चित्रपट संग्रह - विलास पाटील

वि

लास पाटील हे साहित्याचे अतिशय उत्तम प्राध्यापक. पण पुस्तकांबरोबरच चित्रपटांचा संग्रह करण्याचा त्यांचा छंद. त्यांच्याकडे अंदाजे ५००० चित्रपट व्हीडिओ कॅसेट, डीव्हीडी अशा स्वरुपात उपलब्ध आहेत. यात अतिशय दुर्मिळ चित्रपटांचाही समावेश होतो. चित्रपटाचा नुसता संग्रहच नाही तर, त्याच वेडापायी घराच्या गच्चीवर एक ओपन एअर थिएटरही त्यांनी बांधलेलं आहे आणि नामवंत मंडळींनी तिथे अभिजात चित्रपटांचा आस्वाद घेतला आहे. या छंदाबद्द्ल ऐकूयात त्यांच्याचकडून --

VP.jpg

चित्रपटाची आवड कशी निर्माण झाली हे सांगायचं झालं तर माझ्या वडिलांना चित्रपटाची खूप आवड होती. आमच्या लहानपणी इंग्लीश चित्रपटांचे मॅटिनी शो असायचे. माझे वडील रोज त्या शोला न चुकता जायचे. त्यांच्यामुळे मलाही चित्रपट एवढे आवडायला लागले की कित्येकवेळा शाळांना बुट्ट्या मारुन मी चित्रपटांना जायचो. लहानपणीच ते चित्रपटाचे वेड इतके माझ्या डोक्यात भरले की मला असे वाटायचे की आपण पळून जावे मुंबईला आणि चित्रपटात काम करावं. त्यावेळी आमच्या वाचनात आलेलं होतं की देवानंदनं खिशात अवघे ५-६ रुपये घेऊन चित्रपटसृष्टीत प्रवेश केला आणि पुढे तो केवढा प्रसिद्ध झाला. त्यामुळे आमच्या डोक्यातही तेवढेच असायचं की पळून जाऊन चित्रपटजगतात जायचं. त्यावेळी मग वडील रागवायचे. ते म्हणायचे, 'अरे, माणूस शिकलेला पाहिजे. अगोदर तू शिक आणि मग काय पाहिजे ते कर'. पण एकूणच चित्रपटाचं वेड माझ्या रक्तातच होतं.

त्या काळात चित्रपट फिल्मवर असायचे. एखाद्या वेळी फिल्म प्रोजेक्टरवर दाखवताना अचानक पट्टी तुटायची किंवा जळायची. मग तो तुटलेला भाग छाटून ती मोठी पट्टी परत एकमेकांना जोडली जायची आणि हे जे कापलेले तुकडे आहेत ते बाजूला करुन विकायला दिले जायचे. मी ज्या चाळीत रहायचो तिथे बंबईवाला नावाचा एक फेरीवाला गाड्यावर वेगवेगळी खेळणी घेउन यायचा. त्याच्याजवळ हे फिल्मचे लहान लहान तुकडे असायचे. दुर्बिणीसारख्या एका खेळण्यातून त्या फिल्म बघायला मला खूप आवडायचे. मग हळूहळू मला वाटायला लागलं की आपण पडद्यावर ते दाखवावं. मी वडिलांची बॅटरी घेऊन समोर ते फिल्मचे तुकडे ठेवून भितींवरील पडद्यावर ते दाखवायचा प्रयत्न करायचो. त्यावेळी मी बर्‍याच फिल्मचे वगैरे तुकडे जुळवले होते. त्यातूनच मग पुढे स्वतःचा चित्रपटाचा संग्रह असावा असं वाटायला लागलं आणि मी वेगवेगळे चित्रपट जमवायला सुरुवात केली.

