सुरुवात

निवारची संध्याकाळ. आठवड्यातला माझा अत्यंत आवडीचा वेळ. त्यात बाहेर मुसळधार म्हणतात तसा पाऊस कोसळत होता. माझा अत्यंत नावडता आहे हा पाऊस. केव्हा डोळा लागला समजलंच नाही. सव्वापाचचा अलार्म झाला तशी झोपेतून जागी झाले. तोंड वगैरे धुवून कॉफी करून घेतली. कॉफी घेता घेता दुपारी करून ठेवलेली सामानाची लिस्ट पुन्हा एकदा वाचली. जास्त करून भाज्या वगैरेच आणायच्या होत्या. सर्व आवरून बाजारात जाऊन परत आले तेव्हा साडेसहा वाजत आले होते. येताना चांगल्या जुन्या दोन-तीन पिक्चरच्या डीव्हीडीज घेऊनच आले. सागरला रोमँटीक पिक्चर आवडतात आणि मला हॉरर पिक्चर. पण आठवडाभर मला कधीही हॉरर सिनेमा बघता येतात. सागरला मात्र त्याच्या ड्युटीच्या वेळेत सिनेमा बघता येत नाही. म्हणून मुद्दाम सागरच्या आवडीच्या बॉलीवूड डीव्हीडीज आणल्या. पाऊस थोडा कमी झाला होता. फ्लॅटवर आल्यावर फ्रिजमधे भाज्या निवडून लावल्या. सागरने वहीत लिहून ठेवलेली भरल्या वांग्याच्या भाजीची रेसिपी पुन्हा एकदा वाचून काढली. त्यानुसार सर्व सामान आहे का तेही बघून ठेवलं. आयत्या वेळेला घोळ नको.

किचन साफ करत होतेच तेवढ्यात सागरचा एसेमेस आला. त्याला यायला दोनेक तास उशीर होणार होता. हे त्याचं नेहमीचंच आहे. एकतर त्याच्या हॉस्पिटलपासून माझं हे घर चांगलं दीड तासावर आहे. आणि त्याला इमर्जन्सी केसेस आल्यावर निघता येत नाहीच. अजून माझी स्वैपाकाची वगैरे काहीच तयारी झालेली नव्हती. तो दहाच्या सुमाराला येणार मग त्यानंतर कधी स्वैपाक होइल, असा विचार करून मी पोळ्यांसाठी कणीक फूड प्रोसेसरमधे भिजवून ठेवली. हे पण सागरनेच शिकवलेलं. आता कधीतरी असंच एकदा सागरकडून पोळ्या करायला शिकायचं असं मी मनातल्या मनात कुकर लावता लावता ठरवलं. मला एवढा सगळा स्वैपाक शिकवायचं क्रेडिट त्याचचं. त्याला खाण्याची आणि खिलवण्याची जबरदस्त हौस. आधी मला कॉफी आणि मॅगी सोडल्यास अजून काही करता येत नव्हतं. आई ठणाणा ओरडायची स्वैपाकासाठी. पण मला कधीच त्यात लक्ष घालावंसं वाटलं नाही. सागरशी ओळख झाल्यावर मात्र त्याच्या आवडीचा का होईना पण स्वैपाक शिकले. सीडीप्लेयरमधे लताची सीडी घातली आणि निवांत बसले.
लता तिच्या स्वर्गीय आवाजात म्हणत होती...
"रूक जा रात ठहर जा रे चंदा... बितें ना मिलन की बेला"

आज शनिवार आणि उद्या रविवार म्हणजे आमची मिलनकी बेलाच. पण हा असला फिल्मी रोमँटिकपणा वगैरे मेरे बस की बात नहीं. माझ्या दृष्टीने प्रेम म्हणजे जगातली सर्वात मूर्ख कल्पना. पण हे सागरला पटत नाही. तो प्रेमात पडायच्या कल्पनेच्या प्रेमात असल्यासारखा. मी शाळेत असल्यापासूनच प्रेमात पडायचं नाही, लग्न करायचं नाही आणि दुसर्‍याला आपल्या आयुष्याचा ताबेदार होऊ द्यायचं नाही हे ठरवून टाकलेलं होतं. शाळा संपवून कॉलेजमधे गेले तरी हे नियम राहिलेच. बॉयफ्रेंड वगैरे भानगडी कधी केल्याच नाहीत. वर्गातल्या मुली लग्न करून हळूहळू संसारामधे, करीअरमधे रममाण व्हायला लागल्या. मला करीअरमधे पण फारसा इंटरेस्ट कधीच नव्हता. ऊर धपापून धावत पळत पैसा कमवायची माझी स्वप्ने नव्हती. कदाचित दादा कायम म्हणायचा तशी मी अ‍ॅबनॉर्मल असेन. कॉलेज संपवून शहरापासून दूर असलेल्या, या फाईव्ह स्टार होटेलसारख्या असणार्‍या शाळेत येऊन टीचर झाले, तरी माझे जगण्याचे नियम काही बदलले नाहीत मी. इथे शिक्षिका होण्याचं पण काही स्वप्न वगैरे नव्हतं माझं. बाबांच्या ओळखीने जॉब मिळाला, पगार अगदीच भरपूर वाटला म्हणून इथे आले.

