उ
न्हाळा, पावसाळा, हिवाळा! पुण्यासारख्या ठिकाणी लहानाची मोठी झाले, तेव्हा हेच तीन ठळक ऋतू माहीत होते. दुर्गाबाईंच 'ऋतुचक्र' वाचून त्यातले बारकावे अनुभवायची दृष्टी मिळाली. तरीही शाळा सुरू होताना साधारण सात जूनला येणारा पावसाळा, वार्षिक परीक्षा संपल्यावर येणारा उन्हाळा, दिवाळीनंतर येणारी मस्त थंडी! माझ्या शाळकरी मनात ऋतू असेच होते. कॉलेजात त्या ऋतूंमधले रंग दिसायला लागले. गंध जाणवायला लागले, नव्या नात्यांबरोबर त्या गंध, रंगांचीं गुंफण व्हायला लागली. उन्हाळा म्हणजे गुलमोहर आणि अमलताश, पावसाळा म्हणजे रसरशीत ओला हिरवा आणि थंडी म्हणजे दाट धुक्यात हरवलेल्या पहाटे केलेल्या सायकल रपेटी. कालांतराने ऋतूंशी जोडले गेलेले खाद्यपदार्थ.
ह्या ऋतूंबद्दलच्या माझ्या जाणिवा आणखी समृद्ध झाल्या त्या भारताबाहेर केलेल्या भटकंतीमुळे. तिशीत पहिल्यांदा बर्फ पडताना पाहिलं . रात्री दहा साडेदहाला मावळणारा सूर्य पाहिला आणि हिवाळ्यात झाडांचे झालेले खराटे आणि इवलासा दिवसही पाहिला. पण सर्वात जास्त भावला, मनावर ज्याने अगदी खोलवर ठसा उमटवला असा जपानमधल्या पानगळीचा ऋतू. हाच इथे मांडावासा वाटला.
जपानच्या वार्या होतात कामानिमित्त. ऋतू, दिनमान, सण ह्यांपेक्षाही प्रोजेक्ट शेड्युल्स पाहून ठरलेल्या तारखा. ऋतूंच्या कसल्या जाणिवा ? वेदरडॉटकॉमवर नजर टाकायची ते गरम कपड्यांचं ओझ वाहायचंय की नाही ते ठरवण्यासाठी. अगदीच रुक्ष कारभार! गेल्या वर्षी साधारण ह्याच दरम्यान जेमतेम दहा दिवसांचा दौरा होता तोक्यो शहरात. जपानातल्या मित्रमंडळींनी आवर्जून सांगितलं ''कितीही कामात असलीस, तरी फॉल कलर्स नक्की बघ.''
नोंद केली वहीत, तरी मनात रुजलं नव्हतं. आपल्याकडे उन्हाळ्यात बदलतातच की रंग गुलमोहोराचे. आणि पुलंच्या वर्णनातला साकुरा पण काही आता नाही. बघू, जमलं तर. असं ठरवून मी नोंदवहीचं पान उलटलं.
जपानात नेहमीच असतो तसा धावपळीचा आठवडा संपत आला. गुरुवारी पुढच्या दिवसांचा कार्यक्रम ठरवताना नोंदवहीची आठवण आली. कोणत्या तरी कोएन (बाग) च नाव लिहिलं होत. आर्किटेक्ट म्हणून पहायच्या इमारतींची लिस्ट जास्त महत्त्वाची वाटली आणि शनिवार प्लॅन करून टाकला. जपानी वाचता येत नाही त्यामुळे दुसर्या दिवसाच्या मिटिंग्ज कोणत्या स्टेशन जवळ आहेत त्याचा शोध घेऊन स्टेशन नंबर्स लिहून ठेवले. अतिकामसू आणि वक्तशीर जपानी अधिकार्यांना वेळेवर भेटता यावं ह्यासाठी थोडा वेळ हाताशी ठेऊन लवकर निघायचं ठरवलं.
दुसर्या दिवशी ठरल्याप्रमाणे तोरानोमान नावाच्या स्टेशनवर (खरंतर २ लेव्हल खाली) उतरले. नक्की कोणता एक्झिट, वर आल्यावर कोणती दिशा, ऑफिसचा पत्ता, अरेच्या! हीच की बिल्डिंग, करत तासभर आधी पोचले. असा बोनस तास मिळतो तेव्हा हमखास माझ्यातली भटकी जागी होते. कामकर्याचा सदरा बाजूला ठेवला तर बरंच काही दिसायला लागतं. रस्त्यावरची झाडं काय मस्त रंग लेऊन दुतर्फा उभी होती. अगदी हिरवा ते पिवळा, लाल, प्रवास एकाच रस्त्यावर पाहता यावा. कशाला शेजारची झाडं पाहतेस? माझा शेंडा बघ, अजून हिरवा आहे!