अगदी सुरुवातीला जमाना होता व्हिडीओ कॅसेटचा. त्यावेळी आम्ही सोलापूरमध्ये राहात होतो. मला आठवतंय, एका थिएटरात व्हिसीआर आणि व्हिडीओ कॅसेट डेमॉन्स्ट्रेशन दाखवलं होतं. ते पाहायला मी माझ्या धाकट्या मुलालाही घेऊन गेलो होतो. तिथे व्हिडीओ कॅसेटवरुन टिव्हीवर चित्रपट दिसत होता आणि ते अशी माहिती देत होते की ही व्हिडीओ कॅसेट सध्या हजार रुपयाला आहे आणि पुढे खूपच स्वस्त होईल, त्याच्या लायब्रर्‍यापण निघतील. ते पाहून मी माझ्या मुलाला म्हटले की तो कालखंड उगवलेला बहुधा तुझा मुलगाच बघेल. त्यावेळी मला पुसटशी कल्पनाही नव्हती की जग इतक्या झपाट्याने बदलेल की व्हिडीओ कॅसेटचा जमाना येईल, लायब्रर्‍या येतील आणि जातीलही, आणि पुढे डीव्हीडी चा जमाना येईल. सुरुवातीला मी व्हिसीआर घेतला, व्हिडीओ कॅसेट घ्यायला लागलो आणि संग्रह करायला सुरुवात केली. पुढे व्हिसीडी आल्या. त्या जमवायला लागलो आणि त्यानंतर डीव्हीडी रूपात मी चित्रपटाचा संग्रह केला. या मधल्या काळात माझ्याकडच्या अनेक व्हिडीओ कॅसेटचं मी स्वतः संगणक शिकून डीव्हीडी मधे रुपांतर केले.
प्रथमतः माझी आवड ही फक्त हॉलिवूड चित्रपटांपुरती मर्यादीत होती. पण नंतर फिल्म फेस्टिवल मधे जागतिक चित्रपट पण पहायला लागलो तेव्हा माझ्या अभिरुचीला जबरदस्त धक्का बसला. हॉलिवूडच्या चित्रपटांनाही थक्क करणार्‍या, धक्का देणार्‍या आणि वेगळा प्रवाह जोपासणार्‍या चीन,जपान, किंवा आंतरराष्ट्रीय दर्जाचे चित्रपट बनवण्यात आघाडीवर असलेल्या इराण अश्या वेगवेगळ्या देशांचे चित्रपट गोळा करत गेलो आणि माझा संग्रह समृद्ध होत गेला.

पूर्वीच्या काळी चित्रपट जमवणं सोपं नव्हतं. एक अगदी गमतीची गोष्ट आहे. मी राहत होतो सोलापूरात. आणि कुठलीही गोष्ट सोलापूरमध्ये खूप उशीरा यायची. पुणे /मुंबई आणि त्यातल्या त्यात मुंबई हे त्याचे केंद्र होते. मुंबईमध्ये सुशीलकुमार शिंदे हे मंत्री होते आणि मी त्यांना भेटायला मलबार हिल वर जात असे. त्या मलबार हिलच्या पायथ्याशी शेमारू म्हणून एक लायब्ररी होती, त्यांच्याकडे चित्रपटांचा मोठा संग्रह होता आणि ते भाड्याने द्यायचे. रोज दहा रुपये भाडं असायचं. तर मी सुशीलकुमारचा मित्र आहे हे त्यांना कळल्यानंतर ते एका वेळेला दहा पंधरा कॅसेट्स मला देत असत.त्या कॅसेट्स सोलापूरला जाऊन बघून पाठवेपर्यंत पंधरा दिवस व्हायचे. ते माझ्याकडून दहाच रुपये घ्यायचे. पण हे कॅसेट घ्यायला मुंबईला जाऊन येणं मला त्रासाचं होतं. सोलापूर मध्ये एक कंडक्टर होता तो एस टी मध्ये पुण्यापर्यंत असायचा. मग पुण्यामध्ये गाडी सोडली की तो त्याच गाडीमध्ये झोपून मुंबईला यायचा आणि सुशीलकुमारांची कामे असली तर त्यांच्या बंगल्यावर जायचा. मग मी त्याला त्या व्हिडीओ कॅसेट चित्रपटांची नावं कळवायचो. मग तो घेऊन येऊन देई. पुढच्या फेरीपर्यंत मी सर्व हे चित्रपट पाहिलेले असायचे आणि मग मी ते माझे घेऊन जाऊन दुसरे घेऊन यायचो. पुढे त्या शेमारूने ते चित्रपट रेकॉर्ड करून द्यायला सुरुवात केली. सुरुवातीला मी त्यांच्याकडून चित्रपट घेत होतो.