खरं तर सागरला अशी रविवारची सुट्टी मिळणं महामुश्किल. माझा प्रश्न नाही. मी केजीची स्कूलटीचर. वर्षातून हव्या तितक्या सुट्ट्याच सुट्ट्या. सागरचं मात्र एमडीचं शेवटचं वर्षं असल्याने त्यालाच वेळ मिळत नाही. आठवड्यातून एखादे दिवशी सुट्टी मिळाली तरी अभ्यास सतत पाठीला लागलेलाच..

जरा कंटाळा आला म्हणून इंटरनेट लावलं, बघितलं तर आईबाबा दोघेही ऑनलाईन नव्हते. यू एसला दादाकडे गेल्यापासून त्यांना भारतात राहिलेल्या या लेकीचा विसरच पडलायं बहुतेक. श्यामलची म्हणजे माझ्या वहिनीची आणि तिच्या बाळाची काळजी घेण्यातच त्यांचे दिवस मजेत चाललेत. एका अर्थाने तेही बरंच आहे म्हणा. तिथेच अजून थोडे दिवस राहू देत म्हणजे बरं. इथे आले की परत माझ्यामागे त्यांची कटकट. लग्न कधी करणार आहेस आणि इत्यादी इत्यादी. सागरबद्दल मी अजून त्यांना काहीच सांगितलं नव्हतं. सांगण्याची काही आवश्यकता आहे असं मला कधीच वाटलं नव्हतं.

थोड्यावेळाने पीसी बंद करून मी पुन्हा किचनमधे गेले. रेसिपी वाचत वाचत वांग्याची भाजी केली. सागरला कदाचित आवडणार नाही, चवीबद्दल फार पक्का आहे तो, पण इतक्या उशीरा आल्यावर तो तरी येऊन कधी करणार? माझ्यासाठी पुन्हा एकदा कॉफी करून घेतली आणि सागरसाठी चहा ठेवला. त्याची एक विचित्र सवय आहे. त्याला चहा पूर्ण थंड लागतो आणि तोही एक नाही दोन कप. एक कप पिऊन झाल्यावर मग लगेच दुसरा कप. एकाच मोठ्ठ्या मगमधे तेवढाच चहा ओतला तर ते चालत नाही.

घड्याळात बघितलं तर दहा वाजत आले होते. सागरचा अजून काहीच पत्ता नव्हता. फोन लावून बघितला तर त्याने उचलला नाही. म्हणजे बाईकवर असेल किंवा अजून हॉस्पिटलमधेच. किती पिडतात या एमडीच्या मुलांना. रोज रोज पंधरा वीस तास ड्युटी करा शिवाय अभ्यास करा. सागरला जवळजवळ सहा महिन्यांनी रविवारची सुट्टी मिळाली होती.

सव्वादहाच्या सुमाराला बाईकचा आवाज आला. मी दार उघडलं.

"हाय, उशीर झालाच गं. काय करणार?" असं म्हणत तो आत आला आणि आल्या आल्या सोफ्यावर आडवा पडला. "काल रात्री ड्युटीवर गेलो ते आता सुटलोय. वैताग नुसता."

मी किचनमधे जाऊन चहा घेऊन आलेच. आता तो चहा बर्फासारखा थंड झाला होता तरी सागरला चालतं. मला कॉफीची किंचित जरी वाफ निवली असेल तरी प्यायला आवडत नाही. माझ्या आणि सागरमधे असणार्‍या अनेक फरकांपैकी हा एक.

"मी स्वैपाक सगळा केलाय. वांग्याची भाजी, भात, वरण झालंय. पोळ्या मात्र तुला कराव्या... "

"आज नाही, प्राची. जाम दमलोय. उद्या करेन. ब्रेड असला तरी चालेल." माझं वाक्य अर्धवट तोडत सागर म्हणाला.

"ओके. ब्रेड आणलाय मी आजच. तू चेंज करून आंघोळ कर आधी. तुझ्या अंगाला हॉस्पिटलचा बेक्कार वास येतोय."

मी किचनमधे येऊन ताटं वाढून घेतली. मायक्रोवेवमधे गरम करत होते तोवर सागर पाठीमागून आला आणि मला मिठी मारत म्हणाला.

"तुझ्यासाठी एक गुड न्यूज आहे."

"काय?" त्याचे ओले केस मी हाताने उगाचच विस्कटत विचारलं.

"आता नाही सांगणार. उद्या सांगेन. चल जेवू या, माझा भूकबळी होईल नाहीतर."

वांग्याच्या भाजीत मीठ थोडं कमी झालं होतं पण चवीला ठीक झाली होती. सागरने पण "छान झाली आहे" म्हणत आणखी भाजी वाढून घेतली. जेवता जेवता सहज मी टीव्ही लावला तर एकही प्रोग्राम धड लागला नव्हता, सगळे पिक्चर पण बघितलेलेच. रिमोटची बटणं नुसती टाकटाक करत होते.

"डीव्हीडी लावू का?" मी सागरला विचारलं.

"बंद कर तो टीव्ही. त्यापेक्षा आपण गप्पा मारू. काय केलंस आठवडाभर?" सागर म्हणाला.

"काय करणार? मी रोज सकाळी आठला शाळेत जाते. नऊ ते बारा वाजेपर्यंत चिल्लीपिल्ली सांभाळते तीपण वीस-पंचवीस, आणि एक वाजता घरी येते, मग निवांत! तुझ्यासारखं थोडंच लाईफ आहे माझं? तुझं मात्र एकदम बिझी बिझी." मी उगाच त्याला चिडवत म्हटलं.

