हो, मी बोलतोय!

"मु

लीचे मामा, मुलीला घेऊन या"
गुरुजींनी माईकवर ही घोषणा केली आणि अंगावरच्या रेशमी शालूला जबाबदारीचे काठ लागल्याची जाणीव झाली!

मामा खोलीच्या दाराशी आलेच, "दिदी, तयार आहेस बेटा?" आवाजातला गहिवर खूप काही सांगून गेला!

क्षणभर होकारार्थी मान हलली आणि पावलं दाराकडे वळली, दाराशी अडखळले जराशी, मागे वळून पाहिलं, नकळत माझ्याही...... माझं आडनाव आणि बालपण तिथेच राहिलं होतं!

खोलीपासून बोहल्यापर्यंत जाताना, मामांनी क्षणभर डोक्यावर हात ठेवला, आमची नजरानजर झाली, डोळ्यांतच पराकोटीचा आधार दिसला...

बोहल्याच्या पायर्‍या चढताना, अंतरपाटापलीकडलं आयुष्य खुणावत होतं!

एक रोपटं, आपली पाळं-मुळं घेऊन निघालं होतं, माहेरच्या संस्कारांची शिदोरी गाठीशी ठेऊन... सार्‍यांना आपलं करण्यासाठी!

दुसर्‍या घरी रुजण्यासाठी...

_______________________________________

कुठलंही 'रूजणं' ही प्रक्रिया वरकरणी कितीही सहज वाटली तरी आत भरपूर क्लिष्ट असतेच...मुळं घट्ट घट्ट रोवावी लागतात, येणार्‍या प्रत्येक ऋतूत तग धरून राहण्यासाठी... 'तिच्या'बरोबर तिचा पाठीराखा म्हणून मी आलो... हो मी तेच रोपटं बोलतो आहे, जे रूजलं, कधी पार वाळून गेलं, तर कधी बहरलं... पण मुळं खोल खोल रुजवत राहिलं... पानगळ होऊनही!

मी, कधी तिच्याबरोबर तिचा सखा झालो ते उमगलेच नाही. बहुधा तिच्या कॉलेज जीवनापासून. तिच्या सार्‍या सुख दु:खांचा साक्षीदार असा मी.. माझ्याशी हितगुज करण्याची तिची जुनी सवय. तिला कायम सोबत राहण्याच्या अलिखित वचनात बांधलेला.. तिचा पाठीराखाही झालो. मला त्या माहेरच्या मातीतून इकडे आणून तिने मोठ्या विश्वासाने लावलं. ती कायम नजरेसमोरच असणार म्हणून मीही सुखावलेला....पण खरं सांगू, असं रुजणं मला खरंच अवघड झालं. तिकडच्या आणि इकडच्या मातीत फार फरक होता, तिकडे आपुलकीचं सिंचन होतं, इकडे जबाबदारीची फवारणी... तिकडची काळी कसदार माती, इकडे जराशी भुरी...
पण तिच्या 'सुखी संसाराच्या' संकल्पना माझ्यापेक्षा उत्तम कोण जाणून होतं?

आता मला पाणी घालतानाचा तिचा मूक संवाद दिवसभर मनात घोळत असायचा. "थोडंसं अवघड जाईल रे. तुला आठवतं, बाबा काय म्हणतात? साधे रेल्वेचे रूळ बदलतानाही खडखडाट होतो. हा तर आयुष्याच्या दोन पर्वांचा प्रवास! खडखडाट होणारच. पण हाच उद्याच्या सुंदर प्रवासाची सा़क्षी देणारा ठरेल.... डगमगू नकोच... तुझी मुळं घट्ट कर...रुजत जा, दिवसागणिक रुजत जा......"

मीही नव्या प्रेरणेने सारं स्वीकारत होतो. तिच्या डोळ्यातल्या निर्धाराशी एकनिष्ठ होत होतो. कठीण असलं तरी अशक्य नसतं हे तिच्याकडूनच शिकलो. अनेकदा आलेल्या वार्‍यावादळाला मग समर्थपणे पेलू लागलो... माझं असणं तिच्यासाठी किती गरजेचं आहे, हे जाणून कदाचित!!

पानगळीतली माझी अवस्था पाहून तिच्या डोळ्यांतली टिपं खूप काही सांगायची. अशावेळी मग मीच म्हणत असे,"अगं, मी बहरतो म्हणून पानगळही होतेय ना? सगळेच दिवस सुखाचे कसे असतील? तूच म्हणतेस ना, मुळं घट्ट असावीत, बास... सारे ऋतू झेलता येतातच..."तिच्या चेहर्‍यावर उमटलेले हास्य न विरो," असे म्हणत मग मीही उन्हात शेकत बसत असे.

-------------------------------------------------------------------------------------------------

काही दिवसांपूर्वी, कधीही घडू न शकणारी गोष्ट घडून गेली.
माझ्याशी तिच्या गप्पा खुंटल्या. जवळ जवळ थांबल्याच.
येऊन मला पाणीही घालेनाशी झाली. हिच्या मनात काय चालू होते उमगेना. मी स्वतःला समजावले. अनेक जबाबदार्‍या आहेत तिच्यावर, होत नसावी पूर्वीसारखी सवड. अश्या निष्फळ समजुतीवर किती तग धरणार होतो? ती कोण आणि कशी आहे हे पूर्णपणे मी जाणून होतो...

