"च
हा घेणार?" या सहज विचारलेल्या प्रश्नाने कित्येक लोकांसाठी नवीन मैत्रीचे दरवाजे उघडले गेले असतील, हे खरं वाटत नाही ना? घरी आलेल्या पाहुण्यांना, ऑफिसमध्ये नवीनच रुजू झालेल्या सहकार्याला, खूप दिवसांनी अचानक रस्त्यात भेटलेल्या मित्राला, पावसात बाईकवर दोघांनी मनसोक्त भटकल्यावर एकमेकांना, कॉलेज बंक करून आपल्यासोबत भटकणार्या मैत्रिणीला किंवा दोन अनोळखी व्यक्तींनी एकमेकांना "चहा घेणार?" विचारल्यावर उत्तर नेहमी होकारार्थीच येते. तेव्हा चहा हे फक्त एक निमित्तमात्र ठरते. कधी मैत्री करायला तर कधी भरपूर गप्पा मारायला, कधी जुन्या आठवणींमध्ये रमायला, कधी इतरांबद्दल गॉसिप करायला, तर कधी आधी झालेले वाद मिटवायला. एका चहाच्या कपाने किती नवीन मित्र मिळवून दिले असतील याची गणतीच नाही.
या सगळ्या आठवणी, प्रसंग, गप्पा, वादविवाद चहा'सेंट्रिक' आहेत. कप'सेंट्रिक' विचार करायला मला पॉटरीच्या क्लासलाच जावे लागले. तोपर्यंत मी चहाचा कप कसा असावा याबद्दल कधी विचारच केला नव्हता. जी गोष्ट अगदी आपल्या लहानपणापासून नजरेसमोर आहे, तिच्याबद्दल आत्तापर्यंत एकदाही डोक्यात विचार येऊ नये, म्हणजे कमाल आहे ना! माझा चहापासून सुरू झालेला प्रवास चहाच्या कपापर्यंत कसा आला, याबद्दल मला स्वतःलाच खूप आश्चर्य वाटते. पण यात अमेरिकन शिक्षण पद्धतीचा खूप मोठा हात आहे.
अमेरिकेतल्या विद्यापीठात आल्यावर सगळ्यात जास्त आश्चर्य वाटले ते याचे की इथे शास्त्र, वाणिज्य, कला अशा वेगवेगळ्या शाखाच नव्हत्या. कुठलेही विद्यार्थी कुठल्याही विषयाचे कोर्सेस करू शकत होते. एक किंवा दोन क्रेडिट असलेले असे कितीतरी विषय होते, जे साईड बाय साईड करता येतील. कारण त्यांना आठवड्यातून २-३ तासांपेक्षा जास्त वेळ द्यावा लागत नव्हता. मग दर सेमिस्टरमध्ये एक असे पोहणे, योगासन यापासून ते बोटींगपर्यंत आवडलेले कोर्सेस करायचा मी सपाटाच लावला
आत्तापर्यंत मी आपल्याकडे एखादा तरी कलागुण असायला हवा, असा नुसता विचारच करायचे. लहानपणी हे शिकायला हवे होते, ते करायला हवे होते, असा विचार करण्यात वेळ घालवण्यापेक्षा आत्ता आपण त्यासाठी प्रयत्न करू शकतोच की, हे लक्षात आले. त्यानंतर कुठल्यातरी क्लासला नाव घालायचे ठरवले. पण नक्की काय शिकायचे? शाळेतल्या चित्रकला, संगीत, विषयातली माझी गती आणि मिळालेले गुण इतके भयानक होते की त्या क्लासपासून दूरच रहायचे ठरवले. असे करता करता मी विद्यापीठातून दुसरीकडे जाण्याची वेळ आली.
नवीन गावात रहायला आल्यावर घराजवळच्या कम्युनिटी कॉलेजचा कॅटलॉग घरी आला. विषयांची यादी बघता बघता अचानक सिरॅमिक १, सिरॅमिक २ असे विषय दिसले आणि मग कसलाही विचार न करता कुठल्याही कलेचा कुठलाच अनुभव पाठीशी नसताना पॉटरी क्लासला दाखल झाले.