"बिझी तर असतंच, पण त्याहूनही जास्त वैतागवाणं आहे. आमचा तो वेलन सर म्हणजे एक नंबरचा हरामखोर आहे..." पुढे कितीतरी वेळ सागर त्याच्या हॉस्पिटलचे, कामाचे किस्से सांगत होता. ते ऐकत ऐकत त्याने आणि मी टेबल आवरलं. भांडी घासली. साडेअकरा वाजून गेले होते. तो आणि मी बाल्कनीमधे येऊन बसलो. संध्याकाळी इतका पाऊस असला तरी आता आकाश अगदी मोकळं दिसत होतं. मस्त चांदणं पडलं होतं. आजूबाजूच्या बहुतेक घरांचे लाईट्स बंद झाले होते. मी सिगरेट पेटवली.

"चिप्रा, किती वेळा सांगितलंय तुला? सोड ती सवय,"

"सवय थोडीच आहे? रोज रोज ओढत नाही. तू येतोस ना तेव्हाच फक्त."

"का? मला आवडत नाही हे माहीत असूनपण माझा हा खास बहुमान का? थांब, तुला पुढच्या वेळेला कॅन्सर पेशंट्सचे फोटो दाखवतो."

"सागर, किती बोरिंग आहेस रे तू?"

"सो तो मैं हूँ, काय करणार?" माझ्या हातातली सिगरेट त्यानेच विझवली.

मुळात मला सिगरेटचे व्यसन असे नव्हते. पण हल्ली एकटी असताना जास्त वेळा ओढते हे मलाच जाणवत होतं. म्हणून मीच नियम घालून घेतला होता की सागर सोबत असतानाच ओढायची. सागर मला ओढू देणार नाही याची मनाशी पूर्ण खात्री होतीच.

"तू मला गुड न्यूज सांगणार होतास ती काय आहे? आत्ताच सांग ना."

"तू ओळख बघू."

आता मी कशी काय ओळखणार याची गुड न्यूज. तरी काहीतरी गेस करायलाच हवे होते. याचे आईवडील येणारेत? हा गावाला जाणार आहे? याचं परदेशात जायचं नक्की झालं? की याला लग्नासाठी बायको मिळाली?

माझ्या प्रत्येक गेसला पलीकडून नकारच येत होता. शिवाय इतकं सोपं आहे तरी तुला ओळखता येत नाही? अशा टोमण्याबरोबरच एक गालावरच्या खळीसकटचं स्मितहास्य. माझ्याजवळचे बहुतेक गेसेस संपले तरी उत्तर काही मिळेना.

"असू देत. नाही समजलं ना? उद्या सांगेन."
मला थोडा रागच आला त्याचा. पटकन काय असेल ते सांगितलं असतं तर मग तो सागर कसा?

विचार करता करता मनात एक विचार येऊन गेला. हा मला लग्नाचं विचारणार की काय? पण लगेच तो विचार मी झटकून टाकला. काही झालं तरी सागर असे करणार नाही अशी मी स्वत:चीच समजूत घालून घेतली.. आमच्या नात्यातल्या मर्यादा त्याला स्पष्टपणे माहीत होत्या. कित्येकदा मी त्याला या मर्यादांची आठवण करून दिली होतीच. मला लग्नामधे अजिबात इंटरेस्ट नव्हता. त्यातही सागरचे आणि माझे लग्न हे अशक्य कोटीतले होते. कारणे कितीतरी होती, तरी मुख्य कारण म्हणजे मला लग्न करायचेच नव्हते.

"राहू देत. तुला नाही ओळखता येणार, उद्या सांगेन"

"आत्ताच सांग ना, मला सस्पेन्स ठेवायला आवडत नाही."

"बरं मला एक सांग, उद्याचा प्रोग्राम काय आहे आपला?" त्याने माझा हात त्याच्या हातात घेत विचारलं. अगदी समोरच्याला कळूदेखील न देता विषय बदलणं ही सागरची खासियत.

"काय म्हणजे तुझ्या दर सुट्टीचा असतो तोच प्रोग्राम. उद्या उशीरा उठायचं, ब्रेकफास्ट करायचा, निवांत एखादा पिक्चर बघू, लंच बाहेरून ऑर्डर करायचं आणि संध्याकाळी तू जाशील परत हॉस्पिटलला."

"पण उद्या रविवार. तू पूर्ण दिवस घरी असशील ना?"

"हो मी असेनच. नेहमीसारखी तुला घरात एकटं ठेवून कुठ्ठेही जाणार नाही." हे बोलता बोलता मला जांभई आलीच. बारा वाजून गेले होते.

"चल झोपूया," म्हणत तो आत आला. मी पण त्याच्यामागून आले. घरातले सर्व लाईट्स विझवले आणि बेडरूममधे आले. हलकेच सागरच्या मिठीत शिरले.

"आय रिअली मिस्ड यु" माझ्या कपाळावर ओठ टेकवत सागर म्हणाला. "ओह सागर" इतकंच मी म्हटलं... पुढचा तास-अर्धातास आमचा धुंदीतच होता. कधीतरी दीडनंतर डोळा लागला आमचा.

सकाळी मला नेहमीसारखी शाळा नसल्याने मी गजर लावलाच नव्हता. तरीपण सवयीने मला साडेसहाला जाग आलीच. सागर अजून गाढ झोपेत होता.

मी उठून कॉफी बनवली. सागरचा चहा ठेवला. तितक्यात दारावरची बेल वाजली.

दार उघडलं तर एक माणूस उभा होता. हातात एक भलामोठा बुके. अगदी सुंदर कोवळ्या गुलाबांचा. पांढरे, गुलाबी, लाल आणि माझे अगदी आवडते पिवळे गुलाब. बुके सुंदर होताच.

"मिस प्राची इथेच राहतात का?"

"हो, मीच."

त्याने माझ्या हातात तो पुष्पगुच्छ ठेवला. " ही तुमच्यासाठी डिलीव्हरी."

बुकेच्या कार्डावर कुणाचंच नाव नव्हतं. सागरनेच पाठवला असावा याची पूर्ण खात्री होती. बुके घेतला आणि त्या माणसाने सांगितलं त्या कागदावर सही केली. तो माणूस गेल्यावर दरवाजा लावला. बेडरूममधे आले तरी सागर झोपलेला होता. बुके बेडशेजारच्या टेबलावर ठेवला. त्या फुलांचा मंद सुवास येत होता. सागरच्या केसांतून हात फिरवला आणि त्याला हाक मारली.

पण त्याने फक्त कूस बदलली. म्हणजे महाराज झोपेचं नाटक करत होते. दोन-तीन हाका मारून पण उत्तर येइना.

शेवटी त्याला गदागदा हलवलं. जाग आल्याचं नाटक करून डोळे किलकिले करत त्याने माझ्याकडे पाहिलं.

"काय चालू आहे रे हे?" मी ओरडलेच.

"कुठे काय?" पांघरूणातून बाहेर येत तो म्हणाला.

"कुठे काय? ढाण ढाण बेल वाजली तरी तुला जाग नाही. वर म्हणे कुठे काय?"

"चिप्रा, बेल वाजली तेव्हा जाग आली. मला वाटलं दूधवाला असेल." डोळे चोळत तो बाथरूममधे गेला. बाजूच्या टेबलवरच्या बुकेकडे त्याने अजिबात बघितलं नाही.

"सागर, हे अती होतंय." खरं तर मला आता अतिसंताप आला होता. सागर माझा मित्र होता, त्याला सुट्टी असताना एखाद-दोन दिवस माझ्या फ्लॅटवर येत होता इतपत ठीक होतं. पण ही अशी फुलं, चॉकोलेट या असल्या फिल्मी पद्धती मला कधीच पसंत नव्हत्या.

का? कुणास ठाऊक? संताप होत होता हे मात्र खरं. मला प्रेम आणि लग्न या संस्थेचा, त्यासोबत येणार्‍या प्रत्येक पॅकेजचा विनाकारण तिटकारा होता. सागर माझ्या आयुष्यात एक मित्र म्हणून आला. माझ्या दादाच्या क्लासमेटच्या एका मैत्रीणीच्या ओळखीने आमची ओळख झालेली. अगदीच बादरायण संबंध. पण तरी सागर आणि मी खूप जवळ येत गेलो. खरंतर त्याच्यामधे आणि माझ्यामधे काहीच कॉमन नव्हतं. पण तरी तारुण्याच्या जोशामधे असेल किंवा लिव्ह-इनचे थ्रिल म्हणून असेल मी आणि सागर एकत्र आलो होतो हे मात्र खरे. त्याच्या हॉस्पिटलमधल्या ड्युटी असताना तो हॉस्टेलवर रहायचा. सुट्टी असली की मात्र माझ्या फ्लॅटवर.

सागरमधे नाव ठेवायला कुठेच जागा नव्हती. हुशार होता. दिसायला देखणा होता. एमडीपर्यंत डोनेशन न देता मार्कांवर शिकत गेला होता. त्याचे आईवडील साधे शेतकरी होते पण मुलाच्या शिक्षणासाठी कष्ट उचलत होते. सागरला त्यांच्या कष्टाची जाणीव होती. एकुलता एक असल्याने असेल पण शक्यतो तो त्यांना कधी दुखवायचा नाही.

मी बुकेकडे बघत बसले होते तेवढ्यात सागर बाथरूममधून बाहेर आला.

"ब्रेकफास्ट?" त्याने किचनमधे जात मला विचारलं. माझी विचारांची तंद्री भंगली.

"सागर, आपण जरा बसून बोलूयात का?"

"बोलूयात ना. पण बसून नको. भूक लागली आहे. मी ब्रेकफास्ट बनवतो. तू बोल, मी ऐकतो." सागरने फ्रीजमधून काहीबाही काढायला सुरुवातपण केली होती. सागरने दाखवलेला हा दुर्लक्षपणा मला अजिबात आवडला नाही. मी तरातरा उठले आणि बाजूचा बुके घेऊन किचनमधे गेले.

"सागर, हा काय मूर्खपणा आहे?"

"ओह. आला का बुके?" त्याने शांत॑पणे विचारलं. माझा रागाचा पारा आणखीनच चढला.

"सागर, का केलंस तू हे? तूच ऑर्डर केलास ना हा बुके? काही गरज होती का?" माझा आवाज आणखीनच चढला.

"कारण, मला करावसं वाटलं. दॅट्स इट. मला वाटलं की मला तीन दिवसांची सलग सुट्टी मिळाली आहे म्हणून..."

"काय? सलग सुट्टी? ही तुझी गुड न्यूज होती का?" मी मधेच त्याला विचारलं.

"हो! आणि सहज मला वाटलं म्हणून मी तुझ्यासाठी फुलं ऑर्डर केली. त्यामुळे तू इतकी चिडशील असं अजिबात वाटलं नाही." बोलता बोलता त्याने मी करून ठेवलेला चहा कपात ओतून घेतला. कुकरला बटाटे उकडत ठेवले.

