जाणिवांच्या पलीकडे...

हि

वाळा ओसरत आला की साधारण सगळ्यांनाच 'साकुरा'ची म्हणजे चेरीच्या बहराची ओढ लागते. शुष्क, पर्णहीन, रंगहीन हिवाळ्यानंतर फिकट गुलाबी पाकळ्यांनी अवघा आसमंत रोमांचित करणाऱ्या या फुलांची आस लागणे साहजिकच आहे म्हणा! सगळे डोळे असे साकुराकडे लागले असतानाच त्याच्या महिनाभर आधीच फुलणाऱ्या 'उमे' म्हणजे प्लमच्या बहराकडे फारसे कुणाचे लक्षच जात नाही. खरं सांगायचं तर वसंताच्या आगमनाची चाहूल घेऊन येणारा हा पहिला मानकरी. पण आपल्या पाकळ्या भिरभिरवत, जमिनीवर झेपावत, गुलाबी गालिचे घालणाऱ्या साकुराची नजाकत याला नसल्याने आणि याचा बहरही पटकन येऊन जात असल्याने कुणी त्याची फारशी दाखल घेत नाहीत. हां, पोपटी रंगाचा डोळ्याभोवती पांढरे कडे असलेला चष्मेवाला मात्र या बहराच्या आगमनाने अगदी खूश होऊन जातो.

एके वर्षी कुठेतरी जाहिरातीत एका ठिकाणच्या प्लमच्या बहराबद्दल वाचले आणि तिथे जायचे असे ठरवले. ते ठिकाण तसे फारसे दूर नव्हते. फक्त बस स्थानकापासून बरेच आत चालायचे होते. गारठणाऱ्या थंडीतून आणि बोचऱ्या वाऱ्यातून माझा कॅमेरा सावरत मी चालले होते. बागेजवळ पोहोचले तर समोरच गरमागरम भाजलेले दान्गो म्हणजे भाताचे चिकट गोळे विकायला एक जण बसला होता. थंडीवाऱ्यात गोठून आल्यानंतर काठीला टोचून आमाकारा सॉसमध्ये बुडवलेले ते गरमागरम भाजके गोळे, तिथेच उभे राहून तोंड भाजत खाणे म्हणजे स्वर्गसुखच. पण सध्यातरी कॅमेरा हातात असल्याने हे स्वर्गसुख नंतर परत येताना चाखावे असे ठरवून निघाले.

त्याच्या जरा पुढे एका छोट्या मोकळ्या जागेत फुलझाडांचा बाजार भरला होता. वसंत येणार म्हणून वेगवेगळी फुलझाडे लावण्याचा एक कार्यक्रम घरोघरी असतो. प्लमच्या फुलांचा बहर पाहून जाताना थोडी फुलझाडे, ट्यूलिपचे कंद आपल्या घरी न्यायचे, त्यांची निगा राखायची. हवा उबदार व्हायला लागली की मातीत लावलेल्या त्या कंदातून एक हिरवी रेघ तरारून वर येते. काही दिवसातच वाढलेल्या त्या हिरव्या पानांतून हळूचकन डोकावून पाहणाऱ्या कळ्या शोधायच्या. त्यांची फुले उमलताना पाहायची हा ही एक वेगळाच अनुभव. परतताना करायच्या गोष्टींमध्ये हे कंद घेऊन जायचे कामही टाकून मी पुढे निघाले.

बागेच्या प्रवेशद्वारापाशी पोहोचले आणि थोडीशी निराशाच झाली. साकुरासारख्याच या प्लमच्या बागाही फुलांनी डवरलेल्या असतील अशी काहीशी अपेक्षा मी ठेवली होती. पण दूरवरून पाहताना मात्र ही छोटीशी बाग तशी वाटली नाही. आता आलेच आहे, तर सगळी बाग बघून यावी असे ठरवून मी चालायला सुरुवात केली.

