प्रकाशाची फुले

हि

का आणि पिका दोघेजण रात्री चांदण्या बघत अंगणात लोळत होते. चांदण्या बघणे हा या दोघांचा आवडता छंद. रात्र झाली की अंगणात गवताची चटई पसरुन ही दोघे बहीणभाऊ चांदण्या बघत बसायचे.
"आपल्याकडे पण असे सुंदर चमकणारे तारे असते तर किती बरं झालं असतं ना?" हिकाने विचारलं.
"हो ना गं. मग आपण चांदण्यांशी खेळलो असतो. त्यांना हातात घेतलं असतं. " पिका म्हणाला.


Prakashachi-Phule-1.gif

"माहितेय? काल सकाळी झाडावरची चिमणी तिच्या मैत्रिणीला सांगत होती, की दूर कुठेतरी म्हणे प्रकाशाचे माळरान आहे. तिथे खूप खूप प्रकाशाची फुलं फुललेली असतात." हिकाने तिला मिळालेली माहिती सांगितली आणि म्हणाली "जाऊयात का आपण ते प्रकाशाचे माळरान शोधायला?"
पिकालाही ही कल्पना खूप आवडली आणि दोन दिवसांनी त्यांनी निघायचे ठरवले सुद्धा! त्या आधी त्यांनी आपल्या मित्रमैत्रिणींना त्याबद्दल सांगितले. तर सगळ्यांनी त्यांना अगदी वेड्यातच काढले.
"म्हणे प्रकाशाचे रान! असे कधी असते का? उगीच तुम्ही काहीतरी ऐकता आणि त्यावर विश्वास ठेवता. त्यापेक्षा इथेच खेळू आपण. "

कोणीच आपले ऐकले नाही असे पाहिल्यावर हिका आणि पिकाला जरा वाईट वाटलं, पण आता तर नक्कीच आपण ते माळरान शोधायचं असं त्यांनी ठरवून टाकलं.
त्या दिवशी पहाटेच दोघेजण उठले. आपापले आवरून निघाले देखील.


Prakashachi-Phule-2.gif

"अगं, पण आपण कुठल्या दिशेने जायचे?"
"हम्म. ती चिमणी म्हणत होती की पश्चिमेला आहे ते रान. आपण त्या दिशेने चालायला लागूयात. मध्येच कुणी भेटलं तर त्यांना विचारता येईल."
असा विचार करत दोघेजण चालायला लागले. वाटेत भूक लागली की कुठल्यातरी झाडांची फळं तोडून खायची आणि एखाद्या झर्‍यावर गोड पाणी प्यायचं. रात्री एखादे झाड पाहून त्याच्या खाली गुडुप्प झोपायचं. असं करता करता सात दिवस झाले. हिका आणि पिका आपले चालतच होते. आता हिकाला वाटायला लागलं की, हे प्रकाशाचे माळरान येणार आहे की नाही? दोघेही तसे दमले होते आणि चालून कंटाळले होते. सातव्या दिवशी रात्री दोघे एका झाडाखाली झोपून त्या माळरानाबद्दलच बोलत होते. तितक्यात झाडाच्या ढोलीतून एक राखाडी घुबड बाहेर आले. घुबड पाहून दोघे थोडे दचकलेच.


Prakashachi-Phule-3.gif

पण तितक्यात ते घुबड त्यांच्याशी बोलायला लागले. दोघांच्या बोलण्यावरून घुबडाला कळाले की दोघे प्रकाशाच्या माळरानाकडे चालले आहेत. आणि सात दिवस चालून सुद्धा त्यांना रस्ता सापडत नाहीये. घुबड म्हणाले "मुलांनो, खरंतर मला प्रकाश अजिबातच आवडत नाही. म्हणून मी नेहेमी प्रकाशापासून दूर जातो. पण मागे एकदा मी थोडे उडत उडत दूर गेलो होतो तेव्हा मला दूरवर खूप प्रकाश दिसला होता. रात्रीसुद्धा असा प्रकाश पाहून मला आश्चर्यच वाटले होते. पण तरी मी काही तिथे गेलो नाही. मी तिथे गेलो की माझे डोळे पार दिपून जातात. पण मला वाटत की तुमचं ते प्रकाशाचं माळरान नक्की तिथेच कुठेतरी आहे."
घुबडाचे बोलणे ऐकून हिका आणि पिका खूप आनंदले. त्यांनी घुबडाकडून तो पत्ता विचारून घेतला आणि पहाटे लवकर निघायचं असा ठरवून गाढ झोपी गेले.
पहाट झाली तशी घुबडाने या दोघांना हाका मारून उठवले आणि घुबड आपल्या ढोलीत परत गेले. हिका आणि पिका पुन्हा एकदा मजल दरमजल करीत निघाले. आज ते खायला सुद्धा थांबले नाहीत. सारखे आपले चालत राहिले. वाटेत एक छोटीशी टेकडी लागली. ती टेकडी चढून ते दोघे वर पोहोचले. तिथे फक्त एकच झाड होतं. आणि समोर दूरवर पसरलेले एक विस्तीर्ण माळरान होतं. त्या रानातून मधूनच वाहणारी एक अगदी छोटीशी नदीसुद्धा होती. नदी दूरवर माळरानाच्या अगदी टोकापर्यंत पोचली होती. आता संध्याकाळही होत आली होती. आणि पुढे गेलो तर निवार्‍याला काहीच मिळणार नव्हते म्हणून दमून ते दोघे झाडाखालच्या एका खडकावर बसून राहिले. आजतरी प्रकाशाचे माळरान दिसेल असे त्यांना वाटले होते, पण छे! आजसुद्धा ते तिथे पोहोचले नसल्याने दोघे फार शिणून गेले. आणि बसल्या बसल्या तिथेच त्यांचा डोळा लागला.
असा किती वेळ गेला कुणास ठाऊक? पण गार वारा सुटला आणि दूरवरून वार्‍याची शीळ ऐकू यायला लागली. त्या आवाजाने त्यांना जाग आली. इतका वेळ त्यांचं त्या माळरानाकडे विशेष लक्ष गेलं नव्हतं पण आता बघतात तर काय सगळ्या रानभर पसरलेल्या गवताला इवल्या इवल्या कळ्या होत्या. इकडे सूर्य पश्चिमेला क्षितिजाखाली जायला लागला आणि काय आश्चर्य! त्या इवल्या इवल्या कळ्या एकेक करून उमलायला लागल्या. त्या फुलांना पांढरट फिकट आणि पारदर्शक अशा पाकळ्या होत्या आणि परागकणांच्या जागी इवलीशी नखाएवढी प्रकाशाची एक कुपी होती. त्या कुपीतून तो निळसर पांढरा प्रकाश बाहेर पडून पांढरट पाकळ्यांमधून हलकेच बाहेर झिरपत होता. हळूहळू त्या निळसर चांदण्यांसारख्या फुलांनी सगळे माळरान भरून गेले. त्या प्रकाशाच्या फुलांचे प्रतिबिंब नदीत पडून नदीसुद्धा चांदण्यांसारखी वाटायला लागली.


Prakashachi-Phule-4.gif

हिका आणि पिका हरखूनच गेले. खाली वाकून फुलांना हातात घेऊन बघायला लागले आणि तो निळसर प्रकाश त्यांच्या ओंजळीत येऊन बसला. हिकाने फुलं आपल्या डोक्यात माळली. पिकाने ती आपल्या कमरेला खोचली. जिकडे पहावे तिकडे हीच प्रकाशाची फुलं होती. दोघांना अगदी आकाश जमिनीवर उतरल्यासारखं वाटायला लागलं. मनसोक्त फुलांशी खेळून झाल्यावर आता कधी एकदा आपल्या मित्रमैत्रिणींना ही फुलं दाखवतोय असे त्यांना होऊन गेले. त्या दिवशी रात्री ते चांदण्या न पाहता या प्रकाशाच्या फुलांशी खेळत झोपी गेले.

-सावली

प्रतिसाद

सुंदर चित्र आणि मस्त कथा.

सावली , गोष्ट खूप आवडली.
इतक्या सुंदर गोष्टीत माझ्या लेकीची चित्रं सामाविष्ट केल्या बद्द्ल तुझे व संपादक मंडळाचे खूप खूप धन्यवाद!

अनन्या, खुप सुंदर चित्रे काढली आहेस हां. खुप आवडली मला. थँक्यु.
विनार्च, खरंतर मीच तुझ्या लेकीला थँक्यु म्हणतेय, इतकी छान चित्रं काढल्याबद्दल. :)

Ananya, great job! the drawings are amazing !!

गोष्ट आणि चित्रही ... खूप गोड... आवडली!

सुंदर आहेत चित्र.

चित्र आवडली सगळी.

चित्र आणि कथा दोन्हीही आवडली

चित्र आणि कथा दोन्ही मस्त. आवडले.

अनन्या, चित्रे गोड आहेत अगदी.
छान गोष्ट.

चित्रं आणि कथा दोन्ही मस्त!
चित्रांची कंपोझिशन्स किती छान आहेत. रेषांमध्येही एक ठामपणा आहे. बालवयात ही समज असणं अगदी प्रशंसनीय आहे.

गोड आहे गोष्ट :)
अनन्या, तुझी चित्रं अतिशय छान आहेत. चित्रकलेत अशीच प्रगती करत राहा. पहिल्या चित्रात हिकाच्या मनातले विचार दाखवायची कल्पना फार आवडली.

चित्रं आणि कथा दोन्ही मस्त! :)

एकदम गोड..

मस्त चित्र :-)

>>>चित्रं आणि कथा दोन्ही मस्त!
चित्रांची कंपोझिशन्स किती छान आहेत. रेषांमध्येही एक ठामपणा आहे. बालवयात ही समज असणं अगदी प्रशंसनीय आहे.<<< +१
शाब्बास अनन्या :)
सावली मस्त !

छानच! :)

:)

अतिशय सुन्दर आणि मस्त बाल कथा आहे खुप च छान.