"चिडू नको तर काय करू? सागर, तुला माहीत आहे ना... मला हे सर्व नाही आवडत. आपलं नातं हे कधीच या स्टेजला आणायचं नव्हतं. तुलाही आणि मलाही. सागर, वी आर नॉट अ रोमँटिक कपल"

"काय आवडत नाही तुला, प्राची? मी फुलं मागवलेली? तुला लग्न करायचं नाही हे मला चांगलंच माहीत आहे. पण अ‍ॅटलीस्ट आपण एकमेकांवर प्रेम करतो हे तरी मान्य करू या. जगासाठी नसेल तर किमान एकमेकांसाठी तरी."

"म्हणजे काय करूया? एकमेकांना शेकडो रूपयांची फुलं देऊया? चॉकलेटं देऊया? हे केलं की आपलं एकमेकांवर प्रेम आहे हे सिद्ध झालं.? सागर काहीही झालं तरी आपण.. "

"हा.. काय आहोत आपण? मित्र म्हणायच्या स्टेजला नाही राहिलं आपलं नातं. गेली तीन वर्षे एकमेकांना ओळखतो. अधूनमधून फोनवर, चॅटवर गप्पा मारतो. आणि तू जेव्हापासून या मुंबईपासून दूरच्या जंगलात आली आहेस तेव्हापासून आपण एकत्र झोपतो. बरोबर?"

"हे बघ, तुला जे म्हणायचे आहे ते म्हण. खरंतर या विषयावर बोलायचीच माझी इच्छा नाही, मी सर्वात आधी या नात्याबद्दल तुला माझ्या मनात काय आहे ते सांगितलं होतं. मी या नात्याला सध्या काहीच व्याख्या देऊ शकणार नाही."

"पण का?"

"कारण, सागर.. तुझ्या दृष्टीने हे नातं वेगळीच वाटचाल करत चाललंय. तुला माहीत आहे ना.. माझा लग्नावर विश्वास नाही? दोन परस्परभिन्न व्यक्ती एकमेकांसोबत अख्ख आयुष्य काढतात ही संकल्पनाच मला पटत नाही. "

"पण असं का वाटतं तुला? मुळात लग्नाबद्दल मी चकार शब्ददेखील बोलत नाहीये. मला फक्त दोघांच्याही दृष्टीने क्लॅरिटी हवी आहे."

"किती वेळा बोललोय आपण या विषयावर? किती वेळा तेच तेच सांगणार?"

"तेव्हाची गोष्ट वेगळी होती. आता संदर्भ बदललेत प्रत्येक गोष्टीचे." सागरने हातातला चहाचा कप खाली ठेवला. माझ्या अगदी समोर येऊन तो उभा राहिला. "अगदी खरं सांगतोय प्राची, आय अ‍ॅम इन लव विथ यु. मला माझं अख्ख आयुष्य तुझ्यासोबत रहायला आवडेल. कधी ना कधी तुला हे सांगायचचं होतं पण आज सांगतोय... प्राची, आपण दोघांनी... "

Suruvat.gif

"सागर, मला शक्य नाही," मी त्याला मधेच तोडत म्हटलं. रविवारच्या सुट्टीची सकाळ भांडणामधे घालवायची माझी मुळीच इच्छा नव्हती पण सागरचं हे बोलणं म्हणजे अतीच झालं होतं.

"का?" बोलता बोलता तो पुन्हा किचनमधे गेला. गॅस लावत मला विचारलं. "कालची कणीक कुठाय?"

मी फ्रीजमधून काल रात्री भिजवून ठेवलेल्या कणकेचा डबा त्याच्या हातात देत म्हटलं.

"कारण, आज तू माझ्यावर प्रेम करतोस. तुला माझी ओढ आहे म्हणतोस. पण आजपासून दहावीस वर्षांनी पण हेच म्हणशील का?"

"का नाही म्हणणार? तेव्हा कदाचित परिस्थिती बदलेल, नाते बदलेल पण भावना त्याच राहतील ना?"

"का राहतील? भावनादेखील बदलतील. आज ना उद्या सागर, तूदेखील बदलशील. आणि मलाही बदलायचा प्रयत्न करशील. तुला चांगलं ठाऊक आहे की तुझ्या घरामधे मला सून म्हणून कधीच स्वीकारणार नाहीत. बाईच्या डोक्यावरचा पदर ढळला तर घराणं बुडालं मानणारे लोक आहात तुम्ही." सागर काहीतरी बोलणार त्याआधीच त्याला थांबवत मी म्हटलं, "आणि यात तुझी काहीच चूक नाही. पण तू ज्या वातावरणात वाढलास त्या वातावरणात मीदेखील अ‍ॅडजस्ट करावं अशी तुझी अपेक्षा असणारच. सुरुवातीला प्रेमाच्या नवीन नात्याच्या भरात मीदेखील तुझी अपेक्षा पूर्ण करायचा प्रयत्न करणार. तेव्हा मी माझं मन मारत राहणार. कधीतरी वैतागून, चिडून, रडून मी या असल्या अपेक्षांना नकार देणार. तेव्हा तू तुझं मन मारत राहणार. आणि शेवटी कधीतरी एकदा आपल्यापैकी दोघांना आपण चूक केली हे उमगणार. सागर, हे नातं कधीच टिकणार नाही"

"प्राची, कधीतरी वेगळ्या अँगलने विचार कर ना. कुठलंच नातं आपोआप टिकत नसतं. ते टिकवावं लागतं. कुठलीच गोष्ट पर्मनंट नसते. त्यासाठी आपण जबाबदार असतो. जर आपल्याला हे नातं पुढे न्यायचं असेल तर ती आपल्या दोघांची जबाबदारी ठरते. पण तू ज्या घटना अजून घडल्याच नाहीत त्यावरून का भविष्य ठरवते आहेस? उद्या जे काही घडेल त्याबद्दल आता चर्चा करून काय उपयोग? तू आधीच पुढे घडणार्‍या घटनांची भीती घेऊन का राहतेस?"