_MG_6420_small_0.jpg
_MG_9894_small_0.jpg

पायऱ्या पायऱ्यांची रचना असलेल्या त्या बागेत खाली उभे राहिले की समोरची अगदी चिमुकली टेकडी रंगीत फुलांनी भरून गेलेली दिसते. त्या पायऱ्या झाडांच्या आसपास घुटमळत आपल्याला टेकडीच्या वर नेऊन पुन्हा खाली आणून सोडतात. जसजसे चालायला लागले तसतसे त्या झाडांमधली नजाकत मला जाणवायला लागली. त्यांचे दाट काळे बुंधे, चित्रासारख्या लयीत वाढलेल्या बाकदार फांद्या आणि त्या फांद्यांवरच चिकटलेली नाजूक गोल पाकळ्यांची, मंद वासाची फुलं! ती डौलात उभी असलेली झाडं पाहून सर्वात आधी काय आठवलं असेल तर ते म्हणजे चिनी चित्रं. मी लहान असताना घरात एका भिंतीवर एक वॉलपेपर होता त्यावरही असंच एक कमानदार झाड असलेलं आठवलं. त्यानंतरही अनेक चिनी चित्रांमध्ये अशी कमानदार खोंडांची झाडं पाहिली होती. अशी गोल पाकळ्या असलेली फुलं पाहिली होती. बरं, या चित्रातल्यासारख्या झाडांवरच्या फुलांतही इतक्या छटा की दोन झाडांच्या फुलांचे रंग एकमेकांशी जुळायचे नाहीत. पांढऱ्यापासून ते गुलाबी, लाल, किरमिजी रंगाच्या छटा ल्यायलेली ही असंख्य सुवासिक फुलं त्या पर्णहीन काळ्या फांद्यांवर खुलून दिसत होती. पायऱ्यांच्या वळणावळणांतून फिरताना मध्येच एक मंद गोड सुवासही अवतीभवती रुंजी घालत होता. अशा नजाकतदार झाडाच्या फांद्यांवर बसून, त्यावर उमललेल्या फुलांमध्ये चोच घालून मध पीत फुलांशी गुजगोष्टी करण्याऱ्या पोपटी चष्मेवाल्याचा हेवा वाटावा तितका थोडाच.

2005_03_05_Umegaoka-068_small1_0.jpg

2005_03_05_Umegaoka-107_small_0.jpg

2005_03_05_Umegaoka-097_small_0.jpg

2005_03_05_Umegaoka-118_small_0.jpg

अशा पक्षांना शोधत आणि वेळावणाऱ्या फांद्यांवरच्या फुलांचे नखरे पाहत जात असताना एक अतिशय वृद्ध अशा आजी दिसल्या. एक बाई त्यांच्याबरोबर सोबतीला होती. ती बहुधा वृद्धांच्या मदतीसाठी येणारी मदतनीस होती. ती आजींचा हात हातात धरून त्यांना प्रेमाने चालवत होती. मध्येच कुठल्यातरी झाडाजवळ त्यांना थांबवत होती. एखादी फांदी वाकवून त्या फुलांचा सुवास आजींना घ्यायला लावत होती. इतक्यात त्यांच्या हातातली लाल-पांढरी काठी दिसली आणि त्यावेळी मला जाणवलं की त्या आजींना पाहता येत नाही. वार्धक्यामुळे म्हणा किंवा इतर काही कारणांमुळे म्हणा, पण त्यांना काही दिसत नव्हते आणि ती मदतनीस म्हणूनच त्यांचा हात धरून बागेतून चालवत त्या सुंदर, नाजूक फुलांचा सुवास, स्पर्श त्यांना देत होती. आजी त्या फुलांना बोटांनी हलकेच कुरवाळत होत्या. त्या मखमली स्पर्शाने आणि त्या सुवासाने आजींचा चेहरा प्रत्येकवेळी उजळून निघत होता. तो स्पर्श आणि गंध त्यांच्या आठवणींच्या कुठल्यातरी बंद दालनाची कड्याकुलुपे अलगद उघडून त्यांना एका वेगळ्याच प्रवासाला घेऊन जात असेल का असे सहजच वाटून गेले. इतक्या म्हातारपणी काहीच दिसत नसताना सुद्धा मुद्दामहून बागेत येऊन त्या फुलांना दाद देण्याची ही आजींची रसिकता म्हणावी की जुन्या आठवणींना उजाळा देण्याची त्यांची अनोखी रीत म्हणावी, हे मला ठरवता येईना.

मी कितीतरी वेळ त्यांचे ते फुलांना अनुभवणे पाहत होते. त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद बघत होते. त्यांच्यासाठी ही कदाचित साधीशीच गोष्ट असली तरी माझ्यासाठी मात्र हा अनुभव एक वेगळेच प्रकाशाचे दालन उघडून गेला. पूर्वी योग्यांना योगसामर्थ्याने हव्या त्या ठिकाणी जाण्याची सिद्धी प्राप्त होती असे म्हणतात. निसर्गातल्या सगळ्या अनुभूतीही जाणिवांच्या पलीकडच्या असतात. तो निसर्ग मनात असाच झिरपत ठेवला तर जाणिवांची कवाडं बंद करूनही आयुष्यात हव्या त्या क्षणी, हव्या त्या ठिकाणी मनानेच जाऊन यायची सिद्धी आपल्यालाही प्राप्त होईल का असे काहीसे वाटून गेले.

- सावली

प्रतिसाद

मी प्रत्यक्षात कधी साकुरा बघितला नाही... पण एक खात्री आहे,
तो या फ़ोटोंपेक्षा सुंदर असूच शकत नाही.

सावली, आवडला लेख आणि त्यातली अजोड चित्रं... शेवट थोडा आटोपल्यासारखा वाटला मला.

