आ
जोबा गेले तीन-चार दिवस चित्रावर काम करत आहेत. चित्र काही काळापूर्वी त्यांनीच काढलेले. आता केवळ डागडुजीचे काम. चित्र काढणे हा आजोबांचा केवळ छंद नव्हे, ते चित्रकारच. आयुष्यभरासाठीचे चित्रकार. कला माणसाला सोडून जातात का? नसाव्यात. ही जन्मजात कवचकुंडले मिळण्यासाठीचे पूर्वसंचित कुठले? सूर्यपुत्रांना अभिशापही जन्मजात असतील, पण पुत्र म्हणून संगे येणारा पित्याचा गाभा इतरांची आयुष्ये झळाळून टाकतो, याचे मला फार अप्रूप आहे. माणूस थकतो, इंद्रियांवर आधिपत्य असल्याचा आयुष्यभराचा भास आटत जातो. पण काही गोष्टी मात्र तश्याच राहत असाव्यात. समुद्राचा जोर हटला तरी लाटांचा ओघ कायम राहतोच की. कदाचित अश्याच एखाद्या उपरतीच्या क्षणी ज्ञाना म्हणाला असेल - ’जाणे अज मी अजर, अक्षय मी अक्षर...’
समोर आजोबा नेवाश्याच्या खांबाची डागडुजी करतात. भंडार्याचा डोंगर थोडा अधिक उठावदार होतो. मनात विचार येतो - महाराष्ट्राच्या इतिहासातील उणापुरा पाचेकशे वर्षांचा कालावधी. इतिहासाच्या हिशेबात म्हटले तर खरेतर क्षणावधीच. किती संत प्रसवले या भूमीने? ज्ञानापासून तुकापर्यंत नामावली पाहिली तर थक्कच व्हायला होते. असे नेमके काय होत होते त्या काळात की या भूमीवर अशी एक अद्भुत फौजच उभी राहिली? मला ही गोष्ट प्रचंड अचंबित करते. या काळाआधी किंवा नंतरसुद्धा थोर लोक होते व आले, थोर गोष्टी घडल्याच, नाही असे नाही. पण इतक्या सातत्याने, इतक्या संख्येने अतिशय छोट्या कालखंडात इतके समाजनेते निर्माण व्हावेत ही खरोखर विचारात पाडणारी बाब आहे. मी त्या कालखंडाचा विचार करतो. कदाचित समाजाला काही एक विशिष्ट गोष्टींची आत्यंतिक गरज निर्माण होते तेव्हा समाजातूनच ती गरज भागवण्याचे प्रयत्न होत असावेत. स्वत:स प्रश्न पडला तर स्वत:च उत्तर शोधण्यासारखे. ज्ञानोबांचा काळ म्हणजे यादवांच्या राज्याची सायंकाळ. खिलजीची आक्रमणे लवकरच सुरू होणार होती. समाजास ही संभाव्य आक्रमणे प्रतीत झाली असतील का? बदलाचे संभाव्य वारे जनमानसाने जोखले असतील का? आणि यादवांच्या सत्तेनंतर ते स्वराज्याचा उदय होईपर्यंतचा काळ हा केवळ राजकीयच नव्हे तर सामाजिक अनागोंदीचासुद्धा. या सामाजिक अनागोंदीतच तर स्वराज्याची बीजे होती. सत्तेद्वारे जेव्हा हिंसेचा, आक्रमकतेचा प्रादुर्भाव व्हायला लागला, तेव्हा समाजाने त्यास खास स्वत:चे असे चोख प्रत्युत्तर दिले -- संतांनी भागवतधर्म रुजवला. त्यात भक्तीविचार केंद्रस्थानी होता. आपला या भक्तीविचारावर विश्वास नसला तरी एक गोष्ट फार प्रकर्षाने जाणवते, ती म्हणजे या भागवतधर्माचा समाजावर झालेला परिणाम. हा परिणाम अतिशय रोचक व वैशिष्ट्यपूर्ण आहे. संतांनी वारंवार विठोबाच्या भक्तीकडे लक्ष वेधले आणि ते वेधत असताना ज्या गुणांची निंदा केली आहे व जे गुण इष्ट मानले आहेत ते पाहिले तर एक कळते की या भक्तीविचारांद्वारे त्यांनी सात्विक विचारांचा प्रसार केला. हे गुण समाजपोषणासाठी सुयोग्य होते. सर्व संतसाहित्य हे नागर-साहित्य आहे. म्हणजे सर्वसामान्यांना सहजपणे कळेल अश्याच भाषेचा वापर झाला आहे. सत्तेच्या अगम्य हिंसेस, आक्रमकतेस, अनागोंदीस यापेक्षा अधिक चपखल उत्तर कुठले असेल?