काही व्हिडीओ कॅसेट्स मी परदेशातूनही मागवल्या. माझा मुलगा अमेरिकेत स्थायिक होता, तेव्हा जे दुर्मिळ चित्रपट होते ते मी त्याच्याकडून मागवले आणि मी अमेरिकेला जेव्हा गेलो तेव्हा इतर काही आणण्यापेक्षा मी बॅगभरून चित्रपटच घेऊन आलो. मुलाचे कोणीही मित्र इकडे भारतात यायला निघाले की माझे सांगितलेले चित्रपट तो पाठवून द्यायचा. पूर्वी व्हिडीओ कॅसेट पाठवायचा मग डीव्हीडी पाठवायला लागला. आतातर इंटरनेट वरती जेव्हा पाहिजे तेव्हा हवा तो चित्रपट उपलब्ध असतो. व्हिडीओ कॅसेट काही दिवसानी बुरशी लागून खराब होते. त्यामुळे ती रिवाईंड फॉरवर्ड करून ठेवावी लागायची सारखी. पण सोलापूर मध्ये हवा एकदम कोरडी होती, त्यामुळे बुरशी लागायची नाही. पुढे जेव्हा व्हीसीडी आल्या तेव्हा मी ताबडतोब स्वतः शिकून त्याचं रुपांतर सीडीवरती केल्यामुळं त्याला कुठलाही प्रश्न आला नाही. माझ्या घरी व्हिडीओ कॅसेट्सच्या संग्रहामुळे घर, कॉटच्या खालचे कप्पे असे सगळे भरलेले होते. हे इतकं घरामध्ये झालं की एखादेवेळी बायको असं म्हणण्याची शक्यता होती की आपण घराच्या बाहेर राहूयात, तुमच्या व्हिडीओ कॅसेट्सच घरात राहतील.

कुठलीही गोष्ट आपल्याला मिळालेली नसेल आणि ती प्राप्त करून घेण्यासाठी आपण जी धडपड करत असतो त्याच्यामध्ये एक विलक्षण आनंद आहे. काही इतक्या दुर्मिळ फिल्म होत्या की त्या मिळता मिळायच्या नाहीत. तेव्हा त्या कुठूनतरी शोधून काढल्याशिवाय चैन पडायचे नाही. मग एकदा मिळाल्या की त्याचं महत्त्व कमी व्हायचं. मग परत जे मिळत नाही त्याच्या मागं लागायचं. अशाप्रकारे मी देशोदेशीच्या अत्यंत दुर्मिळ अशा फिल्म्स मिळवल्या. 'पोस्टमन इन माऊंटन' हा जो चित्रपट होता त्याचं नाव मी खूप ऐकलेलं होतं. एकदा किशोर कदम सोलापूरला माझ्याकडे आला होता, तेव्हा तो म्हणाला, "तुमच्याकडे पोस्टमन इन माऊंटन आहे का?" तर माझ्याकडे तो चित्रपट नव्हता. मग मोठ्या प्रयत्नाने तो चित्रपट मिळवला. तेव्हा मला अगदी आनंद वाटला. एक 'ट्वेंटिफिफ्थ अवर' नावाचा चित्रपट, एका फ्रेंच डायरेक्टरने केलेला. तो मिळता मिळत नव्हता. मी अगदी देशोदेशी त्याची चौकशी करत होतो. आणि तो जेव्हा मला मिळाला तेव्हाच मला समाधान मिळालं. फ्रान्सने १९२५ साली 'नेपोलिअन' नावाचा एक पाच तासाचा चित्रपट काढला होता. माझी पुस्तकं ज्या बाई छापायच्या, त्या गेल्या फ्रान्समध्ये. त्यांना मी आणायला सांगितला होता हा चित्रपट आणि त्यांना सांगितलं होतं, त्याची छोटी दीड तासाची फिल्म आहे ती आणू नका, मला पाच तासांचीच पाहिजे आहे. आणि तरी त्यांनी ती दीड तासाची आणली. आता मला फुकट त्याचे पैसे द्यावे लागले असते. पण माझ्या सुदैवानं विमानामध्ये त्यांच्या बॅग मधून कुणीतरी ती मारली आणि त्यामुळं मी त्या पैशातून बचावलो. नंतर मग मला तो चित्रपट पाच तासांचा मिळाला आणि मला विलक्षण आनंद झाला.

सुदैवानं माझी बायको याला विरोध करणारी नव्हती. ती जागतिक चित्रपटांची चाहती अशी नव्हती. पण एक बरं झालं, की आम्ही जेव्हा पुण्याच्या आशय फिल्म चे मेंबर झालो आणि त्या आशय फिल्म क्लब मध्ये ती चित्रपट पाहायला लागली. नंतर जागतिक फेस्टिवल व्हायला लागले तेव्हा तीही उत्साहाने माझ्याबरोबर त्या सिनेमाला येऊ लागली. माझ्या सुदैवाने मला बायको अशी मिळाली, की मी कुठे मुंबईला चित्रपट शोधताना उलथापालथी करत असेल तर माझी बायको बाजूला शांतपणे बसून राहायची. तेच ती साड्या आणायला गेली तर मला बसायला कंटाळा येतो. पण तिने असं केलं नाही त्याबद्दल मी तिचे फार आभार मानतो. आता माझ्या मोठ्या मुलानंही असा संग्रह करायला सुरुवात केलेली आहे. त्याचा स्वतंत्र संग्रह तो करतोय.

चित्रपट टिव्हीवर बघताना फार लहान असतो आणि सिनेमागृहात पडद्यावर बघताना खूप छान वाटते.
त्यामुळे मी जेव्हा फ्लॅट घेतला तेव्हा वरती मोठा टेरेस असलेला घेतला. टेरेस मधे ७०-८० लोक बसण्याची क्षमता आहे. मी तिथे सिनेमाच्या पडद्यासारखा पडदा होईल अशी भिंतच बांधून घेतली, प्रोजेक्टर घेतला आणि तिथे ओपन एअर थिएटर मधे सिनेमा पाहिल्यासारखे झाले. इथे मी इंटरनॅशनल फिल्म दाखवण्यासाठी अनेकांना आमंत्रित केले. तिथे मोठमोठी माणसे चित्रपट पाहायला आली. त्यामधे निळू फुले, डॉ. श्रीराम लागू, जयंत नारळीकर आले. अरविंद इनामदार यांना बोलावून 'वेन्सडे' हा दहशतवाद्यावरचा चित्रपट दाखवला आणि त्यावर चर्चासत्रंही घेतली.

हा माझा एवढा मोठा संग्रह आहे तर माझ्या नातीला पुढे त्यात किती आवड आहे हा प्रश्न आहे. नुसती आवड असणे वेगळे आणि वेड असणे वेगळे. आणि मी जर इथल्या फिल्म आर्काईव्हला द्यायचे ठरवले तर ते सरकारीबंधनात जाते. ते कुणाला देत नाहीत. तर त्यामुळे इथले फिल्म क्लब आहेत आणि क्लबला वाहून घेतलेली काही माणसे आहेत, त्यांना हा माझा संग्रह माझ्या वृद्धपणी देण्यात मला आनंद वाटेल.
इतके चित्रपट आहेत की अमुकच एक चांगला असे नाही. पण 'बायसिकल थीफ' सारखा चित्रपट कोणाला आवडला नाही, असे शक्यच नाही. चार्ली चॅप्लिनचे चित्रपट पण तसेच. चार्ली चॅप्लिन हा नुसता विनोदी नटच नव्हता तर तो एक तत्ववेत्ता होता. तो एक मानवतावादी महामानव होता. 'ट्वेंटिफिफ्थ अवर' नावाचा अँथनी क्वीन यांनी भूमिका केलेला चित्रपट मला खूप आवडतो. पण त्याला जागतिक उच्च दर्जाच्या चित्रपटात स्थान नाही, का नाही ते माहिती नाही, पण तो चित्रपट माझा अत्यंत आवडता चित्रपट आहे.

अनेक आवडते दिग्दर्शक आहेत माझे, पण डेव्हिड लीन हा फार मोठा दिग्दर्शक होता. हिचकॉक रहस्यमय चित्रपटामधे फार मोठा होता. पण आता एक आश्चर्याची गोष्ट म्हणजे जगातल्या जाणकार, अभिरुची संपन्न चित्रपट रसिकांना जर कुठले चित्रपट जास्त आवडतात तर ते इराणचे. इराणच्या माजिद माजिदी चे चित्रपट मला विलक्षण आवडतात आणि अत्यंत वेगळ्या अभिरुचीचे हे चित्रपट आहेत. तर असे अनेक मोठ मोठे जागतिक दिग्दर्शक आहेत आणि मला ते खूप खूप आवडतात.

लोकप्रिय चित्रपट वेगळे आणि अभिजात चित्रपट वेगळे. उदाहरणार्थ, मराठी मधे असे अनेक चित्रपट ऑस्करला पाठवले जातात आणि आपण त्याच्यावर खुश होतो की आमचा चित्रपट ऑस्करला गेला. पण पहिल्याच फेरीमधे ते चित्रपट गारद होतात. कारण जागतिक चित्रपटांचा दर्जा खूप उच्च असतो आणि त्यातून त्या त्या देशाच्या संस्कृतीचे दर्शन घडते. ह्या दृष्टीने अलिकडचा 'बाबु बेंडबाजा' नावाचा जागतिक स्पर्धेत पाठवण्याच्या योग्यतेचा होता. पण ते भान आपल्याकडच्यांना असतेच असे नाही. आणि त्या चित्रपटाच्या नावामुळे अनेकांची, त्या चित्रपटाच्या नावामुळे अनेकांची अशी गैरसमजूत होत असावी की मकरंद अनासपुरेच्या पोरकट चित्रपटांपैकीच तो एक असावा. हा चित्रपट मला अत्यंत आवडलेला होता आणि जागतिक स्पर्धेत तो निश्चितपणे पाठवण्याच्या योग्यतेचा होता. एक झालं आहे, की मराठी मधे नवीन चित्रपटांची लाट आली आहे. तिचे मूळ कारण ही मंडळी जागतिक फिल्म्स बघत आहेत. त्यामुळे वेगवेळ्या विषयांची निवड करुन अत्यंत वेगवेगळे चित्रपट करण्याची लाट आली आहे. त्यात मराठी तरी भारतात सर्वत्र आघाडीवर आहे.

चित्रपट मला इतके भावतात, कारण त्यात सर्व कलांचा संगम आहे. त्यामधे साहित्य आहे, कथाकादंबर्‍या आहेत. चित्रपट हे मोजक्या वेळेमधे नेमके मर्म सांगत असतो. चित्रपटामधे डायरेक्टर हजारो मीटर फिल्म शूट करतो आणि एडिटर ती कापून बरोबर लहान करतो, ह्याचा माझ्यावर परिणाम झाला. त्यामुळे माझे लेखन नेमकेपणाने, मोकळेपणाने आणि मर्म सांगण्यात माझी लेखणी तरबेज झाली. चित्रपटांचं माझ्या आयुष्यातलं स्थान खूप वरचं आहे!

शब्दांकन - अनीशा

हितगुज दिवाळी अंक २०१२ छंदमग्न सदरासाठी

प्रतिसाद

अगदी वेगळाच छंद.. आणि सोलापूर गावात असा माणूस असणे.. हा योगायोग नक्कीच नाही.

छान आहे लेख.
विलास पाटील ह्यांच्या छंदाची ओळख करुन दिल्याबद्दल अनीशा हिचेही आभार.

छान लेख. अनीशा धन्यवाद.

धन्यवाद अनीशा.

लेख आवडला..

अगदी सर्वांच्या आवडीचा छंद....