नाव नोंदवल्यावर लक्षात आले की, अरे! हे आपल्याला वाटते तेवढे सोपे नाहीये प्रकरण! आपण ठरवू तसे तर काहीच होत नाही. पण हे सगळे करताना खूपच मजा येतेय, खूप आनंद मिळतोय. हे सगळे मी आधी का नाही शिकले? हे शिकले असते तर कदाचित शास्त्र शाखेकडे वळलेच नसते. ज्यांना लहान वयातच आपल्याला काय हवंय हे कळते, ते लोक खरंच नशीबवान म्हणायचे की! क्लास करताना पहिले काही महिने भांडी घडण्यापेक्षा बिघडतच जास्त होती. क्लास लावणार्या सगळ्या विद्यार्थ्यांच्या अपेक्षाही तश्या अगदी माफक(!) होत्या, क्लास संपताना आपल्याला घरच्यासाठी वापरायचा एक डिनरसेट करता आला पाहिजे की झाले. क्लासच्या सुरुवातीला बर्याच जणांनी ही अपेक्षा सांगितल्यावर सरांनी आम्हाला विचारले, "तुम्हाला काय वाटते किती दिवसांच्या सरावानंतर तुम्हाला असा सेट करता येईल?" सगळ्यांची उत्तरे तीन महिने ते सहा महिने यामध्ये आली.
सरांनी तेव्हा बहुदा मनातल्या मनात कपाळावर हात मारून घेतला असणार. त्यानंतर त्यांनी आम्हाला सकारण सांगितले की असा सेट करता येण्यासाठी मुळात कप, बशी, प्लेट, बोल असे सगळे प्रकार चाकावर करता यायला हवेत आणि नुसतेच करता यायला हवेत असे नाही तर एकसारख्या आकाराची आणि वजनालाही सारखीच असलेली भांडी करता यायला हवीत. अशी सुबक एकसारखी दिसणारी सेट मधली भांडी येण्यासाठी किमान दहा हजार तास चाकावर काम केलेले असायला हवे. दहा हजार तास? बापरे! रोज आठ तास ऑफिसमधे काम करणारे लोक वर्षाला दोन हजार तास काम करतात. थोडक्यात काय तर पाच वर्षे फुलटाइम पॉटरी केली तर आपल्याला हे करता येणार. ही अतिशयोक्ती आहे, असे जरी गृहीत धरले तरी निदान चार-पाच हजार तास तरी चाकावर सराव करायला हवा हे कळले आणि तशी मानसिक तयारी करणे सुरू झाले.
चाकावर काम करताना लक्षात यायला लागले, की एकदा चाकावर माती ठेवली की भांडे घडवायला फार वेळ आपल्या हातात नसतो. सतत पाणी वापरत असल्यामुळे माती हळूहळू सैल होत जाते आणि काही वेळाने इतकी सैल होते की सगळी भांडी मान टाकतात. तेव्हा शक्य तितक्या कमी वेळात भांडे बनवणे आवश्यक आहे, अश्याने आपले दहा हजार तास कसे काय पूर्ण होणार असाही एक विचार डोक्यात येऊन गेला. हँन्डबिल्डींग किंवा स्कल्प्चर करताना हा प्रश्न येत नाही. तुम्ही कित्येक दिवस एकाच मूर्तीवर काम करू शकता. तसे चाकावर काम करताना होत नाही. आज करायला घेतलेला कप आता कंटाळा आला म्हणून उद्या पूर्ण करता येत नाही. याचा फायदा असा की लक्षपूर्वक काम करत जाण्याचे प्रमाण वाढत जाते. बरं, नुसते भांडे करून काम संपत नाही, त्याला हँडल करणे, झाकण करणे, सगळी भांडी वाळवणे, भट्टीत भाजणे, भाजलेले भांडे परत रंगवणे (ग्लेझिंग), रंगाच्या भट्टीत टाकणे अशी अनंत कामे असतात. एवढे करून भट्टीच्या अग्निदिव्यातून सहीसलामत रंगवलेले भांडे मिळणे ही एक प्रकारची लॉटरी असते, सीतेनंतर अशा अग्निपरीक्षेला मुकाट्याने तयार असतात ती ही मातीची भांडीच. थोडक्यात काय तर पॉटरीमुळे मला खर्या अर्थाने 'कर्मण्येवाधिकारस्ते ... ' अनुभवायला मिळाले असे म्हणायला हरकत नाही.
