राजे.. फार भारी.
मानला तुम्हाला.
ज ब र द स्त.

प्रेडीक्टेबल असूनही कथेच्या फॉर्मॅटमुळे आवडली.

चांगली आहे गोष्ट, एकदम ओघवती. आवडलीच :)

अरे वाह नव्या फॉर्मॅटमधे. मस्त रे कौशि :स्मित:

कथेचा फॉर्म एकदम भारी बॉस ....... संवादातून फारच सुरेख उलगडत गेलीये कथा .......मस्त मस्त :)

वेगळी.. मस्तच..

मस्तच...

कौतुक च्या कथा ह्या आधीही संवादाच्या फॉर्म मध्ये वाचल्या आहेत. हा बाज नेहमीच आवडत आला आहे. :-)

प्रेडीक्टेबल असूनही आवडली. कारण मस्त खुलवत नेली आहे. गायत्रीच्या तसे वागण्याची कारणमीमांसाही छान! :-)

मस्तच.. :स्मित: