मी आणि ती

रं तर तिचा मला नाद कधी लागला हे सांगता येणार नाही, पण मी तिला पहिल्यांदा कधी हाताळले हे लख्खपणे आजही डोळ्यासमोर दिसतं. काही काही गोष्टी मनात आत, पार खोलवर रुतून बसतात आणि त्या नेहमी आपल्याला आठवतात तशीच काहीशी तिची माझी पहिली भेट! मी बहुदा साडेचार किंवा पाच वर्षांचा असेन तेव्हा. वडिलांनी त्या दिवशी एक रुपया देऊन सांगितले, "भाड्याने आण !"

त्या काळी छोट्या सायकली किरायाने मिळत. आजही मिळत असाव्यात, पण आज भाड्याने देणारे सायकलचे दुकानच दिसत नाही. अगदीच पेठेत असेल तर माहिती नाही पण मी राहतो त्या भागात भाड्याने फक्त कार्स मिळतात. तर मग मी आमच्या गल्लीत (नाव जरी कॉलनी असले तरी गल्ली हाच शब्द योग्य राहिल कारण ती "लेबर कॉलनी" होती!) राहणार्‍या राजा यन्नमला विनंती केली की चल आपण जाऊन सायकल आणू. दुकान दीड ते पावणेदोन किलोमीटर दूर होते पण आणायला मी अन राजाभौ यन्नम (जो बहुदा तेव्हा दहा-अकरा वर्षांचा असेल) असे दोघेच गेलो. आजही आठवते की सायकल "लेडीज" आणि निळ्या रंगाची होती. तर ती सायकल आणली आणि थोडीफार शिकली असावी किंवा राजानेच चकरा मारल्या असाव्यात. कारण आणल्याच्या पुढे काही आठवत नाही, पण व्यंक्याने जेव्हा "केदारला सायकल आली" अशी बढाई मारली तेंव्हा मी वडिलांनी नाही, "राजाने शिकवली" असे सांगितल्याचे मात्र आठवते. काय सांगावे, कदाचित व्यंक्यानेच सायकल शिकवली असावी. तो राजापेक्षा मोठा होता म्हणून वडील त्यालाच सांगत.

सायकल चालवताना मला "तंद्री लागणे"चा अनुभव आजही येतो. पण तेव्हा मात्र जास्तच तंद्री लागत असावी किंवा मला किती विविध प्रकारे सायकल चालवता येते हे दाखवावे वाटले असेल. पण नंतरची घटना आठवते ती, मी बहुधा सहावी किंवा सातवीत असेन. सायकलचे हॅन्डल हे त्या त्या हातानेच (म्हणजे उजवे हॅन्डल उजव्याने) का धरायचे? हा प्रश्न मला पडला. हा प्रश्न पडायचे कारण, तेव्हा एक मालिका आली होती, नुक्कड. नुक्कड मालिकेतील एक पात्र काहीतरी करून दाखविण्यासाठी काही दिवस सायकल चालवते. अगदी दिवस रात्र. त्यात सायकल उभी करण्याची पद्धत वगैरे सर्व मी तेव्हा आत्मसात करून घेतले होते, पण उजव्या हाताने डाव्या हाताचे हॅण्डल व त्याच वेळी डाव्यानं उजव्याचे हा प्रयोग मात्र कोणी करून पाहिला नव्हता. तसा मी प्रयोगशील माणूस आहे. आजही विविध प्रयोग करून पाहतो. बहुधा हा प्रकार मात्र माझा पहिला किंवा दुसरा प्रयोग असावा. मी मेन रोडवरच जिथे रस्त्यावर कमी खड्डे होते अशा ठिकाणी हा प्रयोग करायचे ठरविले. माझ्या दोन तीन मित्रांनाही हा प्रयोग करणार असल्याचे कळविले. अर्थातच त्यांनी मूर्खात काढले. पण लोक काय कोणालाही मूर्खात काढतात हे गॅलिलिओच्या उदाहरणामुळे मला माहित होते. त्यामुळे मी शाळा सुटल्यावर हा प्रयोग केलाच आणि त्याचा रिझल्टही माझ्या अनइरेझेबल मेमरी मध्ये फिट्ट झाला आहे. तो म्हणजे काही क्षण हा प्रयोग यशस्वी झाला, पण नंतरच्या काही क्षणात तोल जाऊन मी पडलो अन माझ्या सायकलच्या एका चाकावरून एक ट्रक यशस्वीरित्या पार झाला व चाकच तुटले. बहुधा मीच तुटायचा, पण वेळ नव्हती आली !

नववी दहावीच्या वर्षात सायकल अन् मी असे समीकरणच झाले. मुख्य म्हणजे ह्या काळात ट्यूशन नावाचा जीवघेणा प्रकार प्रत्येकाचे माय-बाप आपल्याला कंपल्सरी लावतात, त्यातच व्हेकेशन बॅच नावाच्या एका अतित्रासदायक प्रकाराला मी सामोरा गेलो आहे. मग ती व्हेकेशन बॅच चुकवायची कशी तर सायकल! म्हणजे कसं की बर्ड ऑफ सेम फेदरचा रूल माणसांना देखील लागू होतोच. ज्यांना ज्यांना त्या व्हेकेशन बॅचचा कंटाळा यायचा त्या सेम फेदरवाल्या लोकांनी तो पूर्ण दिवस सायकलवर बाहेर काढायचा व वेळेवर घरी जायचे असे ठरविले. मग एकदा आम्ही २५ किलोमीटर (वन वे) अशी ट्रीप केली, दिवसात ५०-५२ किलोमीटर चालवली, हुरूप वाढला. अन् मग जेव्हा कंटाळा आला तेव्हा शाळेला बुट्टी आणि "वेलकम टू ओपन रोड" हाच एककलमी कार्यक्रम झाला. पुढे पुढे मग सायकलवर बाहेरगावी जाणे हे नित्याचेच झाले. कॉलेजला माझ्याकडे LML असतानाही मी ATB घेतली होती!

सायकलबद्दल मी खरा सिरीयस झालो ते अमेरिकेला गेल्यावर. अमेरिकेत गेल्यावर देखील पहिली काही वर्षे सायकलची आठवणही आली नाही. पण काही वर्षांनंतर मी शिकागोला गेलो. माझी मुलगी जवळपास चार वर्षांची झाली. मग मुलीला सायकल शिकवीन असा विचार करून मी एका दुकानात गेलो. तिची सायकल घेताना ज्या दुकानात गेलो तिथे मी माझ्यासाठी पण सायकल शोधू लागलो. पण बात कुछ जमीं नाही. कारण सगळ्या बाईक्स ऑलमोस्ट MTB होत्या. (माउंटेन बाईक) लोक सायकल घेताना, "कोणती घ्यायची" ह्यावर विशेष लक्ष देत नाहीत कारण त्यांच्या मते सायकल ही सायकल, काही वेळ चालवा अन विसरा, ते पण डॉक्टर लोकांनी सांगितल्यावर ! पण अपून को सिरिअसली लेने का था! मग स्पेशालिस्ट सायकलीच्या दुकानात जाऊन त्याला सांगितले की भौ, आपल्याला MTB नको कारण मी माउंटेन राईड्स नाही करणार पण ऑल टेरीन राईड्ससाठी, आणि पायांना हलकी अशी सायकल सांग. मग त्याने पर्याय दिले दोन. एक तर रोड बाईक, जी आपल्याला सायकल रेस मध्ये दिसते ती वा हायब्रिड. मग किमती बघितल्या तर त्या अगदी $८० पासून $४००० पर्यंत. इतकी माहिती दिल्यावर $८० ची सायकल घेऊन निघणे म्हणजे जरा अतिच. म्हणून मी $३५० ची मजल मारून माझी पहिली श्विन हायब्रिड घेतली. हायब्रिडची बॉडी ही हलकी असते व चाक हे आपल्या भारतीय सायकल सारखे (पण थोडे कमी जाडीचे) असते. ७०० सी असे त्या चाकाचे नाव. त्यामुळे ही रोड व ऑफरोड ह्या दोन्हीला चालू शकते. अगदीच डर्ट ट्रॅक मध्ये चालत नाही पण मी कुठे रोज डर्ट ट्रॅक वर जाणार होतो?

पण मी पहिलीच सायकल बर्‍यापैकी (म्हणजे सिरियस बाईकर एन्ट्री लेवल) घेतली. त्यामुळे एक बरे झाले म्हणजे मला गिअरवाल्या सायकल्स कश्या चालतात, त्यांना कसे हाताळायचे व "मी कुठपर्यंत ह्यात पुढे जाऊ शकतो" याची जाण आली. ती फार महत्त्वाची. अन्यथा माउंटेन बाईक घेतली असती तर कदाचित ती आवड काही दिवसच टिकली असती. MTB वाईट असते असे मी अजिबात म्हणत नाही, तर माझ्या बॉडीसाठी व आवडीसाठी हायब्रिड बरी असे म्हणत आहे. अनेक वर्षांनंतरची पहिली राईड अमेरिकेतली ही सहा मैलांची घेतली. सॅडलवर बसण्याची सवय निघून गेल्यामुळे माकडहाड आणि सॅडल ह्यांच्या संगमात ढुंगण भरडले गेले व जोशात सहा मैल गेल्यामुळे दुसरे दिवशी पाय दुखायला लागले. पण हमने हार नही मानी ! आणि मग शुक्र, शनि व रवि म्हणजे 'मै और मेरी सायकल', असे पूर्ण उन्हाळाभर चालायचे. (सोम ते गुरू मी शिकागोत नसायचो त्यामुळे सायकलही नाही) माझ्या घरापासून तीन मैलांवर खास सायकल ट्रेल्स होत्या. मग शिकाऊ उमेदवार म्हणून पहिल्या त्या पार केल्या अन् मग पुढे सायकल काढली की एक साधारण वीस मैल तरी राईड असायचीच. अमेरिकेत वातावरणामुळे काही महिनेच सायकल चालवता येते. त्यात मी सोम- गुरू बाहेर मग हा सोमवार ते गुरूवार काय करायचे म्हणून मी ज्या गावी गेलो तिथे रेंटल सायकल मिळते का शोधू लागलो. अनेक ठिकाणी रेंटल मिळायच्या, उदा. फ्रेस्नो- कॅली, ग्रँड रॅपिड्स - मिशिगन इत्यादी इत्यादी. पण बाहेर असताना सायकलीचा आनंद खरा मिळाला तो न्यूयॉर्क मध्ये. न्यूयॉर्क मध्ये मी सेंट्रल पार्कच्या अगदी जवळ म्हणजे टाईम्स स्क्वेअर मध्येच राहायचो. एके दिवशी फिरता फिरता 56th & 5th वर गेलो तर तिथे, "आमचेकडे तासावारी सायकल भाड्याने मिळेल" असे लिहिलेले दिसले. लगेच विचारणा केली तर केवळ $१५ प्रतितास. (आता हे केवळ १५ जरा जास्त आहेत पण छंदाला मोल नसते) मग मंगळ आणि बुधवारी रोज संध्याकाळी साडेसात नंतर सायकल घ्यायची अन् सेंट्रल पार्क मध्ये जायचे हा छंदच लागला. सेंट्रल पार्कला ह्या समर मध्ये माझी नक्की आठवण येईल!

पीअर प्रेशर नावाची एक गोष्ट असते म्हणे. मी अशी नेहमी सायकल चालवतो त्यामुळे माझ्या मैत्रिणींनी त्यांच्या नवर्‍याला सायकल घेण्यास भाग पाडले तसेच माझ्या काही मित्रांनी ह्या प्रेशर मध्ये येऊन सायकली घेतल्या. पण बिचारे एक मैल गेले की मग ते कट्टा करून गप्पा मारत बसत व मी एकटा पुढे जाई. आय अ‍ॅम अ लोन बाईकर! दरम्यान माझी सायकल चोरीला गेली, तेंव्हा मित्रांना वाटले की आता सायकल सवारी बंद होईल. पण मला ह्यापेक्षा चांगली सायकल हवी होती म्हणून अजून थोडी महाग असणारी पण श्विनच घेतली.

माझे "श्विन अफेअर" पुढे सहा वर्षे चालले. आम्ही भारतात परत जायचा निर्णय घेतल्यावर सायकल पण पॅक करून पाठवावी असा विचार येत होता पण तेव्हा ही दुसरी श्विन चार वर्षांची झाली होती. मग विकायचे किंवा डोनेट करायचे ठरविले. एक देशी जो रोज मला सायकल चालवताना पाहत होता त्याने सायकलसंबंधी विचारले तर मी त्याला, "मी कसाही जात आहे १५ दिवसांनंतर, तुला हवी तर घे" असे म्हणालो, त्याने घेतली. पण ती सायकल देताना मला खूप यातना झाल्या हे मात्र खरे.

भारतात आल्यावर काही महिने असेच गेले. पण सहा-सात वर्षे पडलेली सवय गप्प बसू देत नव्हती. मग इथे आल्यावर ट्रेक ७१०० नावाची सायकल (परत हायब्रिड) विकत घेतली. "२९००० हजाराची सायकल घेण्यापेक्षा तू सरळ एखादी अ‍ॅक्टिव्हा का घेत नाहीस?" असा सवाल माझ्या शेजार्‍याने केला. पण तो दुर्लक्षून मी माझी आवडती सायकल विकत घेतली आणि इथे मात्र रोज चालवत आहे. कारण भारतात असणारे वातावरण. पहिल्यांदा असे वाटले की येथील खड्डेमय व पोल्युटेड रस्त्यावर सायकल कशी चालवता येईल. ते पण अनेक किलोमीटर. पण आता सवय झाली. मुख्य म्हणजे काही रस्ते इतके चांगले आहेत की तिथे सायकल चालविण्याची मजा आणि सेंट्रल पार्क मध्ये चालवण्याची मजा एकच आहे. (आय नो, लिटल बिट एक्झॅजरेशन वगैरे वगैरे, पण डार्लिंग, ये है इंडिया!)

नियमित सायकल चालविण्याच्या पहिल्या काही महिन्यांनंतर हळूहळू केवळ सायकल चालविणे सोडून मग वेग कसा वाढवावा, अजून जास्त लांब कसे जाता येईल ह्याचा शोध मी घेत होतो. मग सायकलच्या काही अ‍ॅक्सेसरीज जशा सायक्लोमिटर ज्याने तुमचा वेग, आजची राईड एकूण किती किलोमीटर हे सांगणारे यंत्र पुढे मी लावून घेतले. मग अचानक कधीतरी हा रोजचा डेटा आपण excel मध्ये टाइप केला तर कदाचित, 'सायकल चालवताना आपण नक्की काय करतो' ह्यावर विचार करता येईल असे वाटले, अन् मग excel सुरू केली. पण तरीही ह्यात अडचणी येत होत्या. एक तर कंटाळा व दुसरी म्हणजे रुट मॅपिंग. जेव्हा अ‍ॅपल अ‍ॅप्स भरात आले तेव्हा असे काहीतरी अ‍ॅप नक्की असेल असा विचार आला व मी अ‍ॅप शोधू लागलो .कारण त्यातून ट्रेण्डही कळतो व आपल्याच रूटवर इतर हौशी सायकलस्वार किती वेळात व तो कसा पार करतात हेही कळते म्हणजे मग आपलाही वेग वाढविता येईल वगैरे वगैरे.
आणि ते मिळाले, STRAVA !

स्टरावा अ‍ॅप हे तुम्ही तुमच्या स्मार्ट फोनवर डाऊनलोड करू शकता. अ‍ॅप इन्स्टॉल केल्यावर तुम्ही मग सायकल सुरू करण्याआधी हे सुरू करायचे. तुम्ही ज्या रस्त्यावरून जाता तो रस्ता, तुमचा स्पीड, तुमचे एलेवेशन व हवे असल्यास तुमचा हार्टबीटही हे अ‍ॅप मोजू शकतो.
उदाहरणासाठी चित्र क्रमांक १ पाहा.

Photo_1.png

ह्यात गेल्या काही दिवसांत, प्रत्येक दिवशी मी कुठे गेलो, किती वेगात, त्यात चढ किती होता हे दिसते.

चित्र क्रमांक २
Photo_2.png

ह्या चित्रात राईड डिटेल्स दिसतात. थोडक्यात तुम्ही किती किलोमीटर (वा माईल्स) गेलात, एकूण किती वेळ तुम्ही सायकल चालवली, तुमचा अ‍ॅव्हरेज स्पीड काय होता, ह्याचे अ‍ॅनॅलिसिस तुम्ही करू शकता.

चित्र क्रमांक ३
Photo_3.png

चित्र २ प्रमाणेच ह्यात तुम्हाला चित्रमय माहिती मिळू शकते. हार्टबीट देखील कळू शकेल पण त्यासाठी आणखी एक यंत्र ह्या अ‍ॅप सोबत तुम्हाला लावावे लागेल. यंत्राचे पैसे लागतील, पण हे अ‍ॅप मात्र मोफत आहे.

हे अ‍ॅप चांगले आहे पण भारतात बरेचदा हे अ‍ॅप सॅटेलाईट सोडून देते कारण ज्या नेटवर्कवर चालते त्याचे ३जी सर्व ठिकाणी चालेल असे नाही. त्यामुळे होते काय की त्या सिग्नल नसलेल्या किलोमींटर्सची गणना मात्र तुमच्या त्या दिवशीच्या राईडमध्ये होत नाही आणि कमी किलोमीटर दिसू शकतात. हा एक मुद्दा सोडला तर मात्र हे अ‍ॅप मला आवडले. साधारण आपला रोजचा तोच रोड असतो व आपण सहसा एका ठरलेल्या ठिकाणापासून वापस येतो त्यामुळे अशा दिवशी कमी किलोमीटर भरले तरी आपल्याला अंदाज येतो की काहीतरी गंडले आहे. पण योग्य ते अ‍ॅनॅलिसिस करायला हे अ‍ॅप नक्कीच चांगले आहे.

रोडवर सायकल चालवताना मला अनेक लुक्स मिळतात. बहुतांश लुक देणारे आठ ते पंधरा-सोळा वयोगटातील मुलं-मुली. आणि सिग्नलला थांबल्यावर बाईक चालवणारे. ते माझ्याकडे न बघता, सायकल व गिअर बॉक्सकडे बघत असतात.

मला माझी स्वतःची कंपनी आवडते त्यामुळे माझे छंद पण थोडे तसेच आहेत. सायकल चालविणे, रायफल शूटींग आणि वाचन. पण वाचन आणि शूटींगपेक्षा सायकल थोडी वेगळी कारण ती चालवताना अचानक तुम्ही तंद्रीत जाऊन एखाद्या विषयाची मनातल्या मनात उजळणी करू शकता किंवा अगदी डे ड्रीम पण करू शकता. मला दोन्ही आवडते. स्वप्न सत्यात आणण्यासाठी शरीराला जी ताकद लागते, निदान ती तरी सायकलिंगमुळे तुम्हाला मिळेल, हा प्रत्यक्ष फायदा. बाकी सायकलिंगचे अनेक फायदे आहेत, पण मी फायद्यासाठी चालवत नाही तर माझा छंद म्हणून चालवतो.

एके दिवशी पुण्यात परत एकदा सायकलींचे प्रमाण वाढलेले व सायकलींसाठी खास बांघलेले "बाईक रुट" बघायचे, हे स्वप्न मी नेहमी पाहतो. माझ्या न्यूयॉर्क मल्टी मिलियन डॉलर लॉटरी जिंकायच्या स्वप्नासारखे हे अर्धवट राहू नये ही मात्र इच्छा!

- केदार

प्रतिसाद

अगदी पॅशनने लिहिलाय. आवडला.

छान लिहिलयस.. मी युएसमध्ये सायकल घेतली होती कारण घराच्या अगदी जवळ ट्रेल होता.. इथे सायकलींग सुरु नाही केलेलं परत.. पुण्यात बाईक रूट्स आहेत सगळ्या मुख्य रस्त्यांच्या बाजूने पण तिथे मी कधिही कोणालाही सायकल चालवताना पाहिलेलं नाही. तिथे सगळे पथारीवालेच असतात कायम..
तुझ्या सायकलिंगला शुभेच्छा... :)

वाचत असताना डोळ्यासमोर ७०च्या दशकांतले सिनेमा तरळून गेले. सायकलवरून पिकनिकला निघालेल्या तरूणी आणि त्यापण गाणे म्हणत वगैरे. :)

वेगळाच छंद आहे आणि अगदी मनापासून लिहिले आहे.

२९००० हजाराची सायकल घेण्यापेक्षा तू सरळ एखादी अ‍ॅक्टिव्हा का घेत नाहीस?" :हाहा:

मस्त प्रवास. :-)

भारतात चालवताना जपुन रे भौ. वेगळे ट्रॅक्स नसतात त्यामुळे मला तरी ते फार रिस्की वाटते.

छान लिहिलयं खुप!!
स्फूर्तिदायक छंद आहे :)

मस्त केदार. एक तक्रार आहे - इतका सुरेख लेख लिहिलास पण तुझ्या 'लाडकीचा' फोटो मात्र एकही नाही?? :) .. तसे करु नये, एकतरी फोटो येऊ दे प्लीज.

आवडलाच छंद आणि त्यावरचा लेख

केदार तुझे बाइक अफेअर फार आवडले. भारतातपण ही सगळी उस्तवार करतोयस हे वाचून छान वाटले. तिथे विकेन्ड सायकलिंग क्लब्स नाहीत का इथल्यासारखे, नसतील तर तू सुरू कर एक म्हणजे तुम्हाला लांब लांब ट्रीप्स करता येतील.

पॅशनने लिहिले आहे >> +१

आवडला..

मस्तच!

केदार, तुमचा 'ती' च्या वरचा जिव्हाळा अगदी छान प्रतीत होतोय. वर कुणीतरी म्हण्ल्याप्रमाणे 'ती'चं दर्शन घडवा की!

छान लिहीले आहे. मलाही पूर्वीच्या दिवसांची आठवण झाली व मी सुद्धा एक लेख लिहू शकते इतक्या माझ्या सायकलच्या आठवणी आहेत. त्या आठवणींना उजाळा दिल्याबद्दल धन्यवाद.

छान! मीही फ्रान्समधे असताना ३ वर्ष ऑफिसला जायला सायकल वापरायचो. इथेही एक सायकल आहे पण अजुन नियमित चालवणं होत नाही :(

भल्ता बाईकवेडा... :)
एका जागी बसायचं सोडून काहीही मैदानी करणार्‍या सगळ्यांबद्दल मला जाम आदर आहे... खरच अगदी पॅशनने लिहिलाय लेख... जाणवतय.

खुप छान लिहिलेय :)

सर्वांना धन्यवाद. :)

भारतात सायकल चालविणे खूप अवघड आहे कारण इथे ड्रायव्हरची उतरंड ही वेगळी आहे. ज्याच्याकडे मोठी गाडी तो मालक असे काहीसे. शिवाय पुण्यात सायकल ट्रॅक जे जुने रस्ते आहेत तिथे होते म्हणावे लागेल. कारण त्यावर नाव अजूनही "सायकलीसाठी" असे आहे, पण त्यावर फेरीवाले, बाईक अन कारवाले असतात. त्यामुळे ते नावालाच सायकलचे रस्ते.

माझी ट्रेक ७१००

Trek_1.JPG

मैलानमैल (हवं तर किमी म्हणा) चालविल्यावरही ह्या बाईकवर थकवा येत नाही. सॅडलचे कव्हर मात्र मी जेलचे लावून घेतले आहे.

पुण्यात आताशा बाईक अवेअरनेस येत आहे. लाईफ सायकल सारखे सायकल मॉल पुण्यात गेले काही वर्ष आहेत. व ते अनेक राईड आयोजित करतात. पण नेट वर मात्र पुण्यातले बायकर जास्त प्रमाणात अ‍ॅक्टिव्ह नाहीत. जे दोन चार ग्रूप आहेत त्यात पोस्टही अगदी जुन्या आहेत. त्यामुळे सध्या तरी एकला चलो रे !

मस्त माहिती आणि फोटो देखिल :)

मी पण सायकलवेडा आहे...
२२००० ची मेरीडा घेतली तेव्हा पब्लिकने मला पार येड्यात काढलं.
पण ती काय चीज आहे... ते आपल्यालाच माहीत !

मस्त रे केदार..