सुंदर.

फोटो आणि लेख नेहमीप्रमाणेच मस्त :)

छान लेख आणि फोटो :-)

आवडला पण थोडा लहान वाटला लेख.
फोटो अप्रतिम सुंदर. संपूर्ण झाडाचाही चालला असता का एखादा?

छान आटोपशीर लेख.

सावली, सुरेख लेख... साकुरा तर सुंदर उमललाय तुझ्या लेखात.. पण तो पोपटी चष्मेवालाने कमाल किया... सुंदर फोटो..

मस्त. :-)
प्लमचा बहर कधी पाहिला नाही. पहायला हवा..

सुंदर फोटो (as expected :))

शेवटचे दोन पॅरा आवडले..

शेवटचा पॅरा अप्रतिम आहे. मस्तच :)

सगळ्यांचे मनापासुन आभार. :)
फोटोत असलेला साकुरा नाही प्लमचा बहर आहे. हा वेगवेगळ्या रंगछटांचा असतो. साकुराचा बहर अनेकांनी पाहीलेला असतो, पण प्लमच्या बहराकडे सहसा लक्ष जात नाही.
लहान वाटला लेख / शेवटचे दोन पॅरा >> तेवेढ्यासाठीच वरचा फाफटपसारा. ;) खरं तर त्या म्हातार्‍या आजीची गोष्टं सांगायची होती पण ती फारच छोटी आहे.

अपेक्षेप्रमाणेच फोटो अतिशय सुंदर. लेख छान आहे पण पटकन संपल्यासारखा वाटला. आजींच्या गोष्टीइतकंच आधीचे वर्णन वाचायलाही खूप आवडले होते म्हणूनही असेल :)

गजानन +१

पांढर्‍या चष्मेवाल्याचं नाव काय?

पहिला आणि शेवटचा फोटो सारखाच आहे का?

छान लिहीले आहे.खुप आवडले. त्या आजींचा एक तरी फोटो हवा होता. असे वाटते.

एक छोटासा पण उत्कटसा लेख. आवडला.

फोटो मस्त..

सशल.. पांढर्‍या चष्मेवाल्याचं मराठीत मला माहिती असलेलं नाव चष्मेवाला असंच आहे...

सही लिहीलयस. फोटोही भारी :)

मस्त लिहिल आहेस सावली.
फोटोही सुरेख, नेहेमी प्रमाणे. :)

या लेखातल्या प्रकाशचित्रांमधे बदल का केला आहे?
दांगोचे प्रकाशचित्र मी काढलेले नाही.

प्रकाशचित्रांवर आधारीत लेख असताना मी पाठवलेली आणि आधी व्यवस्थित आकारात असलेली प्रकाशचित्रे अचानक लहान करुन मी न काढलेले एक प्रकाशचित्र त्यात टाकणे हे अजिबात योग्य वाटत नाही.
मी प्रकाशचित्रांवर आधारीत लिहीलेला लेख असेल तर मी माझीच प्रकाशचित्रे टाकते. इतर कुणाचे काही कधी वापरलेच तर त्याला योग्य क्रेडीट लाईन असती. मी इथे हे चित्र टाकलेले नाही.
कृपया आधी होता तशाच फॉरमॅट मधे लेख करावा.

त्या लेखात सुरुवातीलाही एक चुक होती. मी पाठवलेले अजुन एक प्रकाशचित्र ( फुलांनी बहरलेली टेकडी ) त्यात टाकलेले नव्हते. पण कदाचित ते सिलेक्ट झाले नाही ( जे शक्य आहे ) असा विचार करुन मी काही बोलले नव्हते.

दांगोचं प्रकाशचित्र आहे कुठे लेखात? मला साकुरा आणि त्या पक्ष्यांशिवाय दुसरं काही दिसलं नाही.

सायो, माझ्या प्रतिक्रियेनंतर बहुतेक पुन्हा बदल केला आहे.
धन्यवाद संपादक.

मला तरी काही बदल दिसत नाहीये :अओ: असो,

सावली मस्त लेख आणि फोटो !

>>पूर्वी योग्यांना योगसामर्थ्याने हव्या त्या ठिकाणी जाण्याची सिद्धी प्राप्त होती असे म्हणतात. निसर्गातल्या सगळ्या अनुभूतीही जाणिवांच्या पलीकडच्या असतात. तो निसर्ग मनात असाच झिरपत ठेवला तर जाणिवांची कवाडं बंद करूनही आयुष्यात हव्या त्या क्षणी, हव्या त्या ठिकाणी मनानेच जाऊन यायची सिद्धी आपल्यालाही प्राप्त होईल का असे काहीसे वाटून गेले.

सुंदर...

छान लिहीलंय आणि फोटो तर अप्रतिम !

लेख आवडला.