"ही भीती नाहीये. आजूबाजूला इतके दिवस जे बघतेय त्यावरून सांगतेय. सागर, तुझ्या आणि माझ्यात खूप फरक आहेत. तू स्कॉलर आहेस. एमडी डॉक्टर आहेस. मी साधी बीए. तेदेखील अगदी जेमतेम पास मधे. . किती फरक आहे आपल्यामधे. मी या सर्वांचा विचार केलाय. "

"प्राची, तुला काय वाटतं मी या सर्वांचा विचार केला नसेन? तुझी जात वेगळी, माझी वेगळी. तू गर्भश्रीमंताची मुलगी. मी शेतकर्‍याचा मुलगा. तुझी लाईफस्टाईल, माझं आयुष्य दोन्ही एकमेकांपासून पूर्ण भिन्न आहेत. पण तरीदेखील माझं तुझ्यावर प्रेम आहे. तू जेव्हा विचार करतेयस तेव्हा आपल्यामध्ये किती फरक आहेत याचा. मी विचार करतोय या फरकांच्या पलीकडे जाऊन आपल्यामधे प्रेम असण्यासारखं काय आहे? "

"पण माझं तुझ्यावर प्रेम आहे किंबहुना ते असेलच हे तू का गृहित धरतोयस?"

"नाही, मी ते गृहित धरलेलं नाही. पण तुझ्या इतक्या दिवसांच्या वागण्यावरून ते मला जाणवलंय. तरी मी तुला विचारतोय." त्याने माझा हात हातात घेत विचारलं. "माझ्यावर विश्वास ठेव मी कायम तुला साथ देत राहीन. तुला नको असेल तर आपण ते विधिवत लग्न वगैरे नको करू या. फक्त या नात्याला एक नाव दे."

"याच अपेक्षेने तर सुरुवात होते ना? नात्याला नाव दे. मग मला तुझे नाव दे. मग तू माझ्या मुलाला नाव दे. आणि मग सुरू होतो एकमेकाना नावं ठेवण्याचा खेळ. मला हे सर्व नकोय. मुळात मला लग्नच नको असताना विधिवत लग्न काय किंवा रजिस्टर मॅरेज काय? आणि फक्त एका सहीने तू आपल्या नात्याला नाव देऊ पहाणार आहेस का?"

"नाही, त्या सहीने नात्याला नाव कधीच दिलं जात नाही. ते तुला आणि मला ठरवायचं आहे. सही तर फक्त फॉर्मॅलिटी आहे. आणि जसं तू म्हणतेसं की आपलं नातं बदलेल किंवा या नात्यामधे राहणे तुला अशक्य होईल तेव्हा अशीच एक सही तुला या नात्यातून मुक्त करू शकेल ना?" सागर डॉक्टरपेक्षा वकील चांगला झाला असता असा एक विचार माझ्या मनात टपकून गेलाच.

"मग का करायचं लग्न? आहेत तसेच राहू या. उगाच लग्न नावाचा दांभिकपणा कशाला?"

सागर हसला, अगदी मनापासून हसला.

"दांभिकपणाबद्दल तू बोलतेस? एका मुलासोबत तुझे संबंध आहेत ही गोष्ट तू तुझ्या घरच्यांना सांगू शकशील? "

"हे बघ, तू भलत्यासलत्या गोष्टी इथे आणू शकत नाही. आईवडिलांना माझ्या आयुष्यातल्या कुठल्या गोष्टी सांगायच्या आणि कुठल्या नाही हा माझा वैयक्तिक प्रश्न. उद्या जर आईवडिलांनी मला काही विचारले तर मी खोटं बोलणार नाही, याची मात्र खात्री बाळग. आणि बोलायचचं झालं तर तू तुझ्या आईवडिलांना माझ्याबद्दल काय सांगशील? त्यांना सांगशील की ही तुमची होणारी सून. शाळेत शिक्षिका आहे हे आठवणीने सांगशील पण गेले तीन वर्षे आम्ही एकमेकाना ओळखतो आणि आम्ही एकत्र राहतो.. हे सांगू शकशील? मी सिगरेट ओढते हे सांगशील? "

सागरने काहीच उत्तर दिले नाही.

"नाही ना? का? तर तुझ्या आईवडिलांना माझ्या चारित्र्याची, माझ्या कॅरेक्टरबद्दल शंका निर्माण होईल. आणि तू??? लग्नानंतर कशावरून तुझ्या मनात शंकासुर येणार नाही. ही माझ्याबरोबर लग्नाआधी होती. मग आता ही कुणाबरोबर तरी नसेल... बोल ना?"