हे पाहता पाहता सिग्नलपलीकडे एक बाग दिसली. म्हटलं, काय सगळे म्हणत होते कोएन ते बघून टाकू, आहेच वेळ तर. स्वागतच केलं, ते ह्या सोनेरी पायघड्यांनी. मी थक्क! लगेच दोन पानं नोंदवहीत ठेवायला उचलली.
कोपर्यावर बागेचा नकाशा दिसला. एक छोटंसं नाट्यगृह, ग्रंथालय आणि एक तळं आहे असं दिसत होतं. तळ्याकडे मोर्चा वळवला. जपानी बागरचना, त्यात ओवलेली झेन फिलॉसॉफी याबद्दल अभ्यासलं होतं तरी अनुभवलं नव्हतं.
एक छोटासा ब्रिज ओलांडून पलीकडे गेल्यावर समोर आलं ते तळं. नि:शब्द करायला लावणारं दृश्य. आणि हे असंच होणं अपेक्षित असल्याप्रमाणे केलेली बैठकीची व्यवस्था योजलेली होती. समोर पसरलेलं संथ तळं. पलीकडल्या काठावर तळ्यात ओणवून आपलेच रंग निऱखणारे वृक्ष. मनाचं अस्थिर, गढूळ पाणी हे पाहता पाहता कसं नितळ झालं ते कळलंच नाही. गिरक्या घेत खाली येणारं एखादं रंगीत पान, त्याने उठणारा हलकासा तरंग. आणि परत नितळ दिसणारं पाणी. अवाक् करणारं होतं खरंच. नि:शब्दपणे कधी समोरच्या दृश्याचा भाग होऊन गेले मी, कळलंच नाही. धावपळीच्या धकाधकीच्या कोंदणात बसवलेलं हे अध्यात्म कसं अलगद ओंजळीत येऊन पडलं. जपानी बागरचनाकारांच्या या आविष्काराला दाद द्यावी तेवढी कमीच. कोणताही बडेजाव नाही. मी केलं, असं दाखवायचा सोस नाही. खुपणारे, ओंगळ मानवनिर्मित आविष्काराचे ठसे नाहीत. फक्त सभोवताली दिसणारा निसर्ग त्याच्या पूर्ण सच्चेपणानी असा काही सादर केला की सामान्य माणूसही रसग्रहण करेल.
चांगला कॅमेरा बरोबर नाही ह्याची खंत नाही वाटली. अजूनही त्या अनुभवाचे रंग मनात ताजे आहेत. फार गढुळलं मन की मी अजूनही तळ्याकाठच्या बाकावर जाऊन बसते. मन स्थिर होतं, नितळ होतं. पलीकडच्या काठावरच्या रंगांचं प्रतिबिंब मनात उमटायला लागतं. पानगळीचे रंग पाहताना भेटलेलं हे माझं झेन तळं.
- इन्ना
प्रतिसाद
सुंदर टिपलेत रंग.. आणखी
सुंदर टिपलेत रंग.. आणखी वाचायला आवडले असते.
सुंदर टिपलेत रंग.. आणखी
सुंदर टिपलेत रंग.. आणखी वाचायला आवडले असते.
उत्तम सतत बोनस वेळ मिळो आणि
उत्तम सतत बोनस वेळ मिळो आणि तुझ्यतील भटकी जागी होवो हि सदिच्छ्या.
मस्तच. जपानचे कोएन आणि तिथली
मस्तच. जपानचे कोएन आणि तिथली पानगळ पहाणे हा खरच अविस्मरणीय अनुभव आहे
वा सुंदर आहे पानगळ.
वा सुंदर आहे पानगळ.
इन्ना, खूप छान लिहिलयस.
इन्ना, खूप छान लिहिलयस. फोटोही अप्रतिम! अशीच लिहित रहा :)
छान.
छान.
छान लिहिलयस इन्ना अजून हवं
छान लिहिलयस इन्ना :) अजून हवं होतं :)
छान लेख आणि फोटो, इन्ना!
छान लेख आणि फोटो, इन्ना! :-)
इन्ना, सुरु झालं म्हणता म्हणत
इन्ना, सुरु झालं म्हणता म्हणत संपलं की... फोटो छान आहेत... शब्द चित्रं सुंदर...
वर सगळ्यांनी म्हणले तसे
वर सगळ्यांनी म्हणले तसे छोटेखानी झाले आहे थोडे इन्ना.
सावली +१.
जपानी बागरचना, त्यात ओवलेली झेन फिलॉसॉफी >> खरंय. 'किमया' आठवले. :-)
लांबी कमी वाटली. एक प्रश्न
लांबी कमी वाटली.