त्याचवेळी दुसरी तीव्रतेने जाणवणारी गोष्ट म्हणजे अठरापगड जातींचा या विचारप्रसारामध्ये असलेला सहभाग. जातीची उतरंड भेदत केवळ माणसांकडून साहित्यनिर्मिती झाली. संतपदासाठी जात ही अट न ठरता प्रतिभा ही अट ठरली. चंद्रभागेत डुबकी मारणार्या सर्वांची जात एकच झाली आणि या भव्य खेळात भाग घेणारे म्हणून गेले -
वर्ण अभिमान विसरली याती, एक एका लोटांगणी जाती
निर्मळ चित्ते झाली नवनीते, पाषाणा पाझर सुटती रे
जातीपातीच्या, अभिमानाच्या जनामनातील सीमा उल्लंघण्याचे काम वारकरीसंप्रदायाकरवी जितके प्रभावी झाले तितके जातपातविरोधी सरकारी कायद्यांनीसुद्धा झाले नसेल! या प्रभावीपणाचे कारण एकच - हे जनतेवर लादलेले नव्हते, तर जनतेतूनच स्वयंभू आलेले होते. संतविचार हा केवळ समाजपोषकच नव्हे, तर समाजास एकसंध करणारा होता. त्याअर्थी तो समाजाची धारणा करणारा होता.
तसे पाहिले तर संतांचे अस्तित्व म्हणजे तत्कालीन समाजाची भूमिगत चळवळच म्हणता येईल. अन्यायी परिस्थितीचा सामना करण्यासाठी समाजातूनच स्वयंस्फूर्तीने पुढे आलेले नेते म्हणजे संत. अवीट गोडीची, सहज गुणगुणता येणारी ’क्रांतीगीते’ निर्माण करून त्यांनी हे भूमिगत आंदोलन धगधगते ठेवले. तेही थोडीथोडकी नव्हे, तर शेकडो वर्षे अव्याहतपणे. कुठलेही प्रसारमाध्यम जे करु शकणार नाही, कितीही जाहिरातबाजी जे करु शकणार नाही, कुठलीही भाषणे जे करु शकणार नाहीत, ते संतसाहित्याच्या अंगभूत खुमारीने करुन दाखवले. बरे यांस प्रतिकार तरी कसा करणार? कारण गंमत अशी की असे आंदोलन पेटले आहे हेच मुळी कुठे कसे कळेल? छे! छे! हे कसले आंदोलन? सामान्य माणूस देवाधर्माच्या गोष्टी करतोय एवढेच. हे आंदोलन सत्ता उलथण्यासाठी नव्हेच, तर सत्ता कशीही असो, त्या सत्तेखाली राहून आम्ही आमचे सत्व आणि स्वत्व कायम राखावे, यासाठीचे हे आंदोलन. सत्ता अक्षम असो, पण समाज सदोदितच सक्षम रहावा म्हणून ही विचारचळवळ. ’सदोदित’ हा शब्द महत्त्वाचा. आजच्या भाषेत सांगायचे झाले तर ’सस्टेनेबल सोशल एम्पॉवरमेंट’! संतांच्या धूर्तपणापुढे कुठल्याही जुलमाने हात टेकावेत अशीच ही परिस्थिती. जुलमी जहागिरदार आले गेले, अन्यायी सत्ताधारी आले गेले, पण समाजास पोषक, समाजास धारक अशा विचारांची ज्योत मनामनात पेटतीच राहिली - ’जाणे अज मी अजर, अक्षय मी अक्षर...’
आजोबा काळ्या पत्थराच्या विठोबावर काम करतात. वीटेवर उभा असलेला साधा देव. कंबरेवर हात ठेवून शतकानुशतके उभा आहे. का म्हणे, तर आईवडिलांच्या सेवेत पूर्ण मग्न असलेल्या भक्ताचे लक्ष आपल्याकडे कधी जाते याची वाट बघत. इतर वेळी भक्त वाट पाहतो की देवाचे आपल्याकडे कधी लक्ष जाते, हा मात्र भक्ताचे लक्ष आपल्याकडे कधी जाते याची वाट बघणारा असा जगावेगळा देव. त्याच्या त्या धीराने उभे राहण्यातच किती आश्वासकता आहे. तो सांगतोय, पहा मी तर तुमच्यासाठी कधीचाच उभा आहे, फक्त तुम्ही लक्ष देण्याची गरज आहे. लाचार आहे तो देव, भक्त नाही. सत्तास्थानी आहे तो भक्त, देव नाही. सामान्य माणसाला असे 'सत्तास्थान' देणारा हा जगावेगळा देव. ज्या समाजाची मानखंडना होत असते अश्या समाजास आधार देणारा चपखल देव. गंमत तरी पहा, याच्या हाती एकही शस्त्र नाही. विनोबांनी हे मर्म अचूक पकडले. हा हिंसेचा आधार घेणारा देव नाही, शस्त्र याचे शस्त्र नाही. तुमच्या-आमच्यासारखी सामान्य माणसे तरी कुठे शस्त्रांशी परिचित असतात? आपल्या हाती असलेल्या शस्त्राची आपल्यालाच भीती वाटते असे आपण. तर शस्त्रे नसलेला देव. याचे हातही सरळ अंगासरशी सोडलेले नाहीत. कंबरेवर हात ठेवून तोल सांभाळत उभा आहे बिचारा. स्वत:चा तोल सांभाळण्यासाठी कुठल्याही परक्या गोष्टीचा आधार न घेणारा, स्वत:च स्वत:चा तोल सांभाळायचा असतो हे दाखवून देणारा विठोबा. एवढेच नाही, तर विनोबा म्हणतात, कंबरेवर हात ठेवून विठोबा जगाला सांगतोय, अरे बघा, हा भवसागर माझ्या कंबरेएवढाच आहे, मी तुम्हाला तो तरून जाण्यास मदत करतो. काय गंमत आहे! ग्रामीण भाषेत विठोबाचा इटोबा किंवा इटुबा होतो. तेही बरोबरच आहे. जिचा आधार घ्यावा लागून उभे रहावेच लागले पंढरीत शतकानुशतके... ती वीट. संतांनी कुठे डोकी टेकवली, तर वीटेवर. वारकर्यांनी कुठे डोकी टेकवली, तर वीटेवरच. तेव्हा आपण विटोबाचे वारकरी, यात चूक काय?