जसजसा चाकावर काम करण्याचा अनुभव वाढत गेला, तशी काय चुका करू नयेत याची यादी लांबत गेली आणि चांगले भांडे मिळण्याची शक्यता वाढत जाते हे कळले. अर्थात ही शक्यता ५०% पेक्षा जास्त होत नाही, ही गोष्ट वेगळी. या सगळ्यात काही काळ गेल्यानंतर आम्हाला हवा असलेला डिनरसेट करण्याच्या दृष्टीने खरी असाइनमेंट मिळाली ती म्हणजे चहाचे कप बनवायची. एक कलाकार म्हणून चाकावर कप बनवताना तो कसा बनवायचा असा प्रश्न जेव्हा आम्हाला वर्गात विचारला, तेव्हा बहुतेकांनी 'कसा म्हणजे काय?', एक पीव्हीसी पाईपसारखा सरळसोट ग्लास बनवायचा आणि त्याला हँडल लावायचे एवढं सोप्पंय ते! असे उत्तर दिले. त्यानंतर आमच्यासमोर साठ सत्तर कप ठेवले गेले. एकही कप दुसर्यासारखा नव्हता. मग त्यातला नक्की कुठला कप चांगला हे कसे ठरवायचे?
घरी किंवा ऑफिसमध्ये आपल्या आवडीचा एखादा कप, मग वा ग्लास असतो. कितीही वेगवेगळे कप-मग समोर आले तरी त्यातून ठराविकच कप निवडला जातो. त्या कपाचा आकार, रंगसंगती, कपाला स्पर्श केल्यावर हाताला जाणवणारा पोत (खरखरीत, मऊ, खडबडीत टेक्श्चर), कान कसा धरता येतो, एका बोटाने की व्यवस्थित चारही बोटे वापरून, कप किती वजनदार आहे, चहा पिताना ओठांना जाणवणारा कपाचा काठ, कपात चहा किती काळ गरम राहतो, ह्या सगळ्या गोष्टी कळत-नकळत आपल्या निर्णयात महत्वाची भूमिका निभावतात. जी गोष्ट आपल्या ओठांना स्पर्श करणार आहे त्याबद्दल गंभीरपणे विचार करणे आवश्यक आहे. त्याचप्रमाणे आपल्या डोक्यात कधी कुठल्या प्रकारच्या कपातून चहा प्यायचा हे पण कळत-नकळत फिट्ट बसलेले असते. जसे पाहुणे आले की कपाटातले चिनीमातीचे नाजूक नक्षीकाम केलेले ठेवणीतले कप बाहेर येतात, ऑफिसमधे मिटींगला सोबत नेतांना तासभर तरी पुरेल एवढया मोठ्या टंबलर सारख्या मगात चहा नेला जातो. कोपर्यावर दोस्तांसोबत असताना मात्र एकदम दोन घोट मावेल अश्या छोट्या कपात कटींग प्यायचा असतो आणि खास कोणाला तरी सोबत घेऊन कॉफी प्यायची असेल तर मस्त एकदम सुबक कप देणार्या कॅफेत.
जेव्हा पॉटरी क्लासमध्ये कप करायला शिकवले, तेव्हा कप कसा बनवायचा याच्यासोबतच एक भला मोठा प्रश्नोत्तराचा तास झाला, "कप कसा असू नये" यावर. धक्का लागून पटकन लवंडणारे नकोत हं! म्हणजे तेच ते पाहुण्यांच्यावेळी काढतो ते ठेवणीतले त्रिकोणी दिसणारे एवढयाश्या बुडाचे कप. हल्ली बशी कोणी वापरत नाही नाहीतर निदान बशीमुळे तरी थोडे स्थिर राहतात ते कप. जास्त वेळ चहा गरम राहील असा आकार हवा म्हणजे मोठे तोंड असलेला नको, तोंड लहान आकाराचे हवे, कपाचा कान व्यवस्थित धरता यायला हवा. अगदी छोटा, एकही बोट धड जात नाही असा नको. म्हणजे तेच ते आपले पाहुणे-नाजूक-ठेवणीतले कप. कप वजनाला फार हलका नको, लगेच टिचतो आणि खूप जडही नको कारण खूप जड झाला तर चहासहित अजूनच जड होतो आणि मग लोक चहा न संपवता अर्धवटच ठेवतात.