एक प्रश्न पडला स्वतःला - नीटनेटकेपणा, स्वच्छता, वक्तशीरपणा अशा गुणांची बॅकग्राऊंड लाभली तर हे ऋतू भारतामधल्या शहरांमध्येही मूळ रूपासकट अनुभवता येतील नाही का? तात्पर्य, परदेशात शहरांमध्ये अनुभवायला मिळणारे ऋतुंचे हे वर्णन भारतात केवळ त्याला पूरक गोष्टी नाहीत म्हणून मिळत नाही, हो ना?
अजून लेख वाचला नाही पण
अजून लेख वाचला नाही पण आनंदयात्री च्या प्रश्नाला उत्तर द्यावंसं वाटलं .. परदेशात कुठे रहाता ह्यावर ऋतू किती ठळकपणे कळतात, अनुभवता येतात हे अवलंबून असतं .. भारतात (मी मुंबईची म्हणून मुंबईबद्दल बोलते) पावसाळा आणि उन्हाळा हेच दोन मुख्य ऋतू .. आणि ते ठळकपणे जाणवतात, दिसतात, अनुभवता येतात हे नक्कीच नाकारता येणार नाही .. :)
आवडलं .. >> लांबी कमी
आवडलं .. :)
>> लांबी कमी वाटली.
+१
मधले तीन फोटो पाहून "ह्यापेक्षा आणखी जास्त चांगले फोटो असतील का"? असा विचार आला मनात ..
हम्म्म सशल
हम्म्म सशल :)
फोटो आवडले. मस्तच आहेत. बाग
फोटो आवडले. मस्तच आहेत. बाग आणि निसर्गाची रंगपंचमी यावर आणखी वाचायला आवडलं असतं.
लांबी का कमी म्हणे.. अजून
लांबी का कमी म्हणे.. अजून थोडा मोठा चालला असता की लेख... आणि फोटोचा आकार पण मोठा चालला असता...
अजून थोडा मोठा चालला असता की
अजून थोडा मोठा चालला असता की लेख... आणि फोटोचा आकार पण मोठा चालला असता.. >>> +१
छान, आवडला लेख, डोळ्यासमोर
छान, आवडला लेख, डोळ्यासमोर तळं जसच्या तसं आलं, सुंदर, नितळ, गढुळलेल्या मनाला शांत करणारं...
फार सुंदर
फार सुंदर शब्दानुभूती,चित्रानुभूती दिलीत, धन्यवाद..
आवडला पण पटकन संपला लेख. फोटो
आवडला पण पटकन संपला लेख. फोटो छान! (पण मोठे चालले असतेच!)
प्रतिसादाबद्दल सगळ्यांना
प्रतिसादाबद्दल सगळ्यांना धन्यवाद!
खरतर संपादकांनीही लेख थोडा मोठा करावा अस म्हटल होतं , पण नाही जमलं . क्षमस्व.
पुढच्या लिखाणात नक्की प्रयत्न करीन.
सुंदर फोटो आणि लेख !
सुंदर फोटो आणि लेख !
शब्दानुभूती सुंदर आहे... पण
शब्दानुभूती सुंदर आहे... पण फोटोज मात्र तितका अनुभव देवू शकले नाहीत..
छान आहे. पण फारच लहान वाटला..
छान आहे. पण फारच लहान वाटला.. सुरु होता होता संपला..
फोटो मोठे चालले असते अजून.
खूप छान लिहिलं आहे.
खूप छान लिहिलं आहे.
फार गढुळलं मन की मी अजूनही
फार गढुळलं मन की मी अजूनही तळ्याकाठच्या बाकावर जाऊन बसते. मन स्थिर होतं, नितळ होतं. पलीकडच्या काठावरच्या रंगांचं प्रतिबिंब मनात उमटायला लागतं. >>>> निसर्गाची अशी अनुभूती फारच थोडे घेऊ शकतात, तुम्ही अशा भाग्यवानांपैकीच एक.
अप्रतिम लेख.
<चांगला कॅमेरा बरोबर नाही
<चांगला कॅमेरा बरोबर नाही ह्याची खंत नाही वाटली>
समोर आलेलं दृश्य इतरांना दाखवण्यासाठी किंवा स्वतःच पुन्हा पहाण्यासाठी कॅम्रेर्याने टिपण्याच्या नादात मनात झिरपू द्यायचे राहून जात असेल का?
अनेकांनी म्हटलं तसं लेख छोटा वाटला, फोटो लहान वाटले, पानगळीचे रंग म्हणताना झेन गार्डनचा ठसा तेवढा दिसला. तरीही हे सगळं खटकलं नाही.