"हे बघ, मी दहा वर्षानंतर कसा वागेन? लग्नानंतर कसा वागेन याची गॅरंटी आत्ता कुणीही देऊ शकत नाही, तू कशी वागशील याचीही खात्री कुणीही देऊ शकत नाही. पण आज काय करायचे आहे ते आपण ठरवू शकतो ना? आजचा दिवस कसा जगायचा हे तर आपल्या हातात आहे ना?

"एक्झॅक्टली, सागर. आजचा दिवस जर आपण सुखात आनंदात जगत असू तर तुला का असं वाटतंय की आपण लग्न करावं?"

"मग काय आयुष्यभर असंच रहायचं? संसार, घर, लग्न, मुलं यातलं काहीच नको तुला?"

"संसार? हा तुला इथे आजूबाजूला दिसतो तो काय आहे सागर? हा फ्लॅट मी माझ्या पैशातून घेतलाय. या घरातली वस्तून् वस्तू माझी आहे. हा माझा संसार आहे सागर. आणि मुलांच्या बाबतीत मी अजून विचार केलेला नाही. पुढे वेळ येइल तेव्हा बघेन"

"आणि मी? माझं तुझ्या आयुष्यातलं स्थान काय आहे प्राची? मी तुझ्यासाठी काय आहे?"

"सागर, तुझं माझ्या आयुष्यातलं स्थान माझ्या स्वत:पेक्षाही जास्त महत्त्वाचं आहे. माझं तुझ्यावर प्रेमपण आहे," सागर माझ्याकडे बघून हसला. "हो आहे प्रेम. मी कबूल करते. पण त्या प्रेमासाठी मी आयुष्यभर तुझ्यासोबत रहावं. तू मला आणि मी तुला सहन करत रहावं ही कल्पनाच मला असह्य होते."

सागर पुन्हा एकदा हसला. एका प्लेटमधे गरमगरम आलूपराठे त्याने माझ्यासमोर आणून ठेवले. म्हणजे इथे माझ्याशी इतकी गहन चर्चा करत असताना हा पराठेपण लाटत होता. माझं लक्षच नव्हतं.

"खूप लहान आहेस तू प्राची. अजून जग बघितले नाहीस. समाजामधे हे असे विचार घेऊन राहणं फार कठीण होईल तुला."

"होऊ देत ना. सागर, जेव्हा हा निर्णय मी घेतलाय तेव्हा या निर्णयाची जबाबदारीपण माझीच ना? समाजाच्या, त्यामधल्या त्या तथाकथित हितचिंतकाचा विचार केलाच आहे मी. आणि तरीदेखील मी माझ्या निर्णयावर ठाम आहे. आणि मला असं खरंच वाटत नाहीये की मी आत्ता या वयात लग्न करावं. सॉरी सागर.."

"प्राची, शांतपणे विचार कर. मी तुला कसलीही डेडलाईन देत नाही. पण खरंच एकदा विचार कर. जर मी आयुष्यभर तुझ्यासोबत रहायला तयार असेन तर आयुष्यभर तुझी वाट बघत थांबायलादेखील तयार आहे".

सागरच्या या बोलण्याने नाही म्हटलं तरी मनात खळबळ माजली होती. सागर मला प्रपोज करत होता, जगातल्या कुठल्याही मुलीने त्याला हो म्हणावं असा सागर. पण मला त्याला होकार देता येत नव्हता. माझंच मन मला कुठेतरी थांब म्हणून सांगत होतं. का? मलाही ठाऊक नव्हतं. आपण लग्न करायचंच नाही हा माझा पक्का निश्चय होता. पण कुठेतरी त्या निश्चयाला सुरुंग लागला होता, हे माझं मलाही जाणवत होतं.

सागर प्लेट हातात घेऊन हॉलमधे निघून गेला. मी किचनच्या दारामधे तशीच उभी होते.

कित्येकदा एकटी असताना मी कायम विचार करायचे.. सागर माझ्या आयुष्यात कायमचा आला तर.... जिथे मला जायचंच नव्हतं तिथे माझं मन मला ओढून घेऊन जात होतं. पण मला लग्न या संस्थेचा, त्यासोबत येणार्‍या प्रत्येक पॅकेजचा विनाकारण तिटकारा होता.

का होतय असं? माझं सागरवर प्रेम आहे का? मी त्याच्याबरोबर आयुष्यभर सुखी राहू शकते का? मुळात प्रश्न हा होता की आयुष्यभर मला त्याच्याच सोबत रहायला आवडेल का? मी सध्या आयुष्याच्या त्या वळणावर आलेली आहे का जिथून मी अख्ख्या आयुष्याबद्दचे निर्णय घेऊ शकते? माझी ती तयारी आहे का? फक्त आणि फक्त प्रेम यावरच संपूर्ण आयुष्याचा ताळेबंद मांडला जाऊ शकतो का? माझ्या आईवडिलांचे ठरवून, पत्रिका बघून केलेले लग्न. तरीदेखील माझ्या आठवणीत एक दिवस असा गेला नाही की त्यांचे भांडण झाले नाही. दादा वहिनीचे लव्ह-मॅरेज. पण तरीदेखील त्यांच्यात कुरबुरी होत्याच. छोटीमोठी भांडणे राहू देत, दादाचे यु एसचे काम जर या सहा महिन्यांत झाले नाही तर वहिनीने घटस्फोटाची धमकी दिली होती. हे कसले प्रेम? हा तर सौदा झाला नाही का? मग हेच ताणतणाव माझ्या आणि सागरच्या नात्यामधे येऊ शकतात की नाही? तसे झाले तर ते निभावण्याची ताकद आहे का माझ्यामधे? सागर माझ्याशी नीट वागेल याची खात्री होती पण माझं काय? त्याने लग्नासाठी विचारलं म्हणून मी मोहरून जावं? त्याच्याशी लग्न करून माझं अस्तित्व पुसून टाकावं? छान सजवून विविध रंगांनी काढलेली रांगोळी कुणाच्या तरी पायांनी क्षणभरात विस्कटून टाकावी तसं?