थोडक्यात काय तर योग्य आकाराचा, योग्य वजनाचा, योग्य पद्धतीने कान असलेला, न लवंडणारा, चहा जास्त वेळ गरम ठेवणारा असा बहुगुणी कप बनवायचा. या वर्णनावरून प्रत्येकाने या सगळ्या कसोट्यांवर उतरणारे आपापले कपाचे डिझाइन तयार करायचे आणि हे सोपे होते म्हणून की काय, तर एक कप नाही तर एकसारख्या दिसणार्या सहा कपांचा संच चाकावर बनवायचा. "ये मुश्कील ही नही नामुमकीन है मेरे लॉर्ड" असे आम्ही सरांना सांगून टाकले. यावर आम्हाला सांगितले गेले की वजनकाट्यावर मोजून सारख्याच वजनाचे मातीचे गोळे घ्यायचे, नंतर सगळ्या गोळ्यांचे चाकावर ठराविक एकसारख्या उंचीचे आणि रुंदीचे ग्लास बनवायचे, त्याला एकसारखा 'योग्य' आकार द्यायचा, हाय काय नाय काय! म्हणजे घ्या! क्लासच्या सुरुवातीला आम्हीपण हेच सांगितले होते ना फक्त ते योग्य आकार, योग्य वजन, योग्य कान एवढे नव्हते सांगितले बाकी सगळे सेम टू सेम. मग मी एप्रन बांधून कंबर कसली. मुळात एकसारख्या आकाराचे ग्लास बनतील तर शपथ. कधी खूप रुंद बोल, वाडगा म्हणून खपेल असा ग्लास तयार व्हायचा (जेव्हा वाडगा करायचा होता तेव्हा मात्र असा पसरट झाला नाही) तर कधी खूप किडकिडीत उंच ग्लास व्हायचा. त्यामुळे माझा प्रत्येक कप "जाना था जापान पहूँच गए चीन समझ गए ना" अश्या अवस्थेत होता.
पहिल्यांदा केलेले बरेचसे कप इतके अवजड होते की क्लासमधल्या एकाने त्याचा 'डोअर स्टॉपर' सारखा उपयोग करायचा सल्ला दिला. हे असे चहाला निरुपयोगी असलेले अवजड कप माझ्या घरी जागोजागी विराजमान झालेत. कारण त्यांचा उपयोग मी मोठ्या हुशारीने पेन, पेन्सिल ठेवण्यासाठी, छोटे मनिप्लँट लावण्यासाठी, पर्समधली चिल्लर काढून ठेवण्यासाठी, केसांच्या पिना,बो ठेवण्यासाठी केला आहे. किती छान उपयोग केलायस तू कपांचा अशी सगळ्यांकडून पाठीवर थाप मिळाली की मी काहीही न बोलता फक्त हसून मान डोलावते.
एकूणच काय तर एक कप चहा मिळवण्यासाठी माणसाला केवढे कष्ट करावे लागतात ह्याची परत एकदा जाणीव झाली. या प्रयत्नात काही दिवस गेल्यानंतर सरांनी मागच्या वेळी न सांगितलेले अजून एक गुपित सांगितले, सहा एकसारख्या दिसणार्या कपांचा सेट बनवायचा असेल तर आधी चाळीस-पन्नास कप बनवायचे आणि त्यातले एकसारखे दिसणारे सहा कप निवडायचे. करायला ही गोष्ट खूप अवघड वाटली तरी ही कल्पना माझ्यासाठी एकदम कलाटणी देणारी ठरली. मुळात एक सारखी भांडी बनवता येण्याइतका सराव चाकावर व्हायला हवा हा जो 'सहा कप असाइनमेंट' चा उद्देश होता. तो एका अर्थाने सफल झाला. सुरुवातीच्या पंधरा वीस कपांनंतर केलेले कप खरोखरच एकसारखे दिसताहेत, असे आम्हाला वाटायला लागले. थोडक्यात इथेही साध्य आणि साधन होते तर! यावर नंतर विचार करताना मला जाणवले की पॉटरीमुळे मला आनंद तर मिळतोच पण हे एकसारखे दिसणारे कप बनवण्याच्या नादात मी इतका वेळ चाकावर घालवला की दहा हजारातले कितीशे तास त्यावर गेले हे उमगलेच नाही आणि ह्या छंदाचे व्यसनात कधी रूपांतर झाले हेही कळले नाही.