अनेक दिवसांनतर डोकावली, बरीचशी त्रस्त... काहीशी उदास.. कारण विचारले तर सांगावे वाटत नाही म्हणाली. पण मी रोडावल्याचे पाहून खिन्नही झाली. "का नीट खात पीत नाहीस तू?" म्हणत रागावलीही.. त्या दिवशी माझ्या ल़क्षात आलं, प्रत्येकाकडे अगदी जातीनं ल़क्ष पुरवता पुरवता, नोकरी सांभाळून सारं करता करता तिची खरंच दमणूक होत असावी... इथून पुढे निरपेक्षपणे तिला सोबत करायची असंही मनोमन ठरवलं.. तिला असं सार्‍यांनीच समजून घ्यावं असंही वाटलं.

कधी हसण्याचे, कधी आसवांचे सण साजरे करत दिवस जात होते. मी ही छान ह्या मातीशी एकरूप होत होतो.
तिच्या स्वप्नांना धुमारे फुटत होते, तिच्या हसर्‍या नजरेत माझं समाधान फुलत होतं!

पण.... हा 'पण' येतोच नाही आडवा?

तिचं हे लाडकं रोपटं, एकाएकी कोमेजू लागलं, तिनं कित्ती मायेची उब दिली, काळजी घेतली. खतपाणी केलं, उन्हाची झळ नको म्हणून जागा बदलली... सारं सारं केलं... पण कोलमडणं सुरूच राहिलं.. "नक्की काय होतंय तुला?" ह्या प्रश्नाचे उत्तर मलाही देता येईना तेव्हा तिची काळजी जाऊन चेहर्‍यावर चिंता दिसू लागली.
इतकं प्रेमाने, संघर्षाने, जीवापाड जिद्दीने रुजलेलं हे रोपटं तिच्या नजरेला दाद न देता मलूल पडू लागलं. एका साथीदाराची आयुष्यातली गरज, ज्याच्यावर जीव ओतून प्रेम केलंय अशाची ही स्थिती बघवेल कशी? आजन्म सोबतीच्या वचनाचे तरी काय? अनेक प्रश्नचिन्हं चेहर्‍यावर वागवत ती मला जपत होती... माझं असणं, माझं इथलं रूजणं हे तिच्यातल्या सन्मानाची साक्ष होती, माझं दिसामाजी ढेपाळात राहणं तिला सहन होत नव्हतं!

प्रचंड निर्धाराने तिने मला उपटलं, अगदी खालच्या बाजूला, देठाजवळ मला पोखरणारी कीड तिला दिसली. मुख्य म्हणजे माझ्याही नकळत ती कीड माझा भाग बनून राहिली होती..... "थोडंसं सहन कर, मी आहे." इतक्या तिच्या आश्वासनावर मी निर्धास्त झालो. तिने ती कीड कापून काढली, माझी मुळं न मुळं स्वच्छ केली. पानन् पान चमकवलं... तेव्हा तिच्या ल़क्षात आलं... ज्या कुंडीमध्ये मी विराजमान होतो, तिला पाण्याचा निचरा होण्यासाठी असलेली छिद्रे पार बुजली होती. कुंडीच्या तळाच्या मातीची जागा चिखलाने घेतली होती.

आता,
मला नव्या कुंडीत, ताज्या मातीत तिने रुजवलयं....
ही माती आता सकस आहे. ह्या मातीचा सुवास माझ्या ओळखीचा आहे. आता ही मातीही भुरी नाही राहिलीय. तिच्या प्रेमाच्या सिंचनाने तीही काळी आहे.

मी नव्याने रुजतोय, तिने दिलेल्या नवीन जन्माचे आभार मानत....
बहर जवळ आलाय...
वचन शाबूत आहे...

- बागेश्री

प्रतिसाद

:)

मस्त :)

अतिशय सुरेख.
एक छोटिशी पण अत्यंत महत्वाची गोष्ट फार सुंदर रितीने पोचवलीस.

गुड वन! :)

मस्त!

सर्वांची आभारी आहे.

dj किती सुंदर चित्र आहे ते... लेखाला समर्पक.. अगदी साजेसं, खूप आभार गो!
संपादकांच्या ह्या कल्पनेचं खूप कौतुक वाटलं, प्रत्येक लिखाणाशी सांगड घालणारी चित्रे अंकात समाविष्ट केलीत. संपादक मंडाळाने केलेली मेहनत अंकाच्या देखणेपणात झळकते आहे! :)

मस्त!

छान!

मस्तच :)

बागेश्री,
यु आर मोस्ट वेलकम !
तुझा लेख जास्त सुंदर झालाय चित्रा पेक्षा. :).

एकदम झकास :)

खास बागेश्री स्टाईल :)
आवडलीच!
डिजेचं चित्रही अगदी समर्पक!

आवडले! कल्पनाशक्ती झक्कास आहे! :)

उत्तम लेख..

डीजेचं चित्र पण फारच समर्पक.

बागेश्री, ही कल्पनाच किती वेगळी आहे... आणि शब्दांत मांडायला अतिशय कठीणही. तरल ठेवूनही अर्थं पोचवण्याची तुझी हातोटी... त्याला सलाम.
दीपांजली (डीजे), त्या रेखाटणाला मोठ्ठं करून फ्रेम करावं असं किती मनात येतय म्हणून सांगू... ह्या लेखात मांडलेला विचार इतका सुंदर चित्रात उतरवणं... तुला साष्टांग नमस्कार.

बागेश्री, रिया, हिम्स्कुल, दाद,
खूप धन्यवाद, संपादक मंडळाला पण क्रेडिट , त्यांची कल्पना होती मेंदी थीम मधे या लेखा साठी स्केच काढावे म्हणून.

वाह ! अतिउत्तम !!

सुरेख......

मस्त.. चित्र पण साजेस नि सुंदर आहे :)

सर्व वाचक मित्र-मैत्रिणींचे आभार :)
अँड डीजे रॉक्स :)

मस्त :)

:)