मुळात मला स्वत:ला अजून खूप जगायचं आहे. खूप फिरायचं आहे. स्वतःची अशी वेगळी खूप स्वप्ने आहेत. ती पूर्ण करायची आहेत. अशावेळेला पायांमधे ही नात्याची बेडी घालून घेता येइल का?

पण आज सागरने मला लग्न करशील का म्हणून विचारल्यावर मी इतकी का गोंधळतेय. "नाही" हे स्पष्टपणे सांगू का शकत नाही? सागरला मी माझ्या आयुष्यामधून बाहेर नाही काढू शकत. होय. कारण मी दुबळी होत चालले आहे. सागरच्या प्रेमामधे? की माझ्या प्रेमाने? ज्या प्रेमाबद्दल मला इतके दिवस राग होता त्याच प्रेमाने आज माझी अशी वाट लावली होती. सागरला एका फटक्यामधे "नाही" हे न सांगता येणं हा माझाच पराभव आहे.

माझं मला काहीच समजत नव्हतं. विचार करून करून डोकं नुसतं भणभणायला लागलं होतं.

सागरच्या मोबाईल रिंगने माझे विचार थांबले. बहुतेक त्याच्या घरून फोन असावा. रोज सकाळी त्याची आई यावेळेला फोन करतेच. आणि कितीही कामात असला तरी तो आईशी किमान एक मिनिटभर तरी बोलायचाच. तो बोलत बोलत बाहेर गॅलरीमधे निघून गेला.

मी उठून पुन्हा एकदा कॉफी बनवून घेतली. माझ्या डोळ्यांमधे पाणी आलं होतं. काल रात्री दीडनंतरची झोप, सकाळी उठल्यावर डोक्याला झालेला हा विनाकारण त्रास... खरं तर हा विषय कधी ना कधी निघणारच होता याची खात्री होती. त्यावेळेला मी काय रिअ‍ॅक्ट करेन याची मात्र खात्री नव्हती.

यामधे सागरला दोष देण्यात काहीच अर्थ नव्हता. एखादी चांगली मुलगी बघावी, तिच्याशी लग्न करावं, संसार करावा, मुलंबाळं होऊ द्यावीत अशा अपेक्षांना कुणी चूक म्हणू शकत नाही. पण त्याच अपेक्षा जर माझ्या नसतील तर???

माझी कॉफी पिऊन संपली तरी सागर फोनवर बोलत होता. मधेच हसत होता. गॅलरीच्या फ्रेंच विंडोज बंद करून घेतल्याने मला त्याचा आवाज ऐकू येत नव्हता. फक्त तो दिसत होता. गॅलरीत गॅलरीत त्याच्या येरझार्‍या चालू होत्या. कितीवेळ गेला कुणास ठाऊक? मी नुसती त्याच्याकडे बघत होते.

मला जगायचं होतं. पण हे जगणं मला सागरसोबतपण हवं होतं. मला त्याच्याशी लग्न करून स्वतःला संपवायचंपण नव्हतं. त्याच्या मध्यमवर्गीय चौकटीमध्ये मला माझं आयुष्य कोंबायचं नव्हतं. ज्या समाजाला मी काडीची किंमत देत नाही, त्याच समाजाच्या समोर सागरला मानाने उभं रहायचं होतं. माझी सागरकडून कसलीच अपेक्षा नव्हती. पण त्याला या नात्याला नाव हवं होतं. प्रेमभंगापेक्षा अपेक्षाभंगाचं दु:ख जास्त मोठं असतं. हा तिढा सोडवायचा प्रयत्न कसाही केला तरी मी किंवा सागर दोघांपैकी एक किंवा दोघंही कायमचे दुखावले जाणार...

माझा निर्णय कसाही असला तरी आत कुठेतरी मलाच मारून होणार होता. मीच दुहेरी होत चालले होते का? सागरवर बेभान प्रेम करणारीपण मीच. त्याला आयुष्यभर साथ देण्याचं वचन न देणारीदेखील मीच. एवढा मोठा निर्णय आजवर कधीही घेतला नव्हता मी. या निर्णयाचे परिणाम फक्त मला एकटीलाच नव्हे तर सागरला पण भोगावे लागणार होते.

नक्की काय म्हणावं याला? एका नवीन नात्याची सुरुवात? आमच्या आतापर्यंतच्या नात्याचा शेवट? की एका शेवटाची वेगळीच सुरुवात?

- नंदिनी

प्रतिसाद

विचार, जबाबदार्‍या यांच्यापासून दूर राहणार्‍या नायिकेने या गोष्टींकडे वळण्याचा, किमान पाहण्याचा प्रवास म्हणून कथेकडे पाहता आले, तेव्हा आवडली.

वो अफसाना जिसे अंजाम तक लाना न हो मुमकीन
उसे एक खुबसूरत मोड देकर छोडना अच्छा...

--- साहिर

मस्त कथा. आवडली!

धन्यवाद, मो. जयंता आणि भरतजी.

सुरेख!!!!!