ज्ञानोबांच्या चेहर्यावरून प्रेमाने हात फिरवणार्या आजोबांना बघताना विचार येतो, संतांप्रती आपली एवढी आत्मीयता का असेल? एवढे जनप्रेम का मिळाले असेल त्यांना? मग विचार येतो, संत म्हणजे तरी नक्की कोण? अपर, अद्भुत असे देणे घेऊन आलेले लोक अनेक असतात, पण जे घेऊन आलो आहे ते वास्तविकत: इतरांना 'देणे' आहे याची जाणीव असलेले लोक संत म्हणावेत. त्यांना जे नेणीवेपलिकडचे गवसले असेल, ते आमच्या जाणीवांपर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी त्यांनी उचलली. ते आम्ही कितपत घेतले याचा हिशेब आम्हीच मांडायचा आहे. तो हिशेब जमाखाती असो वा नसो, ही जबाबदारी पार पाडण्यायोगे समाजाचे जे धारणपोषण झाले आणि अवीट गोडीची अक्षरे निर्माण झाली त्यांस तोड नाही.
चित्राची डागडुजी होत राहते. ब्रशच्या फटकार्यांसरशी कॅनव्हासवर प्रकाश-सावल्या लपंडाव खेळत राहतात. चलबिचलत्या ओलसर रंगांचे तरलभाव हळूहळू स्थिर होत जातात. ज्ञानातुकाचे चेहरे गूढ आश्वासक होत जातात. त्यांची तेजोवलये सावकाश मागील अवकाशात मिसळून जातात. एका क्षणी चित्रासमोरचे आजोबा आणि मागे उभा असलेला विठोबा दोघेही सारखेच तल्लीन भासतात...
आजोबा चित्रावर काम करतात.
ब्रशची एकेक तान, एकेक आलाप
समोर राहते उभी
जोजवतात कधी कॅनव्हासला
आणि दोन पावले मागे सरुन
हळूच
ऐकतात कुठलातरी अनादिताल ...
ज्ञानियाची विश्रब्ध मुद्रा
रसरसून उठते अन्
पोक्त जाणते हलके स्मित
उमटत राहते तुक्याच्या गालावर ...
न जाणे कसले गूढ अमोल
लेवून येतात भाळावर
अरुपाचे रुप डुलत राहते
आजोबांच्या मनातल्या तालावर.
- अरभाट
प्रतिसाद
सुरेख उतरला आहे लेख. खूप
सुरेख उतरला आहे लेख. खूप आवडला.
खूप आवडला लेख.
खूप आवडला लेख.
सगळी थॉट प्रोसेस आवडली.
सगळी थॉट प्रोसेस आवडली. शेवट्च्या ओळी खासचः
ज्ञानियाची विश्रब्ध मुद्रा
रसरसून उठते अन्
पोक्त जाणते हलके स्मित
उमटत राहते तुक्याच्या गालावर ...
न जाणे कसले गूढ अमोल
लेवून येतात भाळावर
अरुपाचे रुप डुलत राहते
आजोबांच्या मनातल्या तालावर.
अप्रतिम लेख! >>इतरांना 'देणे'
अप्रतिम लेख!
>>इतरांना 'देणे' आहे याची जाणीव असलेले लोक संत म्हणावेत.>>
क्या बात है!
खासच
खासच
धन्यवाद अरभाट, इतका सुंदर
धन्यवाद अरभाट, इतका सुंदर वाचनानंद दिलात.
सुरेख!!
सुरेख!!
छान.
छान.
अप्रतिम!!
अप्रतिम!!
सुरेख
सुरेख :)
भारी लिहीलंय..
भारी लिहीलंय..
खूप आवडला लेख.
खूप आवडला लेख.
छान!
छान!