हे करताना कळत गेले की तुम्ही एकच कलाकृती बनवून ती अचूक होईपर्यंत त्यावर काम करू शकत नाही. तुम्हाला सराव करून या पायरीपर्यंत पोचावे लागते की बनतानाच ती कलाकृती हवी तशी बनेल. अत्यंत अवघड, चिकाटीचे आणि तरीही मनाला समाधान देणारे काम आहे हे. आतापर्यंत दहा हजारातले किती तास चाकावर काम झाले ते मला माहीत नाही, ते मोजण्याची गरजही वाटत नाही. मला पहिल्या क्लासमध्ये हवा असलेला डिनरसेट अजूनही पूर्ण व्हायचा आहे, तो होण्यासाठी मला कदाचित अजून काही वर्षे चाकावर काम करावे लागेल पण "घरच्यासाठी डिनरसेट करणे" हा माझा उद्देश केव्हाच बाजूला पडलाय.
आता मी याच्याकडे छंद म्हणून न बघता पॅशन म्हणून बघते. काही वर्षांपूर्वी पॉटरी म्हणजे नक्की काय याचे उत्तर मी बैलगाडीच्या चाकावर कुंभार पणत्या, सुगडे, माठ करतात ते, एवढेच सांगू शकले असते आणि यात काम करायला लागल्यावर आपल्यासाठी एकदम अलीबाबाची गुहाच उघडली गेली आहे असे वाटते. यात इतक्या वेगवेगळ्या पद्धतीने काम केले जाते - जसे जपानमधील विशिष्ट पद्धतीने भांडी भाजतात ती राकु पद्धत, नेटिव्ह अमेरिकन लोकांनी रंगीत माती वापरून केलेले भौमितीक नक्षीकाम, दक्षिण अमेरिकेतली चाकावर न करता हाताने केलेली भांडी आणि त्याला घासून गुळगुळीत केलेले पॉलिश, बर्याच आदिवासी संस्कृतीत करतात ती भांड्यांवरची पेट्रोग्लीफ (Petroglyph )सारखी नक्षी या सगळ्यांचा थोडक्यात अभ्यास करायला एक आयुष्य नक्कीच अपुरे पडेल. या न संपणार्या प्रवासाची माझ्याकडून उशिरा का होईना पण सुरुवात झाली हे माझ्यासाठी सगळ्यात महत्वाचे आहे.
संदीप खरेंच्या भाषेत सांगायचे तर सध्या माझी अवस्था वेड लागलं मला, वेड लागलं मला, पॉटरीचं वेड लागलं अशी झाली आहे.
- रूपाली महाजन
प्रतिसाद
मस्त.. छंद, त्याबद्दलची तळमळ
मस्त.. छंद, त्याबद्दलची तळमळ आणि त्यावरचं हे मन:स्पर्शी लिखाण सुद्धा..
>> जी गोष्ट आपल्या ओठांना स्पर्श करणार आहे त्याबद्दल गंभीरपणे विचार करणे आवश्यक आहे.
:) छान शैली.. तुझे लेख अर्थात नेहमीच छान असतात आणि त्यातली चित्रं पण..
रुनी, फार आवडला तुझा लेख ..
रुनी, फार आवडला तुझा लेख .. आणि तुझ्या छंदाचंही कौतुक .. काय करण्यात तुला अतोनात आनंद मिळतो हे तुला कळलं ह्याबद्दल तुझं अभिनंदन .. :)
फार छान लिहिलंय रूनी. तुमचे
फार छान लिहिलंय रूनी. तुमचे 'मातीकामाचे प्रयोग' वाचले होते. त्यामागची धडपड आज कळली. मस्त !