केदार किती छान लिहिलंस रे!
मला माझे सायकलचे दिवस आठवले.(पुरातन काळ!)
खूप अभिमान होता मला माझ्या सायकलचा! आणि मी खूपच डिपेन्डन्ट होते सायकलवर! तंद्री तर अश्शी लागायची ना सायकलवर गुरुगुरू फ़िरताना!
नंतर जवळजवळ २५/२६ वर्षांच्या गॅपने पुन्हा सायकलसवारीचा योग आला. मागील वर्षी आधी कोडाईकॅनॉलला असलेला सुंदर निसर्गरम्य ६ कि.मी.चा सायकल ट्रॅक! तिथेही मनसोक्त सायकल पिटाळून हा ट्रॅक पूर्ण केला! मन भरून!
नंतर मागीलच वर्षी लेकीकडे उसगावातही बऱ्याच वेळा सायकलिंग केलं. लेकीची आय्ड्या!
पण तिथल्या ट्रॅकवर फ़क्त सायकलस्वारच क्रॉस होतात. कारण अर्थातच तो सायकल ट्रॅकच होता. त्यामुळे आमच्या नगरातल्या सारखं.... म्हशी/माणसं/पाशिंजरं घेण्यासाठी मधेच गपकन थांबलेला सहा आसनी रिक्षावाला असे बरच जण मी तिथे मिस करत होते. आणि मी जवळ जवळ समजा ४०/४२ वर्षांनी सायकल भाड्याने घेऊन चालवली!
मला तरी तिथला ऑटोमेशनचा नमुना फ़ार मस्त आणि अदभुत वाटला. (यंगर जनरेशनला काही विशेष वाटणार नाही...........! )
सायकल बूथवर जा,.......तिथे बऱ्याच सायकली दिमाखात कुलुपबंद उभ्या असतात... कार्ड स्वाइप करा,..त्यावर तुमच्या रिक्वायरमेन्ट्स टाका(कोणत्या मेकची सायकल, किती तास इ.इ.) मग तुम्हाला एक नंबर मिळतो.....सायकलवरही ० ते ९ नंबर्स असतात. मिळालेला नंबर सायकलवरच्या नंबर्सवर प्रेस करा.
सायकल रिलीज होते....घ्या आणि पिटाळा!
परत आल्यावर पुन्हा स्टॅन्डवर विशिष्ट पद्धतीने बसवा! आपोआप लॉक होते!
हे विनामाणूस भाड्याच्या सायकलचे दुकान मला इतकं आवडलं!
आणि तिथे आजूबाजूच्या शहरातून कामासाठी येणारी माणसंही या सायकली भाड्याने घेऊन आपली कामं करतात आणि परत आपापल्या गावी जातात असंही कळलं!

किती पॅशनेटली लिहीलय :)

मस्त लिहिलं आहेस :)

धन्यवाद :)

मानुषी, हो तिकडे ट्रेल्सवर एक तर पळनारे/ चालणारे किंवा सायकलवालेच क्रॉस होतात. आणि बरेचदा हरिण. आपल्याकडे सर्वयोनीसमभाव असल्याने कोणीही दिसू शकते.

अभि सहिच. पुण्यात आहेस का? असलास तर आपण दोघे जात जाऊ. मेरिडा मलाही आवडली होती. मस्त आहे एकदम.

मस्त लेख... कालच मला माझ्या सायकलची आठवण आली होति..१२वी पर्यत रोज वापरायची..
आता फक्त ऑफीस कॅम्पसमधे ते कधीतरी..

मस्त रे! आणि हे तर अगदी लाख मोलाचे...
>>स्वप्न सत्यात आणण्यासाठी शरीराला जी ताकद लागते, निदान ती तरी सायकलिंगमुळे तुम्हाला मिळेल, हा प्रत्यक्ष फायदा.
पुण्यात (माहिती नसेल तर) लाईफ्सायकल मॉल आहे.. तुझ्या सारख्यांसाठी ती एक पर्वणीच ठरावी. तिथे निव्वळ सायकल विक्री नाही तर सर्व सायकलींबद्दल ईत्यंभूत माहिती.. देश विदेशिची सर्व मॉडेल्स आणि सायकलींग गृप देखिल आहेत. त्याचे मालक म्हणजे माझा चुलतभाऊ व तयचे कुटूंबीय याने कोकण पासून लडाख्-लेह पर्यंत सायकलींग केले आहे.. अगदी २० पासुन ५० वय वर्षे पर्यंत आहे पब्लिक.

फेसबुक लिंकः http://www.facebook.com/#!/pages/LIFECYCLE/303262811881

(माझा संदर्भ देऊन हवे तर त्यांच्याशी संपर्क करू शकतोस.. नक्कीच तुझ्या छंदा च्या पुढच्या वाटचालीत तुला ऊपयोग होईल त्या कंपू चा... )

शुभेच्छा!

छान! :)